मृग जवळ आला. आभाळाचा ऊर दाटून आला. पावसाच्या सरींची पहिली टिपरी प्रतापगडावर तडतडली. गडकऱ्याने गारठा कवटाळला. घोंघावत त्याने झाडांच्या पानभन्या फांद्यांना उलटपालटे करून टाकले. त्या वाऱ्याच्या थंडगार बोचऱ्या दौडी अंगावर उतरताच सईबाईच्या दुबळ्या कायेवर सरसरून काटा तरारला. त्यांनी अंथरूण धरले! राजगडाकडे राजांना खबर पोच झाली. सईबाईंनी सगळ्यांशी बोलणे टाकले. गडाच्या तटबंदीवर पाऊसधारा कोसळत होत्या, सईबाईंच्या मनात विचारलोट धावत होते. पाणथळावरील आपल्या लांबट घरटयोशी बया पक्षिणीने एकटेच किलबिलत बसावे तसे त्यांचे मन स्वत:त शिरून फक्त राजांच्या आठवणींशी बातचीत करू लागले. केवढ्या उदंड आठवणी! मोहरून टाकणाऱ्या, शरमायला लावणाऱ्या, अभिमानाने ऊर भरून काढणाऱ्या, हुरहूर लावून हैराण करणाऱ्या. धावणीच्या घोड्याने पाठीवरच स्वार दूर न्यावा तशा दूर-दूर नेणाऱ्या. तटबंदीवरून डोकावताना गरगरावे तशा भोवंडायला लावणाऱ्या दह्याच्या कवड्यांसारख्या मधुर गोड, चिराखदानातल्या ज्योतीसारख्या सतेज सुंदर, दरुणीमहालातल्या तक्तपोशीसारख्या निसूर-निवर, घरभरणीच्या लवंडल्या मापासारख्या ओसंडत्या उभार, हिंदकळणाऱ्या मोतीलगासारख्या अस्थिर चंचल, भवानीच्या भंडाऱ्यासारख्या उदात्त मंगल ! आठवणीच आठवणी !!
संकटांना एकमेकांची सावली पकडत चालण्याची उपजतच खोड असावी! सईबाईच्या दुखण्याने निकराचा जोर धरला आहे ही खबर राजांना कळली. पाठोपाठ राजांना जेर करून " चढे घोडियानिशी जिंदा या मुर्दा पेश करतो" अशी कसम खाल्लेला आदिलशाही खानखानान अफजल माहमदशाही फौजबंद होऊन विजापूरहून कूच झाल्याची खबरही त्यांना लागली. बड्या बेगमेने एका जुम्मा रोजाला बड्या मसलतीसाठी खास दरबार भरविला. दरबारात सिद्दी हिलाल, रुस्तमजमा, अंकुशखान, मुसेखान, राजश्री मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, झुंझारराव घाटगे, पैलवानखान, अब्दुलसय्यद सारे नेकदिल जंगबहादूर हात बांधून उभे होते. बेगमेची आगपाखड खाली गर्दना टाकून शरमिंदे होऊन ते ऐकत होते. कोणीही तगडादिल रुस्तुम बेगमेला तसल्ली द्यायला पुढे सरसावत नव्हता. तिचा शाही घुस्सा शब्दाशब्दांना जाळून टाकीत उफाळला आणि चिडून ती गर्जली - " क्या इस दर्बारमें उस गद्दारे दख्खनसे लोहा लेनेवाला कोई मर्द बाकी नहीं रहा ? उस अजाजील बगावतखोरको अंजाम देनेवाला अकाने दौलत कोई भी नहीं ? बोलो - इस दर्बारका मर्दाना चुडिया पेहन आया है क्या. लानत - लानत है!" बेगमेच्या निर्भत्सनेची ही भट्टी एका भटारियाला पेटवून गेली. कमरेच्या तेगीच्या मुठीवर हाताची मूठ आवळीत खानखानान अफझलखान पुढे सरसावला. याखालचा - तलम रुजामा तुडवीत तो विड्याच्या तबकाजवळ आला. खामोश दरबारावर नफरतीची सख्त नजर फेकीत बेगमेला बंदगी घालून त्याने झटक्यात विडा उचलला.
“मैं मैं उस नाचिज कुक्रको घोडेकी सवारी ना तोडतेही जिंदा या मुर्दा दर्बार पेश करता हूँ हुजूर! या अली मेहरबान !" त्याने विडा घेतलेला हात अस्मानाकडे उंचावीत घोगऱ्या सादात कसम खाल्ली !
" आफरीन ! अलहम्द अल्लिल्लाह ! सुभान ऽल्ला ! मरहब्बा s!" चारी बाजूंनी बेहोष चीत्कार दरबारियांत उठले. सगळ्यांना आपणच जणू अफजलखान असून तो विडा आपणच उचलला आहे असा गौर झाला. पण पण तकदिरीने त्या विड्यात - कुणाकुणाच्या मातीची सुपारी पेरून ठेवली होती है ना बेगमेला, ना अफजलला, ना दरबारीतील एकाही समशेरजंगाला माहीत होते! खानाच्या खांद्यावर मरातबाची खिल्लत चढली. शिरावर किताबांची बरसात बरसली. दरबार बरखास्त झाला. 'जुम्मा' रोजाला एक मोठा मनसुबा खडा झाला. खुषीत दरबारी बाहेर पडले. त्यांना माहीत नव्हते या 'जुम्म्याच्या पाठीमागे एक दख्खनी 'शनी' लागला आहे आणि त्याचे नाव 'सिवा' आहे!
वीस हजारांची हत्यारबंद कडवी फौज, ऐंशी-नव्वद मोठ्या तोफा, तीनशे लहान तोफांचे खटारे, हजारभर उंटांचा काफिला, साठ-सत्तर झुलते हत्ती असा दाबजोर ल्वेोजमा खानाने बरोबर घेतला. निशाणाच्या हत्तीवर चाद-तारा चढवून अफजलखान माहमदशाही निघाला. एका सूर्याला ग्रासण्यासाठी! बशिकनी करण्यासाठी ! शिवाजीचा कुफ्र तोडण्यासाठी ! 'अफजल' म्हणजे 'सर्वांत सुंदर', 'सबसे अच्छा'! खरंच तो केवढा अच्छा होता ! फर्जद शहाजीराजे भोसले यांच्या हातांत हातकड्या जखडून भरल्या विजापुरातून यानेच त्यांची शरमिंदी धिंड काढली होती! कनकगिरीच्या वेढ्यात शिवाजीराजांच्या दादामहाराजांना संभाजीराजांना दगा देऊन यानेच मरणाच्या दारात नेऊन सोडले होते! - कस्तुरीरंगाला मैत्रीच्या भेटीसाठी बोलावून धोक्याने यानेच त्याच्या चिंधड्या उडवल्या होत्या! कल्याणीच्या वेढ्यात शहजादा औरंगजेबाला सहीसलामत सोडल्याबद्दल सेनापती खान- महमंदाला मक्का दरवाज्यात कत्ल करण्याचा डाव यानेच रचला होता! असा हा 'सबसे अच्छा' खान आता 'सबसे अच्छा काम करायला निघाला. सह्याद्रीच्या गुहेत हात घालून एका सिंहाची आयाळ धरून बाहेर खेचण्याची कसम खाऊन !