कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९४

 चैत्री पाडव्याचा सण आला. चुना कुंकवाची ओली बोटं फिरलेल्या, आंबवतीनं सजल्या, हिरव्या, रसवंत, तोरणकाठ्या गडाच्या घरट्या घरट्यांसमोर उठल्या. त्यावरचे झळझळीत चंबू तळपू लागले. कोऱ्या खणांचे रंगीबेरंगी शेव आणि सफेद चाफ्यांच्या माळा गडवायावर हिंदोळू लागल्या. कोंडाजी फर्जद, आण्णाजी, मोत्याजी खळेकर आणि गणोजी कावळा यांनी हिकमतीनं दस्त केलेला पन्हाळा डोळ्यांत साठवून घ्यायला राजे आज रायगड सोडणार होते. संगतीला फौजेसुद्धा प्रतापराव दौडणार होते. रायगड युवराज संभाजीराजांच्या अखत्यारीत येणार होता.


सणाची म्हणून गोडाची पाने उठली. दुपारच्या विसाव्याची डावी कूस झाली. उन्हे थोडी कलतीला लागली असताना राजे, संभाजीराजे व प्रतापराव यांच्यासह जगदीश्वराच्या दर्शनाला आले. दर्शन करून सारी मंडळी मंदिराबाहेर पडली. संभाजीराजे समोर दूरवर दिसणाऱ्या लिंगाण्याच्या डोंगररांगेकडे बघतच होते. 

फांदीवर फांदी टक्करल्याने पडलेल्या ठिणगीमुळे असो, वा कुणब्यांनी पेटविलेल्या तरव्यातील किटण उडाल्यामुळे असो, लिंगाण्याच्या घसरंडीवर घडघडलेला वणवा मावळतीच्या किरणांत नजर खेचून घेत होता. जसा उभा लिंगाणा पिवळ्या तांबडसर ज्वाळांचे भंडारामाखले हात आकाशाच्या रोखाने मूकपणे नाचवीत होता.


मंदिराच्या दगडी आवारकठड्याला हात टेकून युवराज तो आगीचा नाच पापणी न मोडता रोखल्या नजरेने घेत राहिले. सडक बोटांचा एक गुलाबी हातपंजा त्यांच्या खांद्यावर चढला तशी त्यांची ती अग्निसमाधी डहुळली. त्यांनी मागे बघितले.


लिंगाण्याच्या घसरंडीला डोळे जोडलेले राजे केवढेतरी गंभीर दिसत होते.


" ही अमनधपक्यानं पेटल्याली रानची आगट लई वंगाळ धनी. कानांत रानवारा भिनल्याली पाखरं येलबाडून होच्यात घालून घेत्यात! हाकनाक पंख होरपळून घेत्यात !” प्रतापराव गुजर हत्यारावरची मूठ चाळवीत समोरच्या ज्वाळा बघत म्हणाले. "दोष पाखरांचा नाही, पेटल्या वणव्याचा नाही, सरलष्कर. दोष त्या क्षणाचा आहे. ज्या क्षणी या वणव्याला कारण होणाऱ्या दोन फांद्या टक्करल्या जातात! आणि कुठल्याही क्षणावर कुणाचीच हुकमत चालत नाही.” राजांच्या ओठांतून सुटलेले बोल ऐकून संभाजीराजे भरून आले.


'धाराऊला संगती घेऊन पाचाडात आलेल्या येसूबाई आठ दिवस जिजाऊंच्या संगती राहून पुन्हा गड चढू लागल्या. शाळूचे दिवस असल्याने झोंबरा वारा, चेहऱ्याभोवती पदराचा लपेटता फेर घेऊन त्या थोपवू बघत होत्या. त्या वाऱ्याला धरून, आईसाहेबांनी सांगितलेले जाणते विचार त्यांच्या मनी फिरू लागले.


वाताने घराच्या सांध्यांना डुकराची करवी चोळणान्या येसूबाईना जिजाऊ एकदा म्हणाल्या होत्या, "ही भोसल्यांची माणसं अशीच आखडल्या सांध्यासारखी आहेत नातसूनबाई! मुक्या मनानं मायेचं तेलवण चोळलं तरच झाली तर थोडी सुमार व्हायची!"


मेणादरवाज्याने बाहेर आलेल्या येसूबाई धाराऊसह खुल्या पठारावर आल्या होत्या. सातमहालाला लागून हे पठार आबाजीपंतांनी मुद्दाम खुले राखले होते. राजांच्या जनान्याला मेणादरवाजा पार करताच मोकळी हवा घेण्यासाठी या पठारावर येता येईल अशी ही सोय होती.


शिकारीसाठी संभाजीराजे पाचाडवाडीलगतच्या रानात खेळ्यांसह उतरले होते. राजे पन्हाळ्यावर होते.


मोकळ्या मनाने भोवतीचा फुललेला चैत्राचा परिसर न्याहाळत येसूबाई धाराऊशी मध्येच काहीतरी तुटक बोलत होत्या. लाल फुलांच्या तुऱ्यांनी पेटलेली पळसाची आणि पिवळ्या फुलांच्या घोसांनी लवलेली बाव्यांची झाडे भोवतीच्या कड्यांवर उठून दिसत होती. वाऱ्याच्या झपत्काराने उडू बघणारा पदर येसूबाईंनी गळ्याजवळ घट्ट लपेटता धरून घेतला. मावळतीला भिडलेले बिंब बघताना त्यांना न कळणारा भास झाला. पळसाच्या फूलतुऱ्यांचा लाल टोप त्या बिंबाने घातला आहे! कोकिळाची उठलेली थरथरती किलकारी धावत थेट त्या टोपाला जाऊन भिडली आहे! म्हणता म्हणता समोरचा ढालीसारखा सूर्य वितळून मावळतीवर पसरतो आहे! त्यांना वाटले, “इथं आमच्या तहबंदात ! छातीवर! समोरचा सूर्य वितळतो आहे! हे असं काय होतं आहे ?


" धारा ऊ” येसूबाईंचे शब्द थरथरले आणि उभ्या येसूबाई पदराचा शेव तोंडात धरीत मटकन खालीच बसल्या! क्षणभर धाराऊ झाल्या प्रकाराने चक्करली. मग तिचे डोळे लखलखले. तिचा गोंदला हात अपार मायेने येसूबाईच्या पाठीवर आला. कुणबी जाणतेपण ओठांतून निसटले, " भिऊ नगासा. चला. ह्यो वारा असा अंगावर घेऊ नगा.” येसूबाई थरथरत होत्या.. धाराऊने त्यांना उठवून घेतले. सावरते धरून त्यांना ती सातमहालाच्या रोखाने चालवू लागली. भवतीची चैत्री दुनिया उंबरठा ओलांडत होती. मावळतीच्या उन्हात न्हात होती !!


आठ धापावल्या धारकऱ्यांनी, संभाजीराजांनी पाडलेल्या वाघाचे धूड रायगडावर चढवून आणले. ते बघायला गडाच्या साच्या कारखान्यांतील माणसे माळावर दाटली. दत्ताजी त्रिमल, बाळाजी आवजी, खुद्द राजे ते धूड बघायला निघाले.


माळावर दाटलेली माणसे दबके कुजबुजत युवराजांच्या धाडसाची भरल्या तोंडांनी तारीफ करीत होतो. मेल्या वाघाच्या वासल्या टाळ्याभोवती माझ्या घोंगावत होत्या. पिवळ्याजर्द रंगाला धरून त्या धिप्पाड जनावराच्या अंगावरचे काळे पट्टे झळझळत होते. शेपटीचा एरव्ही अखंड नाचता पोत थंड पडला होता. माणसे डोळे फाडून ते शांतावलेले 'रानकौतुक' बघत होती. त्यात बाळाजींचे खंडोजी आणि आवजी हे आता वधार झालेले मुलगेही होते. निराजीपंतांचा चिरंजीव प्रल्हाद होता.


राजे आले. माणसांची दाटली गर्दी डहुळली. मुजऱ्यांच्या झडी झडल्या. डाव्या हाती बंदुकीची नळी पेलत युवराज संभाजीराजांनी झुकून राजांना मुजऱ्याची अदब दिली. त्यांची छाती वाघाच्या धुडाकडे बघताना लव्हारी भात्यासारखी फुगून आली.


आडवे जनावर नजरेला पडले मात्र, कुणीतरी धरून खेचल्यासारखा राजांचा हात वर उठला. छातीवरच्या कवड्यांना बोटे भिडली. पापण्या क्षणभर मिटगत झाल्या. राजे काही काही बोलले नाहीत.


"रान कसे उठले, ध्यानीमनी नसता हे जनावर डरकाळ्या देत कसे सामोरे आले, खेळ्यांची बाजारबुणगाई कशी झाली, घोड्यावर असता आपण वार कसा टाकला, " हे संभाजीराजे अभिमानाने सांगत होते.

ते ऐकून राजे एवढेच म्हणाले, "टाकोटाक आमच्या भेटीस महाली रुजू व्हा ! " राजांच्या पाठीवरची जरीकोयरी तळपली. आले तसे राजे निघून गेले.


संभाजीराजे पालखी दरवाज्याने वाड्याकडे निघाले. ते बालेकिल्ल्याच्या चौकात आले. सातमहालात पुतळाबाईंच्या महालासमोरच्या सफेलीत केस उदबलेल्या येसूबाई धाराऊसमोर बसल्या होत्या. धाराऊ बोटांच्या फाळांनी त्यांच्या दाटल्या केसांच्या बटा फोडीत होती. खांद्याला बंदूक टांगलेली स्वारी बघताच येसूबाई उठल्या आणि सरळ आत गेल्या. काय झाले ते धाराऊला कळलेच नाही.


" सूनबाई, क्यासात वल तशीच न्हायली नी” म्हणत धाराऊही त्यांच्या मागून आत गेली. मुद्रेवर काय उतरलेय ते येसूबाईंनी एकदा डोळाभर बघावे म्हणून धाराऊने हातमुठीचा दर्पण त्यांच्यासमोर धरला. पण पण येसूबाईंना त्या दर्पणाला नजर देण्याचे - धाडस होईना..


पेहराव केलेले संभाजीराजे आज्ञेप्रमाणे राजांच्या महाली रुजू झाले होते. पाठीशी हात बांधलेले राजे झरोक्यातून बाहेर बघत विचारगत उभे होते. त्यांची बांधली बोटे चाळवली. गपकन एकमेकांत रुपली. "युवराज, शिकार ही शूराची खेळी आहे. कधी मनी आले तर आम्हीही रान उठवितो.” राजांचा आवाज बांधलेला झाला.


"पण पण आपण अगोदर भोसले आहोत. मग शिकारी! तुम्ही केली तीच गफलत आम्हीही एकदा करून बसलो होतो. वाघ पाडण्याची! मासाहेबांनी आमचे डोळे उघडले. आपण जगदंबेचे भुत्ये आहोत. वाघ जगदंबेच्या बैठकीचे जनावर आहे याची भूल इतः पर कधी पडू देऊ नका !! '


“जी. हे हे आमच्या ध्यानी आलं नाही." शरमिंद्या युवराजांनी गर्दन पाडली. " तेच. आता येऊ द्या.” राजांनी त्यांना सरकू दिले नाही.


“जी.”


तो हलका हुंकार राजांना जाणवला. ते वळत सामोरे झाले. जवळ घेत त्यांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे आपल्या तळहातांच्या पकडीत गच्च धरले. " गर्दन वर घ्या.” राजांच्या रूपाने जसा उभा रायगडच बोलत होता!


युवराजांची गर्दन वर आली. स्फटिकसाफ डोळे राजांच्या निमुळत्या, गंधर्वी डोळ्यांना भिडले. त्या डोळ्यांतील रानमेरी निधडेपण राजांना जाणवले. आवडले. ते म्हणाले, आम्हास तुमचं बळ पाहिजे- वाघ पाडणारं नव्हे- वाघ होऊन चालणारं !! 


राजांच्याकडे बघताना संभाजीराजांना भास झाला- 'आम्ही पाडलेलं जनावर उठून " " बसलं आहे! त्यांच्या पाठीवर मांड घेऊनच आबासाहेब हे बोलताहेत! ' " या." राजांनी त्यांचे खांदे थोपटले.

झुकून मुजरा देत हटल्या मागच्या पावलांनी युवराज जायला निघाले. त्यांची अदव निरखीत राजे हसत म्हणाले, "गडाच्या बैतेदार चांभाराकरवी त्या जनावराचा पेंढा भरून घ्या. दरबारी चौकात भक्कम चौथऱ्यावर तो पेंढा बसता करा. तुमच्या धाडशी शिकारीची खूण म्हणून तसेच तुम्ही केलेल्या गफलतीची खूण म्हणून !! ' 'जी.'


" आबासाहेब काय आहेत ते कळणं अवघड आहे." महालाबाहेर पडताना संभाजीराजांच्या मनात या विचारांचा पेंढा पक्का भरून टाकला गेला !


" आम्ही देवदर्शनास निघतो आहोत. दोन दिवसांनी परतू.” असे संभाजीराजांना सांगून राजे महालाकडे कूच झाले.


दुसऱ्याच दिवशी इंग्रजांचा मुंबई दरबारातील मराठ्यांचा वकील पिलाजी सुंदर गडावर आला. त्याने वर्दी आणली होती की, “ ताम्रांच्या वतीने वकील म्हणून थॉमस नावाचा साहेब राजियांसी वाटाघाटी करण्यास आला आहे. राजे नाहीत तरी युवराजांची भेटी घेण्याची तो आज्ञा मागत आहे.


"साहेबास गडावर पेश येऊ द्या.” संभाजीराजांनी पिलाजींग इजाजत दिली. इंग्रजांच्या दरवारातील थॉमस निकल्स हा गोरा साहेब मुंबईहून निघून नागोठणे, पाली, सारसगड ह्या मार्गे पाचाडात पोचला होता. त्याच्याबरोबर सदतीस लोक आणि शामजी शेणवी नावाचा दुर्भाष्या होता.


आपल्या दरबारच्या दोन कामगिऱ्या पार पाडण्यासाठी थॉमससाहेब आला होता. नुकतीच प्रतापरावांच्या घोडघाडीने हुबळी येथील इंग्रजांची वखार खणत्या लावून लुटली गेली होती. तिची तसेच पूर्वीच्या लुटलेल्या राजापूरच्या वखारीची नुकसानभरपाई मराठ्यांकडून वसूल करणे, आणि मीठ वे लाकूड या वस्तू मराठी मुलखातून मुंबईला नेण्याचे परवाने मिळविणे अशी ती व्यापारी हेताची कामे होती.


पिलाजीने गड उतरून युवराजांचा तिरोप साहेबांच्या कानी घातला. रायगड आणि युवराज बघण्यासाठी उत्सुकलेला थॉमस बूट-पाटलूण चढवून तयारीला लागला. पण एकाएकी मातीचे गरगरते खांब उठविणाऱ्या वावटळींनी पाचाडला घेर टाकला आणि हां हां म्हणता वळीव पावसाची घनचक्कर रायगड- पाचाडावर कडकडत कोसळू लागली. साहेब पायथ्याला अडकून पडला.


दुसन्या दिवशी शामजी, पिलाजीसह थॉमससाहेब धापा टाकीत रायगड चढून आला. चिटणीस बाळाजींना त्याने वर्दी दिली. बाळाजींनी सामोरे येत साहेबाला राजांच्या वाड्याच्या सदरी बैठकीसमोर आणले. "युवराज, ताम्रांचा हेजिन सदरी दाखल झाला आहे." बाळाजींनी संभाजीराजांच्या महालात येऊन मुजरा देत युवराजांना वर्दी दिली.