किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: सांगली
तालुका: शिराळा
शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावास बत्तीस शिराळा किंवा ३२ शिराळा या नावांनीही ओळखले जाते. शिराळा तालुक्यात प्रमुख दोन किल्ले आहेत शिराळा आणि प्रचीतीगड.शिराळ्याचा उल्लेख इ.स. ९००च्या पूर्वीपासून आढळतो. इथे असणारे अंबामातेचे मंदिर, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर, गोराक्षनाथानी इथे केलेले वास्तव्य, इथे असणारी पुरातन मंदिरे, या गावात महाराजांच्या काळात गोळा होत असलेल्या ३२ गावांच्या महसुलामुळे या गावाला पडलेले नाव म्हणजेच बत्तीस शिराळा. छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी पकडले तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम पडला होता. तेव्हा शिराळा गावच्या इनामदार आणि किल्ल्याचे किल्लेदार तुलाजी देशमुख आणि गावाचे दीक्षित यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता; पण त्यात ते अयशस्वी झाले.शिराळा हे गाव नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे जगभर प्रसिद्ध आहे. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे.शिराळा हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील पेठ नाक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. ते मुंबई पासून ३५० किलोमीटरवर आणि कोल्हापूर पासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे.