कोणतही शिवकाव्य येथे शोधा

सांगली जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सांगली जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बाणूरगड / भूपाळगड / भूपालगड


किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
डोंगररांग: खानापूर-आटपाडी
चढाईची श्रेणी: सोपी
जिल्हा: सांगली
तालुका: खानापूर
किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळ्गड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सान्गोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळ्गड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमरक्षेच्या द्रुष्टीने भूपाळ्गडास अनन्यसाधारण असे महत्त्व होते.इतिहास‘बुसातिन-उस-सलातिन’ या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायांनी मांजऱ्या नजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले. तर एका लोककथेनुसार भूपाळसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे भूपाळगड असे नाव पडले. शिवकालात अफझलखानाच्या वधानंतर हा किल्ला स्वराज्यात आला. छत्रपती शिवरायांनी त्याची डागडुजी केली.शाहिस्तेखानाने केलेल्या स्वारीत फिरंगोजी नरसाळा किल्लेदाराने चाकणचा संग्रामदुर्ग ५५ दिवस लढवला म्हणून त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.पुढे डिसेंबर १६७८ मध्ये युवराज संभाजीराजे मोगलास जाऊन मिळाले. या घटनेनंतर संभाजीराजांनाबरोबर घेऊन दिलेरखान मराठी मुलूखावर हल्ला करीत सुटला, पुढे विजापूरवर चालून जात असताना वाटेत लागणाऱ्या भूपाळ्गडावर मोघलांनी हल्ला चढविला. दिलेर खानाने शेजारील डोंगरावर तोफा चढवल्या, तोफांच्या माऱ्याने किल्ल्याचा बुरुज ढासळला. एकाच प्रहरात किल्ला मोगलांच्या हाताला लागला. महाराजांना ही खबर लागताच सैन्याची कुमक मदतीस पाठवली, पण ही मदत मिळायच्या आतच किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला होता.भूपाळगडावरून प्रतिकार झालाच नव्हता कारण दिलेरखानाने शंभूराजांना पुढे केले होते. शंभू राजानी फिरंगोजी नरसाळे यांना एक पत्र धाडले होते त्यात लिहले होते की,स्वराजाचा युवराज म्हणून किल्ला खाली करण्याची अर्जी करत आहोत.उल्लेख स्वराजाचा युवराज म्हणून केला गेला होता दिलेरखानचा सरदार म्हणून नाही, त्यामुळे फिरंगोजी नरसाळे यांनी संभाजी राज्यांविरूद्ध तलवार उचलली नाही.भूपाळगड संभाजीराज्यांच्या ताब्यात देऊन ते महाराजांकडे रायगडावर निघून आले. याबद्दल महाराजांनी फिरंगोजींची खूप खरडपट्टी काढली. तसेच सर्व गडांवर निरोप धाडले की संभाजीराजे जातीने आले तरी तलवार चालवणे. गड ताब्यात न देणे.आजू बाजूच्या परगण्यातील मराठ्यांना या हल्ल्याची माहिती कळाली तर ते मदतीस येऊन पोहोचतील या भीतीने दिलेरखानने लगेच इखलासखान, जसवंतसिंग बुंदेला व रशीदअली रोशनाई यांना रक्षणाकरिता नामजाद केले, किल्ल्यावरील सर्व लोकांना कैद केले गेले.जे ७०० मावळे कैद झाले होते त्या प्रत्येकाचा एक हात कापून त्यास सोडून दिले. इतिहासाचा हा एक दुर्दैवी अध्याय आहे. इतिहास हा कधी कधी कडू असतो. त्यातीलच हे एक पान.किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणेभूपाळगड हा किल्ला आकाराने मोठ्या क्षेत्रफळाचा आहे, याच्या एका कोपर्यावर बाणूरगड गाव वसलेले आहे. गावातून पायवाट गडावर जाते येथून आपण पुढे कातळात खोदून तयार केलेल्या एका मोठ्या तलावावर येऊन पोहोचतो, हा तलाव पाहून बालेकिल्ल्याकडे चालू लागायचं, त्यासाठी दगडी पायर्यांची वाट आहे. समोरच्या टेकडीवर महादेवाचे मंदिर लागते, मंदिराच्या गाभार्यात शिवलिंग असून ते बाणूरलिंग या नावाने ओळखले जाते.शिव मंदिरातून बहेर पड्ल्यावर उजव्या हातास शिवकालातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चौथऱ्यावर वृंदावन समाधी आपणास दिसते. बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचे साक्षीदार म्हणजेच नाईक होते. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते, तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले. बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं.बाणूरगडावर हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते हा वीर शत्रूच्या ताब्यात सापडला तर काहिंच्या मते दूरवर शत्रूचा घाव वर्मी बसल्याने या वीराने शंभू महादेवापाशी येवून प्राण सोडले. पण ही समाधी बहिर्जी नाईक यांची असल्याची नोंद इतिहासात कागदपत्रात कोठेच नाही. समाधी समोरून जाणार्या पायवाटेने थोडे खाली उतरल्यावर आपणास गडाची तटबंदी पहायला मिळते, दगड एकमेकावर रचून तयार केलेल्या या तटबंदीत जागोजागी बाहेर पडण्यासाठी छोटे चोर दरवाजेही तयार केले आहेत. भूपाळ्गड हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड असला तरीहि एक तलाव, महादेव मंदिर, बहिर्जी नाईकांची समाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष एवढेच काय ते शिल्लक आहेत.
माहिती साभार: प्रतिक जाधवbanurgad_bhupalgad

बहादूरवाडी किल्ला


किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: सांगली
तालुका: वाळवायेडे
निपाणी येथील विलासगड किल्ल्यापासून कोल्हापूरच्या रस्त्याने पुढे गेल्यावर बहादूरवाडी फाटा आहे. या गावात अपरिचित भुईकोट आहे. या कोटाची अवस्था पाहता खुद्द गावातल्यांनाही त्याबद्दलची आत्मीयता वाटत नाही हे सहज लक्षात येते. पण प्रथमदर्शनीच हा कोट मोहात पाडतो.बहादुरवाडी किल्ला माधवराव पेशव्यांनी बांधला. नंतर तो पटवर्धनांच्या ताब्यात देऊन कोल्हापूरकरांवर वचक बसवण्यासाठी याचा उपयोग केला गेला. या कोटाची बांधणी खणखणीत आहे. तटबंदीच्या बाहेर खंदक खोदलेला आहे. कोटाला चार तटबंद्या आहेत. खंदकाला जोडून असलेल्या तटबंदीला १२ बुरुज आहेत. त्याआतील दुसरी तटबंदी पाच मीटर आहे. ती गोलाकार असून, त्याला आठ बुरुज आहेत. अशा एकात एक चार तटबंद्या असून, चौथी मात्र आयताकृती आहे. किल्ल्यामध्ये एक विहीर आणि वाडय़ाचे काही अवशेष आहेत. कोटालगत वेतोबाचे छोटेखानी मंदिर आहे.bahadurwadi

विलासगड


किल्ल्याची उंची: २४०० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
डोंगररांग: येडेनिपाणी
चढाईची श्रेणी: सोपी
जिल्हा: सांगली
तालुका: वाळवा
विलासगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारा एक दुर्लक्षित किल्ला असून, विलासगड पेक्षा मल्लिकर्जुन देवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो.गडपायथ्यापासून प्राचीनत्वाची साक्ष देतात. इथे एकूण सहा लेण्या आहेत. त्यातील एक अर्धवट सोडून दिलेली आहे. उर्वरित लेण्यांपैकी एकात मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे, तर इतरांचे ओवऱ्यात रूपांतर झाले आहे.गडावर जाण्यासाठी कातळात खोदून तयार केलेल्या पायऱ्यांची वाट आहे, या वाटेने वीस मिनिटे चालत गेल्यावर आपण मल्लिकर्जुन मंदिरापाशी येऊन पोहोचतो. हे मंदीर कातळाच्या पोटातील गुहेत असून त्याच्या समोर यादवकालिन बांधणीचा छोटासा मंडप आहे. या मंडपातून मूळ गुहा मंदिराच्या आत पोहोचायचे, गुहेच्या आत भीमाशंकर, उमाशंकर, सोरटीसोमनाथ, कार्तिकस्वामी यांची वेगवेगळी गुहा दालने आहेत. मल्लिकर्जुनाचे मुख्य स्थान येथील उजव्या बाजूच्या गुहा दालनात असून तेथे एक शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोरील गुहेत वाकड्या तोंडाचा नंदी आहे, पार्वती देवीने मारल्याने नंदीचे तोंड वाकडे झाल्याचे येथील पुजारी सांगतात.हा मंदिर परिसर पाहुन येथुनच वर चढणाऱ्या पायवाटेने गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालू लागायचं, थोडी चढाई केल्यानंतर आपण गड्माथ्यावर येऊन पोहोचतो. गडमाथ्यावर विठ्ठ्ल रखुमाइचे व श्रीकृष्णाचे मंदिर आहे, या मंदिराला तळघर आहे. बाजूलाच आदिलशाही काळातील काझाकबीर चांद्साहेब दर्गा आहे.हा दर्गा परिसर पाहून येथे शेजारीच उभ्या असणाऱ्या आदिलशाही बांधणीचा दगडी वास्तूत पोहोचायच, गडाचे गडपण शाबूत करणारी ही एकमेव वास्तू आहे, येथून समोरच एक तलाव आहे, हा तलाव पाहून गडाच्या टोकावर गेल्यावर समोर आपणास एक सपाट पठार दिसते. या ठिकाणास घोडेतळ म्हणतात.विलासगडाची संपूर्ण गडफेरी करण्यास २-३ तास पुरतात, किल्ल्याच्या खुणा सांगणारे वस्तू व्यतिरिक्त कोठेही तटबंदी व बुरुज आज शिल्लक नाहीत.vilasgad

बागणी किल्ला


किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: सांगली
तालुका: वाळवा
वाळवा तालुक्यातील बागणी भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे, येथे पीरचा दर्गा असून मोठा उरूस भरतो. वारणाकाठचे बागणी हे तीनशे वर्षापूर्वीचे नावाजलेले आणि गजबजलेले गाव होते, त्यावेळची येथे एक मोठी बाजारपेठ होती. शिवाय या जागेला ऐतिहासिकदृष्ट्याही महत्व होते. तेथे संभाजी महाराजांच्या काळाआधीपासून एक भुईकोट किल्ला होता. तो किल्ला आजही गावातील एक प्रमुख स्थान म्हणून ओळखला जातो.आज किल्ल्याची तटबंदी आणि भग्न वास्तू शिवाय पाह्ण्यासारखे काही शिल्लक नाही.कवठेएकंद येथील श्री सिद्धराम मंदिर पाहण्यासारखे आहे. विजयादशमीच्या दिवशी येथे फार मोठ्या प्रमाणावर शोभेचे दारूकाम होते.bagni

मच्छिंद्रगड


किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
डोंगररांग: सांगली
चढाईची श्रेणी: मध्यम
जिल्हा: सांगली
तालुका: वाळवा
मच्छिंद्रगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला. इ.स.१६७६ च्या सुमारास स्वराज्यास बळ्कटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायांनी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला. मच्छिंद्रगड किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे.इतिहासछत्रपती शिवरायांनी मच्छिंद्रगडाची उभारणी केली, पुढे इ.स. १६९३ मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता त्यावेळी याचा किल्लेदार देवीसिंग होता. १२ नोव्हेंबर १६९३ रोजी औरंगजेब तख्त्तेखांवर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला, तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला, त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला. औरंगजेबाच्या म्रुत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे इ.स.१८१८ मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला.गडावरील पाहण्यासारखी ठिकाणेमच्छिंद्रगड गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट केलेली असून या वाटेने साधारण अर्धा तास चढाई केल्यानंतर आपण मच्छिंद्रगडाच्या माथ्यावर येवून पोहोचतो. येथून एक पायवाट आपल्याला गडाच्या दक्षिण भागात असलेल्या मच्छिंद्रनाथ मंदिराकडे घेवून जाते. मंदिर प्रशस्त असून विविध शिल्पांनी सजविलेले आहे. येथे भाविकांचा नेहमी राबता असतो. येथून देवळाच्या पिछाडीस एक मोठी कोरडी विहीर आहे, नंतर तटाकडेने पुढे गेल्यावर जुन्या काळातील समाध्या दिसतात.मच्छिन्द्रगडाचा माथ्याचा आकार आटोपशीर असल्यामुळे गडफेरी साधारण तासाभरात पूर्ण होते, गडावर जुने अवशेष तसे फार कमी असून तटबंदीसुध्दा आता जुजबी स्वरूपत उरलेली आहे.machhindragad

प्रचीतीगड



किल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
चढाई श्रेणी: मध्यम
जिल्हा: सांगली
तालुका: शिराळा
शिराळा हा एक पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील डोंगराळ तालुका आहे. हा घनदाट जंगले व मुसळधार पाऊस असणारा प्रदेश आहे. तालुक्याच्या शेवटी चांदोली अभयारण्य आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीने बांधलेले धारण म्हणून चांदोली धरण ‘वसंत सागर’ ओळखले जाते. या धरणाला लाभलेले निसर्गाचे देणे असे आहे कि हे धरण बांधल्यापासून एकदाही रिकामे झाले नाही नेहमी पावसाळ्यात हे धरण १००% भरतेच इतका प्रचंड पूस या धरण परिसरात होतो. यातूनच वारणा नदी वाहते, या नदीमुळे वारणाकाठचा प्रदेशाला बारमाही पाणी मिळाले आहे. चांदोली अभयारण्य शेवटी प्रचीतीगड नावाचा किल्ला आहे.या किल्ल्यावर प्रचीती देवीचे मंदिर आहे म्हणून या किल्ल्याला प्रचीतीगड हे नाव पडले. मंदिरासमोर दोन तोफा आहेत. किल्ल्यात कातळात खोदलेला तलाव आहे. त्यावेळी हा किल्ला मराठ्यांच्या राज्याचे कारागृह होते येथे कडेलोटाच्या शिक्षेसाठी गुन्हेगारांना आणले जात. या किल्ल्याच्या पायथ्याशी शृंगारपुर आहे, छत्रपती संभाजी महाराजांची सासुरवाडी तसेच महाराणी सईबाई यांचे माहेर.शिराळा हे सांगली पासून ६० किमी अंतरावर आहे तर मुंबई पासून ३५० किमी अंतरावर आहे. कोल्हापूर पासून ५३ कि. मी. आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील पेठ नाक्यापासून १५ कि. मी. अंतरावर आहे. शिराळा तालुक्याला रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या ४ जिल्ह्यांच्या सीमा आहेत.
prachitigad

शिराळा किल्ला

shirala
किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: सांगली
तालुका: शिराळा
शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावास बत्तीस शिराळा किंवा ३२ शिराळा या नावांनीही ओळखले जाते. शिराळा तालुक्यात प्रमुख दोन किल्ले आहेत शिराळा आणि प्रचीतीगड.शिराळ्याचा उल्लेख इ.स. ९००च्या पूर्वीपासून आढळतो. इथे असणारे अंबामातेचे मंदिर, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर, गोराक्षनाथानी इथे केलेले वास्तव्य, इथे असणारी पुरातन मंदिरे, या गावात महाराजांच्या काळात गोळा होत असलेल्या ३२ गावांच्या महसुलामुळे या गावाला पडलेले नाव म्हणजेच बत्तीस शिराळा. छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी पकडले तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम पडला होता. तेव्हा शिराळा गावच्या इनामदार आणि किल्ल्याचे किल्लेदार तुलाजी देशमुख आणि गावाचे दीक्षित यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता; पण त्यात ते अयशस्वी झाले.शिराळा हे गाव नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे जगभर प्रसिद्ध आहे. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे.शिराळा हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील पेठ नाक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. ते मुंबई पासून ३५० किलोमीटरवर आणि कोल्हापूर पासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे.

रामगड / रामदुर्ग किल्ला


किल्ल्याची उंची: १५० फुट
जिल्हा: सांगली
तालुका: जत
जत हा सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुका आहेत. याच तालुक्याच्या गावाजवळ जत-कवठे महांकाळ रस्त्यावर जत पासून अवघ्या ५ किमी अंतरावर रामपूर नावाचे गाव आहे. या गावात एक छोटा, देखणा व अपरितीच किल्ला लपला आहे त्याचे नाव रामगड. रामपूर गावाच्या मागच्याच टेकडीवर हा छोटेखानी किल्ला आहे. हि टेकडी इतकी छोटी आहेत कि आपण टेकडी चढायला सुरवात करे पर्यंत किल्ल्याच्या महादरवाज्यात येऊन पोहोचतो.
रामपूर गावाच्या मागे एक पाण्याची टाकी आहे येथे पायउतार होऊन अगदी पाचच मिनिटात आपण गडाच्या ढासळलेल्या तटबंदीवरून किंवा प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करू शकतो. एक मात्र खरे कि इथल्या स्थानिकांना या किल्ल्याबद्दल कोणतीही आस्था दिसत नाही हे किल्याच्या दुरावस्थेवरूनच लक्षात येते. किल्ल्यामध्ये बाभळीचे भयंकर रान माजले आहे त्यामुळे येथे चालताना खूप काळजी घ्यावी लागते.
किल्ल्याचे प्रवेशद्वार सुस्थितीत असून तटबंदी मात्र बरीचशी ढासळली आहे. तटबंदीमधेच एक दरवाजा अगदी साधेपणाने बांधलेला आहे ज्याची कमान अजून तरी टिकून आहे. याच्या बंधणीवरून हा पेशवेकालीन (१८ व्या शतकातला) असावा असे वाटते. दरवाज्याआतील पहारेकर्याच्या देवड्या व पायऱ्या पुर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. गडाच्या डाव्या बाजूला तटबंदीमधून वेगळा असलेला एक उंच टेहाळणी बुरुज आहे ज्यावर भगवे निशाण लावलेले आहे. या टेहाळणी बुरुजा व्यतिरिक्त या किल्ल्याला दुसरा कोणताही बुरुज नाही. गडाच्या मागच्या बाजूस एक तलाव आहे व येथे गडाची तटबंदी अगदी त्या तलावपर्यंत खाली बांधत नेलेली आढळते. याच ठिकाणी एक चोर दरवाजा व तलाव पर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या दिसतात. मात्र बाभळीच्या प्रचंड झाडीमुळे खाली उतरता येत नाही. किल्ल्यामध्ये वाड्याचे अथवा सदरेचे वाटावे असे काही अवशेष दिसतात. किल्ल्याच्या मध्यभागी एक सुंदर हेमाडपंती शिवमंदिर आहे. मंदिराला अर्धमंडप व गाभारा असून मंडपातील खांब घडीव दगडाचे आणि गोलाकार आहेत. मंदिरा शेजारच्या बाभळीच्या झुडूपात एक उखळ दडलेला आहे. गडाची तटबंदी ठिकठिकाणी ढासळली असली तरी गडाचे अवशेष अजूनही पाहण्यासाखे आहेत.
गडाचा इतिहास फारसा ज्ञात नाही पण शिवाजी महाराज इथे येवून गेल्याचे स्थानिक आवर्जून सांगतात. पण नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर आणि सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी आदिलशाहीवर केलेल्या अनेक बेधडक आणि धाडसी मोहिमांचा इतिहास पाहता या गडाला त्यांचेही वास्तव्य लाभले असण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील हेमाडपंती शिवमंदिर मात्र या टेकडी किंवा या किल्ल्याच्या प्राचीनतेची साक्ष देते.
माहिती साभार : – विनीत दाते
ramdurg

गणेशदुर्ग किल्ला

ganeshdurg
किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: सांगली
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते.कृष्णेकाठी वसलेले सांगली हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.१८०१ साली चिंतामणरावांनी सांगली संस्थान स्थापन केलं तरी सुरुवातीची त्यांची काही वर्षे, धोंडजी वाघाबरोबरची आणि करवीरकरांविरुद्ध चाललेल्या युद्धातच गेली. नंतर त्यांनी सांगली गावाच्या संरक्षणासाठी सुप्रसिद्ध गणेशदुर्ग बांधला. चारी बाजूंनी खंदक असलेला हा भुईकोट किल्ला म्हणजे सांगलीचे एक वैशिष्ट्यच ! किल्ल्याचे बरेचशे भाग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असले तरीही तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार मात्र सुस्थितीत आहे.पटवर्धन घराणे परम गणेशभक्त. संरक्षणासाठी गणेशदुर्ग बांधल्यावर पूजेसाठी देऊळ हवंच, म्हणून १८११ साली चिंतामणरावांनी सांगलीचं भूषण ठरणारं गणपती मंदिर बांधायला घेतलं. त्याचं काम तब्बल तीस वर्ष चालू होतं.याच गणेशदुर्गाच्या तुरुंगातून खंदकात उड्या टाकून स्वातंत्र्यसंग्रामात वसंतदादा पाटील यांनी ऐतिहासिक पलायन केलं होतं.