कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग २.

भाग २.


 आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंधरवरच्या सगळ्या राउळांतले देव आपोआप सोयरात पडत होते!


पुरंधरच्या सदरमहालात बैठकीवर बसून जिजाबाई खलित्यांचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्णपंत हणमंते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते. बाहेर अठरा कारखान्यांतील असामींना, पांढऱ्या गलमिश्यांचे गोमाजी नाईक पाणसंबळ, खांद्यावरच्या परातीतील साखर मुठीमुठींनी वाटत होते. कुणीतरी लगटीने गोमाजीबाबांच्याच तोंडात साखरमूठ भरली. तिचे निसटते कण गोमाजीबाबांच्या पांडाघोट मिशीत अडकले होते.


• गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला, "नाईक, लई लहानी मूठ "हाय तुमची !


त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजीबाबा गरजले, " म्होरं ये. परातच वततो तुज्या थोबाडात !" आणि गोमाजी स्वत:वरच खूष होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले.


सदरमहालात खलित्यांच्या लाल फासबंदांच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या ठेवलेल्या तबकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला.


सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक एक खबरगीर सामोरा आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला. फलटण, तळबीड, सिंदखेड, बंगळूर, चौक चौवाटा त्या थैल्या जाणार होत्या.


जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली. त्यांच्या समोर मावळपट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास-नानाजी मुसेखोरेकर उभा होता. त्याच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या, "विश्वासराऊ, जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर. आमचा सांगावा सांग की जरोर निघोन येणे. पुत्ररत्न उपजले! "


" जी." म्हणत विश्वासरावाने थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाऊंना मुजरा भरला. विश्वासराव सदरमहालाबाहेर पडला.


धावणीची वाट बिनघोरी आहे की नाही हे टेहळण्यासाठी जासुदांचा नाईक बहिर्जी, राजांच्या घोडदळापुढे एका मजलेवर दौडत होता. सुपे जवळ आले. बहिर्जीच्या धारनजरेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला. झटकन् बहिर्जीने आपल्या उजव्या तळहाताची झड कपाळावर चढविली. डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानोसा घेतला. त्याच्या घोड्यावरच्या मावळी जिनाची खूण चांगली पटताच टांच मारून, धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने क्षणात त्या स्वाराला गाठला. 

बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पायउतार झाला. 'काय खबर आहे इस्वास ? " मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चाचपून पाहिलं.


" लई नामी खबर हे नाईक ! धन्यास्नी बाळकिसन जालं! पुरंधरावरनं मासाबांची थैली घिऊन आलू न्हवं." विश्वासने आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला.


"धन्यांचं बाळकिसन ऽऽऽ ! कवा ? भले रे माज्या भाद्दरा ! 17 मांड मोडून जिनावरून खाली चलाख चटकी छलांग घेतली. आपण राजांच्या खबरगीर म्हणत बहिर्जीने खात्याचे नाईक आहोत, विश्वास एक मामुली खबरगीर आहे हे विसरून बहिर्जीने सरसे होत विश्वासची थेट ऊरभेट घेतली. त्याचे खांदे थोपटले.


वळीव पावसाचा मारा होणार ही इशारत देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीनं बहिर्जीनं आपल्या घोड्याचा मोहरा माघारा वळविला. विश्वासला राजांच्या सामने रुजू करण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीकडे चौपट दौडू लागला.


राजांचे घोडदळ नजरटप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली. धिम्या चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले. पायउतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांना अदबमुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर, कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढीकळपांसारखा केव्हा जमाव धरला ते कुणालाही कळलेसुद्धा नाही.


राजे कुम्मैत जातीच्या तपकिरी, उमद्या जनावरावर मांडबुलंद बैठक जमवून बसलेले होते. घोड्याचे भगवे, रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखडून धरले होते. कपाळीचे दोन दलांचे आडवे शिवगंध, छातीकडे धारदार नाकाचा तरतरीत शेंडा, कानशिलाकडे निमुळते होत गेलेले, दोन्ही डोळ्यांत दोन सूर्य वागविणारे, लांबट डोळे, उभट शंखासारखी रंगसतेज मुद्रा, छातीच्या ठोकेदौडीशी कान लावून विसावलेली कंठातील चौसष्ट कवड्यांची आई भवानीची पावन माळ! असे ते 'राजयोगी' रूप होते. धावणीत घोड्यांच्या टापांखाली उसळलेली तांबडधूळ त्यांच्या पांढऱ्याशुभ्र टोपावर आणि काळ्याशार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती.


बहिर्जीला बघताच राजांच्या रक्तजागल्या, रसरशीत ओठांतून काळजाची ठाव घेणारी, सोनेरी बोलांची चलाख कबुतरे क्षणात उडाली- “बोला नाईक, सिताब पाठमोरे वळाया कोण वजह ? काही आफत... ?” राजांच्या उजव्या भुवईने वर चढत कमानी-बाक घरला.


"न्हाई धनी, ह्यो इस्वास पुरंधरावयनं मासाबांची थैली घिऊन आला. लई खुषीची खबर हाय. थोरल्या रानीसाबास्नी बाळकिसन जालं! धाकलं धनी आलं! कलच्या बेस्तरवारी ! '