कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ७.

 भाग ७.


मोरोपंत सदरमहालात आले. त्यांनी राजांना मुजरा रुजू केला. केळीच्या मोन्यासारखे ते उंच होते. त्यांचा रंग आणि भाव तसाचे प्रसन्न होता.


" बोला पंत, प्रतापगडाच्या तटबांधणीचं काम पुरं झालं हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत.


"होय महाराज, जवळ जवळ सारं काम पुरं होत आलं. राहिलं ते जामदारखान्याची ताकद थोडी कमी पडली म्हणूनच पण ते एवढा हिसाब धरावं असं नाही. आम्ही - जातीनिशी रुजू झालो ते एक खाशी खबर स्वामींच्या कानांवर घालण्यासाठी.' 'कोण खबर ? बोला पंत.” राजांच्या भुवया चढल्या.


" महाराज, गडाच्या तटबांधणीला मोठा शुभशकुन झाला. बांधकामात कारागिरांना एका स्वयंभू शिवलिंगानं दर्शन दिलं!” मोरोपंतांची मुद्रा, ते सांगताना उजळून गेली. " जगदंब ! पंत, मोठी योगायोगाची बाब आहे ही. बाळराजांचे नाव आम्ही 'शंभू' ठेवलं आणि गडाच्या बांधकामात स्वयंभू शिवलिंग सापडलं ! बघू प्रतापगड आम्हांला श्रींच्या कार्यात कोणता शुभशकुन करतो ते! तुम्ही हात ओले करून घ्या. आम्ही जातीनिशी तुमच्याबरोबर प्रतापगडाकडं निघू, त्या शंभोच्या दर्शनासाठी!'


गडाच्या दरडीवरच्या निवडुंग आणि करवंदीच्या गर्दाव्यात, रंग बदललेले शेंदरी सरडे शीळ भरू लागले. त्यांना मृगांच्या पावसाचा सपळ लागला. मावळाच्या भातखाचरातील तरवे रानशेणींनी, चगाळ्यांनी आणि घाणेरीच्या काटक्यांनी जाळून, कुणब्यांनी बियाण्यासाठी भाजक्या भुईची कूस तयार केली !


'राजे पुरंधरेश्वराचे दर्शन घेऊन आले. “आम्ही येत आहोत" अशी वर्दी त्यांनी सईबाईंना पाठविली. आज राजे पुरंधर उतरून प्रतापगडाकडे कूच करणार होते. त्या खबरीने सईबाईंच्या मनात काहूर माजले होते. उगाच त्यांचा हात एकसारखा बाळराजांवरून फिरत होता.


आज आम्ही गड उतरणार." विचारात गुंतवा झालेल्या सईबाई राजांच्या बोलांनी भानावर आल्या. त्या अवस्थेतही त्यांच्या मनात, समोर राजे उभे असलेले पाहून विचार आला. " हे असंच रानवाऱ्यासारखं सपळ न देता येणं नि निघून जाणं!” कुणबिणीने मंचकाखाली ठेवलेल्या धुनीतल्या तिखट धुराने त्यांना ठसका लागला.


" तब्येतीस जपा. या गडावर वारा बळजोर. आता पडत्या पावसात तो बेगुमान होईल. गैरअंदाज खुल्यावर येऊ नका. बाळराजांना सांभाळा. ज्योतिषी म्हणतात ते रुद्र होऊन आलेत! रुद्र सांभाळणे कठीण!” राजांनी वाकून सईबाईच्या कुशीतील शंभूबाळांना उचलले. काजळ भरल्या, तीट रेखाटल्या त्यांच्या बालमुखावर राजांची नजर स्थिरावली. ते स्वतःशीच मंद हसले. त्यांचे रक्तजागते, रसरशीत निमुळते ओठ बाळराजांच्या कपाळावर टेकले. शिवगंधाला घेऊन त्यांच्या कपाळाचे कातडे टोपाकडे किंचित वर सरकले. डोळे क्षणभर मिटले गेले. बाळशिवावर ओळंबून स्थिरावलेले ते प्रसन्न शिवबल, सईबाई, धुराने लागणारे उसके घशातच रोधून एकटक पाहत होत्या.त्यांचा सावळा चेहरा उजळला होता.


राजांनी डोळे उघडले. हातातील बाळराजांना सईबाईंच्याजवळ ठेवले. त्यांना बिलगते घेण्यासाठी पसरलेल्या सईबाईच्या हातांतील नादभरल्या कंकणांचा स्पर्श राजांच्या सडक बोटांना झाला! दोघांच्याही मनात उदंड सूर किणकिणले !


"येऊ आम्ही ?" म्हणत राजे सिधे दालनाबाहेर पडू लागले. सईबाईना काहीच दिसत नव्हते. दालनात दाटलेल्या धुरामुळे की त्या तिखट घुराने डोळ्यांत उभ्या राहिलेल्या पाण्यामुळे ते त्यांचे त्यांनाच कळत नव्हते ! जिजाबाईंनी हातावर ठेवलेली दह्याची कवडी ओठाआड करून राजे मोरोपंत,माणकोजी, तान्हाजी नूरखान यांच्यासह पुरंधर उतरले.


प्रतापगडाकडे राजे गेले. पाठोपाठ राजांचा राणीवसा राजगडाकडे पावता झाला. ओली बाळंतीण म्हणून सईबाईंना हा पावसाळा पुरंधरावरच काढावा लागणार होता. तीन महिने तरी त्यांना हलविता येणार नव्हते. म्हणून एकट्या पुतळाबाई पुरंधरावर मागे राहिल्या.


काळ्या मुंग्यांचे भिरे रांगा धरून, पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रसदीचे पांढरे अन्नकण तोंडात घेऊन उंचाव्यावरच्या वारुळांकडे जाताना दिसू लागले. खाशा महालावरच्या झडी गड्यांनी बांधून घेतल्या. सर्पणाची जळाऊ लाकडे दगडी कोठारात आबादान झाली. पुरंधरच्या वाऱ्याने अलवार गारवा पांघरला !


आभाळाच्या मैदानात मिरगाने ढगांची आपली काळी भरदार घोडी उतरवली. सपासप चौखूर उधळून त्यांनी मावळी मुलखावर एल्गार केला! तापले कातळ निवांत झाले. गुरगुरणारे तांबडे पाणलोट उडद्या घेत कन्हेला सामील झाले. कुणब्यांनी तयार केलेल्या भाजक्या भुईच्या कुशी, आभाळाचे दान घेऊन सुखावल्या! आता अवघ्या बारा मावळांवर चार-पाच महिने राज्य राहणार होते ते या ढगांचे आणि बेलगाम पावसाळी वाऱ्याचे!


कोंढाणा स्वराज्यात रुजू झाला खरे पण राजांचा एक भावगड मात्र झुरू लागला. पुरंधरावर सईबाईंची तबियत ढासळू लागली. जिजाबाईंनी महाडहून दुखणेपारखी गंगाधर वैद्यांना बलावू धाडून गडावर आणविले. गेले कित्येक रोज त्यांनी आपले वैद्यक डोळ्यांत तेल घालून राबविले होते. औषधी पाल्यांचे रस, काढे, मात्राप्रयोग, शेक हरएक उपाव करून ते थकले होते. त्यांना व्याधीचे निदान कळून चुकले होते. जिजाबाईंच्या खाजगीच्या महालात ते हातातील विविध गुणांच्या अष्टमात्रा चाळवीत खाली मान घालून उभे होते.