" स्वारीचं येणं होतं तेवढंच आमचं हसणं! ” सईबाईंनी गनिमी कावा केला ! राजांच्या कपाळी कुंकुमतिलक भरला. थरथरत्या हातांनी त्यांच्या मुद्रेभोवती तबकातील ज्योती फिरविल्या. सईबाईंना पाहताना राजांना जाणवून गेले की शंभूबाळांनी चांगले अंग धरले आहे तेवढेच सईबाईंनी आपले अंग टाकले आहे.
"बाळराजांचं उष्टावण होणं आहे. फलटणला दादासाहेबांना आवतन "सईबाईचे बोल अर्धवटच राहिले. " ते होईल. तुम्ही आता प्रतापगडाकडे जाण्याची तयारी ठेवा. तिथली हवा तुम्हास मानवेल." राजांनी मनाच्या खोल कप्प्यातील सल बाहेर काढला. सईबाई एकदम गंभीर झाल्या. त्यांचे डोळे भरून आल्यागत झाले. हातातील निरांजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नयेत म्हणून वळून त्यांनी वाकून देव्हाऱ्यासमोरच्या चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले. राजांनी त्यांची कातरता हेरली. न राहवून ते भावभरल्या आवाजात म्हणाले, "सई, दिल टाकू नका! "
आणि आत्म्यावरही हात फिरवणान्या त्या थबथबत्या शब्दांनी सईबाईंचा बांध फुटला! घशातून हमसून येणारे हुंदके रोधण्याचा पराकाष्ठेचा यत्न करूनही ते थांबत नव्हते. विचित्र कंठदाटल्या शब्दांत त्या बोलल्या, ""आमचा भऽऽ रो ऽसा नाही ! बाळाच्या मासाहेब धाराऊ ! त्यांना त्यांs च्या दुधाऽ साठी स्वारींनी का ऽ ही तैनात लावून द्यावी ! "
त्या बोलांनी राजे सुन्न झाले. त्यांना काही बोलवत नव्हते. जीवनातील काही सत्येच अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे असते !
." येतो आम्ही." म्हणत राजे वळले. चारी मुले खेळात रमली होती. महालाबाहेर पडलेल्या राजांच्या मनात सईबाईच्या बोलांनी दौड घरली होती. " आता आमचा भऽ रो ऽसा नाही! भऽ रो ऽसा नाही ! "
आणि कुठून तरी अगदी खोल दरीतून यावा तसा एक आवाज त्यांना ऐकू येऊ लागला, "सैतानकी बनायी सबसे 'ऐबी' वस्त 'मौत' है सैस ! "
नेताजीराव, आबाजी महादेव, येसाजी कंक यांच्या संगती राजे राजगड चढू लागले. गडाच्या पाली दरवाज्यातून पालखी पार होताना नौबत दुडदुडली. तिच्या आवाजाने पद्मावती माचीवरच्या निशाणबारदारांना आपोआप इशारत मिळाली. त्यांनी लगबगीने निशाणचौथऱ्यावर भगव्या जरीपटक्याचा ध्वजदंड उभा केला.
पालखीत बसूनच राजांनी पद्मावती माचीवर आपली नजर जोडली होती. क्षणात त्यांना आभाळाच्या निळ्याशार टाक्यावर डुलणारा जरीपटक्याचा लहान भगवा राजहंस दिसू लागला ! गडमाथ्यावरचा फडफडणारा जरीपटका बघताना नेहमीच आपल्या छातीवरचा जामा काखेजवळ दाटत जातो असे राजांना वाटत आले होते. आत्ताही त्यांना तसेच वाटले. छातीजवळ उजव्या हाताची बोटे नेत त्यांनी गडमाचीवर डुलणाऱ्या भगव्या राजहंसाला पालखीतूनच वंदन केले.
गडावरच्या पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या तिन्ही माच्यांवरून गेले आठ दिवस नवनव्या असामी वाहत होत्या. राजांनी थैलीस्वार धाडून साऱ्या खाशांना राजगडावर पेश होण्याची फर्मान दिली होती.
कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, मानाजी भोसले, सोनोपंत डबीर, तान्हाजी मालुसरे, रघुनाथ बल्लाळ अत्रे, बाजी सर्जेराव, निळोपंत आणि रामचंद्रपंत बहुलकर, संभाजी कावजी, सुभानजी इंगळे सारी मंडळी जरोरीने गडदाखल झाली होती. आणि साऱ्यांना बलावू धाडण्यात राजांचा काय मनसुबा असावा याची खलबते करीत होती.
राजांची पालखी पद्मावती माचीवरच्या सदरमहालासमोर ठाण झाली. राजांना साऱ्यांनी अदबमुजरे घातले. ते मुजरे आपलेसे करताना राजांची उभट मुद्रा उजळून निघाली. दौडीत ठिकठिकाणी भेटणारी मंडळी आज इथं राजगडावर एका जमावाने दिसत होती.
सर्वांसह माचीच्या सदरमहालाकडे जात असतानाच राजांनी प्रमुख तटसरनौबत सिदोजी थोपट्यांना सदर दरबाराचा बेत सांगितला. वासुदेवपंत हणमंतेंना मरातबाच्या साजाची सरपोसबंद तबके सिद्ध करण्याची सूचना दिली. श्रीसांबाचे आणि पद्मावतीदेवीचे दर्शन घेऊन आलेले राजे सदर बैठकीवर सुखावले. सर्व मंडळींना त्यांनी बसण्यासाठी हाताची इशारत केली. सदर बसली.
राजांनी पुजाऱ्याने पेश केलेल्या परडीतील भवानीचा भंडारा चिमटीत घेऊन ती चिमट 'जगदंब, जगदंब' म्हणत सदरेसमोर उधळली. दुसऱ्या चिमटीने भंडारा कपाळावरच्या शिवगंधावर घेतला. चिमटीची दोन्ही बोटे आपल्या गळ्याला टेकविली. भंडाऱ्याची भली थोरली परडी साऱ्या सदरभर फिरली. मानकऱ्यांनी आपले मळवट भंडाऱ्याने भरून घेतले. राजांनी आपल्या मनचा हेत खुला केला -
"एक तपापूर्वी रायरेश्वरावर आम्ही श्रींचे राज्यास आणभाकेने बांधील जालो. उमर कवळी असता, दिमतीला मूठभर असामी असता आम्ही अगस्तीचा मनशा बोलून गेलो! आजवर श्रीसांब येश देणार थोर जाले, एकट्याने बांधू म्हणता राहणीचे साधे घरटे बांधणेही साध्य नच होय! ये तो श्रींचे गोमट्या राज्याची बाबत ! आमचे दोन हात कैसा नतीजा पावावेत ? एक म्हणता दहा हात आमच्या पाठीशी आले. पोख्तांचे जाणते बोल आम्हास मार्गी लावते जाले. आऊसाहेबांचे मायेचे हात धीर दिलासा आणि डोळे आशीर्वाद देत आले. आज आम्हास याद येते ती आमच्या दादोजींची, बाजी पासलकरांची ! " क्षणभर राजांचा आवाज घोगरा झाला.
"तुम्ही सान्यांनी अंगेजणीने कस्त केली म्हणोन श्रींचे राज्याने अंग धरले. आज चाळीस गडकोटांवर जरीपटका चढला! दहा हजारांवर पाऊलोक आणि तितुकाच घोडालोकांचा जमाव जमला. आम्हास साऱ्यांची कदर करणे आहे म्हणोन ही सदर आम्ही बोलावली! जैसी साध्य होय तैसी कदर आज आम्ही करतो आहोत. याहून तुमची जाणती कदर श्री आमचे हातून करवून घेणार. ये समयी कोणास आमचे हातून गैरमरातब जाहलियास श्रीसाठी मन मोठे केले पाहिजे. आम्हास आपले लेकरू मानिले पाहिजे. समस्तांनी लेकरास आसरा दिल्हा पाहिजे !!'
जंगमैदानावर कंठाची पाटी फुलवून 'हर हर महादेव' गर्जत गनिमावर तुटून पडणाऱ्या शिवाजीराजांचेच हे दुसरे रूप होते ते पाहून सदरेवरच्या बाराबंद्यांतील रांगडी मने हेलावून गेली.
राजे बैठकीवर उभे राहिले. तलवारीच्या पात्यासारखे त्यांचे रक्तजागते बाकदार, सतेज नाक नजर खेचून घेत होते. राजांनी सदर बैठकीवर बसलेल्या नेताजीराव पालकरांना अभिमानाने साद घातली- "नेताजीराव, आमच्या सामने या.'
नेताजीराव राजांच्या समोर आले. कमरेत वाकून त्यांनी राजांना मुजरा घातला. कारभाऱ्यांनी हाती धरलेल्या तबकावरचा सरपोस दूर केला. तबकात रत्नजडित मुठीची म्यानबंद तलवार, तुरेवाली कंगणीदार भगवी पगडी, शुभ्र बाराबंदी आणि मांडचोळणा होता. राजांनी तबकातील तलवार उचलली. तिच्या फासबंदाची गाठ नेताजीरावांच्या कमरेभोवती बांधीत ते तळपत्या डोळ्यांनी म्हणाले "सुभेदार नेताजी आजपासून श्रींच्या राज्याचे सरनौबत झाले.'
गहिवरलेले नेताजीराव राजांचे पाय शिवण्यासाठी वाकू लागले. झटकन त्यांचे खांदे आपल्या हातांनी थोपवीत राजांनी त्यांना वर घेतले. क्षणभर नेताजीरावांवर आपली सूर्यपेट नजर जोडून राजांनी प्रेमभराने त्यांना मिठी भरली !
निळो सोनदेवांना मुजुमदारीची, आबाजी महादेवांना सुरनिशीची वस्त्रे राजांनी अशीच बहाल केली. येसाजी कंकांना पायदळाचे सरनौबत म्हणून रत्नजडित तलवार बांधली. कुणाला चांदीचे तोडे, कुणाला कडे, कुणाला कट्यार, कुणाला तलवार अशी साऱ्यांच्या इमानी चाकरीची कदर राजांनी केली.
स्वतःसाठी गुणवंत आणि भोवतीच्या मंडळींसाठी गुणपारखी असा तो राजा होता. तो साऱ्यांची कदर करीत होता, पण सदरेवरचा त्यांचा एक एक बोल ऐकूनच सारे धन्य झाले होते. त्याच्या एका एका बोलासाठी जान कुर्बान करण्याची सर्वांची कमरबंद तैय्यारी होती. कदर दरबार सरला.
राजगडाच्या कारभाऱ्यांनी बैठकीवर बसलेल्या राजांच्या हाती त्यांच्या मुद्रेचा नुकताच सुघड बनविलेला नवा साचा दिला. राजांनी तो निरखायला सुरुवात केली. त्या अष्टकोनी मुद्रेवर उलट्या साचेबंदात कोरीव अक्षरे होती- “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।