कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९६

 "अदब हा जनान्याचा रिवाज पुरुषांनी सोशिक असले पाहिजे. त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. तुमच्या आऊ गेल्या तेव्हापासूनच हे तुमच्या पाठीशी लागलं आहे. वाढत्या उमरीनं ते वाढणार आहे. शक्य होतं तोवर आमचा हात तुमच्या पाठीशी राहिला. आता आम्ही थकलोत.” दूर लावल्यासारखी जिजाऊंनी नजर महालाच्या तख्तपोशीला लावली. ती तशीच ठेवून त्या म्हणाल्या, “ हाताची पाची बोटं सारखी नसतात म्हणून काही त्यातील एखादे दूर करता येत नाही! असेल त्या वकुबानिशी अवघ्यांना बरोबर घेऊन चालणं पडतं. हे विसरू नका. एवढी थोर जगदंबा पण तिचेसुद्धा भुत्याखेरीज काही चालत नाही! लहान-थोर सारेच आपले आहेत. हेच आम्ही हयातभर आमच्या राजांना सांगत आलो. आज तेच तुम्हांस सांगतो आहो.' “जी.” संभाजीराजांनी ती माया उरात ठेवीत हुंकार भरला.


"जा. बाहेर झड सुमार झालीय काय बघून या.” जिजाऊंनी दाटू लागलेला विषय कसबाने पालटला. संभाजीराजे महालातून निघून सदरेवर आले. पुन्हा महालात जाऊन त्यांनी जिजाऊंना हात देत मंचकावरून खाली येऊ दिले. त्यांना सावरून धरून ते वाड्याच्या सदरी जोत्यावर घाटेजवळ आले. नेमला तासवाला मुजरा करीत पुढे झाला. घाट घणघणू लागली.


थोड्याच वेळात रायगडच्या मावळमाचीवर बार्दाराने धरलेल्या भगव्या जरीपटक्याचा ठिपका दिसू लागला. दूरवरच्या धुकट माचीवर राजे दाखल झाल्याची ती खूण होती. जिजाऊंना थकल्या डोळ्यांनी ती दिसू शकत नव्हती. म्हणून संभाजीराजे म्हणाले, मासाहेब महाराजसाहेब माचीवर आले. 


ते ऐकताच राजांची उभट मुद्रा डोळ्यांसमोर तरळलेल्या जिजाऊंच्या ओठांतून सहजी शब्द सुटले "औक्षवंत व्हा ! 


माचीकडे रोख घरत मुजरा देणाऱ्या संभाजीराजांच्या ते कानी पडले मात्र त्यांना वाटले " जसं आबासाहेबांचं केलं आहे तसं मासाहेबांचं वर्णन केलं तर फक्त समर्थच करतील. इतरांचं ते सामर्थ्यच नव्हे!'


पावसाची नाळ तुटली. रायगडाचा घेर फुलाच्या हिरवाईने बहरून आला. जिजाऊंचा निरोप घेऊन संभाजीराजे गड चढून आले.


दरम्यान दोन घटनांची चक्रे फिरून गेली होती. उमराणीच्या खुल्या मैदानात कैचीत फसलेला विजापूरचा सेनापती अब्दुल करीम बहलोलखान यास जिवे सोडण्याची चूक प्रतापरावांनी केली होती. आणि वाई प्रांतातील पांडवगड मराठ्यांच्या एका फौजफळीने झडप टाकून दस्त करण्याचा प्रयत्न केला होता.


दसरा उरकून राजे सातारा प्रांतात निघून गेले. चारच दिवसांत त्यांनी पांडवगड जिंकल्याची खबर रायगडावर आली. ती ऐकून संभाजीराजांनी रायगडावर साखर वाटली. धाराऊने दिलेल्या हुलग्याच्या माडम्याचा कटोरा ओठांआड रिचवून संभाजीराजे आपल्या महालाबाहेर पडले. बाहेर पहायला यादव नामाजी होता. त्याचा मुजरा आपलासा घेत युवराज त्याला म्हणाले, " यादवराव, आमच्या संगती या.'


त्याच्यासह ते दरबारी चौकात आले. दक्षिणी जोत्यावर मांडलेल्या, पंजा उगारलेल्या, पेंढा भरल्या वाघावर त्यांची नजर गेली. ते जनावर आत्ताच झाडीतून बाहेर पडल्यागत जिवंत दिसत होते. "आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी. " राजांची बोली संभाजीराजांच्या मनात फिरली. कारण नसता तिला समर्थांचे बोल " चिकटले - काया बहुत कष्टवावी! उत्कट कीर्ति उरवावी !


यादव नामाजीसह जगदीश्वरदर्शन करून युवराज कुशावर्ताच्या टाक्याजवळ आले. कुणाचीही नजर जखडून पडावी असे नानारंगी कमळफुलांचे थाळे टाक्यावर उठले होते. गडाच्या मंद वाल्याने ते डुलत होते.


भारल्यासारखे संभाजीराजे कुशावर्ताकडे बघत राहिले. त्यांच्या मनी एका विचाराचे कमळफूल फुलून उठले - “मासाहेबांना फुलांचा खूप सोस. गडावर आणून हे टाके त्यांना एकदा दाखविलं पाहिजे.' "


" यादवराव, आत उतरा. वेगवेगळ्या वाणांचे नाळ खंडून आणा.” युवराजांनी आज्ञा केली. पायताणे उतरवून यादव नामाजी टाक्यात उतरला. निळे, सफेद, लाल असे अर्धवट फुलले कमळनाळ घेऊन बाहेर आला. ते निरखीत युवराज बालेकिल्ल्याकडे परतले. दरबारी चौकातील कारंजी हौद आला. शतधारांनी उसळत्या फवाऱ्याकडे नजर टाकीत संभाजीराजे महालात आले. त्यांना कल्पना नव्हती पण महालात धाराऊ आणि येसूबाई उभ्या होत्या. येसूबाईंनी रामराजांना वर छातीशी घेतले होते. युवराजांना बघताच धाराऊ आपले आपणालाच सांगितल्यागत म्हणाली, “तरकतच न्हात न्हाई. आईच्या पूजेची जुपी लावून द्याची • न्हायलीच की बुवास्नी !" आणि ती महालातून बाहेर पडलीही.


" या." रामराजांना घेण्यासाठी कमळनाळांसह संभाजीराजांनी हात पसरले. येसूबाईंच्या काखेतून त्यांना घेताना संभाजीराजांच्या बोटांचा स्पर्श येसूबाईंच्या अंगदंडाला झाला ! उभ्या अंगावर रसरशीत कमलफुले फुलल्याचा भास त्या स्पशनि येसूबाईंना झाला ! त्यांच्या पापण्या फडफडल्या. कपाळीच्या कुंकूबोटात घामाचे थेंब तरारून आले. मोठ्या धाडसाने त्यांनी समोरच्या टोपाखालच्या पाणीदार डोळ्यांना आपले डोळे भिडविले. आणि क्षणात ते खालच्या फरसबंदीवर टाकले आणि लगबगीने त्या बाहेर जायला निघाल्या.


'थांबा!” कुणीतरी त्यांचे पाय जागीच खिळवून टाकले. संभाजीराजे रामराजांसह पुढे आले. हातीचे कमळनाळ त्यांनी येसूबाईंच्या मुद्रेच्या केतकी कमळाकडे बघत पुढे घरले आणि म्हणाले, “घ्या. एकतर जगदीश्वराला नाहीतर तुम्हालाच हे द्यावेत असे ठरविले होते!'


घडघडत्या छातीने आणि थरथरत्या हाताने येसूबाईंनी ते रंगीबेरंगी फुले असलेले देठ हाती घेतले. ते घेताना पुन्हा झालेल्या बोटांच्या स्पशनि त्यांच्या पापण्यांचे अस्तर आणि पुन्हा कानांची पाळी रसरसून आली. डोळ्यांना डोळे भिडले.


भांबावलेल्या येसूबाई नेसूच्या शेवाने फरसबंदी झाडीत तरातर महालाबाहेर पडल्या! थोड्याच वेळात धाराऊ महालात अली, दोघा बंधूंना एकत्र बघून हसली. युवराजांच्या हातात कमळे नाहीत हे बघून ती म्हणाली, “पूजेची जुपी लागली; पर देवीला कमळाचं दॅट ठिवायचं न्हाऊनच म्येलं. आता कोण बापडीला ते आनून देनार!' आणि रामराजांना घेऊन धाराऊही हसत बाहेर पडली.


बंकापूर लुटून, कारवार तसनस करून, आनंदराव मकाजी यांना पन्हाळा प्रांती ठेवून राजे पुरत्या दोन महिन्यांनंतर रायगडी आले. ते आले नि एक वाईट आणि एक चांगली खबरही त्यांच्या पाठोपाठ गड चढून आली.


दौलतीचे कदीम चाकर मुजुमदार निळो सोनदेव वारले ही खबर वाईट होती. आणि काशीचे गागाभट्ट राजे यांच्या भेटीला येत आहेत ही खबर चांगली होती. राजांचे कुलोपाध्याय - नाशिकचे अनंतभट्ट कावळे यांनी खास माणूस पाठवून काशीच्या वेदशास्त्रसंपन्न विश्वेश्वरभट्ट उर्फ गागाभट्ट यांना क्षेत्री आणवले होते.


आचार्य गागाभट्टांना इतमामाने गडावर आणण्यासाठी राजांनी आण्णाजींना पालखी-सरंजामासह नाशिकला रवाना केले. आणि गागाभट्टांचे दर्शन जिजाऊंना पडावे म्हणून त्यांना पाचाडातून गडावर आणण्याची कामगिरी राजांनी संभाजीराजांना जोडून दिली.


गडचढीचे भोये आणि पडदेबंद मेणे घेऊन आज्ञेप्रमाणे संभाजीराजे पाचाडात उतरले. त्यांनी थकल्या जिजाऊंना हातजोड देत मेण्यात बसते केले. दुसऱ्या मेण्यात पुतळाबाई बसल्या. कबिला रायगडावर आला. पण आजारी काशीबाई मात्र तेवढ्या पाचाडातच राहिल्या. श्रीक्षेत्र काशीच्या धर्मपीठाचे श्रेष्ठ आचार्य रायगडावर येताहेत या जाणिवेने सर्वत्र चैतन्य पसरले. दाक्षिणात्यी मावळी स्वागताची तयारी खुद्द यांच्या देखरेखीखाली सिद्ध झाली. महाडाहून अनंतभट्टांची गडावर वर्दी आली - राजे-संभाजीराजे 'आपल्या निवडक शिष्यगणांसह आचार्य येताहेत.

राजे-संभाजीराजे जिजाऊंची पायधूळ घेऊन गड उतरायला लागले. त्यांच्या पालख्यांमागून मोरोपंत, आण्णाजी, दत्ताजी, येसाजी, निश्चलपुरी, कवी परमानंद, कवी कुलेश, प्रभाकरभट्ट, केशवपंडित अशी निवडीची मंडळी गड उतरू लागली.


पालखीच्या राजगोंड्याबरोबर संभाजीराजांचे मन हिंदोळू लागले - "कसे असतील आचार्य गागाभट्ट ? समर्थांच्यासारखे ? त्यांना तरी आम्ही कुठे पाहिलंय ? काशी मधुरेहून काशीच्या वाटेवर असताना आम्हास परतावं लागलं. काशी राहून गेली! आणि आता बघून तरी काय उपयोग ? तिथल्या विश्वेश्वराचं देऊळ औरंगजेबानं लुटलं. मंदिराच्या चिन्यांनी त्याच जागी म्हणे मशिद उठवली! औरंगजेब भरल्या दरबारी बंदिस्त कठड्याआड बसणारा! आम्हास 'हौदा खेळता काय ?' हे वजिरामार्फत विचारणारा!" पालखीच्या दांड्याच्या कुरकुरीतूनच शब्द बाहेर पडताहेत असा त्यांना भास झाला. " या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्रधर्म उरला कांही। तुम्हाकरिता !"


'महाराष्ट्रधर्म' नकळत एक हुस्कार त्यांच्या नाकपाळ्यांतून सुटला. पाचाडचा जिजाऊंचा वाडा मागे पडत होता. रस्त्याच्या दुहाती शस्त्रधारी मावळ्यांनी शिस्त धरलेली दिसू लागली. पखाले पालख्या बघून दूर हटू लागले.


आगवानीचा डेरा आला. पालख्या ठाण झाल्या. अंथरल्या पायघड्यांवरून राजे संभाजीराजे डे-यात शिरले. आत मांडलेली बैठक राजांनी निरखली. लोड, गिर्धा, बिछायती सारा इतमाम ठीक होता. बैठकीच्या बगलेला एक धारकरी सरपोसाने झाकले सुवर्णतबक खांद्यावर घेऊन उभा होता. मोरोपंत, आण्णाजी, येसाजी, परमानंद, कुलेश साऱ्यांच्या चर्येवरून नजर फिरविताना राजांचे मन राजगडाच्या भुयारात शिरावे तसे खोलवर शिरले.


"केवढा पुण्यवंत योग हा! पाचारण करतो म्हटले तरी मधल्या गनिमांच्या मुलखाने साध्य होणार नाही ते काशी धर्मपीठाचे आचार्य आपल्या पावलांनी येताहेत. ' महाडच्या रोखाने उठलेल्या शंखांच्या कल्लोळत्या निनादाने राजांची साखळी तुटली. प्रभाकरभट्टांनी आत येत वर्दी दिली. "वेदोनारायण श्री आलेड !


राजे-संभाजीराजे जोडीने होत डेऱ्याबाहेर आले. मानेच्या शिरा फुलवीत, आभाळमार्गी तोंड धरून आचार्यांचा शिष्यगण बेहोष शंखनाद उठवीत होता. त्या पवित्र कल्लोळात नौबतडक्याचा मर्दाना घोष मिसळला !


ठाण झाल्या पालखीजवळ लगबगीने जात राजांनी आचार्य गागाभट्टांना हात दिला. भगव्या बासनातून हळुवारपणे धर्मग्रंथ बाहेर घ्यावा तसे त्या भगव्या अस्तराच्या पाळखीतून राजांनी आचार्य श्रींना बाहेर घेतले!.


मथुरेत चुकार झालेली 'काशी' संभाजीराजे निरखू लागले ! मस्तकी लिंबू वाणाचा जरीकिनारी रुमाल, अंगभर लपेटलेली भगवी शाल, तिला घरून उत्तरीमाटाचे डाळिंबकिनारी सफेद धोतर, सतेज पायांत लाकडी खडावा, कपाळी गंधाचे शैव पट्टे, तासाच्या थाळीसारखी गोल तोरंजनी वर्णाची मुद्रा, तेवते शांत डोळे. गागाभट्टांच्या रूपाने हिंदू विद्वत्तेचा सूर्य मावळी स्वागताच्या चांदण्यात न्हात उभा होता ! खेचल्यासारखे संभाजीराजे आचार्यांच्या डाव्या बगलेला झाले.


पायघड्या तुडवीत राजे आणि संभाजीराजे यांच्यामधून गागाभट्ट डेऱ्यात प्रवेशले. मांडल्या बैठकीवर आचार्यांना आदराने बसवून राजांनी सुवर्णी तबकातील पानविड्यासह श्रीफळ त्यांच्या ओंजळीत दिले. मानाचे वस्त्र म्हणून शाल त्यावर ठेवली..


राजे आणि संभाजीराजे यांनी गुडघे टेकून आचार्यांना नमस्कार केला. आचार्य तो स्वीकारण्यासाठी झुकते झाले. हात उभवीत, डोळे मिटून त्यांनी आशीर्वाद दिला, "जयो ऽस्तु !'