भाग १
पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या राउळातील दगडी ठाणवया, करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या. राउळाचा गाभारा त्यांनी उजळूनटा कला.
पुरंधरच्या बालेकिल्ल्यातील राणीवशाच्या दरुणीमहालात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबिणींचा कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता. दरुणीमहालातील बाळंतिणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता..
त्या मिटल्या दरवाज्यासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकंवा झालेले स्त्री-खानदान अस्वस्थपणे, चिंतागत जडावल्या येरझारा घेत होते. स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनांचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या स्त्री-खानदानाने कैक वेळा दरवाज्याला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतःशीच 'आई जगदंबे, आई जगदंबे' असे पुटपुटणे चालू ठेवले.
त्या होत्या जिजाऊसाहेब! शहाजीराजे भोसले यांच्या राणीसरकार ! श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातुश्री- आऊसाहेब ! भोसले कुळीचा पवित्र - मंगल कुंकुमकरंड ! जगदंबेला स्त्री-जातीच्या रूपात पडलेले सर्वांत गोमटे स्वप्न !
उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाज्यासमोर अशाच ये-जा करीत होत्या. त्यांच्या शेजारीच दहाबारा हातांचा पल्ला राखून पुरंधरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते. उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हातांचा वेढा भरला होता. रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एक जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळलं नाही! त्यांच्या डुईवरची कंगणीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सिताब सावरीत होती. मर्दाची झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते !
दरुणीमहालावरचा रोपणनाईक आला. जिजाऊंना बघताच अदबमुजरा घालून कोनाड्याकोनाड्यांत निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला.
दिवस चांगला दीड कासरा धावणी घेऊन वर चढला. महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐसपैस प्रकाश मांडला. मातुश्री जिजाऊ पुरत्या फिकरमंद झाल्या. चिंतागत फेन्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कढ आले होते. त्याहून अधिक काळजीचे कढ त्यांच्या आत दाटले होते.
एकाएकी दालनाचा दरवाजा कुरुवात कुरकुरला. आऊसाहेब बिगी बिगी दरवाज्याच्या रोखाने पुढे सरशा झाल्या. आतल्या सगळ्या 'आऊपणानं त्यांच्या कानांत जमाव केला. अनेक सवाल डोळ्यांत खडे ठाकले.
दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके, राजस रडणे धावणी घेत कानी आले. उघडल्या दरवाज्यात मध्यम वयाची कसबी सुईण गोजाक्का कमरेत वाकून उभी होती. आपले अशुच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून तिने ते पाठीशी उफराटे फिरविले होते.
तापल्या दुधावर दाट साय जमून बावी तसे नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले. जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंदलेले कातडे वर चढबीत दिललगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाह्या फुलविल्या. 'झडू द्या तोपांची नवबत! बाळकिसन आलं... बाळकिसन !! बाळ बाळतीन " सम्द सुकरूप.
" औ... बाळराजं " म्हणत नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चटकी छलांगच घेतली! त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला. मात्र सामने जिजाबाईंना बघताच दबकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर सिधी बसती केली. मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले, " बुरजावरजवरच्या भांड्यांस्नी बत्ती देतो आऊसाब! धाकलं धनी आलं !! दे जगदंबेचा उदो!" "
प्राजक्ताचे फुलभरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न प्रसन्न हसल्या. चतुर नेताजींनी तेवढीच संमती सिताब उचलली. आपली पाठवळ आऊसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीत घालीतच ते मागल्या पावली चार-पांच कदम मागे हटले. वळताना आपल्या भरदार मिश्यांच्या चिंच आकड्यावरून उजव्या हाताची दमजोर पालथी मूठ फिरविताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले, 'बाळराजं ऽ! धाकलं धनी ऽ ब्येस... लई ब्येस !” आणि एरव्ही घोड्यावर मांडबुलंद बैठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सिधे पायीच धावले- तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी !
त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांचा कुंकूपट्टा वर चढवीत स्वतःशीच हसल्या. डोकीवरच्या टोपपदरी नेसूचा भगवा जरीकाठ त्यांनी गोंदल्या हाताच्या कुलवंत चिमटीने उगीच सरसा केला !
"बाळकृष्ण ! शिवबांचे बाळ! पहिले बाळराजे!" गोजाक्काच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या सोशिक मनावर लक्ष लक्ष मोरपिसे फिरली होती. आता त्या 'थोरल्या आऊ' झाल्या होत्या. त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली. इतकी सालं गुदरली. शिवनाराजांच्या राणीवशात कन्यारत्नांचं उंच टिपेचं रडणं कैकवेळा घुमलं होतं... पण बाळकृष्णाचं बसकं रडणं आजवर कधी उठलं नव्हतं. म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले. कृतार्थतेने ! मुलाच्या दर्शनाने 'आऊपण' धन्य होते, पण नातवाच्या दर्शनाने अवधे 'स्त्रीपण' धन्य होते ।
स्वतःला सावरीत जिजाऊंनी गोजाक्काला विचारले, "कुणासारखे गं दिसतात बाळराजे ? "
" जितनित राजेसायबाबानी!'
"राजेसाहेब!” जिजाऊंच्या डोळ्यांसमोर शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली. "घोड्याच्या पाठीवरून घामेजत घावणी धरून ते कुठल्या मुलखात असतील अंबा जाणे! राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातान्हात दौडीवर होती ! आज शिवनाराजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिल्याचा पायगोवा राहात नाही हेच खरं हूं- जगदंब जगदंब ! करीत जिजाऊंनी एक निःश्वास सोडला. कितीतरी उदंड कढ त्या निःश्वासात भरले होते. राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला..
आतल्या शिसवी मंचकावर सईबाईच्या कुशीतून उफाळलेले रडणे भवतीच्या दगडी भिंतींवर रोमांच रोमांच उठवीत होते! उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या. आपल्या उतावळ्या मनाचे त्यांचे त्यांनाच हसू आले. पाचवी झाल्याखेरीज बाळंतिणीच्या सोयर पडलेल्या दालनात नसते जायचे! त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जखडबंद झाल्या. उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला! नेसूच्या निरीजवळ खोचलेली मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली.
" सतका उतरा बाळराजांचा गोजाबाई." म्हणत त्यांनी वाकून ती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली. शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे चालल्या. त्या वेळी किल्ले पुरंधरच्या चारी बाजूंचे बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी, निळ्या, वैशाखी आभाळाला खबर देत होते. "राजश्रियाविराजित, सकळगुणमंडित, भोसले कुलावतंस, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणीसरकार वज्रचुडेमंडित सईबाईसाहेब प्रसूत जाहल्या ! पुत्ररत्न प्राप्त जाहले!"