भाग ४.
“छ्या! एवढं ग्वाड वजं कळत न्हाई व्हय मासाब म्हणत संभाजीने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत बाळराजांना तान्हाजीच्या बळजोर हाती दिले. बाळराजांना हाती घेताना तान्हाजीच्या भरगच्च मिश्या ताठरल्या. तो संभाजीला म्हणाला, "हां, तेवडं बोलू नगं ! मासाब म्हनत्यात त्ये खरं हाय. बरं का मासाब, जुन्नरच्या चालीत ह्यो नि मीच हुतो पागंतली घोडी भाईर काढाय. पागंवरलं धारकरी आमी कापून काढलं. म्या तेगीनं घोड्यांचं बंद कापलं. आमी सारी घोडी भाईर काढाया लागलो तर गलिमांचं याक हत्यारबंद भिरं 'मारो ऽ मारो।' वरडत थेट चाल करून आलं. ह्यो म्हनला - तान्हाजीराव, निस्ता पट्टा घुमवत माज्याबराबर या गमज्या दावतो.' आन चाल करून आलेल्या धारकऱ्यांवर ह्यो पट्ट्या पांगतलंच याक घोडं, त्येच्या पोटाखाली मान घालून उचलून हार 5 हार 5 म्हादेव' वरडत, थयथय नाचत धावला की ! होच भुतावानी ध्यान बघून त्ये बिचारं 'तोबा, तोबा करीत पळालं. असा ह्यो संबाजी हाय!" तान्हाजीच्या रांगड्या विनोदाने राजांसह सगळे खुषदिल होऊन हसले. नूरखान बेगने बाळराजांना पाहून काढलेले, “कैसा सुरूर बच्चा है! " हे उद्गार त्या हास्यात कुणालाच ऐकू गेले नाहीत.
बाळराजांना पाहून सारेजण बाहेर पडले. राजांना आणि सईबाईंना मोकळे बोलता यावे म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या...
हातातील बाळराजांना सईबाईच्या कुशीत ठेवून राजे मंचकाच्या कोपऱ्यावर टेकले. शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उकलत नव्हते. इतक्यात इंगळांवर ओवा घातलेली, घूर उसळती धुनी हातांत घेऊन एक कुणबीण दालनाच्या दरवाज्यात डोकावली. राजांना आत बघताच ती गडबडून गेली! धुनीची पाटी सावरून डोकीवरचा पदर कसा सावरावा हेच तिला सुधरेना! गोंधळून ती माघारा परतणार एवढ्यात राजांनीच तिला 'ये' असा हाताने विश्वास दिला !
आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगीने जात तिने सईबाईच्या मंचकाखाली हातातील धुनीची लोखंडी पाटी सारली. गडबडीने डोकीवरचा पदर नीट केला, आणि तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला असे वाटून ती स्वतःशीच शरमली ! आल्या पावलीच ती भिंतीच्या कडेकडेने पटकन् दालनाबाहेर निसटली. तिने 'ठेवलेल्या धुनीतील ओव्याचा धुराचा उग्रमधुर वास राजांच्या आणि सईबाईच्या नाकाला जाणवला. त्या वासाबरोबरच त्यांची नजर एकमेकांना भिडली. दोघेही शांतसुंदर हसले ! डोळेच उदंड बोलून गेले.
" तब्येतीस आराम ? " राजांनी विचारले.
काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या. ओव्याच्या तिखट धुराने बाळराजांनी खुसपुसायला सुरुवात केली.
“येतो आम्ही." म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर ओंजळीत दाबून दरवाज्याकडे चालू लागले. धुराने भरल्या दालनातून धीरपुरुष चालत होता. त्यांच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना सईबाईची तृप्त नजर त्यांच्या टोपातील ऐटदारपणे डुलणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगाबरोबर त्यांचे मनपाखरू डुलत होते. त्यांना सांगत होते. "तीन मुलींच्या पाठीवर हे बाळराजे झाले. त्यांना भरल्या डोळ्यांनी बघून परतणारी स्वारी आता केवढी पोक्त दिसते! एरव्ही मुलूखभा धावणी करताना पाठीवर धूळलोट घेत दौडणारी स्वारी, आमच्या महालातून बाहेर पडताना मात्र पाठीवर ओव्याचा धूरलोट घेऊन चालली आहे! कुंकूबळ असावं तर असं!"
सईबाईच्या महालातून बाहेर पडलेले राजे तसेच जिजाबाईंच्या महालात दाखल झाले.
"खबर मिळाल्यापासून बाळराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्याएवढी तरी फुरसद मिळाली की नाही राजे ?” राजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारत करीत
जिजाबाईंनी जाब केला.
"नाही मासाहेब, आम्हाला तुमच्या खलित्यातील एकाच बाबीची सारखी याद लागली." न बसता उभे राहूनच राजे अदबीने बोलत होते. “ कोणत्या ? "
* आम्ही थोरल्या आऊ झालो.' या तुमच्या बोलांची !” " म्हणजे बाळराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की? आम्ही ते केव्हाच योजून आहोत. पण पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे ?' " पुन्हा आऊसाहेबांनी तोच सवाल टाकला. त्या सवालाने त्यांच्या समोर उभे असलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले. काय बोलावे? कसा जाब द्यावा ? " अंऽ मतलब मासाहेब? आमची काही गल्लत राजे घोटाळले,
अडखळले.
"तशी गल्लत नाही पण गड चढून येताच कधी नव्हे ते पायांवर पाणी घ्यायच्या आधीच सिधे दरुणीमहालात आलात! कसं ? ” जिजाऊंनी हसून विचारले. राजांच्या धारदार नाकाजवळच्या निमुळत्या डोळ्यांवरच्या पापण्या त्या बोलांनी क्षणभर लवल्या! दुसऱ्याच क्षणी मुजरा घालीत राजे वळले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर, अवखळपणे हिंदकळणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगावर पंख पसरून बसलेले त्यांचे मातृहृदय त्यांना सांगत होते "एवढ्या दौडी घेतात, आता बाळराजांचे आबा झाले तरी राजांचं पोरपण काही नाही गेलं ते कधीच जाऊ नये! फर्जद असावेत तर असे!" जिजाबाई त्या विचारांनी स्वतःशीच हसल्या. त्या वेळी राजे महालाबाहेरच्या चौकात पंगाळातील पाणी गडव्याने पायांवर घेत होते. त्यांच्या टोपाला लगटलेली मोतीलग मात्र स्थिर होती !