भाग ६.
" जी. जगदंबेचं स्मरण करून आऊसाहेबांनी ग्रहयोग ऐकावा." हरभटांनी कुंडलीतील ग्रहांना आपल्या जिभेवर बसविले.
" बाळराजांच्या पायानं वैशाखीचा मार्तंड कुळात उपजला आहे. साक्षात रुद्र जन्माला आला आहे ! रुद्र हिमालयावर राहतो तसाच उंच गडकोटांवर राहील. कुलाची कीर्ती उंच करेल. रुद्रासारखाच प्रलय-तांडव मांडेल ! तसाच भोळाभाबडा, तापट आणि सरळ स्वभाव असेल, रुद्राला नसते तशीच यांना मृत्यूची दिक्कत असणार नाही ! आणि" हरभट क्षणभर घोटाळले. उगाच त्यांनी ठीक असलेले उपरणे पुन्हा ठीक कैसे.
" आणि काय ? बोला शास्त्री” जिजाबाईंना त्यांच्या 'आणि' मधला संकोच जाणवला.
" क्षमा असावी पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो!" हरभटांच्या बोलांनी राजांसह सारे गंभीर झाले. "अस्सं! ते काय आम्हीसुद्धा फसलोच की !” म्हणत हसून जिजाबाईंनी साऱ्यांच्या मनावरचा ताण कमी केला.
घिरावल्या हरभटांनी कुंडलीच्या कागदाची वळी करून ती थैलीबंद केली. कुलदेवतेसमोर ती ठेवून तिच्यावर बेलभंडार वाहण्याची सूचना प्रभाकरभट राजोपाध्यांना दिली. जिजाबाईनी संभावनेची बिदागी म्हणून दिलेल्या मोहरांची थैली स्वीकारून ते राजांना आणि जिजाबाईंना मुजरा घालून महालाबाहेर पडले. बैठक उठली. राजे आपल्या महालात आले. मावळतीच्या डोंगराआड सूर्याने आपली छावणी टाकली. सासवडच्या पांढरीतून सोपानदेवांच्या समाधीवरचे, सांजआरतीच्या देवझांजांचे आणि घंटानादाचे निसटते सूर राजांच्या कानांवर पडत होते. एका लाकडी चौरंगावर तबकात ठेवलेल्या, दौडीत राजांच्या नेहमी बरोबर असणाऱ्या स्फटिक शिवलिंगावर त्यांची नजर गेली. त्या रंगसतेज शिवलिंगांजवळ जात त्यावर शेजारच्या परडीतील बेलाची त्रिदलं त्यांनी वाहिली. हात जोडून आपले निमुळते डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर पवित्रशांत शिवलिंग उभे होते. कानात हरभट ज्योतिषीबुवांचे बोल धावणी घेत होते- 'पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला ना तसा योग या कुंडलीत दिसतो!" एक क्षणभर राजांची तंद्री लागली. "रुद्राचे सारे गुण घेऊन आलात तशीच कोणतंही विष पचविण्याची ताकदही घेऊन आला असाल !! जगदंब, जगदंब!" असं पुटपुटत राजांनी डोळे उघडले. त्यांचे मन शांत होते !
बालेकिल्ल्याच्या चोवीस बुरुजांवर केलेल्या दिवल्यांच्या रोषणाईने आकाशातील नक्षत्रे पुरंधरावर उतरल्यासारखी वाटत होते!
पुतळाबाई भेटीला येत असल्याची वर्दी दासीनं सईबाईंना दिली. त्यांची शिणलेली नजर मधून मधून दरवाज्याकडे वळत होती. त्यांच्या कुशीत पदराखाली बाळराजांची दुधासाठी चुळबूळ चालली होती. सईबाईंनी पदराखाली हात नेला तशी ती चुळबूळ थांबली. हे बाळंतपण सईबाईंना मानवलं नाही. मंचकावरून उठताना डोळ्यांसमोर अंधारल्यागत वाटत होतं. चालताना पायांच्या पोटऱ्यात गोळे उठत होते. बारशाच्या सोहळ्यातील सगळे कष्ट त्यांनी बाळराजांचे कौतुक म्हणूनच निकराने सहन केले होते...
कुणाशी तरी बोलत पुतळाबाई दरवाज्यातून आत आल्या. त्यांच्याबरोबर सख, राणू अंबा ह्या सईबाईंच्या एकमेकींच्या पाटीवरच्या तीन मुली होत्या. त्यांतील थोरल्या सखूबाई समजूतदार होत्या.
“थोरल्याबाई, आता कसं आहे तब्येतीचं ? ” पुतळाबाईंनी मंचकाजवळ येत सईबाईना प्रेमाने विचारले.
"बाई, इथं पडून वरच्या तख्तपोशीकडं बघायचा कंटाळा आला. चार कदम चालावं म्हटलं तर पाय थारा देत नाहीत.” सईबाईंच्या पापण्यांभोवतीची काळी वर्तुळे बघून पुतळाबाईंचे मन थरकले. काय बोलावं ते त्यांना सुचेना म्हणून शांत चालीने भिंतीकडे आत त्यांनी, सईबाईच्या मंचकावर वाऱ्याचा मारा करणाऱ्या खिडकीचे दार बंद केले. चिराखदानातल्या ज्योती स्थिरावल्या.
"आऊ, आम्ही बाळराजांना घेऊ ?” सईबाईच्या मंचकाशेजारी उभ्या असलेल्या सखूबाईंनी विचारले.
"हां घ्या की." म्हणत सईबाई डाव्या कुशीवर वळल्या आणि बाळराजांना उचलून त्यांच्या हातात देण्यासाठी उठून बसू लागल्या. लगबगीने पुढे होत पुतळाबाईंनी मंचकावरच्या बाळराजांना सखूबाईंच्या हातात हळुवारपणे दिले. अर्धवट उठलेल्या सईबाईंच्या मानेखाली हात देऊन, त्यांना मंचकावर लेटते केले !
बाळराजांना घेऊन सखूबाई मंचकालातच्या बिछायतीवर बसल्या राणूने आणि अंबाने डोळे मोठ्ठे करीत बाळराजांच्या गालांवर हात फिरविला. त्या तिघी बहिणी आपल्या भाऊराजाकडे बघण्यात स्वतःला हरवून गेल्या होत्या. सखूबाईंच्या मांडीवर आपले चिमुकले पाय उडवीत बाळराजे चिराखदानातल्या ज्योतीकडे टक लावून बघत होते. त्या चौर्धीकडे बघताना राजांच्या आठवणीत सईबाई हरवल्या होत्या आणि त्या साऱ्यांना प्रसन्न बघून पुतळाबाई सुखावल्या होत्या.
" प्रतापगडावयनं मोरूपंत आल्यात धनी हुकूम व्हईल तर रुजू व्हावं म्हनत्यात.' " मुजरा घालीत किल्लेदार नेताजींनी, सदरमहालाच्या बैठकीवर लोडाला टेकलेल्या शिवाजी महाराजांना खबर दिली.
" येऊ द्या पंतांना.” राजांनी नेताजींना संमती दिली.