कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १००

 गाळ काढल्याने नितळ दिसणाऱ्या बारा टाक्यांतील पाणी निरखत संभाजीराजे उभे होते. त्यांच्या मनी समर्थांची मूर्ती आणि त्यांचे श्लोक फिरत होते.


एकाएकी बगलेच्या घाणेरीच्या झुडपाजवळून वाळल्या पानांची सरसर उठली. ठिपक्याठिपक्यांचा एक चपळ भुजंग वळवळत बाणागत सुसाटत होता. मध्येच ते ठिपकेदार चैतन्य थांबले. हातभर वर उठलेल्या त्या जनावराने पंजासारखी झळझळीत ठिपकेदार फणा फुलविली. जिभेच्या पालव्या चटाचट आतबाहेर घोळवल्या. संभाजीराजांच्या पाठीशी असलेल्या रायाजीने हातचा भाला आडवा करून त्याच्यावर रोखला. तो झटकन कडेधारी हाताने खाली दबवून टाकीत अंतोजी म्हणाला, "शंबु म्हादेवाचा अलंकार हाथ त्यो. जाऊ देत आपल्या वाटेनं."


रायाजी आठ्या घालीत थांबला. जनावर पुन्हा वळवळत झाडोऱ्याआड झाले. संभाजीराजे रायाजीला काही म्हणणार होते तेवढ्यात कवी कुलेशांच्यासह आलेल्या महादेव यमाजींनी मुज़याबरोबर वर्दी दिली- “जगदीश्वराच्या मंदिरओवरीत उत्तरेकडचा कुणी कवी उतरला आहे. युवराजांनी त्याची भेटी पाडावी असा स्वामींचा सांगावा आहे.'


" जशी आज्ञा. चला." कवी कोण असावा असा स्वतःलाच प्रश्न करीत युवराजांनी बारा टाके सोडले. कुलेश आणि महादेव यमाजी यांच्यासह ते जगदीश्वराच्या चौक आवाराजवळ आले. झाडाच्या बुंध्याला ठाण केलेल्या पांढऱ्या शुभ्र घोडीला खरारा करीत एक माणूस काही गुणगुणत होता.


संभाजीराजे मंदिराच्या प्रथम चौकात आले. पायगतीला असलेल्या दगडी कासवाला बगल देऊन त्यांनी घंटेचा टोल दिला. तसेच चालत जाऊन मंदिरगाभाऱ्यातील बेलकमळांनी आच्छादिलेल्या, जलधारा अंगी घेणाऱ्या शिवपिंडीसमोर गुडघे टेकून पिंडीला मस्तक टेकविले. पुजाऱ्याने दिलेले तीर्थ पापण्यांना भिडवून ओठांआड केले.


बाहेर चौकाभोवती फिरलेल्या ओवरी-ओवरीत शिरून कुलेश आणि महादेवपंत - त्या कवीचा तलाश पाडू बघत होते. दक्षिणा आणि दानाच्या ओढीने आलेल्या उदासी, बैरागी, गोसाव्यांनी साऱ्या ओवन्या भरून गेल्या होत्या. त्यातच वेष पालटून राजांच्या जासूद खात्याचे खबरगीरही मिसळले होते। त्यांनी महादेवपंतांना ओळखले. जवळ येत त्यांनी पंतांना दखल दिली.


एका खबरगिराने चौकाबाहेर येत महादेवपंतांना दबक्या आवाजात सांगितले, "ह्योच त्यो शाहीर. निक्तंच धनी होचं पवाडं आतल्या चौकात ऐकून म्येलं. लई खूष जालं. पर ह्या वागानं काय वळाकलं न्हाई त्येस्नी! म्यॅबी ऐकलं पर होची बोली काय साधली न्हाई मला!" त्या गोसावी कफनी घातलेल्या खबऱ्याचे बोट घोडीला खरारा देणाऱ्या त्या ठेंगण्या माणसावर रोखले होते.


"प्रणाम कविराज.” पुढे होत कवी कुलेशांनी त्या माणसाचा खरारा थांबविला. "जै जयंती. प्रणाम." खरारावाला वर उठून हिंदोस्थानी भाषा कानी पडल्याच्या आश्चर्याने कुलेशांच्याकडे बघत म्हणाला.


त्याचा रंग पिकल्या आंब्यावर पडला होता. कपाळी कनोजी पगडी, अंगी उत्तरी सफेद बंदी निमा. लाल करवतकाठी धोती, कपाळी आडवे शैवगंध आणि तेजफेकी,

अभिमानी डोळे असे त्याचे रूप होते.


हाताला बांधलेला बुरणुसी खराऱ्याचा वाद उकलीत त्याने विचारले "क्षमा व्है!

आपका परिचय ?

'हम कवी कुलेश. प्रयागनिवासी। आप ? "

हो. त्रिविक्रमपूरके त्रिपाठी! भूषण त्रिपाठी!'

" चंडी 5 चंडी 5 प्रणाम कविराज भूषण ! हमने आपकी कीरत सुनी है। आज दर्शन हुए। " कुलेशांनी समोरचे कनोजी काव्यतेज पारखीत पुन्हा नमस्कार केला. झाडाच्या रोखाने येत्या संभाजीराजांना बघून कुलेश भूषणना समज मिळावी म्हणून "


पुटपुटले, “युवराज संभाजीराजे ! ' भूषण झुकून कनोजी नमस्कार देत, समोरून चालत येणारे क्षात्रतेज उतावळ्या डोळ्यांत भरून घेताना पुटपुटला- “जे जयंती ! सर्जा सिवाजी के सुपूत. '


" कविराज, आमच्या आबासाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही तुमच्या भेटीस आलो. कोण देश तुमचा? नाव कोण ?” संभाजीराजांना भूषण आणि कुलेश यांच्या पगडीत सारखेपण दिसले.


भूषणने युवराजांना आपला परिचय देऊन विनंती केली, “युवराज, दूर देसनसे आवत्. हमको राजा सिवाजीके दरसन की क्रिपा होवे !."


'जरूर. कवींनी करावे असेच त्यांचे दर्शन आहे. पण कवींनी प्रथम इथला मुक्काम हलवावा. आमच्या महाली चलावं." हसून युवराज म्हणाले.


“हाँजी." भूषणने त्यांचा आदर राखला.. रायाजीने भूषणच्या घोडीचे ठाण मोकळे करून ती आपल्या ताब्यात घेतली. अंतोजीसह आत जाऊन भूषण आपली पडशी पथारी घेऊन बाहेर आला.


भूषण आणि कुलेश या दोन उत्तरी कवींच्यामधून संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या रोखाने चालू लागले. मागून भूषणच्या 'केसर' घोडीचे कायदे-ओठाळी धरत रायाजी, अंतोजी चालू लागले. व्यापारपेठ आली तसे संभाजीराजांना मुजरे झडू लागले. कवी भूषण रायगडाचे राजवैभव डोळ्यांत जमवीत चालला होता.


नगारखान्याच्या दरवाज्याने सारे आत आले. एवढ्या उंचीवर फव्वारती कारंजी बघताना भूषण अचंब्याने क्षणभर रेंगाळला. सजावट ल्यालेल्या दरबारी चौकभर त्याची नजर फिरली.


आपल्या महाली प्रवेशताना संभाजीराजांनी आदराने भूषणचा हात आपल्या हाती घेतला आणि यादव नामाजी ह्या खिदमतगाराला काही आज्ञा खुणावली. मध्यभागीच्या बैठकीवर त्यांनी भूषणला आपल्या शेजारी बसवून घेतले. कुलेश महादेवपंत भिंतीजवळ अदब धरून उभे राहिले. रायाजी अंतोजीने भूषणची पडशी पथारी आतील दालनात नेली.


यादव चांदीच्या तबकात मांडलेले केशरी दुधाचे चंदेरी प्याले घेऊन पेश आला. त्यांतील एक प्याला उचलून भूषणच्या समोर धरून संभाजीराजे म्हणाले, " घ्या.' हाँजी " आतिथ्याने भरून आलेला कवी भूषण म्हणाला.

"आम्हास काव्याचा छंद आहे. कर्वी भेटले की बाणगंगेत स्नान झाल्यासारखे वाटते आम्हाला! " दुधाचा घोट घेऊन संभाजीराजे म्हणाले.


"हाँजी" भूषण मनोमन एका बाबीचा ताळा बांधीत होता- “ये सिवाजीके सपूत "हैं . तो साक्षात सिवाजी कैसे होंगे ?' "कविराज, तुमची बोली कोणची ?"


"जी. व्रज बोली है हमारी. आम्या हो तो इसकी कुछ खुमार पेश करेंगे." “जरूर. जरूर. आमचे कान धन्य होतील." युवराज हसून म्हणाले.


काहीतरी पाहिजे असल्यासारखी भूषणची नजर महालभर भिरभिरली. दालनात जाणाऱ्या दरवाज्यावर खिळली:


" काय झाले कविराज ? काय शोधता ?'


क्षणभर कवी घोटाळला. मग हलक्या आवाजात म्हणाला - " हमारी दिमडी ! अंदर गयी!"


संभाजीराजांनी ते ऐकून रायाजीला नजर दिली. रायाजी आतल्या दालनात गेला. भूषणची पडशी घेऊन पुन्हा पेश आला. बैठकीवरून उतरून भूषणने पडशीतील दिमडी, शेला घेतला.


बैठकमहालाच्या मध्यभागी येत त्याने शेल्याने कमर कसली. संभाजीराजांना दरबारी थाटाचा मुजरा दिला. डोळे मिटून दिमडीवर दोन तीन लयदार थापा दिल्या. अंगी वीज उतरल्यासारखा भूषणचा आवाज पलटी घेऊन शाहिरी झाला.


"सर्जा सेवाजी के सपूत युवराज संभूराजे सुनिये सर्जाकी कीरत !" भूषणने - दिमडीच्या फडफडीने बैठकमहाल थरकवून सोडला. डोळे मिटून त्याने जयंती - जगदंबेचे मंगलस्तवन धरले-


"जै जयंती, जे आदि सकति, जै कालि कपर्दिनि जै मधु कैटभ छलनी, देवि जै महिष बिमर्दिनी'


कविभूषण स्तवनाच्या तालाबरोबर जयंतीच्या दरबारात पोचला! त्याचे वीज पिऊन आलेले कडकडीत व्रजबोल तोफांची भांडी फुटावीत तसे फुटू लागले- 


" इंद्र जिमि जंभपर, वाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर- रघुकुल राज है।


पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यो सहस्रबाह पर, राम द्विजराज है। दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंडपर, भूषन बितुंड पर, जैसे मृगराज है।


तेज तम अंस पर, कन्ह जिमि कंस पर, 

त्यों मलिच्छ बंस पर, 

सर्जा सिवराज है !

सर्जा सिवराज है !


"व्वाऽ! कविराज! धन्य धन्य आहे तुमची! आम्हास समर्थांची आठवण दिलीत!" हात उठवून भूषणला मोकळी दाद देताना संभाजीराजांच्या मनात समर्थांचे श्लोक फिरले-


“निश्चयाचा महामेरू। बहुत जनांस आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी ।।'


बराच वेळ दिमडीच्या तालबद्ध थडथडीवर कवी भूषणाने आपल्या शेलक्या बांधण्या संभाजीराजांना ऐकविल्या. त्यांच्या नाचत्या पोतासारख्या शब्दरचना ऐकून मोहरून उठलेल्या संभाजीराजांनी बैठक सोडली. भूषणजवळ जात आपल्या गळ्यातील मोतीकंठा त्याच्या गळ्यात चढवीत ते म्हणाले, "कविराज, तुमचा एक एक बोल ओंजळीनं मोती उधळावेत असा आहे. आम्ही खूषनिहाल झालो. नागफण्यासारखी आहे तुमची रचना!'


." मुतालिक, कवींचा इतमाम राखा. " संभाजीराजांनी महादेवांना समज दिली. कुलेश आणि महादेवपंत भूषणना घेऊन गेले. संभाजीराजांच्या मनात भूषणचा एक शब्द निवळीसारखा फिरत राहिला- "सर्जा सर्जा ! '


'चला." पूजेचा पेहराव घेऊन सिद्ध झालेल्या संभाजीराजांना राजे म्हणाले. शेजारी उभ्या असलेल्या रामराजांच्या खांद्यावर युवराजांनी हात ठेवला. परातीत शिजला भात • घेऊन प्रभाकरभट्ट आणि अनंतभट्ट यांनी तो उभ्या रायगडाच्या घेराभवत्याने शिवरून 'अशुचशांतीचा' विधी पार पाडला होता.


राज्याभिषेकाच्या प्राथमिक विधीला आज सुरुवात होणार होती. मुंगीराशीने माणूस गडावर दाटले होते. फलटण, तळबीड, शृंगारपूर, चौक, सिंदखेड, भुईंज, पाली, राजांचे चौबाजूचे रक्तसंबंधी गोतावळे गड चढून आले होते..


बांदल, जेधे, शिर्के, मालुसरे पासलकर, शिलींबकर, कंक, जाधव, दहातोंडे, सरदार भोसले सारे शिबंदी सरंजामानिशी गडावर दाखल झाले होते. टोपीकरांच्या मुंबई दरबारचा वकील हेन्री ऑक्झिडनही गड चढून आला होता.


जागा मिळेल तिथे डेरे, राहुट्या, शामियाने, चांदण्या तणावांच्या आधाराने उठल्या होत्या. तोरणे बांधलेला नगारखाना, महादरवाजा, वालेकिल्ला आंबवतीच्या आरासींनी मला होता. ठिकठिकाणी झाडांच्या घेरांखाली जांभळीचे ठाळे टाकलेले मुदपाकी मंडप "उठले होते. त्यात रचलेल्या चुलवणांवर चढलेल्या हंड्यांखालून धुराचे लोळ उसळून वर झेपावत होते. त्यांच्या घाईगर्दीतून, नगारखान्यावरून उठलेला चौघडा नौबतीचा डंका मुष्किलीने वाट काढत गडभर पसरला होता. त्याचा माग घेत सनयांचे चपळ सूर सारीकडे पसरले होते. नगारखान्याच्या निशाणकाठीवर नेहमीपेक्षा केवढातरी मोठा दिसणारा भगवा वरच्या निळ्याशार मावळी आभाळाचा डफ करून त्यावर फडफडती थाप देत होता! गडावरच्या मंदिरामंदिरांवरची छोटेखानी, तिकोनी भगवी निशाणे माना डोलावून त्याची झील धरून होती !


हुजुराती पागेतील घोड्यांच्या आघाडीच्या उजव्या पायांत चांदीचे तोडे भरून त्यांच्या पाठीवर नक्षीदार लोंबत्या झुली चढविल्या होत्या. उठती धूळ शांत व्हावी म्हणून पखालीवाले रस्त्यारस्त्यांवर पखालीतून पाण्याचा शिडकारा करीत होते.


गंगा, सिंधू, जमुना आदी सप्तनद्यांचे तसेच पूर्व, पश्चिम आणि दक्षिण सागरांचे पवित्र अभिषेक जल आबदारखान्यातील चौरंगावर आणि सुवर्णाच्या, मृत्तिकांच्या कलशांत भरून ठेवले होते. रामराजे, युवराज संभाजीराजे आणि गागाभट्ट यांच्यासह पूजेची वस्त्रे ल्यालेले राजे आपल्या महालातून बाहेर पडले. त्यांच्या पाठीशी अष्टप्रधान, येसाजी कंक, आनंदराव, फिरंगोजी, पिलाजी शिर्के. रूपाजी, सर्जेराव असे आघाडीचे सरदार चालू लागले. कवी भूषण, कुलेश, परमानंद, निश्चलपुरी चालू लागले. गोमाजी, खंडोजी, रायाजी अंतोजी यांचे मावळी इमान चालू लागले. 'श्रींच्या कल्याणकारी राज्याचे भाग्य चालू लागले !


जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन सारे रामजी दत्तोच्या रत्नशाळेतील ओतकामाच्या कारखान्यात आले. सुवासिनी आणि कुणबी दासी पाठीशी घेत सोयराबाई आल्या. कारखान्याच्या चौकात भगवा सरपोस घालून झाकलेले सिंहासन होते. त्याच्या दक्षिण बाजूला सोन्याची घडीव गणेशमूर्ती होती. आज त्यांच्या पूजनाचा व स्थापनेचा विधी होता. त्याबरोबरच समर्थांनी दिलेल्या कोदंडाचे पूजन होते.


पुढे होत रामजीने हलक्या हाताने सरपोस हटविला. असंख्य मावळ्यांचे सांडले रक्तच जणू सोन्याचे झळकते रूप लेवून अंगी पडणारी किरणे परतविताना म्हणत होते, " आम्ही कुनाला अंगझटी घेतले नाही ! त्यो मान फक्त धन्याचा हाय !! "


" जगदंब ! जगदंब !" सिंहासनाच्या नुसत्या दर्शनानेच राजांचा हात छातीशी गेला. सिंहासनाच्या वाघमुखी हातबैठकी बघताना संभाजीराजांना राजांचे बोल आठवले - "आपण प्रथम भोसले आहोत, मग शिकारी! वाघ हे जगदंबेच्या बैठकीचं जनावर आहे.'


राजे-सोयराबाई, संभाजीराजे चंदनी पाटावर बसले. गागाभट्टांनी अथर्वशीर्षातील गणेशस्तोत्राचा उद्घोष केला, "ॐ गं गणपतये नमः ! त्वमेव कर्ता, त्वमेव...' गणेश आणि सिंहासन पूजन झाले. मानाचे बकरे पडले. कोदंडाची पूजा झाली. सुवर्णफुलांची उधळण झाली.


"आईए. सिंहासनको हस्तस्पर्श दीजिए." गागाभट्टांनी राजमंडळाला विनंती केली. राजे-सोयराबाई पुढे झाले. रामराजे ते सारे बघत बगलेला उभे होते. " या बैठकीस हात देऊया.” संभाजीराजांनी मायेने रामराजांचा हात आपल्या हाती घेत त्यांना सिंहासनाजवळ घेतले.