किल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
चढाई श्रेणी: मध्यम
जिल्हा: सांगली
तालुका: शिराळा
शिराळा हा एक पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील डोंगराळ तालुका आहे. हा घनदाट जंगले व मुसळधार पाऊस असणारा प्रदेश आहे. तालुक्याच्या शेवटी चांदोली अभयारण्य आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीने बांधलेले धारण म्हणून चांदोली धरण ‘वसंत सागर’ ओळखले जाते. या धरणाला लाभलेले निसर्गाचे देणे असे आहे कि हे धरण बांधल्यापासून एकदाही रिकामे झाले नाही नेहमी पावसाळ्यात हे धरण १००% भरतेच इतका प्रचंड पूस या धरण परिसरात होतो. यातूनच वारणा नदी वाहते, या नदीमुळे वारणाकाठचा प्रदेशाला बारमाही पाणी मिळाले आहे. चांदोली अभयारण्य शेवटी प्रचीतीगड नावाचा किल्ला आहे.या किल्ल्यावर प्रचीती देवीचे मंदिर आहे म्हणून या किल्ल्याला प्रचीतीगड हे नाव पडले. मंदिरासमोर दोन तोफा आहेत. किल्ल्यात कातळात खोदलेला तलाव आहे. त्यावेळी हा किल्ला मराठ्यांच्या राज्याचे कारागृह होते येथे कडेलोटाच्या शिक्षेसाठी गुन्हेगारांना आणले जात. या किल्ल्याच्या पायथ्याशी शृंगारपुर आहे, छत्रपती संभाजी महाराजांची सासुरवाडी तसेच महाराणी सईबाई यांचे माहेर.शिराळा हे सांगली पासून ६० किमी अंतरावर आहे तर मुंबई पासून ३५० किमी अंतरावर आहे. कोल्हापूर पासून ५३ कि. मी. आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील पेठ नाक्यापासून १५ कि. मी. अंतरावर आहे. शिराळा तालुक्याला रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या ४ जिल्ह्यांच्या सीमा आहेत.