सईबाईंचा निष्प्राण हात शंभूबाळांच्या हातातून निसटला! तो मायाळू, कृश हात
मंचकावरच्या बिछायतीवर कसनुसा होऊन कोसळला! त्यांच्या ओठांतील हताशतुळशीपत्र निसटून घरंगळत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर ओघळले. महालात एकच आक्रोश उठला. चिराखदानांच्या काजळल्या ज्योती ऊरफुटी थरथरल्या. भिंतीचे घडीव दगड शहारले.
" आऊ, आऊ ऽऽ" म्हणून भेदरट हाक घालीत शंभूबाळांनी सईबाईंचा पडला होत उचलून गद्गद हलविला. सगळा राणीवसा मंचकावर ओळांबून आक्रोशतो आहे हे पाहून भांबावलेले शंभूबाळ 'थोरल्या आऊऽ!' म्हणत जिजाबाईंना एकदम बिलगले. धाराऊने बाळराजांना महालाबाहेर काढले. सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भावगड ढासळला! एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला! मळवट भरल्या सईबाई नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या !!
सईबाईंनी राजगडावर देह ठेवला ही खबर ऐकताच पापण्या मिटून 'जगदंब, जगदंब' म्हणत अपार वेदनेने राजांनी छातीवर हात ठेवला. टाकोटाक ते प्रतापगडावरून राजगडी आले. त्यांच्या थोरल्या राणीच्या पेटत्या चितेबरोबर त्यांच्या एका सावळ्या, भावूक • मनसुब्याची चिता जळत होती. सईबाईच्या कैक रूपांच्या ज्वाला फरफरत होत्या. फर्जद शिवाजीराजे भोसले त्यांच्या दाहाने होरपळून निघत होते. तशा राजांच्या राणीवशात तर आणखी राणीसाहेब होत्या पण सईबाईंत त्यांच्या मनाचा दिललगाव गुंतवा झाला होता. वीराला पहिल्याने कमरेला जडलेली तलवार. आणि आपल्यासमोर बोहल्यावर चढलेली पहिली स्त्री विसरू म्हणता विसरता येत नाही! शब्दांना संकोच आणि डोळ्यांना संवाद अशी राजांची आणि सईबाईंची खानदानी मर्मजोड होती. भक्कम ऐटदार गडाला फेर धरून वळणदार माची असावी तसा तो राजस नातेबंध होता !
सईबाईंच्या जाण्याने राजगडावरचे देव नवरात्राच्या घटात बसण्याऐवजी सुतकात पडले, सालिना हसरा होणारा दसरा दुखरा झाला..
बजाजीमामांनी मायेने जावळ उतरलेल्या शंभूबाळांच्या मस्तकाचे सईबाईंच्यासाठी मुंडन झाले! त्यांची पोरवयाची चर्या त्यामुळे पोरकी दिसू लागली. ती पाहून गलबलून आलेल्या जिजाऊंनी त्यांना निर्धाराच्या मायेने जवळ घेतले. आता जिजाऊंनीच त्यांची 'आऊ' व्हायचे मनोमन ठरवून टाकले. भोसल्यांच्या तडा गेलेल्या सान्या तटबंदी सांधण्यासाठीच जिजाऊ त्या घराण्यात आल्या होत्या.
मुंडन झालेल्या बाळ शंभूंना जवळ घेऊन राजे आपल्या महालात मंचकावर बसले होते. त्यांचा एक हात शंभूच्या पाठीवरून आणि दुसरा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांवरून फिरत होता. त्यांच्या मनाला एका बाजूने सईबाईच्या आठवणींनी आणि दुसऱ्या बाजूने अफजलखानाच्या वाईतल्या तळाने वेढा टाकला होता. " आबा, आऊ कुठे गेल्या ?" शंभूबाळांनी राजांना विचारले. त्या सवालाने राजे थरथरले. त्यांच्याजवळ काही काही जाब नव्हता. अत्यंत मायेने ते आपल्या बाळराजांचा खांदा थोपटू लागले. त्यांच्या मनात हरभट ज्योतिषीबुवांचे बोल उसळी घेऊन उठले. 'पुराणांतरी रुद्र जसा आप्तगणाकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो !! '
शंभूकडे बघताना राजांच्या मनाची घालमेल झाली. एक विचित्र विचार त्यांना चाटून गेला, "उपजलात आणि धाराऊचे दूध तुमच्या वाट्यास आले ! पण- पण हयातीच्या पहिल्या चालीलाच तुम्ही आप्तगणाकडून असे फसले जाल याचा अंदाज काही ज्योतिष्यांनाही आला नसेल!" राजे बाळशंभूंचा खांदा नुसता थोपटीत होते आणि नुसते थोपटीतच राहिले!!
मराठी दौलतीच्या उरावर अफजलखानाचे भय वाईत दबा धरून बसले होते. खानाने पांढऱ्यांना शिरवळात, खराठ्यांना कन्हेच्या खोऱ्यात, जाधवांना सुपे परगण्यात, सिद्दी हिलालला पुणे प्रांतात आणि सैफखानाला तळकोकणात पेरून राजांना जखडबंद करून टाकण्याचा कावेबाज डाव टाकला होता.
ही तमाम कोंडी अंगावर घेऊन राजगडावरच ठाण ठेवणे हिसाबी नव्हते. त्यासाठी खानाच्या वाईच्या तळाची बगल धरून दाटलेले जावळीचे कुबल खोरे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. प्रसंग पडला तर त्या खोऱ्यातील प्रतापगडाच्या शिडीवरून मावळतीकडून त्यांना सिताब आणि सलामत कोकणपट्टीत उतरता येणे शक्य होते. रानसावजाची धडक त्याच्यापासून दूरच्या फासल्यावर राहून कधीच हुकविता येत नाही ! त्यासाठी त्याच्या अंगलटीला घासूनच हूल भरावी लागते! राजांनी वाईजवळ प्रतापगडाकडेच कूच व्हायचा मनसुबा धरला.
या बेतात आता पालट झाला असता तर तो केवळ मासाहेबांच्यामुळे! नुकत्याच सूनबाई गेल्या असताना कुसव्याची एकुलती एक यादगीर असलेल्या राजांना निरोपाच्या दहीकवड्या जिजाबाई देतील काय ? काय कल्लोळ माजेल त्या माउलीच्या काळजात ? थांबविण्यासाठी त्यांनी मायेचा पायगोवा घातला तर....!
ते सारेच टाळण्यासाठी, "राजगड सोडताना आऊसाहेब भेटीसाठी न येत तसे करावे" असा सल्ला खुद्द राजांनीच जिजाऊंच्या खाजगीच्या कारभाऱ्यांना दिला. तो देताना त्यांचा हात गळ्यातील माळेच्या कवड्यांवरून थरथरत फिरला. मनात विचारांच्या कवड्यांनी कितीतरी डाव टाकले.." आणि जर खानाच्या मोहिमेतून परतीची वाट आम्हास नाहीच दिसली तर !! तर सईच्या जात्या पायांचे ठसे आम्हास पुढच्या दौडीचा माग देतील! आणि मासाहेब आमच्या नावानं जगदंबेच्या भंडाऱ्याची चिमट शंभूबाळाच्या कपाळी भरून खाशा श्रींच्या राज्याची बेलरोटी उचलतील! भवानीनं तेवढं बळ त्यांच्या चिमटीत भरलं आहे !
"पण आमचे शंभूबाळ तो भंडारा पेलतील ? मातेवेगळा पोरका दिसणारा अश्राप जीव तो! छे ss! भोसला आणि पोरका ? होणं नाही. आमच्या महाराजसाहेबांना पोरपणीच घोड्यावर मांड घ्यावी लागली. आम्हीसुद्धा तसेच पुण्याच्या बरड जहागिरीत दाखल झालो. प्रसंग पडला तर त्याच वाटेवर शंभूबाळांनाही धावणी करावी लागेल. एकदा उपजताना 'जगदंब' म्हणून श्वास घेतला की, भोसल्यांना तो हयातभर इमानाची संगत करतो. मग पोरकंपण त्यांच्या वाटेला कधीच जात नाही!" राजांनी मन बांधले. ज्या पंखाखाली मायेच्या उवायात त्यांचा जीव पोसला तेच पंख कठोर मनाने दूर करणे भाग होते. त्याशिवाय निळ्या आभाळात भरारती झेप घेताच येत नाही! श्रींच्या राज्याचे स्वप्न रेखताना मायेच्या नात्याचे सत्य डोळ्यांआड सारावेच लागते. राजांना खाजगीची नाती नसतात! नाती नसणे हेच त्यांचे दौलतीशी नाते असते. राजांनी दौलतीचे नाते निवडले.
राजगड सोडण्याचा दिवस उजाडला. राजांनी स्नान आटोपून शिवलिंगपूजा बांधली. आपला महाल सोडून ते सदर चौकाकडे चालू लागले. राणीवशाच्या महालात त्यांच्या जाण्याचा मोहरा धरून महिरपीआड उभ्या असलेल्या राण्या पटापट बाहेर येऊन त्यांची पायधूळ कपाळाला लावून संकोचून उभ्या राहिल्या. सईबाईंचा खाजगीचा महाल येताच राजांचे पाय त्याच्यासमोर क्षणभर घोटळले. एकवार त्यांनी त्या रित्या महालावर नजर लावली आणि भरल्या मनाने झपाझप ते सदरचौकात आले. नेताजी, येसाजी, संभाजी कावजी, सिदोजी थोपटे यांनी राजांना मुजरे घातले. "सिदोजीराव, शंभूबाळ कुठं आहेत बघा." राजांनी आज्ञा केली.
"जी," म्हणत सिदाजीराव सदरेवरून धाराऊच्या दालनाकडे निघून गेले. धाराऊ बाळराजांना घेऊन सिदोजीरावांच्या मागोमाग सदरेच्या उंबरठ्यापर्यंत आली. खासे राजे सदरेवर असताना बाईमाणसाने सदरेवर कसे जायचे म्हणून शंभूबाळांचा हात सोडून ती थांबली, पण ते कसले हट्टी! त्यांनी धाराऊचा हात पुन्हा धरून त्यांना सदरेवर ओढायला सुरुवात केली. तो काकणभरला, गोंदलेला हात पाहताच राजे म्हणाले, "या धाराबाई, बालराजे ऐकणार नाहीत!
"जी,” म्हणत धाराऊं सदरेवर आली. शंभूबाळांनी पुढे येत राजांच्या पायांवर मस्तक टेकले. त्यांच्या मुंडन केलेल्या मस्तकावरचा लहाना जिरेटोप घट्ट बसला होता. त्यावर एक हात ठेवून राजांनी त्यांना दुसऱ्या हाताने हळुवार वर उठविले. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उचलून वाकून राजांनी त्यांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आपले ओठ क्षणभर टेकविले. त्यांचे छोटे खांदे थोपटीत घोगऱ्या आवाजात राजे बोलले, 'बाळशंभू, मासाहेबांना मुजरा करून आलात ?'
“जी. आबा, तुम्ही गड उतरलात की आम्ही आभाळात जाणार!" शंभूबाळांनी हात उंच करून आभाळ दाखविले." ते कशाला ?
“आमच्या आऊसाहेबांना मुजरा करायला ! थोरल्या मासाहेब म्हणतात त्या वर गेल्यात! '
शंभूबाळांच्या बोलांनी सारी सदर चरकली. राजांचे डोळे सदरेच्या बगलेला असलेल्या जिजाऊंच्या महालावर जडले. उरात कल्लोळ माजला. “धाराऊ, शंभूबाळांना घ्या." निर्धाराने राजांनी बाळराजांना तोडून धाराऊच्या हाती दिले.