मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस बारा मावळांचा डोंगरमाथा चढून वर आला. जिजाऊंचे मन शंकांच्या कैक काळढगांनी भरून आले. राजगडावरच्या देवमहालात बसून त्या एक एक बेलपत्र समोरच्या शिवपिंडीवर वाहू लागल्या. त्यांच्या शेजारी बाळशंभू एका पाटावर बसले होते. भिंतीची कड धरून धाराऊ जिजाऊंच्यावर नजर ठेवून उभी होती.
दिवस चढतीला आला. मनच्या शंका बेलपत्रावर चढवून एक एक बिल्वदल शिवपिंडीवर वाहून वाहून जिजाबाई थकदिल झाल्या. बेलपत्रे सरतीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकांनी भरूनच राहिले! दिवस ऐन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तक जिजाऊंनी पिंडीभोवतीच्या शाळुंकेवर टेकविले. त्यांच्या चंद्रशांत डोळ्यांतून सरसरत पाणधारा उतरू लागल्या. उभे अंग थरथरू लागले. डोळ्यांतून ओघळत्या पाण्याबरोबर त्यांची वरकडची सगळी सगळी नाती वाहून गेली होती. उरला होता तो फक्त एकच लागेबंध - 'आऊपणाचा!' एकाच विचाराचा फासबंद त्यांचे प्राण त्यांच्या कुडीत कांडून टाकू लागला - आता आता माझे - - शिवबाराजे गड उतरून संकटाच्या कैचीत फसले तर नसतील !! रात्रभर तोफांचे आवाज झाले ते का ? "
जिजाबाई मान वर करीत नाहीत, त्यांचे उभे अंग थरथरते आहे, कोंदटले हुंदके पिंडीला वेढून टाकताहेत हे पाहून शंभूबाळ भेदरले. त्यांनी पुढे होऊन जिजाऊंना गद्गद् हलवीत हाक घातली- "थोरल्या आऊ ऽ! थोरल्या आऊ !' " थोरल्या आऊंना काही काही ऐकू येत नव्हते. त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी,
नेसूचा पायघोळ फरफटवीत तरातरा आपल्या महालाकडे निघून गेल्या. हात पसरून त्यांच्या मागे धावणाऱ्या बाळशंभूंना धाराऊने पुढे होत थोपवून धरले. त्यांना संगती घेऊन ती आपल्या दालनाकडे निघून गेली....
जिजाऊंनी आपल्या महालाचा दरवाजा आतून आडबंद घालून बंद केला. त्या पुरत्या पुरत्या एकट्या झाल्या. धाराऊच्या दालनात शंभूबाळ साफ गोंधळून गेले.
रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि गडाच्या मिटलेल्या पाली दरवाज्याजवळ एक फकीर आला. त्याने बाहेरून दरवाज्यावर तळहाताची तीन वेळा थाप भरली. आतल्या देवडीवाल्याला ऐकू जाईल अशा बेताने तो जाड, घोगऱ्या आवाजात म्हणाला, " आईचा भुत्या ! रानचा वारा!" तो परवलीचा बोल होता... देवडीवाल्याने तो बोल कान देऊन ऐकला आणि दरवाज्याची दिंडी खुली केली.
फकीर घाईने आत घुसला. तरातरा चालत तो पद्मावती माचीवर आला. सिदोजी थोपट्यांनी फकिराला ओळखले. तो होता हुन्नरबाज खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेकर! सिदोजी आणि विश्वास राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आले. सिदोजींनी जिजाऊंना आपण येत असल्याची वर्दी दिली.
जिजाऊ आपल्या महालात शंभूबाळांना शेजारी घेऊन बसल्या होत्या. दिवसभराच्या चिंता तापाने त्यांचा चेहरा ओढला होता. चिराखदानांच्या प्रकाशात तो विचित्र दिसत होता. सिदोजी आणि विश्वास जिजाऊच्या महालात गेले.
एका फकिराला सिदोजी संगती पाहून जिजाऊ धरकल्या. त्या मंचकावरून तडक उठल्या. सिदोजीने व विश्वासने त्यांना अदबमुजरे केले. जिजाऊ क्षणभर गोंधळल्या. दुसऱ्याच क्षणी त्यांनी विश्वासला ओळखले. भीतीने थरथरत त्या खेचल्या आवाजात कसेबसे म्हणाल्या विश्वाऽस!.
मुजन्यासाठी वाकलेला विश्वास ताठ खडा झाला. दूर धावणी घेऊन आलेल्या विश्वासच्या उसळत्या तोंडातून मावळी रांगडे बोल उसळले - "मासाब, त्वांड ग्वाड करा! जगदंबेनं तारलं समद्यास्नी. राजांनी चलाखीनं खान सफै फोडला! वाघनख्या चालवून धन्यांनी खानाचा पोटला भर काढला! संभाजी कावजीनं खानाचं गर्दन तेगीच्या एका फटक्यात धडागुणं क्येलं! खानाचं गर्दन प्रतापगडाच्या सदरंवर हाय ! धड़ जनीच्या टेंब्यावर गडाच्या पायथ्याला धूळ खात पडलंय! खानाचा पारावरचा बारा - हजारांचा तळ जेधे सिलबकर, भोसले-पासलकरांनी येरगाटून टाकलाय ! हातोहातीच्या हत्यारवालीला जावळी खोऱ्यात त्वांड फुटलंय ! सरलष्करांची घोडी बाईच्या रोखानं दौड घेत गेल्यात! खान समद्या जमेतीनिशी पार बुडाला ! आपली फते झाली !!! "
विश्वासचे बोल ऐकताना जिजाबाईंच्या डोळ्यांतून सरसर आनंदाचे अश्रू ओघळू लागले. मागे वळून शंभूच्या कानशिलाजवळ हाताची बोटे नेत ती जिजाऊंनी आपल्या कानशिलाजवळ आणून मोडली. शंभूंना उचलून घेत त्या विश्वासला म्हणाल्या, "विश्वास, सदरेवर चल. तुझ्या या खबरीची कदर आम्ही करणार आहोत.'
उचलून घेतलेल्या बाळराजांना जिजाबाई न राहवून म्हणाल्या "खान म्हणजे काय म्हणून विचारता ! जो सर्वांना खायला टपलेला असतो पण ज्याला कुणीतरी त्याच्या सर्वांसह खाऊन जातो त्याला खान म्हणतात बाळराजे!" बाळशंभूंना ते काही उमगले नाही !
प्रतापगडावरून जिऊ महाला राजगडावर आला. वाकाच्या शिंकाळ्यात घातलेले विजल्या, काळपट रक्तओघळांचे खानाचे शिर त्याने आपल्या संगती गडावर आणले होते. जिजाऊंनी नजरेखाली घालावे म्हणून जिऊने ते एका तबकात ठेवून ते तबक सरपोसाने झाकून टाकले. एका चौरंगावर ते तबक ठेवून तो चौरंग राजसदरेच्या फरसबंदीवर मांडण्यात आला. गडावरचा सारा मावळलोक खान बघण्यासाठी बालेकिल्ल्याच्या सदरेवर लोटला होता. डाव्या हाती शंभूंचा हात धरून जिजाबाई सदरदाखल झाल्या. सायांनी मुजरे झाडले. जिजाबाई शंभूसह सदरबैठकीवर बसत म्हणाल्या, "जिवा, दूरची घावणी घेतलीस. काही खाल्लंस ? ""न्हाई मासाब, प्वाट भरलंय माजं!" म्हणत जिवाने चौरंगावरच्या तबकाचा सरपोस दूर सारला. कमरेत वाकून जिवा बोलला, "ही भेट धन्यानी मासाहेबांच्या रुजवातीला धाडलिया !"
खानाचे रक्त ओघळांत गोठलेले, डोळ्यांच्या कवड्या अर्धवट उपड्या टाकलेले, वासलेले शिर बघताच कपाळावरचे आडवे कुंकू ताणीत जिजाबाई बैठकीवरून तड़क उठल्या. त्यांच्या नाकपुड्या विस्फारल्या गेल्या. श्वास चढा झाला. ओठ क्षणभर थरथरले.
" अफजलखान ! जसं पेरावं तसंच उगवतं " त्यांच्या ओठातून थरथरते बोल निसटले. या याच खानाने गेली कैक वर्षे जिजाऊच्या काळजाला मरणभयाच्या जळवा ओडून दिल्या होत्या.
क्षणभरातच जिजाऊंनी आपला संताप सावरला. पुन्हा बैठकीवर बसत त्यांनी आज्ञा केली, "सिदोजीराव हे शिर पिंजऱ्यात घालून गडाच्या पाली दरवाज्यावरच्या कोनाड्यात ठेवा. आठरा कारखान्यांचे लोक त्याचं दर्शन घेतील. त्याची पूजा करून इतमामानानं त्याचं दफन करा. गनिम संपला गनिमी संपली !
जिजाबाईंच्या तर्फेला बसलेले शंभूबाळ डोळे ताणून केव्हाचे खानाच्या शिराकडे एकटक बघत होते. अनेक सवालांचे पलोते त्यांच्या मनात खडे झाले. "आबा या खानाच्या भेटीला गेले होते. याला हात-पाय काहीच नसता त्यांनी याची भेट कशी घेतली असेल ? थोरल्या आऊ म्हणाल्या "जो दुसन्यास खायला टपतो पण " ज्याला कुणीच खात नसतो तो खान! मग त्यांनी हे का नाही सांगितलं की ज्यास हातपाय नसतात ते नुसते मुंडके म्हणजे खान !! जो घोड्यावर मांड न घेता तबकावर बसतो तो खान !"
शेवटी न राहवून बाळराजांनी जिजाबाईंना विचारलेच, “धाराऊ म्हणत होती खान मोठ्ठा आहे. तर मग हा एवढाच कसा ? " त्यांच्या अचानक सवालाने सारी सदर हसली. बाळराजे गोंधळून गेले. जिजाऊ त्यांचा खांदा थोपटीत शांतपणे म्हणाल्या, “तुमच्या आबांनी जमला तेवढा खान आणला. तुम्ही याहून मोठा आणा! " शंभूबाळांना ही तोड मात्र मनोमन मानवली!