भाग:-२
*शिवकालीन न्यायव्यवस्थेत राजाबरोबरच स्वतंत्र न्यायाधिशाचीही नेमणूक शिवरायांनी केलेली होती. पण, अतिशय गुंतागुंतीचे आणि फौजदारी स्वरुपाचे खटले न्यायाधिशापर्यंत जात. गावपातळीवरची गोतसभा हीच अधिक प्रभावी होती. गोतसभेबरोबरच धर्मसभा ही धार्मिक निर्णय घेत असे. गोतसभेमध्ये स्थानिक प्रशासनाचा अधिकारी, गावातले बारा बलुतेदारांचे प्रतिनिधी, मुकादम आणि हवालदार यांचा समावेश असे. ही गोतसभा उपरे ते आलुतेदारापर्यंत सर्वांनाच प्रतिनिधित्व देत असे.
गोतसभेने घेतलेला निर्णय राजालाही बदलता येत नसे. गोतसभेच्या निर्णयावर बारा बलुतेदारांच्या मुद्रा आणि शिक्के असत. धर्मग्रंथ आणि परंपरेनुसार न्याय देताना सामाजिक रुढी परंपरा आणि नीती-नियमांचाही निर्णय देताना विचार केला जात असे. फिर्यादी आणि प्रती पक्षाचे म्हणणे गोतसभा ऐकून घेत असे. आरोपीला त्याचा बचाव करण्याची पूर्ण संधीही दिली जात असे.* आरोपीने परमेश्वराला स्मरून सत्य सांगावे अशी, गोतसभेची अपेक्षा असे. साक्षीदारांनाही शपथेवार साक्षी द्याव्या लागत. गोतसभेपुढच्या विविध दाव्यांचे साक्षी-पुरावे पूर्ण झाल्यावर न्यायदान केले जात असे. ज्याच्याविरुद्ध दावा दाखल झाला असेल, त्याला पंचांचा म्हणजेच गोतसभेचा निर्णय मान्य करावाच लागे.
*संबंधिताला सुनावलेली शिक्षा किंवा दंड, दंडाची कार्यवाही लगेचच केली जात असे.*
शिवकालात आणि मराठे शाहीत सूत्रबद्ध असे कायदे नव्हते. पण,
*न्यायदानाची पद्धत अत्यंत सोपी होती. कुणाही व्यक्तीला गोतसभेकडे दाद मागता येत असे. सत्ता विभाजनाचा सिद्धांत न्याय प्रक्रियेसाठीही अंमलात आलेला होता.
आरोपी आणि फिर्यादीत वैर वाढू नये, याची दक्षता गोतसभा घेत असे. परस्पर वैराने सूडाचा अग्नी पेटता राहतो आणि त्यामुळे सामाजिक, गावाच्या ऐक्यालाही सुरूंग लागतो, याचे भान पंचांना असे. आरोपी विरुद्ध निर्णय देताना मुख्य पंच त्याला तू कसा दोषी आहेस, हे समजावून सांगत असत. किरकोळ तक्रारी आणि फिर्यादी ऐकून घेऊन परस्पर समझोत्याने निकाल देण्याची पद्धतही रूढ होती. या जलद गती न्याय मिळायच्या पद्धतीने गावोगावात शांतता आणि सुव्यवस्था नांदत असे. कुठलेही वैर शेवटच्या टोकाला जात नसे.* गावातील अठरा पगड जाती, भिन्न भिन्न कामे करीत असल्या तरी, गाव मात्र एकच असे. गावाच्या आणि पंचांच्या सल्ल्याशिवाय न्याय निवाडा राजाही करीत नसे. राजकुमार आलेल्या खटल्यांचा निकाल देताना मंत्री आणि न्यायधिशांचे सहाय्य घेतले जाई.
स्थानिक स्वरुपाचे दावे आणि खटले मात्र ग्रामीण गोतसभेच्या सल्ल्यानुसारच निकाली काढले जात. स्वराज्यात न्यायाधीश किंवा पंडीतराव हे न्यायदानाचे काम करताना धर्माला अनुसरूनच न्यायदान करीत. निकालपत्रावर राजाची मुद्रा असे.
*पंडीतरावांकडे धार्मिक खटलेही चालत असत. देवस्थानाच्या जमिनी आणि अन्य सार्वजनिक खटले वंश परंपरागत जमिनींबाबतचे दावे सरकारकडे निर्णयासाठी जात. पण, गोतसभा हीच न्यायदानाच्या बाबतीत श्रेष्ठ होती. त्यामुळेच
-शिवशाही आणि मराठेशाहीत खटले तुंबण्याचे प्रकार घडत नव्हते. जनतेला गोत
सभेकडून न्याय मिळेलच, असा विश्वास होता.* :
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलशाही खिळखिळी झाली. मराठेशाही बळावली. उत्तरेतही मराठ्यांनी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. शिंद्यांनी ग्वाल्हेरला, होळकरांनी इंदूरला आणि गायकवाडांनी बडोद्याला आपले कायमचे ठाणे केले. स्वराज्यावर आक्रमणाची भीती राहिली नाही. स्वराज्य स्थिर झाले. छ.
शाहू महाराजांच्या कारकिर्दीपासून न्यायदान व्यवस्था पंचायत पद्धतीचे (मजलिस) महत्व वाढले.
क्रमशः
Sagar