कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९७

 राजे-संभाजीराजांच्या पायसोबतीत आचार्य रायगड चढून आले. जगदीश्वराचे दर्शन करून व्यापारपेठ, नगारखाना, दरबारी चौक बघंत साऱ्यांसह ते राजांच्या खासेवाड्यात आले. बैठकमहालात राजे, जिजाऊ, संभाजीराजे, रामराजे यांच्यासाठी देखणी राजबैठक सिद्ध केली होती. तिच्यासमोर वेदोनारायणांच्यासाठी मृगाजिन घातलेले प्रशस्त आसन मांडले होते.


आचार्य आल्याची वर्दी अंतःपुरात जिजाऊंना पोच झाली. राजांच्या राण्या, मुली, येसूबाई, रामराजे असा गोतावळा पाठीशी घेत शुभ्र नेसूधारी जिजाऊ बैठकमहालांच्या उंबरठ्याजवळ आल्या. त्यांना बघताच आसनावरून उठलेले आचार्य गागाभट्ट चालत पुढे झाले. जिजाऊंच्या रूपाने बिजलीचं शुभ्र वस्त्र लेवून सोशिक मावळी आभाळच उंबरठ्यात उभे होते!


पापणी न मोडता त्यांच्याकडे बघत पुढे झालेल्या गागाभट्टांनी "मांजी, प्रणाम. " - म्हणत झुकून थेट जिजाऊंच्या पायांना आपल्या हाताची बोटे भिडविली ! असे काही होईल ही कल्पना नसलेल्या जिजाऊ लगबगीने पाय मागे घेत म्हणाल्या "हे कोण करणं! आपण थोर श्रेष्ठ आचार्य.


त्यांची भावना ओळखून गागाभट्टांनी खुलासा केला, "माँजी, गंगासे बढकर श्रेष्ठ हैं आपके चरण । हम आचार्य हैं पढत धर्मग्रंथोंके। आप साक्षात् धर्ममाता हैं। " गंगेच्या खळखळाटासारखे ते बोल होते. ते ऐकताना राजांच्या पापणीकडा दाटल्यागत झाल्या. संभाजीराजांची छाती भरून आली.


'हाताची खूण देत आचार्यांनी जिजाऊंना बैठक घेण्याची विनंती केली. धीम्या धीम्या चालीने जात जिजाऊ मांडल्या बैठकीवर बसल्या. राजांनी आचार्यांना मृगासनावर बसण्याची विनंती केली. आचार्यांनी बैठक घेतली. त्यांच्या चरणाखाली असलेल्या आसनावर प्रभाकरभट्टांनी ताम्हन ठेवले. 

राजे, संभाजीराजे, रामराजे, राणीवसा, साऱ्यांनी आचार्यांची सविध पाद्यपूजा केली. बैठकीवरून उठलेल्या जिजाऊ पाद्यपूजेसाठीच पुढे येताहेत हे बघून गागाभट्ट राजांना म्हणाले, "नरेश, उन्हे फिरसे आसनस्थ कराइये। मातासे पुत्र की पाद्यपूजा पुत्र की आयु कम कर देती है। हमें जीवित रहना है- कमसे कम एक संकल्पित, धर्मकार्य पूर्ण करनेतक । 

आचार्यांची इच्छा सांगून राजांनी जिजाऊंना राजबैठकीवर उच्चासनी बसविले. त्यांच्या पायगतीला, दोन्ही तर्कांना संभाजीराजे, रामराजे घेऊन राजांनी बैठक घेतली. पाठीमागे राणीवसा उभा राहिला. भोवती मंत्रिगणांसह, निवडक असामी हात बांधून, अदब धरून धर्मपीठ आणि धैर्यपीठ यांचा संवाद ऐकण्यासाठी उत्सुक झाल्या. 

देवस्मरण केलेल्या वेदसंपन्न गागाभट्टांच्या विमल मुखातून बनारसी वाकूगंगा सबू लागली - " पुरुषोत्तम शिवाजीराजे, हम काशीक्षेत्रसे यहाँ दक्षिणदेश आये मनमें एक धर्मसंकल्प लेकर। आपका यह किला हमने देखा, परमसंतोष। यहाँ सब है। परंतु एक नहीं। सिंहासन। नरेश, राजदंडके व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है। समस्त आर्यावर्तमें आज हिंदुओंका एक भी राजपीठ नहीं सिंहासन नहीं जिसे देखकर हिंदुमस्तक गर्व करे। जीवनसंग्राम लडानेकी मनीषा करे। वहीं कारन है कि हिंदु स्वयं को निराश्रित, पराजित मान रहें हैं। नरश्रेष्ठ, अनुरक्षित धर्म धर्म नहीं रहता ! .... 'आपका कीर्तिसुगंध श्रवण कर हमें प्रेरणा प्राप्त हुई राजा शिवाजी, समस्त आर्यावर्तका यह भार स्कंधोंपर तोलने आप केवल आपही योग्य हैं।. " उत्तरमें हमारे पवित्र देवालय नष्ट हो रहे हैं। देवदेवता विटंबित किये जा रहे हैं, म्लेच्छों उदंड हाहाकार मचा दिया है। दुर्बल हिंदु प्रजानन बलात् धर्मांतरित किये जा रहे हैं।" आचार्यांचा धीरगंभीर आवाज धरत चालला.


" यही चलता रहा तो रामकृष्णकी यह पवित्र देवभूमि रौरव हो जायेगी। यही प्रयोजन है कि समस्त उत्तरवासियोंके प्रतिनिधिरूपमें भिक्षापात्र हाथ लिये हम आपके किलेके महाद्वारमें खडे हैं। धर्मरक्षक, हमें सिंहासन प्रदान करो। नरश्रेष्ठ, धर्मदंडको राजदंड प्रदान करो। राजा छत्रपति बनो। छत्र प्रदान करो। " भावनावेगाने उचंबळलेल्या आचार्यांनी , दोन्ही हात पसरले. उत्तर दक्षिणेला साकडं साद घालू लागली. डोळे भरल्यामुळे जिजाऊंना समोरचे काहीच दिसेनासे झाले.

मिटल्या डोळ्यांच्या राजांचा हात छातीवरच्या कवड्यांवर फिरत राहिला. बोटांना स्पर्शणारी प्रत्येक कवडी त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खर्ची पडलेला चेहरा चेहरा उभी करू लागली. बाजी, तान्हाजी, मुरार, सूर्याजी, रामजी! कैक. ते सारेच हात उठवून म्हणत होते- "राजे, आम्हांस छत्र द्या! मरणास मोल द्या!'


संभाजीराजांची पाणीदार नजर वेदभूषण गागाभट्टांच्या सतेज, निर्भय ओठांवर अडकून पडली होती. आचार्यांच्या रूपाने उभा रायगडच आपल्या कड्यांचे भक्कम ओठ उघडून कानात साठवावे असे काही सांगतो आहे असे त्यांना वाटले.

" राजदंडके व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है। असुरक्षित धर्म धर्म नहीं रहता। देवालय नष्ट हो रहे हैं, देवदेवता विटंबित किये जा रहे हैं। दुर्बल प्रजानन बलात् धर्मांतरित किये जा रहे हैं। " ऐकल्या शब्दाशब्दाला त्यांच्या आतून कुणीतरी फेरसाद घालू लागले. " मारिता मारिता मरावें । तेणे गतीस पावावें फिरोनी येता भोगावें। महत्भाग्य ॥' 

गागाभट्टांची आज्ञा राजांनी शिरोधार्य मानली. झाल्या बैठकीचे बोलणे रायगडाच्या पाखरांनी आपल्या पंखांवर घेतले आणि ती फडफडत मावळभर उडाली ! "राजं गादीवं बसनार! मोट्टं बादश्या हुनार! जंगी दर्बार बशिवनार!" बारा मावळांच्या खोपटाखोपटाला भावड्या प्रेमांचे रोमांच फुटले.


" म्हातारबाईनं लई वनवेस काढलं. आतं पारनं फिटंल तिच्या नदरंचं. ल्योक उपजावा तर अस्सा. न्हायतर आमची बी हाईतच खायाला कार नि.... पाणोठ्या पाणोठ्यांवर घागरी ठणठणू लागल्या.

या राज्याभिषेकात काही उणे राहायला नको म्हणून अनंतभट्ट कावळे पुन्हा नाशिकला गेले. त्यांनी तीर्थाची ब्रह्मसभा भरविली. सभेत दोन विवादाचे मुद्दे उपस्थित झाले. कलियुगात क्षत्रियलोप झाला आहे आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असलेला मुंज हा राजांचा विधी झालेला नाही. मात्र विवाह झाले आहेत ! गागाभट्टांनी शास्त्रपुराणांचे दाखले देऊन प्रायश्चित्ताने संस्कारलोप भरून काढता येतात हे नासिकसभेला पटवून दिले.

आपली वंशावळीची यादी आणण्यासाठी राजांनी बाळाजी चिटणीसांना राजपुतान्यात धाडले. मेवाड, उदेपूर, जयपूर अशी नगरे पालथी घालून बाळाजींनी यादी आणली. राजे सूर्यवंशी 'शिसोदिया' कुलातील रजपूत क्षत्रिय होते. राणा भीमसिंह, सज्जनसिंह, दिलीपसिंह, देवराजजी अशा सूर्यतेजी राजांच्या कुळातले !


सारे आडबंद दूर झाले. गागाभट्टांच्या सूचनांवर राज्याभिषेकाचे तपशील तयार होऊ लागले. ज्येष्ठ म्हणून पट्टराणीचा अभिषेक सोयराबाईंना आणि युवराज म्हणून राजांच्या हक्क जबाबदाऱ्यांच्या वारसापदाचा अभिषेक संभाजीराजांना करण्याचा आदेश आचार्य गागाभट्टांनी दिला.