भाग ५
ज्येष्ठ वद्य अष्टमीचा सूर्य उगवतीचे मोर्चे फोडू लागला. फटफटीलाच सुरू झालेल्या बालेकिल्ल्याच्या नगारखान्यातील चौघड्याने आणि पिपाणीच्या सुरावटींनी पुरंधरचे अठरा कारखाने जागविले. हिरव्या आंबवतीच्या रसवंत आराशींनी गडाचे पत्थरी दरवाजेसुद्धा जिंदादिल केले! बालेकिल्ल्याच्या माथ्यावरचा भगवा जरीपटका आभाळाला थपडा देत पहाटवाऱ्यावर फडफडू लागला.
हालगी, लेझमींच्या तालावर वाजतगाजत बाळंतविडे गड चढू लागले. थैलीपोच झालेल्या नात्यागोत्यातील लागेबंद जनाना केव्हाच गडदाखल झाला होता. राजगडाहून राजांच्या राणीवशाचे मेणे तर पाचवीलाच गड चढून आले होते. सोयराबाई, पुतळाबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई या साती राण्यांनी प्रभातस्नान आटोपून भरजरी शालू परिधान केले.
दरुणीमहालातील सईबाईंचा महाल चिरागदानांच्या ज्योतींनी ऊरउजळता केला . होता. सुगंधी पुष्पमालांनी त्या ज्योतींचा प्रकाश गंधित केला ! आज बाळराजांच्या बारशाचा सोहळा होता !
प्रभाकरभट राजोपाध्यांनी मुहूर्तासाठी पंगाळात घटिकापात्र सोडले. सईबाईंच्या महालात पुष्पमाला आणि जरीबतूने शृंगारलेल्या पाळण्याभोवती सवाष्णींनी रांगोळी रेखली. त्यांच्या खाली कणकीच्या तेवत्या दिवल्यांची पंचकडी मांडली.
चंद्रकळी शालू नेसलेल्या सईबाई, सोन्याची फुले मढविलेली धुंची घातलेल्या, जरीचे अंगडे ल्यालेल्या बाळराजांना घेऊन चांदीच्या फुलांच्या चंदनी पाटावर बसल्या. त्या पाटाभोवती रांगोळीचे नाजूक नकसकाम फिरले होते. पूर्वाभिमुख बसलेल्या, तृप्त डोळ्यांच्या आपल्या लेकुरवाळ्या सूनबाईकडे डोळाभर पाहत शेजारीच जिजाबाई उभ्या होत्या.
सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई अशा रक्ताच्या नात्यातील पाच सवाष्णी सईबाईच्या सामोन्या आल्या. सईबाईंच्या मळवटभरल्या सावळ्या मुखाभोवती फेर धरू लागल्या. खणानारळानं भरलेली एक ओटी रिकामी करून दुसरी ओटी घ्यायलाही त्यानं फुरसद मिळत नव्हती. औक्षणाच्या ओवाळण्याची ती पंचारती खाली ठेवलीच जात नव्हती! बाळंतविड्यांची झिंबड उडाली होती.
बाहेरून प्रभाकरभटांची मुहूर्त भरत आल्याची वर्दी आली. महालातील गडबड वाढली. पाळण्याच्या एका बाजूला पुतळाबाई आणि दुसऱ्या बाजूला सोयराबाई उभ्या राहिल्या. पाळण्याशेजारी तबकात ठेवलेला, धुंची अंगडं घातलेला दगडी वरवंट्याचा 'गोपा' पुतळाबाईंनी लाजून हसत हसत उचलला. "गोपाळ घ्या! " म्हणत तो मधल्या पाळण्यावरून तीन वेळा सोयराबाईच्या हाती दिला. पुन्हा तबकात ठेवला.
" नाव काय ठेवायचं ? " कुणीतरी जाणती बोलली. बाळराजांचं नाव संभाजीराजे ठेवा! त्यांच्या काकामहाराजांची ती यादगीर
आहे!" जिजाबाईच्या पापणीकडा, ते नाव सांगताना आपल्या थोरल्या पुत्राच्या आठवणीने पाणावल्या.
पुतळाबाईंनी बाळराजांना सईबाईच्या मांडीवरून अलगद उचलले. तीन वेळा पाळण्यावरून पलीकडच्या सोयराबाईच्या हाती देताना त्या प्रसन्न हसत म्हणाल्या,
" गोपाळ घ्या, गोविंद घ्या! "
पाळण्यातील तलम बिछायतीवर हळुवारपणे हातातील बाळराजांना ठेवून त्यांच्या छोटेखानी कानांजवळ आपले ओठ नेत पुतळाबाईंनी त्यांना त्याचे नाव सांगितले- 'शंभूजी!" आणि ही बदतमिजी केल्याबद्दलं पाठीवर पडलेले काशीबाई, गुणवंताबाईंचे गोड धपाटे हसत हसत सहन केले! शंभूसाठी सवाष्णी पाळणा गाऊ लागल्या. अभिषेकपात्र घंगाळात बुडाले. सईबाईंनी पुढं होत पाळणा पाठ लावून एकदा, पाठझोका दिला!
आणि नेताजीरावांनी बत्ती दिलेल्या पुरंधरच्या चारी बुरजांवरच्या तोफांच्या भांड्यांनी माथ्यावरच्या मृगार्त आभाळाला खबर दिली "राजश्रियाविराजित, सकलगुणमंडित, भोसलेकुलावतंस, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या बाळराजांचे नामाभिधान जाहले!. संभाजीराजे शंभूजीराजे ऐसे शुभनाम ठेविले!' आणि त्या खबरीने गडावरच्या राउळातील सगळे देव सोयरातून सुटले !
खाजगीच्या महालात मध्यभागी मांडलेल्या एका बैठकीवर गिर्दीला सुखावून जिजाबाई उत्सुक होऊन बसल्या होत्या. त्यांच्या उजव्या तर्फेला एका सवत्या बैठकीवरच्या लोडाला शिवाजीराजे रेलले होते. महालाच्या भिंतीकडा धरून अंथरलेल्या बिछायतीवर माणकोजी, तान्हाजी, गोमाजीबाबा, नेताजीराव, बाळकृष्णपंत, प्रभाकरभट अशा खाशा मंडळींनी बैठक घरली होती.
महालाच्या मध्यभागी, जिजाबाईंना पुढा करून एका छोटेखानी दर्भासनावर सासवडचे ज्योतिषी हरभट बसले होते. त्यांच्यासमोर ठेवलेल्या लाकडी तिकाटण्यावरच्या पंचांगावर त्यांची एकटक नजर खिळली होती.
कपाळावरचे सुकले गंध फोडणाऱ्या आठ्या एक-दोनवार हरभटांनी उभ्या केल्या. हाताच्या बोटांची पेरे मोडून मनातल्या आकड्यांचा सरतपास घेतला. खांद्यावरच्या उपरण्याच्या नीट असलेल्या जरीकाठाचा जाबता पुन्हा एकदा ठीक बसवला. भुवया उंचावून त्यांनी आपल्या लांबसडक बोटांनी समोरच्या कलमदानातले पीस उचलले. काजळीच्या बुधलीत ते बुडवून, कुलदैवताचे स्मरण करून त्यांनी आपल्या पोथीवरच्या बदामी कागदावर सरासर कुंडलीपट मांडला. ग्रहांनी आपापली घरे घेतली !
"बोला शास्त्री, बाळराजांच्या ललाटीचा लेख ऐकण्याचा साऱ्यांचा मनशा पुरा होऊ दे." जिजाबाईंची उत्सुक नजर हरभटांनी आखलेल्या कुंडलीपटावर जखंडली.