कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १२

 ती चंद्ररेखेची मुद्रा पाहताना राजांना सईबाईंची याद झाली. त्यांनी नवे मुजुमदार निळो सोनदेव यांना बैठकीजवळ बोलावून घेतले. दमगीर झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले, “मुजुमदार, आमच्या कबिल्याकडे कापूरहोळाच्या गाड्यांची धाराऊ आहे. तिला सालिना सव्वीस होन तैनात जोडून द्या! जातीनिशी तुम्ही ते होन पावते करीत चला.


सदर उठली! राजे बैठकीवरून उठले आणि महालात गेले. आपल्या फर्जद शंभूला दूधआई जोडून द्यावी लागली; त्या दूधआईला तैनात तोडून द्यावी लागली. या बाबींचा सल राजांच्या मनाला लागून राहिला.


आता शंभूबाळ एक एक पाय टाकीत चालू लागले होते. जिजाबाईंनी त्यांच्या उष्टावणासाठी फलटणला हारकारा धाडून बजाजी निंबाळकरांना निरोप दिला.


बजाजी शिवापट्टणात आले. शंभूबाळांचे ते मामा होते. बळजबरीने मुसलमान केलेल्या बजाजींना राजांनी पुन्हा शास्त्रपूत हिंदू करून घेतले होते. निंबाळकरांच्या महादजी या मुलाला सईबाईंची सखू ही थोरली मुलगी देऊन राजांनी त्यांना समाजात ठाव दिला होता. सखू लहान असल्यामुळे अजून माहेरीच होती. भाच्याचे उष्टावण आणि सुनेचे दर्शन ह्या दोन्ही हेतूंनी बजाजी शिवापट्टणात दाखल झाले.


ज्योतिष्याकडून जिजाबाईंनी चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढला. त्या दिवशी चंदनी पाटावर बसून बजाजींनी शंभूबाळांना आपल्या उजव्या मांडीवर घेतले. शेजारी जिजाबाई, सईबाई, धाराऊ आणि सारा राणीवसा होता.


हातातील अंगठी काढून बजाजींनी चांदीच्या वाटीतील खिरीत ती बुडविली. आणि त्या अंगठीने आपल्या भाच्याला खीर चाटविली. शंभूबाळांना सईबाईच्या हाती देऊन पाटावरून ते उठले. ती खीरमाखली अंगठी पाटावर मामाची भाच्याला उष्टावण्याची भेट म्हणून ठेवली. शंभूबाळ आता खाते झाले!


जिथे 'बाकीचा' हिसाबच नाही असे राजांच्या आणि सईबाईंच्या हयातीचे भोवरे एकमेकांभोवती आजवर फिरले होते! आता सईबाईंचा भोवरा भेलकांडायला लागला होता. त्यांच्या पायातील भिंगरी सरत आल्यागत झाली. सईबाईंची तबियत सुधारेना म्हणून राजांनी जिजाऊंच्या मसलतीने त्यांना हवाफेरासाठी प्रतापगडावर हलवायचे ठरविले. संगती खाशा जिजाबाई जाणार होत्या.


शंभूबाळ आता दीड वर्षांचे झाले होते. बोबड्या बोलात बोलू लागले होते. वाडाभर धावत होते. धाराऊचा त्यांना लळा लागला. तिचे काही कुणबाऊ शब्द त्यांनी मावळी लकबीसह उचलले. राजांना ते 'आबा' म्हणू लागले. सईबाईना 'माँ आणि आऊ' म्हणत बिलगू लागले. राजांच्या आजानुबाहूचे गुडघ्याखाली आलेल्या हाताचे बोट पकडून पुढे पुढे धावताना राजांना ओढ देऊ लागले. शंभूबाळ हे राजांच्या विसाव्याचे छोटेखानी ठाणे झाले. ते डोळ्यांआड होऊ नयेत असे राजांना वाटत होते. पण सईबाईंना हलविण्याचा बेत ठरताच शंभूबाळाला पाठविणे भाग होते.


एके दिवशी कबिल्याचे मेणे तयार झाले. राजगडावरून राजे शिवापट्टणच्या महालात आले. देवदर्शन घेतलेल्या जिजाबाई, सईबाई, धाराऊ, शंभूबाळ आणि मुलींना घेऊन महालाबाहेर पडू लागल्या. राजांनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. 'आम्ही संगती आहोत. चिंता कराया कारण नाही.” जिजाबाईंनी राजांना धीर दिला. राजांनी धाराऊचे बोट पकडलेल्या शंभूबाळांच्या काखेत हात घालून त्यांना वर उचलून घेतले. त्यांच्या शिवगंध रेखलेल्या सतेज कपाळावर आपले ओठ टेकले. त्यांच्या चिमुकल्या पण निर्भीड डोळ्यांत आपले डोळे घालून त्यांना हसत विचारले, शंभूबाळ, चालत चालत प्रतापगड चढाल ? "

"हां आबा, आमी पलत पलत गल बडू! " शंभूबाळ डोळे मोठे करून बोलले. राजांनी त्यांची पाठ थोपटीत त्यांना खाली उतरवले.


त्यांना आपल्याजवळ ओढून त्यांची हनुवटी वर उचलीत जिजाबाई बोलल्या, गंगेच्या शांत- विशाल पात्राने बिलगत्या खळाळ ओढ्याला बोलाव्या तशा ! “बाळ शंभू आबांच्या पायांवर डोई ठेवायची ना ?'


बाळराजांनी होकाराची मान डोलावली. जिजाबाईंना सोडून राजांच्या पायाजवळच्या फरसबंदीवर आपले चिमुकले गुडघे आणि हात टेकून वरच्या आकाशाएवढ्या उंच आबांकडे पाहत ते म्हणाले, "आबा, आमी मुजला कलतो. जय भवानी ! " आणि शंभूबाळांनी आपल्या कपाळावरचे शिवगंध राजांच्या पायांच्या सडक बोटांवर टेकविले. त्या स्पशनि राजांचे क्षणभर डोळे मिटले गेले.


कबिला मेण्यात बसला. भोयांनी भोईपट सावरीत मेणे उचलले. राजे कबिल्याबरोबर 'चार पावले चालत गेले. मग जखडबंद पावलांनी खिळलेले राजे एकटक नजरेने दूर जाणाऱ्या पेण्यांकडे पाहत राहिले. शंभूबाळांचे बोबडे बोल आठवताना ते स्वत:ला म्हणत हात- "केवढा अजाण आणि लाघवी पोर ! तो माँसाहेबांना बिलगून उभा राहिलेला पाहताना आमचे 'असणे आम्हीच हरवून गेलो आहोत असे आम्हांस वाटते जावळी खोऱ्यातील प्रतापगड नजरटण्यात आला. गडाच्या पायऱ्या चढताना हातातील धोपे टेकीत भोयांनी मेणे सुखचाल केले.


गडाच्या तटबांधकामात दर्शन दिलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे स्थान आले. मोरोपंतांनी त्या शिवलिंगावर आता डौलदार घुमटी उभारली होती. त्या घुमटीवर एक जाईचा वेल चौलग पसरला होता. जिजाबाई आणि सईबाई मेणाउतार झाल्या. शंभूबाळांना घेऊन धाराऊ उतरली. सारीजण दर्शनासाठी घुमटीत गेली. सईबाईंनी त्या स्वयंभूसमोर आपल्या शंभूला माथा टेकायला सांगितले.


शिवलिंगाचे दर्शन घेताना सईबाईंचे डोळे क्षणभर मिटले गेले. शब्द नसलेल्या ज्या भाषेत हिंदू कुलस्त्री देवमूर्तीशी बोलते त्या भाषेत त्या बोलल्या, "आमच्या स्वारींना उदंड येश द्या. आमच्या बाळांना जपा.


भावभरले डोळे उघडून समोरच्या शिवलिंगावरचे एक त्रिदळी बिल्वपत्र उचलून ते मळवट भरल्या कपाळाला लावताना कसा कुणास ठाऊक पण एक मजेदार विचार त्यांच्या मनात डोकावला, "हे त्रिदळ म्हणजे शंकर-पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती असे खुणेचे तर नसेल!'


'निळसर हिरवागार मुलूख आणि त्याला बिलगलेले पिवळे उन डोळासुख देणारे होते. सामोरे येण्यासाठी आलेल्या मोरोपंत पेशवे आणि अर्जोजी यादव यांनी जिजाबाई आणि सईबाईंना अदबमुजरे घातले. प्रतापगडावर येणाऱ्या सईबाई ह्या भोसलेकुलीच्या पहिल्याच लेकुरवाळ्या राजस्त्री होत्या. मोरोपंतांनी त्यासाठी त्यांच्यावरून सुवासिनींकडून मोहोरांचा सतका उतरून घेतला.. सासवडच्या हरभट ज्योतिष्यांचा चालता बोलता प्रतापी रुद्र-शंभूबाळ प्रताप गडावर दाखल झाला !-


हवेसाठी कधी कधी सईबाई आणि धाराऊ शंभूबाळांना घेऊन तटावरून फेरफटका करीत. गडाभोवतीची घनदाट गचपणाची हिरवी झाडी बघताना सईबाईंना जाणवून जाई, "केवढ्या औषधी वनस्पती ह्या झाडोऱ्यात लपल्या असतील! आम्हास मात्र एकही गुणकारी लाभत नाही! माणूस भरल्या समुद्रात असतं पण तहानेच्या समयास एक थेंबसुद्धा हाताशी येत नाही. तशीच ही गत!'


आताशा सईबाईचे मन कुठल्यांच एक बाबीवर स्थिरावत नव्हते. गडमाथ्यावरच्या आभाळात तरंगणाऱ्या पाकोळीने कारण नसता दिशा बदलून फिरकी घ्यावी तशी त्यांच्या मनाची गत झाली होती. जवळ जवळ येणारे काहीतरी ते सुचवू पाहत होते, दूर दूर जाणारे काहीतरी घट्ट पकडून ठेवण्याचा यत्न करीत होते.


धाराऊ आणि शंभूबाळ मात्र आता एकमेकांत रमले होते. बाळराजांना घेऊन गडावरच्या देवळांच्या घुमटीतील घंटा वाजवून दाखविणे ही तर धाराऊची रोजची एक कामगिरीच झाली होती. कधी कधी बाळराजे हात उंचावून आपणच घंटा वाजविण्याचा हट्ट घेत. कितीतरी वेळ मग शंभूबाळ घंटानादातच रमून जात. हिवाळा हटला. रंगीत रानफुलांनी आपले तुरे वर काढले. वैद्याकडून हरतऱ्हेच्या दवामात्रा जिजाऊ सईबाईंना देत होत्या. उगाळलेल्या मात्रा कणाकणाने झिजत होत्या. सईबाईही तशाच झिजत चालल्या. क्षणभर शंभूबाळांना उचलून घेतले तरी त्यांचे हात भरून येऊ लागले.


उन्हाळ्याच्या कोरड्या हवेने सईबाईंना थोडे बरे वाटले. पण अंग काही घरले नाही. गडावरची होळी उदासपणे पेटून विझली. मोरोपंत, अर्जोजी, वैद्य, जिजाबाई सान्यांना सईबाईचे डोळादेखत विझणारे अंग पाहून उरात सलू लागले. जिजाबाईंनी व्रत-वैकल्ये, उपवास सुरू केले. अंगारे, घुटारे, लिंबलोण सारे सईबाईंच्यापुढे हरत होते. उन्हाळा सरत आला. वळिवाचे ढग एकदोन वेळा आभाळाच्या पाठीवर आपले कडकडणारे कोरडे ओढून त्यांच्या डोळ्यांतून पाणी काढून गेले.