कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १०३

 देकार सरला. दरबारी कलाकारांनी पवाडे, नृत्य, भजन यांच्या शेलक्या चिजा पेश केल्या. सर्वांत शेवटी व्रजकवी भूषण कमरशेला आवळून सिंहासनाच्या सामोरा आला. त्याची बिजलीवर मांड घेतलेली दिमडी धडबडू लागली. कानावर हात घेत त्याने राजांच्या कुलदेवाचे नमन धरले.


'जै जयंती जै आदि सकति-


जै चमुंड जै मुंड भंडासुर खंडिनी। जैसुक्त, जे रक्तबीज बिडाल बिहंडिनी ॥'


ते नमन ऐकताना राजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. डोळे मिटलेल्या संभाजीराजांना साक्षात अष्टभुजा दिसू लागली. दिमडी छळकत थडाडू लागली -


'दशरथ जू के राम, मैं वसुदेव के गोपाल ।


सोई प्रगटे साहि के, श्री सिवराज भुपाल ॥


सिव हि औरंग जिति सके, और न राजा राव। हदि मत्थ पर सिंह बिनु, और न पाले पाव ॥


औरस को जो जनम है, सो याको यक रोज औरस को राज है सो, सिर सरजा को मौज ॥


"भरल्या दरबारातून भूषणच्या ढंगदार शिवगौरवाला सहज दादी येऊ लागल्या. डोळे मिटलेला भूषण हात छताकडे उडवीत शब्दाचे पोतचे पोत नाचवू लागला-


'जीवन मैं नर लोग बडो, कवि भूषन भाषत पैज अडो है। है नर लोगन मैं राज बड़ों, सब राजनमें सिवराज बडो है ॥


को दाता ? को रन चढो ? को जग पालनहार ?


कवि भूषन उत्तर दिखो, सिव नृप हरि अवतार ॥ " युवराजपण विसरून संभाजीराजे हात उठवून कवी भूषणच्या तेजासी, रोमांचक रचनेला दाद देऊ लागले. चौकात मागे पाण्याची कारंजी उसळत होती. पुढे शब्दांची कारंजी उराळू लागली - राजांचे यश वर्णन करताना बेमान भूषण स्वतःला विसरला.


'तेरे तेज है सरजा दिनकरसो-दिनकर है तेरो तेज के निकर सो।। तेरो जस है सरजा हिमकर सो-हिमकर है तेरो जस के अकर सो ॥ कुंद कहीं, पयवृंद कहाँ, अरू चंद कहाँ- सरजा जस आगे ?


बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ तेरो साहस के आगे ?"

"व्वा ऽ!" भले." संभाजीराजांच्यातील कविमन दाद देऊन गेले. भूषण थांबला. घामाघूम झालेल्या भूषणसमोर सरपोसाने झाकलेले मोहरांचे तबक आले. राजे सिंहासनावरून उठले. संभाजीराजे सोनपायरीवर खडे झाले. सोयराबाईंनी राणीवसा सोडला. राजमंडळ गडदेव जगदीश्वराच्या दर्शनासाठी निघाले. " श्रीमान् छत्रपति शिवाजीमहाराज की "ऽऽ


" जय ऽ जय जय !" जयकारांनी भोवतीचे झिरझिरे पडदे सळसळून उठले. राजमंडाळाच्या कदमा-कदमाबरोबर दुहातीची शेकडो इमानी मस्तके झुकू लागली. महामुजरे झडू लागले.


नगारखान्यासमोर राजयात्रेचा सरंजाम सिद्ध झाला होता. गळ्यात सोनेरी घाट किणकिणवीत, कानांच्या झापा फडफडविणारा, सोंड, गंडनाळ यावर रंगी नक्षी फिरलेला, उजव्या पायात चांदीचा तोडा भरलेला, पाठीवरच्या भरजरी झुलीवर देखणी, किरणांत झळझळती सोनअंबारी घेतलेला 'त्रिशूल' हत्ती 'राजऐरावत' म्हणून अलमस्तपणाने झुलत होता. त्याच्यासमोर पांढराशुभ्र, जातवान घोडा, आयाळीवर पिसांचा मोर्चेल मिरवीत, अंगी तलम झूल घेऊन, गळ्यात सोनकोयऱ्याची माळ आणि उजव्या पायात सोनतोडा मिरवीत लाभाचा 'राजअश्व' म्हणून उभा होता. नंग्या तलवारी हाती पेलून निवडीच्या पेहरावातील दरबारी मानकऱ्यांनी दुहाती शिस्त धरली होती. अब्दागिरे, निशाणबार्दार, चवरीवाले, गुर्झबे यांनी ऐरावताला कडे टाकले होते. माहुताने इशारा देत राजऐरावत बसता केला. त्याला शिडी लावण्यात आली. उजव्या हाती सुवर्णी अंकुश घेऊन फीलवान म्हणून सरलष्कर हंबीरराव प्रथम राजऐरावतावर आरूढ झाले. पाठोपाठ राजे व बाकीचे राजमंडळ ऐरावतावरील सोनअंबारीत स्थानापन्न झाले. सोनमोर्चेल घेऊन चढलेले मोरोपंत त्यांच्या पाठोशी वीरबैठकीत बसले.


हंबीररावांनी ऐरावताला अंकुशमार देऊन खडे केले. सुवर्णी फुले, गुलाल, पुष्पे ऐरावतावर उधळली जाऊ लागली. राजयात्रा निघाली. कुबेरी थाटात. लेझमाचे तांडे खेळीला पडले. रणहलग्या, ताशे तडतडू लागले. तोड्यांच्या बंदुका आणि जडशीळ उखळ्या दणाणू लागल्या. दांडपट्टे, फरीगदगा, बोथाट्या यांचे खेळगडी अंबारीतल्या राजमंडळाला आपले कसब दावण्यासाठी समोरच्या खेळगड्यावर इरेसरीने घालून घेऊ लागले. गुर्झबदार राजअल्काब देऊ लागले-


"राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित... " दाटल्या कंगणी पगड्यांचा ... लालदर्या सरकू लागला. त्या सरकत्या दर्यावर अंबारीच्या रूपाने वर आलेला, मावळी अभिमानाचा सूर्य बघून उगवतीला कासराभर वर चढलेला आभाळीचा सूर्यही क्षणभर श्वरथरला! लपकन कमरेत झुकला!! 'शिव' आणि 'शंभो शंकराच्या दर्शनाला निघाले. राजयात्रा जगदीश्वराच्या मंदिरासमोर आली.


एका बाजूला महाराणी सोयराबाई, दुसऱ्या बाजूला युवराज संभाजीराजे घेऊन महाराज जगदीश्वराच्या चौकआवारात आले.

देवदर्शन करून राजयात्रा बालेकिल्ल्याकडे परतली. राजमंडळ जिजाऊंच्या खासेमहालाकडे निघाले. राजमातेच्या दर्शनासाठी.


"छत्रपती महाराज येताहेत.” वर्दी ऐकताना जिजाऊंचे सुरकुतलेले अंग रोमांचून थरले. त्यांच्या बैठकीच्या भवत्याने पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई उभ्या होत्या.


जिजाऊंच्या पायांवर डोके ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजीमहाराजांनी गुडघे टेकले.. त्यांच्या बगलेने संभाजीराजांनी गुडघे टेकले. रायगडाएवढ्या उंच थोरल्या मायेसमोर त्यांनी मस्तक झुकविली. जिजाऊंच्या मिटल्या डोळ्यांतून सुटेलेले थेंब सुरकुत्यांना न जुमानता घरंगळले. महाराजांच्या राजटोपावर उतरले. झालेला अभिषेक पावन झाला !


जिजाऊ आशीर्वादासाठी बोलू बघत होत्या. शब्द फुटेना. उभे अंग थरथरू लागले. आठवणींच्या हजारो सुरकुत्या त्यांच्या मनी उलगडल्या होत्या. मन असंख्य विचारांच्या कल्लोळात होलपटू बघत होते. त्यांच्या पायांवर डोके ठेवून महाराज तसेच काही क्षण थांबले. कसल्यातरी निर्धारी विचाराने महाराजांनी मान वर घेतली. भरल्या डोळ्यांमुळे त्यांना जिजाऊ दिसतच नव्हत्या. महाराजांच्या दोन्ही हातांचे झोले मस्तकीच्या राजटोपाला भिडले. कुणाला कल्पना नसताना त्यांनी तो कीर्तिधवल राजटोप उतरून • सरळ जिजाऊंच्या पायांवर ठेवला! आणि तो ठेवताना त्यांचे उभे अंग गद्गद् लागले.


"शिवबा ऽ! " डोळे पदराने निपटून टाकीत जिजाऊसाहेबांनी लगबगीने तो टोप उचलला. महाराजांच्या मस्तकी पुन्हा चढवून त्यांना उठवून मिठीत घेताना कसल्याही आशीर्वादाऐवजी पुन्हा त्या एवढंच म्हणू शकल्या, "शिवऽ बा!"


जिजाऊंचा थरथरता हात महाराजांच्या पाठीवरच्या जरीकोयरीवर, उपरण्यावर फिरत राहिला. बाहेरून अत्यंत मूक वाटणारी पण आतून पार गलबलून आलेली ती राजमातेची आणि श्रीमंत योग्याची मिठी दोघांनाच नीटपणे कळू शकत होती. महाराजांनी खांद्याला लावलेल्या समर्थांच्या बैरागी कोदंडाला आणि आणि महाराज - जिजाऊंनी अंगाखांद्यावर खेळवून ऐन भरीत आणलेल्या संभाजीराजांना !!


राज्याभिषेकाचे उत्तरविधी आटोपले. आचार्य गागाभट्टांना सव्वालक्ष होनांची दक्षणा देऊन, पहायासाठी हत्यारबंद शिबंदी त्यांच्या दिमतीला जोडून महाराजांनी त्यांची गौरवी बोळवण केली.


राजमाता जिजाऊसाहेबांच्या महालीचा राबता वाढला. जेधे, बांदल, कंक, सिलिंबकर यांच्या जमेतीतील पगडीधारी मस्तके जिजाऊंच्या पायांना भिडू लागली. 'आऊसाहेब, येताव. तब्येतीला धरा. लई तापदरा करू नगासा आता. पाऊस धराय लागलाय. आमास्नी जाय पायजे. शेतीवाडी हाय. निगताव. गारठ्याला दम्याचं दुखणं दुनावतया. हतं न्हावू नगासा. खालतं पाचाडात जावा कसं." नितळ, भाबड्या, मावळी प्रेमभावनांच्या अभिषेकानं चिंब होऊन लोकमाता जिजाऊ निथळू लागल्या.

जमले मावळमाणूस चौवाटा पांगले. गड उलगला. मृगाची काळी छपरी आभाळाला घरून आली. पावसाळी चावरा वारा रायगडावर सूंकारत पिसाट घोंघावू लागला. झाडांचे डेरे पलट्या खाऊ लागले. बांधल्या झड्या उधळल्या. निकराने बसून असलेल्या जिजाऊंनी बिछायतीवर अंग टाकले. दम्याच्या धुसकान्यात त्यांच्या घशातील 'जगदंब " घुसमटू लागला. कांबळ्याच्या दोन दोन घड्या टाकल्या तरी अंगभर काटा उठू लागला. त्यांना गडावरून पाचाडात हलविणे भाग होते.


पडवेबंद मेणे जोडण्यात आले. हातजोड देत, शाल पांघरलेल्या जिजाऊंना महाराज आणि संभाजीराजे यांनी खासेमहालाबाहेर घेतले. पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई, सोयराबाई, रामराजे सारा गोतावळा त्यांच्या भवती दाटला होता. - 'राजे. आम्हास जरा दरवारीचौकात नेता ?” जिजाऊंच्या तोंडून शब्द आले.


'जी.” महाराज व युवराज यांचा दुहाती आधार घेत जिजाऊ चालू लागल्या.


जागजागी अगिषेकाच्या खुणा मिरविणारा, सजला दरबारी महाल आला. पूर्वाभिमुख, सुवर्णमंडित, रत्नजडावाच्या बत्तीसमणी सिंहासनासमोर उभ्या राहिलेल्या जिजाऊंचे उभे अंग थरथरले. डोळे भरून आले. म्हाताऱ्या उरात भावनांचा कल्लोळ दाटला. सिंहासनावरच्या मोतीलगाच्या छत्राकडे बघत जिजाऊ घोगरट आवाजात म्हणाल्या, " चला. राजे, तुमच्यावर छत्र आलं .... "


बालेकिल्ल्याच्या पालखीदरवाज्याने जिजाऊंचा मेणा मनोऱ्याबाहेर पडला. त्याच्या दोन्ही तर्कांना महाराज आणि संभाजीराजे पायी चालू लागले. पाठीमागून जनान्याचे सात-आठ मेणे चालले. ... जिजाऊ रायगड सोडून निघाल्या. मेण्याची काठाळी धरून चालताना संभाजीराजांच्या मनी विचार उठू लागले. "ही गडउताराची वाट कधीच सरू नये! पलीकडे महाराज, अलीकडे आम्ही. मेण्यात मासाहेब. ही चालणी अशीच राहावी! भोवी थकले तर त्यांच्या हातीचे थोपे आम्ही घेऊ, महाराज घेतील. मासाहेबांना धक्के बसणार नाहीत अशी तोलती चाल धरू !


* कधीतरी महाराज मासाहेबांना म्हणाले होते 'आम्ही आपला मान काय करावा? तो आमचा वकूब नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी चढविल्या तरी ते थिटेच आहे.' मासाहेब खोकू लागल्या की आमचाच जीव घोटाळणीला पडतो. खंत वाटते. त्यांचा दमा आम्हास घेता येत नाही.


'आता अभिषेक संपला. हा पावसाळा आम्ही पाचाडातच राहू मासाहेबांच्या पायांजवळ. आम्ही रचलेली काव्ये त्यांना ऐकवू. त्यांच्या धरल्या सांध्यांना मालिश देऊ. दम्याची उबळ तुटताच त्यांच्यासमोर तस्त धरू. धाप लागलेली असली तरीही त्या हसतच म्हणतील, 'हं. ऐकवा तुमची गीतं. आमच्या शिवबानं कधी गीतं रचली नाहीत. तेवढी वाण शंभूराजे तुम्ही भरून काढलीत.' मग आम्ही त्यांच्यावरच रचलेले गीत सर्वांत शेवटी वाचू. ते ऐकताना डोळे मिटते घेत पुटपुटतील, 'जगदंब, जगदंब!' बिछायतीवर हात थोपटीत आम्हास बोलावून जवळ बसवून घेतील. तोंडाने त्या काहीच बोलणार नाहीत; पण आमच्या पाठीवरून फिरणारा त्यांचा हात उदंड बोलेल ! बोलतच राहील! "


पाचाडच्या दरुणीमहालातील समया मंद तेवत होत्या. शिसवी मंचकावर जिजाऊ पडून होत्या. खालती सहाणेवर औषधीमात्रा उगाळणाऱ्या धाराऊच्या हातांतील किणकिणणाऱ्या काकणाबरोबर जिजाऊच्या मनाने विचित्र सूर धरला होता.


"आमच्या थोरल्या सूनबाईंच्या सेवेत अशाच औषधीमात्रा झिजल्या! मात्रा घेऊन घेऊन त्या कंटाळत. तेव्हा आम्ही त्यांना मायेच्या रागाची जरब देऊन त्या घ्यायला लावीत होतो. तेव्हा जाणवलं नाही की शेवटी शेवटी मात्राही नकोशा होतात. आज ही सारीजणं आमचं ऐकत नाहीत. आम्हास त्या घ्यायला लावतात.' " या." दरुणीमहालाचा उंबरठा ओलांडणान्या सोयराबाईंना बघून जिजाऊ क्षीण बोलल्या. त्यांनीच वर्दी पाठवून सोयराबाईंना बोलावून घेतले होते. बाहेर सदरी जोत्यावर महाराज आणि युवराज महाडहून आलेल्या वैद्यांचा सल्ला ऐकताना चिंतातुर बसले होते. त्यांच्या ओढल्या चेहऱ्याकडे बघत तुळईची घाट निश्चल टांगती होती. मध्येच वाऱ्याचा झपकारा येत होता. त्याने घाटेतील टोल थरारत होता. तिकडे कुणाचेच ध्यान नव्हते. सोयराबाईंनी मंचकावर झुकून पदर तळहाती घेत तीन वेळा जिजाऊंना नमस्कार केला. त्यामुळे उठलेल्या त्यांच्या सुवर्णी कंकणांच्या किणकिणाटाचा माग घेत काही क्षण शांततेत तसेच गेले.


" सूनबाई, काही एक मनचं तुमच्या कानी घालावं म्हणून आम्ही तुम्हाला याद केलंय." जिजाऊंना धाप लागल्यागत वाटले. त्यानी नजर वरच्या तख्तपोशीत जोडली होती. हात छातीवर होते. सोयराबाईंच्या कपाळीचे कुंकूपट्टे आक्रसले. जीव कानांत गोळा झाला. नाकाची नथ काच देतेय असे त्यांना वाटले. " सूनबाई, आता अधिकाचं सांगायला आम्ही राहू याचा भरवसा नाही! ते ऐकताना सहाणेवर फिरणारे धाराऊचे हात कलम झाल्यासारखे गपकन थांबले. " जे सांगतो आहोत ते शेवटचं. ते तुमच्या कानी घातल्याखेरीज आम्ही मरणास मोकळ्या नाही! सूनबाई, आता तुम्हास एक नाही तीन फर्जद आहेत हे नीट ध्यानी घ्या ! राजे, शंभूराजे आणि रामराजे ! दमा जिजाऊंशी भांडू लागला. त्या त्याला खानदानी अरब देत जागी बसवू लागल्या. धाराऊचे हात थाबले. कान टवकार झाले.


" बाई, भोसल्यांचे पुरुष हाती लागणं मुश्किल. तुमच्या हातांत तीन आहेत! त्यांना सांभाळून घ्या. हा वाढला पसारा, याहून अधिक वाढवा. शंभूराजांना तर सर्वाहून अधिक जपा. त्याच्या आऊ गेल्या नि आम्हीच त्यांच्या आऊ झाला. आता आम्हा दोघींचा भार तुमच्यावर आहे. धाराऊ कोरड पडल्याने जिजाऊनी धाराऊला हाक दिली. त्यांना काय पाहिजे हे ओळखून धाराऊ पाण्याचा गडवा, वाटी घेत चटक्याने पुढे झाली. पाणी घशाखाली जाताच जिजाऊंना कितीतरी हपार वाटले. "तुम्ही महाराणी झालात. आम्ही भरून पावला. आता महामाता व्हा. त्यासाठी येईल ते आपलं घेण्यासाठी पदर मोठा करा. आईला मानअपमान मानून नाही चालत. ते बळ येण्यासाठी जगदंबेची आण भाका. आमची याद ठेवा न ठेवा, पण जगदंबेला कधी विसरू नका. आम्हास भरोसा आहे पडल्या न पडल्याला ती तुम्हास मार्ग दाखवील. हे एवढंच सांगणं. या तुम्ही.” जिजाऊंनी डोळे मिटते घेतले. सोयराबाईंची नथ ओळांबलो. सुवर्णी कंकणे किणकिणली. नमस्कार करून त्या महालाबाहेर पडू लागल्या.


" हां. घेवा मासाहेब.” धाराऊने उगाळली मात्रा बोटाने राजमाता जिजाऊंना चाटवली. महालाबाहेर पडणाऱ्या राणीसाहेबांच्या शालूवरचे झळझळणारे जरीबुट्टे जिजाऊंना दिसत होते. मंचकाच्या उशाकडे जिजाऊंना दिसणार नाही अशी उभी राहिलेली धाराऊ न राहवून हणाली, "मासाब, तुमी बऱ्या व्हनार. मग असं कशापायी बोलता ते! आम्ही हाव की सायांस्नो!" आणि घशातून फुटणारा हुंदका जिजाऊंनी ऐकू नये म्हणून तिने आपल्या पदराचा बोळा तोंडात कोंबून घेतला.


मृगाची पाणझडप पाचाडावर पडली. सावित्री, काळ, गांधारी नद्या लाल पाण्याने भरून आल्या. टपटपती थेंबावळ झाडांच्या पानापानांवरून उतरू लागली. जिजाऊंचे पाय चेपीत बसलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यांवरची झापड केव्हा हटतेय याची टक लावून वाट बघत होत्या.


'येसू." मासाहेबांच्या हलक्या सादेने त्यांची तंद्री मोडली. " जी." म्हणत येसूबाई उठल्या. चौरंगीवरचे पंचपात्र उचलून जिजाऊंच्या जवळ गेल्या. " तीर्थ घ्या मासाहेब आईचं.” येसूबाईंनी पळी जिजाऊंच्या ओठांशी नेली. जिजाऊंनी तीर्थ घेतले. “येसू, इथल्या सदरीजोत्यावर आम्ही उभ्या राहिलो की गडाच्या मावळमाचीवर तुम्हीही असाल काय असा विचार मनी यायचा !"


"हां मासाहेब, स्वारी मनोऱ्याच्या पाचव्या मजल्यावर आहेसं बघून आम्ही एकदा मावळमाचीवर आपल्या दर्शनास येण्याचं धाडस केलं होतं. आबासाहेब गडावर नव्हते. '


येसूबाईंचे उत्तर ऐकून जिजाऊ क्षीण हसल्या. “तुम्ही तसं घेतलेलं ते पहिलं नि शेवटचं दर्शन आहे आमचं!" असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्या बोलण्याने येसूबाईंचा चेहरा किती दुखरा होईल याची कल्पना असल्याने त्या म्हणाल्या, " नातसूनबाई, तुम्हाला काही सांगणं कधी साधलंच नाही. आमच्या स्वारीनं खूप सालांपूर्वी एक तुला केली होती. नांगरगावी. इंद्रायणी आणि भीमेच्या संगमावर. हत्तीचा बच्चा नावेत चढवून." उबळ आल्याने जिजाऊ आपोआप थांबल्या..


येसूबाई पदर सावरीत मंचकावरून उठल्या. कारण त्यांच्या स्वारीसह महाराज महालात आले. त्यांच्या पाठीशी राजवैद्य नि मोरोपंत होते. जिजाऊंना येसूबाईंना सांगायची होती ती हत्तीच्या तुलेची कथा त्यामुळे त्यांच्या ओठांत तशीच राहिली!