कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️. भाग ३.

  भाग ३.

"अस्सं! जगदंब, जगदंब!" राजांच्या कपाळीचे शिवगंध, सईबाईंच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले. नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कवड्यांवरून फिरली. दुसऱ्याच क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मांड मोडून घोडाउतार झाले. शांत पावली विश्वासजवळ जात त्यांनी काही न बोलता त्याचा खांदा हळुवार धोपटला आणि आपल्या डाव्या हातीचे सोनकडे झटकन् खेचून त्यांनी ते विश्वासला दिले.


मागच्या घोडदळातील माणकोजी, मुरारबाजी, येसाजी, तान्हाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पायउतार झाली होती. त्यांना दौडीतले मावळे पगड्यांना झटके देत 'कसली खबर ?' म्हणून विचारू लागले. ढगात उठलेल्या विजेचा प्रकाशलोट क्षणात मुलूखभर पसरतो तशी ती खबर घोडदळभर पसरली. ती ऐकताना न राहवून एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत, आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली- " आई भवानीचा उदो ऽ! हर ऽऽ हर ऽ हर ऽऽ महादेव!" सगळे घोडदळ ती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठले.


राजांनी मागे वळून हसत आपल्या जानकुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर टेकवून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांच्या हाती दिली.


निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे बोल खडे होऊ लागले - “... ज्येष्ठ शुध द्वादशेस, गुरुवारी दहाव्या घटिकेस थोरल्या सूनबाईंस पुत्ररत्न प्राप्त जाहले. जगदंबेच्या आशीवदि करोन आम्ही 'थोरल्या आऊ' जाहलो.'


त्या बोलांनी राजांचे मन न्हाऊन निघाले. धावणीचा शिणोटा पार पसार झाला. निळोपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंड्यांचा फासबंद आवळला आणि सप् सप् सप् करीत, टपटपीत पाणथेंबाची टिपरी घुमवीत वळिवाने आपली बेहोष मारगिरी सुरू केली. हां हां म्हणता राजांच्यासह सारे बेडावल्या आकाशाखाली निथळून निघाले! राजांच्या टोपावरची, दाढीवरची तांबडमाती वळिवानं पार पिटाळून लांबली. तिची जागा पावसाच्या मोतीथेंबांनी घेतली !! वळीवधारांत न्हाऊन निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिकटली. अभिषेकपात्रातून वर्षणाऱ्या जलधारांखालचे नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते. सह्याद्रीच्या शिवाचे! पुरंधरच्या परतीवरचा राजांचा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लालमहालात पडला. या लालमहालाशी त्यांच्या कैक आठवणी जखडबंद झाल्या होत्या! उमर कवळिकीची असताना याच लालमहालाच्या उंबरठ्यावरचे माथाभरले माप लवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या. त्या वेळी 'एवढं भलं मोठं माप यांना दिसलं कसं नाही ?' याचं राजांना हसू आलं होतं! आज त्यांना आपल्या त्या विचाराचं हसू येत होतं.


रायगडावर सईबाईच्या महालात ही लग्नातील आठवण चिराखदानांच्या मंद प्रकाशात राजांनी अनेक वेळा बोलून दाखवली होती.

त्या आठवणी मनात घोळवीत राजे लालमहालाच्या माळवदावर आले. हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याचे डोळाभर दर्शन घेतले. भवतीचे छोटेखानी पुणे न्याहाळले. केदारवेस, कुंभारवेस यांची तटबंदी धरलेले छोटेखानी पुणे दुरडीतल्या दह्याच्या लोटक्यासारखे दिसत होते! ते बघता बघता राजांना पंधरा सालांपूर्वीचा काळ आठवला. * पंधरा वर्षापूर्वी हे सगळं गावठाण तसनस झालं होतं. त्याचं सुरूरपण सुकून गेलं होतं. या बेचिराख मातीला आऊसाहेबांनी बोलतं केलं. मासाहेबांचा हात पाठीवर घेऊन या बरड जहागिरीत सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराच्या खुंटाळीला आम्ही हात घातला! इथंच आमच्या मनसुब्याला श्रीगणेशाचा शुभशकून सांगायला आम्हास गजाननाच्या मूर्तीनं दर्शन दिलं!'


त्या मूर्तीची आठवण येताच राजे विचारात हरवले श्रींच्या गोमट्या राज्याची आणभाक आम्ही रायरेश्वरावर घेतली. हर मनसुब्यात येश देण्यास प्रत्यक्ष श्रीच समर्थ झाले. आजवर आऊसाहेबांच्या दोन चंद्रशांत डोळ्यांनी आमच्या मस्तकावर ममतेची बरसात केली. आता बाळराजांच्या रूपानं दोन हात आमच्या पाठीशी आले. सारी श्रींची कृपा!'


प्रसन्नशांत मनाने राजे महालात आले. चौरंगावर तबकात ठेवलेल्या केसरी टोपावर त्यांची नजर गेली. जवळ जाऊन त्या टोपाला आपल्या उजव्या हाताची बोटे भिडवून ती छातीला लावून राजांनी त्या टोपाला वंदन केले. दोन्ही हातांनी अलगद उचलून त्यांने तो आपल्या मस्तकावर घेतला; आणि राजे महालाच्या सदरेवर आले. माणकोजींने मुजरा घालून पुरंधरच्या धावणीसाठी घोडी तयार असल्याची वर्दी दिली.


तांबड्या कुम्मैत घोड्याला तबेल्यात ठाणबंद करून माणकोजींनी राजांची लाडकी, काळ्याभोर रंगाची कृष्णा' घोडी धावणीसाठी तयार ठेवली होती. तिच्या काळ्याभोर पाठीला हात लावून राजांनी तो मस्तकाला भिडविला. रिकिबीत पाय भरून झेपावत पक्की मांड घेतली; तेव्हा राजांच्या ओठांतून शब्द निसटले-“सरनौबत, विघ्नहर्त्यांचं दर्शन घेऊन मगच पुढे कूच करू !'


" जी!" माणकोजीं नी पगडी डोलवली.


माणकोजी, मुरारबाजी, तान्हाजी, संभाजी कावजी, सुभानजी, यांच्यासह राजे पुण्याच्या कसब्यातील गणेशदर्शनासाठी धिम्या चालीने निघाले.


गजाननाचे दर्शन घेऊन प्रसन्न झालेल्या खाशांनी घोड्यांना टाचा भरल्या. सारे पुरंधरच्या वाटेला लागले. नकळतच सगळ्या घोडेतुकडीच्या धावणीची गती नेहमीपेक्षा वाढली होती! राजे आपल्या 'बाळराजांचं' आणि त्यांचे साथीदार आपल्या 'धाकल्या धन्याचं' चित्र कल्पनेनेच स्वतःशी रेखाटीत होते!


पुरंधर नजरेत आला. राजांना सामोरे जाण्यासाठी गडपायथ्याशी उतरलेले किल्लेदार नेताजी पुढे आले. त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराच्या पालखीत बसले. झुपकेदार राजगोंड्याची वादी त्यांनी मुठीत पकडली. 'जय भवानी' असे भोयांनी पालखीला खांदे दिले. भोई गड चढू लागले. पुटपुटत भोयांनी पालखीला खांदे दिले. भोई गड चढू लागले.

बालेकिल्ल्याच्या सरदरवाज्यातून पालखी जाताना दरवाज्यावरची नौबत दुमदुमली. ती थेट राणीवशाच्या महालात पोचली होती. भोयांनी पालखी ठाण केली. राजे बालेकिल्ल्याच्या पायऱ्या चढून आले. एकवार मागे वळून त्यांनी, भक्कम माचीचे हात पसरलेल्या पुरंधरावर टेहेळती नजर फिरवली. आणि झपाझप कदम उचलीत, झडणारे मुजरे आपलेसे करीत ते थेट दरुणीमहालाकडे चालले.


दरुणीमहालाच्या दालनाच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या पहारेकऱ्याच्या हातात त्यांनी कमरेची जमदाड दिली. उंबरठ्याजवळ पायांतील बाकदार मोजड्या उतरल्या आणि समया तेवणाऱ्या शांत दालनात पाऊल टाकले. समोरच सईबाईच्या मंचकाशेजारी उभ्या असलेल्या हसमुख आऊसाहेबांना पाहताच ते झटकन कमरेत वाकले. त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ ओळंबली. उजवा हात तीन वेळा फरसबंदीकडे नेत त्यांनी तो छातीला भिडवून मुजरा रुजू केला. जिजाऊ हसतच पाच पावलं पुढे आल्या. त्यांचे चरण शिवून राजांनी आपला उजवा हात स्वतःच्या मस्तकी लावला. जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहराजड थैली दिली.


" आम्हाला वाटलं, बाळांच्या बारशाचं तरी भान तुम्हाला मुलुखगिरीत राहतं की नाही कोण जाणे!" म्हणत जिजाबाईंनी हसत राजांच्या टोपावर आपला हात ठेवीत त्यांना वर उठविले. शांतपणे त्या सईबाईंच्या मंचकाजवळ गेल्या. " सूनबाई 5.! " म्हणून त्यांनी एक हळुवार साद घातली. सईबाईनी जडावलेले डोळे उघडले. जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंचकावर उठून बसण्याची कोशीस करू लागल्या. "राहू दे." म्हणत जिजाबाईंनी त्यांना बळेच शांत केले, आणि त्यांच्या कुशीतील दुपट्यात लपेटलेल्या, चळवळ्या बाळराजांना अलगद उचलताना जिजाबाई म्हणाल्या, "तुमची स्वारी गडावर आली. जागत्या राहा!' "


मोहरांच्या थैलीचा सतका बाळराजांवरून उतरून राजांनी ती थैली एका तबकात ठेवली. हातांतील बाळराजे हसत जिजाबाईंनी राजांच्या हातात दिले. किंचित वाकून हलक्या हातांनी ते गोड ओझे आपल्याकडे घेताना नकळतच राजांची धारी नजर मंचकाकडे गेली. डोळ्यांना डोळे क्षणमात्र भिडले; क्षेमकुशल नजरेतच विचारले गेले.


हातातील धडपडणाऱ्या बाळजीवाकडे बघताना राजांच्या डोळ्यांतले भाव क्षणात बदलले. गनिमांवर एल्गारी चाल करताना आग वर्षविणारे त्यांचे निमुळते डोळे, हातांतील कोवळ्या जिवावर वात्सल्याची मूक बरसात करू लागले. बाळराजांच्या बिबट्या सतेज डोळ्यांत पाहताना राजांचे भान हरपले होते. मंचकावरून सईबाई आणि शेजारी उभ्या असलेल्या जिजाबाई राजांच्या त्या रूपाकडे कौतुकभरल्या नजरेने पाहत होत्या. तीन पिढ्यांचा तो अतिशय बोलका मूक-संवाद फक्त शांतपणे जळण्याची ताकद असलेल्या भवतीच्या समयांनाच कळत होता !


नकळत जिजाबाईंची नजर दरवाज्याकडे गेली. तिथे उंबरठ्याबाहेर, उत्सुकलेल्या डोळ्यांची राजांची खास मंडळी दाटीवाटीने उभी होती. जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच अदबमुजरे केले. त्या मंडळींत माणकोजी, सुभानजी, संभाजी कावजी, येसाजी, तान्हाजी नूरखान बेग सारे मीठजागते ईमान होते. त्या सर्वांना आपले 'धाकले धनी' एकदा नदरं पडावेत असे वाटत होते. त्या मोहऱ्यानेच ते सारे उंबरठ्याबाहेर दाटले होते.


त्यांच्यावरची नजर उचलून राजांच्याकडे पाहत जिजाबाई हसत म्हणाल्या, “पहिला- बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे ?' " " "अं! मतलब मासाहेब ? आमच्या ध्यानी नाही आलं. राजांची पुत्रमुखदर्शनाची समाधी भंगली.


"नाही म्हणजे हमेश तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्याबरोबर दौडणारी खाशी मंडळी दरवाज्यातच खोळंबलीत! त्यांनाही बाळराजांना पाहावंसं वाटतंय!' जिजाऊंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न हसले. आपल्या हातातील बाळराजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालनात येण्यासाठी हाताची इशारत केली. तशी सारी मंडळी दालनात आली. फक्त नूरखान बेग बाहेर राहिला. मुघलाने राजांच्या राणीवशात कसे कदम टाकायचे ? त्याची अडचण राजांनी हेरली.


" खान, तुम्ही का थांबलात ? बेशक आत या.” राजांनीच त्याची कोंडी फोडली.


नूरखानही आत आला. जिजाबाईंनी बाळराजांना माणकोजींच्या हाती दिले. भुवया चढवीत, डोकीवरची पगडी डोलवून त्यांनी बाळराजांना डोळाभर पाहून संभाजी कावजीच्या थोराड हातात दिले.


" हा ऽ" करीत संभाजीने बाळराजांना आपल्या हातात अलगद घेतले तशा


जिजाबाई म्हणाल्या-


"सांभाळून घे रे बाबा, उभं अरबी घोडं पोटाखाली मान घालून उचलणारा तू; अजून बाळराजांची मान नाही धरली!" सगळेजण त्या बोलांनी दिलखुलास हसले.