किल्ल्याची ऊंची: २७०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा
श्रेणी: सोपी
औरंगाबाद – देवगिरी रस्त्यावर, औरंगाबाद शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगर रांगेपासून वेगळा झालेला एक छोटा डोंगर आहे. आजूबाजूच्या सपाट परीसरामुळे हा डोंगर उठून दिसतो. या डोंगरावर कातळात कोरलेला सुंदर किल्ला आहे, तोच भांगसी गड. या किल्ल्यावरील कातळात कोरून काढलेल्या भूयारात असलेल्या भांगसाई देवी मंदिरामुळे औरंगाबाद परिसरातील लोक या गडाला “भांगसाई गड” या नावाने ओळखतात. भांगसाई देवी ट्रस्टने भूयारी मंदिरावर नविन मंदिर व गडावर जाण्यासाठी पायर्या बांधल्यामुळे गडावर औरंगाबाद परिसरातील लोकांचा वावर वाढलेला आहे. परंतू औरंगाबादला येणार्या पर्यटकांना मात्र या किल्ल्याची फारशी माहिती नाही.भांगसी गड, औरंगाबाद – देवगिरी रस्त्यावर आहे. देवगिरी किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने सकाळी ९.०० वाजल्यानंतर त्याचे दरवाजे उघडतात. त्यामुळे औरंगाबादहून सकाळी ७.०० वाजता निघून प्रथम भांगसी गड पहावा. तो पहाण्यासाठी साधारणपणे १ तास लागतो.इतिहासभांगसी गडाचा इतिहास उपलब्ध नाही. देवगिरी या राजधानाच्या गडाशी जवळीक व गडावर कातळात खोदलेली टाकी व गुहा पहाता हा गड ७ व्या किंवा ८व्या शतकातला असावा.
पहाण्याची ठिकाणे: भांगसी गड चढतांना गडमाथ्याच्या थोडं खाली उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक गुहा आहे. गुहेच्या पुढे सिमेंटच्या पायर्या संपून कातळात खोदलेल्या पूरातन पायर्या लागतात. या पायर्या चढून गेल्यावर कातळात कोरून काढलेल्या उत्तराभिमुख प्रवेशव्दारातून आपला गडावर प्रवेश होतो. प्रवेशव्दाराची कमान मात्र उध्वस्त झालेली आहे. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस तटबंदीचे अवशेष आहेत. प्रवेशव्दारातून गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर पूर्व – पश्चिम पसरलेला चिंचोळा गडमाथा दिसतो. गडावरील सर्व अवशेष पश्चिमेला असल्यामुळे उजव्या बाजूला भांगसाई देवी मंदिराकडे चालत जावे. वाटेत मंदिरा समोर एक बुजलेल टाक पहायला मिळते.भांगसाई देवीच्या मुळच्या भुयारी मंदिरावर नविन मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात असलेल्या पायर्यांनी भूयारात उतरून भांगसाई देवीच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. मुर्तीच्या डाव्या बाजूच्या असलेल्या झरोक्यातून (भोकातून) रांगत गेल्यावर आपण एक प्रशस्त गुहेत पोहोचतो. या कातळात कोरुन काढलेल्या गुहेला २५ खांब आहेत. या गुहेचे तोंड दक्षिणेला आहे. ही गुहा दोन स्तरात खोदलेली आहे. भांगसाई देवी मंदिरा पासून गुहेच्या तोंडापर्यंत डाव्या बाजूला गुहेची उंची जेमतेम १ ते ३ फूट आहे, तर उजव्या बाजूस पाण्याचे विशाल टाक खोदलेले आहे. या रचनेमुळे उन्हाळ्याच्या दिवसात गडावरील शिबंदीला पाणी आणि थंडावा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असे. या गुहेच्या उजव्या कोपर्यात गणपतीची मुर्ती, शिवलिंग व नंदी ठेवलेले आहेत. त्यांच दर्शन घेऊन, गुहेच्या दक्षिणेकडील मुखातून बाहेर पडावे.भांगसाई देवीच्या मंदिरामागे एक कोरड टाक आहे. तेथून पुढे गेल्यावर डाव्या हाताला (दक्षिणेला) वळून खाली उतरावे. येथे गडाच्या दुसर्या दक्षिणाभिमुख दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. या दरवाजा समोरच कातळात खोदलेल्या गुहा आहेत. त्यांचा उपयोग देवडी प्रमाणे होत असावा. आज या गुहांच्या वरचा दगड पडल्यामुळे या गुहा बुजलेल्या आहेत. हा दरवाजा पाहून परत गडमाथ्यावर यावे. पुढे गेल्यावर कातळात खोदलेले एक खिडकी टाक आहे. या टाक्यात मुळ आयताकार खोदलेल्या टाक्याच्या आत ४ चौकोनी खिडक्या (झरोके) कोरलेल्या आहेत. या टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेल शिवलिंग व नंदी आहे. या टाक्याच्या पुढे उजव्या हाताला (उत्तरेला) वळून खाली उतरावे. येथे कातळाच्या पोटात तीन दालन असलेल खांबटाक कोरलेल आहे. या टाक्या समोरील भिंतीत एक गोल झरोका कोरलेला आहे. हे टाक पाहून पुन्हा गडाच्या माथ्यावर येऊन पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत एक जोड टाक पहायला मिळत. या टाक्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. त्याला लागूनच एक कोरड पडलेलं टाक पहायला मिळत. या टाक्याच्या तळाला एक आयताकृती खड्डा कोरून काढलेला आहे. या टाक्याच्या जवळ एक बैठ घर बांधलेल आहे. येथून किल्ल्याचे पश्चिम टोक पाहून प्रवेशव्दाराकडे परत यावे. या ठिकाणी आपली गड फेरी पूर्ण होते.
पोहोचण्याच्या वाटा:
१) भांगसी गडाच्या पायथ्यापर्यंत खाजगी वहानाने जाता येते. औरंगाबाद – वेरूळ रस्त्यावर औरंगाबाद शहरापासून शरणपूर गाव साधारण १० किमीवर आहे. येथून डाव्या बाजूचा रस्ता औरंगाबाद – देवगिरी रेल्वे लाईन ओलांडून पलिकडे एम आय डी सी कडे जातो. या रस्त्यावर भांगसी गडाचा एकमेव डोंगर आहे, तसे़च गडाची दिशा दाखवणारे फलक लावलेले आहेत. या रस्त्यावर डावीकडे जाणारा रस्ता भांगसी गडाच्या पायथ्या पर्यंत जातो. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी १५ मिनीटे ते ३० मिनीटे लागतात.
२) औरंगाबादहून वेरूळ, मनमाड, चाळीसगावकडे जाणार्या एसटीने शरणपूर फाट्याला उतरावे. तेथून चालत पाऊण तासात किल्ल्यावर जाता येते.
राहाण्याची सोय: गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय: जेवणाची सोय गड पायथ्याच्या हॉटेलात होऊ शकते.
पाण्याची सोय: गडावर पिण्यायोग्य नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी २० मिनीटे लागतात.