"चला मंडळी." म्हणत राजे सदरचौकाबाहेर पडू लागले. निम्मीशिम्मी फरसबंदी ते चालून गेले असतील नसतील तोच रणशिंगाच्या ललकारीसारखी मायेच्या जरबेने थब्धबलेली साद सदरेच्या बाजूने त्यांच्या कानावर पडली, "शिवबा 5! आमची गाठभेटी न घेता चाललात! आम्हांस पाठमोरे झालात ? "
पाठीवर थाप भरणाऱ्या, चंदी खरारा करणाचा घोडेपारख्याने मागून इशारतीची साद घालताच जातिवंत अरबी घोडा भरल्या कानाने मोहरा फिरवतो तसे राजे गर्रकन वळले! तरातरा चालत त्यांनी सदरपायच्या मागे टाकल्या. त्यांच्या केशरी टोपात जडलेली मोतीलग लडालड हिंदकळत होती. छातीवरच्या कवड्यांच्या माळेला हबके बसत होते. जिजाऊंच्या डोळ्यांना डोळा भिडविण्याचा त्यांना धीर होत नव्हता. तड़क जाऊन त्यांनी आपल्या मासाहेबांच्या सात्त्विक गोऱ्या पायांवर आपले मस्तक विसावले.
त्यांचे खांदे मायेने पकडून त्यांना उठवीत जिजाऊ म्हणाल्या, "उठा, कोण म्हणतं आम्ही तुम्हांस रोखून धरणार ? भोसल्यांचा कविला कधीच कचदिल नव्हता. असणार नाही! सुखे जा. आमच्या शंभूबाळांचे तुमच्या दादामहाराजांचे पुरते उसने घ्या. खानाचा खातमा करा आणि ध्यानात ठेवा आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहेत. घ्या.' म्हणत जिजाबाईंनी धाराऊकडे पाहिले. तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली. जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी तळहातावर ठेवल्या. त्या ओठांआड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यांत पाहिले. त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे!
"या. औक्षवंत व्हा. आई अंबा तुम्हास यश देणार थोर आहे!” जिजाऊंनी राजांना आपल्या मिठीत घेतले. कसल्यातरी अज्ञात विजेने आपल्या उराचा भाता ठासून भरला जातो आहे असे राजांना वाटले. "
“येतो आम्ही! ” म्हणत राजे मिठीतून मोकळे झाले. "मासाहेब, शंभूबाळांना जपा. गोमाजीबाबा, फिरंगोजीबाबा, सिदोजीराव तुमच्या दिमतीला मागं ठेवतो आहोत. जय भवानी !"
शांत चालीने राजे आपल्या खाशा मंडळींसह सदरचौकाबाहेर पडले. राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून निघून पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडावर आले. चार तगड्या मावळ्यांनी पुढे सरसावत त्या भुयारावरची भक्कम धोंड दूर हटवली. पेटत्या मशाली घेतलेले दोन मशालजी भुयारात उतरले. त्यांच्या पाठोपाठ छातीवर उजवा हात भिडवीत राजे उतरले. मशालींच्या प्रकाशात ते पद्मावती माचीकडे चालू लागले. त्यांच्या मनात कैक विचार दौड घेत होते- “आमच्या भोवती असंच भुयार आहे. खानाच्या बळजोर फौजेचं! असाच अंधार दबा धरून आहे... दगाबाज फितवेखोरांचा! एकच आधार आहे. मशालीचा. आई भवानीच्या आशीर्वादाचा !!' "
भुयार पार झाले. राजे पद्मावती माचीवर आले. त्यांनी मागे राहणाऱ्या मंडळींना बारीकसारीक सूचना केल्या. माचीवरच्या पद्मावती देवीचे दर्शन घेतले. निवडक असामींसह ते माची सोडून पाली दरवाज्याने गडपायथ्याशी आले. एकदा त्यांनी राजगडावर नजर जोडली. घोड्याच्या जिनावर मांड घेऊन टाच मारली. राजांची घोडेतुकडी प्रतापगडाचा रोख ठेवून दौडू लागली. बालेकिल्ल्याच्या तटबंदीपाशी जिजाबाई शंभूबाळांना घेऊन उभ्या होत्या. त्यांना धूळ फेकीत दूर जाणाऱ्या जनावरांचे फक्त ठिपके दिसत होते.
रात्रभर जिजाबाई आपल्या महालातील मंचकावर पडून वरच्या दगडी तक्तपोशीकडे एकनजर बघत होत्या. भलभलते विचार त्यांना हैराण करीत होते. विचारांची ओढ असहा झाली की, त्या आपल्या कुशीत सुख झालेल्या शंभूबाळांच्या पाठीवरून हात फिरवीत होत्या. त्यांचा धाकुटपणा जिजाऊंना पिळवटून काढीत होता. निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या, "भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही." पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू हा एकुलता एक अंकुर बघताना आता त्यांना वाटत होते की, "भोसल्यांच्या कबिल्याला इंगळास वाशिंग बांधूनच घरभरणीचे माप लोटून येणे पडते. पण... पण भोसल्यांच्या बाळवशाला हा कसला शाप ? लहानपणी शिवबांच्या पाठीवर अशीच संकटांची घोडदौड पडली. आता त्यांच्या या अजाण पोरावर अशीच संकटे मोहरा धरून चाल घेताहेत. 'हे विचारतात खान म्हणजे काय ? कोण आणि कशी यांची समजूत घालणार ? आपल्या गेल्या आऊंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आभाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात! कोण आणि कसं यांच्या मनाच्या घोड्याची ओठाळी धरून त्याचा थोपा करणार ? धाराऊनं यांना दूध दिलं, आम्ही यांना माया देऊ, पण यांच्या मनच्या एकटेपणाला कोण आणि कशी धीराच जोडसंगत देणार ? आमचे शिवबाराजे पित्याच्या प्रेमास पारखे झाले. हे मातेच्या ममतेस मुकले. आता तर यांचे आबाच पणास लागले. अफजलच्या मनचा हेतू घातकी आहे. शिवबांचं काही बरं ऽऽ...'
त्या नुसत्या शंकेनंच लेटल्या जिजाबाई सर्रकन थरारल्या. जिजाऊंना काही काही सुचत नव्हते. कशाचा कशास मेळ पडत नव्हता. त्यांचा थरथरता हात झोपल्या शंभूच्या पाठीवरून फिरत होता. नुसताच फिरत होता.
राजगडावरच्या हमामखान्यात अंघोळ घालून पेहराव चढविलेल्या शंभूबाळांना धाराऊने जिजाऊंच्या महालात आणले. स्नानानंतर शंभूच्या कपाळी रोज जिजाऊच शिवगंध रेखीत असत.
शंभूंनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. धाराऊने गंध-अष्टगंधाचे तबक जिजाबाईंच्या हाताला येईल असे सरसे करून धरले. जिजाऊंनी शंभूबाळांच्या कपाळावर आडव्या माटाचे शिवगंध रेखले. त्या तेवढद्या शिवगंधानेही मूळचे देखणे असलेले बाळराजांचे रूपडे अधिकच राजसगोमटे दिसू लागले. ते बघताना जिजाबाईंना राजांच्या उभट मुद्रेची आठवण झाली. त्या एकटक शंभुंच्या शिवगंधरेखल्या कपाळाकडे बघू लागल्या. हे असेच शिवगंध त्या शिवबाराजांच्या बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या. शंभूंच्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला गंध रेखले की शिवबाराजांची आणि या शंभूबाळांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते! पण.... पण शिवलिंगावर सततचा जलाभिषेक होणे पडते. आई अंबे, तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या या शिवलिंगांच्या मस्तकावरून क्षणभरसुद्धा ढळवू नकोस. तार. आम्हा सान्यांना या वाक्या संकटातून तार! "
जिजाऊंनी शंभूबाळांना उचलून आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या मांडीवर शंभू होते, डोळ्यांसमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता !
राजांनी पाठविलेला निकराचा थैलीस्वार राजगडावर आला. जिजाऊंचे खाजगीचे कारभारी खलित्याचा मजकूर वाचून दाखवू लागले.. " अखंड सौभाग्यमंडित मातुश्री आऊसाहेब प्रति त्रिकाल चरणी मस्तक ठेवून सिवबाराजे यांचे दंडवत उपरी - विशेस खान फौजेसमेत कोयनाखोरीत पारावर तळ देऊन आहे. उदईक खानासवे भेटीचा प्रसंग पडला आहे. आम्हास आशीर्वाद द्यावा. शंभूबाळांना जपावे." जिजाबाई 'जगदंब, जगदंब' पुटपुटल्या. शंभूबाळांचा हात हाती धरून गडाच्या- तटबंदीवर आल्या. प्रतापगडच्या रोखाने नजर जोडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या.
त्यांचे मन सुन्न झाले होते...
त्या काहीच बोलत नाहीत म्हणून बाळराजांनीच त्यांना विचारले, "आबा खानाच्या " भेटीला गेलेत. मग ते त्याला घेऊनच का नाही येत इकडे ? '
जिजाबाईनी चमकून शंभूकडे पाहिले. "साखर पडो तुमच्या तोंडात " म्हणत जिजाबाई तटबंदीवरून महालाकडे परतल्या. मावळतीला कलतीला लागलेल्या सूयनि आभाळाचा पोटला फोडला होता! क्षितिजकडा लाललाल झाली होती.