कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १०४

 संभाजीराजांचे बोट धरून चालत येणारे रामराजे, जिजाऊ थकल्या नजरेनेच पण कौतुकाने बघू लागल्या. त्या मनोमन म्हणाल्याही " असेच रहा. रामभरतासारखे!' - “राजे, यांना कशाला त्रास देता ? " वैद्यांकडे बघत जिजाऊंनी विचारले. " आईचं करताना मुलाला त्रास कसला ? " वैद्यांनी त्यांना धीर द्यायचा यत्न केला.


मंचकावर टेकून महाराजांनी जिजाऊंचा हात हाती घेतला. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या संभाजीराजे आणि रामराजांनी मंचकावर बसावे म्हणून जिजाऊंनी हात थोपटून खूण दिली. संभाजीराजांनी उचलून रामराजांना मंचकावर ठेवले. जिजाऊंचा थरथरता हात रामराजांच्या पाठीवरून फिरू लागला. शांत आवाजात त्या म्हणाल्या, “बाळराजे, दादामहाराजांचे धरले बोट सोडू नका.' “मासाहेब, कसं वाटतंय ? जिजाऊ आपणाला टाळू बघताहेत हे जाणून


"महाराजांनी विचारले. 'आता काय वाटायचं राजे ? आम्ही वाटण्याच्या पलीकडे गेलोत. या सान्यांना नजरभर बघून बरं वाटतं.” जिजाऊंचा आवाज साऱ्यांनाच परका वाटला. "राजे, एक वाटतं.” जिजाऊंचा आवाज साऱ्यांनाच परका वाटला. " आज्ञा मासाहेब.” महाराजांनी त्यांचा हात मायेने थोपटला.


"आम्हास आम्हास आईचा गोंधळ ऐकावा वाटतो! " - महाराज चरकल्या नजरेने त्यांच्याकडे बघतच राहिले. मग त्यांनी मोरोपंतांना नजर दिली. तिचा इशारा ओळखून पंत गोंधळ्यांना निरोप धाडण्यासाठी बाहेर पडले. औषधी पोतडी खोलून वैद्यांनी नाना प्रकारच्या मात्रा जोडल्या.


रात्री वाड्यात गोंधळाचा चौक मांडण्यात आला. आपल्या हाताने जिजाऊंनी जमल्या गोंधळ्यांना पानविडा आणि वस्त्रे दिली. ती पाजळून गोंधळ्यांनी नमन घरले.. त्यांचा म्होरक्या उदासवाण्या आबाजीत आईचा महिमा गाऊ लागला.


" उदर परडी देऊन हाती- ब्रह्मांडी फिरवी. लक्ष चौऱ्याऐशी घरची भीक्षा मागविली बरवी- ज्या ज्या घरी मी भीक्षा केली - ते ते घर रुचले ! आदिशक्तीचे कवतुक मोठे भुत्या मज केले. 


ते ऐकताना जिजाऊंचे पाय चेपणाऱ्या संभाजीराजांचे डोळे झरझरू लागले. राजांच्या गळ्यात दम्यासारखी दाटण झाली. जिजाऊ मात्र डोळे मिटून शांत पडून होत्या. बाहेर वाड्यात कोसळणाऱ्या पावसाच्या गजरात संबळ तुणतुण्याचे सूरसाद क्षीण होत विरून जात होते.


ज्येष्ठ वद्य नवमीची काळरात्र पाचाडच्या वाड्याभोवती घिरट्या घालू लागली. बाहेर पावसाची रपरप धुडगूस घालीत होती. आत दरुणीमहालात मायेच्या मंचकाभोवती जमलेली मने चिंतेने कळंजली होती. आऊसाहेबांच्या हट्टी दम्यासमोर मात्रा हरल्या होत्या, काढे कंटाळले होते, वनस्पती वरमल्या होत्या. खोकून खोकून फासळी फासळी खिळखिळी झालेल्या जिजाऊंचा डोळा लागला होता. त्यांची झोपमोड होईल म्हणून हाती धरलेला त्यांचा हात तसाच ठेवून संभाजीराजे बसले होते. त्यांच्या शेजारीच महाराज आणि रामराजे टेकले होते...


मोरोपंत, आण्णाजी, चांगोजी, हंबीरराव, अंतोजी, रायाजी साऱ्या जिव्हाळ्याच्या माणसांचे मंचकाला कडे पडले होते. मंचकाच्या उशालगतीला पुतळाबाई, येसूबाई, धाराऊ, सोयराबाई असा स्त्रीवसा चिंतावल्या डोळ्यांनी उभा होता.


बाहेर घोंघावणाऱ्या पावसाळी वाऱ्यांचा झपकारा मधूनच महालात घुसला. चिराखदाने आणि समयांच्या ज्योती त्याने अंगभर थरथरल्या. त्यांच्या धरथरत्या उजेडाबरोबर आतले मननू मन नको त्या शंकेने चरकून उठले. मधरात्रीचा सुमार झाला. "राजे ऽ" मंचकावरून दमादाटली क्षीण साद आली.


जी." महाराज पुढे झुकले. " तीर्थ द्या. गंगेचं." दमा निर्धारी झाला. " तुळशीपत्रही आणा.'


महाराज उठले. देव्हाऱ्यात ठेवलेली गंगाजलाची तीर्थकुपी आणि तुळशीपत्र घेऊन पुन्हा मंचकाजवळ आले. पळीने त्यांनी गंगोदक मासाहेबांच्या ओठांत सोडले. त्यांच्या हातीचे सोनकडे थरथरले. मासाहेबांच्या ओठांत तुळशीपत्र देताना उभा रायगडच उचलून कुणीतरी आपल्या छातीवर ठेवला आहे असे त्यांना वाटले.


मासाहेबांच्या सेवेत सर्वांत शेवटी रुजू होऊन गंगाजल आणि तुळशीपत्र पावन झाले ! "शिवबा, जवळ या." तुळशीपत्राआडून सावळे, निर्बंध बोल आले.


महाराज पुढे झाले.


" हात द्या." कधी नव्हे ते, मानी स्त्री खानदान राजांच्याकडे मागणे घालीत होते.. महाराजांनी सोनकड्याचा हात जिजाऊंच्या कंकणे घरंगळणाऱ्या हाती दिला. " शिवबा, आम्ही तुमच्याकडे कधी काही मागणं टाकलं नाही. आज टाकतो


आहोत. आम्हास आण द्या.


“मासाहेब आज्ञा व्हावी -" राजांची छाती दाटून आली. -


“शिवबा , शिवबा, आमच्या शंभूराजांच्या आऊ आता तुम्ही व्हा! आम्ही वचनात आहोत थोरल्या सूनबाईच्या. ते तडीस लाव."


ते ऐकताना संभाजीराजांच्या मनाचा बांध बांध फुटला. हाती धरलेला जिजाऊंचा हात गदगदून हलवून ते मुसमुसत म्हणाले, “आऊसाहेब तुम्ही... तुम्ही हव्यात

आम्हाला, आमच्या महाराजसाहेबांना.' "


"शंभूराजे, शांत व्हा. तो ऋणबंध सरला. एक नीट ऐका. तुम्ही तुम्ही आमच्या - स्वारीसारखेच दिसता. पण पण ते जसे आम्हास पारखे झाले तसे तुम्ही कधी येसूबाईंना - होऊ नका !

'राजे, आम्ही सारं बघितलं. फक्त एक राहून गेलं. आमच्या रामराजांचे हात पिवळे झालेलं बघण्याचं! ते करा. आणि आणि जीवावरच्या साकड्यात आता स्वतःला कधी गुंतवून घेऊ नका. तुमच्यासाठी जगदंबेच्या पायाशी धरणं घरायला आता कुणी उरलं नाही !"


ते ऐकताना नाकगड्डा चिमटीत धरलेल्या राजांचा टोप डावा उजवा हिंदकळला. त्यांच्या पोटात पोकळीचा खड्डा पसरला. शब्द थरथरले - " माऽसा ऽ हे ऽब!" "राजे, केशवपंडितांना बोलवा. आम्हास समर्थांचा बोध ऐकवा !"


बाहेर पाचाडभर ऐन मध्यरात्र हट्टी धरणे धरून बसली. मेटामेटावरचे पहारेकरी एकमेकांच्या हाती बदलत्या पहाऱ्यांचे भाले देताना गस्त घालू लागले - " मेटकरी हुश्या र!" वाड्याच्या छतावर मावळी पाऊस दाभणधारेनं कोसळतच होता. केशव पंडितांनी अडंगीच्या बैठकीवर दासबोध मांडून चौरंगावर बैठक घेतली. त्यांना बोध दिसावा म्हणून धाराऊने अडंगीजवळ तेवती समई ठेवली.


केशवपंडितांच्या तोंडून समर्थांचे बैरागी शब्द थरथरत बाहेर पडू लागले- 'सरतां संचिताचे शेष। नाहीं क्षणाचा अवकाश । भरतां न भरतां निमिष जाणे लागे ॥


गेले बहुतां बळांचे । गेले बहुतां काळाचे।


गेले बहुतां कुळांचे। कुळवंत राजे ॥ बहुतां जन्माचा सेवट । नरदेह सांपडे अवचट ।


येथ वर्तावे चोखट नीतिन्यायें ॥


काया बहुत कष्टवावी। उत्कट कीर्ति उरवावी । चटक लावुनी सोडावी काही एक ॥


पंडितांची जवान थरथरू लागली. शब्दाशब्दांबरोबर भवतीची मने थिजू लागली.


चिराखदानांच्या ज्योती थरथरू लागल्या.


'जीव जीवांत घालावा। आत्मा आत्म्यांत मिसळावा ।


राह राहो शोध घ्यावा 51 परांतराचा ॥


केशव पंडितांचा हात कापू लागला. डोळ्यांच्या कडा दाटून आल्या. एक एक शब्द त्यांच्या दाटल्या गळ्यातून घोगरत बाहेर पडू लागला-


'सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेवट


येथ सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन ॥


" पंडित, नको ऽ, वाचू नका 5. संभाजीराजांच्या या कळवळत्या बोलांनी केशवपंडितांच्या पापण्यांवर थरारलेले अश्रूंचे थेंब हातीच्या पानावर टपटपले! त्यांना वाचवेना. कुणालाच काही बोलवेना.

ना छत्रपती शिवाजीमहाराजांना, ना युवराज संभाजीराजांना, महालातील कुणालाच कल्पना नव्हती की मिटल्या डोळ्यांच्या जिजाऊंनी आत्मा केव्हाच आत्म्यात घातला होता. देहभान हरपलेल्या, माणसांच्या जगापार गेलेल्या, लोकमाता जिजाऊसाहेबांच्या जीवज्योतीला प्रकाशच प्रकाश दिसत होता शेवटचा प्रकाश.


होय! साक्षात अष्टभुजा, शस्त्रधारी, वाघावर आरूढ झालेली जगदंबाच त्यांच्या रोखाने येत होती! वाजत-गाजत, तिच्या समोर डोर-चोळणा घातलेला, छातीवर कवड्यांच्या माळाच माळा मिरविणारा, भंडाऱ्याने मळवट भरलेला, हाती पोत नाचविणारा भुत्यांचा सरंजामी तांडाच तांडा "उदंऽ उदं ऽ" गर्जत येत होता!


ती 'भवानी यात्रा' थेट जिजाऊंच्या समोर येऊन थांबली. वाद्यांचा गलका विरला. वाघावर बसल्या जगदंबेने जिजाऊंच्या रोखाने आठी हात पसरले! भुत्यांनी बेहोष उदोकार दिला- "उदं उदं ऽ".


देहाच्या सिंहासनावरून खंबीर जिजाऊ उठल्या! त्यांनी भगवा पदरकाठ ठाकेठीक केला. जगदंबेच्या डोळ्यांना डोळे जोडून बरेच दिवस मनाच्या खोलवटात रुजून बसलेला एक जाब तिला त्यांनी खानदानी बोलीत विचारून घेतला -


'आम्हास वाटलं होतु तुम्हीच याल! पण वाटलं नव्हतं, तुम्ही अशा याल! वाटलं होतं तुम्ही येताना आपल्या संगती एक जीनकसला घोडा घेऊन याल ! त्याच्या रिकिबीत आमचाही पाय भरून फरफट करीत आम्हास तुमच्या दरबारी घेऊन जाल! जसं होदिगेरीच्या रानातून तुम्ही आमच्या स्वारीची शिकार करून त्यांना घेऊन गेला होतात तशा ! पण !! चला. आम्ही सिद्ध आहोत! "


राजे, संभाजीराजांसकट साऱ्यांना जिजाऊंच्या ओठांतून 'जगदंब ! जगदंब !' असे शब्द बाहेर पडताहेत असा भास झाला.


डुईवर सप्तनद्यांचे पवित्र जल घेतलेले छत्रधारी, अभिषिक्त राजे खऱ्या अर्थानि पोरके झाले ! छत्रधारी छत्रहीन ! राजांच्या डुईवरचे आऊपणाचे छत्र गेले... आणि आणि..... संभाजीराजांच्या ? जिजाऊंचा निष्प्राण झालेला, थंडगार हात गद्गदा हलवीत, उभ्या चेहऱ्याला इंगळ्याच इंगळ्या डसाव्यात तसे आक्रसल्या चर्येने, महाराजांच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत, संभाजीराजांनी मध्यरात्रीचे पाषाणकठोर काळीजही तडकेल असा हंबरडा फोडला-- आबा, आमच्या आऊसाहेब गेऽल्या ! 


पाठच्या भिंतीवर थडाथड गोंदले कपाळ बडवीत "मासाब, मासा 5 ब" म्हणत पाय गेलेली धाराऊ मटकन खालीच बसली. उठलेल्या आक्रोशाने शमादानांच्या ज्योतीन ज्योती थरथरल्या. जिजाऊंच्या निष्प्राण देहावर दुअंगाने डोके घुसळीत महाराज नि संभाजीराजे स्फुंदू लागले. बाहेर पाचाडभर फतेबाज मध्यरात्र सरत होती. थेंबाथेंबाने गळत होते !