कोणतही शिवकाव्य येथे शोधा

छावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
छावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १०४

 संभाजीराजांचे बोट धरून चालत येणारे रामराजे, जिजाऊ थकल्या नजरेनेच पण कौतुकाने बघू लागल्या. त्या मनोमन म्हणाल्याही " असेच रहा. रामभरतासारखे!' - “राजे, यांना कशाला त्रास देता ? " वैद्यांकडे बघत जिजाऊंनी विचारले. " आईचं करताना मुलाला त्रास कसला ? " वैद्यांनी त्यांना धीर द्यायचा यत्न केला.


मंचकावर टेकून महाराजांनी जिजाऊंचा हात हाती घेतला. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या संभाजीराजे आणि रामराजांनी मंचकावर बसावे म्हणून जिजाऊंनी हात थोपटून खूण दिली. संभाजीराजांनी उचलून रामराजांना मंचकावर ठेवले. जिजाऊंचा थरथरता हात रामराजांच्या पाठीवरून फिरू लागला. शांत आवाजात त्या म्हणाल्या, “बाळराजे, दादामहाराजांचे धरले बोट सोडू नका.' “मासाहेब, कसं वाटतंय ? जिजाऊ आपणाला टाळू बघताहेत हे जाणून


"महाराजांनी विचारले. 'आता काय वाटायचं राजे ? आम्ही वाटण्याच्या पलीकडे गेलोत. या सान्यांना नजरभर बघून बरं वाटतं.” जिजाऊंचा आवाज साऱ्यांनाच परका वाटला. "राजे, एक वाटतं.” जिजाऊंचा आवाज साऱ्यांनाच परका वाटला. " आज्ञा मासाहेब.” महाराजांनी त्यांचा हात मायेने थोपटला.


"आम्हास आम्हास आईचा गोंधळ ऐकावा वाटतो! " - महाराज चरकल्या नजरेने त्यांच्याकडे बघतच राहिले. मग त्यांनी मोरोपंतांना नजर दिली. तिचा इशारा ओळखून पंत गोंधळ्यांना निरोप धाडण्यासाठी बाहेर पडले. औषधी पोतडी खोलून वैद्यांनी नाना प्रकारच्या मात्रा जोडल्या.


रात्री वाड्यात गोंधळाचा चौक मांडण्यात आला. आपल्या हाताने जिजाऊंनी जमल्या गोंधळ्यांना पानविडा आणि वस्त्रे दिली. ती पाजळून गोंधळ्यांनी नमन घरले.. त्यांचा म्होरक्या उदासवाण्या आबाजीत आईचा महिमा गाऊ लागला.


" उदर परडी देऊन हाती- ब्रह्मांडी फिरवी. लक्ष चौऱ्याऐशी घरची भीक्षा मागविली बरवी- ज्या ज्या घरी मी भीक्षा केली - ते ते घर रुचले ! आदिशक्तीचे कवतुक मोठे भुत्या मज केले. 


ते ऐकताना जिजाऊंचे पाय चेपणाऱ्या संभाजीराजांचे डोळे झरझरू लागले. राजांच्या गळ्यात दम्यासारखी दाटण झाली. जिजाऊ मात्र डोळे मिटून शांत पडून होत्या. बाहेर वाड्यात कोसळणाऱ्या पावसाच्या गजरात संबळ तुणतुण्याचे सूरसाद क्षीण होत विरून जात होते.


ज्येष्ठ वद्य नवमीची काळरात्र पाचाडच्या वाड्याभोवती घिरट्या घालू लागली. बाहेर पावसाची रपरप धुडगूस घालीत होती. आत दरुणीमहालात मायेच्या मंचकाभोवती जमलेली मने चिंतेने कळंजली होती. आऊसाहेबांच्या हट्टी दम्यासमोर मात्रा हरल्या होत्या, काढे कंटाळले होते, वनस्पती वरमल्या होत्या. खोकून खोकून फासळी फासळी खिळखिळी झालेल्या जिजाऊंचा डोळा लागला होता. त्यांची झोपमोड होईल म्हणून हाती धरलेला त्यांचा हात तसाच ठेवून संभाजीराजे बसले होते. त्यांच्या शेजारीच महाराज आणि रामराजे टेकले होते...


मोरोपंत, आण्णाजी, चांगोजी, हंबीरराव, अंतोजी, रायाजी साऱ्या जिव्हाळ्याच्या माणसांचे मंचकाला कडे पडले होते. मंचकाच्या उशालगतीला पुतळाबाई, येसूबाई, धाराऊ, सोयराबाई असा स्त्रीवसा चिंतावल्या डोळ्यांनी उभा होता.


बाहेर घोंघावणाऱ्या पावसाळी वाऱ्यांचा झपकारा मधूनच महालात घुसला. चिराखदाने आणि समयांच्या ज्योती त्याने अंगभर थरथरल्या. त्यांच्या धरथरत्या उजेडाबरोबर आतले मननू मन नको त्या शंकेने चरकून उठले. मधरात्रीचा सुमार झाला. "राजे ऽ" मंचकावरून दमादाटली क्षीण साद आली.


जी." महाराज पुढे झुकले. " तीर्थ द्या. गंगेचं." दमा निर्धारी झाला. " तुळशीपत्रही आणा.'


महाराज उठले. देव्हाऱ्यात ठेवलेली गंगाजलाची तीर्थकुपी आणि तुळशीपत्र घेऊन पुन्हा मंचकाजवळ आले. पळीने त्यांनी गंगोदक मासाहेबांच्या ओठांत सोडले. त्यांच्या हातीचे सोनकडे थरथरले. मासाहेबांच्या ओठांत तुळशीपत्र देताना उभा रायगडच उचलून कुणीतरी आपल्या छातीवर ठेवला आहे असे त्यांना वाटले.


मासाहेबांच्या सेवेत सर्वांत शेवटी रुजू होऊन गंगाजल आणि तुळशीपत्र पावन झाले ! "शिवबा, जवळ या." तुळशीपत्राआडून सावळे, निर्बंध बोल आले.


महाराज पुढे झाले.


" हात द्या." कधी नव्हे ते, मानी स्त्री खानदान राजांच्याकडे मागणे घालीत होते.. महाराजांनी सोनकड्याचा हात जिजाऊंच्या कंकणे घरंगळणाऱ्या हाती दिला. " शिवबा, आम्ही तुमच्याकडे कधी काही मागणं टाकलं नाही. आज टाकतो


आहोत. आम्हास आण द्या.


“मासाहेब आज्ञा व्हावी -" राजांची छाती दाटून आली. -


“शिवबा , शिवबा, आमच्या शंभूराजांच्या आऊ आता तुम्ही व्हा! आम्ही वचनात आहोत थोरल्या सूनबाईच्या. ते तडीस लाव."


ते ऐकताना संभाजीराजांच्या मनाचा बांध बांध फुटला. हाती धरलेला जिजाऊंचा हात गदगदून हलवून ते मुसमुसत म्हणाले, “आऊसाहेब तुम्ही... तुम्ही हव्यात

आम्हाला, आमच्या महाराजसाहेबांना.' "


"शंभूराजे, शांत व्हा. तो ऋणबंध सरला. एक नीट ऐका. तुम्ही तुम्ही आमच्या - स्वारीसारखेच दिसता. पण पण ते जसे आम्हास पारखे झाले तसे तुम्ही कधी येसूबाईंना - होऊ नका !

'राजे, आम्ही सारं बघितलं. फक्त एक राहून गेलं. आमच्या रामराजांचे हात पिवळे झालेलं बघण्याचं! ते करा. आणि आणि जीवावरच्या साकड्यात आता स्वतःला कधी गुंतवून घेऊ नका. तुमच्यासाठी जगदंबेच्या पायाशी धरणं घरायला आता कुणी उरलं नाही !"


ते ऐकताना नाकगड्डा चिमटीत धरलेल्या राजांचा टोप डावा उजवा हिंदकळला. त्यांच्या पोटात पोकळीचा खड्डा पसरला. शब्द थरथरले - " माऽसा ऽ हे ऽब!" "राजे, केशवपंडितांना बोलवा. आम्हास समर्थांचा बोध ऐकवा !"


बाहेर पाचाडभर ऐन मध्यरात्र हट्टी धरणे धरून बसली. मेटामेटावरचे पहारेकरी एकमेकांच्या हाती बदलत्या पहाऱ्यांचे भाले देताना गस्त घालू लागले - " मेटकरी हुश्या र!" वाड्याच्या छतावर मावळी पाऊस दाभणधारेनं कोसळतच होता. केशव पंडितांनी अडंगीच्या बैठकीवर दासबोध मांडून चौरंगावर बैठक घेतली. त्यांना बोध दिसावा म्हणून धाराऊने अडंगीजवळ तेवती समई ठेवली.


केशवपंडितांच्या तोंडून समर्थांचे बैरागी शब्द थरथरत बाहेर पडू लागले- 'सरतां संचिताचे शेष। नाहीं क्षणाचा अवकाश । भरतां न भरतां निमिष जाणे लागे ॥


गेले बहुतां बळांचे । गेले बहुतां काळाचे।


गेले बहुतां कुळांचे। कुळवंत राजे ॥ बहुतां जन्माचा सेवट । नरदेह सांपडे अवचट ।


येथ वर्तावे चोखट नीतिन्यायें ॥


काया बहुत कष्टवावी। उत्कट कीर्ति उरवावी । चटक लावुनी सोडावी काही एक ॥


पंडितांची जवान थरथरू लागली. शब्दाशब्दांबरोबर भवतीची मने थिजू लागली.


चिराखदानांच्या ज्योती थरथरू लागल्या.


'जीव जीवांत घालावा। आत्मा आत्म्यांत मिसळावा ।


राह राहो शोध घ्यावा 51 परांतराचा ॥


केशव पंडितांचा हात कापू लागला. डोळ्यांच्या कडा दाटून आल्या. एक एक शब्द त्यांच्या दाटल्या गळ्यातून घोगरत बाहेर पडू लागला-


'सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेवट


येथ सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन ॥


" पंडित, नको ऽ, वाचू नका 5. संभाजीराजांच्या या कळवळत्या बोलांनी केशवपंडितांच्या पापण्यांवर थरारलेले अश्रूंचे थेंब हातीच्या पानावर टपटपले! त्यांना वाचवेना. कुणालाच काही बोलवेना.

ना छत्रपती शिवाजीमहाराजांना, ना युवराज संभाजीराजांना, महालातील कुणालाच कल्पना नव्हती की मिटल्या डोळ्यांच्या जिजाऊंनी आत्मा केव्हाच आत्म्यात घातला होता. देहभान हरपलेल्या, माणसांच्या जगापार गेलेल्या, लोकमाता जिजाऊसाहेबांच्या जीवज्योतीला प्रकाशच प्रकाश दिसत होता शेवटचा प्रकाश.


होय! साक्षात अष्टभुजा, शस्त्रधारी, वाघावर आरूढ झालेली जगदंबाच त्यांच्या रोखाने येत होती! वाजत-गाजत, तिच्या समोर डोर-चोळणा घातलेला, छातीवर कवड्यांच्या माळाच माळा मिरविणारा, भंडाऱ्याने मळवट भरलेला, हाती पोत नाचविणारा भुत्यांचा सरंजामी तांडाच तांडा "उदंऽ उदं ऽ" गर्जत येत होता!


ती 'भवानी यात्रा' थेट जिजाऊंच्या समोर येऊन थांबली. वाद्यांचा गलका विरला. वाघावर बसल्या जगदंबेने जिजाऊंच्या रोखाने आठी हात पसरले! भुत्यांनी बेहोष उदोकार दिला- "उदं उदं ऽ".


देहाच्या सिंहासनावरून खंबीर जिजाऊ उठल्या! त्यांनी भगवा पदरकाठ ठाकेठीक केला. जगदंबेच्या डोळ्यांना डोळे जोडून बरेच दिवस मनाच्या खोलवटात रुजून बसलेला एक जाब तिला त्यांनी खानदानी बोलीत विचारून घेतला -


'आम्हास वाटलं होतु तुम्हीच याल! पण वाटलं नव्हतं, तुम्ही अशा याल! वाटलं होतं तुम्ही येताना आपल्या संगती एक जीनकसला घोडा घेऊन याल ! त्याच्या रिकिबीत आमचाही पाय भरून फरफट करीत आम्हास तुमच्या दरबारी घेऊन जाल! जसं होदिगेरीच्या रानातून तुम्ही आमच्या स्वारीची शिकार करून त्यांना घेऊन गेला होतात तशा ! पण !! चला. आम्ही सिद्ध आहोत! "


राजे, संभाजीराजांसकट साऱ्यांना जिजाऊंच्या ओठांतून 'जगदंब ! जगदंब !' असे शब्द बाहेर पडताहेत असा भास झाला.


डुईवर सप्तनद्यांचे पवित्र जल घेतलेले छत्रधारी, अभिषिक्त राजे खऱ्या अर्थानि पोरके झाले ! छत्रधारी छत्रहीन ! राजांच्या डुईवरचे आऊपणाचे छत्र गेले... आणि आणि..... संभाजीराजांच्या ? जिजाऊंचा निष्प्राण झालेला, थंडगार हात गद्गदा हलवीत, उभ्या चेहऱ्याला इंगळ्याच इंगळ्या डसाव्यात तसे आक्रसल्या चर्येने, महाराजांच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत, संभाजीराजांनी मध्यरात्रीचे पाषाणकठोर काळीजही तडकेल असा हंबरडा फोडला-- आबा, आमच्या आऊसाहेब गेऽल्या ! 


पाठच्या भिंतीवर थडाथड गोंदले कपाळ बडवीत "मासाब, मासा 5 ब" म्हणत पाय गेलेली धाराऊ मटकन खालीच बसली. उठलेल्या आक्रोशाने शमादानांच्या ज्योतीन ज्योती थरथरल्या. जिजाऊंच्या निष्प्राण देहावर दुअंगाने डोके घुसळीत महाराज नि संभाजीराजे स्फुंदू लागले. बाहेर पाचाडभर फतेबाज मध्यरात्र सरत होती. थेंबाथेंबाने गळत होते !

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १०३

 देकार सरला. दरबारी कलाकारांनी पवाडे, नृत्य, भजन यांच्या शेलक्या चिजा पेश केल्या. सर्वांत शेवटी व्रजकवी भूषण कमरशेला आवळून सिंहासनाच्या सामोरा आला. त्याची बिजलीवर मांड घेतलेली दिमडी धडबडू लागली. कानावर हात घेत त्याने राजांच्या कुलदेवाचे नमन धरले.


'जै जयंती जै आदि सकति-


जै चमुंड जै मुंड भंडासुर खंडिनी। जैसुक्त, जे रक्तबीज बिडाल बिहंडिनी ॥'


ते नमन ऐकताना राजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. डोळे मिटलेल्या संभाजीराजांना साक्षात अष्टभुजा दिसू लागली. दिमडी छळकत थडाडू लागली -


'दशरथ जू के राम, मैं वसुदेव के गोपाल ।


सोई प्रगटे साहि के, श्री सिवराज भुपाल ॥


सिव हि औरंग जिति सके, और न राजा राव। हदि मत्थ पर सिंह बिनु, और न पाले पाव ॥


औरस को जो जनम है, सो याको यक रोज औरस को राज है सो, सिर सरजा को मौज ॥


"भरल्या दरबारातून भूषणच्या ढंगदार शिवगौरवाला सहज दादी येऊ लागल्या. डोळे मिटलेला भूषण हात छताकडे उडवीत शब्दाचे पोतचे पोत नाचवू लागला-


'जीवन मैं नर लोग बडो, कवि भूषन भाषत पैज अडो है। है नर लोगन मैं राज बड़ों, सब राजनमें सिवराज बडो है ॥


को दाता ? को रन चढो ? को जग पालनहार ?


कवि भूषन उत्तर दिखो, सिव नृप हरि अवतार ॥ " युवराजपण विसरून संभाजीराजे हात उठवून कवी भूषणच्या तेजासी, रोमांचक रचनेला दाद देऊ लागले. चौकात मागे पाण्याची कारंजी उसळत होती. पुढे शब्दांची कारंजी उराळू लागली - राजांचे यश वर्णन करताना बेमान भूषण स्वतःला विसरला.


'तेरे तेज है सरजा दिनकरसो-दिनकर है तेरो तेज के निकर सो।। तेरो जस है सरजा हिमकर सो-हिमकर है तेरो जस के अकर सो ॥ कुंद कहीं, पयवृंद कहाँ, अरू चंद कहाँ- सरजा जस आगे ?


बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ तेरो साहस के आगे ?"

"व्वा ऽ!" भले." संभाजीराजांच्यातील कविमन दाद देऊन गेले. भूषण थांबला. घामाघूम झालेल्या भूषणसमोर सरपोसाने झाकलेले मोहरांचे तबक आले. राजे सिंहासनावरून उठले. संभाजीराजे सोनपायरीवर खडे झाले. सोयराबाईंनी राणीवसा सोडला. राजमंडळ गडदेव जगदीश्वराच्या दर्शनासाठी निघाले. " श्रीमान् छत्रपति शिवाजीमहाराज की "ऽऽ


" जय ऽ जय जय !" जयकारांनी भोवतीचे झिरझिरे पडदे सळसळून उठले. राजमंडाळाच्या कदमा-कदमाबरोबर दुहातीची शेकडो इमानी मस्तके झुकू लागली. महामुजरे झडू लागले.


नगारखान्यासमोर राजयात्रेचा सरंजाम सिद्ध झाला होता. गळ्यात सोनेरी घाट किणकिणवीत, कानांच्या झापा फडफडविणारा, सोंड, गंडनाळ यावर रंगी नक्षी फिरलेला, उजव्या पायात चांदीचा तोडा भरलेला, पाठीवरच्या भरजरी झुलीवर देखणी, किरणांत झळझळती सोनअंबारी घेतलेला 'त्रिशूल' हत्ती 'राजऐरावत' म्हणून अलमस्तपणाने झुलत होता. त्याच्यासमोर पांढराशुभ्र, जातवान घोडा, आयाळीवर पिसांचा मोर्चेल मिरवीत, अंगी तलम झूल घेऊन, गळ्यात सोनकोयऱ्याची माळ आणि उजव्या पायात सोनतोडा मिरवीत लाभाचा 'राजअश्व' म्हणून उभा होता. नंग्या तलवारी हाती पेलून निवडीच्या पेहरावातील दरबारी मानकऱ्यांनी दुहाती शिस्त धरली होती. अब्दागिरे, निशाणबार्दार, चवरीवाले, गुर्झबे यांनी ऐरावताला कडे टाकले होते. माहुताने इशारा देत राजऐरावत बसता केला. त्याला शिडी लावण्यात आली. उजव्या हाती सुवर्णी अंकुश घेऊन फीलवान म्हणून सरलष्कर हंबीरराव प्रथम राजऐरावतावर आरूढ झाले. पाठोपाठ राजे व बाकीचे राजमंडळ ऐरावतावरील सोनअंबारीत स्थानापन्न झाले. सोनमोर्चेल घेऊन चढलेले मोरोपंत त्यांच्या पाठोशी वीरबैठकीत बसले.


हंबीररावांनी ऐरावताला अंकुशमार देऊन खडे केले. सुवर्णी फुले, गुलाल, पुष्पे ऐरावतावर उधळली जाऊ लागली. राजयात्रा निघाली. कुबेरी थाटात. लेझमाचे तांडे खेळीला पडले. रणहलग्या, ताशे तडतडू लागले. तोड्यांच्या बंदुका आणि जडशीळ उखळ्या दणाणू लागल्या. दांडपट्टे, फरीगदगा, बोथाट्या यांचे खेळगडी अंबारीतल्या राजमंडळाला आपले कसब दावण्यासाठी समोरच्या खेळगड्यावर इरेसरीने घालून घेऊ लागले. गुर्झबदार राजअल्काब देऊ लागले-


"राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित... " दाटल्या कंगणी पगड्यांचा ... लालदर्या सरकू लागला. त्या सरकत्या दर्यावर अंबारीच्या रूपाने वर आलेला, मावळी अभिमानाचा सूर्य बघून उगवतीला कासराभर वर चढलेला आभाळीचा सूर्यही क्षणभर श्वरथरला! लपकन कमरेत झुकला!! 'शिव' आणि 'शंभो शंकराच्या दर्शनाला निघाले. राजयात्रा जगदीश्वराच्या मंदिरासमोर आली.


एका बाजूला महाराणी सोयराबाई, दुसऱ्या बाजूला युवराज संभाजीराजे घेऊन महाराज जगदीश्वराच्या चौकआवारात आले.

देवदर्शन करून राजयात्रा बालेकिल्ल्याकडे परतली. राजमंडळ जिजाऊंच्या खासेमहालाकडे निघाले. राजमातेच्या दर्शनासाठी.


"छत्रपती महाराज येताहेत.” वर्दी ऐकताना जिजाऊंचे सुरकुतलेले अंग रोमांचून थरले. त्यांच्या बैठकीच्या भवत्याने पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई उभ्या होत्या.


जिजाऊंच्या पायांवर डोके ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजीमहाराजांनी गुडघे टेकले.. त्यांच्या बगलेने संभाजीराजांनी गुडघे टेकले. रायगडाएवढ्या उंच थोरल्या मायेसमोर त्यांनी मस्तक झुकविली. जिजाऊंच्या मिटल्या डोळ्यांतून सुटेलेले थेंब सुरकुत्यांना न जुमानता घरंगळले. महाराजांच्या राजटोपावर उतरले. झालेला अभिषेक पावन झाला !


जिजाऊ आशीर्वादासाठी बोलू बघत होत्या. शब्द फुटेना. उभे अंग थरथरू लागले. आठवणींच्या हजारो सुरकुत्या त्यांच्या मनी उलगडल्या होत्या. मन असंख्य विचारांच्या कल्लोळात होलपटू बघत होते. त्यांच्या पायांवर डोके ठेवून महाराज तसेच काही क्षण थांबले. कसल्यातरी निर्धारी विचाराने महाराजांनी मान वर घेतली. भरल्या डोळ्यांमुळे त्यांना जिजाऊ दिसतच नव्हत्या. महाराजांच्या दोन्ही हातांचे झोले मस्तकीच्या राजटोपाला भिडले. कुणाला कल्पना नसताना त्यांनी तो कीर्तिधवल राजटोप उतरून • सरळ जिजाऊंच्या पायांवर ठेवला! आणि तो ठेवताना त्यांचे उभे अंग गद्गद् लागले.


"शिवबा ऽ! " डोळे पदराने निपटून टाकीत जिजाऊसाहेबांनी लगबगीने तो टोप उचलला. महाराजांच्या मस्तकी पुन्हा चढवून त्यांना उठवून मिठीत घेताना कसल्याही आशीर्वादाऐवजी पुन्हा त्या एवढंच म्हणू शकल्या, "शिवऽ बा!"


जिजाऊंचा थरथरता हात महाराजांच्या पाठीवरच्या जरीकोयरीवर, उपरण्यावर फिरत राहिला. बाहेरून अत्यंत मूक वाटणारी पण आतून पार गलबलून आलेली ती राजमातेची आणि श्रीमंत योग्याची मिठी दोघांनाच नीटपणे कळू शकत होती. महाराजांनी खांद्याला लावलेल्या समर्थांच्या बैरागी कोदंडाला आणि आणि महाराज - जिजाऊंनी अंगाखांद्यावर खेळवून ऐन भरीत आणलेल्या संभाजीराजांना !!


राज्याभिषेकाचे उत्तरविधी आटोपले. आचार्य गागाभट्टांना सव्वालक्ष होनांची दक्षणा देऊन, पहायासाठी हत्यारबंद शिबंदी त्यांच्या दिमतीला जोडून महाराजांनी त्यांची गौरवी बोळवण केली.


राजमाता जिजाऊसाहेबांच्या महालीचा राबता वाढला. जेधे, बांदल, कंक, सिलिंबकर यांच्या जमेतीतील पगडीधारी मस्तके जिजाऊंच्या पायांना भिडू लागली. 'आऊसाहेब, येताव. तब्येतीला धरा. लई तापदरा करू नगासा आता. पाऊस धराय लागलाय. आमास्नी जाय पायजे. शेतीवाडी हाय. निगताव. गारठ्याला दम्याचं दुखणं दुनावतया. हतं न्हावू नगासा. खालतं पाचाडात जावा कसं." नितळ, भाबड्या, मावळी प्रेमभावनांच्या अभिषेकानं चिंब होऊन लोकमाता जिजाऊ निथळू लागल्या.

जमले मावळमाणूस चौवाटा पांगले. गड उलगला. मृगाची काळी छपरी आभाळाला घरून आली. पावसाळी चावरा वारा रायगडावर सूंकारत पिसाट घोंघावू लागला. झाडांचे डेरे पलट्या खाऊ लागले. बांधल्या झड्या उधळल्या. निकराने बसून असलेल्या जिजाऊंनी बिछायतीवर अंग टाकले. दम्याच्या धुसकान्यात त्यांच्या घशातील 'जगदंब " घुसमटू लागला. कांबळ्याच्या दोन दोन घड्या टाकल्या तरी अंगभर काटा उठू लागला. त्यांना गडावरून पाचाडात हलविणे भाग होते.


पडवेबंद मेणे जोडण्यात आले. हातजोड देत, शाल पांघरलेल्या जिजाऊंना महाराज आणि संभाजीराजे यांनी खासेमहालाबाहेर घेतले. पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई, सोयराबाई, रामराजे सारा गोतावळा त्यांच्या भवती दाटला होता. - 'राजे. आम्हास जरा दरवारीचौकात नेता ?” जिजाऊंच्या तोंडून शब्द आले.


'जी.” महाराज व युवराज यांचा दुहाती आधार घेत जिजाऊ चालू लागल्या.


जागजागी अगिषेकाच्या खुणा मिरविणारा, सजला दरबारी महाल आला. पूर्वाभिमुख, सुवर्णमंडित, रत्नजडावाच्या बत्तीसमणी सिंहासनासमोर उभ्या राहिलेल्या जिजाऊंचे उभे अंग थरथरले. डोळे भरून आले. म्हाताऱ्या उरात भावनांचा कल्लोळ दाटला. सिंहासनावरच्या मोतीलगाच्या छत्राकडे बघत जिजाऊ घोगरट आवाजात म्हणाल्या, " चला. राजे, तुमच्यावर छत्र आलं .... "


बालेकिल्ल्याच्या पालखीदरवाज्याने जिजाऊंचा मेणा मनोऱ्याबाहेर पडला. त्याच्या दोन्ही तर्कांना महाराज आणि संभाजीराजे पायी चालू लागले. पाठीमागून जनान्याचे सात-आठ मेणे चालले. ... जिजाऊ रायगड सोडून निघाल्या. मेण्याची काठाळी धरून चालताना संभाजीराजांच्या मनी विचार उठू लागले. "ही गडउताराची वाट कधीच सरू नये! पलीकडे महाराज, अलीकडे आम्ही. मेण्यात मासाहेब. ही चालणी अशीच राहावी! भोवी थकले तर त्यांच्या हातीचे थोपे आम्ही घेऊ, महाराज घेतील. मासाहेबांना धक्के बसणार नाहीत अशी तोलती चाल धरू !


* कधीतरी महाराज मासाहेबांना म्हणाले होते 'आम्ही आपला मान काय करावा? तो आमचा वकूब नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी चढविल्या तरी ते थिटेच आहे.' मासाहेब खोकू लागल्या की आमचाच जीव घोटाळणीला पडतो. खंत वाटते. त्यांचा दमा आम्हास घेता येत नाही.


'आता अभिषेक संपला. हा पावसाळा आम्ही पाचाडातच राहू मासाहेबांच्या पायांजवळ. आम्ही रचलेली काव्ये त्यांना ऐकवू. त्यांच्या धरल्या सांध्यांना मालिश देऊ. दम्याची उबळ तुटताच त्यांच्यासमोर तस्त धरू. धाप लागलेली असली तरीही त्या हसतच म्हणतील, 'हं. ऐकवा तुमची गीतं. आमच्या शिवबानं कधी गीतं रचली नाहीत. तेवढी वाण शंभूराजे तुम्ही भरून काढलीत.' मग आम्ही त्यांच्यावरच रचलेले गीत सर्वांत शेवटी वाचू. ते ऐकताना डोळे मिटते घेत पुटपुटतील, 'जगदंब, जगदंब!' बिछायतीवर हात थोपटीत आम्हास बोलावून जवळ बसवून घेतील. तोंडाने त्या काहीच बोलणार नाहीत; पण आमच्या पाठीवरून फिरणारा त्यांचा हात उदंड बोलेल ! बोलतच राहील! "


पाचाडच्या दरुणीमहालातील समया मंद तेवत होत्या. शिसवी मंचकावर जिजाऊ पडून होत्या. खालती सहाणेवर औषधीमात्रा उगाळणाऱ्या धाराऊच्या हातांतील किणकिणणाऱ्या काकणाबरोबर जिजाऊच्या मनाने विचित्र सूर धरला होता.


"आमच्या थोरल्या सूनबाईंच्या सेवेत अशाच औषधीमात्रा झिजल्या! मात्रा घेऊन घेऊन त्या कंटाळत. तेव्हा आम्ही त्यांना मायेच्या रागाची जरब देऊन त्या घ्यायला लावीत होतो. तेव्हा जाणवलं नाही की शेवटी शेवटी मात्राही नकोशा होतात. आज ही सारीजणं आमचं ऐकत नाहीत. आम्हास त्या घ्यायला लावतात.' " या." दरुणीमहालाचा उंबरठा ओलांडणान्या सोयराबाईंना बघून जिजाऊ क्षीण बोलल्या. त्यांनीच वर्दी पाठवून सोयराबाईंना बोलावून घेतले होते. बाहेर सदरी जोत्यावर महाराज आणि युवराज महाडहून आलेल्या वैद्यांचा सल्ला ऐकताना चिंतातुर बसले होते. त्यांच्या ओढल्या चेहऱ्याकडे बघत तुळईची घाट निश्चल टांगती होती. मध्येच वाऱ्याचा झपकारा येत होता. त्याने घाटेतील टोल थरारत होता. तिकडे कुणाचेच ध्यान नव्हते. सोयराबाईंनी मंचकावर झुकून पदर तळहाती घेत तीन वेळा जिजाऊंना नमस्कार केला. त्यामुळे उठलेल्या त्यांच्या सुवर्णी कंकणांच्या किणकिणाटाचा माग घेत काही क्षण शांततेत तसेच गेले.


" सूनबाई, काही एक मनचं तुमच्या कानी घालावं म्हणून आम्ही तुम्हाला याद केलंय." जिजाऊंना धाप लागल्यागत वाटले. त्यानी नजर वरच्या तख्तपोशीत जोडली होती. हात छातीवर होते. सोयराबाईंच्या कपाळीचे कुंकूपट्टे आक्रसले. जीव कानांत गोळा झाला. नाकाची नथ काच देतेय असे त्यांना वाटले. " सूनबाई, आता अधिकाचं सांगायला आम्ही राहू याचा भरवसा नाही! ते ऐकताना सहाणेवर फिरणारे धाराऊचे हात कलम झाल्यासारखे गपकन थांबले. " जे सांगतो आहोत ते शेवटचं. ते तुमच्या कानी घातल्याखेरीज आम्ही मरणास मोकळ्या नाही! सूनबाई, आता तुम्हास एक नाही तीन फर्जद आहेत हे नीट ध्यानी घ्या ! राजे, शंभूराजे आणि रामराजे ! दमा जिजाऊंशी भांडू लागला. त्या त्याला खानदानी अरब देत जागी बसवू लागल्या. धाराऊचे हात थाबले. कान टवकार झाले.


" बाई, भोसल्यांचे पुरुष हाती लागणं मुश्किल. तुमच्या हातांत तीन आहेत! त्यांना सांभाळून घ्या. हा वाढला पसारा, याहून अधिक वाढवा. शंभूराजांना तर सर्वाहून अधिक जपा. त्याच्या आऊ गेल्या नि आम्हीच त्यांच्या आऊ झाला. आता आम्हा दोघींचा भार तुमच्यावर आहे. धाराऊ कोरड पडल्याने जिजाऊनी धाराऊला हाक दिली. त्यांना काय पाहिजे हे ओळखून धाराऊ पाण्याचा गडवा, वाटी घेत चटक्याने पुढे झाली. पाणी घशाखाली जाताच जिजाऊंना कितीतरी हपार वाटले. "तुम्ही महाराणी झालात. आम्ही भरून पावला. आता महामाता व्हा. त्यासाठी येईल ते आपलं घेण्यासाठी पदर मोठा करा. आईला मानअपमान मानून नाही चालत. ते बळ येण्यासाठी जगदंबेची आण भाका. आमची याद ठेवा न ठेवा, पण जगदंबेला कधी विसरू नका. आम्हास भरोसा आहे पडल्या न पडल्याला ती तुम्हास मार्ग दाखवील. हे एवढंच सांगणं. या तुम्ही.” जिजाऊंनी डोळे मिटते घेतले. सोयराबाईंची नथ ओळांबलो. सुवर्णी कंकणे किणकिणली. नमस्कार करून त्या महालाबाहेर पडू लागल्या.


" हां. घेवा मासाहेब.” धाराऊने उगाळली मात्रा बोटाने राजमाता जिजाऊंना चाटवली. महालाबाहेर पडणाऱ्या राणीसाहेबांच्या शालूवरचे झळझळणारे जरीबुट्टे जिजाऊंना दिसत होते. मंचकाच्या उशाकडे जिजाऊंना दिसणार नाही अशी उभी राहिलेली धाराऊ न राहवून हणाली, "मासाब, तुमी बऱ्या व्हनार. मग असं कशापायी बोलता ते! आम्ही हाव की सायांस्नो!" आणि घशातून फुटणारा हुंदका जिजाऊंनी ऐकू नये म्हणून तिने आपल्या पदराचा बोळा तोंडात कोंबून घेतला.


मृगाची पाणझडप पाचाडावर पडली. सावित्री, काळ, गांधारी नद्या लाल पाण्याने भरून आल्या. टपटपती थेंबावळ झाडांच्या पानापानांवरून उतरू लागली. जिजाऊंचे पाय चेपीत बसलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यांवरची झापड केव्हा हटतेय याची टक लावून वाट बघत होत्या.


'येसू." मासाहेबांच्या हलक्या सादेने त्यांची तंद्री मोडली. " जी." म्हणत येसूबाई उठल्या. चौरंगीवरचे पंचपात्र उचलून जिजाऊंच्या जवळ गेल्या. " तीर्थ घ्या मासाहेब आईचं.” येसूबाईंनी पळी जिजाऊंच्या ओठांशी नेली. जिजाऊंनी तीर्थ घेतले. “येसू, इथल्या सदरीजोत्यावर आम्ही उभ्या राहिलो की गडाच्या मावळमाचीवर तुम्हीही असाल काय असा विचार मनी यायचा !"


"हां मासाहेब, स्वारी मनोऱ्याच्या पाचव्या मजल्यावर आहेसं बघून आम्ही एकदा मावळमाचीवर आपल्या दर्शनास येण्याचं धाडस केलं होतं. आबासाहेब गडावर नव्हते. '


येसूबाईंचे उत्तर ऐकून जिजाऊ क्षीण हसल्या. “तुम्ही तसं घेतलेलं ते पहिलं नि शेवटचं दर्शन आहे आमचं!" असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्या बोलण्याने येसूबाईंचा चेहरा किती दुखरा होईल याची कल्पना असल्याने त्या म्हणाल्या, " नातसूनबाई, तुम्हाला काही सांगणं कधी साधलंच नाही. आमच्या स्वारीनं खूप सालांपूर्वी एक तुला केली होती. नांगरगावी. इंद्रायणी आणि भीमेच्या संगमावर. हत्तीचा बच्चा नावेत चढवून." उबळ आल्याने जिजाऊ आपोआप थांबल्या..


येसूबाई पदर सावरीत मंचकावरून उठल्या. कारण त्यांच्या स्वारीसह महाराज महालात आले. त्यांच्या पाठीशी राजवैद्य नि मोरोपंत होते. जिजाऊंना येसूबाईंना सांगायची होती ती हत्तीच्या तुलेची कथा त्यामुळे त्यांच्या ओठांत तशीच राहिली!

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १०२

 शांतिहोमांच्या पवित्र मंत्रघोषांनी बालेकिल्ल्याची तटबंदी चौथडी भरून वाहू लागली. विनायक, नक्षत्र, इंद्र, ग्रह पुरंधर या होमांचे यज्ञकुंड धडधडले. हवनासाठी जाळून घेणाऱ्या दूध, तुपाच्या पौष्टिक वासाने महावेदी दाटून गेली. महावेदीच्या मध्यभागी थोराड, रुपेरी पारड्यांची पुष्पमालांनी सजलेली तुला एका भक्कम खांबाला उभी करण्यात आली होती. तिचे पूजन झाले.


राजांच्या तुलादानविधीला प्रारंभ झाला. उजव्या बाजूच्या पारड्यात उजवा पाय प्रथम ठेवून राजांनी वीरबैठक घेतली. गागाभट्ट, बाळभट्ट, अनंतभट्ट ऑजळी-ऑजळींनी तबकातील झळझळीत सोनमोहरा तुलेच्या डाव्या पारड्यात सोडू लागले. भोसलाई सोनसूर्य वर घेण्यासाठी सोने झटू लागले.


रोखल्या नजरेने संभाजीराजे पारड्याकडे बघत होते. " या उभ्या रायगडाला सोनरूप देऊन तो डाव्या पारड्यात उचलून ठेवला तरी आबासाहेबांचं पारडं फरसबंदी नये!" असे त्यांना वाटत होते.


राजांनी वीरासनी बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडून उचलले गेले. राजांची सुवर्णतुला झाली. मंत्रांचा घोषच घोष उठला. सतरा हजार तोलल्या मोहरा तबकात उतरून त्यावर गागाभट्टांनी मंत्रित फुले ठेवली.


चांदी, तांबे, कापूर, शिसे, फळे, मध, मसाले, साखर अशा राजांच्या आणखी पंधरा तुला राजबैठकीत जोखण्यात आल्या.


" युवराज, आइए. पुष्प चढाइए तुलादेवतापर." गागांनी संभाजीराजांच्या हाती फुलांची ओंजळ ठेवली. उजवा पाय फुले वाहून संभाजीराजांनी तुलेवर हळदीकुंकू सोडून तिला वंदन करीत उजव्या पारड्यात ठेवून वीरबैठक घेतली. मंत्रांचे घोष उठू लागले.


गागाभट्ट, बाळंभट्ट, प्रभाकरभट्ट सोनमोहरांच्या ऑजळी डाव्या पारड्यात सोडू लागले. त्यातून खणखणत पारड्यात उतरणाऱ्या मोहरा बघताना विचाराची एक ओंजळ कुठूनतरी संभाजीराजांच्या मनाच्या पारड्यात सोडली गेली-


'आमच्या मासाहेब इथं येतील आणि 'शंभूबाळ' म्हणत शिवलिंगाला नेहमी वाहतात त्यांतील एकच विल्वपान त्या पारड्यात सोडून आमच्याकडं बघतील तर आमचं पारडं हां हां म्हणता आभाळाला जाऊन थडकेल !!' " संभाजीराजांनी वीरबैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडू लागले. पीतवर्णी वत्र अंगभर लपेटून शेजारी उभ्या असलेल्या राजांना ते बघताना वाटले- "मोहरांच्या पारड्यातील मोहर नू मोहर रंग पालटते आहे. पिवळ्याधमक मोहरा सावळ्यासावळ्या होताहेत !! ' मंत्रोच्चाराचा उद्घोष करणाऱ्या गागाभट्टांना, सावळ्या मोहरा बघणाऱ्या राजांना, बिल्वपानाच्या विचारात गेलेल्या संभाजीराजांना कुणालाच कल्पना नव्हती की पारड्यात बसलेल्या, टोप नसलेल्या सोनेरी कमळाला एक स्त्रीमन आपल्या डोळ्यांच्या तराजूत तोलून धरू बघत होते ! सोनेरी बुट्ट्यांचा शालू नेसलेल्या, कपाळी कुंकूपट्टे असलेल्या, नाकात नथ ल्यालेल्या येसूबाईंचे! आपल्या अंगावरचे सगळे सुवर्णालंकार त्यांनी आपल्याच डाव्या डोळ्याच्या पारड्यात टाकून बघितले! मनाचे सोनकमळ त्यावर टाकून बघितले. उजव्या डोळ्यात बैठक घेतलेला हटवादी, बेडर, बांडा, केशरी टोप काही रेसभर हलायला तयार नव्हता!

कावऱ्या वाक्या येसूबाईनी आपल्यावर कुणाचे ध्यान तरी नाही ना म्हणून डावे, उजवे बावरून बघितले. त्यांच्या शेजारी उभी असलेली धाराऊ हसत त्यांना म्हणाली, " नथंची सवं न्हाई तुमास्नी सूनबाई, म्हून ती काच देतीया!" ते ऐकताना येसूबाईंच्या गाली पळसच पळस फुलारले. संभाजीराजे पारड्यातून खाली आले. 'महाराज्ञि, आइए." आचार्यांनी सोयराबाईंच्या हाती फुले दिली.

तुलेची पूजा करून पारड्यात उजवे पाऊल ठेवताना सोयराबाईंना आचार्य गागाभट्टांना म्हणावेसे वाटले, “करताच आहात आमची तुला तर आमच्या रामराजांना संगती घेऊ द्या! त्यांच्याखेरीज आमची एकलीची तुला कसली करताहात ? " पण हस्तिमृत्तिका रामराजांच्या हाती देताना जाणवेल असे घोटाळलेले आचार्य आठवून मग काही न बोलताच त्यांनी एकट्यांनीच पारड्यात बैठक घेतली.


ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट किरणांच्या मोहरा वेचीत फुटू घातली. रात्र तीन घटका उरली होती. शतकांची झोप झाडून एक सोनस्वप्न उराशी घेऊन किल्ले रायगड जागा होत होता. पन्नास हजारांवर माणसांनी गडावर दाटवा केला होता. दुडदुडणाऱ्या नौबतीने रायगडावर डंक्याचे छत्र धरले होते.


पहाटस्नान घेऊन शूचिर्भूत झालेले राजे आणि संभाजीराजे जोडीने लोकमाता जिजाऊंच्या पायांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खासेमहालात आले. त्यांना आशीर्वाद देऊन जवळ घेताना जिजाऊंच्या थकल्या मनी विचारांचे काहूर कल्लोळले-


"केवढं मागं पडलं! काय घडलं आणि काय नाही? आईच्या कृपेनंच सान्या वाक्यातून निभावलं. तिच्यामुळेच आजचा दिवस उजाडला. हे बघायला आज आमची स्वारी पाहिजे होती. राजांचे दादामहाराज पाहिजे होते. आमच्या थोरल्या सूनबाई पाहिजे होत्या. ' दमा दाटलेल्या जिजाऊंच्या छातीत शहाजीराजे आणि सूनबाई यांच्या आठवणीने कळ दाटली.

उबळ, उबळ उसळू लागली. निर्धारी स्वभावाच्या जिजाऊ, राजे-संभाजीराजे जवळ असल्याने ती निकराने रोधू बघत होत्या. त्यांचा श्वास कोंडणीला पडला. घशात खवखव उठली. आजवर दम धरणं' त्यांनी साधले होते. पण पण आता दमा रोखणे त्यांना साधेना. उभ्या जिजाऊ खोकू लागल्या. त्यांच्या दोन्ही बगलांना हात देऊन राजे-संभाजीराजे शब्दांनी त्यांचा दमा रोधू वधू लागले.


'मासाहेब.

'आऊसाहेब." ते दोघेही पितापुत्र आपला राज्याभिषेकही क्षणभर विसरले! धाराऊ, पुतळाबाई जिजाऊंच्या पाठीशी झाल्या. साऱ्यांनी सावरून त्यांना मंचकावर बसते केले. साऱ्यांचा जीव कळवळला. आचार्यांची वर्दी घेऊन बाळंभट्ट महालात आले. त्यांना बघताच जिजाऊ म्हणाल्या, "राजे युवराज, या तुम्ही. आचार्यांची सांगी आली. आता तुम्ही आमचे नाही! सिंहासनाचे! पंडित खोळंबलेत. संभाजीराजांनी पुतळाबाई, धाराऊ यांची पायधूळ घेतली. दोघेही महावेदीकडे जायला निघाले. • मुजरा देत मागच्या कदमांनी मागे हटून वळण्यापूर्वी संभाजीराजांना मान वर करताच पदराने डोळ्यांच्या कडा टिपणाऱ्या जिजाऊ दिसल्या. त्यांचे पाय फरबंदीला जखडल्यागत झाले.

चला " राजांचा घोगरा साद त्यांच्या कानी आला. ते वळते झाले. चालू लागले..

जगदीश्वर आणि भवानीपूजनासाठी. धाप लागल्यानं पाणी दाटतंय. पाठीशी गप्प गप्प उभ्या असलेल्या धाराऊला जिजाऊ म्हणाल्या. तसे म्हणताना जिजाऊंना कळलेच नाही की धाराऊच्या डोळ्यांतही पाणी दाटलेच होते! कसलीही घाप नसताना !


महावेदीचा उभा मंडप ब्रह्मवेत्ते, पंडित, शास्त्री यांनी दाटून गेला होता. मंडपाच्या मध्यभागी, अष्टदिशांना आम्रपत्रे आणि श्रीफले मस्तकी घेतलेले सुवर्णाचे, रुप्याचे, तांब्याचे, मृत्तिकेचे कुंभ स्थापित केले होते. त्यांत दूध, दही, तूप, मध आदी पंचामृत आणि पाणी मंत्रित करून भरले होते. त्या सर्व कुंभांच्या कंठांना फेर टाकून कुंकूहळदीत न्हालेल्या शुभ्र धाग्यांनी ते अष्टकुंभ एकजीव करून एक नेटका अभिषेकचौक सिद्ध केला होता. चौकाच्या दक्षिण दिशेला औदुंबराची प्रशस्त आसंदी उभी केली होती. राजे, युवराज, सोयराबाई यांनी अभिषेकासाठी स्थानापन्न होण्याची ती बैठक होती. औदुंबराच्या पवित्र समिधांची.


तिच्यासमोर कढीव तुपाने शीग भरलेली काशाची मोठी परात रांगोळी फिरलेल्या चंदनी चौरंगावर मांडली होती. तिच्या उजव्या तर्फेने तूप भरलेला सुवर्णकलश, दूध भरलेला रौप्यकलश, दही भरलेला ताम्रकलश, मध भरलेला मृत्तिकाकलश, मोतीलगाचे नकसदार छत्र, मयूरपिसांचा अब्दागिरी पंखा, भगवे वाद लोंबणारा सोनेरी मोर्चेल असा अभिषेकी सरंजाम हारीने लावून ठेवला होता. राजमंडळाच्या समंत्रक स्नानासाठी चौकाच्या मध्यभागी दोन स्नानचौक उभे केले


होते. एक खुला. राजे व संभाजीराजांसाठी. दुसरा आडपडदे टाकलेला. सोयराबाईच्यासाठी. स्नानांचे सांडीव पाणी अभिषेकचौकाबाहेर काढण्यासाठी विटांचे पाट त्यांच्या भवतीने फिरविले होते. मंडपांचे पूजन करून मंत्रघोषांच्या गजरात राजे-संभाजीराजे सोयराबाई हे राजमंडळ मंडपात आले.


गणेशपूजनाने अभिषेकाविधीला सुरुवात झाली. कुंकू-हळदीच्या चिमटी सोडून राजमंडळ दक्षिण पाऊल धाग्यापार ठेवीत अभिषेकचौकात आले. त्यांच्या पाठोपाठ गागाभट्ट, बाळंभट्ट आदी मंत्रवेत्ते आले. मोरोपंत, हंबीरराव, आण्णाजी, रामचंद्रपंत, त्र्यंबकपंत, दत्ताजी त्रिमल, निराजीपंत आणि रघुनाथपंडित हे मंत्रिगण आले.


समंत्रक स्नानानंतर राजे-

-युवराज यांचे मृत्तिका आणि पंचामृतस्नान झाले. मंत्रांचा घोष चढीला पडला. मंडपभर जागा मिळेल तिथे माणूस दाटले होते. मंत्रिगण पाठीशी घेत राजे आसंदीजवळ आले. आनंदीची सविध पूजा झाली. पायाचा स्पर्श होणार नाही अशी दक्षता घेत राजे आसंदी आरूढ झाले. पाठोपाठ सोयराबाई आणि संभाजीराजे चढले.


अभिषेकांच्या मांडल्या सरंजामातील छत्र आण्णाजींनी उचलले, अब्दागिरी मोरपंखा , त्र्यंबकपंतांनी घेतला, सुवर्णी मोर्चेल दत्ताजींनी हाती पेलला. तिघेही आसंदीच्या पाठीशी झाले. सुवर्णकुंभ घेतलेले मोरोपंत, रौप्यकुंभ उचललेले हंबीरराव, ताम्रकुंभ तोललेले रामचंद्रपंत, मृत्तिकाकुंभ सावरलेले रघुनाथपंडित आणि सुवर्णी हिरे-रत्नजडित राजदंड पेललेले न्यायाधीश निराजीपंत आसंदीच्या दुतर्फा झाले. भंडारा वाहिलेली सोन्याची ओंजळ पूर्वेच्या दिशेने उधळून आचार्य गागाभट्टांनी खड्या आवाजात अभिषेकाची रोमांचक, पावन नांदी दिली-


“ॐ गणपतये नमः ! कुलदेवताभ्यो नमः !


मोरोपंतांनी हातीचा तूपभरला सुवर्णकुंभ बाळंभट्टांच्या हाती दिला. राजे, संभाजीराजे, सोयराबाई यांच्या राजमस्तकांवर अभिषेक होऊ लागला. ते तिघेही निथळू लागले. तूप, दूध, दही, मध अशा सत्त्वरसांत गंगा, सिंधू, यमुना अशा लोकनद्यांच्या पावन जलात, पश्चिम, पूर्व आणि दक्षिणेस गर्जत, उसळणान्या मर्दान्या सागरांच्या अशरण जलात ते निथळू लागले आणि त्यांच्या बरोबरच जगदंबेचा थोर भुत्या रायगडही निथळू लागला, जमलेल्या पन्नास हजारांवर उराउरांतून ओसंडणाऱ्या स्वातंत्र्यलाटांत. नगारखान्यावरचा सोनकिनारी जरीपटका निथळू लागला, वरच्या आकाशातून पाझरणाऱ्या आजवर कामी आलेल्या हजारो मावळवीरांच्या आनंद आसवांत जिजाऊंचे म्हातारपण' निथळू लागले, कृतार्थतेच्या, जीव कोंडणाऱ्या दम्यात! जगदंबेचे आईपण' निथळू लागले भुत्यांच्या 'कवतुक महिम्यात'. झोपडीखोपटांत अंग- टाकणाऱ्या, शिंगांची तान कानी पडताच एका हाताने पाठीशी ढाल बांधून घेत दुसऱ्या हाताने आपल्या खोपटावर चिलमीवरचा निखारा तसाच उचलून ठेवून 'जय भवानी' गर्जत घोड्यावर मांड घेणाऱ्या हर मावळी धारकऱ्यांचे 'मर्दर्पण' निथळू लागले, आता मराठा गादी जाली!" या रांगड्या अभिमानात !


अभिषेकसंपन्न झालेल्या राजमंडळाने उंचो राजपेहराव परिधान केले. काशाच्या परातीतील कढीव तुपाच्या दर्पणात मुखदर्शन घेतले. शस्त्रपूजा करून राजे, युवराजांनी अंगी शस्त्रे धारण केली. समर्थांचा कोदंड खांद्यावर घेताना राजांच्या मनात त्यांनी दिलेला दोघ टंकारला " मराठा तितुका मेळवावा! महाराष्ट्रधर्म वाढवावा! देवद्रोही तितुके कुत्ते ! मारून घालावे परते! अवघा हलकल्लोळ करावा !"


युवराज संभाजीराजांना संगती घेऊन राजे गागाभट्टांमागून चालले दरबारीचौकाकडे. सिंहासनाच्या रोखाने. त्यांच्यामागून मंत्रिगण, शास्त्री, जमलेले बिन्नीचे सरदार चालले. दूरवर डोंगररांगांआड नवा उषःकाल भवितव्याची वाट चालला.


राजे, युवराज, सोयराबाई दरबारीचौकांत आले. मुंगी रिघायला वाव मिळणार नाही असे माणूस चौकात दाटले होते. छताला धरून चौबाजूंना ओळंबलेले झालदार पडदे झळकत होते ! पुष्पमालांनी सारा दरबार शिणगारला होता. साऱ्यांचे डोळे जखडले होते, राजमंडळावर टाचा उंचावून माणसे धडपडत होती. राजदर्शनासाठी. राजे, सोयराबाई, युवराज सिंहासनाच्या चौथऱ्यासमोर आले. प्रथम पायरीला लागूनच एका चौरंगावर चांदीचे पंगाळ होते. त्यात ताम्र मुहूर्तपात्र सोडले होते.. • आचार्यांनी दिलेले श्रीफळ चौथऱ्याच्या प्रथम पायरीजवळ वाढवून राजांनी भकले दुहाती फेकली. सिंहासनाची सविध पूजा बांधली. पोतराजाने समोर धरलेल्या परडीतील भंडाऱ्याची मूठ उघळली.


" जगदंब, जगदंब” कुणालाही ऐकू येणार नाही असे स्मरण करीत राजांनी सोनपत्र्याने मढविलेल्या चौथऱ्याच्या पायरीवर उजवा पाय ठेवला. राजे चौथरा चढू लागले. त्यांच्या पायमागाला धरून सोयराबाई, संभाजीराजे चौथरा चढले.


मोतीलगाच्या छत्राला धरून असलेल्या, व्याप्रदंडी हिरे-रत्नजडित, प्रशस्त, सुवर्णसिंहासनाला छातीशी हात भिडवीत राजांनी वंदन केले. पाय न लावता, उगवता पुढा धरून त्यांनी सिंहासनावर वीरबैठक घेतली.


सिंहासनासमोरच्या चरणासनाला लागून असलेल्या उजव्या सोनेरी पायरीवर संभाजीराजांनी बैठक घेतली. डाव्या तर्फेला असलेल्या पडदेबंद राणीवशात सोयराबाईनी - बैठक घेतली. अष्टप्रधान मानाप्रमाणे एक एक सुवर्णस्तंभ धरून खडे झाले. अब्दागिरे, गुर्झबदार, चवरीवाले, पंखावाले यांनी आपआपल्या जागा घेतल्या. आचार्य गागाभट्टांनी राजे युवराज यांच्या मस्तकीचे टोप उतरून मोकळ्या तबकात ठेवले. दुसऱ्या तबकात असलेला राजांचा अभिमंत्रित शुभ्रवर्णी टोप आचार्यांनी हाती घेतला. मंत्रसाद उठू लागले. मुहूर्तपात्र पंगाळात डुबताना आचार्यांनी राजटोप राजांच्या मस्तकी स्वापित केला. दुसरा केशरी टोप संभाजीराजांच्या मस्तकी चढविला. रायगडाचा बुलंद तोफखाना दणाणू लागला. उखळी, बंदुकांच्या फेरी झडू लागल्या. चौघडे, नगारे, शाजणे यांचा राजडंका घुमू लागला.


गुर्झबदारने हातचा गुर्झब उचलून धरीत ठणठणीत अल्काब दिला-


राजशिवाविराजित सकळगुणमंडित, त्रिकुल्यवतंस, सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदुपदपातशहा ऽ श्रीमन् महाराज छत्रपति शिवाजीमहाराज की ...!"


"जय ! जय जय ऽ!" उभ्या दरबाराने तो अल्काब वरच्यावर तोलून धरला. त्या कल्लोळाने चौथऱ्यावरची सुवर्णी न्यायतुलाही थरथरली. आपल्या दोन्ही पारड्यांत नाचण्याएवढीही तफावत नाही ना याची खातरजमा करून घेत स्थिर झाली !


कानी पडलेला जयकार संभाजीराजांच्या अंगी टपटपून उठला. त्यांना वाटले उठावे आणि घाटी फुलवीत आपणही त्याला दाद द्यावी!


• उगवतीवर आलेल्या सूर्याची किरणे थेट चौथऱ्याला मुजरा द्यायला रुजू झाली ! सुवर्णी सिंहासन झळाळून उठले. नेहमीच्या सरावाने संभाजीराजे बसल्या बैठकीवरूनच दूरवर दिसणाऱ्या सूर्याचे दर्शन घेण्यात दंगले.


त्यांचे ते सूर्यदर्शन भंगले, कारण त्यांच्या अवती-भोवती रोमांचक खणखणाट करीत सोनमोहरा कोसळत होत्या! सिंहासनमंडित राजांना प्रधानमंत्री मोरोपंत ओंजळींनी 'सुवर्णस्नान घालीत होते. राजांच्या मस्तकावरून उड्या घेत उतरलेल्या मोहरांचा, पायगतीला बसलेल्या संभाजीराजांच्या भोवती सडाच सडा पडू लागला.


एकलगीने भरजरी नजराण्यांची शेकडो तबके सिंहासनासमोर पेश येऊ लागली. दरबारी गर्दीतून वाट काढीत टोपीकरांचा गोरा साहेब हेन्री ऑक्झेंडन सिंहासनासमोर आला.


डोकीवरची साहेबी टोपी उतरून राजे युवराजांना कमरेत झुकून अदव देताना तो टोपीकर बोलीत पुटपुटला- - 'युवर एक्सलन्सी राजा सेवानी में पॉवर हिज मर्सी टू अॅक्सेप्ट पि गिफ्टस ऑफ कंपनी!"


त्याच्या तबकधान्यांनी आणलेल्या नजराण्यात राजांच्यासाठी एक हिरेजडित शिरपेच, दोन किमती मोती आणि दोन हिरेजडित सलकड्या होत्या. संभाजीराजांच्यासाठी दोन हिरेमंडित सलकड्या आणि भरजरी हिऱ्यांची एक कंठी होती.


नजराण्याचा विधी आटोपला. महादानी देकार सुरू झाला. जमल्या ब्राह्मणांना, गोसावी, उत्पात, वासुदेव, भुत्ये, पोतराज, बैतेदार, फकीर, बैराग्यांना राजे युवराज दान करू लागले, दान पेणारे भरल्या तोंडाने दुवा आशीर्वाद देऊ लागले. तथास्तु. भोलानाथ सुखी ठेवील. खुदा सलामत रखे.

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १०१

 "बोला हर हर हर महादेव!" भोवतीच्या मावळ नरड्यांच्या घाटी फुटल्या. राजमंडळाने सिंहासनाला मानाचा हस्तस्पर्श दिला.


हंबीरराव, आनंदराव, मोरोपंत, आण्णाजी, रामचंद्रपंत, येसाजी सारे पुढे झाले. " जय भवानी" गर्जत त्यांनी शूचिर्भूत झालेले सुवर्णसिंहासन फुलांच्या माळांनी सजलेल्या रथासारख्या गाड्यावर चढविले. त्या गाड्याला सजलेले पाच पांढरेशुभ्र घोडे जोडण्यात आले होते. राजांनी झुकून गणेशाची सुवर्णमूर्ती उचलली आणि छातीजवळ कवड्यांच्या माळेवर धरली. संभाजीराजांनी कोदंड उचलला.


रणहलग्यांच्या रोमांचक काठ्या तडतडल्या. लेझीम तोड्यांनी लय पकडली छळळू खण खण छळळू.” उखळी, बंदुकांचे बार दणाणले. शिस्त धरलेल्या हुजराती फौजेच्या धारकऱ्यांच्या हातांतील पाती उन्हात झगमगू लागली. गुलालाच्या मुठी उधळल्या. फुलांच्या ओंजळी उसळल्या. शिंगे ललकारली.


चालले. मानाचे सिंहासन मराठ्यांच्या मसनदीकडे मरातबाने चालले. रत्नशाळेकडून दरबारीचौकाकडे चालले. जिजाऊंनी मनी जागविलेले तुळजाई स्वप्न जिवंत होऊन चालू लागले! जंगमैदानावर घाईगर्दी करून धारातीर्थी देह ठेवताना "राजास्नी आमचा जुहार दंडवत सांगा' म्हणणाऱ्या कैक आकाशवीरांचे सार्थक चालले! समर्थांचे आनंदवनभुवन चालले! असंख्य मायमाउलींचे कुंकूबळ चालले! हिंदूच्या शतकानुशतके गाडल्या गेलेल्या आशांचे ऐरावती बळ चालले! 'श्री' चे कल्याणकारी राज्य चालले!


सिंहासनाच्या गाड्याची पिछाडी धरून गणेशमूर्ती हाती घेतलेले राजे, पंचारती घेतलेल्या सोयराबाई, समर्थांचा कोदंड घेतलेले संभाजीराजे आणि त्यांचे बोट हातात धरलेले रामराजे असे सारे त्या सिंहासनाशी रक्ताने बांधील असलेले राजमंडळ चालले. वाजत-गाजत नगारखान्याच्या दरवाज्याने रथगाडा दरबारचौकात आला. सिंहासनाच्या चौथऱ्याची सारी मखरे सुवर्णात घडली होती. अष्टखांब, मेघडंबरी, मस्त्यमोर्चेल, न्यायतुला असा देखणा साज झळकत होता. त्या चौथऱ्याची मधली जागा या खाशा सिंहासनासाठी मोकळी राखण्यात आली होती. राजांनी गणेशमूर्ती संभाजीराजांच्या हाती दिली. • रथगाडा चौथऱ्याजवळ आला. गागाभट्ट राजमंडळासह चौथऱ्यावर चढले. हत्तीच्या


पायाखालच्या शुभ मृत्तिकेने भरलेले तबक घेऊन प्रभाकरभट्ट चौथरा चढले. सुवर्णी खिळा ठेवलेले तबक घेऊन रामजी दत्तो चौथरा चढले. चौथऱ्यावर शिडी चढविण्यात आली. रामजींच्या हातातील तबकातून गागाभट्टांनी सुवर्णी खिळा उचलला. मंत्रोच्चार करीत त्यांनी तो निरखला आणि राजांच्या हाती दिला.


राजे खिळा घेऊन शिडीजवळ आले. हंबीरराव, येसाजी, आनंदराव यांनी शिडी तोलून धरली. कोढता आणि खिळा घेतलेले राजे शिडीच्या पायऱ्या मागे टाकीत मेघडंबरीच्या थेट छताला भिडले. साऱ्या माना' वर उचलल्या गेल्या! 

हातीचा सुवर्णी खिळा राजांनी मेघडंबरीच्या छताला राखलेल्या छिद्रात ठोकला. 'सुवर्णमेख' बसली. राजे खाली आले. शिडी हटली. सिंहासनाखाली 'हस्तिमृत्तिका' प्रदान करण्याचा विधी सुरू झाला. मंत्राचा घोष उठू लागला. गागाभट्टांनी प्रभाकरभट्टांच्या हातातील हत्तीच्या पायाखालच्या मृत्तिकेने भरलेले तबक आपल्या हाती घेतले. मुठीने त्यातील माती राजांच्या ओंजळीत सोडली.


चौथऱ्यावर मोकळ्या राखलेल्या, सिंहासनाखाली येणाऱ्या चौकात ती शिवरून टाकण्याची इशारत केली. राजांनी मृत्तिकेची ओंजळ चौकात शिवरली. सोयराबाई पुढे झाल्या. त्यांच्या हाती गागाभट्टांनी हस्तिमृत्तिका दिली. त्यांनी आपली सवाष्ण ओंजळ चौकात सोडली. संभाजीराजांनी गणेशमूर्ती व कोदंड प्रभाकरभट्टांच्या हाती दिला. पुढे होत आचार्यांनी दिलेली मृत्तिका चौकात सोडून ते मागे झाले.


• गागाभट्ट तबक ठेवण्यासाठी म्हणून वळू लागले. एवढ्यात आपल्या शेजारी असलेल्या रामराजांची ओंजळ आपल्या हातांनी जोडून सोयराबाईंनी ती आचार्यांच्या समोर धरली ! आचार्य क्षणभर घोटाळले. मग त्यांनी मृत्तिका रामराजांच्या ओंजळीत ठेवली. त्यांचे हात तसेच चौकाकडे नेत सोयराबाई म्हणाल्या "हां. सोडा ओंजळ चौकात !” हत्तीच्या पायांखाली रगडलेली माती पडू लागली - सिंहासन चौथऱ्याच्या बैठक - चौकात !

अभिषेकपूर्व विधींना सुरुवात करण्यापूर्वी सोयराबाई आणि संभाजीराजांना घेऊन राजे जिजाऊंच्या महाली आले. फलाहार आणि दुग्धपान असे व्रत पाळल्यामुळे त्या तिघांच्याही डोळ्यांत तेज उतरले होते. आपल्या महाली मध्यभागी गिद्यलोडांची बैठक टाकून जिजाऊसाहेब बसल्या होत्या. गेले पंधरा दिवस त्या तकवा नव्हता तरी आल्या गेल्या माणसाची आस्थेनं विचारपूस करीत अशाच बसल्या होत्या. राजे-संभाजीराजांना बघून त्या बैठकीवरून उठण्याच्या खटपटीला पडल्या. ते बघून पुढे झेपावलेल्या संभाजीराजांनी त्यांना बळेच बसते केले.


राजे युवराज जोडीने त्यांना नमस्कार करण्यासाठी वाकले. बसल्या बैठकीवरून जिजाऊंनी त्या दोघांचे मुखडे छातीशी बिलगते घेतले. त्यांचे


शब्द थकले होते. सुरकुतले होते. म्हातारे झाले होते. ते घशातच अडकले. " हे बघायला आमची स्वारी आज असायला पाहिजे होती ! "


शहाजीराजांच्या नुसत्या आठवणीबरोबर जिजाऊंचे डोळे भरून आले. सुरकुत्यांच्या पाटांतून आत्म्याचे पाणी वाहू लागले. एवढे दृष्ट लागण्यासारखे विधी गडावर होताहेत पण पण त्यांतील एकही आम्हास बघता येत नाही. येणार नाही! कपाळ उजाडल्यामुळे ! पोटी तहानेचा जाळ असता समुद्रात पाण्याने वेढलेले असूनही - पिण्यासाठी एक थेंबही हाताशी येऊ नये तशीच ही गत आहे! आम्ही साऱ्यात आहोत आणि कशातही नाही! 'जगदंब, जगदंब!' आपल्या भरून येणाऱ्या मनावर जिजाऊंनी शीपत्र ठेवले. आणि म्हटले, "औक्षवंत व्हा !

जिजाऊंनी राजे-संभाजीराजांना शिगभरल्या जबाबीने आशीर्वाद दिला. " सौभाग्यवंत व्हा!” थरथरत्या हाताने सोयराबाईंना आशीर्वाद दिला. "मासाहेब, आता माणसांचा राबता तोडा. आराम घ्या." राजे काळीजपिळाने म्हणाले.


" राबता तुटणार कसा? आम्ही राजमाता होणार आहोत, आता तर राबता वाढीला पडेल. आम्हीहून लोकांचा राबता कधीच तोडणार नाही राजे!" निग्रही जिजाऊ आग्रहाने म्हणाल्या.


“येतो आम्ही.” संभाजीराजे आणि सोयराबाई यांच्यासह राजे त्या 'थोरल्या मायेच्या' महालाबाहेर पडले.


जगदीश्वरावर दुग्धाभिषेक करून ते तिघेही दरबारचौकातील प्रशस्त महावेदीवर आले. प्रमुख विधींना सुरुवात झाली. गागाभट्ट, बाळंभट्ट, अनंतभट्ट आणि तीर्थोतीर्थीचे विख्यात शास्त्रवेत्ते त्यांना विधिकर्मे सांगू लागले.


स्वस्तिवाचन, ऋत्विजपूजन, वसोद्धारपूजन, मातृकापूजन, दुर्गपूजन, नांदीश्राद्ध, नारायणपूजन, आज्यहोम एकेका विधीची तपशिलांनिशी सांगता होऊ लागली. -


राजे, युवराज आणि सोयराबाई यांच्या राजहस्तांनी निरनिराळ्या होमकुंडांत बेल, वट, औदुंबर, पिंपळ, आम्र यांच्या समिधा पडू लागल्या. दूध, तूप, दही, मध यांचे हवन होऊ लागले. या विर्धीतील सर्वांत मौजेचा विधी आला राजांच्या मौंजीबंधनाचा ! त्यासाठी राजे चंदनी पाटावर बैतेदार न्हाव्यासमोर बसले डुईवर संजाब कोरून घेण्यासाठी !


बलदंड राजे 'बटु' झाले. राणीवसा, कन्यावसा असताना, फर्जंद सूनबाई असताना राजांचे सविध मौजीबंधन झाले ! छातीवर यज्ञोपवीत चढले. अवघ्या मुलखाला नवा 'जन्म देणारे राजे 'द्विज' झाले !


मौंजीबंधनाने रद्दबातल झालेले राजांचे पूर्वोल विवाह शात्रसंमत करून घेण्यासाठी त्यांचे पुन्हा सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई आदो राण्यांशी समंत्रक विवाह झाले. राजांनी गागाभट्टांना मनची एक इच्छा बोलून दाखविली " आम्ही सूर्यवंशी करिता आम्हास सवितृ मंत्राचे! पुरश्चरण द्यावे.


गागाभट्टांना ती पटली. सवितृहोमासाठी यज्ञकुंड सज्ज करण्यात आला. हा होम स्त्रियांना लाभत नसल्याने या विधीतून सोयराबाईंना वगळण्यात आले.


उगवतीला पुढा करून राजे आणि संभाजीराजे यज्ञकुंडाजवळ बसले त्यांच्या भोसलाई हातांनी त्यांचे आदिदैवत सूर्यनारायणाच्या नावे कुंडात चंपक, चंदन, बिल्वकाष्ठांच्या समिधा पडू लागल्या. हवन उरकून ते दोघेही सूर्यवंशी पितापुत्र उभे ठाकले. गंगा, सिंधु, जमुना आदी सप्त नद्या जल त्यांच्या ओंजळीतून अर्घ्य म्हणून मावळी सूर्याला अर्पण होऊ लागले.

मिटल्या डोळ्यांनी सवितृ मंत्राचा उद्घोष ते गायत्री छंदात करू लागले - "ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ! ” 'भूलोकाला आणि स्वर्लोकाला उजळणारे ते सूर्यांचे दिव्य तेज आम्ही सदैव चिंतितो. ते दिव्य तेज आमची बुद्धी उजळून टाको.'

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १००

 गाळ काढल्याने नितळ दिसणाऱ्या बारा टाक्यांतील पाणी निरखत संभाजीराजे उभे होते. त्यांच्या मनी समर्थांची मूर्ती आणि त्यांचे श्लोक फिरत होते.


एकाएकी बगलेच्या घाणेरीच्या झुडपाजवळून वाळल्या पानांची सरसर उठली. ठिपक्याठिपक्यांचा एक चपळ भुजंग वळवळत बाणागत सुसाटत होता. मध्येच ते ठिपकेदार चैतन्य थांबले. हातभर वर उठलेल्या त्या जनावराने पंजासारखी झळझळीत ठिपकेदार फणा फुलविली. जिभेच्या पालव्या चटाचट आतबाहेर घोळवल्या. संभाजीराजांच्या पाठीशी असलेल्या रायाजीने हातचा भाला आडवा करून त्याच्यावर रोखला. तो झटकन कडेधारी हाताने खाली दबवून टाकीत अंतोजी म्हणाला, "शंबु म्हादेवाचा अलंकार हाथ त्यो. जाऊ देत आपल्या वाटेनं."


रायाजी आठ्या घालीत थांबला. जनावर पुन्हा वळवळत झाडोऱ्याआड झाले. संभाजीराजे रायाजीला काही म्हणणार होते तेवढ्यात कवी कुलेशांच्यासह आलेल्या महादेव यमाजींनी मुज़याबरोबर वर्दी दिली- “जगदीश्वराच्या मंदिरओवरीत उत्तरेकडचा कुणी कवी उतरला आहे. युवराजांनी त्याची भेटी पाडावी असा स्वामींचा सांगावा आहे.'


" जशी आज्ञा. चला." कवी कोण असावा असा स्वतःलाच प्रश्न करीत युवराजांनी बारा टाके सोडले. कुलेश आणि महादेव यमाजी यांच्यासह ते जगदीश्वराच्या चौक आवाराजवळ आले. झाडाच्या बुंध्याला ठाण केलेल्या पांढऱ्या शुभ्र घोडीला खरारा करीत एक माणूस काही गुणगुणत होता.


संभाजीराजे मंदिराच्या प्रथम चौकात आले. पायगतीला असलेल्या दगडी कासवाला बगल देऊन त्यांनी घंटेचा टोल दिला. तसेच चालत जाऊन मंदिरगाभाऱ्यातील बेलकमळांनी आच्छादिलेल्या, जलधारा अंगी घेणाऱ्या शिवपिंडीसमोर गुडघे टेकून पिंडीला मस्तक टेकविले. पुजाऱ्याने दिलेले तीर्थ पापण्यांना भिडवून ओठांआड केले.


बाहेर चौकाभोवती फिरलेल्या ओवरी-ओवरीत शिरून कुलेश आणि महादेवपंत - त्या कवीचा तलाश पाडू बघत होते. दक्षिणा आणि दानाच्या ओढीने आलेल्या उदासी, बैरागी, गोसाव्यांनी साऱ्या ओवन्या भरून गेल्या होत्या. त्यातच वेष पालटून राजांच्या जासूद खात्याचे खबरगीरही मिसळले होते। त्यांनी महादेवपंतांना ओळखले. जवळ येत त्यांनी पंतांना दखल दिली.


एका खबरगिराने चौकाबाहेर येत महादेवपंतांना दबक्या आवाजात सांगितले, "ह्योच त्यो शाहीर. निक्तंच धनी होचं पवाडं आतल्या चौकात ऐकून म्येलं. लई खूष जालं. पर ह्या वागानं काय वळाकलं न्हाई त्येस्नी! म्यॅबी ऐकलं पर होची बोली काय साधली न्हाई मला!" त्या गोसावी कफनी घातलेल्या खबऱ्याचे बोट घोडीला खरारा देणाऱ्या त्या ठेंगण्या माणसावर रोखले होते.


"प्रणाम कविराज.” पुढे होत कवी कुलेशांनी त्या माणसाचा खरारा थांबविला. "जै जयंती. प्रणाम." खरारावाला वर उठून हिंदोस्थानी भाषा कानी पडल्याच्या आश्चर्याने कुलेशांच्याकडे बघत म्हणाला.


त्याचा रंग पिकल्या आंब्यावर पडला होता. कपाळी कनोजी पगडी, अंगी उत्तरी सफेद बंदी निमा. लाल करवतकाठी धोती, कपाळी आडवे शैवगंध आणि तेजफेकी,

अभिमानी डोळे असे त्याचे रूप होते.


हाताला बांधलेला बुरणुसी खराऱ्याचा वाद उकलीत त्याने विचारले "क्षमा व्है!

आपका परिचय ?

'हम कवी कुलेश. प्रयागनिवासी। आप ? "

हो. त्रिविक्रमपूरके त्रिपाठी! भूषण त्रिपाठी!'

" चंडी 5 चंडी 5 प्रणाम कविराज भूषण ! हमने आपकी कीरत सुनी है। आज दर्शन हुए। " कुलेशांनी समोरचे कनोजी काव्यतेज पारखीत पुन्हा नमस्कार केला. झाडाच्या रोखाने येत्या संभाजीराजांना बघून कुलेश भूषणना समज मिळावी म्हणून "


पुटपुटले, “युवराज संभाजीराजे ! ' भूषण झुकून कनोजी नमस्कार देत, समोरून चालत येणारे क्षात्रतेज उतावळ्या डोळ्यांत भरून घेताना पुटपुटला- “जे जयंती ! सर्जा सिवाजी के सुपूत. '


" कविराज, आमच्या आबासाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही तुमच्या भेटीस आलो. कोण देश तुमचा? नाव कोण ?” संभाजीराजांना भूषण आणि कुलेश यांच्या पगडीत सारखेपण दिसले.


भूषणने युवराजांना आपला परिचय देऊन विनंती केली, “युवराज, दूर देसनसे आवत्. हमको राजा सिवाजीके दरसन की क्रिपा होवे !."


'जरूर. कवींनी करावे असेच त्यांचे दर्शन आहे. पण कवींनी प्रथम इथला मुक्काम हलवावा. आमच्या महाली चलावं." हसून युवराज म्हणाले.


“हाँजी." भूषणने त्यांचा आदर राखला.. रायाजीने भूषणच्या घोडीचे ठाण मोकळे करून ती आपल्या ताब्यात घेतली. अंतोजीसह आत जाऊन भूषण आपली पडशी पथारी घेऊन बाहेर आला.


भूषण आणि कुलेश या दोन उत्तरी कवींच्यामधून संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या रोखाने चालू लागले. मागून भूषणच्या 'केसर' घोडीचे कायदे-ओठाळी धरत रायाजी, अंतोजी चालू लागले. व्यापारपेठ आली तसे संभाजीराजांना मुजरे झडू लागले. कवी भूषण रायगडाचे राजवैभव डोळ्यांत जमवीत चालला होता.


नगारखान्याच्या दरवाज्याने सारे आत आले. एवढ्या उंचीवर फव्वारती कारंजी बघताना भूषण अचंब्याने क्षणभर रेंगाळला. सजावट ल्यालेल्या दरबारी चौकभर त्याची नजर फिरली.


आपल्या महाली प्रवेशताना संभाजीराजांनी आदराने भूषणचा हात आपल्या हाती घेतला आणि यादव नामाजी ह्या खिदमतगाराला काही आज्ञा खुणावली. मध्यभागीच्या बैठकीवर त्यांनी भूषणला आपल्या शेजारी बसवून घेतले. कुलेश महादेवपंत भिंतीजवळ अदब धरून उभे राहिले. रायाजी अंतोजीने भूषणची पडशी पथारी आतील दालनात नेली.


यादव चांदीच्या तबकात मांडलेले केशरी दुधाचे चंदेरी प्याले घेऊन पेश आला. त्यांतील एक प्याला उचलून भूषणच्या समोर धरून संभाजीराजे म्हणाले, " घ्या.' हाँजी " आतिथ्याने भरून आलेला कवी भूषण म्हणाला.

"आम्हास काव्याचा छंद आहे. कर्वी भेटले की बाणगंगेत स्नान झाल्यासारखे वाटते आम्हाला! " दुधाचा घोट घेऊन संभाजीराजे म्हणाले.


"हाँजी" भूषण मनोमन एका बाबीचा ताळा बांधीत होता- “ये सिवाजीके सपूत "हैं . तो साक्षात सिवाजी कैसे होंगे ?' "कविराज, तुमची बोली कोणची ?"


"जी. व्रज बोली है हमारी. आम्या हो तो इसकी कुछ खुमार पेश करेंगे." “जरूर. जरूर. आमचे कान धन्य होतील." युवराज हसून म्हणाले.


काहीतरी पाहिजे असल्यासारखी भूषणची नजर महालभर भिरभिरली. दालनात जाणाऱ्या दरवाज्यावर खिळली:


" काय झाले कविराज ? काय शोधता ?'


क्षणभर कवी घोटाळला. मग हलक्या आवाजात म्हणाला - " हमारी दिमडी ! अंदर गयी!"


संभाजीराजांनी ते ऐकून रायाजीला नजर दिली. रायाजी आतल्या दालनात गेला. भूषणची पडशी घेऊन पुन्हा पेश आला. बैठकीवरून उतरून भूषणने पडशीतील दिमडी, शेला घेतला.


बैठकमहालाच्या मध्यभागी येत त्याने शेल्याने कमर कसली. संभाजीराजांना दरबारी थाटाचा मुजरा दिला. डोळे मिटून दिमडीवर दोन तीन लयदार थापा दिल्या. अंगी वीज उतरल्यासारखा भूषणचा आवाज पलटी घेऊन शाहिरी झाला.


"सर्जा सेवाजी के सपूत युवराज संभूराजे सुनिये सर्जाकी कीरत !" भूषणने - दिमडीच्या फडफडीने बैठकमहाल थरकवून सोडला. डोळे मिटून त्याने जयंती - जगदंबेचे मंगलस्तवन धरले-


"जै जयंती, जे आदि सकति, जै कालि कपर्दिनि जै मधु कैटभ छलनी, देवि जै महिष बिमर्दिनी'


कविभूषण स्तवनाच्या तालाबरोबर जयंतीच्या दरबारात पोचला! त्याचे वीज पिऊन आलेले कडकडीत व्रजबोल तोफांची भांडी फुटावीत तसे फुटू लागले- 


" इंद्र जिमि जंभपर, वाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर- रघुकुल राज है।


पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यो सहस्रबाह पर, राम द्विजराज है। दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंडपर, भूषन बितुंड पर, जैसे मृगराज है।


तेज तम अंस पर, कन्ह जिमि कंस पर, 

त्यों मलिच्छ बंस पर, 

सर्जा सिवराज है !

सर्जा सिवराज है !


"व्वाऽ! कविराज! धन्य धन्य आहे तुमची! आम्हास समर्थांची आठवण दिलीत!" हात उठवून भूषणला मोकळी दाद देताना संभाजीराजांच्या मनात समर्थांचे श्लोक फिरले-


“निश्चयाचा महामेरू। बहुत जनांस आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी ।।'


बराच वेळ दिमडीच्या तालबद्ध थडथडीवर कवी भूषणाने आपल्या शेलक्या बांधण्या संभाजीराजांना ऐकविल्या. त्यांच्या नाचत्या पोतासारख्या शब्दरचना ऐकून मोहरून उठलेल्या संभाजीराजांनी बैठक सोडली. भूषणजवळ जात आपल्या गळ्यातील मोतीकंठा त्याच्या गळ्यात चढवीत ते म्हणाले, "कविराज, तुमचा एक एक बोल ओंजळीनं मोती उधळावेत असा आहे. आम्ही खूषनिहाल झालो. नागफण्यासारखी आहे तुमची रचना!'


." मुतालिक, कवींचा इतमाम राखा. " संभाजीराजांनी महादेवांना समज दिली. कुलेश आणि महादेवपंत भूषणना घेऊन गेले. संभाजीराजांच्या मनात भूषणचा एक शब्द निवळीसारखा फिरत राहिला- "सर्जा सर्जा ! '


'चला." पूजेचा पेहराव घेऊन सिद्ध झालेल्या संभाजीराजांना राजे म्हणाले. शेजारी उभ्या असलेल्या रामराजांच्या खांद्यावर युवराजांनी हात ठेवला. परातीत शिजला भात • घेऊन प्रभाकरभट्ट आणि अनंतभट्ट यांनी तो उभ्या रायगडाच्या घेराभवत्याने शिवरून 'अशुचशांतीचा' विधी पार पाडला होता.


राज्याभिषेकाच्या प्राथमिक विधीला आज सुरुवात होणार होती. मुंगीराशीने माणूस गडावर दाटले होते. फलटण, तळबीड, शृंगारपूर, चौक, सिंदखेड, भुईंज, पाली, राजांचे चौबाजूचे रक्तसंबंधी गोतावळे गड चढून आले होते..


बांदल, जेधे, शिर्के, मालुसरे पासलकर, शिलींबकर, कंक, जाधव, दहातोंडे, सरदार भोसले सारे शिबंदी सरंजामानिशी गडावर दाखल झाले होते. टोपीकरांच्या मुंबई दरबारचा वकील हेन्री ऑक्झिडनही गड चढून आला होता.


जागा मिळेल तिथे डेरे, राहुट्या, शामियाने, चांदण्या तणावांच्या आधाराने उठल्या होत्या. तोरणे बांधलेला नगारखाना, महादरवाजा, वालेकिल्ला आंबवतीच्या आरासींनी मला होता. ठिकठिकाणी झाडांच्या घेरांखाली जांभळीचे ठाळे टाकलेले मुदपाकी मंडप "उठले होते. त्यात रचलेल्या चुलवणांवर चढलेल्या हंड्यांखालून धुराचे लोळ उसळून वर झेपावत होते. त्यांच्या घाईगर्दीतून, नगारखान्यावरून उठलेला चौघडा नौबतीचा डंका मुष्किलीने वाट काढत गडभर पसरला होता. त्याचा माग घेत सनयांचे चपळ सूर सारीकडे पसरले होते. नगारखान्याच्या निशाणकाठीवर नेहमीपेक्षा केवढातरी मोठा दिसणारा भगवा वरच्या निळ्याशार मावळी आभाळाचा डफ करून त्यावर फडफडती थाप देत होता! गडावरच्या मंदिरामंदिरांवरची छोटेखानी, तिकोनी भगवी निशाणे माना डोलावून त्याची झील धरून होती !


हुजुराती पागेतील घोड्यांच्या आघाडीच्या उजव्या पायांत चांदीचे तोडे भरून त्यांच्या पाठीवर नक्षीदार लोंबत्या झुली चढविल्या होत्या. उठती धूळ शांत व्हावी म्हणून पखालीवाले रस्त्यारस्त्यांवर पखालीतून पाण्याचा शिडकारा करीत होते.


गंगा, सिंधू, जमुना आदी सप्तनद्यांचे तसेच पूर्व, पश्चिम आणि दक्षिण सागरांचे पवित्र अभिषेक जल आबदारखान्यातील चौरंगावर आणि सुवर्णाच्या, मृत्तिकांच्या कलशांत भरून ठेवले होते. रामराजे, युवराज संभाजीराजे आणि गागाभट्ट यांच्यासह पूजेची वस्त्रे ल्यालेले राजे आपल्या महालातून बाहेर पडले. त्यांच्या पाठीशी अष्टप्रधान, येसाजी कंक, आनंदराव, फिरंगोजी, पिलाजी शिर्के. रूपाजी, सर्जेराव असे आघाडीचे सरदार चालू लागले. कवी भूषण, कुलेश, परमानंद, निश्चलपुरी चालू लागले. गोमाजी, खंडोजी, रायाजी अंतोजी यांचे मावळी इमान चालू लागले. 'श्रींच्या कल्याणकारी राज्याचे भाग्य चालू लागले !


जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन सारे रामजी दत्तोच्या रत्नशाळेतील ओतकामाच्या कारखान्यात आले. सुवासिनी आणि कुणबी दासी पाठीशी घेत सोयराबाई आल्या. कारखान्याच्या चौकात भगवा सरपोस घालून झाकलेले सिंहासन होते. त्याच्या दक्षिण बाजूला सोन्याची घडीव गणेशमूर्ती होती. आज त्यांच्या पूजनाचा व स्थापनेचा विधी होता. त्याबरोबरच समर्थांनी दिलेल्या कोदंडाचे पूजन होते.


पुढे होत रामजीने हलक्या हाताने सरपोस हटविला. असंख्य मावळ्यांचे सांडले रक्तच जणू सोन्याचे झळकते रूप लेवून अंगी पडणारी किरणे परतविताना म्हणत होते, " आम्ही कुनाला अंगझटी घेतले नाही ! त्यो मान फक्त धन्याचा हाय !! "


" जगदंब ! जगदंब !" सिंहासनाच्या नुसत्या दर्शनानेच राजांचा हात छातीशी गेला. सिंहासनाच्या वाघमुखी हातबैठकी बघताना संभाजीराजांना राजांचे बोल आठवले - "आपण प्रथम भोसले आहोत, मग शिकारी! वाघ हे जगदंबेच्या बैठकीचं जनावर आहे.'


राजे-सोयराबाई, संभाजीराजे चंदनी पाटावर बसले. गागाभट्टांनी अथर्वशीर्षातील गणेशस्तोत्राचा उद्घोष केला, "ॐ गं गणपतये नमः ! त्वमेव कर्ता, त्वमेव...' गणेश आणि सिंहासन पूजन झाले. मानाचे बकरे पडले. कोदंडाची पूजा झाली. सुवर्णफुलांची उधळण झाली.


"आईए. सिंहासनको हस्तस्पर्श दीजिए." गागाभट्टांनी राजमंडळाला विनंती केली. राजे-सोयराबाई पुढे झाले. रामराजे ते सारे बघत बगलेला उभे होते. " या बैठकीस हात देऊया.” संभाजीराजांनी मायेने रामराजांचा हात आपल्या हाती घेत त्यांना सिंहासनाजवळ घेतले.

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९९

 'जय जय रघुवीर समर्थ" या खड्या बोलामागोमाग समर्थ नजरेला पडताच

राजे बोलून गेले - "शंभूऽ खुद्द समर्थच येताहेत! आघाडीचे. उतार व्हा.' राजांनी रिकीब सोडली. मोजड्या उतरल्या. चटक्या पावलांनी तरातर पुढे होत त्यांनी समर्थांच्या पायांवर आपले मस्तक ठेवले. राजांच्या टोपावर आपल्या तळहाताचे छत्र " धरीत समर्थांनी आशीर्वाद दिला. "रामरूप व्हा!'


राजे बगलेला झाले. पुढे होत संभाजीराजांनी आपले मस्तक समर्थांच्या चरणांवर ठेवले. कमळपाकळीसारख्या त्या चरणांचा स्पर्श संभाजीराजांना जाणवला. विचारांचे भुंगे घुमून उठले. " बहुता जन्मांचा शेवट ! नरदेह सांपडे अवचट !' " रघुदास व्हा! " जपमाळ अंगठ्याखाली तोलत समर्थांनी तळहात संभाजीराजांच्या टोपावर ठेवला.


'उठून संभाजीराजांनी समर्थांच्या शांत, तेजवान मुद्रेवर नजर जोडली. पाऊसधारांत निथळलेला नि श्रावणी उन्हात उजळलेला रायगडाचा कातळकडा दिसावा तशी ती मुद्रा होती ! निर्धारी, नितळ, शांत, काहीही साठवून घ्यायला राजी नसलेली, चारी पुरुषार्थ जिंकलेली, संन्यासी ! गोसावी !


बघणाऱ्याला सर्वांगावर कमंडलूतील पाण्याचा शिडकावा होतो आहे असे वाटावे अशी रामरंगी नजर समर्थांनी संभाजीराजांच्यावर जोडली. कपाळीचे भस्मपट्टे किंचित वर घेत ते म्हणाले - " तुम्ही युवराज.... संभाजीराजे. अं!' 'जी.” संभाजीराजांच्या कानातील सोनचौकडा मंद डुलला.


रघुकृपा." डोळे मिटते घेत समर्थ पुटपुटले.


'स्वामींनी पुढं येण्याची तसदी घेतली.” राजे प्रेमभावाने म्हणाले. 'अवधा मुलूख पाठीशी घेऊन जाणाऱ्यांना पुढं होऊनच पावतं घ्यायला पाहिजे


राजे! चला." समर्थांनी घळीच्या रोखाने हात उभारला.


दुतर्फा जगदंबेचे भुत्ये घेऊन तो गिरिकुहरात राहणारा रामभक्त चालू लागला. शंखांचे नाद उठले. त्यात राजांच्या सरंजामातील शिंगाड्याने काढलेली शिंगांची थरथरती ललकारी मिसळली. घळीतील दगडी गुहेत राजांचे बोल घुमले.

"स्वामींना रायगडी पाचारण करण्यासाठी आम्ही आलो आहोत. " चौथरावजा एका दगडी बैठकीवरच्या व्याघ्रांबरावर समर्थ बसले होते. शेजारी कमंडलू, थोपा आणि भगव्या बासनात बांधलेली ग्रंथसंपत्ती होती. पाठीशी पुरुषभर उंचीची उड्डाणी पवित्र्यातील शेंदूरमंडित हनुमंत मूर्ती होती. तिच्याजवळ एक बळकट धनुष्य होते. त्याच्या पायथ्याशी भरल्या बाणांचा भाता होता.


समर्थांच्या समोर अंथरलेल्या घोंगडीवर राजे-संभाजीराजे पलख मांड्याची बैठक घेऊन बसले होते. मठाच्या धुनीतील धुराची मंद वळी गुहेत शिरून फिरत होती. डोळे मिटून थोडा वेळ समर्थ हातची जपमाळ ओढीत राहिले. मग गुहेवरची घोंड हटावी तशा त्यांच्या पापण्या उघडल्या. ओठांतून आशय पाझरू लागला.


" तुमच्या राज्याभिषेकाची सुवार्ता कानी आली आहे राजे. त्यासाठीच क्षणापूर्वी डोळे मिटून आम्ही अयोध्येत जाऊन आलो ! आम्हाला पाचारण करण्यासाठी तुम्ही येथवर आलात. आम्ही धन्य झालो. सिवबाराजे, आम्ही केव्हाचेच तुमच्यावर छत्र धरले आहे- आमच्या तपः सामर्थ्याचे! डोंगरदरीत राहणारे आम्ही गोसावी. आम्हाला लौकिकाचे बंध नाहीत. जनलज्जेसाठी लंगोटी आणि उदरपूजेसाठी झोळी आम्ही धारण केली आहे. नाहीतर तो भारच आहे! आम्हाला लौकिकात गुंतवू नका.


"तुम्हाला आम्ही साक्षात प्रभू रामचंद्रांचा अवतार मानतो. आम्ही सांगतो तो राजयोग समचित्त होऊन ध्यानी ठेवा. मनी किंतू न धरता सविध राज्याभिषेक करून घ्या. झाले नाही एवढे थोर कार्य तुम्हास करणे आहे." डोळे मिटत समर्थ पुन्हा मनापलीकडच्या प्रकाशगुहेत शिरले.


'जी." घोंगडी थरथरली.


समर्थांच्या दाट दाढीमिश्यांनी मखर धरलेल्या ओठांतून शब्दाचा एक एक सूर्य टंकारत फुटू लागला. पिता-पुत्र कानांचे कमंडलू करून ते रामतीर्थ आपलेसे करू लागले. गुहा मंदिर गाभारा झाली. रामबाण शब्दांनी भरू लागली.


'जयास वाटे जिवाचे भय । त्याने क्षात्रधर्म करूं नये । कांहीतरी करून उपाय पोट भरावे ॥ नजर करार राखणे कार्य पाहून खत्तल करणे।


तेणे रणशुरांची अंत:करणें । चकित होतीं। देखोनी व्याघ्राचा चपेटा मेंढरे पळती नानावाटा । मस्त तो रेडा मोठा काय करावा ?


उदंड मुंडे असावीं । सर्व ही एकत्र न करावीं ।

वेगळाली कामे द्यावीं । सावधपणे ॥ मोहरा पेटला अभिमाना। मग तो जीवास पाहेना। मोहरे मिळवून नाना। मग चपेटे मारी ॥


अमर्याद फितवेखोर त्यांचा करावा संहार। शोधिला पाहिजे विचार । यथायोग्य ॥ मर्दे तकवा सोडूं नये । तेणे प्राप्त होतो जय । कार्य, प्रसंग, समय ओळखावा ॥


दोन्ही दळें एकवटें। मिसळताती लखलखाटें | युद्ध करावें खणखणाटें। सीमा सोडूनिया ॥ देवमात्र उच्छादिला । जित्यापरीस मृत्यु भला ।


आपला स्वधर्म बुडविला असे समजावें।। महाराष्ट्र देश थोडका उरला राजकारणें लोक शोधिला । अवकाश नाहीं जेवायाला उदंड कामें ॥


लोक पारखून सोडावें । राजकारणे अभिमान झाडावें । पुन्हा मेळवून घ्यावे । दुरील दोरे ॥ देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा । मुलुख बडवा की बडवावा। धर्मसंस्थापनेसाठी ॥


जय जय रघुवीर समर्थ ! "


रामनांदी उठवून समर्थांनी डोळे उघडले. बैठकीवरून उठून ते पाठीच्या हनुमंत- मूर्तीजवळ गेले. खांद्याएवढ्या उंचीचे धनुष्य प्रत्यक्ष त्यांच्या हातसरावाचे होते. समर्थांचे बोल मनावर कोरून घेतलेले राजे युवराज घोंगडीवर खडे झाले होते.


राजांच्यासमोर उभे होत समर्थ बैरागी आवाजात म्हणाले, “आशीर्वाद आम्ही तुम्हाला दिलेलाच आहे. हा आमचा कोदंड घ्या राजे! तुमच्या अभिषेकाला आमची ही गोसावी भेट! आमच्याकडे देता येण्याजोगे एवढेच आहे. आणि या प्रसंगी ते योग्य आहे. घ्या. विजयवंत व्हा! " हातांतील कोदंड समर्थांनी पुढे केला. राजांच्या पापणीकडा दाटून आल्या.


झुकते होत त्यांनी तो रामप्रसाद आदराने हाती घेतला. कोदंड डोळे मिटत कपाळीच्या शिवगंधाला भिडविला. तसाच तो संभाजीराजांच्या हाती दिला. डोळे मिटून तो 'गोसावी कोदंड' कपाळीच्या शिवगंधाला भिडविताना समर्थांचा एक विचार बाणागत युवराजांच्या काळजात रुतून बसला कधीही न हटण्यासाठी -


" जयास वाटे जिवाचें भय त्याने क्षात्रधर्म करू नये । धनुष्य-भाता हाती घेऊन संभाजीराजे समर्थांना काही एक बोलू गेले. पुन्हा थांबले. "त्यांनी राजांना नजर दिली.


“बोला. निःसंकोच बोला युवराज.” समर्थांच्या नजरेतून ती घालमेल सुटली नाही. 'नाही - आम्ही म्हणणार होतो की " संभाजीराजे अडखळले. -- " सांगा. काय आहे ? " समर्थ हसले.

" स्वामींनी जसे महाराजसाहेबांचे रूप श्लोकांत उभे केले आहे तसे तसे आमच्या मासाहेबांचेही केले तर आमचे कान धन्य होतील!"


न पाहिलेल्या जिजाऊंच्या आठवणीने समर्थांना कधीतरी बाळपणी पाहिलेल्या आपल्या मातोश्रींची आठवण झाली निर्धाराने त्यांनी ती परतविली.


"युवराज, तुम्ही आणि राजे धन्य आहात. प्रतिदिनी त्यांच्या सहवासात आहात. आम्ही त्यांना पाहिले नाही ! केवळ ऐकले आहे! आणि पाहिले तरीही त्यांचे रूप आम्ही शब्दांत उभे करू शकणार नाही. आम्ही शब्दांचा दासबोध घडविला. पण पण त्यांनी - हा समस्तास जिताजागता शिवबोध घडविला आहे!" समर्थांनी राजांच्याकडे हात केला. “ वाल्मिकींनी रामायण रचले पण त्यांनाही कौसल्यामातेचे रूप गवसलेले नाही. आम्ही ते कसे विसरू ?"


राजांनी झुकून समर्थांच्या चरणांना हात भिडविले.


संभाजीराजांनी द्रोणागिरिधारी बलदंड हनुमंत आपल्या नजरेत भरून घेतला. त्या दिवशीचा मुक्काम घळीत टाकून दिवस फुटीला राजे-संभाजीराजे रायगडाकडे जायला निघाले. त्यांना पायसोबत द्यायला समर्थ घळीच्या कुंपणापर्यंत आले.


निरोपासाठी हात जोडणाऱ्या राजांच्या खांद्यावर जपमाळेचा हात चढवीत समर्थ नेहमीपेक्षा वेगळ्या कातऱ्या आवाजात म्हणाले, "राजे, एक स्मरणपूर्वक करा. आईसाहेबांना आमचा दंडवत सांगा! आमच्या रूपाने आमचा दासबोध त्यांच्या सेवेला तत्पर आहे हे सांगा. या, रामरूप व्हा! जय जय रघुवीर समर्थ ! 


समर्थांनी डोळे मिटले. त्यांना पाठमोरे झालेल्या संभाजीराजांचे मन कुठेतरीच जाऊन पोचले होते-


" एवढं थोरपण जन्मास घालणाऱ्या स्वामी समर्थांच्या आईसाहेब कशा असतील ? आमच्या मासाहेबांसारख्या ?" कुठे असतील त्या ? त्यांनी ऐकला असेल कधी दासबोध ? दासबोध ! केवढा अर्थ!-


" सरतां संचिताचे शेष नाहीं क्षणाचा अवकाश । भरतां न भरतां निमिष जाणे लागे ! "

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९८

 मावळ्यांची होऊ घातलेली राजधानी म्हणून रायगड सजावटीला निघाला. दरबारी चौक, बालेकिल्ल्याचे खासेमहाल आईनेबंदीसाठी हिरोजी इंदलकर, आबाजी, अर्जेजी-गिर्जोजी यादव यांनी हाती घेतले. शिलावट छिन्न्या घुमवू लागले. ठोका ठोका ताल धरू लागला - " राजा शिवछत्रपति !” सुतार, सोनार, लोहार, कहार, मांग, महार झाडून सारे आघाडीने कामावर पडले.

जवाहिरे, सराफ, अत्तार सौद्यासाठी उमेदीने रायगड चढू लागले. पागेची घोडी नालबंदीसाठी बाहेर पडली. प्रांत परगण्यांतून कबाडीच्या बैलांनी फेसाटत वाहून आणलेली धान्याची आणि मिठाची पोती अंबारखान्यात आबादान होऊ लागली.


गडावरच्या मंदिरातील मूर्ति मूर्तीवर वज्रलेप चढू लागले. लाल फासबंदांच्या थैल्या कमरशेल्यात खुपसून थैलीस्वार गड उतरू लागले. बहिर्जी, कर्माजी, विश्वास यांची खबरगीर पथकं खांद्यावरची रामोशी कांबळी सावरत मुलूखभरच्या खबरा उचलू लागली. आठरा कारखाने गजबजून उठले. चांदीची कडी भरलेले मदनि हात आणि कोपरभर चुडा भरलेले जनानी हात, स्वतःला हरवून एक नामी मनसुबा उभा करण्यासाठी झटू लागले.


ओतकामात तरबेज असलेल्या रामजी दत्तोने राजांच्या हस्ते श्रीफळ वाढवून 'सिंहासन घडाईच्या कामाला हात घातला. रामजीला माहीत होते. तो एका 'मावळी रामचंद्राचे' राजआसन घडविणार आहे! बत्तीस मण भराचे! झळझळत्या बावनकशी संभाजीराजे हत्तीटाक्याजवळ उभे होते. फार वर्षांपूर्वी बच्चा असताना दोरखंडांनी चोरदरवाज्याच्या बाजूने रायगडावर चढविलेला 'त्रिशूल' हा हत्ती आता भरात आला होता. टाक्यात पाण्याला पडलेला 'त्रिशूल' बाहेर घेण्याच्या खटपटीत माहूत पुरता दमगीर झाला ! 'त्रिशूल' हट्टावर आला होता. टाक्याबाहेर पडायला राजी नव्हता. संभाजीराजे माहुताची घालमेल बघत हत्तीच्या विचारात गेले होते. शेजारी महादेव यमाजी आणि यादव नामाजी उभे होते.


सांजेचा नौबतडंका झडायला सुरुवात झाली न झाली तोच कुणीतरी रोखल्यासारखा डंका गपकन थांबला.


संभाजीराजांच्या कपाळी आठी जमली. दिठी समोर गेली. विझल्या वणव्याचा काळपट डाग अंगावर घेतलेला लिंगाणा त्यांना दिसला.


बालेकिल्ल्याच्या रोखाने चाललेल्या संभाजीराजांच्या कानी माहुताचे वैतागी शब्द पडले - “ त्रिशूल, आरं हाटमोरेपन सोड! क्काय टाक्यातच रुतून बसनार हाईस का काय ? "


महादेव यमाजी आणि यादव यांना पाठीशी घेत संभाजीराजे तरातर चालत पालखी दरवाज्याने बालेकिल्ल्यात आले. राजांच्या खासेवाड्याच्या सदरी पायऱ्या चढतानाच त्यांना जाणवले 'काही तरी घडलंय.'


बैठकीसमोर खालच्या मानेने उभ्या असलेल्या राजांच्या सामने कर्माजी हा धूळमाखल्या कपड्याच्या आनंदरावाच्या फौजेचा खबरगीर उभा होता. बाजूला आण्णाजी, बाळाजी, मोरोपंत, येसाजी खडे होते. साऱ्यांच्या माना पडल्या होत्या. मुजरा देऊ बघणाऱ्या संभाजीराजांना बघताच हातपंजा उठवून ते म्हणाले, " शंभूराजे, तो मुजरा तुमच्या गेल्या मुतालिकांना करा! 

ओढल्या पायांनी राजे युवराजांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, "संभाजीराजे, प्रतापरावांनी पंख जाळून घेतले! पठाण बहलोलच्या दहा- हजारी फौजेच्या वणव्यात! तुमचे मुतालिक गेले! आमचे सरलष्कर गेले! आमच्यावर रूसून ! हटमोरेपणानं ! स्वतः संगती आमचे लढाऊ सहा बांके घेऊन!'


संभाजीराजांना आठवले, बहलोलला सलामत सोडल्याबद्दल राजांनी राजसंतापाने प्रतापरावांना पत्र लिहिले होते- "पठाणाशी सला कार्य निमित्त केला ? गनिमास मारून गर्देस मिळवावे. नातर आम्हास तोंड दावो नये ! "


सुटला बहलोल बेइमानपणे मराठी मुलखाला ताराज करीत सुटला होता. पुरे एक वर्ष प्रतापराव त्याच्या पाठलागावर होते. चुकीचा सल सुधारून काढण्याची संधी बघत होते. बहलोल बंदिस्त होता.


राजे 'तख्ती बसणार ही खबर प्रतापरावांना लागली. आता रायगडी परतावे लागणार. पण बहलोल जिंदा ठेवून राजांना तोंड कैसे दावावे ?


नेसरीजवळ कुप्याच्या खिंडीवर बहलोलचा दहा हजारी पठाणी तळ पडलाय, ही खबर प्रतापरावांना लागली. फौजेनिशी चालून जाऊन फत्ते होणार नव्हती. म्हणून प्रतापरावांनी आपल्या डेऱ्यात शेलके धारकरी याद केले. कुणाला ध्यानीमनी नसता प्रतापरावांनी त्यांना साकडे घातले" आम्ही पठाणावर चालून जाणार! एकले ! राजांस्नी आमचा दंडवत सांगा ! "


सहा धारकऱ्यांनी कमरेची हत्यारे उपसत त्यांचा शब्द हट्टाने झेलला “सरलष्कर, जितं तुमी तिथं आमी!" आणि महाशिवरात्रीच्या दिवशी घोड्यांवर मांड घेतलेले प्रतापराव नंगी तलवार हाती नाचवीत "हर हर हर महादेव" गर्जत बेभान उधळले. सहा घोडाईत पाठीशी घेऊन!


ते वेडे सात पक्षी दहा हजारी फौजेवर झडप घालण्यासाठी गेले ते परतलेच नाहीत ! सात कडकडत्या विजा पठाणी फौजेच्या दर्यात कोसळल्या नि विझल्या. कर्माजीने सांगितलेला वृत्तान्त राजांच्या तोंडून ऐकताना संभाजीराजांच्या डोळ्यांसमोर प्रतापरावांची मर्दानी मुद्रा उभी ठाकली.


उधळत्या घोड्यावर मांड घेतलेले, हत्यार नाचवीत चवताळलेले प्रतापराव लिंगाण्याच्या पेटत्या वणव्यात घुसल्याचा भास संभाजीराजांना झाला!.


घुसते प्रतापराव म्हणत होते- “अमनधपक्यानं पेटल्याली ही आगट लई वंगाळ धाकलं धनी! रानपाखरं त्येनं येलबाडून जात्यात! घालून घेत पंख जाळून घेत्यात !' कारण नसताना माहुताचे ऐकलेले शब्द संभाजीराजांच्या मनात फिरले-


"त्रिशू ऽल, आरं हाटमोरेपन सोड !! टाक्यातच रुतून बसनार हाईस का काय ? ".. सजला रायगड प्रतापरावांच्या सुतकात आला. दाटल्या मनाने राजांनी प्रतापरावांचे मर्तिकविधी केले. सरलष्करपदाची मोकळी जागा मानवस्त्रासह हंसाजी मोहित्यांना दिली.

ती देताना 'हंबीरराव' ही खिताबत त्यांना बहाल केली.


हंसाजी सोयराबाईंचे बंधू. त्यामुळे त्यांची ही नामजादी सोयराबाईंना खोलवर सुखवून गेली. अडीनडीला रक्ताची माणसे कामी पडतात. सत्ता हाती असलेल्या रक्तसंबंधाच्या माणसाचा तर मनाला उगाच मोठा आधार वाटत असतो.


सगळे प्राचीन ग्रंथ राबत्याला घेऊन गागाभट्टांनी तपशिलासह 'राज्याभिषेक प्रयोग' हा विधींचा ग्रंथ तयार केला.


पाचाडहून, काशीबाईच्या दुखण्याने उचल खाल्ल्याची वर्दी गडावर आली.


राजे, संभाजीराजे, जिजाऊ, राणीवसा, येसूबाई, धाराऊ संगळा राजगोतावळा . पाचाडात उतरला. अभिषेक होऊ घातलेल्या राजे-संभाजीराजांच्याकडे भरल्या नजरेने बघत, बोलायचे ते खूप ओठाआड तसेच ठेवून मूकपणे काशीबाई निघून गेल्या. पाचाडच्या दरुणीमहालात आक्रोश उठला.


काशीबाईंचा निष्प्राण हात हाती घेऊन त्यांच्या कपाळीचा भरला आडवा मळवट बघताना राजांचे डोळे दाटून आले. एक मुका मनसुबा थंड झाला होता. होणाऱ्या राज्याभिषेकावर आभाळाच्या सांदीतून काही अशिव झिरपेल की काय या कातरभयाने ते थोपवायला घाईगर्दी करून काशीबाई निघून गेल्या !


पाचाडच्या माळावर पेटलेल्या चंदनी चितेकडे उदास नजरेने संभाजीराजे बघत होते. चितेच्या चटचट्या आवाजाबरोबर त्यांच्या शब्दाचे पक्षी पंख फडफडवीत राहिले-

" सरता संचिताचें शेष नाहीं क्षणाचा अवकाश ।


भरता न भरता निमिष जाणे लागे। मृत्यु न म्हणे मुद्राधारीं न म्हणे परनारीं। राजकन्या ॥


प्रतापरावांच्या होमानंतर एकच महिन्यात काशीबाईंची चिता पेटली. युवराज म्हणून राजटोप मस्तकी चढण्यापूर्वीच ज्येष्ठ पुत्र म्हणून संभाजीराजांचे जावळ मुंडन विधीने उतरले गेले ! रायगड पुन्हा सुतकात आला !


काशीबाईंचे मर्तिकविधी पार पडले. संभाजीराजांच्यासह राजे प्रतापगडी जायला निघाले. कुळदेवता भवानीआईचे आशीर्वाद घेऊन, रामजी दत्तोने बांधलेले सव्वामणी सुवर्णछत्र तिच्या मस्तकी चढवायला शिवथर घळीत उतरून समर्थांची पायधूळ घ्यायला.


दोघा पितापुत्रांनी जिजाऊंचा निरोप घेऊन निवडक शिबंदीनिशी रायगड सोडला. फुलमाळांनी सजल्या पालखीत वस्त्राच्छादित सुवर्णछत्र ठेवण्यात आले होते. 'जय भवानी !' नांदी देत भोयांनी पालखीला खांदे दिले. जगावर छत्र धरणाऱ्या तुळजाभवानीवर छत्र चढविण्यासाठी तिचे भुत्ये चालले होते !

उन्हाळी मजला मागे पडल्या. घाट चढून छत्रतांडा जावळी खोऱ्यात घुसला. जनीच्या टेंब्यावरची अफजल-कबर मागे टाकीत छत्रशिबंदी प्रतापगडावर आली. सोनमोहरा उधळून किल्लेदाराने राजे युवराजांची आगवानी केली. भरल्या मळवटाने सुवासिनींनी निरांजने फिरविली.


छत्रस्थापनाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी होता. थाळे घेऊन दुपार टळतीला टाकून संभाजीराजांच्यासह राजे गडाच्या पाहणीला बाहेर पडले.


गडाच्या मोक्याच्या जागा बघून स्वाऱ्या 'अब्दुल-बुरुजावर आल्या. दूरवर हंड्याएवढ्या दिसणाऱ्या अफजलच्या कबरीकडे बघत राजे गंभीर झाले. "महाराजसाहेब, आपणास जिवे घेण्याचा विडा उचलून आलेल्या खानाचे दफन आपण इतमामाने केले. त्याची कबर बांधविली. ही कोण विचाराने ? " अफजलच्या कबरीकडे बघत संभाजीराजांनी विचारले. राजांचा घरला विचार त्याने तुटला.


संभाजीराजांच्या भरगच्च कपाळीच्या गंधपट्ट्यावर, गालाकडे फिरलेल्या मिश्यांच्या काळभोर रेषांकडे बघत राजे म्हणाले, " आमचा झगडा करणीशी असतो, कर्त्याशी नाही. मरणाबरोबर गनिमी संपली असे आम्ही मानतो.'


" पण गनिम तसे मानीत नाहीत! आपल्या गुजरकाकांचा पडला देह मिळाला नाही. त्यांचे दहन झाले नाही! कामी आलेल्या आपल्या माणसांची घडें छावणीच्या कुत्र्यांसमोर टाकली जातात. टाकली जातील! हे कसे?".


तो विचार बिनतोड होता. राजे त्याने क्षणभर सुन्न झाल्यागत झाले. मग शांतपणे म्हणाले, " मोगलाईत आणि आमच्या 'श्रीं' च्या राज्यात फरक आहे तो इथंच. आम्ही पाडली मंदिरं पुन्हा उठविली- उठवू. पण कुणाची धर्मस्थानं धूळदोस्त करावी तो विचार आमच्या मनात शिवत नाही. तुम्हास आता जसं वाटतं तसं एकेकाळी आम्हांसही वाटत होतं. पण मासाहेबांनी आमचा भ्रम दूर केला. विचार उदात्त केले.' " जिजाऊंच्या आठवणीने दोघेही जबानबंद, निसूर झाले. भवानीच्या मंदिराच्या रोखाने सांजआरतीची तडतडणारी संबळ ऐकू येऊ लागली..


क्षणभर युवराजांना आपण रायगडाच्या मावळमाचीवरच उभे असल्यासारखे वाटले. हात छातीशी भिडले. भवानीच्या मंदिराकडे जाण्यासाठी ते राजांबरोबर अब्दुल- बुरुजाच्या पायऱ्या उतरू लागले.

ओघळत्या उपरण्याचे शेव मुठीत धरून आण्णाजी दत्तांनी रायगडाच्या सातमहालातील सोयराबाईंच्या महालाचा दगडी उंबरठा ओलांडला.


राणीसाहेबांना बघताच त्यांनी अदबीने झुकून मुजरा दिला. "या सुरनीस, अभिषेकविधीचा तपशील सिद्ध झाला असे आम्ही ऐकतो. " सोयराबाईंनी मुद्द्याला हात घातला.

रायगडावर राजे, युवराज नव्हते म्हणून मनातील एका पेचाची उकल करण्यासाठी आण्णाजींना सोयराबाईंनी चंद्राकडून महाली याद केले होते.


“जी. सर्व तपशील सिद्ध झालेत.” आण्णाजींनी मान खाली ठेवून प्रश्नाचा जाब दिला. एवढ्यात महालाच्या अंत:पुरातून चंद्रा कुणबिणीच्या हाती हात दिलेले रामराजे बैठकी दालनात आले. त्यांना बघताच आण्णाजींनी त्यांना मुजरा दिला.


रामराजांना जवळ घेत सोयराबाईंनी त्यांच्या गळ्यातील ठीक असलेला मोतीकंठा उगाच पुन्हा ठीक केला. तसे करताना आण्णाजींना नेमक्या मुद्द्यावर कसे आणावे याचा विचार मनाशी बांधून घेतला. "मग त्या तपशिलात आमच्या बाळराजांच्यासाठी कसले विधी आहेत?" सोयराबाईंची जरबी नजर आण्णाजींच्या थोराड पगडीभवती फिरली आणि त्यांच्या कपाळीच्या गंघटिळ्यावर बसली.


आण्णाजींना द्यायला उत्तर नव्हते म्हणून ते खालमानेने गप्पच उभे राहिले. " का ? सुरनीस, यांच्यासाठी कोणतेच विधी नाहीत ? तुम्ही गप्प का ?"


सोयराबाईंचा आवाज बांधील झाला. “जी. आचार्यांनी सिद्ध केलेल्या अभिषेकप्रयोगात बाळराजांचा स्वतंत्र उल्लेख नाही!" आण्णाजी तोलून बोलले.


"मतलब ? हे स्वारींचे कुणीच नाहीत ? मग यांना मुजरे तरी कशाला ?? " गैरसमज होतोय राणीसाहेब. यात आमची काहीच कसूर नाही. खुद्द स्वामींनीच "आचार्यांना अभिषेकविधी ठरविण्याचे सर्व अधिकार दिले आहेत. "


"तेच आम्ही म्हणतो. आचार्यांना गडाची ओळख दोन दिवसांची. त्यांच्या कामात काही वाण राहिली तर ते बोलणार कोण ? तुम्ही ती सुधारून घ्यायला नको काय ? " आण्णाजींना फिरवून फिरवून सोयराबाईंनी नेमक्या तिवड्यावर आणले. "जी. आम्ही हे बोलू. पण आचार्य ते मान्य करतीलच असा विश्वास कसा द्यावा ? "


तुम्ही बोला तर खरे. "


“जी.” आण्णाजींची पगडी मंद डुलली. सोयराबाईंना आणि रामराजांना मुजरा दे ते पिछाडीच्या कदमांनी महालाबाहेर पडले.


काही वेळाने सोयराबाईंची दासी चंद्रा, मंत्रिवाडीतील आण्णाजींच्या घरी जाऊन हळदीकुंकवाचे आमंत्रण देऊन आली.


सायंकाळी महाली आलेल्या आण्णाजींच्या कबिल्याची सोयराबाईंनी खण- शालूवर मोतीबंद नथ ठेवून ओटी भरली! आणि ती भरत असताना त्या हसून म्हणाल्या, " आपल्या माणसांचा असा राबता असला म्हणजे मनास बरं वाटतं!

सरंजाम-शिबंदी पाठीशी घेत राजे-संभाजीराजांसह शिवथरघळीच्या वाटेला लागले. ओढे, पाणंदी पार करताना जातवान घोड्यावर बैठक घेतलेल्या संभाजीराजांच्या मनी एकच एक विचार पुन: पुन्हा फेर टाकू लागला- " कसे कसे दिसत असतील स्वामी - समर्थ ? सूर्यभक्त रामसेवक संन्यासी. संन्यासी असून ठिणग्यांसारख्या शब्दांचा प्रपंच ओठांत नांदवणारे! केवढ्या मानतात मासाहेब त्यांना ! " " लतावेलींनी मेट धरलेली शिवथरची घळ जवळ आली. उभे रानच कुदणीला पडलेय असे वाटावे तसा शंखांचा घुमरा आवाज ऐकू येऊ लागला. राजांची आगेवर्दी गेल्याने साक्षात समर्थ, शिष्यांचा तांडा पाठीशी घेऊन स्वागतासाठी येत होते.

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९७

 राजे-संभाजीराजांच्या पायसोबतीत आचार्य रायगड चढून आले. जगदीश्वराचे दर्शन करून व्यापारपेठ, नगारखाना, दरबारी चौक बघंत साऱ्यांसह ते राजांच्या खासेवाड्यात आले. बैठकमहालात राजे, जिजाऊ, संभाजीराजे, रामराजे यांच्यासाठी देखणी राजबैठक सिद्ध केली होती. तिच्यासमोर वेदोनारायणांच्यासाठी मृगाजिन घातलेले प्रशस्त आसन मांडले होते.


आचार्य आल्याची वर्दी अंतःपुरात जिजाऊंना पोच झाली. राजांच्या राण्या, मुली, येसूबाई, रामराजे असा गोतावळा पाठीशी घेत शुभ्र नेसूधारी जिजाऊ बैठकमहालांच्या उंबरठ्याजवळ आल्या. त्यांना बघताच आसनावरून उठलेले आचार्य गागाभट्ट चालत पुढे झाले. जिजाऊंच्या रूपाने बिजलीचं शुभ्र वस्त्र लेवून सोशिक मावळी आभाळच उंबरठ्यात उभे होते!


पापणी न मोडता त्यांच्याकडे बघत पुढे झालेल्या गागाभट्टांनी "मांजी, प्रणाम. " - म्हणत झुकून थेट जिजाऊंच्या पायांना आपल्या हाताची बोटे भिडविली ! असे काही होईल ही कल्पना नसलेल्या जिजाऊ लगबगीने पाय मागे घेत म्हणाल्या "हे कोण करणं! आपण थोर श्रेष्ठ आचार्य.


त्यांची भावना ओळखून गागाभट्टांनी खुलासा केला, "माँजी, गंगासे बढकर श्रेष्ठ हैं आपके चरण । हम आचार्य हैं पढत धर्मग्रंथोंके। आप साक्षात् धर्ममाता हैं। " गंगेच्या खळखळाटासारखे ते बोल होते. ते ऐकताना राजांच्या पापणीकडा दाटल्यागत झाल्या. संभाजीराजांची छाती भरून आली.


'हाताची खूण देत आचार्यांनी जिजाऊंना बैठक घेण्याची विनंती केली. धीम्या धीम्या चालीने जात जिजाऊ मांडल्या बैठकीवर बसल्या. राजांनी आचार्यांना मृगासनावर बसण्याची विनंती केली. आचार्यांनी बैठक घेतली. त्यांच्या चरणाखाली असलेल्या आसनावर प्रभाकरभट्टांनी ताम्हन ठेवले. 

राजे, संभाजीराजे, रामराजे, राणीवसा, साऱ्यांनी आचार्यांची सविध पाद्यपूजा केली. बैठकीवरून उठलेल्या जिजाऊ पाद्यपूजेसाठीच पुढे येताहेत हे बघून गागाभट्ट राजांना म्हणाले, "नरेश, उन्हे फिरसे आसनस्थ कराइये। मातासे पुत्र की पाद्यपूजा पुत्र की आयु कम कर देती है। हमें जीवित रहना है- कमसे कम एक संकल्पित, धर्मकार्य पूर्ण करनेतक । 

आचार्यांची इच्छा सांगून राजांनी जिजाऊंना राजबैठकीवर उच्चासनी बसविले. त्यांच्या पायगतीला, दोन्ही तर्कांना संभाजीराजे, रामराजे घेऊन राजांनी बैठक घेतली. पाठीमागे राणीवसा उभा राहिला. भोवती मंत्रिगणांसह, निवडक असामी हात बांधून, अदब धरून धर्मपीठ आणि धैर्यपीठ यांचा संवाद ऐकण्यासाठी उत्सुक झाल्या. 

देवस्मरण केलेल्या वेदसंपन्न गागाभट्टांच्या विमल मुखातून बनारसी वाकूगंगा सबू लागली - " पुरुषोत्तम शिवाजीराजे, हम काशीक्षेत्रसे यहाँ दक्षिणदेश आये मनमें एक धर्मसंकल्प लेकर। आपका यह किला हमने देखा, परमसंतोष। यहाँ सब है। परंतु एक नहीं। सिंहासन। नरेश, राजदंडके व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है। समस्त आर्यावर्तमें आज हिंदुओंका एक भी राजपीठ नहीं सिंहासन नहीं जिसे देखकर हिंदुमस्तक गर्व करे। जीवनसंग्राम लडानेकी मनीषा करे। वहीं कारन है कि हिंदु स्वयं को निराश्रित, पराजित मान रहें हैं। नरश्रेष्ठ, अनुरक्षित धर्म धर्म नहीं रहता ! .... 'आपका कीर्तिसुगंध श्रवण कर हमें प्रेरणा प्राप्त हुई राजा शिवाजी, समस्त आर्यावर्तका यह भार स्कंधोंपर तोलने आप केवल आपही योग्य हैं।. " उत्तरमें हमारे पवित्र देवालय नष्ट हो रहे हैं। देवदेवता विटंबित किये जा रहे हैं, म्लेच्छों उदंड हाहाकार मचा दिया है। दुर्बल हिंदु प्रजानन बलात् धर्मांतरित किये जा रहे हैं।" आचार्यांचा धीरगंभीर आवाज धरत चालला.


" यही चलता रहा तो रामकृष्णकी यह पवित्र देवभूमि रौरव हो जायेगी। यही प्रयोजन है कि समस्त उत्तरवासियोंके प्रतिनिधिरूपमें भिक्षापात्र हाथ लिये हम आपके किलेके महाद्वारमें खडे हैं। धर्मरक्षक, हमें सिंहासन प्रदान करो। नरश्रेष्ठ, धर्मदंडको राजदंड प्रदान करो। राजा छत्रपति बनो। छत्र प्रदान करो। " भावनावेगाने उचंबळलेल्या आचार्यांनी , दोन्ही हात पसरले. उत्तर दक्षिणेला साकडं साद घालू लागली. डोळे भरल्यामुळे जिजाऊंना समोरचे काहीच दिसेनासे झाले.

मिटल्या डोळ्यांच्या राजांचा हात छातीवरच्या कवड्यांवर फिरत राहिला. बोटांना स्पर्शणारी प्रत्येक कवडी त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खर्ची पडलेला चेहरा चेहरा उभी करू लागली. बाजी, तान्हाजी, मुरार, सूर्याजी, रामजी! कैक. ते सारेच हात उठवून म्हणत होते- "राजे, आम्हांस छत्र द्या! मरणास मोल द्या!'


संभाजीराजांची पाणीदार नजर वेदभूषण गागाभट्टांच्या सतेज, निर्भय ओठांवर अडकून पडली होती. आचार्यांच्या रूपाने उभा रायगडच आपल्या कड्यांचे भक्कम ओठ उघडून कानात साठवावे असे काही सांगतो आहे असे त्यांना वाटले.

" राजदंडके व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है। असुरक्षित धर्म धर्म नहीं रहता। देवालय नष्ट हो रहे हैं, देवदेवता विटंबित किये जा रहे हैं। दुर्बल प्रजानन बलात् धर्मांतरित किये जा रहे हैं। " ऐकल्या शब्दाशब्दाला त्यांच्या आतून कुणीतरी फेरसाद घालू लागले. " मारिता मारिता मरावें । तेणे गतीस पावावें फिरोनी येता भोगावें। महत्भाग्य ॥' 

गागाभट्टांची आज्ञा राजांनी शिरोधार्य मानली. झाल्या बैठकीचे बोलणे रायगडाच्या पाखरांनी आपल्या पंखांवर घेतले आणि ती फडफडत मावळभर उडाली ! "राजं गादीवं बसनार! मोट्टं बादश्या हुनार! जंगी दर्बार बशिवनार!" बारा मावळांच्या खोपटाखोपटाला भावड्या प्रेमांचे रोमांच फुटले.


" म्हातारबाईनं लई वनवेस काढलं. आतं पारनं फिटंल तिच्या नदरंचं. ल्योक उपजावा तर अस्सा. न्हायतर आमची बी हाईतच खायाला कार नि.... पाणोठ्या पाणोठ्यांवर घागरी ठणठणू लागल्या.

या राज्याभिषेकात काही उणे राहायला नको म्हणून अनंतभट्ट कावळे पुन्हा नाशिकला गेले. त्यांनी तीर्थाची ब्रह्मसभा भरविली. सभेत दोन विवादाचे मुद्दे उपस्थित झाले. कलियुगात क्षत्रियलोप झाला आहे आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असलेला मुंज हा राजांचा विधी झालेला नाही. मात्र विवाह झाले आहेत ! गागाभट्टांनी शास्त्रपुराणांचे दाखले देऊन प्रायश्चित्ताने संस्कारलोप भरून काढता येतात हे नासिकसभेला पटवून दिले.

आपली वंशावळीची यादी आणण्यासाठी राजांनी बाळाजी चिटणीसांना राजपुतान्यात धाडले. मेवाड, उदेपूर, जयपूर अशी नगरे पालथी घालून बाळाजींनी यादी आणली. राजे सूर्यवंशी 'शिसोदिया' कुलातील रजपूत क्षत्रिय होते. राणा भीमसिंह, सज्जनसिंह, दिलीपसिंह, देवराजजी अशा सूर्यतेजी राजांच्या कुळातले !


सारे आडबंद दूर झाले. गागाभट्टांच्या सूचनांवर राज्याभिषेकाचे तपशील तयार होऊ लागले. ज्येष्ठ म्हणून पट्टराणीचा अभिषेक सोयराबाईंना आणि युवराज म्हणून राजांच्या हक्क जबाबदाऱ्यांच्या वारसापदाचा अभिषेक संभाजीराजांना करण्याचा आदेश आचार्य गागाभट्टांनी दिला.

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९६

 "अदब हा जनान्याचा रिवाज पुरुषांनी सोशिक असले पाहिजे. त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. तुमच्या आऊ गेल्या तेव्हापासूनच हे तुमच्या पाठीशी लागलं आहे. वाढत्या उमरीनं ते वाढणार आहे. शक्य होतं तोवर आमचा हात तुमच्या पाठीशी राहिला. आता आम्ही थकलोत.” दूर लावल्यासारखी जिजाऊंनी नजर महालाच्या तख्तपोशीला लावली. ती तशीच ठेवून त्या म्हणाल्या, “ हाताची पाची बोटं सारखी नसतात म्हणून काही त्यातील एखादे दूर करता येत नाही! असेल त्या वकुबानिशी अवघ्यांना बरोबर घेऊन चालणं पडतं. हे विसरू नका. एवढी थोर जगदंबा पण तिचेसुद्धा भुत्याखेरीज काही चालत नाही! लहान-थोर सारेच आपले आहेत. हेच आम्ही हयातभर आमच्या राजांना सांगत आलो. आज तेच तुम्हांस सांगतो आहो.' “जी.” संभाजीराजांनी ती माया उरात ठेवीत हुंकार भरला.


"जा. बाहेर झड सुमार झालीय काय बघून या.” जिजाऊंनी दाटू लागलेला विषय कसबाने पालटला. संभाजीराजे महालातून निघून सदरेवर आले. पुन्हा महालात जाऊन त्यांनी जिजाऊंना हात देत मंचकावरून खाली येऊ दिले. त्यांना सावरून धरून ते वाड्याच्या सदरी जोत्यावर घाटेजवळ आले. नेमला तासवाला मुजरा करीत पुढे झाला. घाट घणघणू लागली.


थोड्याच वेळात रायगडच्या मावळमाचीवर बार्दाराने धरलेल्या भगव्या जरीपटक्याचा ठिपका दिसू लागला. दूरवरच्या धुकट माचीवर राजे दाखल झाल्याची ती खूण होती. जिजाऊंना थकल्या डोळ्यांनी ती दिसू शकत नव्हती. म्हणून संभाजीराजे म्हणाले, मासाहेब महाराजसाहेब माचीवर आले. 


ते ऐकताच राजांची उभट मुद्रा डोळ्यांसमोर तरळलेल्या जिजाऊंच्या ओठांतून सहजी शब्द सुटले "औक्षवंत व्हा ! 


माचीकडे रोख घरत मुजरा देणाऱ्या संभाजीराजांच्या ते कानी पडले मात्र त्यांना वाटले " जसं आबासाहेबांचं केलं आहे तसं मासाहेबांचं वर्णन केलं तर फक्त समर्थच करतील. इतरांचं ते सामर्थ्यच नव्हे!'


पावसाची नाळ तुटली. रायगडाचा घेर फुलाच्या हिरवाईने बहरून आला. जिजाऊंचा निरोप घेऊन संभाजीराजे गड चढून आले.


दरम्यान दोन घटनांची चक्रे फिरून गेली होती. उमराणीच्या खुल्या मैदानात कैचीत फसलेला विजापूरचा सेनापती अब्दुल करीम बहलोलखान यास जिवे सोडण्याची चूक प्रतापरावांनी केली होती. आणि वाई प्रांतातील पांडवगड मराठ्यांच्या एका फौजफळीने झडप टाकून दस्त करण्याचा प्रयत्न केला होता.


दसरा उरकून राजे सातारा प्रांतात निघून गेले. चारच दिवसांत त्यांनी पांडवगड जिंकल्याची खबर रायगडावर आली. ती ऐकून संभाजीराजांनी रायगडावर साखर वाटली. धाराऊने दिलेल्या हुलग्याच्या माडम्याचा कटोरा ओठांआड रिचवून संभाजीराजे आपल्या महालाबाहेर पडले. बाहेर पहायला यादव नामाजी होता. त्याचा मुजरा आपलासा घेत युवराज त्याला म्हणाले, " यादवराव, आमच्या संगती या.'


त्याच्यासह ते दरबारी चौकात आले. दक्षिणी जोत्यावर मांडलेल्या, पंजा उगारलेल्या, पेंढा भरल्या वाघावर त्यांची नजर गेली. ते जनावर आत्ताच झाडीतून बाहेर पडल्यागत जिवंत दिसत होते. "आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी. " राजांची बोली संभाजीराजांच्या मनात फिरली. कारण नसता तिला समर्थांचे बोल " चिकटले - काया बहुत कष्टवावी! उत्कट कीर्ति उरवावी !


यादव नामाजीसह जगदीश्वरदर्शन करून युवराज कुशावर्ताच्या टाक्याजवळ आले. कुणाचीही नजर जखडून पडावी असे नानारंगी कमळफुलांचे थाळे टाक्यावर उठले होते. गडाच्या मंद वाल्याने ते डुलत होते.


भारल्यासारखे संभाजीराजे कुशावर्ताकडे बघत राहिले. त्यांच्या मनी एका विचाराचे कमळफूल फुलून उठले - “मासाहेबांना फुलांचा खूप सोस. गडावर आणून हे टाके त्यांना एकदा दाखविलं पाहिजे.' "


" यादवराव, आत उतरा. वेगवेगळ्या वाणांचे नाळ खंडून आणा.” युवराजांनी आज्ञा केली. पायताणे उतरवून यादव नामाजी टाक्यात उतरला. निळे, सफेद, लाल असे अर्धवट फुलले कमळनाळ घेऊन बाहेर आला. ते निरखीत युवराज बालेकिल्ल्याकडे परतले. दरबारी चौकातील कारंजी हौद आला. शतधारांनी उसळत्या फवाऱ्याकडे नजर टाकीत संभाजीराजे महालात आले. त्यांना कल्पना नव्हती पण महालात धाराऊ आणि येसूबाई उभ्या होत्या. येसूबाईंनी रामराजांना वर छातीशी घेतले होते. युवराजांना बघताच धाराऊ आपले आपणालाच सांगितल्यागत म्हणाली, “तरकतच न्हात न्हाई. आईच्या पूजेची जुपी लावून द्याची • न्हायलीच की बुवास्नी !" आणि ती महालातून बाहेर पडलीही.


" या." रामराजांना घेण्यासाठी कमळनाळांसह संभाजीराजांनी हात पसरले. येसूबाईंच्या काखेतून त्यांना घेताना संभाजीराजांच्या बोटांचा स्पर्श येसूबाईंच्या अंगदंडाला झाला ! उभ्या अंगावर रसरशीत कमलफुले फुलल्याचा भास त्या स्पशनि येसूबाईंना झाला ! त्यांच्या पापण्या फडफडल्या. कपाळीच्या कुंकूबोटात घामाचे थेंब तरारून आले. मोठ्या धाडसाने त्यांनी समोरच्या टोपाखालच्या पाणीदार डोळ्यांना आपले डोळे भिडविले. आणि क्षणात ते खालच्या फरसबंदीवर टाकले आणि लगबगीने त्या बाहेर जायला निघाल्या.


'थांबा!” कुणीतरी त्यांचे पाय जागीच खिळवून टाकले. संभाजीराजे रामराजांसह पुढे आले. हातीचे कमळनाळ त्यांनी येसूबाईंच्या मुद्रेच्या केतकी कमळाकडे बघत पुढे घरले आणि म्हणाले, “घ्या. एकतर जगदीश्वराला नाहीतर तुम्हालाच हे द्यावेत असे ठरविले होते!'


घडघडत्या छातीने आणि थरथरत्या हाताने येसूबाईंनी ते रंगीबेरंगी फुले असलेले देठ हाती घेतले. ते घेताना पुन्हा झालेल्या बोटांच्या स्पशनि त्यांच्या पापण्यांचे अस्तर आणि पुन्हा कानांची पाळी रसरसून आली. डोळ्यांना डोळे भिडले.


भांबावलेल्या येसूबाई नेसूच्या शेवाने फरसबंदी झाडीत तरातर महालाबाहेर पडल्या! थोड्याच वेळात धाराऊ महालात अली, दोघा बंधूंना एकत्र बघून हसली. युवराजांच्या हातात कमळे नाहीत हे बघून ती म्हणाली, “पूजेची जुपी लागली; पर देवीला कमळाचं दॅट ठिवायचं न्हाऊनच म्येलं. आता कोण बापडीला ते आनून देनार!' आणि रामराजांना घेऊन धाराऊही हसत बाहेर पडली.


बंकापूर लुटून, कारवार तसनस करून, आनंदराव मकाजी यांना पन्हाळा प्रांती ठेवून राजे पुरत्या दोन महिन्यांनंतर रायगडी आले. ते आले नि एक वाईट आणि एक चांगली खबरही त्यांच्या पाठोपाठ गड चढून आली.


दौलतीचे कदीम चाकर मुजुमदार निळो सोनदेव वारले ही खबर वाईट होती. आणि काशीचे गागाभट्ट राजे यांच्या भेटीला येत आहेत ही खबर चांगली होती. राजांचे कुलोपाध्याय - नाशिकचे अनंतभट्ट कावळे यांनी खास माणूस पाठवून काशीच्या वेदशास्त्रसंपन्न विश्वेश्वरभट्ट उर्फ गागाभट्ट यांना क्षेत्री आणवले होते.


आचार्य गागाभट्टांना इतमामाने गडावर आणण्यासाठी राजांनी आण्णाजींना पालखी-सरंजामासह नाशिकला रवाना केले. आणि गागाभट्टांचे दर्शन जिजाऊंना पडावे म्हणून त्यांना पाचाडातून गडावर आणण्याची कामगिरी राजांनी संभाजीराजांना जोडून दिली.


गडचढीचे भोये आणि पडदेबंद मेणे घेऊन आज्ञेप्रमाणे संभाजीराजे पाचाडात उतरले. त्यांनी थकल्या जिजाऊंना हातजोड देत मेण्यात बसते केले. दुसऱ्या मेण्यात पुतळाबाई बसल्या. कबिला रायगडावर आला. पण आजारी काशीबाई मात्र तेवढ्या पाचाडातच राहिल्या. श्रीक्षेत्र काशीच्या धर्मपीठाचे श्रेष्ठ आचार्य रायगडावर येताहेत या जाणिवेने सर्वत्र चैतन्य पसरले. दाक्षिणात्यी मावळी स्वागताची तयारी खुद्द यांच्या देखरेखीखाली सिद्ध झाली. महाडाहून अनंतभट्टांची गडावर वर्दी आली - राजे-संभाजीराजे 'आपल्या निवडक शिष्यगणांसह आचार्य येताहेत.

राजे-संभाजीराजे जिजाऊंची पायधूळ घेऊन गड उतरायला लागले. त्यांच्या पालख्यांमागून मोरोपंत, आण्णाजी, दत्ताजी, येसाजी, निश्चलपुरी, कवी परमानंद, कवी कुलेश, प्रभाकरभट्ट, केशवपंडित अशी निवडीची मंडळी गड उतरू लागली.


पालखीच्या राजगोंड्याबरोबर संभाजीराजांचे मन हिंदोळू लागले - "कसे असतील आचार्य गागाभट्ट ? समर्थांच्यासारखे ? त्यांना तरी आम्ही कुठे पाहिलंय ? काशी मधुरेहून काशीच्या वाटेवर असताना आम्हास परतावं लागलं. काशी राहून गेली! आणि आता बघून तरी काय उपयोग ? तिथल्या विश्वेश्वराचं देऊळ औरंगजेबानं लुटलं. मंदिराच्या चिन्यांनी त्याच जागी म्हणे मशिद उठवली! औरंगजेब भरल्या दरबारी बंदिस्त कठड्याआड बसणारा! आम्हास 'हौदा खेळता काय ?' हे वजिरामार्फत विचारणारा!" पालखीच्या दांड्याच्या कुरकुरीतूनच शब्द बाहेर पडताहेत असा त्यांना भास झाला. " या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्रधर्म उरला कांही। तुम्हाकरिता !"


'महाराष्ट्रधर्म' नकळत एक हुस्कार त्यांच्या नाकपाळ्यांतून सुटला. पाचाडचा जिजाऊंचा वाडा मागे पडत होता. रस्त्याच्या दुहाती शस्त्रधारी मावळ्यांनी शिस्त धरलेली दिसू लागली. पखाले पालख्या बघून दूर हटू लागले.


आगवानीचा डेरा आला. पालख्या ठाण झाल्या. अंथरल्या पायघड्यांवरून राजे संभाजीराजे डे-यात शिरले. आत मांडलेली बैठक राजांनी निरखली. लोड, गिर्धा, बिछायती सारा इतमाम ठीक होता. बैठकीच्या बगलेला एक धारकरी सरपोसाने झाकले सुवर्णतबक खांद्यावर घेऊन उभा होता. मोरोपंत, आण्णाजी, येसाजी, परमानंद, कुलेश साऱ्यांच्या चर्येवरून नजर फिरविताना राजांचे मन राजगडाच्या भुयारात शिरावे तसे खोलवर शिरले.


"केवढा पुण्यवंत योग हा! पाचारण करतो म्हटले तरी मधल्या गनिमांच्या मुलखाने साध्य होणार नाही ते काशी धर्मपीठाचे आचार्य आपल्या पावलांनी येताहेत. ' महाडच्या रोखाने उठलेल्या शंखांच्या कल्लोळत्या निनादाने राजांची साखळी तुटली. प्रभाकरभट्टांनी आत येत वर्दी दिली. "वेदोनारायण श्री आलेड !


राजे-संभाजीराजे जोडीने होत डेऱ्याबाहेर आले. मानेच्या शिरा फुलवीत, आभाळमार्गी तोंड धरून आचार्यांचा शिष्यगण बेहोष शंखनाद उठवीत होता. त्या पवित्र कल्लोळात नौबतडक्याचा मर्दाना घोष मिसळला !


ठाण झाल्या पालखीजवळ लगबगीने जात राजांनी आचार्य गागाभट्टांना हात दिला. भगव्या बासनातून हळुवारपणे धर्मग्रंथ बाहेर घ्यावा तसे त्या भगव्या अस्तराच्या पाळखीतून राजांनी आचार्य श्रींना बाहेर घेतले!.


मथुरेत चुकार झालेली 'काशी' संभाजीराजे निरखू लागले ! मस्तकी लिंबू वाणाचा जरीकिनारी रुमाल, अंगभर लपेटलेली भगवी शाल, तिला घरून उत्तरीमाटाचे डाळिंबकिनारी सफेद धोतर, सतेज पायांत लाकडी खडावा, कपाळी गंधाचे शैव पट्टे, तासाच्या थाळीसारखी गोल तोरंजनी वर्णाची मुद्रा, तेवते शांत डोळे. गागाभट्टांच्या रूपाने हिंदू विद्वत्तेचा सूर्य मावळी स्वागताच्या चांदण्यात न्हात उभा होता ! खेचल्यासारखे संभाजीराजे आचार्यांच्या डाव्या बगलेला झाले.


पायघड्या तुडवीत राजे आणि संभाजीराजे यांच्यामधून गागाभट्ट डेऱ्यात प्रवेशले. मांडल्या बैठकीवर आचार्यांना आदराने बसवून राजांनी सुवर्णी तबकातील पानविड्यासह श्रीफळ त्यांच्या ओंजळीत दिले. मानाचे वस्त्र म्हणून शाल त्यावर ठेवली..


राजे आणि संभाजीराजे यांनी गुडघे टेकून आचार्यांना नमस्कार केला. आचार्य तो स्वीकारण्यासाठी झुकते झाले. हात उभवीत, डोळे मिटून त्यांनी आशीर्वाद दिला, "जयो ऽस्तु !'

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९५

 बाळाजी मनोमन थोडे साशंक होते. हा परदरबारचा वकील. बोलता बोलता युवराजांना आडवाटेला नेईल; मनाजोगे करून घेईल !


महालाबाहेर पडणाऱ्या युवराजांना बाळाजी अदबीने म्हणाले, “युवराज, स्वामी गडावर नाहीत. ही ताम्रांची जात. म्हणून अर्जी. जे बोलणे ते सावधगिरीने व्हावे.' " चिटणीस, आम्ही ऐकून आहोत, साहेब आम्हास बघायला गड चढून आला आहे. त्याला बघू द्या एकदा डोळाभर आम्हास." हसून संभाजीराजे म्हणाले.


बाळाजींच्यासह संभाजीराजे सदरी बैठकीवर आले. पिलाजी, शामजीने अदब मुजरे घातले. थॉमससाहेबाने डुईवरची, पांढऱ्याशुभ्र पिसांचा तुरा असलेली थोराड लाल टोपी उतरली. ती छातीशी घरीत मान व कमर झुकवून संभाजीराजांना टोपीकर अदब दिली. युवराजांनी बैठकीवर बसता बसता साहेबाला निरखीत शामजीला सवाल केला, "काय म्हणते तुमच्या साहेबांची तबियत ?


" जी बरी आहे. मुंबई दरबारची अर्जी ते युवराजांना पेश करू इच्छितात." शामजीने मध्यस्थाचे काम सुरू केले.


गड चढून आलेल्या साहेबाचा चेहरा पिकल्या कोकम फळासारखा लालबुंद झ होता. आपल्या निळसर घाऱ्या डोळ्यांनी तो समोरचे बेडर राजरूप निरखीत होता. ""आज्ञा.” संभाजीराजांनी चौरंगीवरच्या तबकातील गुलाबकळा उचलून हुंगला.. पाठीशी असलेल्या गिर्दीवर कोपर रोवीत ते रेलून बसले.


'आपल्या सरलष्करांच्या फौजांनी हुबळी येथील टोपीकरांची वखार फसगमतीनं लुटली. या दरबारचा आणि टोपीकरांचा कसलाच दावा नाही. करिता या लुटीची नुकसानभरपाई मिळावी अशी टोपीकरांची विनंती अर्जी आहे." शामजीची भाडोत्री जीभ साखरपेरणी करू लागली. युवराज आता काय बोलतात म्हणून बाळाजी, शामजी, पिलाजी सायांनी कान टवकारले.


" शेणवी, आमचे सरलष्कर तर पन्हाळाप्रांतात आहेत असे आम्ही ऐकून आहोत. त्यांनीच हुबळी लुटली हे सांगताना तुमची फसगंमत तर होत नाही ना ?" युवराजांनी शामजीला आडवाटेला नेले. “बोला, दुसरी काही अर्जी ?'


"जी. मराठी मुलखातून मीठ आणि लाकूड मुंबईस नेण्याची दस्तके मिळाली तर दोन्ही दरबारांचा व्यापारी संबंध जुळून येईल." शामजीने दुसरे सोंगटे बाहेर काढले.


" मीठ आणि लाकूड ह्या तर रोजच्या थाळ्याच्या गरजेच्या बाबी ! शेणवी, तुमच्या दोन्ही अर्जी निवाड्यास लावण्यासाठी खुद्द आमच्या महाराजसाहेबांची वाट तुम्ही बघितली पाहिजे. आम्ही तुमचे म्हणणे त्यांच्या कानी घालू. ते देवदर्शनास गेले आहेत. दोन दिवसांत परततील.” संभाजीराजांनी हातीचा कळा तबकात ठेवून बाळाजींना उद्देशून म्हटले, " चिटणीस, साहेबांना निरोपाचे विडे द्या."


"जी" म्हणत बाळाजींनी विड्याचे तबक थॉमससाहेबांपुढे नेले.

बैठकीवरून उठताना संभाजीराजे पिलाजी सुंदर ह्या आपल्या वकिलाकडे बघत म्हणाले, "पिलाजी, तुम्ही जातीनं साहेबांना पाचाडच्या मुक्कामावर पोचते करा! गडावरची हवा त्यांच्या तब्येतीस मानवणार नाही !! "


"जी" पिलाजीने हुंकार भरला. संभाजीराजांनी बाळाजींच्याकडे हसून बघितले. कमरेत झुकून थॉमस देत असलेल्या अदबीकडे पाठ करून, 'जगदंब, जगदंब' पुटपुटत संभाजीराजे निघून गेले.


दोन दिवसांनंतर पाचाडी परतलेल्या राजांना शामजीने परस्पर गाठले. गोऱ्या साहेबाची आणि त्यांची भेटीची वेळही ठावून घेतली. ठरल्या वेळी पाचाडाच्या वाड्याच्या सदरेवर थॉमस निकल्स शामजीसह राजांच्या भेटीला आला.


भेटीचे प्रयोजन सांगण्यासाठी शामजीने तोंड खोलले "दोन दिवसांपूर्वी आम्ही गडावर चढून युवराजांच्या कानी सारे घातले आहे." शामजी राजांचा नूर बघण्यासाठी क्षणभर थांबला. ते ऐकताच मात्र बैठकीवरून उठून राजे शामजीला अत्यंत थंडपणे म्हणाले, " शेणवी, आजचा मुहूर्त आमच्या आणि साहेबांच्या भेटीस योग्य नाही ! आम्ही त्यांची भेट उद्या घेऊ ! "


राजांनी शामजीला मुहूर्ताचे कारण सांगितले, पण ते खरे नव्हते! शामजी आणि थॉमस गडावर युवराजांशी काय बोलले हे राजांना माहीत नव्हते. बोलण्यात गैरमेळ पडू नये यासाठी ते कळणे आवश्यक होते!.


जसे संभाजीराजांच्या भेटीत काहीच पदरी पडले नाही, तसे त्या भेटीतही थॉमससाहेबाच्या हातात काहीही पडले नाही! 'शिव' आणि 'शंभो' यांच्या भेटी घेऊन मिठासाठी आलेला थॉमससाहेब आळणी तोंडाने मुंबईला परतला !


पावसाने रिकीब भरली. धारा उधळीत मावळी आभाळ गर्जू लागले. रायगडाच्या कड्यांवरून लाल पाण्याचे गर्जते धबधबे झेपा टाकू लागले. पाखरे कोठारात अडकून पडली. इरले डुईवर घेऊन हारकारा त्या पाणघाईत पाचाडहून निघून गडावर आला. त्याने खबर आणली, " गारठ्याने मासाबांचं सांदं धरल्यात. दम्यानं लई उचल खाल्लीया.


आबादान केलेल्या मारल्या वाघाच्या चरबीचे बुधले घेऊन संभाजीराजे पाचाडात उतरले. जिजाऊ पडूनच होत्या. वाड्यावरील माणसे त्यांच्या सेवेत दाखल होती. सारी देख चोख ठेवायला पुतळाबाई डोळ्यांत तेल घालून मंचकाजवळ उभ्या होत्या. तरीही युवराजांना बघून जिजाऊंना समाधान वाटले. न कळणारा धीर वाटला.


जिजाऊंसाठी म्हणून पाचाडात वस्तीत असलेले केशवपंडित दुपार टळल्यावर आले. त्यांनी दासबोधांची पोथी लाकडी अडंगीवर ठेवली. अनुग्रहाच्या भेटीत समर्थांनी दिलेला तो शब्द मौक्तिकांचा ग्रंथराज जिजाऊंसाठी राजांनी पाचाडातच ठेवला होता. अंगभर तलम, भगवे उपरणे लपेटलेल्या केशवपंडितांनी नामस्मरण करीत दासबोधाला हात घातला. नुकतीच धूपाची वळी महालभर फिरलो होती. स्वच्छ, संथ वाणीने पंडित बोध वाचू लागले. जिजाऊ, संभाजीराजे, पुतळाबाई ध्यान देऊन ऐकत होते.


मृत्यूची हुकूमत केवढी बेलगाम आहे हे सांगताना समर्थांनी म्हटले होते-


"सरतां संचिताचे शेष नाहीं क्षणाचा अवकाश । भरतां न भरतां निमिष जाणे लागे ॥


मृत्यू न म्हणे हयपती मृत्यू न म्हणे गजपती। मृत्यू न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥


मृत्यूचा अनिरुद्ध दिग्विजय वर्णन करताना बैरागी समर्थांची रामवाणी कोदंडासारखी टणत्कारी झाली होती.


मृत्यू न म्हणे हा झुंजार संग्रामशूर वा क्रूर - न म्हणे हा प्रतापी, उग्ररूपी, बलाढ्य वा धनाढ्य ।


॥ न म्हणे- हा चक्रवर्ती, करामती वा भूपती न म्हणे हा मुद्राधारी, व्यापारी वा ब्राह्मण कर्मनिष्ठ ॥ - न म्हणे हा संपन्न, व्युत्पन्न, धूर्त, बहुश्रुत वा पंडित न जाणे हा वेदश, शास्त्रज्ञ, सर्वज्ञ वा महाभला ॥


केशवपंडितांचे बोल थरथरू लागले. मिटल्या डोळ्यांनी शांतपणे जिजाऊ ते टणत्कार ऐकत होत्या. त्यांचा हात संभाजीराजांच्या हाती होता.


धरल्या आवाजाने केशवपंडित पुढे वाचू लागले-


" गेले बहुत वैभवाचे गेले बहुत आयुष्याचे। गेले अगाध महिमेचे । मृत्युपंथे ॥


गेले बहुतां बळांचे गेले बहुतां काळांचे। गेले बहुत कुळांचे। कुळवंत राजे ॥ ' "


मृत्यूचे विकराल वर्णन करताना घनदाट अरण्यात शिरलेली समर्थांची वाणी. भक्तिमार्गाचा आग्रह धरताना हिरव्यागार पठारावर आली-


बहुतां जन्माचे सेवटी जेणे चुके अटाटी तो हा नरदेह भेटी करी भगवतीं ॥


जो जगदंतरें मिळाला तो जगदंतरचि जाला देह परमार्थी लाविले । तरीच याचे सार्थक जाले नाहीं तरी हे वेथेचि गेले। नाना आघातें मृत्युपंथें ॥ जीव जीवांत घालावा आत्मा आत्म्यांत मिसळावा राह राहो शोध घ्यावा । परांतराचा ॥ आरत्रीं परत्रीं तयाला काय उणे ?

काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी चटक लावुनी सोडावी । कांहीं एक ॥'


स्वतः जगल्या-भोगल्या अनुभवाचे गर्भसार बोधरूपाने सांगताना समर्थच निर्देह झाले होते. त्यांनी पुजल्या-भजल्या श्रीरामाच्या वर्णासारखे निळे आकाशबोल संभाजीराजे आणि जिजाऊंच्या कानी पडू लागले- येथ वर्तावें चोखट । नीतिन्यायें ।


" बहुतां जन्माचे सेवट। नरदेह सांपडे अवचट कीर्ति पाहतां सुख नाहीं । सुख पाहतां कीर्ति नाहीं केल्यावीण कांहींच नाहीं कोठें तरी ॥


उत्कट, भव्य तेंचि घ्यावें। मिळमिळीत अवघेंचि टाकावें निःस्पृहपणे विख्यात व्हावें भूमंडळीं ॥


एवढे काळीजवेधी शब्द उभे करून समर्थ शेवटी त्या शब्दांनाच म्हणत होते-


“सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट । येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन ।।"


" जय जय रघुवीर समर्थ !" केशवपंडितांनी समाप्तीची नांदी उठवली. जिजाऊंचे थकले हात जोडले गेले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांतून पाझरलेले अश्रू कुणालाच दिसले नाहीत.


ऐकलेला जीवनबोध संभाजीराजांच्या मस्तकात भणभणत राहिला-'मृत्यु न म्हणे- चक्रवती, प्रतापी मुद्राधारी-


गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे ॥ काया बहुत कष्टवावी उत्कट कीर्ति उरवावी। जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यांत मिसळावा । उत्कट भव्य तेंचि घ्यावें। मिळमिळीत अवघेंचि टाकावें । बहुतां जन्माचे सेवट । नरदेह सापडे अवचट येथ वर्तावें चोखट नीतिन्यायें ! "


आषाढी एकादशी उलटली. संभाजीराजे पाचाडीच होते. पावसाळी लाल पाणी घेऊन भरलेल्या गांधारी आणि काळ ह्या नद्या रायगडाला घेर टाकून फिरल्या होत्या. नेहमीप्रमाणे संभाजीराजे जिजाऊंच्या धरल्या गुडघ्यांना चरबीचे मालिश हलक्या हातांनी देऊ लागले. जिजाऊ शांतपणे म्हणाल्या, "बरेच दिवस झाले. तुम्हास काही एक बोलावं म्हणतो आम्ही ऐकता ? "जी.


" थोरल्या बाईंचा आणि तुमचा मांमुली निमित्तानं गैरमेळ पडतो असं आमच्या कानी येतंय." जिजाऊ थांबल्या. शेजारच्या समईतील तेवत्या ज्योती त्यांनी उगाच क्षणभर आपल्या थकल्या नजरेने निरखल्या.


त्यांच्या गुडघ्यावरचे हात तसेच खाली नेऊन त्यांच्या पायांना भिडवीत संभाजीराजे घोगया आवाजात म्हणाले, "आपल्या पायांची आणबेल मासाहेब. आम्ही त्यांना खूप मानतो. पुष्कळ अदन ठेवतो.

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९४

 चैत्री पाडव्याचा सण आला. चुना कुंकवाची ओली बोटं फिरलेल्या, आंबवतीनं सजल्या, हिरव्या, रसवंत, तोरणकाठ्या गडाच्या घरट्या घरट्यांसमोर उठल्या. त्यावरचे झळझळीत चंबू तळपू लागले. कोऱ्या खणांचे रंगीबेरंगी शेव आणि सफेद चाफ्यांच्या माळा गडवायावर हिंदोळू लागल्या. कोंडाजी फर्जद, आण्णाजी, मोत्याजी खळेकर आणि गणोजी कावळा यांनी हिकमतीनं दस्त केलेला पन्हाळा डोळ्यांत साठवून घ्यायला राजे आज रायगड सोडणार होते. संगतीला फौजेसुद्धा प्रतापराव दौडणार होते. रायगड युवराज संभाजीराजांच्या अखत्यारीत येणार होता.


सणाची म्हणून गोडाची पाने उठली. दुपारच्या विसाव्याची डावी कूस झाली. उन्हे थोडी कलतीला लागली असताना राजे, संभाजीराजे व प्रतापराव यांच्यासह जगदीश्वराच्या दर्शनाला आले. दर्शन करून सारी मंडळी मंदिराबाहेर पडली. संभाजीराजे समोर दूरवर दिसणाऱ्या लिंगाण्याच्या डोंगररांगेकडे बघतच होते. 

फांदीवर फांदी टक्करल्याने पडलेल्या ठिणगीमुळे असो, वा कुणब्यांनी पेटविलेल्या तरव्यातील किटण उडाल्यामुळे असो, लिंगाण्याच्या घसरंडीवर घडघडलेला वणवा मावळतीच्या किरणांत नजर खेचून घेत होता. जसा उभा लिंगाणा पिवळ्या तांबडसर ज्वाळांचे भंडारामाखले हात आकाशाच्या रोखाने मूकपणे नाचवीत होता.


मंदिराच्या दगडी आवारकठड्याला हात टेकून युवराज तो आगीचा नाच पापणी न मोडता रोखल्या नजरेने घेत राहिले. सडक बोटांचा एक गुलाबी हातपंजा त्यांच्या खांद्यावर चढला तशी त्यांची ती अग्निसमाधी डहुळली. त्यांनी मागे बघितले.


लिंगाण्याच्या घसरंडीला डोळे जोडलेले राजे केवढेतरी गंभीर दिसत होते.


" ही अमनधपक्यानं पेटल्याली रानची आगट लई वंगाळ धनी. कानांत रानवारा भिनल्याली पाखरं येलबाडून होच्यात घालून घेत्यात! हाकनाक पंख होरपळून घेत्यात !” प्रतापराव गुजर हत्यारावरची मूठ चाळवीत समोरच्या ज्वाळा बघत म्हणाले. "दोष पाखरांचा नाही, पेटल्या वणव्याचा नाही, सरलष्कर. दोष त्या क्षणाचा आहे. ज्या क्षणी या वणव्याला कारण होणाऱ्या दोन फांद्या टक्करल्या जातात! आणि कुठल्याही क्षणावर कुणाचीच हुकमत चालत नाही.” राजांच्या ओठांतून सुटलेले बोल ऐकून संभाजीराजे भरून आले.


'धाराऊला संगती घेऊन पाचाडात आलेल्या येसूबाई आठ दिवस जिजाऊंच्या संगती राहून पुन्हा गड चढू लागल्या. शाळूचे दिवस असल्याने झोंबरा वारा, चेहऱ्याभोवती पदराचा लपेटता फेर घेऊन त्या थोपवू बघत होत्या. त्या वाऱ्याला धरून, आईसाहेबांनी सांगितलेले जाणते विचार त्यांच्या मनी फिरू लागले.


वाताने घराच्या सांध्यांना डुकराची करवी चोळणान्या येसूबाईना जिजाऊ एकदा म्हणाल्या होत्या, "ही भोसल्यांची माणसं अशीच आखडल्या सांध्यासारखी आहेत नातसूनबाई! मुक्या मनानं मायेचं तेलवण चोळलं तरच झाली तर थोडी सुमार व्हायची!"


मेणादरवाज्याने बाहेर आलेल्या येसूबाई धाराऊसह खुल्या पठारावर आल्या होत्या. सातमहालाला लागून हे पठार आबाजीपंतांनी मुद्दाम खुले राखले होते. राजांच्या जनान्याला मेणादरवाजा पार करताच मोकळी हवा घेण्यासाठी या पठारावर येता येईल अशी ही सोय होती.


शिकारीसाठी संभाजीराजे पाचाडवाडीलगतच्या रानात खेळ्यांसह उतरले होते. राजे पन्हाळ्यावर होते.


मोकळ्या मनाने भोवतीचा फुललेला चैत्राचा परिसर न्याहाळत येसूबाई धाराऊशी मध्येच काहीतरी तुटक बोलत होत्या. लाल फुलांच्या तुऱ्यांनी पेटलेली पळसाची आणि पिवळ्या फुलांच्या घोसांनी लवलेली बाव्यांची झाडे भोवतीच्या कड्यांवर उठून दिसत होती. वाऱ्याच्या झपत्काराने उडू बघणारा पदर येसूबाईंनी गळ्याजवळ घट्ट लपेटता धरून घेतला. मावळतीला भिडलेले बिंब बघताना त्यांना न कळणारा भास झाला. पळसाच्या फूलतुऱ्यांचा लाल टोप त्या बिंबाने घातला आहे! कोकिळाची उठलेली थरथरती किलकारी धावत थेट त्या टोपाला जाऊन भिडली आहे! म्हणता म्हणता समोरचा ढालीसारखा सूर्य वितळून मावळतीवर पसरतो आहे! त्यांना वाटले, “इथं आमच्या तहबंदात ! छातीवर! समोरचा सूर्य वितळतो आहे! हे असं काय होतं आहे ?


" धारा ऊ” येसूबाईंचे शब्द थरथरले आणि उभ्या येसूबाई पदराचा शेव तोंडात धरीत मटकन खालीच बसल्या! क्षणभर धाराऊ झाल्या प्रकाराने चक्करली. मग तिचे डोळे लखलखले. तिचा गोंदला हात अपार मायेने येसूबाईच्या पाठीवर आला. कुणबी जाणतेपण ओठांतून निसटले, " भिऊ नगासा. चला. ह्यो वारा असा अंगावर घेऊ नगा.” येसूबाई थरथरत होत्या.. धाराऊने त्यांना उठवून घेतले. सावरते धरून त्यांना ती सातमहालाच्या रोखाने चालवू लागली. भवतीची चैत्री दुनिया उंबरठा ओलांडत होती. मावळतीच्या उन्हात न्हात होती !!


आठ धापावल्या धारकऱ्यांनी, संभाजीराजांनी पाडलेल्या वाघाचे धूड रायगडावर चढवून आणले. ते बघायला गडाच्या साच्या कारखान्यांतील माणसे माळावर दाटली. दत्ताजी त्रिमल, बाळाजी आवजी, खुद्द राजे ते धूड बघायला निघाले.


माळावर दाटलेली माणसे दबके कुजबुजत युवराजांच्या धाडसाची भरल्या तोंडांनी तारीफ करीत होतो. मेल्या वाघाच्या वासल्या टाळ्याभोवती माझ्या घोंगावत होत्या. पिवळ्याजर्द रंगाला धरून त्या धिप्पाड जनावराच्या अंगावरचे काळे पट्टे झळझळत होते. शेपटीचा एरव्ही अखंड नाचता पोत थंड पडला होता. माणसे डोळे फाडून ते शांतावलेले 'रानकौतुक' बघत होती. त्यात बाळाजींचे खंडोजी आणि आवजी हे आता वधार झालेले मुलगेही होते. निराजीपंतांचा चिरंजीव प्रल्हाद होता.


राजे आले. माणसांची दाटली गर्दी डहुळली. मुजऱ्यांच्या झडी झडल्या. डाव्या हाती बंदुकीची नळी पेलत युवराज संभाजीराजांनी झुकून राजांना मुजऱ्याची अदब दिली. त्यांची छाती वाघाच्या धुडाकडे बघताना लव्हारी भात्यासारखी फुगून आली.


आडवे जनावर नजरेला पडले मात्र, कुणीतरी धरून खेचल्यासारखा राजांचा हात वर उठला. छातीवरच्या कवड्यांना बोटे भिडली. पापण्या क्षणभर मिटगत झाल्या. राजे काही काही बोलले नाहीत.


"रान कसे उठले, ध्यानीमनी नसता हे जनावर डरकाळ्या देत कसे सामोरे आले, खेळ्यांची बाजारबुणगाई कशी झाली, घोड्यावर असता आपण वार कसा टाकला, " हे संभाजीराजे अभिमानाने सांगत होते.

ते ऐकून राजे एवढेच म्हणाले, "टाकोटाक आमच्या भेटीस महाली रुजू व्हा ! " राजांच्या पाठीवरची जरीकोयरी तळपली. आले तसे राजे निघून गेले.


संभाजीराजे पालखी दरवाज्याने वाड्याकडे निघाले. ते बालेकिल्ल्याच्या चौकात आले. सातमहालात पुतळाबाईंच्या महालासमोरच्या सफेलीत केस उदबलेल्या येसूबाई धाराऊसमोर बसल्या होत्या. धाराऊ बोटांच्या फाळांनी त्यांच्या दाटल्या केसांच्या बटा फोडीत होती. खांद्याला बंदूक टांगलेली स्वारी बघताच येसूबाई उठल्या आणि सरळ आत गेल्या. काय झाले ते धाराऊला कळलेच नाही.


" सूनबाई, क्यासात वल तशीच न्हायली नी” म्हणत धाराऊही त्यांच्या मागून आत गेली. मुद्रेवर काय उतरलेय ते येसूबाईंनी एकदा डोळाभर बघावे म्हणून धाराऊने हातमुठीचा दर्पण त्यांच्यासमोर धरला. पण पण येसूबाईंना त्या दर्पणाला नजर देण्याचे - धाडस होईना..


पेहराव केलेले संभाजीराजे आज्ञेप्रमाणे राजांच्या महाली रुजू झाले होते. पाठीशी हात बांधलेले राजे झरोक्यातून बाहेर बघत विचारगत उभे होते. त्यांची बांधली बोटे चाळवली. गपकन एकमेकांत रुपली. "युवराज, शिकार ही शूराची खेळी आहे. कधी मनी आले तर आम्हीही रान उठवितो.” राजांचा आवाज बांधलेला झाला.


"पण पण आपण अगोदर भोसले आहोत. मग शिकारी! तुम्ही केली तीच गफलत आम्हीही एकदा करून बसलो होतो. वाघ पाडण्याची! मासाहेबांनी आमचे डोळे उघडले. आपण जगदंबेचे भुत्ये आहोत. वाघ जगदंबेच्या बैठकीचे जनावर आहे याची भूल इतः पर कधी पडू देऊ नका !! '


“जी. हे हे आमच्या ध्यानी आलं नाही." शरमिंद्या युवराजांनी गर्दन पाडली. " तेच. आता येऊ द्या.” राजांनी त्यांना सरकू दिले नाही.


“जी.”


तो हलका हुंकार राजांना जाणवला. ते वळत सामोरे झाले. जवळ घेत त्यांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे आपल्या तळहातांच्या पकडीत गच्च धरले. " गर्दन वर घ्या.” राजांच्या रूपाने जसा उभा रायगडच बोलत होता!


युवराजांची गर्दन वर आली. स्फटिकसाफ डोळे राजांच्या निमुळत्या, गंधर्वी डोळ्यांना भिडले. त्या डोळ्यांतील रानमेरी निधडेपण राजांना जाणवले. आवडले. ते म्हणाले, आम्हास तुमचं बळ पाहिजे- वाघ पाडणारं नव्हे- वाघ होऊन चालणारं !! 


राजांच्याकडे बघताना संभाजीराजांना भास झाला- 'आम्ही पाडलेलं जनावर उठून " " बसलं आहे! त्यांच्या पाठीवर मांड घेऊनच आबासाहेब हे बोलताहेत! ' " या." राजांनी त्यांचे खांदे थोपटले.

झुकून मुजरा देत हटल्या मागच्या पावलांनी युवराज जायला निघाले. त्यांची अदव निरखीत राजे हसत म्हणाले, "गडाच्या बैतेदार चांभाराकरवी त्या जनावराचा पेंढा भरून घ्या. दरबारी चौकात भक्कम चौथऱ्यावर तो पेंढा बसता करा. तुमच्या धाडशी शिकारीची खूण म्हणून तसेच तुम्ही केलेल्या गफलतीची खूण म्हणून !! ' 'जी.'


" आबासाहेब काय आहेत ते कळणं अवघड आहे." महालाबाहेर पडताना संभाजीराजांच्या मनात या विचारांचा पेंढा पक्का भरून टाकला गेला !


" आम्ही देवदर्शनास निघतो आहोत. दोन दिवसांनी परतू.” असे संभाजीराजांना सांगून राजे महालाकडे कूच झाले.


दुसऱ्याच दिवशी इंग्रजांचा मुंबई दरबारातील मराठ्यांचा वकील पिलाजी सुंदर गडावर आला. त्याने वर्दी आणली होती की, “ ताम्रांच्या वतीने वकील म्हणून थॉमस नावाचा साहेब राजियांसी वाटाघाटी करण्यास आला आहे. राजे नाहीत तरी युवराजांची भेटी घेण्याची तो आज्ञा मागत आहे.


"साहेबास गडावर पेश येऊ द्या.” संभाजीराजांनी पिलाजींग इजाजत दिली. इंग्रजांच्या दरवारातील थॉमस निकल्स हा गोरा साहेब मुंबईहून निघून नागोठणे, पाली, सारसगड ह्या मार्गे पाचाडात पोचला होता. त्याच्याबरोबर सदतीस लोक आणि शामजी शेणवी नावाचा दुर्भाष्या होता.


आपल्या दरबारच्या दोन कामगिऱ्या पार पाडण्यासाठी थॉमससाहेब आला होता. नुकतीच प्रतापरावांच्या घोडघाडीने हुबळी येथील इंग्रजांची वखार खणत्या लावून लुटली गेली होती. तिची तसेच पूर्वीच्या लुटलेल्या राजापूरच्या वखारीची नुकसानभरपाई मराठ्यांकडून वसूल करणे, आणि मीठ वे लाकूड या वस्तू मराठी मुलखातून मुंबईला नेण्याचे परवाने मिळविणे अशी ती व्यापारी हेताची कामे होती.


पिलाजीने गड उतरून युवराजांचा तिरोप साहेबांच्या कानी घातला. रायगड आणि युवराज बघण्यासाठी उत्सुकलेला थॉमस बूट-पाटलूण चढवून तयारीला लागला. पण एकाएकी मातीचे गरगरते खांब उठविणाऱ्या वावटळींनी पाचाडला घेर टाकला आणि हां हां म्हणता वळीव पावसाची घनचक्कर रायगड- पाचाडावर कडकडत कोसळू लागली. साहेब पायथ्याला अडकून पडला.


दुसन्या दिवशी शामजी, पिलाजीसह थॉमससाहेब धापा टाकीत रायगड चढून आला. चिटणीस बाळाजींना त्याने वर्दी दिली. बाळाजींनी सामोरे येत साहेबाला राजांच्या वाड्याच्या सदरी बैठकीसमोर आणले. "युवराज, ताम्रांचा हेजिन सदरी दाखल झाला आहे." बाळाजींनी संभाजीराजांच्या महालात येऊन मुजरा देत युवराजांना वर्दी दिली.