कोणतही शिवकाव्य येथे शोधा

नांदेड जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नांदेड जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रामगड / माहूरगड / माहूरचा किल्ला


उंची: २६०० फुट
डोंगररांग: सातपुडा
चढाई श्रेणी: मध्यम
जिल्हा: नांदेड
माहूर / माहोर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.माहूर, नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. श्रीरेणुकादेवी मंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. इतिहास प्रेमींसाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.शिवकाळात औरंगजेबाच्या आदेशावरून स्वराज्यावर चालून आलेली मुघलांची मनसबदार पंडिता रायबाघन (राजव्याघ्री) उर्फ सावित्रीबाई ही सुद्धा माहुरची. सावित्रीबाई माहूरचे राजे उदाराम देशमुख यांची पत्नी. राजे उदाराम यांच्या मृत्युनंतर वऱ्हाड प्रांतात हरचंदराय नावाच्या सरदाराने बंड केले. हे बंड सावित्रीबाईने मोडून काढले व वऱ्हाड प्रांतातील मोघली अंमल कायम राहिला. सावित्रीबाईच्या ह्या कामगिरीवर खुश होऊन औरंगजेबाने सावित्रीबाईला ‘पंडिता’ आणि ‘रायबाघन’ हे दोन किताब बहाल केले.माहूर येथे रेणुकादेवीचे मुख्य स्थान असल्यामुळे वर्षभर माहूर भक्तांनी गजबजलेले असते. येथे येणारे सर्व भाविक रेणुकादेवीचे, अनुसयामातेचे (दत्तात्रयांची आई) आणि दत्तशिखर येथे दत्तात्रयांचे दर्शन घेऊन निघून जातात. माहूर येथे येणाऱ्या भाविकांपैकी बोटावर मोजता येतील एवढे भाविक माहूरच्या किल्ल्याला किंवा रामगडला भेट देतात. पण माहुर येथे असलेली लेणी पर्यटकांची वाट बघत असतात. माहूर येथील लेण्यांना पांडवलेणी म्हणून ओळखले जाते. पांडवलेणी माहूर एसटी स्थानकापासून जास्तीत जास्त १५ मिनिटावर असूनसुद्धा येथे फारसे कोणीही येत नाही.माहूर येथील लेणी उत्तराभिमुखी असून एका टेकडीत कोरलेली आहेत. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणी साधारणपणे ६व्या ते ७व्या शतकात म्हणजे राष्ट्रकुट काळात कोरलेली आहेत. ही हिंदू लेणी असून लेणी संकुलात चार लेणी आहेत. संकुलाच्या मध्यभागी दगडी खांबांनी युक्त असे मोठे लेणे आहे. या लेण्याच्या दर्शनी भागात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. वरांड्यातून मुख्य दालनात प्रवेश करताना सहा पूर्ण स्तंभ आणि २ अर्ध स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. या खांबांवर शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे कोरलेली आहेत. पण खांबाना पांढरा रंग मारलेला असल्यामुळे मूर्ती पटकन ओळखता येत नाहीत. या दालनाला जोडून गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. गर्भगृहाच्या दरवाज्यावर दोन्ही बाजूला द्वारपालांची भव्य शिल्प कोरलेली आहेत. गर्भगृहाला पूर्ण प्रदक्षिणा मारता येते.मुख्य लेण्याच्या डाव्या बाजूला दोन अर्धवट कोरलेली असून एका लेण्यात गणपतीची मूर्ती कोरलेली आहे, दुसरे लेणे रिकामे आहे. मुख्य लेण्याच्या उजव्या बाजूला असलेल्या लेण्यांच्या दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. स्तंभांच्या पलीकडे मोठा वरंडा असून वरांडाच्या दोन्ही बाजूना विहार कोरलेले आहेत. हे दोन्ही विहार दिसायला सारखे असून दोघांच्याही दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ कोरलेले आहेत. या लेण्याच्या अंतर्भागात आणखीन तीन लेणी कोरलेली असून यात देवतांच्या मूर्ती पण कोरलेल्या आहेत. पण लेण्यात असलेल्या अंधारामुळे या मूर्ती पटकन दिसून येत नाहीत. या तिन्ही लेण्यात दगडी बाकसुद्धा कोरलेले आहेत.पांडव वनवासात असताना भीमाचे आणि हिडिंब राक्षसाचे युद्ध, भीम आणि हिडिंबेचा विवाह आणि घटोत्कचाचा जन्म याच पांडवलेण्यांच्या परिसरात झाला, असा स्थानिक लोकांचा समज आहे.
माहूर येथील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे : श्री रेणुकामाता मंदिरपरशुराम मंदिरअनुसयामाता मंदिरदत्तशिखरदेवदेवेश्वर मंदिरमाहूर संग्रहालयरामगड उर्फ माहूरचा किल्ला, किल्ल्यात असलेले महालक्ष्मी मंदिरराजे उदाराम देशमुख वाडासोनापीर दर्गा.
जाण्याचे मार्ग: माहूर येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक किनवट. किनवट पासून माहूर साधारणपणे २० कि.मी.वर. पण किनवट येथे फार कमी गाड्या थांबत असल्यामुळे शेगाव किंवा अकोले सोयीचे.
जेवण आणि राहण्याची सोय : माहूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे राहण्यासाठी भरपूर धर्मशाळा / भक्त निवास आणि जेवणासाठी भरपूर उपहारगृहे उपलब्ध आहेत.
टीप : उन्हाळ्यामध्ये ह्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे माहूरला भेट देण्यासाठी हिवाळा हा योग्य मोसम आहे.raamgad_mahurgad

नंदगिरी किल्ला


नांदेड रेल्वेस्थानकापासून ४ कि.मी. अंतरावर कळंबच्या राजाने बांधलेला नांदेडचा नंदगिरी किल्ला आहे.संथ वाहणार्या गोदावरीच्या विस्तीर्ण पात्राच्या शेजारी दिमाखदार तटबंदीचे कवच अंगावर घेऊन तीनशे वर्षांपूर्वींचा इतिहास सांगणारा नंदगिरी किल्ला कात टाकत आहे.गोदावरी नदीच्या काठावर शहराच्या दक्षिणेला जुन्या नांदेडात उत्तर दिशेला किल्ल्याचे प्रवेशद्वार असून, नदीच्या मोठय़ा वळणावर असलेला हा किल्ला लांबूनच आपली ओळख सांगतो. या किल्ल्याने सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादवांचा कालखंड पाहिला आहे. सुभेदारी महाल, नियोजनबद्ध उद्यान, कारंजे, वॉटरटँक ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये होती. परंतु, त्यांच्या खुणाही पाहण्यास मिळत नाहीत. किल्ल्याला सहा बुरूज असून, तीन बुरूज गोदावरी नदीच्या दिशेने तोंड करून उभे आहेत. दक्षिणेकडचा बुरूज सर्वांत उंच असून, त्याला टेहळणी बुरूज म्हणून संबोधले जात असे.तीनशे वर्षांपूर्वी उमदतुल्ला खान, फिरोज जंग हे सुभेदार येथे वास्तव्यास होते. सय्यद अब्दुला, शादुल्लाह खान, अलिमोद्दीन खान व शाहिस्ते खान यांचा मुलगा खुदाबंद खान यांचेही किल्ल्यात सुभेदार म्हणून वास्तव्य होते. तेलंगणा सुभ्याचे सुभेदारही येथे राहत असत.सन १९३६ मध्ये या ऐतिहासिक वास्तूत मराठवाड्यातील पहिले पाणीपुरवठा पंपहाउस शुद्धीकरण केंद्रासह सुरू करण्यात आले.nandgiri

कंधारचा किल्ला


प्रकार : भुईकोट किल्ला
चढाईची श्रेणी: सोपी
ठिकाण कंधार, महाराष्ट्र
जवळचे गाव कंधार
कंधारचा किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ २४ किलोमीटर इतके असून, चहु बांजूनी खंदक आहे.इतिहासया किल्ल्याचे बांधकाम मालखेडचा राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचा शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करुन बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे.kandhar