कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९९

 'जय जय रघुवीर समर्थ" या खड्या बोलामागोमाग समर्थ नजरेला पडताच

राजे बोलून गेले - "शंभूऽ खुद्द समर्थच येताहेत! आघाडीचे. उतार व्हा.' राजांनी रिकीब सोडली. मोजड्या उतरल्या. चटक्या पावलांनी तरातर पुढे होत त्यांनी समर्थांच्या पायांवर आपले मस्तक ठेवले. राजांच्या टोपावर आपल्या तळहाताचे छत्र " धरीत समर्थांनी आशीर्वाद दिला. "रामरूप व्हा!'


राजे बगलेला झाले. पुढे होत संभाजीराजांनी आपले मस्तक समर्थांच्या चरणांवर ठेवले. कमळपाकळीसारख्या त्या चरणांचा स्पर्श संभाजीराजांना जाणवला. विचारांचे भुंगे घुमून उठले. " बहुता जन्मांचा शेवट ! नरदेह सांपडे अवचट !' " रघुदास व्हा! " जपमाळ अंगठ्याखाली तोलत समर्थांनी तळहात संभाजीराजांच्या टोपावर ठेवला.


'उठून संभाजीराजांनी समर्थांच्या शांत, तेजवान मुद्रेवर नजर जोडली. पाऊसधारांत निथळलेला नि श्रावणी उन्हात उजळलेला रायगडाचा कातळकडा दिसावा तशी ती मुद्रा होती ! निर्धारी, नितळ, शांत, काहीही साठवून घ्यायला राजी नसलेली, चारी पुरुषार्थ जिंकलेली, संन्यासी ! गोसावी !


बघणाऱ्याला सर्वांगावर कमंडलूतील पाण्याचा शिडकावा होतो आहे असे वाटावे अशी रामरंगी नजर समर्थांनी संभाजीराजांच्यावर जोडली. कपाळीचे भस्मपट्टे किंचित वर घेत ते म्हणाले - " तुम्ही युवराज.... संभाजीराजे. अं!' 'जी.” संभाजीराजांच्या कानातील सोनचौकडा मंद डुलला.


रघुकृपा." डोळे मिटते घेत समर्थ पुटपुटले.


'स्वामींनी पुढं येण्याची तसदी घेतली.” राजे प्रेमभावाने म्हणाले. 'अवधा मुलूख पाठीशी घेऊन जाणाऱ्यांना पुढं होऊनच पावतं घ्यायला पाहिजे


राजे! चला." समर्थांनी घळीच्या रोखाने हात उभारला.


दुतर्फा जगदंबेचे भुत्ये घेऊन तो गिरिकुहरात राहणारा रामभक्त चालू लागला. शंखांचे नाद उठले. त्यात राजांच्या सरंजामातील शिंगाड्याने काढलेली शिंगांची थरथरती ललकारी मिसळली. घळीतील दगडी गुहेत राजांचे बोल घुमले.

"स्वामींना रायगडी पाचारण करण्यासाठी आम्ही आलो आहोत. " चौथरावजा एका दगडी बैठकीवरच्या व्याघ्रांबरावर समर्थ बसले होते. शेजारी कमंडलू, थोपा आणि भगव्या बासनात बांधलेली ग्रंथसंपत्ती होती. पाठीशी पुरुषभर उंचीची उड्डाणी पवित्र्यातील शेंदूरमंडित हनुमंत मूर्ती होती. तिच्याजवळ एक बळकट धनुष्य होते. त्याच्या पायथ्याशी भरल्या बाणांचा भाता होता.


समर्थांच्या समोर अंथरलेल्या घोंगडीवर राजे-संभाजीराजे पलख मांड्याची बैठक घेऊन बसले होते. मठाच्या धुनीतील धुराची मंद वळी गुहेत शिरून फिरत होती. डोळे मिटून थोडा वेळ समर्थ हातची जपमाळ ओढीत राहिले. मग गुहेवरची घोंड हटावी तशा त्यांच्या पापण्या उघडल्या. ओठांतून आशय पाझरू लागला.


" तुमच्या राज्याभिषेकाची सुवार्ता कानी आली आहे राजे. त्यासाठीच क्षणापूर्वी डोळे मिटून आम्ही अयोध्येत जाऊन आलो ! आम्हाला पाचारण करण्यासाठी तुम्ही येथवर आलात. आम्ही धन्य झालो. सिवबाराजे, आम्ही केव्हाचेच तुमच्यावर छत्र धरले आहे- आमच्या तपः सामर्थ्याचे! डोंगरदरीत राहणारे आम्ही गोसावी. आम्हाला लौकिकाचे बंध नाहीत. जनलज्जेसाठी लंगोटी आणि उदरपूजेसाठी झोळी आम्ही धारण केली आहे. नाहीतर तो भारच आहे! आम्हाला लौकिकात गुंतवू नका.


"तुम्हाला आम्ही साक्षात प्रभू रामचंद्रांचा अवतार मानतो. आम्ही सांगतो तो राजयोग समचित्त होऊन ध्यानी ठेवा. मनी किंतू न धरता सविध राज्याभिषेक करून घ्या. झाले नाही एवढे थोर कार्य तुम्हास करणे आहे." डोळे मिटत समर्थ पुन्हा मनापलीकडच्या प्रकाशगुहेत शिरले.


'जी." घोंगडी थरथरली.


समर्थांच्या दाट दाढीमिश्यांनी मखर धरलेल्या ओठांतून शब्दाचा एक एक सूर्य टंकारत फुटू लागला. पिता-पुत्र कानांचे कमंडलू करून ते रामतीर्थ आपलेसे करू लागले. गुहा मंदिर गाभारा झाली. रामबाण शब्दांनी भरू लागली.


'जयास वाटे जिवाचे भय । त्याने क्षात्रधर्म करूं नये । कांहीतरी करून उपाय पोट भरावे ॥ नजर करार राखणे कार्य पाहून खत्तल करणे।


तेणे रणशुरांची अंत:करणें । चकित होतीं। देखोनी व्याघ्राचा चपेटा मेंढरे पळती नानावाटा । मस्त तो रेडा मोठा काय करावा ?


उदंड मुंडे असावीं । सर्व ही एकत्र न करावीं ।

वेगळाली कामे द्यावीं । सावधपणे ॥ मोहरा पेटला अभिमाना। मग तो जीवास पाहेना। मोहरे मिळवून नाना। मग चपेटे मारी ॥


अमर्याद फितवेखोर त्यांचा करावा संहार। शोधिला पाहिजे विचार । यथायोग्य ॥ मर्दे तकवा सोडूं नये । तेणे प्राप्त होतो जय । कार्य, प्रसंग, समय ओळखावा ॥


दोन्ही दळें एकवटें। मिसळताती लखलखाटें | युद्ध करावें खणखणाटें। सीमा सोडूनिया ॥ देवमात्र उच्छादिला । जित्यापरीस मृत्यु भला ।


आपला स्वधर्म बुडविला असे समजावें।। महाराष्ट्र देश थोडका उरला राजकारणें लोक शोधिला । अवकाश नाहीं जेवायाला उदंड कामें ॥


लोक पारखून सोडावें । राजकारणे अभिमान झाडावें । पुन्हा मेळवून घ्यावे । दुरील दोरे ॥ देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा । मुलुख बडवा की बडवावा। धर्मसंस्थापनेसाठी ॥


जय जय रघुवीर समर्थ ! "


रामनांदी उठवून समर्थांनी डोळे उघडले. बैठकीवरून उठून ते पाठीच्या हनुमंत- मूर्तीजवळ गेले. खांद्याएवढ्या उंचीचे धनुष्य प्रत्यक्ष त्यांच्या हातसरावाचे होते. समर्थांचे बोल मनावर कोरून घेतलेले राजे युवराज घोंगडीवर खडे झाले होते.


राजांच्यासमोर उभे होत समर्थ बैरागी आवाजात म्हणाले, “आशीर्वाद आम्ही तुम्हाला दिलेलाच आहे. हा आमचा कोदंड घ्या राजे! तुमच्या अभिषेकाला आमची ही गोसावी भेट! आमच्याकडे देता येण्याजोगे एवढेच आहे. आणि या प्रसंगी ते योग्य आहे. घ्या. विजयवंत व्हा! " हातांतील कोदंड समर्थांनी पुढे केला. राजांच्या पापणीकडा दाटून आल्या.


झुकते होत त्यांनी तो रामप्रसाद आदराने हाती घेतला. कोदंड डोळे मिटत कपाळीच्या शिवगंधाला भिडविला. तसाच तो संभाजीराजांच्या हाती दिला. डोळे मिटून तो 'गोसावी कोदंड' कपाळीच्या शिवगंधाला भिडविताना समर्थांचा एक विचार बाणागत युवराजांच्या काळजात रुतून बसला कधीही न हटण्यासाठी -


" जयास वाटे जिवाचें भय त्याने क्षात्रधर्म करू नये । धनुष्य-भाता हाती घेऊन संभाजीराजे समर्थांना काही एक बोलू गेले. पुन्हा थांबले. "त्यांनी राजांना नजर दिली.


“बोला. निःसंकोच बोला युवराज.” समर्थांच्या नजरेतून ती घालमेल सुटली नाही. 'नाही - आम्ही म्हणणार होतो की " संभाजीराजे अडखळले. -- " सांगा. काय आहे ? " समर्थ हसले.

" स्वामींनी जसे महाराजसाहेबांचे रूप श्लोकांत उभे केले आहे तसे तसे आमच्या मासाहेबांचेही केले तर आमचे कान धन्य होतील!"


न पाहिलेल्या जिजाऊंच्या आठवणीने समर्थांना कधीतरी बाळपणी पाहिलेल्या आपल्या मातोश्रींची आठवण झाली निर्धाराने त्यांनी ती परतविली.


"युवराज, तुम्ही आणि राजे धन्य आहात. प्रतिदिनी त्यांच्या सहवासात आहात. आम्ही त्यांना पाहिले नाही ! केवळ ऐकले आहे! आणि पाहिले तरीही त्यांचे रूप आम्ही शब्दांत उभे करू शकणार नाही. आम्ही शब्दांचा दासबोध घडविला. पण पण त्यांनी - हा समस्तास जिताजागता शिवबोध घडविला आहे!" समर्थांनी राजांच्याकडे हात केला. “ वाल्मिकींनी रामायण रचले पण त्यांनाही कौसल्यामातेचे रूप गवसलेले नाही. आम्ही ते कसे विसरू ?"


राजांनी झुकून समर्थांच्या चरणांना हात भिडविले.


संभाजीराजांनी द्रोणागिरिधारी बलदंड हनुमंत आपल्या नजरेत भरून घेतला. त्या दिवशीचा मुक्काम घळीत टाकून दिवस फुटीला राजे-संभाजीराजे रायगडाकडे जायला निघाले. त्यांना पायसोबत द्यायला समर्थ घळीच्या कुंपणापर्यंत आले.


निरोपासाठी हात जोडणाऱ्या राजांच्या खांद्यावर जपमाळेचा हात चढवीत समर्थ नेहमीपेक्षा वेगळ्या कातऱ्या आवाजात म्हणाले, "राजे, एक स्मरणपूर्वक करा. आईसाहेबांना आमचा दंडवत सांगा! आमच्या रूपाने आमचा दासबोध त्यांच्या सेवेला तत्पर आहे हे सांगा. या, रामरूप व्हा! जय जय रघुवीर समर्थ ! 


समर्थांनी डोळे मिटले. त्यांना पाठमोरे झालेल्या संभाजीराजांचे मन कुठेतरीच जाऊन पोचले होते-


" एवढं थोरपण जन्मास घालणाऱ्या स्वामी समर्थांच्या आईसाहेब कशा असतील ? आमच्या मासाहेबांसारख्या ?" कुठे असतील त्या ? त्यांनी ऐकला असेल कधी दासबोध ? दासबोध ! केवढा अर्थ!-


" सरतां संचिताचे शेष नाहीं क्षणाचा अवकाश । भरतां न भरतां निमिष जाणे लागे ! "