किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
डोंगररांग: खानापूर-आटपाडी
चढाईची श्रेणी: सोपी
जिल्हा: सांगली
तालुका: खानापूर
किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळ्गड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सान्गोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळ्गड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमरक्षेच्या द्रुष्टीने भूपाळ्गडास अनन्यसाधारण असे महत्त्व होते.इतिहास‘बुसातिन-उस-सलातिन’ या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायांनी मांजऱ्या नजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले. तर एका लोककथेनुसार भूपाळसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे भूपाळगड असे नाव पडले. शिवकालात अफझलखानाच्या वधानंतर हा किल्ला स्वराज्यात आला. छत्रपती शिवरायांनी त्याची डागडुजी केली.शाहिस्तेखानाने केलेल्या स्वारीत फिरंगोजी नरसाळा किल्लेदाराने चाकणचा संग्रामदुर्ग ५५ दिवस लढवला म्हणून त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.पुढे डिसेंबर १६७८ मध्ये युवराज संभाजीराजे मोगलास जाऊन मिळाले. या घटनेनंतर संभाजीराजांनाबरोबर घेऊन दिलेरखान मराठी मुलूखावर हल्ला करीत सुटला, पुढे विजापूरवर चालून जात असताना वाटेत लागणाऱ्या भूपाळ्गडावर मोघलांनी हल्ला चढविला. दिलेर खानाने शेजारील डोंगरावर तोफा चढवल्या, तोफांच्या माऱ्याने किल्ल्याचा बुरुज ढासळला. एकाच प्रहरात किल्ला मोगलांच्या हाताला लागला. महाराजांना ही खबर लागताच सैन्याची कुमक मदतीस पाठवली, पण ही मदत मिळायच्या आतच किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला होता.भूपाळगडावरून प्रतिकार झालाच नव्हता कारण दिलेरखानाने शंभूराजांना पुढे केले होते. शंभू राजानी फिरंगोजी नरसाळे यांना एक पत्र धाडले होते त्यात लिहले होते की,स्वराजाचा युवराज म्हणून किल्ला खाली करण्याची अर्जी करत आहोत.उल्लेख स्वराजाचा युवराज म्हणून केला गेला होता दिलेरखानचा सरदार म्हणून नाही, त्यामुळे फिरंगोजी नरसाळे यांनी संभाजी राज्यांविरूद्ध तलवार उचलली नाही.भूपाळगड संभाजीराज्यांच्या ताब्यात देऊन ते महाराजांकडे रायगडावर निघून आले. याबद्दल महाराजांनी फिरंगोजींची खूप खरडपट्टी काढली. तसेच सर्व गडांवर निरोप धाडले की संभाजीराजे जातीने आले तरी तलवार चालवणे. गड ताब्यात न देणे.आजू बाजूच्या परगण्यातील मराठ्यांना या हल्ल्याची माहिती कळाली तर ते मदतीस येऊन पोहोचतील या भीतीने दिलेरखानने लगेच इखलासखान, जसवंतसिंग बुंदेला व रशीदअली रोशनाई यांना रक्षणाकरिता नामजाद केले, किल्ल्यावरील सर्व लोकांना कैद केले गेले.जे ७०० मावळे कैद झाले होते त्या प्रत्येकाचा एक हात कापून त्यास सोडून दिले. इतिहासाचा हा एक दुर्दैवी अध्याय आहे. इतिहास हा कधी कधी कडू असतो. त्यातीलच हे एक पान.किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणेभूपाळगड हा किल्ला आकाराने मोठ्या क्षेत्रफळाचा आहे, याच्या एका कोपर्यावर बाणूरगड गाव वसलेले आहे. गावातून पायवाट गडावर जाते येथून आपण पुढे कातळात खोदून तयार केलेल्या एका मोठ्या तलावावर येऊन पोहोचतो, हा तलाव पाहून बालेकिल्ल्याकडे चालू लागायचं, त्यासाठी दगडी पायर्यांची वाट आहे. समोरच्या टेकडीवर महादेवाचे मंदिर लागते, मंदिराच्या गाभार्यात शिवलिंग असून ते बाणूरलिंग या नावाने ओळखले जाते.शिव मंदिरातून बहेर पड्ल्यावर उजव्या हातास शिवकालातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चौथऱ्यावर वृंदावन समाधी आपणास दिसते. बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचे साक्षीदार म्हणजेच नाईक होते. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते, तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले. बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं.बाणूरगडावर हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते हा वीर शत्रूच्या ताब्यात सापडला तर काहिंच्या मते दूरवर शत्रूचा घाव वर्मी बसल्याने या वीराने शंभू महादेवापाशी येवून प्राण सोडले. पण ही समाधी बहिर्जी नाईक यांची असल्याची नोंद इतिहासात कागदपत्रात कोठेच नाही. समाधी समोरून जाणार्या पायवाटेने थोडे खाली उतरल्यावर आपणास गडाची तटबंदी पहायला मिळते, दगड एकमेकावर रचून तयार केलेल्या या तटबंदीत जागोजागी बाहेर पडण्यासाठी छोटे चोर दरवाजेही तयार केले आहेत. भूपाळ्गड हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड असला तरीहि एक तलाव, महादेव मंदिर, बहिर्जी नाईकांची समाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष एवढेच काय ते शिल्लक आहेत.
माहिती साभार: प्रतिक जाधव