भाग ८.
" वैद्यबुवा, आमच्या सूनबाई अंग धरत नाहीत. तुम्हीहून आम्हास काही बोलत नाही हा कोण मामला ? आम्हांस धीर निघत नाही." जिजाबाईंनी आपली व्यथा उघडी केली.
" आऊसाहेब, सारे उपाय हरले. शेक, काढे, मात्राप्रयोग लेप कशामुळंच गुण नाही. वाऱ्याची झमकी येताच राणीसाहेबांच्या अंगावर काटा फुलतो. खिडक्या दरवाजे बंद होताच ओठाला सोक पडतो. सरकारांचा सावळा मुखोडा फिका पडत चालला. मला तरी हे लक्षण " वैद्य कसे बोलावे हे न सुचून चाचपडले. ...
कसलं . कसलं वाटतं वैद्यबुवा ? " जिजाबाईंचा आवाज कातरला होता. हे बाळंतव्याधीचं लक्षण आहे आऊसाहेब!" वैद्यांचा आवाज घोगरा झाला. मान अधिकच खाली गेली. हातातील अष्टमात्रा त्यांनी कसनुशा चाळविल्या.
'बाळंतव्याधी! अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई सुत्र होऊन स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांच्या अचल डोळ्यांसमोर दोन मुद्रा तरळत होत्या. एक पाठीवर मरण टाकून, कबिल्याकडे पाठमोरे होत मुलूखभर दौडणाऱ्या राजांची... आणि दुसरी, ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या बाळराजांची! बाहेर पुरातन पुरंधर मात्र श्रावणातील ऊनपावसाचा खेळ मन लावून खेळतच होता. महालाबाहेर पडणाऱ्या विचारमग्र वैद्यांना आपल्या हातातील एक मात्रा निसटून खालच्या फरसबंदीवर केव्हा पडली हे लक्षातच आले नाही !! पडलेली ती मात्रा फार फार गुणकारी होती !!
राजांच्या तारिफेच्या राजकारणी मामल्यात एका व्याधीवर कोणतीच मात्रा लागू पडत नव्हती. ती व्याधी होती जंजिरेकर हबश्यांची! दर्याची खोळ पांघरलेला जंजिऱ्याच्या बिकट बसकणीत बसलेला सिद्दी, मजलेत येईल तितुकी कोकणची किनारपट्टी तसनस करीत होता. दस्त होईल तेवढी कुणबी रियाया दर्यावरून राजरोस लोटून नेऊन गुलाम करून त्यांचा दूरदेशी विक्रा मांडीत होता. आपल्या मुलखाला पारखे होताना आक्रोशणाच्या या देशीच्या आसामच्या डोळ्यांतून कोसळलेल्या आसवांनी दर्याचे खारेपण निबर केले होते! दर्याला त्याची खसखससुद्धा पर्वा नव्हती! ती वाटायला सर्जा राजा पाहिजे होता. राजांनी हे सारे हेरले होते!
रघुनाथ बल्लाळ अत्र्यांना राजांनी जंजिऱ्याचा दर्या रंगविण्याचा विडा दिला. त्यांच्या कुमकेला मायनाक भंडारी, दर्यासारंग दौलतखान हे दर्याचे खासे फर्जद नामजाद करून दिले.
अत्र्यांनी दंडाराजपुरीचा किनारा मारून जंजिऱ्याला मोर्चे घातले. अत्रे शर्तीने भांडले. दोन्हीकडचे कैक धारकरी पडले. पण जंजिरा दस्त झाला नाही. राजांनी सिद्यावर काढलेली सासवडी मात्रा लागू पडली नाही. हा सल राजांना फार स्तला. सह्याद्रीच्या शिवाला अशा कैक सलांचे विष पचविणे पडतेच!
आता सईबाईना पुरंधरावरून हलविणे भागच होते. बाळंतव्याधीने बाळराजांना सईबाईंच्या पदरापासून तोडले होते. मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंनी शंभूबाळाचे रडणे थोपविले होते. काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरण्याची वाट पाहत होत्या. कबिला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला होता. चांगला दिवस पाहून जिजाबाईनी सईबाई, पुतळाबाई यांच्यासह पुरंधर सोडला. मेणे राजगडाच्या वाटेला लागले. बाळराजांना खांद्यावर घेऊन भोई भुई तुडवू लागले ! बाळशंभू राजगडाकडे चालले.
किल्ले राजगड! गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा ! सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला आस्मानी पक्षी! गणपती, पद्मावती, मारुती, कालेश्वरी, जान्हवी, ब्रह्मदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडविणारी बारा मावळांतील उच्चासनी पंढरी ! राजांच्या मर्मबंधाच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी कुप्पी !
किल्ले रायगड डोळ्यांच्या बाहुल्यांत आला. मेण्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गडउतार झाले होते. त्यांच्याबरोबर शामराव रांझेकर, वासुदेवपंत हणमंते, प्रतापराव सिलीमकर, सिदोजी थोपटे अशी मंडळी होती.
पुढे होत आपली गर्दन झुकवून राजांनी आऊसाहेबांना मुजरा घातला. आपली निमुळती सडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेणाउतार व्हायला आधार दिला.
मागच्या मेण्यातून बाळराजांसह उतरलेल्या सईबाईच्यावरून कुणीतरी कुणबीण जित कॉबड उतरत होती. सईबाईंच्या सुकल्या देहाकडे आणि घरंगळणाऱ्या कांकणांकडे पाहताना राजांना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला !
" सूनबाईंचा मेणा पद्मावतीवर जाऊ द्या. आम्ही तुमच्या संगती पायीच निघू राजे. पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे.” जिजाबाई सईबाईच्या मेण्याच्या भोयांकडे पाहत म्हणाल्या. सईबाई, पुतळाबाई पुन्हा मेण्यात बसल्या. त्यांचे मेणे गडाच्या वाटेला लागले. जिजाबाईंच्या सावलीवर नजर जोड़ीत राजे त्यांच्या मागून चालले. जिजाऊ बोलत होत्या. राजे फक्त ऐकत होते!
राजगडावरच्या खाजगीच्या महालात जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. सईबाई सोडून राजांच्या सर्व राज्यांचा राणीवसा समोर उभा होता. भवती जळणाऱ्या चिराखदानांवर काजळी दाटल्याने ज्योती मंदावल्या होत्या. त्यांच्या वाती कुणीतरी सरशा करायला पाहिजे होत्या. राजगडाचा सारा हालहवाल विचारून होताच जिजाबाईंनी मनातील हेत उभा केला.