कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १०२

 शांतिहोमांच्या पवित्र मंत्रघोषांनी बालेकिल्ल्याची तटबंदी चौथडी भरून वाहू लागली. विनायक, नक्षत्र, इंद्र, ग्रह पुरंधर या होमांचे यज्ञकुंड धडधडले. हवनासाठी जाळून घेणाऱ्या दूध, तुपाच्या पौष्टिक वासाने महावेदी दाटून गेली. महावेदीच्या मध्यभागी थोराड, रुपेरी पारड्यांची पुष्पमालांनी सजलेली तुला एका भक्कम खांबाला उभी करण्यात आली होती. तिचे पूजन झाले.


राजांच्या तुलादानविधीला प्रारंभ झाला. उजव्या बाजूच्या पारड्यात उजवा पाय प्रथम ठेवून राजांनी वीरबैठक घेतली. गागाभट्ट, बाळभट्ट, अनंतभट्ट ऑजळी-ऑजळींनी तबकातील झळझळीत सोनमोहरा तुलेच्या डाव्या पारड्यात सोडू लागले. भोसलाई सोनसूर्य वर घेण्यासाठी सोने झटू लागले.


रोखल्या नजरेने संभाजीराजे पारड्याकडे बघत होते. " या उभ्या रायगडाला सोनरूप देऊन तो डाव्या पारड्यात उचलून ठेवला तरी आबासाहेबांचं पारडं फरसबंदी नये!" असे त्यांना वाटत होते.


राजांनी वीरासनी बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडून उचलले गेले. राजांची सुवर्णतुला झाली. मंत्रांचा घोषच घोष उठला. सतरा हजार तोलल्या मोहरा तबकात उतरून त्यावर गागाभट्टांनी मंत्रित फुले ठेवली.


चांदी, तांबे, कापूर, शिसे, फळे, मध, मसाले, साखर अशा राजांच्या आणखी पंधरा तुला राजबैठकीत जोखण्यात आल्या.


" युवराज, आइए. पुष्प चढाइए तुलादेवतापर." गागांनी संभाजीराजांच्या हाती फुलांची ओंजळ ठेवली. उजवा पाय फुले वाहून संभाजीराजांनी तुलेवर हळदीकुंकू सोडून तिला वंदन करीत उजव्या पारड्यात ठेवून वीरबैठक घेतली. मंत्रांचे घोष उठू लागले.


गागाभट्ट, बाळंभट्ट, प्रभाकरभट्ट सोनमोहरांच्या ऑजळी डाव्या पारड्यात सोडू लागले. त्यातून खणखणत पारड्यात उतरणाऱ्या मोहरा बघताना विचाराची एक ओंजळ कुठूनतरी संभाजीराजांच्या मनाच्या पारड्यात सोडली गेली-


'आमच्या मासाहेब इथं येतील आणि 'शंभूबाळ' म्हणत शिवलिंगाला नेहमी वाहतात त्यांतील एकच विल्वपान त्या पारड्यात सोडून आमच्याकडं बघतील तर आमचं पारडं हां हां म्हणता आभाळाला जाऊन थडकेल !!' " संभाजीराजांनी वीरबैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडू लागले. पीतवर्णी वत्र अंगभर लपेटून शेजारी उभ्या असलेल्या राजांना ते बघताना वाटले- "मोहरांच्या पारड्यातील मोहर नू मोहर रंग पालटते आहे. पिवळ्याधमक मोहरा सावळ्यासावळ्या होताहेत !! ' मंत्रोच्चाराचा उद्घोष करणाऱ्या गागाभट्टांना, सावळ्या मोहरा बघणाऱ्या राजांना, बिल्वपानाच्या विचारात गेलेल्या संभाजीराजांना कुणालाच कल्पना नव्हती की पारड्यात बसलेल्या, टोप नसलेल्या सोनेरी कमळाला एक स्त्रीमन आपल्या डोळ्यांच्या तराजूत तोलून धरू बघत होते ! सोनेरी बुट्ट्यांचा शालू नेसलेल्या, कपाळी कुंकूपट्टे असलेल्या, नाकात नथ ल्यालेल्या येसूबाईंचे! आपल्या अंगावरचे सगळे सुवर्णालंकार त्यांनी आपल्याच डाव्या डोळ्याच्या पारड्यात टाकून बघितले! मनाचे सोनकमळ त्यावर टाकून बघितले. उजव्या डोळ्यात बैठक घेतलेला हटवादी, बेडर, बांडा, केशरी टोप काही रेसभर हलायला तयार नव्हता!

कावऱ्या वाक्या येसूबाईनी आपल्यावर कुणाचे ध्यान तरी नाही ना म्हणून डावे, उजवे बावरून बघितले. त्यांच्या शेजारी उभी असलेली धाराऊ हसत त्यांना म्हणाली, " नथंची सवं न्हाई तुमास्नी सूनबाई, म्हून ती काच देतीया!" ते ऐकताना येसूबाईंच्या गाली पळसच पळस फुलारले. संभाजीराजे पारड्यातून खाली आले. 'महाराज्ञि, आइए." आचार्यांनी सोयराबाईंच्या हाती फुले दिली.

तुलेची पूजा करून पारड्यात उजवे पाऊल ठेवताना सोयराबाईंना आचार्य गागाभट्टांना म्हणावेसे वाटले, “करताच आहात आमची तुला तर आमच्या रामराजांना संगती घेऊ द्या! त्यांच्याखेरीज आमची एकलीची तुला कसली करताहात ? " पण हस्तिमृत्तिका रामराजांच्या हाती देताना जाणवेल असे घोटाळलेले आचार्य आठवून मग काही न बोलताच त्यांनी एकट्यांनीच पारड्यात बैठक घेतली.


ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट किरणांच्या मोहरा वेचीत फुटू घातली. रात्र तीन घटका उरली होती. शतकांची झोप झाडून एक सोनस्वप्न उराशी घेऊन किल्ले रायगड जागा होत होता. पन्नास हजारांवर माणसांनी गडावर दाटवा केला होता. दुडदुडणाऱ्या नौबतीने रायगडावर डंक्याचे छत्र धरले होते.


पहाटस्नान घेऊन शूचिर्भूत झालेले राजे आणि संभाजीराजे जोडीने लोकमाता जिजाऊंच्या पायांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खासेमहालात आले. त्यांना आशीर्वाद देऊन जवळ घेताना जिजाऊंच्या थकल्या मनी विचारांचे काहूर कल्लोळले-


"केवढं मागं पडलं! काय घडलं आणि काय नाही? आईच्या कृपेनंच सान्या वाक्यातून निभावलं. तिच्यामुळेच आजचा दिवस उजाडला. हे बघायला आज आमची स्वारी पाहिजे होती. राजांचे दादामहाराज पाहिजे होते. आमच्या थोरल्या सूनबाई पाहिजे होत्या. ' दमा दाटलेल्या जिजाऊंच्या छातीत शहाजीराजे आणि सूनबाई यांच्या आठवणीने कळ दाटली.

उबळ, उबळ उसळू लागली. निर्धारी स्वभावाच्या जिजाऊ, राजे-संभाजीराजे जवळ असल्याने ती निकराने रोधू बघत होत्या. त्यांचा श्वास कोंडणीला पडला. घशात खवखव उठली. आजवर दम धरणं' त्यांनी साधले होते. पण पण आता दमा रोखणे त्यांना साधेना. उभ्या जिजाऊ खोकू लागल्या. त्यांच्या दोन्ही बगलांना हात देऊन राजे-संभाजीराजे शब्दांनी त्यांचा दमा रोधू वधू लागले.


'मासाहेब.

'आऊसाहेब." ते दोघेही पितापुत्र आपला राज्याभिषेकही क्षणभर विसरले! धाराऊ, पुतळाबाई जिजाऊंच्या पाठीशी झाल्या. साऱ्यांनी सावरून त्यांना मंचकावर बसते केले. साऱ्यांचा जीव कळवळला. आचार्यांची वर्दी घेऊन बाळंभट्ट महालात आले. त्यांना बघताच जिजाऊ म्हणाल्या, "राजे युवराज, या तुम्ही. आचार्यांची सांगी आली. आता तुम्ही आमचे नाही! सिंहासनाचे! पंडित खोळंबलेत. संभाजीराजांनी पुतळाबाई, धाराऊ यांची पायधूळ घेतली. दोघेही महावेदीकडे जायला निघाले. • मुजरा देत मागच्या कदमांनी मागे हटून वळण्यापूर्वी संभाजीराजांना मान वर करताच पदराने डोळ्यांच्या कडा टिपणाऱ्या जिजाऊ दिसल्या. त्यांचे पाय फरबंदीला जखडल्यागत झाले.

चला " राजांचा घोगरा साद त्यांच्या कानी आला. ते वळते झाले. चालू लागले..

जगदीश्वर आणि भवानीपूजनासाठी. धाप लागल्यानं पाणी दाटतंय. पाठीशी गप्प गप्प उभ्या असलेल्या धाराऊला जिजाऊ म्हणाल्या. तसे म्हणताना जिजाऊंना कळलेच नाही की धाराऊच्या डोळ्यांतही पाणी दाटलेच होते! कसलीही घाप नसताना !


महावेदीचा उभा मंडप ब्रह्मवेत्ते, पंडित, शास्त्री यांनी दाटून गेला होता. मंडपाच्या मध्यभागी, अष्टदिशांना आम्रपत्रे आणि श्रीफले मस्तकी घेतलेले सुवर्णाचे, रुप्याचे, तांब्याचे, मृत्तिकेचे कुंभ स्थापित केले होते. त्यांत दूध, दही, तूप, मध आदी पंचामृत आणि पाणी मंत्रित करून भरले होते. त्या सर्व कुंभांच्या कंठांना फेर टाकून कुंकूहळदीत न्हालेल्या शुभ्र धाग्यांनी ते अष्टकुंभ एकजीव करून एक नेटका अभिषेकचौक सिद्ध केला होता. चौकाच्या दक्षिण दिशेला औदुंबराची प्रशस्त आसंदी उभी केली होती. राजे, युवराज, सोयराबाई यांनी अभिषेकासाठी स्थानापन्न होण्याची ती बैठक होती. औदुंबराच्या पवित्र समिधांची.


तिच्यासमोर कढीव तुपाने शीग भरलेली काशाची मोठी परात रांगोळी फिरलेल्या चंदनी चौरंगावर मांडली होती. तिच्या उजव्या तर्फेने तूप भरलेला सुवर्णकलश, दूध भरलेला रौप्यकलश, दही भरलेला ताम्रकलश, मध भरलेला मृत्तिकाकलश, मोतीलगाचे नकसदार छत्र, मयूरपिसांचा अब्दागिरी पंखा, भगवे वाद लोंबणारा सोनेरी मोर्चेल असा अभिषेकी सरंजाम हारीने लावून ठेवला होता. राजमंडळाच्या समंत्रक स्नानासाठी चौकाच्या मध्यभागी दोन स्नानचौक उभे केले


होते. एक खुला. राजे व संभाजीराजांसाठी. दुसरा आडपडदे टाकलेला. सोयराबाईच्यासाठी. स्नानांचे सांडीव पाणी अभिषेकचौकाबाहेर काढण्यासाठी विटांचे पाट त्यांच्या भवतीने फिरविले होते. मंडपांचे पूजन करून मंत्रघोषांच्या गजरात राजे-संभाजीराजे सोयराबाई हे राजमंडळ मंडपात आले.


गणेशपूजनाने अभिषेकाविधीला सुरुवात झाली. कुंकू-हळदीच्या चिमटी सोडून राजमंडळ दक्षिण पाऊल धाग्यापार ठेवीत अभिषेकचौकात आले. त्यांच्या पाठोपाठ गागाभट्ट, बाळंभट्ट आदी मंत्रवेत्ते आले. मोरोपंत, हंबीरराव, आण्णाजी, रामचंद्रपंत, त्र्यंबकपंत, दत्ताजी त्रिमल, निराजीपंत आणि रघुनाथपंडित हे मंत्रिगण आले.


समंत्रक स्नानानंतर राजे-

-युवराज यांचे मृत्तिका आणि पंचामृतस्नान झाले. मंत्रांचा घोष चढीला पडला. मंडपभर जागा मिळेल तिथे माणूस दाटले होते. मंत्रिगण पाठीशी घेत राजे आसंदीजवळ आले. आनंदीची सविध पूजा झाली. पायाचा स्पर्श होणार नाही अशी दक्षता घेत राजे आसंदी आरूढ झाले. पाठोपाठ सोयराबाई आणि संभाजीराजे चढले.


अभिषेकांच्या मांडल्या सरंजामातील छत्र आण्णाजींनी उचलले, अब्दागिरी मोरपंखा , त्र्यंबकपंतांनी घेतला, सुवर्णी मोर्चेल दत्ताजींनी हाती पेलला. तिघेही आसंदीच्या पाठीशी झाले. सुवर्णकुंभ घेतलेले मोरोपंत, रौप्यकुंभ उचललेले हंबीरराव, ताम्रकुंभ तोललेले रामचंद्रपंत, मृत्तिकाकुंभ सावरलेले रघुनाथपंडित आणि सुवर्णी हिरे-रत्नजडित राजदंड पेललेले न्यायाधीश निराजीपंत आसंदीच्या दुतर्फा झाले. भंडारा वाहिलेली सोन्याची ओंजळ पूर्वेच्या दिशेने उधळून आचार्य गागाभट्टांनी खड्या आवाजात अभिषेकाची रोमांचक, पावन नांदी दिली-


“ॐ गणपतये नमः ! कुलदेवताभ्यो नमः !


मोरोपंतांनी हातीचा तूपभरला सुवर्णकुंभ बाळंभट्टांच्या हाती दिला. राजे, संभाजीराजे, सोयराबाई यांच्या राजमस्तकांवर अभिषेक होऊ लागला. ते तिघेही निथळू लागले. तूप, दूध, दही, मध अशा सत्त्वरसांत गंगा, सिंधू, यमुना अशा लोकनद्यांच्या पावन जलात, पश्चिम, पूर्व आणि दक्षिणेस गर्जत, उसळणान्या मर्दान्या सागरांच्या अशरण जलात ते निथळू लागले आणि त्यांच्या बरोबरच जगदंबेचा थोर भुत्या रायगडही निथळू लागला, जमलेल्या पन्नास हजारांवर उराउरांतून ओसंडणाऱ्या स्वातंत्र्यलाटांत. नगारखान्यावरचा सोनकिनारी जरीपटका निथळू लागला, वरच्या आकाशातून पाझरणाऱ्या आजवर कामी आलेल्या हजारो मावळवीरांच्या आनंद आसवांत जिजाऊंचे म्हातारपण' निथळू लागले, कृतार्थतेच्या, जीव कोंडणाऱ्या दम्यात! जगदंबेचे आईपण' निथळू लागले भुत्यांच्या 'कवतुक महिम्यात'. झोपडीखोपटांत अंग- टाकणाऱ्या, शिंगांची तान कानी पडताच एका हाताने पाठीशी ढाल बांधून घेत दुसऱ्या हाताने आपल्या खोपटावर चिलमीवरचा निखारा तसाच उचलून ठेवून 'जय भवानी' गर्जत घोड्यावर मांड घेणाऱ्या हर मावळी धारकऱ्यांचे 'मर्दर्पण' निथळू लागले, आता मराठा गादी जाली!" या रांगड्या अभिमानात !


अभिषेकसंपन्न झालेल्या राजमंडळाने उंचो राजपेहराव परिधान केले. काशाच्या परातीतील कढीव तुपाच्या दर्पणात मुखदर्शन घेतले. शस्त्रपूजा करून राजे, युवराजांनी अंगी शस्त्रे धारण केली. समर्थांचा कोदंड खांद्यावर घेताना राजांच्या मनात त्यांनी दिलेला दोघ टंकारला " मराठा तितुका मेळवावा! महाराष्ट्रधर्म वाढवावा! देवद्रोही तितुके कुत्ते ! मारून घालावे परते! अवघा हलकल्लोळ करावा !"


युवराज संभाजीराजांना संगती घेऊन राजे गागाभट्टांमागून चालले दरबारीचौकाकडे. सिंहासनाच्या रोखाने. त्यांच्यामागून मंत्रिगण, शास्त्री, जमलेले बिन्नीचे सरदार चालले. दूरवर डोंगररांगांआड नवा उषःकाल भवितव्याची वाट चालला.


राजे, युवराज, सोयराबाई दरबारीचौकांत आले. मुंगी रिघायला वाव मिळणार नाही असे माणूस चौकात दाटले होते. छताला धरून चौबाजूंना ओळंबलेले झालदार पडदे झळकत होते ! पुष्पमालांनी सारा दरबार शिणगारला होता. साऱ्यांचे डोळे जखडले होते, राजमंडळावर टाचा उंचावून माणसे धडपडत होती. राजदर्शनासाठी. राजे, सोयराबाई, युवराज सिंहासनाच्या चौथऱ्यासमोर आले. प्रथम पायरीला लागूनच एका चौरंगावर चांदीचे पंगाळ होते. त्यात ताम्र मुहूर्तपात्र सोडले होते.. • आचार्यांनी दिलेले श्रीफळ चौथऱ्याच्या प्रथम पायरीजवळ वाढवून राजांनी भकले दुहाती फेकली. सिंहासनाची सविध पूजा बांधली. पोतराजाने समोर धरलेल्या परडीतील भंडाऱ्याची मूठ उघळली.


" जगदंब, जगदंब” कुणालाही ऐकू येणार नाही असे स्मरण करीत राजांनी सोनपत्र्याने मढविलेल्या चौथऱ्याच्या पायरीवर उजवा पाय ठेवला. राजे चौथरा चढू लागले. त्यांच्या पायमागाला धरून सोयराबाई, संभाजीराजे चौथरा चढले.


मोतीलगाच्या छत्राला धरून असलेल्या, व्याप्रदंडी हिरे-रत्नजडित, प्रशस्त, सुवर्णसिंहासनाला छातीशी हात भिडवीत राजांनी वंदन केले. पाय न लावता, उगवता पुढा धरून त्यांनी सिंहासनावर वीरबैठक घेतली.


सिंहासनासमोरच्या चरणासनाला लागून असलेल्या उजव्या सोनेरी पायरीवर संभाजीराजांनी बैठक घेतली. डाव्या तर्फेला असलेल्या पडदेबंद राणीवशात सोयराबाईनी - बैठक घेतली. अष्टप्रधान मानाप्रमाणे एक एक सुवर्णस्तंभ धरून खडे झाले. अब्दागिरे, गुर्झबदार, चवरीवाले, पंखावाले यांनी आपआपल्या जागा घेतल्या. आचार्य गागाभट्टांनी राजे युवराज यांच्या मस्तकीचे टोप उतरून मोकळ्या तबकात ठेवले. दुसऱ्या तबकात असलेला राजांचा अभिमंत्रित शुभ्रवर्णी टोप आचार्यांनी हाती घेतला. मंत्रसाद उठू लागले. मुहूर्तपात्र पंगाळात डुबताना आचार्यांनी राजटोप राजांच्या मस्तकी स्वापित केला. दुसरा केशरी टोप संभाजीराजांच्या मस्तकी चढविला. रायगडाचा बुलंद तोफखाना दणाणू लागला. उखळी, बंदुकांच्या फेरी झडू लागल्या. चौघडे, नगारे, शाजणे यांचा राजडंका घुमू लागला.


गुर्झबदारने हातचा गुर्झब उचलून धरीत ठणठणीत अल्काब दिला-


राजशिवाविराजित सकळगुणमंडित, त्रिकुल्यवतंस, सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदुपदपातशहा ऽ श्रीमन् महाराज छत्रपति शिवाजीमहाराज की ...!"


"जय ! जय जय ऽ!" उभ्या दरबाराने तो अल्काब वरच्यावर तोलून धरला. त्या कल्लोळाने चौथऱ्यावरची सुवर्णी न्यायतुलाही थरथरली. आपल्या दोन्ही पारड्यांत नाचण्याएवढीही तफावत नाही ना याची खातरजमा करून घेत स्थिर झाली !


कानी पडलेला जयकार संभाजीराजांच्या अंगी टपटपून उठला. त्यांना वाटले उठावे आणि घाटी फुलवीत आपणही त्याला दाद द्यावी!


• उगवतीवर आलेल्या सूर्याची किरणे थेट चौथऱ्याला मुजरा द्यायला रुजू झाली ! सुवर्णी सिंहासन झळाळून उठले. नेहमीच्या सरावाने संभाजीराजे बसल्या बैठकीवरूनच दूरवर दिसणाऱ्या सूर्याचे दर्शन घेण्यात दंगले.


त्यांचे ते सूर्यदर्शन भंगले, कारण त्यांच्या अवती-भोवती रोमांचक खणखणाट करीत सोनमोहरा कोसळत होत्या! सिंहासनमंडित राजांना प्रधानमंत्री मोरोपंत ओंजळींनी 'सुवर्णस्नान घालीत होते. राजांच्या मस्तकावरून उड्या घेत उतरलेल्या मोहरांचा, पायगतीला बसलेल्या संभाजीराजांच्या भोवती सडाच सडा पडू लागला.


एकलगीने भरजरी नजराण्यांची शेकडो तबके सिंहासनासमोर पेश येऊ लागली. दरबारी गर्दीतून वाट काढीत टोपीकरांचा गोरा साहेब हेन्री ऑक्झेंडन सिंहासनासमोर आला.


डोकीवरची साहेबी टोपी उतरून राजे युवराजांना कमरेत झुकून अदव देताना तो टोपीकर बोलीत पुटपुटला- - 'युवर एक्सलन्सी राजा सेवानी में पॉवर हिज मर्सी टू अॅक्सेप्ट पि गिफ्टस ऑफ कंपनी!"


त्याच्या तबकधान्यांनी आणलेल्या नजराण्यात राजांच्यासाठी एक हिरेजडित शिरपेच, दोन किमती मोती आणि दोन हिरेजडित सलकड्या होत्या. संभाजीराजांच्यासाठी दोन हिरेमंडित सलकड्या आणि भरजरी हिऱ्यांची एक कंठी होती.


नजराण्याचा विधी आटोपला. महादानी देकार सुरू झाला. जमल्या ब्राह्मणांना, गोसावी, उत्पात, वासुदेव, भुत्ये, पोतराज, बैतेदार, फकीर, बैराग्यांना राजे युवराज दान करू लागले, दान पेणारे भरल्या तोंडाने दुवा आशीर्वाद देऊ लागले. तथास्तु. भोलानाथ सुखी ठेवील. खुदा सलामत रखे.