कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९१

 *** भाग ६ ***


मजल दरमजल मागे पडली. झाडीत अर्धवट दडलेले जव्हार नजरटप्प्यात आले. हौद्यात पाठीशी बसलेले मोरोपंत संभाजीराजांच्या कानाशी झुकले. जव्हारच्या विक्रमशहाच्या झाडीतून उठलेल्या वाड्याच्या कळसाकडे तर्जनी रोखत अदबीने पुटपुटले, "जव्हार-कोळीराजा विक्रमशहाची राजधानी !”


ते ऐकताच संभाजीराजे हौद्यातील बैठकीवरून ताडकन् उठले. वाड्याच्या कळसाचा त्यांनी रोख घेतला. त्यांच्या छातीत धड़का घेत काहीतरी सरसरले. राजांची भुवई घेत होती तसा त्यांच्या उजव्या भुवईने कमानी बाक घेतला. क्षणात कमरेचे हत्यार उपसून त्यांनी त्याचे टोक जव्हारवर रोखत रणघोष दिला- "हर हर महादेव!' त्या रणघोषाला आघाडी - पिछाडीकडून किलकाऱ्यांचे हजारो कोंब फुटले - “हर! हर! महादेव!

खड्या ठाकलेल्या मोरोपंतांनी घोडदळाच्या अधिकाऱ्यांची नावे भराभर गर्जत आज्ञा फेकल्या- " वस्तीस चौतर्फेनं घोडाइतांचा घेर टाका, शाजणे, ढोलांचा कालवा उठवा. दोनांस एक असा घोडा आणि पाऊलोकांचा मेळ पाडा. बोला हर 5 हर महादेव! " सुरतेपासून अवघ्या पंचवीस कोसांवर असलेल्या जव्हारला संभाजीराजांच्या झडप्या घोडदळाने क्षणात येरगाटले.


वाटेत दस्त केलेले काळेकभिन्न लंगोटीबाज कोळी मराठ्यांनी धाक देऊन घोड्यांवर चढविले. त्यांना तोंडाशी ठेवून मराठ्यांची एक घोडेतुकडी जव्हारात दौडत घुसली. पुढचे कोळी, कोळीभाषेत ओरडत दौडू लागले - "मराठे आले! खुद्द शिवाजीचा फर्जद संभूराजे दाबजोर फौज घेऊन चालून येतो आहे! पळा!' " साऱ्या जव्हारभर आवयांचे रान उठले. आत घुसलेली दौडती घोडेतुकडी आपले काम करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली.


भरतीचा दर्याच चालून येतो आहे की काय हे भांबावल्या कोळ्यांना कळेना! हाहाकार उडाला. त्याचा फायदा उठवीत, भाले आणि ढाला तेगी पेलून 'जय भवानी' गर्जत पाच हजारी मावळी पायदळ चवाटांनी जव्हारात घुसले. हत्यारे भिडली. कोळ्यांचा हाय खाल्लेला राजा विक्रमशह, निवडक कोळी संगती घेऊन आपल्या वाड्यातून बाहेर पडला. आपली प्रजा मराठ्यांच्या टापांखाली मरणाला सोडून तो दौड् लागला नासिकच्या रोखाने! मोगलांच्या पंखाखाली गुलशनाबादेत आसरा घ्यायला ! राजा पळाला! जव्हार बेवारस झाले. मनचाहा लुटीला तोंड फुटले. सोने, चांदी, मोती; अफाट संपत्ती लुटीला लागली.


गळ्यातील चंदेरी घाट घुमवीत संभाजीराजांचा हत्ती जव्हारात घुसला. त्यांना बघून चेतावलेले मावळे लुटीचे डाग चटक्या पावलांनी उचलून नगराबाहेर काढू लागले. एक फेर टाकून संभाजीराजे जव्हारच्या मावळतीला झाले. डेरे, शामियानाच्या तणावा ताणल्या गेल्या. तळ सज्ज झाला.


मांडलेल्या चौथऱ्यासारख्या बैठकीवर संभाजीराजे बसले. याच खंबायती मुलुखफाट्यात एकदा नव्हे दोनदा राजांनी सुरत लुटली होती. तेथून केवळ पंचवीस कोसांवरचे ते आभाळ आज जव्हार लुटलेले बघत होते; शिवाजीराजांच्या पुत्राकडून ! सोने, रूपे, चांदी, मोती यांची रास प्रतवारीने संभाजीराजांच्या समोर मांडण्यात आली. सतरा लक्ष रुपयांच्या वस्तभावाची रास पडली.


लुटीला निकराचा विरोध करणारे, काढण्यांनी मुसक्या आवळलेले धिप्पाड कोळी कैदी संभाजीराजांच्यासमोर पेश करण्यात आले. बंदिस्त असले तरी मोठ्या गुर्मीत ते मिळेल ती सजा भोगायला मन बांधून तयार होते.


फत्ते - खुशीच्या, राजांना लिहिलेल्या मोरोपंतांनी पुढे केलेल्या पत्रावर संभाजीराजांनी दस्तुराचे शिक्के केले. पत्रथैली खबरगिराच्या सुपूर्द करण्यात आली.


"युवराजांनी दस्त झाल्या कैद्यांच्या सजेचा करिणा द्यावा. " कैद्यांच्या रोखाने हात करीत मोरोपंत अदबीने म्हणाले.


संभाजीराजांनी कैद्यांच्यावरून एकदा नजर फिरविली. काही झाले तरी ते आपल्या मुलुखाच्या आबादानीसाठी प्राणबाजीने झुंजले होते. संभाजीराजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. कपाळीच्या शिवगंधाचे पट्टे आक्रसले. शांत, धीरगंभीरपणे ते म्हणाले, “पंत, यांतील जे आपल्या फौजेकडे चाकरीस राजी असतील तयांस रुजू करून घ्या. जे नसतील त्यांच्या काढण्या उतरून त्यांस इतमामाने परते पाठवून द्या." "जी. जशी आज्ञा." मोरोपंत आश्चर्याने कमरेत झुकले. युवराजांची आज्ञा इतकी पोक्त पडेल याचा त्यांना कयास नव्हता.


जव्हारचा तळ हलला. मिळाली लूट पहायात रायगडच्या वाटेला लावण्यात आली. युवराजांची फौज रामनगरवर मोहरा धरून पुढे सरकू लागली. रामनगर दोन मजलांवर ठेवून मराठी सेनेचा तळ पडला. रामनगर तर सुरतेच्या दक्षिणेला अवघ्या पंधरा कोसांवर !


मसलत देण्यासाठी मोरोपंत युवराजांच्या डेऱ्यात आले. आत रायाजी, अंतोजी ही युवराजांची खास माणसे होती.

'युवराज, रामनगरवर चाल धरली तर सुरतेची मोगली ठाणी त्यांना कुमक करणार." मुजरा देत पंत म्हणाले.


'त्यासाठीच सुरत आपल्या धाकात राहील असे केले पाहिजे.” संभाजीराजे त्याच विचाराला धरून बोलले. " तो धाक बसण्यासाठी रामनगरवर जाण्यापूर्वी एकदा घोडदळ सुरतेच्या भवत्यानं दौडवून आणावं असं आम्हास वाटतं.” मोरोपंतांनी मसलत पेश केली.


खंडोजी जगताप आणि रूपाजी भोसले यांना ती मनोमन पटली. ती ऐकून संभाजीराजे विचारात गेले. पावसाळ्याचा नेम सांगण्यासारखा नसताना कुठल्याही कारणासाठी फौजेच्या दोन फळ्या पडणे कार्य लावणारे नव्हते..


आम्हाला वाटतं, सुरतेच्या सुभेदारास थेट खलिता धाडावा. त्याच्याकडेच खंडणीची मागणी करावी. जातीनिशी आबासाहेब या तळावर आहेत असा भास त्याला 'द्यावा. सुरतेत खबरगिर पेरून त्यांच्याकरवी अशीच भूमका उठवावी. सुरतकर आपल्या रक्षणासाठी जागीच अडकून पडतील." पंतांच्यासह सारेच युवराजांकडे बघतच राहिले. ही चाल बिनतोड होती. साऱ्यांनाच ती पटली.


"चार लक्ष रुपये खंडणीदाखल भरणा करा, नाहीतर शिवाजीराजे सैन्यासह सुरतेवर चालून येतील" असा जरबेचा खलिता पंतांनी सुरतेच्या सुभेदाराला धाडला. त्या थैलीस्वाराबरोबरच चलाख खबरें सुरतेत घुसले. सुरतेत हाहाकार उडाला !


ही वेळच रामनगरवर चालून जाण्याची होती. पण नासिक-बागलाणकडून विक्रमशहा आणि दिलेरखान आपल्या फौजेची प्रचंड जमवाजमव करीत असल्याच्या खबरा आल्या आणि त्यातच पावसाला सूर लागला.


रामनगरजवळ आलेल्या संभाजीराजांच्या फौजेने सुरक्षित जागेपर्यंत माघार घेतली. गुजराथी पावसात मावळी डेऱ्यांच्या कनाती भिजू लागल्या.


पावसाने पंधरवडा खेळविला. तापल्या घोड्यांची पाठवाने पाणधारांनी निवांत झाली. मोरोपंतांनी आणखी दोन पत्रे सुरतेच्या सुभेदाराला धाडून आपण खंबायतातच ठाण धरून आहोत याची जाण दिली!


पावसाने भांगा देताच मराठी फौजेने पुन्हा रामनगरचा मोहरा धरला. “मराठे आलेत!" हे ऐकून धास्त घेतलेला रामनगरचा सोमशहा केव्हाच पळाला होता ! कबिल्यासह तो सुरतभागात गणदेवीजवळ चिखली येथे ठाण धरून होता. राजा नसलेल्या जव्हारची जी झाली तीच गत रामनगरची झाली. पावसाने झोडपून काढलेले रामनगर संभाजीराजांच्या धारकऱ्यांनी लुटून काढले ! तिकडे सुरतेत शिवाजीच्या सेनेचा थोपा करण्याचे निमित्त धरून औरंगजेबाचा अक्लमंद सुभेदार आपल्याच रयतेकडून पैसे उकळण्याची अजब तेगबाजी नेकीने पार पाडीत होता !

रामनगरच्या लुटीच्या गोणी मोहोरबंद करण्यात आल्या. पडल्या तळावर संभाजीराजांनी जखमदरबार भरविला. दोन्ही चालींत मर्दानगी केलेल्या असामींना तोडे, कडी, मोहरा, वस्त्रे बहाल करण्यात आली. देखण्या संभाजीराजांना प्रत्यक्ष तळावर बघून मावळे धारकरी अभिमानाने भरून येत होते. पेटत्या आगट्यांभोवती फेर टाकून शेक घेताना त्यांची युवराजांबद्दल भरल्या जबानीने बातचीत होत होती.


रूपाजी, रायाजी, अंतोजी आणि धाडसी शिकारखेळे बरोबर घेऊन संभाजीराजे रामनगरच्या रानात एकदा दिवसा शिकारलाही उतरले. हाका घालून उठविलेल्या कळपातील काळी जनावरे त्यांनी हत्तीवरच्या हौद्यातून बंदुकीचे बार टाकून लोळविली. पडली रानसावजे काठ्यांना टांगून तळावर आणण्यात आली. गळाठलेल्या धारकऱ्यांना झणझणीत सागुतीचा तवाना भोग मिळाला!


सुरतेला झुलवीत ठेवून मराठी फौजेचा तळ रामनगर सोडून उठला. पश्चिम घाट चढून नासिक-त्र्यंबकच्या तोंडावर आला.


नासिकजवळ संभाजीराजांच्या विजयी फौजेच्या दोन फळ्या झाल्या. एक त्र्यंबकच्या रोखाने घुसली. दुसरी नासिकवर चालून गेली.


जव्हारचा विक्रमशहा आणि दिलेर यांचे जोडसैन्य ठाण्याच्या उत्तर प्रांतात असलेल्या मराठी फौजेवर चालून गेले होते. तिथे भयानक रणधुमाळी पेटली होती. अनेक मावळे कामी आले होते. पण मराठ्यांनी धारराव कोळी आणि विक्रमशहाचा मुलगा यांना दस्त करून त्यांना गर्दनमारीची सजा ठोकली होती.


नासिक ( उर्फ गुलशनाबाद) हे ताकदवर मोगली ठाणे जाधवराव या मोगली चाकरीत असलेल्या राजांच्या मामेभावाच्या ताब्यात होते! संभाजीराजांचे ते मामेकाका. मराठी फौजांनी गोदावरीला साक्षी ठेवून त्र्यंबक, नासिक ही दोन्ही ठाणी मारली. काढण्या चढवून मुसक्या बांधलेले जाधवराव रूपाजी भोसल्यांनी नासिकच्या तळावर युवराजांच्या सामने पेश केले.


जोडल्या डोळ्यांनी संभाजीराजांनी मामेकाका जाधवराव सिंदखेडकर यांना निरखले. मासाहेबांचे हे मोगली पेहराव केलेले भाचे बघताना त्यांच्या छातीत कालवाकालव झाली. जिजाऊंच्या आठवणीने त्यांचा हात नमस्कारासाठी छातीकडे गेला. जाधवराव त्यामुळे गैरसमजात आले. त्यांना वाटले युवराजांच्या मनी रक्ताचे नाते जागे झाले ! आणि त्यांनी आम्हालाच नमस्कार केला.


"रूपाजी, काकासाहेबांच्या काढण्या उत्मा.” संभाजीराजे थंडपणे म्हणाले. रूपाजी चमकला. क्षणभर घोटाळला.


" रूपा! जी." बैठकीवरून आसूड फुटल्यागत जरब आली. घाईघाईने रूपाजीने जाधवरावांच्या काढण्या फटाफट उतरल्या.

उजव्या तर्फेला असलेल्या मोरोपंतांकडे वळून संभाजीराजे म्हणाले, “पंत, काकासाहेबांना समज द्या. आम्ही युवराज आहोत. त्यांनी रिवाजी मुजरा दिलेला नाही ! तो नीट देता यावा म्हणूनच त्यांच्या काढण्या उतरल्या आहेत.


“जी.” मोरोपंत झुकले. दमदार पावलांनी ते जाधवरावांजवळ आले. त्यांनी समज दिली " राव, तुम्ही कैदी आहात. युवराजांना रिवाजी मुजरा द्या. "जाधवराव चमकले. मान ताठ ठेवीत संभाजीराजांना पेटते डोळे देत ते म्हणाले, 'कैद झाला म्हणून वाघ गवत खात नाही ! पोर फर्जदांना मुजरा द्यायचा जाधवांचा वसा नाही !"


"कोण वाघ ?” फुलल्या डोळ्यांचे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. तो चित्कार ऐकून रूपाजी, पंत, रायाजी ही भोवतीची मंडळी अंगभर चरकली.

'बेडर चालीने संभाजीराजे जाधवरावांच्या समोर आले. भाल्याचे पाते चालवावे तशी नजर मामेकाकांच्या डोळ्यांत चालवीत, फुलल्या नाकपुड्यांनी आसुडासारखे वाटावे असे शब्द त्यांनी त्यांच्या कानांवर ओढले - "वाघ गवत खात नाही पण तो वसा - पाळीव मांजरांनी बोलू नये ! दर्शनाबरोबर आम्ही पाय धरावे असा तुमचा वकूब. पण- पण तुम्हांस काका म्हणण्याची आम्हास शरम वाटते! आऊसाहेबांचे भाचे तुम्ही ! म्हणूनच मुजरा रुजू घातला पाहिजे ! आम्हास नव्हे त्यांना! आम्हाला बघून त्यांची याद आली नाही तुम्हाला ! तुम्हास बघून आम्हास मात्र ती आली! गुमाने मुजरा रुजू घाला त्या बैठकीला ! ती आऊसाहेबांची आहे! नाहीतर...!" 'नाहीतर काय ? " भुवई चढवीत जाधवराव गुर्मन बोलले.

" काय ? जाधवांचा वसा बोलणारी तुमची जीभ हासडून या क्षणी तुमच्या हातात देण्याची आज्ञा देऊ आम्ही! पंत,” संभाजीराजांची छाती लपापू लागली. "राव , मुजरा घाला. बैठकीला आणि युवराजांना " संभाजीराजांचे घुसखोर मन ऐकून सुन्न झालेले मोरोपंत जाधवरावांचा खांदा हलवीत म्हणाले.


एक क्षण गेला आणि तसलीम कुर्निस करून मार खाल्लेल्या उभ्या हयातीच्या - आठवणीने जाधवरावांचा ऊर गलबलला. डोळ्यांच्या कडा दाटल्या. श्वास चढीला पडला. पुढे होत जाधवरावांनी झटकन युवराजांच्या मोजड्यांना सरळ हात भिडविले. धरल्या आवाजाने मान डोलवीत ते म्हणाले, "आत्याबाईंचे पाय धरण्याची आमची लायकी नाही ! खरे तर तुमचे सुद्धा!

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९०

जगदीश्वराचे दर्शन घेऊन जोत्याजी केसरकरासह खासेमहालात परतलेल्या संभाजीराजांना खिदमतगाराने आत येऊन वर्दी दिली, "मुतालिक महादेव यमाजी भेटींची आज्ञा मागतात. "


"पेश येऊ द्या." युवराजांनी त्याला इजाजत दिली.


प्रौढ वयाचे महादेव यमाजी उपरणे सावरीत महालात आले. पगडी झुकवीत त्यांनी मुजरा रुजू घातला. नजर युवराजांच्या पायांवर ठेवून ते म्हणाले, “थोरल्या स्वामींनी युवराजांना आपल्या सदरेशी याद फर्मावलं आहे.'


महादेव यमाजींना पुढे ठेवून जोत्याजींसह संभाजीराजे तसेच महालाबाहेर पडले. राजांच्या वाड्याची सदर आली. तिच्या दोन्ही तर्कांना मोरोपंत, आण्णाजी, दत्ताजी त्रिमल, बाळाजी हात बांधून अदब धरून उभे होते. राजांच्या पाठीशी विश्वासू हुजऱ्या खंडोजी दाभाडे कमरेच्या हत्यारांवर मूठ देऊन खडा होता. युवराजांना बघताच त्या साऱ्यांचे मुजरे झाले.


" “या.” संभाजीराजांना बघून राजे म्हणाले.


राजे बसलेल्या बैठकीच्या समोर येत युवराजांनी त्रिवार अदब मुजरा रुजू घातला. "या." यांची ओळख करून घ्या.” राजांनी समोर उभ्या असलेल्या भगव्या कफनीधारी, तेजस्वी गोसाव्याकडे हाताचा इशारा दिला.


राजांच्या बैठकीच्या खालगत पायरीवजा बिछायतीवर संभाजीराजे बसले.


"हे समर्थांचे शिष्य. दिवाकर गोसावी.” राजांनी संन्याशाची ओळख दिली. दंड, मनगटात रुद्राक्षांची टपटपीत कडी आवळलेले, दाढीधारी, सतेज दिवाकर गोसावी हातातील दंड तसाच धरून नमस्कारासाठी किंचित झुकले.


" आणि हे आमचे फर्जद युवराज संभाजीराजे.” राजांनी युवराजांच्या खांद्यावर हाताची बोटे ठेवीत दिवाकर गोसाव्यांना त्यांचा परिचय दिला.


'रघुकृपा!" दिवाकर पुटपुटले. संभाजीराजांनी उठून त्यांना नमस्कार दिला.


"बोला दिवाकरपंत, काय धरून येणं झालं ? " राजांनी गोसाव्यांच्या कपाळीचे भस्मपट्टे निरखले.


"गुरुदेवांचा मुक्काम कोडोली पारसगावात आहे. आपल्या भेटीची ते इच्छा करतात.- आपल्यासाठी त्यांनी पत्र दिले आहे." दिवाकरांचा आवाज हनुमानाच्या मंदिरातील घाटेसारखा होता. त्यांनी खांद्याची झोळी पोटाशी घेत तिच्यातून पत्राची वळी बाहेर काढली. पुढे येत वाकून ती राजांच्या हाती दिली.


हाती घेतलेली वळी मिटल्या डोळ्यांनी राजांनी आपल्या कपाळीच्या शिवगंधाला भिडविली. ती वाचण्यास तशीच बाळाजींच्या हाती द्यावी म्हणून एकदा बाळाजींच्याकडे नजर टाकली. आणि त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, ती मागे हटलेल्या दिवाकरांच्याच रोखाने पुन्हा धरीत राजे म्हणाले, “समर्थांचे बोल समर्थशिष्यांच्या तोंडून ऐकावे असं आम्हास वाटतं."


"जशी राम इच्छा!" म्हणत दिवाकर पुन्हा पुढे झाले. झुकून त्यांनी राजांच्या हातून पत्राची वळी आपल्या हाती घेतली. त्या पत्रात काय आहे ते खुद दिवाकर गोसाव्यांनाही माहीत नव्हते.


चौदा वर्षांपूर्वी एकदा राजगडावर दुसऱ्या एका समर्थ शिष्याची- भास्कर गोसाव्यांची राजांशी भेट झाली होती. त्या भेटीत राजांनी त्यांना विचारले होते की, - 'तुमचे गुरू कोण ? कुठले ? कोठे राहतात ?” भास्कर गोसाव्यांनी त्यांच्या गुरूंचा महिमा त्या वेळी सांगितला होता, पण त्याउपर राजकारणाच्या घाईगर्दीत राजांना समर्थांचा परामर्श घेणे जमले नव्हते. आज समर्थांनी आपणहून त्यांना पत्र धाडले होते.. निर्हेतुक. राजांचे चढत्या शिगेचे पराक्रम ऐकून जे वाटले ते रसाळ रामबोलीत समर्थांनी पत्रात उतरविले होते.


जय जय रघुवीर समर्थ " पत्र वाचण्यापूर्वी दिवाकरांनी नामस्मरण केले. तासावर ठणठणीत टोल उठावेत तसे दिवाकर गोसाव्यांच्या तोंडून समर्थांचे सूर्यबोल सर्वांच्या कानी पडू लागले:


" निश्चयाचा महामेरू। बहुतजनांस आधारू अखंड स्थितीचा निर्धारू ! श्रीमंत योगी ॥


परोपकाराचिया राशी उदंड पड़ती जयाशी तयाचे गुणमहत्त्वाशी । तुळणा कैशी ? नरपति हयपति। गजपति, गडपति पुरंधर आणि शक्ति पृष्ठभागी ॥ येशवंत, कीर्तिवंत सामर्थ्यवंत, वरदवंत पुण्यवंत आणि जयवंत। जाणता राजा ॥ आचारशील, विचारशील। दानशील, धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सर्वांठायी ॥ धीर, उदार, सुंदर। शूर क्रियेसी तत्पर सावधपणेसी नृपवर तुच्छ केले ॥ तीर्थक्षेत्रे ती मोडिली । ब्राह्मणस्थाने बिघडली सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला ॥


 देवधर्म, गोब्राह्मण करावयासी रक्षण हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥ 

उदंड पंडित, पुराणिक । कवीश्वर, याज्ञिक, वैदिक


धूर्त, तार्किक, सभानायक । तुमचे ठायी ॥ या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।


महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा करिता ॥


गावोगाव भ्रमंती करताना डोळांदेखत लोकांचे नरकहाल बघणारे दिवाकर गोसावी भरून आले. त्यांच्या डोळ्यांतून झालेली आसवे दाढीवर उतरली. वाचन खुंटले.


सारे कानांचे ओठ करून ते अमृतबोल प्राशीत होते. नाकाचा गड्डा चिमटीत धरून मिटल्या डोळ्यांनी राजे विचारात गेले होते- "कसे दिसत असतील समर्थ ? हृदयस्थ झाला नारायण ! श्रीमंत योगी! योग ? केवढा दूरचा पल्ला ! खर्ची पडलेला आमचा हर मोहरा योगी झाला! आम्ही त्यांच्या योगीपणाचा भार खांद्यावर घेऊन वाहतो आहोत! आम्ही भारवाहक ! महाराष्ट्र धर्म ! पृथ्वी आंदोळली!" जिथं तारे संपतात तिथं जाऊन राजे पोचले होते! खोल खोल. दूर-दूर.


दिवाकरांच्या बोलाबोलांनी आजवर सापडत नव्हते ते सारे मनात अडखळलेले महाराजसाहेब संभाजीराजांना मूर्तिमंत गवसत होते 'निश्चयाचा महामेरू !' महामेरू ! केशवपंडितांनी रामायणाच्या पठणात सांगितलेला सर्वांत उंच पर्वत! या रायगडाहून दशगुणी उंच! तेवढा निश्चय! आम्याच्या दरबारात 'कभी नहीं' म्हणताना पेटून उठलेला! आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला! निश्चयाचा महामेरू !


बहुतजनांस आधारू! 'आमच्या मावळ्यास हातजोड देऊन बसल्यास उठता, उठल्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे' म्हणणारा! आधारू ! म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवीत - बाबा जे मनी आले ते आम्हास बोलले पाहिजे' म्हणणारा आधारू !


धीर, उदार, सुंदर! होय अतिसुंदर! एका रात्री आई जगदंबा स्वप्नात आली तेव्हा " जाऊ नको, थांब" म्हणत विस्कटल्या केसांनी, घामेजल्या, थरथरत्या चेहऱ्याने, फुलल्या डोळ्यांनी आम्हाला बघताना दिसलेला तो सुंदर चेहरा! " ल्येकरा घात झाला!" म्हणत आम्याच्या डेऱ्यात आम्हाला मिठीत घेताना दिसलेली ती सुंदर मुद्रा ! कीर्तिवंत, यशवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, वरदवंत, जयवंत पाचाडच्या सदरेवरची घाट घणघणावी तसे ते रामबोल संभाजीराजांच्या कानामनात घुमू लागले. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सुशील- सावचित्त झालेले दिवाकर पुढे आणखी काही वाचणार तोच संभाजीराजे म्हणाले, 'थांबावं! गोसावी, तो महाराष्ट्र धर्माचा काव्यबोल आणखी एकवार ऐकवा." संभाजीराजांच्यातील कवी आणि राजपुत्र दोन्हीही तवाने झाले होते.

" या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हांकरिता।' 

दिवाकर वाचू लागले. राजांचे मिटले डोळे तसेच होते. संभाजीराजांचे टवकार कान अधिक टवकार झाले.


" आणखी काही धर्म चालती। श्रीमंत होऊन कित्येक असती धन्य धन्य तुमची कीर्ति । विस्तारली ॥ तुमचे देशी वास्तव्य केले। परंतु वर्तमान नाही घेतले ऋणानुबंधे विस्मरण जाहले बा काय नेणू ?


उदंड राजकारण तटले। तेथ चित्त विभागले- प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे।।'


शेवटची ओवी कानी पडताच राजांनी खाडकन डोळे उघडले! क्षणभर त्यांना दिवाकराऐवजी समर्थच समोर आहेत की काय असा भास झाला !


संभाजीराजांचे डोळे मात्र आपोआप मिटले गेले होते. आपल्या आबासाहेबांची असंख्य गोमटी रूपे ते ऐकल्या शब्दांशी ताडून बघण्यात गढले होते.


बागलाण मारून परतलेली मोरोपंतांची फौज महाडात ठाण धरून होती. राजांनी पेशवे मोरोपंतांना रायगडी पाचारण केले. पावसाळा तोंडाशी आला की मराठी घोडी पागेत लीद टाकीत चंदी चघळतात हा सायाच शेजारी गनिमांचा अनुभव होता:


राजांना या गाफिलीचा पुरता लाभ उठवायचा होता.


मोरोपंतांची फत्तेबाज फौज, खासा युवराज संभाजीराजांच्या दिमतीला जोडून घोडी जव्हार- रामनगर या गुजरात सीमेवरच्या कोळी राज्यांवर उतरविण्याचा चुनेगच्च मनसुबा राजांनी बांधला !


संभाजीराजांची ही पहिली मोहीम ! पावसाळा तोंडावर धरून ! भोसल्यांचे 'राजेपण असेच उन्हा पावसात सुलाखून निघावे लागते.


सदरी दाखल झालेल्या मोरोपंतांना राजांनी बेत खुला केला, “पंत, युवराजांच्या पाठीशी राहून तुमच्या फौजेनिशी जव्हार-राननगर मारून चालविणे. खासा आम्ही मोहिमेत आहोत हा भाव युवराजांशी ठेवणे. नदी नाले आड येतील ते पार करावया नौका, हत्ती, पोहणीस कसबी कोळी, भोई दिमतीस घेणे. पाऊस जोर धरतो तरी हिमतीने मोहीम चालती ठेवणे. युवराजांची ही पहिली हत्यारी चाल, फत्तेमुबारकीने कार्यों लावणे.' "


युवराज संभाजीराजे आणि मोरोपंत यांना राजांनी मानवस्त्रे बहाल केली. मोहिमेचा मोहरा जोडून दिला.


रायगडच्या देवमहालातील, अंगावर धावून आल्यागत दिसणाऱ्या आवेशी जगदंबेच्या मूर्तीवर संभाजीराजांनी बेलभरली ओंजळ उधळली. भंडाऱ्याची मूठ चरणांवर सोडली. डोळे जोडून आईच्या पेटल्या डोळ्यांतील आग क्षणभर निरखली. आपसुखच संभाजीराजांचे गुडघे फरसबंदीवर टेकले. आपले टोपधारी मस्तक त्यांनी आदिशक्तीच्या समोर फरसबंदीला भिडविले.


त्यांच्या मिटल्या डोळ्यांना न कळणारे दृश्य दिसले- आईच्या आठी हातांचा मिळून एकच थोर हात झाला आहे! प्रतापगडी नाचविला त्याहून थोर- राव तान्हाजी पडले त्या रात्री कोंढाण्याच्या कड्यावर उसळला त्याहून केवढातरी थोर पोत खुद्द आईच त्या हाताने आमच्या हाती देते आहे! तो पेलता घेण्यासाठी आमचे हात लहाने वाटताहेत! त्याच्या दिपवत्या उजेडात आमचे आम्हीच दिसेनासे झालो आहोत !


" उदं उदं." कळवळती भाक घालण्यासाठी त्यांचे ओठ पुटपुटले. उठविले मस्तक त्यांनी पाठीशी उभ्या असलेल्या राजांच्या पायांवर ठेवले. "उठा, येशवंत असा. पडल्या मुक्कामावरून खबरगीर घाडा. पंतांच्या मसलतीने चला.” राजांनी त्यांचे खांदे हात पकडीत घट्ट धरले. आज संभाजीराजे मोहिमशीर होण्यासाठी गड उतरणार होते. राजे जातीने महाडपर्यंत त्यांची सोबत करणार होते. युवराजांनी आऊवशाकडे जाऊन आशीर्वाद घेतले. धाराऊच्या पुढे राहून तबक फिरविणाऱ्या येसूबाईच्या तबकातील ज्योतीकडे बघून "निघतो आम्ही." म्हणत निरोप घेतला.


ते शब्द ऐकताना येसूबाईंना वाटले मान उठवावी आणि मिळाला तर टोपाखालचा - शिवगंधाचा जोडपट्टा निसटत्या नजरेने बघून घ्यावा! पण ते घडले नाही..


त्यांच्या पाठीशी असलेल्या धाराऊने मनोमन कापूरव्होळाच्या 'म्हादेवाला साकडे घातले-"संबू म्हादेवा, ल्येकरू पयल्या डाव गर्दीत उतारतंय. येसूसरी कर त्येला !! संभाजीराजांनी धाराऊची पायधूळ मस्तकी घेतली. बालेकिल्ल्याच्या सदरी जोत्यावर सिद्ध असलेल्या मोरोपंत, रूपाजी भोसले, खंडोजी जगताप यांच्याशी राजे, रायाजी, अंतोजी, जोत्याजी यांच्या सोबतीने संभाजीराजांचा मेळ पडला.


- साऱ्यांनी बेलफुले वाहून गडदेव जगदीश्वराचे दर्शन घेतले. मंडळी गडउताराला लागली. मनोरे, गंगासागर तलाव मागे पडला. गडमुखासारखा असलेला महादरवाजा समोर आला. खांद्याच्या इतमामासाठी त्यावरची नौबत दुडदुडू लागली. लहाना दरवाजा आणि बगीचा मागे टाकीत सारे पाचाडच्या वाड्यात आले. सदरेवरची घंटा आणि आत जिजाऊसाहेब असल्याने तो वाडा मंदिरासारखाच झाला होता.


राजे, मोरोपंत सदरेवर थांबले. अंतोजी, रायाजीसह संभाजीराजे वाड्याच्या खासेमहालात गेले. तिथे जिजाऊ, पुतळाबाई त्यांची वाट बघत होत्या. युवराजांनी त्यांचे पाय शिवून धूळ घेतली. त्यांना घेऊन जिजाऊ, पुतळाबाई वाड्याच्या देवमहालात आल्या. देवीचे दर्शन झाले. विचारात गेलेल्या जिजाऊ म्हणाल्या, " तुमच्या एवढ्याच उमरीचे असताना तुमचे महाराजसाहेब तोरण्याला भिडले होते. यश घेऊन आले होते. आम्हास भरोसा आहे तुम्ही तसेच कराल !


पाचाडात थाळे झाले. राजे-संभाजीराजे वाड्याबाहेर जायला निघाले. सदरेवर येताच कुणीतरी खेचल्यासारखे संभाजीराजे तुळईला टांगलेल्या घंटेखाली आले. समोर दिसणाऱ्या कृष्णकमळासारख्या रायगडाच्या मावळतीला माचीला त्यांचे डोळे भिडले. तेथून दुरून का होईना आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. आता परतेपर्यंत काही ते घडणार नव्हते. पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊंची मूरत त्यांनी गर्रकन समोर होऊन डोळ्यांत भरून घेतली.


“येतो आम्ही." त्यांनी जिजाऊंचा निरोप घेतला.


सारे पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. बाहेर जिन कसून दौडीची घोडी मोतद्दारांनी धरली होती. त्यावर मांडा जमल्या. राजे-संभाजीराजे महाडच्या रोखाने दौडू लागले. आभाळात भुर्के ढग लटकून होते. गर्मीने अंगी घामाच्या धारा धरू लागल्या.


महाड हे लष्करी पागेचे ठाणे आले. पंतांच्या माणसांनी बांधलेली दहा हजार कडव्या स्वारांची फौज कूचासाठी सज्ज होती. तिच्या आघाडीला हौदा घातलेला जंगी हत्ती तयार होता.


उन्हे कलती घेईपर्यंत राजांनी महाडात बांधविलेल्या वाड्यात विसावा झाला.


दिवस प्रहरभर ठेवून फौजेतील चौघडे झडू लागले.. पाच हजार मांड घेतल्या घोडाईतांचे पथक मोरोपंतांनी हत्तीच्या पुढे काढले. आता हत्ती घोडदळ आणि पायदळ यांच्या मध्ये आला. संभाजीराजांना घेऊन राजे महाडच्या वाड्याबाहेर पडले. मध्यभागीच्या हौदावान हत्तीजवळ आले. माहुताने अंकुशमार देऊन स्वारीचे ते थोर जनावर बसते केले.


राजांच्या सामने गुडघे टेकून आपले मस्तक त्यांच्या पायांवर ठेवताना संभाजीराजांना फरक कळला. शाही फर्मानाच्या धूळमाखल्या उंटासमोर गुडघे टेकण्यातील आणि सजल्या सेनेत महाराजसाहेबांसमोर गुडघे टेकण्यातील !


त्यांना उठवून छातीशी घेत राजे म्हणाले, " सांभाळून असा. कधीतरी होळी सणाला तुम्ही विचारलं होतंत 'आबासाहेब, तुम्ही काढाल जळत्या हुडव्यातील नारळ - बाहेर ?" आज आम्हीच विचारतो आहोत तुम्ही तो काढाल काय ?" “जी. कोशिस करू.” संभाजीराजांच्या तोंडून सहज जाब सुटला.


" या; जय भवानी !” राजांचे डोळे लखलखले.


'जय भवानी.” संभाजीराजांनी त्या लखलखीला साद दिला. हत्तीला शिडी लागली. ती पार करीत संभाजीराजे हौद्यात चढले. पाठोपाठ सेनेवर नजर ठेवण्यासाठी मोरोपंत चढले. रूपाजी भोसले, रायाजी, अंतोजी गाडे, खंडोजी जगताप, मोरेश्वर नागनाथ यांनी हत्तीला आपल्या घोड्यांचे कडे टाकले. निशाणबारदारांनी निशाणी काठ्या वर घेतल्या. शिंगाड्यांनी शिंगांच्या ललकाच्या घुमविल्या. चौघडे दुडदुडले. घोडदळाने कदमबाज चाल धरली. चालला! शिवाचा वरदहस्त घेऊन शंभो चालला! त्याच्या पिछाडी आघाडीने दहा हजार जानकुर्बान मावळा चालला.


युवराजांची चालती फौज नजरेआड होईपर्यंत राजे आपल्या माणसांनिशी ती बघत राहिले. कुणाच्या तोंडून ऐकलेले, केव्हा ऐकलेले ते राजांना नीट आठवेना पण तेवढे त्यांना आठवले - " हे गडकोटावर राहतील, प्रलय-तांडव माजवतील !!'

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८९

 आता पाचाडवाडीत सकाळ धरून नित्यनेमाने घंटेचे टोल घुमू लागले. याने केवळ राजे-संभाजीराजे यांचीच सोय झाली नाही. पाचाडातील शिबंदीच्या शिलेदारांना, अठरा कारखान्यांतील, कष्टकऱ्यांना कळून चुकले की, घंटानाद घुमू लागताच जिजाऊसाहेब सदरेवर आलेल्या असतात !


असेच संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे एकदा मावळमाचीवर आले. पाचाडच्या रोखाने उठलेले घंटेचे टोल वाऱ्यावर स्वार होऊन माचीकडे सरकले होते. दिवस कासराभर वर चढला होता. दगडबंद बुरुजावर उभे राहून राजे-संभाजीराजे पायथ्याच्या पाचाडच्या सदरेवर डोळे जोडून उभे होते.


चुन्याची बोटभर खड़ी रेघ दिसावी तशा जिजाऊ दूरवर सदरेवर दिसू लागल्या. त्या दिसताच दोघांनीही अदबमुजरे घातले. सदरेवरची रेख निश्चल खड़ी होती. बुरुजावरून पितापुत्र डोळ्यांचेच हात करून त्या रेषेच्या पायथ्याला भिडवून मोकळे झाले होते !


"युवराज ऽ, " राजे काहीतरी योजून बोलू लागले. 'जी.” संभाजीराजांनी त्यांची साद पडू दिली नाही.


“ पायथ्याच्या वाड्याच्या सदरेवरून मासाहेब तुम्हा-आम्हास अचूक कशा का ओळखतील ?" राजांनी विचारले.


अलबत... अलबत ओळखतील मासाहेब अचूक. तुम्ही कुठले व आम्ही कुठले ते!” संभाजीराजे क्षणभर थांबले. राजांच्या पायांकडे नजर लावीत म्हणाले - " आपण केवढे थोर आम्ही आम्ही केवढे छोटे ! मासाहेब चुकणार नाहीत!” संभाजीराजांनी - - उत्तर दिले.


निरोपासाठी आलेल्या गणोजी शिर्यांना संभाजीराजांनी खांदाभेट दिली. ती देताना त्यांना कुठंतरी खोलवर चालून गेले की, " एवढ्या पंधरा दिवसांच्या येथील मुक्कामात गणोजी ना आबासाहेबांशी, ना चमकत्या तोड्याशी, ना आमच्याशी कधी खुल्या जवानीने बोलले! कधी निसटते बोलण्याचा योग आलाच तर गणोजी शिर्के पापण्यांची चटाचट फडफड करतात! एखादा शब्द बोलून आमच्या आणि आबासाहेबांच्या हातातील सोन्याच्या कड्याकडे एकरोख बघत राहतात ! "


एकदा तर संभाजीराजांना गणोजी तसे बघत असताना वाटले होते की, तसेच चालत त्यांच्याजवळ जावे आणि सर्वांसमक्ष आपल्या हातीचे कडे उतरून त्यांच्या हाती भरावे ! पण ते रिवाजी दिसले नसते.


पिलाजी आपल्या मुला -सुनेनिशी निघून गेले.


संभाजीराजांचा ठरला दिनक्रम सुरू झाला. सुक्या तळ्याजवळ मोकळ्या मैदानात असलेल्या लोखंडी मल्लखांबावर ते एका सकाळी सरसर दशरंग फिरत होते. शेजारी उभ्या असलेल्या गोमाजीबाबांची आता त्यांच्यावर नजर ठरत नव्हती. टाळा वासून ते नुसते बघत होते.


मल्लखांब लोखंडी असल्याने संभाजीराजांच्या अंगी उठलेल्या घामाने तो निथळून निघाला. त्याच्यावर हात ठरेनात आणि खांबाच्या टोपाकडे चढते गेलेले संभाजीराजे बाणासारखे पायथ्याकडे घसरतीला लागले, त्या घसरतीतच त्यांनी कसबाने अंग बाहेर झोकून दिले आणि पवित्रा घेत ते गोमाजींच्या पुढ्यात खडे ठाकले! घामाघूम झालेले ! पण ओठभर हसणारे !


झटकन गोमाजींनी पुढे होत हातीची शाल त्यांच्या अंगाभोवती लपेटली, 'म्हेनतीच्या घामेजल्या अंगावं वारा घेऊ ने, धाकलं धनी!" काहीतरी बोलायचे म्हणून गोमाजी बोलले खरे; पण मनोमन त्यांना उघडे संभाजीराजे बघताना वाटले होते की, " म्हातारी जाली म्हूण काय जालं, आमचीच नदार लागायची या सोनकांबंच्या मल्लखांबाला ! "


मेहनत घेऊन आलेले संभाजीराजे पेहराव अंगी घेऊन, धाराऊने दिलेली दुधाची चरवी ओठांआड रिचवून वाड्याच्या सदरबैठकीवर आले. राजे महाडकडे कूच झाले होते. युवराजांना बघताच बसलेले बाळाजी चिटणीस अदबीने उठले. उभ्या असलेल्या आण्णाजींनी झटकन मुजरा घातला.


सदरेवर चारपाच कुणबाऊ माणसे आणि रायगडाच्या पायथ्याच्या वाडीचा गावखोत उभा होता. संभाजीराजांची त्यांच्यावर नजर पडताच ते सारेच कमरेत झुकले.


* कोण मंडळी ही ? " बैठक घेत संभाजीराजांनी बाळाजींना विचारले. "हे वाडीचे शिकारखेळे आहेत. त्यांच्याविरुद्ध गावखोतांची तकरीर आहे. " बाळाजींनी उभे राहून उत्तर दिले.


"कसली तकरीर ?” संभाजीराजांनी खोतांकडे बघत विचारले.


सारेच गप्प होते.


"का?" चिटणीस यांची तकरीर आम्हास ऐकविण्याजोगी नाही ?"


" नाही. तसं नाही युवराज ! पण हा कथला सादिलवार आहे. आम्ही त्यास निवाडा देऊ." एवढा वेळ गप्प बसलेले आण्णाजी नम्रपणे म्हणाले.


" जशी तुमची इच्छा!” संभाजीराजे हसून म्हणाले. जमलेल्या शिकारखेळ्यांत मात्र चुळबूळ झाली. त्यांच्या म्होरक्या गुंजोटे कमरेत झुकून मुजरा देत म्हणाला, " सरकार गडावं न्हाईत तर आपुनच काय ती तड लावावी आमची धाकलं धनी."


" कसली तड! काय झालं? ना कचरता बोला आम्हास ! संभाजीराजांनी गुंजोट्याला धीर दिला.

'धनी, होनी आगळ क्येलीय. तड लावायची ती आमची, होंची नाय." गावखोताने सावधपणे तोंड उघडले.


'कसली आगळ ? संभाजीराजांनी खोताला नजर दिली. "


" वाडीच्या वाघोऱ्याच्या रानात होनी शिकार क्येली. मायंदळ जनावरं पाडली. पर सरकारातनं ठरवून दिल्याली शिकारीची तक्षीम आम्हाला न्हाई पावती क्येली! शिकार करून ह्ये वाटा द्याया लागतो म्हून रानातनं गुपचूप पशार जालं.” खोताने तकरीर पेश केली. ती मजेदार होती. शिकारखेळ्यांनी केल्या शिकारीचा ठरलेला वाटा गावखोताला दिला नव्हता!


'आण्णाजीपंत, या शिकारीबाबीचा कानू काय ?" संभाजीराजांनी विचारले. " खोत म्हणतात ते सही आहे युवराज. सरकारी फडातून खोतास तसे अधिकार देण्यात आले आहेत. गुंजोटे आणि त्यांचे शिकारखेळे दोषी आहेत.” आण्णाजींनी बरहुकूम कानुजाबता सांगितला. "यासी सजा काय ?” संभाजीराजांना औरंगाबादेतील 'त्या' शिकारीचा प्रसंग आठवला.


"दंड! शिकाऱ्यांनी सरकारी फडात दंड जमा केला पाहिजे. त्यातील तक्षीम गावखोतास तोडून दिली जाईल. जेवढी जनावरं शिकाऱ्यांनी पाडली असतील त्या हर जनावरामागं चार शिवराई दंड जमा करणं भाग आहे ! "


शिकारखेळे दंडाची भाषा ऐकताच चळवळले. खोताचा चेहरा जरा उजळ झाला. " खोत, तुम्ही कधी शिकारीची खेळी खेळता ? " खोताच्या ध्यानी मनी नसलेला प्रश्न संभाजीराजांनी त्याला विचारला.


"जी. खेळतो की!


" मग त्यातील तक्षीम कधी वाडीच्या शिबंदीच्या सुभेदारांच्या हवाली करता ?


"न्हाई घनी" खोताचा आवाज पडका झाला.


"तुम्ही शिकार खेळता. तुम्हास ठावे असेल. उठवल्या रानाला अमुकच एक जनावर भेटेल याचा अंदाज नाही देता येत. या जोखमीच्या खेळीत कधी वाघरासारखं जनावर खेळ्यावर चालून आलं; त्यानं तो जाया झाला तर त्याची हकीकत पुसता ?' "न्हाई धनी." खोत गडबडला.


"कुणी वाघराची शिकार पाडली तर त्याच्या पाठीवर गावखोत म्हणून शाबासकीचा हात देता की त्यातही तक्षीमच मागता ?


' या प्रश्नाला खोताजवळ उत्तरच नव्हते !


" वाघासारख्या जनावराला हा जाबता लागू नाही युवराज.” आण्णार्जीनी खोताला पाठीशी घालण्यासाठी अदबीने कायदा पुढे केला. 

" तेच म्हणतो आम्ही आण्णाजीपंत. शिकारखेळीला असे काटेकोर कानू लागत नाहीत. जोखमीचे जनावर अंगावर आले तर घरी ठाव घेतलेले हे खोत काही करणार नाहीत. खायचे जनावर पडले तर वाटा मागण्यास चुकायचे नाहीत! आम्ही आम्ही या शिकारखेळ्यांवरील दंड माफ केला आहे !!' "


" पण पण युवराज कानूप्रमाणे ... -


"आण्णाजी ऽ, आम्ही दंड माफ केला आहे. ही आज्ञा आहे!” संभाजीराजांचा आवाज करडा झाला. मान ताठ झाली.


“जी.” आण्णाजी लपकन कमरेत झुकले.


'खोत. जातीचा शिकारी 'वाटा' म्हणून आलेली शिकार कधी खात नाही है। ध्यानी ठेवा. गुंजोटे, जातीचा शिकारी ज्यांना ज्यांना शिकार झाल्याचे कळले त्यांना 'वाटा' तोडून दिल्याखेरीज रानातून गुपचूप पळून जात नाही हे विसरू नका. आण्णाजीपंत, आम्ही आज्ञा केली ते मनी लावून घेऊ नका. थोरपणी आम्हास क्षमा करा. औरंगाबादेच्या रानात आम्ही वनगाईंची शिकार होताना डोळ्यांदेखत पाहिली. त्या खेळ्यांना दंड करणे तुम्हा-आम्हा कुणालाच साध्य न होणारे! त्या वेळी वनगाई समोर बघून हातीची हत्यारे तशीच खाली नेणाऱ्या आमच्या खेळ्यांचा आम्हास कोण अभिमान वाटला! यांना दंड माफ करताना वाटत नाही एवढा आनंद आम्हाला त्या खेळ्यांना मरातबानं बक्षिसी बहाल करताना वाटला असता!"

" खोत, आम्ही जातीनिशी तुमच्या रानात उतरू! शिकार खेळण्यासाठी- रानडुक्करांची! त्या वेळी आमच्या सोबतीला असा. पुरं जनावर वाहून वाडीत न्या. तुम्ही शिकार खा. वाडीच्या गावकऱ्यांच्या तोंडी घाला!


'जगदंब जगदंब' ! संभाजीराजे थेट राजांच्यासारखे पुटपुटले. छातीच्या - कवड्यांच्या माळेवर हातबोटे फिरवीत बैठकीवरून उठले. जगदीश्वराच्या दर्शनासाठी म्हणून अंत:पुराकडे चालू लागले. त्यांच्या पाठवा आकृतीला साऱ्यांनीच मुरे घातले. आण्णाजीपंतांच्या हातातील उपरण्याचे शेव मुठीत घट्ट आवळले गेले होते. युवराजांच्या राजदर्शनाने ते दिपून गेले होते. पण कथलेकन्यांसमोर झालेल्या करड्या आज्ञेने ते मनोमन कुठेतरी खोलवर दुखावले गेले होते!

गडावर कोसळणाऱ्या अखंड धारा थांबून थोडासा भांगा मिळताच पाचाडच्या वाड्याच्या सदरेवर घंटा ठणठणून उठत होती. ती ऐकताच असतील तेथून जोड घेऊन राजे आणि संभाजीराजे मावळमाचीवर जात होते. पावसाळी कुंद आकाश, पसरलेले भुरके पाणतुषार यांनी शे-दोनशे हातांपलीकडचे काहीच दिसत नव्हते. गूढ, धुकट दरीतून नुसता 'ठण ठण असा आवाज ऐकू येई. त्याच्या रोखाने मावळमाचीवर राजे-संभाजीराजे यांचे मुजरे होत. दोघेही न बोलता समोरच्या धुकट गडतळाकडे बराच वेळ बघत राहत. पावसाची सर धरू लागली की हुजरे पुढे येत. त्यांच्यावर छत्रे धरीत. आठ-दहा दिवस असे गेले. जिजाऊ दिसत नव्हत्या. हैराण झालेले संभाजीराजे मावळमाचीवर उभे असता राजांना म्हणाले, “आबासाहेब, या घंटेच्या टोलांनी आम्हास राहवत नाही. आम्ही पाचाडात उतरावं म्हणतो."


राजांना मासाहेब आणि संभाजीराजे यांचा काळीजमेळ माहीत होता. समोरच्या धुकटलेल्या गडतळाच्या रोखाने बघत ते म्हणाले, " कधी कधी तुमचा आम्हाला हेवा वाटतो. मनी उठणारे तुम्ही साफ बोलून जाता. आम्हाला ते बोलता येत नाही. जरूर उतरा पाचाडात. चार दिवस वाड्यातच मासाहेबांची सोबत करा. पुन्हा गडावर या. तुम्हाला मोहिमेचे कामकाज समजून घेणे आहे. शिकारखेळ्यांचे कथले निवाडी लावणे सोपे आहे. याहून कठीण बाबी मार्गी लावणे मुष्किल आहे!" पार दूर बघत असल्यासारखे राजे न दिसणाऱ्या पाचाडावर डोळे लावून बोलले.


" आमचं काही चुकलं कथल्याच्या निवाड्यात महाराजसाहेब ?” संभाजीराजांनी नजर टाकली.

" नाही. कथल्यात नाही चुकलं. सदरी रिवाजात मात्र म्हटलं तर गफलत झाली तुमची. कथलेकऱ्यांसमोर आण्णाजींना आज्ञा करायला नको होती तुम्ही!" राजांनी पाचाडच्या रोखाने बोट उठविले आणि ते मनाचा खोल कप्पा त्या बोटावर ठेवून म्हणाले, "त्या सदरेवरचे डोळ्यांना काहीच दिसत नाही तरी तुम्ही जाणता, आम्ही जाणतो तिथे मासाहेब आत्ता उभ्या आहेत. का ? श्रद्धा म्हणून. मासाहेबही सुमार झालेल्या डोळ्यांनीसुद्धा स्पष्ट बघत असतील तुम्हा-आम्हाला तेथून. का ? माया आहे म्हणून. हे ध्यानी ठेवा. माणसं श्रद्धा आणि मायेपोटीच एकमेकांस जान लावून असतात. " प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात.' वे धारेसारखे बोल संभाजीराजे ऐकत राहिले. त्यांना वाटले कोसळत्या आकाशासारखे हे बोल अखंड वर्षतच राहावेत. 'आमचं चुकलं. इथून जाताच आम्ही आण्णाजींची गाठी घेऊ. त्यांची क्षमा मागू.


" संभाजीराजांचे उभारीचे मन राजांच्यासाठी आदराने भरून आले होते.


" नको. ती दुसरी चूक होईल! तुम्ही युवराज आहात. " राजे गडबडीने म्हणाले. "ध्यानी ठेवा. राजांना चूक करता येत नाही! आणि केल्या चुकीला सफाईही देता * येत नाही! चला. पाचाडात उतरण्याच्या तयारीला लागा." राजांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.


जिजाऊंच्या दर्शनासाठी पडत्या पावसातून संभाजीराजे पाचाडात उतरले होते. अंगाबाहेर वाटावा असा शालू नेसलेल्या येसूबाई पुतळाबाईंच्या महालासमोरच्या सफेलीत येऊन उभ्या राहिल्या होत्या. त्यांना समोरच्या चौकातील पाटात फिरविलेले पाणी दिसत होते. पावसाने ते आता गदळ झाले होते.


थोडा वेळ येसूबाई त्या पाटाकडे बघत राहिल्या. सातमहालातील पुतळाबाईंच्या महाली वावरताना घडलेले अनेक प्रसंग त्यांच्या मनात पाटासारखे फिरले. पाचाडात मासाहेबांच्या सोबतीला जाताना मामीसाहेब पुतळाबाई त्यांना दोन-तीन वेळा बजावून गेल्या होत्या- "थोरल्या बाईसाहेबांचे नुसते ऐकत चला. त्यांना जाबसाल करू नका. धाराऊस पाठीशी ठेवूनच त्यांच्या भेटीस जाणे करा. हा महाल आमचा नव्हे. आता तुमचा आहे!"


रायगड चढताना गंगासागर तलाव बघताच येसूबाईंनी मनोमन ठरवून टाकले होते, " या तलावासारखे झाले पाहिजे. कानी पडेल ते ते पोटी ठेवले पाहिजे ! "


त्या विचाराबरोबर येसूबाईंची नजर पाण्याच्या पाटावरून उठली आणि सफेलीच्या दगडी भिंतीला भिडली. तिच्या पायथ्याजवळून चाललेल्या मुंग्यांच्या रांगेतील थरथया देवमुंग्या त्यांच्या पायांवर चढल्या! त्यांनी फरसबंदीवर पाव झटकून त्या हटवल्या. एकमागात अंगापेक्षा मोठे कसलेतरी पांढरे कण घेऊन धावणाऱ्या मुंग्यांच्या रांगेकडे येसूबाई एकरोख बघत राहिल्या. त्यांच्या पायांच्या हालचालीने झालेला थोडासा गैरमेळ मुंग्यांनी पुन्हा जमवून घेतला.


रामराजांशी बोबड्या बोलात बोलून सोयराबाईच्या महालातून बाहेर पडलेले आबासाहेब आपल्या पाठीशी येऊन उभे आहेत याचे येसूबाईंना भान नव्हते ! राजेही त्या कष्टाळू, लहान्या जीवांची धडपड बघत तसेच थांबले होते. " बघितलंत सूनबाई, एवढासा जीव पण वकुबापेक्षाही केवढा भार वाहून नेतो आहे!" राजे शांतपणे बोलले.


त्या आवाजाने येसूबाई मात्र गडबडल्या. झटकन त्या तळहातात पदराचा शेत्र घेऊन नमस्कारासाठी झुकू लागल्या. त्यांना थोपवून वर घेत राजे म्हणाले, "असू दे.' खालमानेने उभ्या असलेल्या येसूबाईंच्या कपाळीच्या मेणमळल्या आडव्या कुंकूबोटात राजांची नजर क्षणभर स्थिरावली. आणि कारण नसता त्या बोटांनी खोलवर रुजलेली सईबाईंची सय उमळून आली.


'यांना बघायला, यांच्या मस्तकी आशीर्वादाचा हात ठेवायला त्या हव्या होत्या." अनेक विचारांची मुंग्यासारखी एक रांग राजांच्या मनी चरत गेली. तिचा माग घेत गंभीर झालेले राजे संथ पावलांनी चालू लागले.


त्यांना तसे चालताना बघून येसूबाईंना आपल्या आबांचा पिलाजींचा आठव झाला. क्षणापूर्वी राजे म्हणाले तेच बोल प्रत्यक्ष आपले आबाच घोगऱ्या आवाजात आपल्या कानांत सांगताहेत असे येसूबाईंना वाटले- "एवढासा जीव पर वकुबापरास केवढा भार वाहून नेतोय ! '

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८८

 जिजाऊ, राजे, संभाजीराजे गंगासागरात पडलेल्या आघाडी मनोऱ्यांचे देखणे प्रतिबिंब बघू लागले. हरवल्या डोळ्यांनी. गंगासागरात केवढ्या थोर गोष्टींचा जमाव झाला होता! द्वादशकोनी उंच मनोरे डोकावलेले भोसलाई त्रिदळ आणि वरचे निळेशार आभाळ ! त्या तिघांपैकी कुणालाच बोलावेसे वाटत नव्हते. एकाएकी ते आपोआप घडलेले देखणे पाणचित्र हिंदोळले आणि विलग झाले !

तलावाच्या काठावर ओळंबलेल्या आंब्याच्या एका फांदीवरून, बराच वेळ मोहरा धरून गोळ्यासारख्या बसलेल्या एका मुठीएवढ्या खंड्या पक्ष्याने उसळी घेत गंगासागरात सूर टाकला!! लाटाच लाटा उठल्या. संभाजीर जे त्या सुराने दचकले. त्यांनी पाण्याबाहेर 'उमाळी घेऊन उठलेल्या त्या लहान वाटणाऱ्या फडफडत्या पक्ष्याच्या चोचीत मासोळी पाहिली! मग हट्टाने त्यांचे डोळे त्या पक्ष्यामागून दौडत गेले.


पुन्हा फांदीवर बसलेल्या खंड्याने मानेला दिलेला झटका संभाजीराजांना दिसला. मासोळीची एक तळपती रुपेरी तार उन्हात फेकलेली त्यांना दिसली न दिसली आणि ती क्षणात खंड्याच्या चोचीआड झाली! मासोळी होत्याची नव्हती झाली !

खंड्याने शीळ भरली संतोषाने! संभाजीराजे ती ऐकून अस्वस्थ झाले. मनोऱ्यांनी सुरूर केलेल्या बालेकिल्ल्याच्या सदरदरवाज्यात स्वाऱ्या आल्या. हिरोजी इंदळकराने पुढे येत राजांच्या हाती एक पायबांधले काळे कोंबडे दिले. राजांनी ते दरवाज्यावरून तीन वेळा उतरून दूर फेकून दिले! असते ! चुन्या दगडांनी घडलेल्या वास्तूलाही एक न दिसणारे 'बाळसे' असते! त्यालाही दृष्ट लागण्याचा संभव असतो! त्यासाठी हा उतारा होता.

राजांनी बालेकिल्ल्याच्या दरवाज्याची पूजा बांधली. त्यावर मोहरा उधळल्या. आणि, पृथ्वीवरल्या कुठल्याही गडाला ज्यांची पायधूळ मस्तकी घेताना धन्य वाटावे अशा जिजाऊंना मध्ये घेऊन राजे-संभाजीराजे यांनी रायगडच्या बालेकिल्ल्याच्या सदरदरवाज्याचा दगडी उंबरठा ओलांडला !!


स्वप्ननगरीचे दालन उलगडावे तसा पालखी दरवाजा पार करताच बालेकिल्ल्याचा ऐन शिलावटी भाग समोर आला.


एकास एक लागून असलेल्या सातमहालांच्या. माळवदे असलेल्या जोड चिरेबंद इमारती समोर होत्या. त्यांतील कुठल्याही महालाच्या मजल्याला लागून पुढे झुकलेल्या माळवदात उभे राहिले तर, आतल्या चौकात दगडी पाटातून फिरविलेल्या पाण्यातील माशांची पाठशिवणीची अविरत खेळी सहज दिसावी अशी चतुर सोय केली होती. त्या सात महालांची जोड इमारत निरखीत संभाजीराजांनी राजांना विचारले, "हे. कसले वाडे ?'


"हा राणीवसा आहे संभाजीराजे." उत्तर देताना राजांचा आवाज धरल्यासारखा झाला, त्यांना सईबाईंचा आठव आला. महाल सात होते. 'आठवा' म्हणण्यापेक्षा 'पहिला' महाल त्यात असायला पाहिजे होता सईबाईंचा तो नव्हता. असूही शकत नव्हता. तसा तो होताही! कुणाला न दिसेल असा. राजांच्या मनात! सावळ्या स्मृतींच्या रूपात!


जिजाऊ, राजे-संभाजीराजे यांच्यासाठी बांधलेला 'खासेमहाल ऊर्फ राजवाडा' बघून राजे सिंहासनचौकात आले. ही राजदरबारची जागा होती. सिंहासन बैठकीपासून समोरच्या भव्य नगारखान्यापर्यंत पाच हाती पायपट्टा मोकळा सोडला होता. त्यावर जामे अंथरले होते. शानदार सिंहासन बैठक साऱ्यांनी डोळाभर बघितली. समोरच्या पायपट्ट्यावर मध्येच एक तलाव खोदून त्यात उसळत्या कारंज्यांची दिमाखदार योजना केली होती. त्या कारंज्याभोवती सारी राजमंडळी जमा झाली. हिरोजी इंदळकर कारंज्यातून पाणी कसे उसळी घेते याची जाणकारी सांगू लागला. संभाजीराजे एकरोखाने वर फवारणाच्या पाण्याच्या अगणित धारा बघताना हरवून गेले. नगारखान्याची अस्मानात घुसलेली देखणी कारागिरी डोळ्यांखाली टाकीत राजे-संभाजीराजे जिजाऊ दरबारासमोरच्या मोकळ्या पटांगणात आले.


जिजाऊंच्यासाठी पालखी जोडण्यात आली. मोरोपंत, आण्णाजी, बाळाजी, दत्ताजी, प्रतापराव, इंदळकर, आबाजीपंत, मुधोजी सरकवास, चांगोजी काटकर आणि राजे व संभाजीराजे यांनी पालखीभोवती फेर घेतला. सारा राणीवसा, येसूबाई, धाराऊ अशा स्त्रिया पालखीच्या पिछाडीला झाल्या. जिजाऊ दर्शनाला निघाल्या- गडदेवाच्या! श्रीजगदीश्वराच्या!!

होळीचा फेरघेराचा माळ येताच पालखी ठाण झाली. या माळावर होळीसणाचा हुडवा कसा शिलगणार याची माहिती आबाजीपंतांनी साऱ्यांना दिली.


मांड घेतलेल्या घोड्यावरून उभ्या उभ्याच स्वाराला खरेदी करता यावी अशी जोती राखलेली, दुतर्फा एका हारीत दुकाने असलेली व्यापारपेठ आली. अजून ती पेठ क्सती झाली नव्हती. ती वसती करण्याचा मक्ता राजांच्याकडून घ्यावा म्हणून गड चढून आलेला नागाप्पा शेट्टी आपल्या चाकरांसह सामोरा आला. त्याने जिजाऊंच्या पालखीवर सोनमोहरा उधळल्या. त्यांची पायधूळ घेतली.


जगदीश्वराच्या मंदिराचा, उन्हात झळकता सोनकळस दिसू लागला. जिजाऊंची पालखी मंदिरासमोर ठाण झाली.


हातजोड देत राजांनी जिजाऊंना पालखीतून उतरून घेतले. उत्तराभिमुख असलेल्या गाभाऱ्यातील नितळ शिवलिंगासमोर, राजबेलाचे जन्माने वाहिलेले पान असावे तसे मध्ये जिजाऊ आणि दुहाती राजे, संभाजीराजे उभे राहिले.


तिघांनीही वाकून मंदिराच्या दगडी पायरीला हात लावले. आणि मंदिराच्या प्रथम चौकात प्रवेश केला. पाठोपाठ राणीवसा, मंत्रिगण आत आले. गाभाऱ्यातील समयांच्या मंद प्रकाशात, अर्धवट फुलांनी झाकलेले. अभिषेकपात्राखाली जलधारा घेणारे शिवलिंग बघत राजे पुढे झाले.


डोकीवर असलेल्या घंटेचा टोल राजांनी दिला. सारे मंदिर आवार घंटानादाने भरून पावले. पुढे टाकावे म्हणून राजांनी पाऊल उचलले आणि फरसबंदीवर रेखलेल्या दगडी कासवाकडे बघताच ते तसेच मागे घेतले.


“पंत, आम्हा हिंदूच्या मंदिरांत प्रवेशचौकातच या दगडी कासवाची योजना का केलेली असावी ? काही अंदाज ? " पाठीशी असलेल्या मोरोपंतांना राजांनी विचारले. "जी" म्हणत पुढे आलेले मोरोपंत, संभाजीराजे, जिजाऊ सारेच कासवाकडे निरखून खाली बघू लागले. आणि पगडी डोलवीत मोरोपंत म्हणाले, "नाही स्वामी, तसा अंदाज नाही करता येत पण हे पहिल्या कूर्मावताराचं प्रतीक असावं. " आम्हास वेगळंच वाटत पंत. मंदिरी येणाऱ्या हर दर्शनभक्तास, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार या कासवाच्या पायांसारखे मागे सारून मोकळ्या मनाने गाभान्यात या' याची सांग देण्यासाठी ही योजना असावी! पण आम्हा दर्शनभक्तांचे, विसरगतीनं का होईना पाय पडतात ते या कासवाच्या पाठीवर !!" राजे भारल्यासारखे बोलत होते.


कासवाकडे बघताना संभाजीराजांना वाटले- 'एकदा का होईना कासवाचं रूप आमच्या वाट्याला यावं! महाराजसाहेब आणि आऊसाहेब यांचे पाय पडावेत- आमच्या पाठीवर !!

जगदीश्वराचे दर्शन होताच जिजाऊ राणीवशासह बालेकिल्ल्याकडे परतल्या. राजे संभाजीराजांना घेऊन गडाचा फेर टाकण्यासाठी पुढे निघाले.


काळा हौद, भवानी टोक, बारा टाकी, दारू कोठ्या, मंत्र्यांचे वाडे, कुशावर्त तलाव, शिरकाईचे देऊळ अशा लहानथोर साऱ्या जागा बघून राजे-संभाजीराजांच्यासह नगारखान्याच्या पायऱ्या चढून आले. ही रायगडावरची सर्वात उंच जागा ! निशाणचौथऱ्याच्या काठीवर चढलेल्या भगव्या जरीपटक्याची फडफड साऱ्यांना स्पष्ट ऐकू येत होती. "तो तोरणा- उगवतीला तोंड धरून राजांनी संभाजीराजांना बोटाने मार्ग दाखविला. " तो तो राजगड ! "


“जी.” संभाजीराजांनी साद भरला. दोघांचेही जरीनामे वाऱ्यावर फरफरू लागले.


जिरेटोपातील लगी हिंदोळू लागल्या. कानांतील सोनचीकडे डुलू लागले. दुसऱ्याच्या शे-दोनशे मेंढीकळपात चुकार होऊ बघणारे आपले मेंढरू जातिवंत धनगर ज्या नजरेने अचूक पारखून काढतो तसे सह्याद्रीच्या काळपट रांगांत मुरू बघणारे "आपले गडकोट राजे तर्जनी फिरवीत संभाजीराजांना अचूक दाखवू लागले. " तो सोनगड, तो चांभारगड, तो घोसाळा, हा लिंगाणा, हा कांगोरा, हा कोकणदिवा, तो तळेगड, शंभूराजे, हा रायगड जगदंबेचा सर्वांत थोर भुत्या आहे! भोवतीच्या या गडांच्या कवड्यांची माळ त्यानं कंठात चढविली आहे! त्या पायथ्याशी फिरलेल्या गांधारी आणि काळ या नद्यांच्या सफेद पाण्यानं त्यानं आईचा 'तांदूळचीक' भरला आहे! याच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे पाट संबळ तुणतुण्याचा ठेका धरून आहेत! जवळ असलेल्या उगवतीच्या सूर्याांचा पोत करून तो हा हाती धरतो ! या जरीपटक्याचा भगवा-भंडारा त्यानं माथी माखून घेतला आहे! असा हा रायगड आहे !" राजांनी हाताची बोटे छातीशी नेत त्या भुत्याला मान दिला. शुभमुहूर्तावर राजांनी जिजाऊंच्या हातांनी जगदीश्वराला अभिषेक करविला.


महिन्याभरातच रायगडाचा दफ्तरी जाबता बसला. गड नांदू लागला. गडावरच्या थंड हवेत जिजाऊंचे दम्याचे दुखणे उचल खाऊ लागले. राजांच्या सल्ल्याने त्या गड उतरून पाचाडच्या वाड्यात राहायला आल्या. त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाईही गड उतरल्या. महाडचे निष्णात वैद्य गंगाधरपंतांनाही सेवेसाठी पाचारण्यात आले.


पाचाडच्या वाड्याच्या कारभाऱ्याला सदरेशी बोलावून राजांनी एक सक्त आज्ञा केली- “एक फेर घेराची घंटा वाड्याच्या सदरी तुळईस बांधणे. त्यावर एक तासवाला नेमून देणे. रोज आऊसाहेबांची स्नानादी आन्हिके आटोपून त्या तुळशीपूजेसाठी सदरी येतील त्या समयास घंटेचे टोल ते एकसुरी देत जाणे! त्या इशारतीने आम्ही युवराज संभाजीराजांच्यासमवेत मावळमाचीवर दाखल होऊ. दुरून का होईना जे घडेल ते आऊसाहेबांचे चरणदर्शन करू. ये काम बिलाकसुरीने हररोज पार पाडीत जाणे! ".

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८७

 माचीच्या निशाणचीथऱ्याजवळ राजे आणि संभाजीराजे आले. माना उठवून त्यांनी जरीपटक्याला नजरा दिल्या. मोतीलगी ओळांबल्या. राजे थोपट्यांना म्हणाले, “सिदोजी, आज आम्ही पालखीतून गड उतरणार नाही ! साऱ्यांच्या पायसोबतीने आम्ही गड उतरू. " जी." सिदोजींनी आज्ञा झेलली.


राजे-संभाजीराजे देवदर्शन करून संजीवनी माची सोडून पाली दरवाज्याची वाट तोडू लागले. देवमाशांच्या अवती-भवतीने, पाठमागाने शेकडो लहाने मासे ओढल्यागत जात असतात तशी गडमाणसे राजांच्याबरोवर चालू लागली.


पाली दरवाजा आला. दरवाज्यावरच्या नगारखान्यात गडउताराची नौबत झडू लागली. दरवाज्यात उभे राहून राजे-संभाजीराजांनी ती ऐकली. चौघड्यावर पडणाऱ्या काठीचा ठेका नेहमीसारखा एकसूर नव्हता! मध्येच कुठेतरी ठेका चुकार होत होता ! राजे दरवाज्यापार होताच नौबतवाल्यांनी हातीच्या टिपऱ्या खाली ठेवल्या आणि तेही पायऱ्या उतरू लागले.


मावळमेळ्यात राजे-संभाजीराजे राजगडाच्या पायथ्याशी आले. राजांनी किल्लेदार सुभानजींच्या हातात श्रीफळ विडा दिला. गडाकडे बघत ते म्हणाले, "किल्लेदार, माळी जैसा बगीचा राखतो तेसी गडाची निगा राखा. येतो आम्ही!" राजांनी गळ्यातील मोतीकंठा उतरून सुभानर्जीच्या हातात ठेवला..


राजांच्या पायांवर पगडीधारी डोके ठेवत लहान पोर पुटपुटावे तसा सुभानजी गद्गद् लागला. त्याला उठवून खांदाभेट देत राजे म्हणाले, "सुभानजी, सावरा, जगी जे जे प्रिय आहे त्याला एक ना एक दिवस पाठ दाखवावीच लागते.' " राजे आणि संभाजीराजे यांनी समोरच्या खड्या कातळदेवाला हात जोडून नमस्कार केले. ते बघताना भोवतीची मावळी काळजे फुटली. राजे सुरतेवर चालून गेले तेव्हा नव्हती, मिर्झा अफजलच्या भेटीसाठी गेले तेव्हा नव्हती, आग्राभेटीसाठी कूच झाले तेव्हा नव्हती पण आज आज माणसं डोळ्यांवाटे - फुटली! दाटीवाटीने पुढे येत धन्यांच्या पायांवर पगड्या ठेवू लागली.


प्रतापरावांनी जीन कसून तयार ठेवलेल्या दोन पांढऱ्याशुभ्र घोड्यांजवळ राजे-संभाजीराजे आले. राजांनी हात देत संभाजीराजांना मांड जमवून दिली. पाठोपाठ राजांनी मांड घेतली. पाठमोऱ्या झालेल्या राजे-संभाजीराजांना कल्पना नव्हती की जबान असती तर उभा राजगडच कमरेत झुकून म्हणाला असता, “धनी, धाकलं धनी, वाईच थांबतिसा! पायधूळ माथ्यावं घ्यावी म्हन्तो म्या !"


आणि आणि उडत्या गरुड पक्ष्याच्या पवित्र्यात असलेला राजगड सुवेळा आणि संजीवनी माचीचे पंख फडफडवून झेपावला असता थेट आकाशात !! - चालला! तो चक्रवर्ती संन्यासी आपल्या कैक स्मृतींचे पायठसे राजगडावर ठेवून चालला! त्याच्या जोडीने बालभुत्या चालला. आठवणींचे कितीतरी पाजळले पौत राजगडी पेटते ठेवून !


रायगड टप्प्यात आला. पायथ्याच्या पाचाड या गावठाणात आबाजीपंतांनी जिजाऊंच्यासाठी खणबंद वाडा उभा केला होता.


रायगडावर सुमूहतनि प्रवेश करण्यापूर्वी सगळ्या राजकुलाचा त्या वाड्यात मुक्काम पडला. पाचाड शिबंदीचे ठाणे होते. मडाला पडेल तो वस्तभाव पुरविण्यासाठी इथे व्यापारपेठ होती.


दुसरा दिवस उजाडला. पाचाडच्या या वाड्याच्या पैस सदरेवरून समोर रायगड दिसत होता. तळ्यातून बाहेर उठलेल्या कृष्णकमळासारखा. त्या पैस सदरेवर उभ्या राहून, मनोमन साद घालणाऱ्या रायगडाकडे जिजाऊ डोळे लहाने करून बघू लागल्या. त्यांच्या नेत्रकडा धरून कानशिलापर्यंत आक्रसलेल्या सुरकुत्या उठल्या. गड बघणाऱ्या खटाटोपात असल्याने त्यांच्या डोईचा पदरकाठ किंचितसा मागे हटला होता. त्यातून डोकावलेली त्यांची पांढरी केसवट राजांच्या नजरेतून सुटली नाही.


"मासाहेब, हा सामने दिसतो तो 'खुबलढा बुरुज !" त्यावर थेट दिसते ती मावळती माची!” राजांनी उजवी तर्जनी उठवून रोख दाखविला. शेजारी उभे असलेले संभाजीराजे तो बुरुज व माची निरखू लागले. "राजे, आमच्यासाठी हो सकता वाडा कशाला उभा केलात ?" जिजाऊ समोर बघत म्हणाल्या.


राजे गंभीर झाले. जिजाऊंच्या उजाड माथ्याकडे बघताना त्यांचा आवाज धरल्यासारखा झाला. “मासाहेब, आम्ही काय करू शकतो आपल्यासाठी ? आमचा तो वकूब नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी आम्ही चढविल्या, तरी ते थिटे आहे. तुम्ही आम्हास कधी बोलला नाहीत; पण तुमच्या महालावरून जाताना आम्ही ऐकली आहे तुमच्या घशात घोटाळणारी दम्याची उसळ ! मासाहेब, तुम्हाला गडावरची गार हवा नाही झेपणार. त्यासाठी हा वाडा आहे." राजे थांबले.

संभाजीराजे राजांच्याकडे बघत राहिले.


"आम्ही समोरचा बुरुज व माची का दाखविली ध्यानी नाही आलं मासाहेब ? " राजांनी पुन्हा समोरच्या बुरुजाकडे बोट रोखत विचारले. L नाही समजलो. काही खास ?' जिजाऊंनी राजांच्या कपाळीचे शिवगंध निरखले.


"मासाहेब, तुम्ही या वाड्यात राहणार. आम्हास गडावरच राहणे भाग आहे. आपले दर्शन घेतल्याशिवाय आमच्या गळ्याखाली पाण्याचा घोटही उतरत नाही. म्हणून. म्हणून या वाड्याची बांधणी आम्ही इंदळकरला तिरकी, कोनी धरण्यास सांगितली. वरच्या त्या खूबलढा बुरुजावरच्या माचीवर आम्ही उभे राहिलो की या सदरजोत्यावर उभ्या असलेल्या आपल्या मूर्तीचे आम्हास दूरवरून का होईना दर्शन घडेल !! जग पूर्वेला


" सूर्योदय पाहते, आम्ही पश्चिमेला पाहू!'


राजे वेड्यासारखे माचीकडे बघत राहिले. डोळे पाण्याने भरून आलेल्या जिजाऊ राजांच्याकडे बघत राहिल्या. संभाजीराजांनी समोरच्या रायगडाचा उंचावा क्षणभर निरखला. पुन्हा राजांच्याकडे बघताना त्यांना वाटले- "रायगड थिटा आहे! महाराजसाहेबांच्या कमरेला बांधलेल्या घोप तेगीएवढा ! "


ठरल्या मुहूर्ताला पालख्या आणि मेणे पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. पहाटेचा गारवा धरून भोई रायगडची चढण चढू लागले.


झाडाझुडपात दडलेली वाटेवरची फुलबाग आली. मेणे- पालख्या ठाण झाल्या. सामोरा आलेल्या माळ्याचा मुजरा आपलासा करीत जिजाऊ, संभाजीराजे, राणीवसा, सर्वांसह राजे बगिच्यात आले. गुलाब, कर्दळ, मोगरा, मावळशेवंती, अबोली, अनंत अशा रंगीबेरंगी फुलांचा जमाव बागेत चारी बाजूला दाटला होता. त्यांचा मेळ पडलेला मजेदार सुगंध सगळीकडे पसरला होता. राजे एका गुलाबाच्या रोपट्याजवळ थांबले.

" हा उत्तरी, मोगलाई वाण मासाहेब." असे म्हणत राजांनी एक फुलू घातलेला गुलाबकळा खुडला आणि जिजाऊंच्या हाती दिला. ते बघताना संभाजीराजांना औरंगाबादेतील शाहजाद्यांचे बोल आठवले, "गुलाब भी खूबसूरत होता है! " रिवाज म्हणून हाती घेतलेला गुलाबकळा जिजाऊंनी निरखला. कुणालाच न कळणारी अशी एक दुखरी भावछटा त्यांच्या सुरकुतल्या मुद्रेवर पसरली. त्यांना राजांना म्हणावेसे वाटले- " फुलाचा हा वाण आम्ही बघितला आहे राजे! खूप जवळून ! काटे असलेला सर्वांत देखणा वाण हाच ! "


जिजाऊंनी आपल्या हातातील गुलाबकळा तसाच संभाजीराजांच्या हातात ठेवला. जणू ते फूल जवळ असणे हा संभाजीराजांचा हक्क होता! वसा होता! हाती फूल "घेतलेल्या संभाजीराजांना बघताना जिजाऊंना मन पलटी खाऊन मागील काळात गेल्याचा भास झाला!" तेच साफ डोळे ! कपाळाची तशीच भरगच्च गादी ! "


बाग नजरेखालून घालून स्वाऱ्या पुढची चढण चढू लागल्या. 'लहान दरवाजा' हा गडाचा पहिला दगडबंद दरवाजा आला. भोई थांबले. राजे-संभाजीराजे पालखीउतार झाले. अदबीने पुढे होत आबाजीपंतांनी राजांच्या हाती श्रीफळ दिले. राजांनी गडाच्या प्रथम दरवाज्याचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी श्रीफळ वाढविले. भकले दुहाती फेकून दिली. हाताला धरून त्यांनी प्रथम जिजाऊंना उंबरठा ओलांडू निला. मग ते आणि संभाजीराजे उंबरठ्यावर गेले. जिजाऊ गडाचा कमानबंद दरवाजा निरखू लागल्या! जोड कमानीचा तो भक्कम दरवाजा बघून त्या सुखदिल झाल्या.

गडचढीचा पहिला टप्पा संपला. दुसरा सुरू झाला. आता भोयांच्या कपाळी घामाची थेंबावळ उठू लागली. मध्येच थांबून ते थोप्यांवर मेणे पालख्या तोलून उभ्या उभ्या आपली भरली छातवाने सुमार करून घेऊ लागले.

अंबाकोठ्या मागे पडल्या. पहिल्या चौकीची दगडी ओवरी मागे पडली. आणि- आणि उभा रायगड हा एक वास्तुपुरुष असून तो आपला जबडा ताणून उभा आहे भास निर्माण व्हावा तो 'महादरवाजा' समोर आला.


राजांनी महादरवाज्याची पूजा बांधली. दोन भक्कम बुरुजांना धरून या दरवाज्याच्या दुहाती उंच नक्षीदार तटबंदी फिरली होती. वर नगारखान्याची व्यवस्था होती. • भोसलेमंडळ दरवाज्यापार होताना रायगडावरची पहिली नौबत झडली! राजे, जिजाऊ, संभाजीराजे यांच्यावर सोनमोहरा उधळण्यात आल्या.


आता गडाची खडी चढण सुरू झाली. राजे-संभाजीराजे पालखीउतार होऊन जिजाऊ बसलेल्या मेण्याच्या दुतर्फा झाले. हत्ती टाके मागे पडले, समोर आभाळात घुसलेले द्वादशकोनी, पाचमजली मनोरे दिसू लागले. जत्ता रायगड आपले मनोऱ्यांचे दोन्ही भक्कम हात उभवून वरच्या आभाळाला मूकपणे साद घालीत होता ! 

गोल घेराचा गंगासागर तलाव आला. जिजाऊंचा मेणा थांबला. एक हात राजांनी धरला आहे, दुसऱ्या हाताचा आधार संभाजीराजांनी घेतला आहे अशा थकल्या जिजाऊ गंगासागराच्या काठाशी आल्या.

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८६

 'राजे बैठकीवरून उठले आणि जमल्या दरबारला आपल्या मनचा हेतू खुला करून सांगू लागले - "मंडळी, जखम दरबार सरला आहे. आम्ही जातीने सांगतो आहोत त्यास प्रयोजन वेगळे." राजे थांबले. त्यांनी संभाजीराजांच्याकडे एकदा बघून घेतले. पुन्हा ते एकसुरी धीमे बोलू लागले. "उत्तरेहून रजपूत मिरजा राजा आला. त्याने वस्त्रे, हत्ती, नजर करून आमच्या फर्जद संभाजीराजांना मनसबीचा मरातब दिला.


" आगरियात भरल्या दरबारी पादशाह औरंगने त्यांना रत्नजडावाची कट्यार बक्ष केली. औरंगाबादेस शहजादा शहाआलमने त्यांना हत्ती नजर करून मानाची वस्त्रे बहाल केली.


'फक्त आम्हास त्यांच्यासाठी काही देणे करणे ते आजपर्यंत म्हटले तरी साधले नाही म्हणोन एक विचार बांधून मासाहेबांच्या आणि आपल्या साक्षीने आम्ही तो बोलणार आहोत.


" आजपासून आम्ही आमचे फर्जद संभाजीराजे यांना सवत्या कारभार कामावर नामजाद करणार आहोत! शिक्के, कट्यार, वस्त्रे बहाल करणार आहोत.” राजांनी थांबून आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यांना मध्येच अर्थपूर्ण नजर दिली. " आजपासून संभाजीराजे दिल्या अधिकारात आपल्या नावे पत्रांवर शिक्के करतील. फर्मान , निवाडे, करार, खलिते यांवर दस्तुर लावतील.'


" आम्ही त्यांच्या दिमतीस वाकनिसीच्या मुतालकीसाठी मशारनिल्हे महादेव यमाजी यांना व चिटणिसी कामासाठी कारकून परशराम यांना जोडून देत आहोत. फडाचे कारभारी धारराव निंबाळकर यांनी हरकामी पडेल ती मदत करणे आहे. आजपासून संभाजीराजे शिक्काधारी, सवते कारभारी जाहले!"


राजांच्यासमोर त्यांच्या खाजगी कारभाऱ्याने शिक्के, कट्यार, वस्त्रे, म्यानबंद तलवार असलेले तबक धरले. तबकातील तलवार उचलीत राजे संभाजीराजांना म्हणाले, "असे दरबारा सामने या.' "


संभाजीराजे उठून अदबीने राजांच्याजवळ आले. चिकाच्या पडद्याआडून येसूबाई बघत राहिल्या. राजे उठून आपल्या हातांनी तलवारीचे भगवे वाद संभाजीराजांच्या कमरेला आवळीत असलेले त्यांना दिसले.


राजांनी मानवस्त्रे संभाजीराजांच्या खांद्यावर झडीने टाकली. तबकातील भंडारा घेऊन त्याची आडवी बोटे 'जगदंब' म्हणत संभाजीराजांच्या कपाळी असलेल्या शिवगंधावर ओढली. संभाजीराजांनी त्यांना आणि जिजाऊंना नमस्काराचा रिवाज दिला.


एका हाती संभाजीराजांचा हात घेऊन दुसऱ्या हाताची जोड जिजाऊंना देऊन राजांनी त्यांना उठते केले. त्या दोघांच्या मधून संभाजीराजे चालू लागले. त्या त्रिदळी भोसलेमंडळाला मुजरा करण्यासाठी मंत्रिगणांसह उभा जखम दरबार कमरेत झुकला !

राणीवशात हरोलीच्या बैठकीवर बसलेल्या सोयराबाई मात्र चटक्याने उठल्या. इतर कुठल्याही बाईसाहेबांकडे न बघता त्या पाठीशी उभ्या असलेल्या चंद्रा दासीला म्हणाल्या, " चंद्रा, चल. आमचे बाळर जे महाली एकलेच आहेत !!". आणि चंद्रा मागून येते आहे की नाही हे न बघताच त्या आपल्या महालाच्या रोखाने तरातरा चालूही लागल्या.


त्यांच्या चालण्याबरोबर फरफटत जाणारा नेसूचा जरीकाठी घोळ बघताना धाराऊंच्या कपाळीचे गोंदणे मात्र कळेल न कळेल असे लकलकले !


इमारत कारखान्याचे प्रमुख आबाजीपंत यांचा किल्ले रायगडहून निरोप आला- " जैसा सरकारस्वारीने मनी योजला तैसा गड घडीव केलाआहे. स्वामींनी पायधूळ झाडून. शिलागारी नजरेखाली घालावी. काही उणे असल्यास करिणा सांगावा. चाकर सेवेत तत्पर असे. "


राजांनी संभाजीराजे आणि निवडक लोक संगती घेऊन रायगडाची वाट धरली. इंद्रपुरीसारखा सजलेला किल्ले रायगड डोळ्यांखाली घातला. जेवढे राजांनी मनी धरले होते त्याहून दशगुणी, रूपवान गड कारागिरांनी सजविला होता. जसे चांदण्यारात्री स्वर्गीचे शिलावट गडमाथ्यावर अल्लाद उतरून घडीव दगडाची नजरखेच रांगोळी रेखून पसार झाले होते!


सजला गड पाहून राजे संतुष्ट होऊन राजगडी परतले. त्यांनी राजज्योतिषी आणि कुलोपाध्याय प्रभाकर भट यांच्या मसलतीने राजगड सोडण्याचा आणि रायगडी प्रवेश करण्याचा मुहूर्त काढला. ही खबर आपगतीने गुंजणमावळभर पसरली. काळीजवेडी कुणबाऊ माणसे तांड्या तांड्यांनी राजगडावर येऊन भोसलेमंडळाचे दर्शन घेऊ लागली. पुढे होऊ घातलेल्या धरणीकंपाची कशी कुणास ठाऊक पण मधमाश्यांना चाहूल लागते. मग कपारीला लटकलेल्या पोळ्यात ते सोडण्यापूर्वी त्यांची विचित्र चाळवाचाळव सुरू होते. तशी गडावरची सारी मने दाटल्या भावनेने भरून येऊ लागली. हत्यारबंद धारकऱ्यांच्या पहान्यात प्रथम जामदारखान्यातील जडजवाहिरांचे मोहोरबंद पेटारे हलले !


संभाजीराजांच्या मनाच्या जामदारखान्याची मोहोर मात्र कुणीतरी आपल्या अज्ञात हातांनी खोलली! आजवर खोलवटात जतून ठेवलेल्या आठवणींचे जडजवाहर बाहेर पडले! कधी पोहण्याच्या टाक्यावर, तर कधी रोवलेल्या मल्लखांबांसमोर, कधी कालेश्वरीच्या मंदिरगाभाऱ्यात, तर कधी होळीचौकात तर कधी संजीवनी व पद्मावती माचीवर ते कुणाला संगती न घेता एकटेच फेर टाकू लागले !


गडाच्या दफ्तरखान्याचे बांधीव गठ्ठे मावळ्यांनी डोकीवर वाहून गडपायथ्याशी नेले ! संभाजीराजांच्या मनाच्या दफ्तरखान्यातील आठवणींचे कितीतरी हस्तलेख गडवाऱ्यावर फरफरू लागले! कधी सदरेच्या हमचौकात, तर कधी संजीवनी माचीवर, बाहेर पडणाऱ्या भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवर, कधी फडफडत्या जरीपटक्याला मिरवणाऱ्या निशाणचौथऱ्याच्या पायाशी, तर कधी दसराचीकाच्या खुल्या पटांगणात असे ते वेड्यासारखे मूक रेंगाळू लागले !.


आसवाबखान्यातील जरीवस्त्रांची गाठोडी गडाच्या कुणबिणींनी आवळली. संभाजीराजांच्या अंतरीच्या आसवाबगारात घटनांची कितीतरी वस्त्रे सळसळून उठली ! कधी थोरल्या मासाहेबांच्या खासेमहालात तर कधी आबासाहेबांच्या बैठकमहालात, कधी अष्टभुजा जगदंबेची मूर्ती उभी असलेल्या देवमहालात, तर कधी रंगीबेरंगी घटनांचे पडदे आडपडदे सळसळताहेत असे वाटणाऱ्या दरुणीमहालात ते एकलेच पायफेर टाकू लागले !


शिलेखान्यातील भाले, तलवारी, कट्यारी, बोथाट्या, ढाला घोड्यांच्या पाठीवर टाकण्यात आल्या. अवजड तोफांची भांडी हत्तीवरून मार्गी लागली. संभाजीराजांच्या मनाच्या शिलेखान्यात विचारांची कितीतरी हत्यारे एकमेकांवर आदळू लागली -


"हा गड सोडणे आहे! जेव्हा मनाचा दाटवा झाला तेव्हा तेव्हा जिथल्या वाऱ्याशी कानगोष्टी केल्या, जिथल्या भिंतीभिंतीवर मासाहेब आणि महाराजसाहेब यांचे श्वास श्वास रुपून बसले आहेत, जिथल्या पाखरांचा झाडांच्या गचपणात उठलेला सांजकालवा मनी शिक्कमोर्तवासारखा ठसून बसला आहे, जेव्हा कोणीच जवळ नव्हते तेव्हा ज्याच्याशी मिटल्या ओठांनी आम्ही उदंड बोललो आहोत तो हा गड सोडणे आहे ! "


प्रस्थानाचा ठरला दिवस कातळकड्याबाहेर उठेला. संभाजीराजांनी नेहमीच्या हमामखान्यात शेवटचे स्नान घेतले. गडवा खाली ठेवताना त्यांना वाटले- 'या वाहत्या पाण्याबरोबरच खूप काही वाहून चालले आहे !'


अंगी राजसाज घेऊन ते जिजाऊंच्या महाली दर्शनासाठी आले.


'त्या महाली मुसमुसणारी धाराऊ जिजाऊंना म्हणत होती" मला जाऊ देवा आता कापूव्हळाला, मासाब. म्या कशाला येऊ संगट. ह्यो ठाव बरा हुता. कदी नडलं पडलं " तर हितनं गावाकडं जाया सुदरत हुतं. त्यो गड कुठल्या पल्ल्यावर हाय कुनाला ठावं!' जिजाऊ धाराऊला सोडायला तयार नव्हत्या. त्या परोपरीने तिची समजूत काढू बघत होत्या. धाराऊ ते ऐकत होती; पण कानाच्या पलीकडे ते तिच्या काळजापर्यंत पोचतच नव्हते. शेवटी संभाजीराजे पुढे झाले. धाराऊला एवढेच म्हणाले, "तुझ्या बरोबर आम्हीही येऊ कापूरहोळास ! "


ते ऐकून मात्र धाराऊ चक्करली. "ल्येकरा, तुज्यामागनं मसणोटीत जाया दिकुल पाय मार्ग हटायचे न्हाईत माजं! लई गुंतवा झालाय रं माज्या वासरा तुज्यात !” म्हणत आखरीला धाराऊ सान्यांबरोबर रायगडी येण्यास राजी झाली. संभाजीराजांना बरोबर घेऊन जिजाऊ सदरी बैठकीजवळ जायला निघाल्या. आपल्या महालातून बाहेर पडलेले राजेही येऊन त्यांना मिळाले.

ते भोसलाई त्रिदळ सदरेवर आले. मुंगी शिरणार नाही असे माणूस समोरच्या चौकात दाटले होते. माणसे होती पण आवाज नव्हता. शांत, सारे कसे शांत होते. राजे, जिजाऊ, संभाजीराजे बैठकीवर बसले. परडी फिरविणारा मानकरी आला. राजांनी भंडाऱ्याची चिमट उचलून उधळली. ती उधळताना अखेरची चिमट आहे." या विचाराने त्यांची बोटे थरथरली. " या सदरेवरची ही पूर्वी रिवाज नव्हता तरीही परडीवाल्याने हातची परडी जिजाऊ आणि संभाजीराजांच्या समोर धरली. त्यांनी चिमटी भरून घेतल्या. आईच्या कृपेची उधळण केली. कण उधळले. मनामनातील दाटल्या भावनांचे. आजवरच्या भल्याबुन्या एकोप्याचे !


गडावरच्या एकजात झाडून साऱ्या असामींच्या हातावर ते तिघेही मोहरा, बस्त्रे, हत्यारे ठेवणार होते! ज्यांनी सेवा केली त्यांचा तो हक्क होता. राजासाठी तो रिवाज होता. मागील माणसास संतोषून जाणे !


सदरबैठकीवरून शेवटचे दान झाले. राणीवशात वर्दी गेली. अंगाभोवती शालनामे पांघरलेला राजांचा राणीवसा दरुणीमहालाबाहेर पडला. सिद्ध ठेवलेल्या मेण्यात खाशा स्वाऱ्या बसल्या. गड-उताराला लागल्या.


सर्वांत शेवटी जिजाऊ मेण्यात बसल्या वळीव पावसाने आभाळ भरून यावे तसे त्यांचे मन भरून आले. बाहेर काहीच नं दाखविता त्या पुटपुटल्या- “जगदंब, जगदंब.” मेणे गड उतरू लागले. जिजाऊंच्या मेण्याबरोबर चालणाऱ्या धाराऊने वाकून चिमटभर माती वर घेतली. आपल्या सुताडी लुगडयाच्या शेवात बांधली..


मंत्रिगण, किल्लेदार सुभानजी, सिलिमकर यांच्या सोबतीत राजे आणि संभाजीराजे संजीवनी माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या रोखाने चालले. दरम्यान गडाची किल्लेदारी सिदोजी थोपट्यांकडून सुभानजी शिळिमकरांकडे आली होती.


समोर दूरवर सुवेळा माचीचे टोक दिसताच राजे थांबले. ते का ते कुणालाच कळले नाही. या - याच माचीवर झिजून शांत झालेल्या सईबाईंची चिता पेटून विझली होती.. त्या आठवणीने राजांच्या नेत्रकडा ओल्या झाल्या, त्यांचा हात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला.


आजवर अनेक वेळा पायांखाली टाकलेला तोच भुयारी मार्ग आला. धोंड हटली. राजे-संभाजीराजे आत उतरले. पायऱ्या मागे पडू लागल्या. काहीतरी योजून चालते राजे थांबले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, "तुम्हास आठवतं, तुम्ही विचारलं होतं एकदा हे भुयार संपणार तरी केव्हा ? '


"जी. आठवतं. तुम्ही आम्हांला सांगून ठेवलं आहे महाराजसाहेब, भुयारं कधीच संपत नसतात. चाल कधी थांबत नसते ! ते पितापुत्र संजीवनी माचीवर आले. उभी माची माणसांनी फुलली होती.. गड-उतारासाठी सिदोजी थोपट्यांनी पालख्या सिद्ध ठेवल्या होत्या.

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८५

 पुरंधरचे फर्मान व ओलीसपण, आम्याची कैद व हुन्नरी सुटका, औरंगाबादेची शहाअलमची भेट, राजे आणि जिजाऊसाहेब यांचा सार्थ प्रेमा या संभाजीराजांच्या हयातीतील घटना प्रत्यक्ष समोर पाहिल्यामुळे मंत्रिगण आणि फडकरी मंडळी मनोमन पुरते जाणून होते की “ उद्याच्या श्रींच्या राज्यात राजांचे पडणारे बिंब आहे ते संभाजीराजे ! - दौलतीच्या वाढत्या बारदान्याचे भोसलाई कर्ते वारस आहेत ते संभाजीराजे !' "


सोयराबाईंच्या महाली संभाजीराजे फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर मांड घेऊन बसले होते. त्यांच्या मांडीवर हात-पाय झाडीत खिळणारे रामराजे होते. भिंतीला धरून चंद्रा दासी उभी होती.


मंचकावर बसलेल्या सोयराबाई रामराजांच्या अंगड्यावर वेलबुट्टीच्या नक्षीचे विणकाम आपल्या खाशा हातांनी भरू लागल्या. टाका-टाका गुंतू लागला.


मध्येच थांबून सोयराबाई हसत संभाजीराजांनी घेतलेल्या बाळांच्याकडे बघत होत्या. "तुम्हाला असे आमच्या सूनबाईंनी बघितले तर ?” हसून सोयराबाईंनी संभाजीराजांना विचारले.


" बघू देत. यांना फक्त त्यांनीच घ्यावं असा काय रिवाज आहे!” संभाजीराजे रामराजांच्या लपलपत्या टाळूवरून हलका तळहात हलकेच फिरवीत म्हणाले. खिदळते. रामराजे एकाएकी थांबले. त्यांनी संभाजीराजांच्या जाम्यावर सरसस्ती धार लावली.


" ही कोण बेअदब ! दादामहाराजांचा पेहराव खराब केलात!” म्हणत सोयराबाई लगबगीने मंचकावरून खाली उतरल्या. चंद्रा चटकन पुढे झाली.


"असू देत ! " म्हणत संभाजीराजांनी दोघींनाही हात उठवता करून थोपविले.


रामराजे पुन्हा खिदळले. चंद्रा मागे हटली. सोयराबाई मंचकावर ठेवलेले अंगडे उचलायला वळल्या. एवढ्यात... एवढ्यात धाराऊ आणि येसूबाई महालात प्रवेशल्या. संभाजीराजांना बघून येसूबाई उंबरठ्यावर अडखळल्या! ते ओळखून सोयराबाई त्यांना धीर देत म्हणाल्या, "या सूनबाई" ते ऐकताना संभाजीराजे गोंधळले ! त्यांनी मागे वळून पाहिले आणि तसे पाहताना भिजला जामा चतुराईने मांडीखाली लपविता सारला! ते बघून सोयराबाई हसल्या. येसूबाईना म्हणाल्या, “बाळराजांना तुम्ही एकल्यानंच घ्यावं असा काही रिवाज नाही. असं तुमची स्वारीच म्हणते !' " " धाराऊऽ!” संभाजीराजांनी बाजी अंगलटलेली बघून धाराऊला हाक घातली.


" आलू." म्हणत धाराऊ चटक्याने पुढे झाली. 'यांना घ्या!" म्हणत संभाजीराजांनी रामराजांना धाराऊच्या हाती दिले. महालाबाहेर पडता पडताच गडबडीने ते सोयराबाईंना कसेतरी म्हणाले- "येतो"आम्ही.'


" या." सोयराबाई समाधानाने जबानभर म्हणाल्या.


येसूबाईंना हाताला धरून आपल्या मंचकाकडे धीरे नेताना सोयराबाई न राहवून म्हणाल्या, “खरंच सूनबाई, तुम्ही भाग्यवान आहात !

रामराजांना मांडीवर डोलवीत असलेली धाराऊ भरल्या कानांनी आणि मनाने ते नुसते ऐकत राहिली !

तोंडावर आलेल्या दिवाळीसणासाठी राणीवशाकडे लागणाऱ्या अलंकारांची यादी बाळाजी आवर्जीनी आपल्या चिटणिसी बैठकीवर बसून तयार केली. जोखमीची असलेली ती यादी मुजुमदार निळोपंतांना स्वतःच्या हातांनी देण्यासाठी ते बैठकीवरून उठले. त्यांनी खांद्यावरचे उपरणे ठाकठीक केले. "मी ही यादी देऊन येतो मुजुमदारांना.. तुम्ही इथंच थांबा कुठे जाऊ नका." बाळाजींनी आपल्याबरोबर फडावर आणलेल्या आपल्या आवजी व खंडोजी या दोन्ही मुलांना ताकीद दिली. पुढच्या मागच्या वयाच्या आवजी- खंडोजींनी माना डोलावल्या.


सदरबैठकीवर कुणीच नव्हते. चौकाच्या दरवाज्यावर दोन धारकरी पहारा देत होते.. फरास, सरपोस घालणारे हुजरे अधूनमधून डोकावत होते. पण त्यापैकी कुणाचेही ध्यान • आवजी व खंडोजी यांच्याकडे जायचे कारण नव्हते.


त्या दोन्ही चिटणीसपुत्रांनी एकमेकांकडे पाहिले. सारी सदर मोकळी होती. भिंतीवरच्या रेखल्या रामायण भारतातील चित्रांकडे ते दोघे बघत राहिले. दोन - चित्रांमधल्या मोकळ्या जागेत ढाल, तलवारी, भाले, तिरकमठे ऐटदार पद्धतीने मांडले होते. थोरल्या आवजींचे लक्ष बाळाजींच्या कलमदानावर गेले. त्याला काय वाटले कुणास ठाऊक, तो आपल्या भावाच्या कानात दबके म्हणाला, "खंडा, मी त्या पिसानं लेख काढून बघतो! तू कुणी आलं तर लक्ष ठेव.'


"हां. जा तू.' " खंडोजीने त्याला दुजोरा जोडला. - आवजी चिटणिसी बैठकीवर चढला. मोठ्या कुतूहलाने त्याने बैठक घेऊन कलमदानांतील शहामृगपीस उचलले. थरथरत्या हाताने ते शाईच्या बुधलीत डुबविले. आवजी थरथरत्या हाताने चौरंगीवरच्या कागदावर लिहू लागला- “ ॐ नमः " शिवाय!" खंडोजीने त्याला दुजोरा जोडला.


अंत:पुराच्या रोखाने आलेले संभाजीराजे सदरजोत्यावरून आपल्याकडे बघताहेत याचे त्या दोघांनाही भान नव्हते! संभाजीराजांच्या पाठीशी उभ्या असलेल्या अंतोजी, रायाजी, जोत्याजी या मंडळींतील मग कुणीतरी दाटून खाकरले.


आवजीने आवाजाच्या रोखाने बघितले मात्र. तो ताडकन् वर उडाला! त्याला मुजरा करायचे सुधारले नाही. हातीचे पीस घरंगळून हेलकावे खात केव्हा पडले हे त्याला कळलेच नाही.


बैठकीवरून खाली ताडकन् उडी मारावी आणि बेलाग दौडत सुटावे असे त्याला वाटले. तरतरीत नाकाचा, तांबूस गोरा, छोटेखानी डाळिंबी पगडी डोक्यावर असलेला खंडोजी मात्र क्षणापूर्वी भिंतीवरची चित्रे ज्या हरवल्या डोळ्यांनी निरखली तसा संभाजीराजांना निरखू लागला.

आपल्या पाठीच्या मंडळींना जागीच थोपवण्याची हातखूण देऊन संभाजीराजे चिटणिसी बैठकीच्या रोखाने शांतपणे चालत आले. बैठकीवरचा आवजी धरथरला. चतुर खंडोजीने मात्र झटकन पुढे होत संभाजीराजांच्या पायांना हात लावला.


संभाजीराजांनी आवजीने लेख रेखलेला कागद हलक्या हाताने उचलला. डोळ्यांखाली घातला. त्यावरची "ॐ नमः शिवाय!" ही आवजीने रिवाज म्हणून काढलेली अक्षरे त्यांना वेगळ्याच अर्थानि जाणवली. त्याची चर्या ते वाचून फुलून उठली.. बैठकीवर पडलेले शहामृगपीस संभाजीराजांनी उचलले. शाईच्या बुधलीत ते डुबविताना त्यांच्या तर्जनीवरचा पुष्कराज खडा झळकून उठला.


संभाजीराजांनी आवजीने रेखलेल्या मजकुराकडे ते रोखून बघू लागले. त्यांना राजांची आठवण झाली. यावेळी राजे सुरतेस मनचाहे धुमाकूळ घालीत होते. त्या मजकुराखाली पुन्हा संभाजीराजांनी शब्द उमटविले - “ तुळजाभवानी प्रसन्न ! "


संभाजीराजांनी हातीचे शहामृगपीस हलकेच कलमदानात ठेवीत आपला व आवजीचा हस्तलेख बारीक निरखला, आणि ते आवजीकडे बघत म्हणाले, "तुमचं हातवळण आमच्याहून गोमटं आहे! कोण तुम्ही ? इथे का ? " आवजीचा जीव भांड्यात पडला, पण त्याला बोलणे साधेना! खंडोजी मात्र घिटाईने


म्हणाला, "आम्ही चिटणिसांचे मूल! हे आवजी, आम्ही खंडोजी ! " बसा. आवजी बैठक घ्या.” संभाजीराजांनी आवजीला चिटणिसी बैठकीवर बसण्याची खूण केली. आवजी आता थिरावला! एवढ्यात बाळाजीच प्रवेशले. आवजीला चिटणिसी बैठकीवर बसलेले बघून त्यांनी गटकन आवंढा गिळला !


तुरुतुरु चालत ते आवजीला कानगोष्ट देण्यासाठी येऊ लागले. त्यांचा मनसुबा हेरून संभाजीराजे त्यांना हसून म्हणाले, “चिटणीसकाका, बघू द्या त्यांना! तुमचा आहे तसाच त्यांचा हात गोमटा आहे. हातीच्या पिसांचा त्यांना सराव द्या.' आणि संभाजीराजे वळते होऊन थेट राजांच्यासारखे झपाझप चालत अंतःपुरात गेले. त्यांच्या पाठीवरच्या जाम्यावरची जरीबतूची गिर्रेबाज कोयरी बघताना खंडोजीचे डोळे दिपले. त्याने कमरेत झुकून पाठमोऱ्या संभाजीराजांना मुजरा रुजू घातला !!


गडाच्या तोफखान्यावर स्वागती तोफा घडघडल्या. नगारे, शहाजणे, शिंगे कल्लोळून उठली. मोगली सुरत पुन्हा एकवार बेसुरत करून, वणी दिंडोरीच्या रानात फौजबंद शाही सदर इखलास व दाऊदखान कुरेशी यांना पुरते खडे चारून, वन्हाडातील 'लाडांचे करंजे' ही संपन्न व्यापारपेठ मावळी लाडाने लुटून, साल्येरीचे खुले जंग फत्ते करून, तिथल्या किल्ल्यावर जरीपटक्याचा भगवा टिळा मढवून, बागलाण, वन्हाड, खानदेश या मोगली मुलखाची मारतोड करून विजयी राजे परतले. जाताना मोकळ्या नेलेल्या किल्तानी बारदानांच्या पडशीसारख्या मोहोरबंद पिशव्या पाठीवर वाहून 'आणलेली घोडी दमछाक झाली होती. पूर्वी झाला त्याहून हा पराक्रम थोरच झाला.

पालखी घेऊन राजगड उतरून आलेले आपले सेवक प्रतापराव सिलींबकर, किल्लेदार सुभानजी बाळाजी, आण्णाजी, निळोपंत व मोहिमेतील रूपाजी, प्रतापराव गुजर, मोरोपंत, येसाजी यांच्या सोबतीत राजे गड चढून आले.


बालेकिल्ल्यांच्या सदरदरवाज्याशी येऊन जिजाऊसाहेब आणि संभाजीराजे यांनी राजांची आगवानी केली. संभाजीराजांना या वेळी राजांच्या मुद्रेवर एक आगळेच तेज आढळले. राजांना राजगडी येऊन पंधरवडा हटला. आणली लूट प्रतवार ठरवून दास्तानी


लावण्यात आली. जाया झालेले स्वार आणि घोडी तबिबांनी आपल्या ताब्यात घेऊन त्यांना दवादारू केली. माघ वद्य एकादशीचा दिवस मावळ चढून आला. राजगडाची कदरेची सदर बसली.


'जखम दरबार' जमा झाला. सदर बैठकीवर राजे, जिजाऊसाहेब, संभाजीराजे यांनी बैठक घेतली होती. भोवतीने मोरोपंत, आण्णाजी, बाळाजी, येसाजी, प्रतापराव, निळोपंत, निराजी रावजी, रघुनाथभट, दत्ताजी त्रिमल अदब धरून उभे राहिले.


चिकाच्या पडद्याआड सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई असा राणीवसा, सखूबाई, अंबाबाई, असा कन्यावसा, येसूबाई, धाराऊ जमा झाल्या होत्या. रिवाजाप्रमाणे समोर आलेल्या भंडाऱ्याची चिमट राजांनी सदरदेवतेवर उधळली. समोर उभ्या असलेल्या जखम दरबारच्या मानकऱ्यांवर एकदा अभिमानाची नजर फिरवली आणि ती नजर तशीच चिटणीस बाळाजी आवजींना दिली.


बाळाजींनी 'जखम दरबारचा' मायना खुला केला -


" मातुःश्री आऊसाहेबांचे कृपाप्रसादे करोन खासा सरकार स्वामींनी मोगलाई, बागलाण, वन्हाड, खानदेश, सुरत ऐशी भरपल्याची मोहिम घातली. शेलका पाऊलोक, घोडाई दिमतीस घेतला, मनी धरला तेव्हढा मनसुबा घडवून आणिला. "ये स्वारीत मर्दानगी केले हातास, जाया झाले असामीस, कामी आले हत्यारगिरांचे वारसास मरातब द्यावा म्हणोन हा 'जखम दरबार' बसता केला असे -

"ये सदरी मरातब म्हणोन मशारन्हिल्ले.


बाळाजी एक एक नाव वाचू लागले. राजे संबंधिताला कडे, मोहरा, तोडे, मानवस्त्रे बहाल करू लागले.


जखम दरबार सरतीला आला. बाळाजी झुकून तसेच पाच कदम मागे हटले. सारा जखम दरबार राजांच्या कदरदानीने भारावून गेला होता. राजांच्या हातून मिळालेल्या वस्तूकडे बघताना अभिमानाने ऊर भरले होते. त्या समाधान अभिमानात काही क्षण गेले.


राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. एक निसटती लकेर जिजाऊंच्या ओठांमागे तरळली. चेहऱ्यावर आता दाटत आलेल्या सुरकुत्यांत ती मिसळून गेली.

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८४

 राजे देवमहाली पूजेला बसले होते. त्यांनी समोरच्या ताम्हनात, हाती घेतलेले आचमनाचे पाणी तसेच सोडले आणि " जगदंब.” म्हणत ते प्रभाकरभट आणि केशव - पंडिताकडे बघत चौरंगीवरून उठले!

हीच वर्दी जोत्याजी केसरकराने जिजाऊंच्या महाली येऊन त्यांच्या पायांवर घातली. जिजाऊ पुण्याहून बलाऊ धाडून आणलेल्या खोंद्याशी, सोयराबाईंच्या 'डोहाळजेवणाच्या वेळी ' लागणाऱ्या फुलांच्या मखराबद्दल बोलत होत्या. वर्दी ऐकताच त्यांनी चालते बोलणे तसेच सोडले आणि त्या उठल्या.


जिजाऊंच्या महाली 'मखराचा साज कंचा' ते ऐकायला आलेली सोयराबाईंची कुणबीण चंद्रा जिजाऊ महालाबाहेर पडेपर्यंत थांबली ! मग ती चटक्या पावलांनी सोयराबाईसाहेबांच्या महाली आली. पण आत धाराऊ आणि संभाजीराजांना बघून ती जागीच घोटाळ्यात पडली.


गर्भारपणाने सतेज दिसणाऱ्या सोयराबाई पलंगावर लेटून होत्या. दूरवर झरोक्यातून दिसणाऱ्या कालेश्वरीच्या मंदिराचा सोनकळस त्यांनी क्षणभर निरखला. त्यांच्या पलंगाच्या काठाळीवर बसलेले संभाजीराजे विचारात गुंतून गेले. बरेच दिवस त्यांना या मासाहेबांच्या चालीबोलीत फेर पडलेला जाणवत होता.


फुलत्या कुशीत सोयराबाई संभाजीराजांशी त्यांनाच न कळणाच्या मायेने वागत होत्या! डोळ्यांआड असणारे राजांचे रूप त्यांना संभाजीराजांच्यात दिसत होते. त्यांचे मन तडफेच्या संभाजीराजांतून काहीतरी उचलू बघत होते ! चंद्राला आत येताना बघून सोयराबाईंनी विचारले, “ये. आज फुटता दिवस धरून कुणासाठी नौबत उठली ?


चंद्रा संभाजीराजांकडे बघत गप्पच राहिली. " बोल. ते आमचेच आहेत!" सोयराबाई हसत म्हणाल्या.


गोंधळलेली चंद्रा बोलून गेली, "सरलस्कर परातलं न्हवं मोगलाईतनं! " चंद्राचे बोल ऐकून संभाजीराजे काठाळीवरून उठले.


"आम्हास आज्ञा द्या मासाहेब. आम्ही येतो. ""या" सोयराबाईंनी पडल्या पडल्या हात उभविला.


धाराऊसह बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना सोयराबाई, ते आड होईपर्यंत निरखीत राहिल्या. मग पुन्हा त्यांनी मंदिराच्या उन्हात तळपत्या सोनकळसाला नजर दिली ! संभाजीराजे सदरेवर आले. राजे आणि जिजाऊंच्या समोर प्रतापरावं व रावजी उभे होते. त्यांनी संभाजीराजांना येते बघून मुजरे दिले. काही क्षण तसेच गेले. मग प्रतापराव राजांना अर्धवट राहिलेला मोगलाईचा करिणा पेश करू लागले.


. एका रातीत सारा तळ आमी उठविला. ह्ये रावजी वन्हाडात हुतं. त्येस्नी ... खबरगीर धाडून आपला मुलूख गाटायची झ्यायली कराय सांगितलं. धनी, बादशानं लई आतल्या गाठीनं डाव टाकला हुता. आमची आन रावजींची उभी फौज दस्त व्हायची हुती ! पर शाजाद्यानं हात दिला! खुद्द त्येनंच आपला वजीर धाडून आम्हाला कानगोष्टी केली- 'रातीत तळ सोडायची!' न्हाईतर..." प्रतापराव थांबले.

औरंगजेबाने मराठी फौजा कैद करण्याचा शहाआलमला औरंगाबादेला हुक्म सोडला होता. त्यांची आगाऊ कुणकूण लागलेल्या शहजाद्यानेच प्रतापरावांना हुक्म हातात पडण्यापूर्वीच इशारत भरली होती !


'प्रतापरावांचा वृत्तांत ऐकून राजे शेजारी बसलेल्या संभाजीराजांकडे बघत राहिले. एक दीर्घ हुस्कार त्यांच्या नाकपाळीतून सुटला. तो एकाच विचाराने" आता फर्मान असो, भेट असो, जहागिरीची वस्त्रे असोत, मोगलांच्या छावणीत आमचे संभाजीराजे कधी-कधीच जाणार नाहीत! आम्ही त्यांना पाठवणार नाही!" " राजश्रियाविराजित, अखंड सौभाग्य अलंकृत, वज्रचुडामंडित थोरल्या राणीसरकार सोयराबाईसाहेब प्रसूत जाहल्या. पुत्ररत्न प्राप्त जाहले. '


चौवाटा पुत्रजन्माची वार्ता घेऊन थैलीस्वार सुटले. गडागडांवर साखरमुठी वाटण्यात आल्या. चौघडे, नगारे दुडवुडले. तोफांची भांडी फुटली. राजाच्या 'थोर' संसारातील नातेबंधाची मंडळी राजगड जवळ करू लागली. पाचवी झाली. सटवी येऊन जन्मल्या बाळाच्या भाळी आपल्या अज्ञात हातांनी 'भाकितलेख 'रेखून गेली.


राजांचा सारा गोतावळा दरुणीमहालातील सोयराबाईंच्या दालनासमोर एकवटला. बाळराजाचे दर्शन घ्यायला. त्यात संभाजीराजे होते. येसूबाई पण धाराऊच्या सोबतीने होत्या. उपाध्यायांनी दिलेल्या शुभमुहूर्तावर 'दर्शन' घ्यायचे होते.


जमल्या गोतावळ्यात राजे येऊन दाखल झाले. सर्वांची उत्कंठा शिगेला पोचली. घंगाळातील मुहूर्ताचे पात्र डुबले. दालनाचा दरवाजा कुरकुरला. जिजाऊंच्या पाठीशी होत सारे भोसलेमंडळ दालनात प्रवेशले.


सुईणीने दुपट्यात लपेटलेले बाळ सोयराबाईंच्या कुशीतून उचलले. हलक्या हातांनी हसत जिजाऊंच्या समोर धरले. जिजाऊंनी मोहरांचा सतका बाळाच्यावरून उतरला आणि आईचा भंडारा ओंजळीत घ्यावा तसे बाळराजे हळुवार आपल्या हाती घेतले! डोळाभर त्यांना पाहून भरल्या समाधानी मनाने जिजाऊंनी बाळ राजांच्या हाती दिले. ते देताना जिजाऊ म्हणाल्या, "मातृमुखी आहेत. पण पण आम्ही ऐकून आहोत हे पालथे उपजले -!” जिजाऊंचा आवाज कातरा झाला होता.


भुवया चढत्या ठेवून, हातीच्या आपल्या देखण्या सोनरूपाकडे बघत राजे म्हणाले, मासाहेब, चिंता करू नका. हे पालथे उपजले म्हणूनच उभी पादशाही हे पालथी घालतील!” राजांचे मर्मबोल संभाजीराजांना फार आवडले. * घ्या.' राजांनी बाळांना संभाजीराजांच्या समोर धरले. संभाजीराजांनी बाळराजांच्यावरून मोहरथैलीचा सतका आपल्या हातांनी उतरता केला.


हळुवार हातांनी संभाजीराजांनी बाळराजे आपल्या हाती घेतले. वेरूळच्या पहाड़ी लेण्यांकडे बघावे तसे ते हातीच्या बाळलेण्याकडे बघत राहिले. सोयराबाईंनी आकाशीचा चंद्र जसा खुडून आणून साऱ्यांच्या हाती दिला होता !

बाळराजांच्याकडे बघताना संभाजीराजांना वाटले, “नक्की. " पादशाही पालथी घालतील.' नक्कीच हे उभी काही तरी मनी धरून राजे आता संभाजीराजांना अष्टौप्रहर स्वतः संगती घेऊ लागले. - फडावरची कलमदानाची कामे कशी चालतात, पत्रावर दस्तुर कसा लावतात, शिक्कामोर्तब कसा करतात, कथला कोण पद्धतीने ऐकून घ्यावा, निवाडा मंत्रिगणांच्या मसलतीने सावचित्ताने कसा द्यावा, मर्दानगी करणाऱ्या हत्यार, कडे बसून त्याचा म कैसा करावा, कुणबियास राजेपणाचा धीर दिलासा देऊन त्याला तवानगी येईल तसे असे बागवावे, परदरबारचा हेजिब आल्यास त्याकडून मनाचा मतलब अल्लाद घ्यावा, 'डावे जाणा-यास' सलगी देऊन त्यास थोरपण कैसे बहाल करावे, हा सार राज्यकारभारी कुलकरिणा स्वतः राजे संभाजीराजांच्या कानी घालू लागले.


आता फडावरच्या मंडळींशी संभाजीराजांचा निकटीचा संबंध येऊ लागला. त्यातील कारकुनी पद्धतीची मोड बैठक घेणारे, हातीचे शहामृग पीस कुरुकुरु चालविताना हस्तलेख वळणदार यावा म्हणून मान तिरकी करणारे, काही खा मतलबाचे लिहिण्यापूर्वी मध्येच थांबून वरच्या छतास डोळे देणारे चिटणीस बाळाजी आवजी.


आबासाहेबांनी ‘पंत ऽ' अशी हलकीच साद घालताच " जी स्वामी 5 लपकन कमरेत झुकणारे, केळीच्या मोन्यासारखे सतेज दिसणारे, कपाळीचा घ म्हणत हमेश एक आकारात ठेवणारे, कमरेच्या हत्यारावर हाताची बोटे चाळवीत असताना कुणीही “ पंत ऽ ' असे हाकारताच त्या बोटांची मूठ पक्की बसती करणारे, कमी घेरांच्या गोल, डाळिंबी पगडीचे पेशवे मोरोपंत पिंगळे.


काही खाशी मसलत पेश करण्यापूर्वी "आमची पेश अर्जी ऐसी की" असे म्हणत छातीच्या दुबाजूंनी कमरेपर्यंत आलेल्या लालकाठी उपरण्याचे शेव मुठीत घट्ट धरणारे, पेडापेडांच्या गोल घेरबाज पगडीचे, मूळचे लहान डोळे हसताना मुळीच न दिसणारे सुरनीस आण्णाजी दत्तो.


आबासाहेब आता कोणतीही 'वस्त रुजू करायला सांगतील म्हणून काढता पाय तयारीत ठेवणारे, मोहरा, रुपये, डाग, वसूल असे हिशेबी शब्द योजणारे मुजुमदार निळो सोनदेव.


ही सारी मंडळी संभाजीराजांना राजांच्या एवढीच अदब देत होती. संभाजीराजांना त्यांच्याबद्दल, प्रसंगी त्यांची पायधूळ मस्तको घ्यावी असा आदर वाटत होता. ही सर्व माणसे राजांच्या खास विश्वासातील होती. कर्तबगारीने, सचोटीने इमानाने त्यांनी आपापली पदे कमावली होती.

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८३

 आपल्या महाली येताच सोयराबाईंनी येसूबाईंना मंचकावर बैठक घेण्याची इशारत केली आणि आपल्या चंद्रा दासीला खुणावत नजर दिली. चंद्रा आपल्या दालनात गेली आणि एक नक्षीदार लक्कडपेटी घेऊन बाहेर आली. तिने ती पेटी आपल्या बाईसाहेबांच्या हाती दिली.


पेटी घेऊन सोयराबाई येसूबाईच्याजवळ आल्या. त्यांनी पेटीचे झाकण उघडले आणि येसूबाईच्या समोर पेटी धरीत त्या म्हणाल्या, "हे आमचे डाग आहेत तळबिडाहून माहेरकडून आलेले. तुम्हास वाटेल त्यावर हात ठेवा." पेटीत बाजूबंद, मोत्याचे सर पैंजण्या, रजपुती घाटणीच्या बिंद्या, वाक्या, टिका होत्या. सोयराबाईंचे मूळ मोहिते घराणे राजपुतान्यातील. राजपुती रक्ताचे म्हणूनच त्यांचा वर्ण केतकगौर होता. त्यांना दागिन्यांचा चौक होता. पायांवर आळत्याची नक्षी होती.


येसूबाई बावरून त्यांच्याकडे नुसत्या बघत राहिल्या. मग आपसुखच त्यांची नजर धाराऊकडे वळली. 'काय करावे ?' ते विचारण्यासाठी.


सोयराबाईच्या नजरेतून ते सुटले नाही. त्या धाराऊला म्हणाल्या, "धाराबाई, सांगा सूनबाईंना हात ठेवायला. त्या संकोचल्यात.'


" हो त्येच्यावर ठेवा हात सूनबाई. ह्यो आपलाच म्हाल हाय." धाराऊ येसूबाईंना म्हणाली. येसूबाईनी पेटीतील डाग निरखले आणि एका कोयऱ्यांच्या बांधणीच्या टिकेवर हात ठेवला !


ते बघून सोयराबाई हसल्या. त्यात म्हटले तर कौतुकाची आणि शोधले तर कधीही न गवसणारी अशी कसली तरी एक छटा होती.


झटकन ती टिका पेटीतून उचलून सोयराबाईंनी पेटी चंद्राच्या हाती दिली. आणि खुद आपल्या हातांनी ती टिका येसूबाईंच्या गळ्यात घातली. तिची सरकती गुंडी झुकते होत ओढून ती टिका येसूबाईच्या गळ्यात नीट बसती केली. मग सोयराबाई राजांच्याबद्दल, आऊसाहेबांच्याबद्दल, माहेराबद्दल बराच वेळ बोलत राहिल्या. येसूबाई आणि धाराऊ नुसत्या ऐकत राहिल्या. " आम्ही एकट्याच बोलतो आहोत. तुम्ही काहीच बोलत नाही सूनबाई ! ' सोयराबाईंनी मध्येच थांबून घेतल्या विषयाला बगल दिली. येसूबाईंनी मान उठवून • त्यांच्याकडे नुसते पाहिले. पण त्या काहीच बोलल्या नाहीत.


" आम्ही तरी कशा वेड्या ? आमच्या ध्यानीच येत नाही. तुम्ही संकोचता ! तुमची बोली शृंगारपुरी- कोकणी कुणबाऊ! अजून गडाची बोली तुमच्या तोंडी बसली - नाही. म्हणूनच तुम्ही संकोचता !! तसे करू नका, बोलत चला.” जे सांगायचे होते ते सोयराबाईंनी मायफळ गुळात घालून चारावे तसे सांगितले ! 

ते ऐकताना येसूबाईंना स्वतःला कधी जाणवला नव्हता तो दोष जाणवला ! आणि त्यांनी मनोमन क्षणात निर्धारही करून टाकला - "आपणास गडांची फडकरी बोली ध्यान देऊन ऐकली पाहिजे. जिभेवर बसती केली पाहिजे!'


सोयराबाई आता टिकेची गुंडी किती आवळती सरकवतील सांगता यायचे नाही हे हेरलेल्या धाराऊने येसूबाईंचा पालटलेला मुखडाही जाणला. ती म्हणाली, "दोपारचा उपास सोडायचा हाय न्हवं ? निगूया सूनबाई ! "

ते ऐकून येसूबाई उठल्या. “येतो आम्ही.” म्हणत त्यांनी सोयराबाईंना नमस्कार केला. त्यांना पाठमोऱ्या महालाबाहेर पडताना त्यांच्या पाठीवर रुळणाऱ्या टिकेच्या भगव्या गोंड्याकडे बघून सोयराबाई हसल्या. पुन्हा मघासारख्याच ! त्यांना येसूबाईंचे हसू आले. "पेटीत एवढे रजपुती माटाचे मोत्याहिऱ्यांचे डाग असताना सूनबाईंनी हात ठेवला तोही कोकणी टिकेवरच !'

धाराऊला मात्र वाटले की मागे वळून आळत्याच्या नक्षीला सांगावे- “ बोली कंची असती यापरीस मायेचा पीळ कंचा असतो त्येला लई धारण असती रानीसरकार!" पण ती काही बोलली नाही. येसूबाईंच्या पाठीवर रुळणारा गोंडा बघून ती पुटपुटली, " कुंकू-हळद सोडून तरी चढवायचा हुता डाग सूनबाईच्या गळ्यात !!

बालेकिल्ल्याच्या सदरचौकासमोरील पटांगणाच्या रोखाने उठलेले बारांचे एकलग आवाज ऐकून येसूबाई आपल्या महालाच्या खिडकीच्या झरोक्याशी येऊन उभ्या राहिल्या. हलक्या पायांनी धाराऊ त्यांच्या पाठीशी आली. दुपार टळतीला आली होती. दोघींना समोरच्या चौफेरी पटांगणात मधोमध पिंजराने पेंढा भरलेल्या एका रानसावजाची आकृती दिसली. ती लाकडी चौथऱ्यावर खालगर्दनीने धावत्या पवित्र्यात उभी केली होती. सावजाच्या मागच्या खुरांना लांबलचक दौर बांधला होता.


पेंढ्याच्या सावजापासून दूरवर संभाजीराजे दोन्ही पायपंजांवर बैठक घेऊन बसले होते. - त्यांच्या भवत्याने गोमाजीबाबा, जोत्याजी, महमद सैस, अण्णाजी, वाकनीस, दत्ताजी त्रिमल, बाळाजी अशी मंडळी फेर धरून होती.

महमद सैसने बंदुकीच्या दारूची फेकी आणि छरे एका फिरंगी माटाच्या बंदुकीच्या नळीत सोडले. बुरणुसाच्या गोळ्यांचे बोते बोटाने दाबून नळीत खुपसले.


गोमाजींनी पुरुषभर उंचीची ठेचणीची लोखंडी सळी त्या नळीत खुपसून बार ठेचला. बंदुकीच्या लवंगीवर केपाची टाप बसती केली. हत्यार दोन्ही हातांनी तोलबंद करून पाहिले आणि झुकून ते संभाजीराजांच्या हाती दिले..


उजव्या खांद्याला बंदुकीच्या दस्त्याचा बूड बसता ठेवून संभाजीराजांनी दस्त्याला गाल भिडविला. नळीच्या तोंडावर असलेल्या नेमाच्या माशीकडे बघत एक डोळा मिटता करीत बार फेकीचा पवित्रा घेतला. जोत्याजीच्या हातात कमरेचा शेला होता. त्याने सावचित्ताने 'धाकल्या राजांनी ' पवित्रा धरल्याची खातर करून घेतली. हातातील शेला बावट्यासारखा उंच धरून जोत्याजीने तो खाली टाकला.

बावट्याची खूणगत मिळताच पटांगणातील खिदमतगारांनी दोऱ्या धरून चौथरा दौडवायला सुरुवात केली. पेंढा भरलेले सावज दौडू लागले! हातातील बंदुकीची मोहरेबाज नळी सरासर फिरती करीत संभाजीराजांनी बार टाकला. दस्त्याने त्यांचा खांदा झटकला. कानाजवळ धुराची बळी उठली. आणि तिकडे पटांगणात सावजाच्या आरपार शिरलेल्या छऱ्यांबरोबर पिंजराच्या गवतकाड्या उसळल्या. जोत्याजी बावटा टाकू लागला. समोरच्या पटांगणात दौडणाऱ्या पेंढ्याच्या सावजाची चाळण चाळण होऊ लागली. बार टाकून टाकून संभाजीराजांचा खांदा आता ठणकायला लागला. दिवस सांजावत आला होता.

एकसुराने पाली दरवाज्यावर उठलेली नौबत साऱ्यांना ऐकू आली. त्यात शिंगाच्या ललकाऱ्या मिसळल्या होत्या. पवित्रा घेतलेली बैठक मोडून बंदुकीसह संभाजीराजे तसेच वर उठले आणि त्यांनी शेजारच्या बाळाजी चिटणीसांकडे बघितले.


दंडाराजपुरीवर सिद्दी फत्तेखानाच्या जंजिऱ्यावर चालून गेलेले राजे, फौजेसह गड चढत होते. धुळीचे उसळते लोळ मावळत्या लांबट किरणात पसरलेले संभाजीराजांना दिसले. महमद सैसच्या हातात बंदूक देत संभाजीराजे जिजाऊंच्या महालाच्या रोखाने चालले. त्यांना आता सराव पडला होता की गडावर आले की महाराजसाहेब तडक मासाहेबांच्या दर्शनासाठी रुजू होतात.

जिजाऊंच्या महाली संभाजीराजे आणि जिजाऊ राजांची वाट पाहत राहिले. दिवस टळला. गडाचे पलोते, शमादाने पाजळली तरी राजे येत नव्हते! त्यांच्याकडून कसली वर्दीही येत नव्हती. जिजाऊ अस्वस्थ झाल्या. संभाजीराजांना घेऊन त्या राजांच्या महाली आल्या. टोप उतरून ठेवलेले, विखुरल्या केसांचे राजे चिंतागत दिसत होते. त्यांनी जिजाऊंची पायधूळ घेतली. खांद्याला घरीत संभाजीराजांना जवळ घेतले. त्या स्पर्शनि संभाजीराजांचा बार टाकून झटके खाल्लेला खांदा ठणकून उठला. वेदनेची एक सणक खांद्यातून अंगभर सरकली.

" काय झालं राजे? आम्ही तुमची वाट पाहून शेवटी जातीनं आलो.” जिजाऊंनी राजांच्या शिवगंधावर डोळे जोडले.


" हबशावर जंजिऱ्याच्या मोहिमेत शिकस्त घेतली आम्ही. हाती येणारा जंजिरा हुकला. सिद्दी फत्तेखान जलदुर्ग आमच्या हवाली करण्यास राजी झाला होता. पण पण सिद्दी संबूल, कासम आणि खैरतखान या त्याच्या सरदारांनी त्यालाच मुसक्या आवळून आबदारखान्यात टाकला. बनला बेत हुकला." बोलते राजे थांबले.. "मग म्हणून एवढ्यासाठी आमच्या भेटीस येणं टाकलंत ? राजे, हार कुणाला चुकली ? देवादिकांनाही ती चुकली नाही."


चमकून राजांनी मान वर केली. खलिता वाचावा तशी जिजाऊंची नजर वाचली. मासाहेबांच्या कानी आलं तर सारं ? " घोगऱ्या सादात राजे म्हणाले. 'कशाबाबत म्हणता ? " जिजाऊंना राजांची दुखरी झालेली चर्या जाणवली. " देवादिकांच्याबद्दल ? ” राजांचे बोल जडावू लागले. " बोला राजे. काय झाले ?" जिजाऊ संभाजीराजांच्यासह त्यांच्या पाठीशी आल्या.


" आमचे राजेपण व्यर्थ आहे मासाहेब. आपले पुत्र म्हणवून घेण्यास आम्ही शरमिदे आहोत. जंजिऱ्याला घेर टाकून बसलो असता जी खबर ऐकली तिने आमचे सारे स्वप्नच कुठल्यातरी खाऱ्या लाटांच्या समुद्रतळाशी जाणार काय अशी धास्त वाटते आहे. आमची जबान उठत नाही ते सांगावयास.” राजे थांबले. " राजे" जिजाऊंचा हात राजांच्या पाठीवर चढला. त्या नुसत्या स्पशनि राजांना वाटले, तडक वळते व्हावे आणि आपले तोंड मासाहेबांच्या कुशीत ठेवावे. " बोला. काय खबर मिळाली तुम्हास राजपुरीवर ?" जिजाऊ हलक्या शब्दांनी दिंडी उघडून राजांच्या मनाच्या दरवाज्यात घुसल्या.


" मासाहेब 5... मासाहेबऽ उभी उत्तर धूळदोस्त करण्यासाठी औरंगजेबानं हत्यार - उचललं आहे. हिंदूंची पवित्र मंदिरं फोडली जाताहेत. शाही फौजेचा वरवंटा मंदिरांच्या कळसावरून फिरवला जातो आहे. मोगलांनी काशीला विश्वेश्वराचं देऊळ जाया केलं ! त्या जागी मशिदीचे पत्थर उभे केले. देवादिकांना हार येते. पण ती सोसण्यास माणसांना बळ नसते! आम्ही शरमिंदे आहोत आपल्यासमोर उभे राहायला!" राजांचे डोळे भरून आले. जिजाऊंचा हात त्यांच्या पाठीवरून नुसता फिरत राहिला.


जे राजांच्या तोंडून संभाजीराजांनी ऐकले ते ऐकताना त्यांच्या खांद्यातून बारफेकीमुळं उठणारा ठणका बंद झाला! त्याची थोडी जागा सरकली आणि त्यांच्या काळजात ठणका उठला.


आम्याच्या लाल किल्ल्यावरचा तो पैलवानी लाल मातीचा हौदा त्यांना दिसू लागला! कोणीतरी त्यांना विचारीत होतं "हौदा खेलते हो संबूराजे ?'


बाळाजी आवजी चिटणीसांनी जातीने लगबगीने येऊन राजांच्या कानी वर्दी घातली, 'स्वामी, प्रतापराव आणि रावजी आगे खबर नसता मोगलाईतून सेनेसह परतले! गड चढून येताहेत.

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८२

 आपले सबनीस म्हणून रावजी सोमनाथ आणि प्रल्हाद निराजी यांना औरंगाबादेत मागे ठेवून, राजांचे राजकारण मार्गी लावून संभाजीराजे राजगडी परतले,


याच वेळी राजांनी आदिलशाहीशी तह केला. विजापूर दरबाराने राजांना सालिना तीन लाख होनांची खंडणी देण्याचे मान्य केले. स्वराज्याच्या दोन आघाड्या बिनघोर झाल्या मुगलशाही आणि आदिलशाही. -फिरंगाणातील गरीब रयत तर जिवाला कंटाळून गेली होती. तिथे फिरंग्यांनी सक्तीच्या धर्मांतराचा वरवंटा गावागावांवरून फिरवण्याचा सपाटा चालविला होता. विरोध करणाऱ्यांना गावचौकात आणून उभे जाळण्यात येत होते. शेकडो वर्षांचा गावठाव सोडून निराश्रित, त्राता नसलेली रयत कारवार, कोकणपट्टीत उतरत होती. देशमुख आणि फिरंगी लोकांचा माज टापांखाली रगडण्यासाठी खुद्द राजे फौजबंदीने कोकणपट्टीत उतरले!


त्यांना निरोप दिलेले संभाजीराजे आणि जिजाऊ खासेमहालात गिर्दीच्या बैठकीवर बसले होते. समोर एका शिसवी चौरंगावर कपाळी आडवे गंधपट्टे घेतलेले केशव पंडित मांड-बैठक घेऊन बसले होते. त्यांच्यासमोर लाकडी तिकाटण्याच्या भगव्या बिछायतीवर रामायणाच्या स्कंधाची पोथी होती. त्या पोथीतील एक एक पान पंडित उचलीत होते. स्वच्छ उच्चारात, लयीत देववाणीतील श्लोक वाचीत होते. वाचल्या श्लोकांचा प्राकृत अर्थ सांगीत होते.


" रावणाचा अंत केलेले प्रभू रामचंद्र अयोध्येत सिंहासनाभिषिक्त झाले. आपल्या वीरांचा भेटवस्तू देऊन त्यांनी गौरव केला. भक्त हनुमंताला त्यांनी स्वकंठातील मोत्याचा हार प्रदान केला.


“ तो घेऊन हनुमंत अयोध्येच्या नगरवेशीजवळ आला. एका उंच वटवृक्षावर चढून 46 त्याने बैठक घेतली. रामप्रभूंनी दिलेल्या मोत्यांच्या हारातील एक एक मोती तो आपल्या सामर्थ्यवान दाढांखाली फोडू लागला! त्यात प्रभू राम आहेत का हे पाहण्यासाठी ! एकाही मोत्यात त्यास : रामचंद्र' दिसेनात! तो विव्हळ झाला! वृक्षाखाली मोत्यांची " टरफले पसरली. ' ऐकल्या कथाभागाने संभाजीराजांच्या मनाची नौका न कळणाऱ्या प्रकाशपात्रावरून


सरसर धावू लागली -


"हरबाबीत 'राम' शोधला पाहिजे! जसे हनुमंताला आपल्या फोडल्या छातीत रामप्रभूंचे दर्शन झाले तसे आम्हास. आम्हास महाराजसाहेबांचे होईल ?


'कसला विचार करता ?" पाठीवर हात फिरवीत जिजाऊ मायेने म्हणाल्या. उत्तरासाठी म्हणून संभाजीराजांनी त्यांच्या रोखाने मान उठविली. एवढ्यात गोमाजीबाबा महालात आले. झुकता मुजरा रुजू ठेवून म्हणाले, “आऊसाब, कोलापूर तरफेचा पुनाळ गावठाणाचा योक असामी आलाय. केसरकरांच्या बीयाचा. जोत्याजी म्हनत्यात त्याला मानूस कसबाचा हाय. चाकरीसाठनं आऊसाबांच्या पायाची भेंट घ्यायची म्हन्तो. '


"पेश करा त्यास." जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. भरल्या माटाचा आणि मावळी श्राटाचा तरणाबांडा जोत्याजी आत आला. चांदीच्या कड्यांचे मनगट फरसबंदीकडे नेत स्थाने मुजरा घातला. "कोण गाव ? " जिजाऊंनी त्याला निरखीत विचारले.


पुनाळ जी." जोत्याजी अदबीने उत्तरला. कोण कोण हत्यारांची चाल येते ? "


'पट्टा, भाला, बोथाटी, गदका सम्द्यांची सरकार. "

'इमान कोण जातीचं ? "


क्षणभर जोत्याजी घोटाळला. “आऊसाहेबांच्या पायाशी ल्येकराच्या जातीचं !' जोत्याजीच्या जाबाने जिजाऊंचा चेहरा उजळला, आणि संभाजीराजे तर उत्तराने खूषदिल होऊन जोत्याजीच्या छातीवरच्या बाराबंदीच्या गाठी मोजू लागले !

" गोमाजी, यास फडावर नेऊन बाळाजींची भेटी पाडा. रुजू करून घ्या.” जिजाऊ गोमाजींना म्हणाल्या.


गोमाजी, जोत्याजी मुजरे घालून मागे हटू लागले. ते गर्दन वर करून वळणार एवढ्यात जिजाऊ जोत्याजीला थोपवीत पुन्हा म्हणाल्या, "पुनाळकर, मनास किंतू येऊ देऊ नकोस आम्ही इमान विचारलं म्हणून. एक वेळ राज्य मिळणं सोपं जातं पण पण इमानी - चाकर मिळणं ते घडत नाही. रामायण हाच दाखला देते! "


राजांनी मंत्रिगण आणि संभाजीराजे यांच्या साक्षीने सदर बसविली वन्हाड, खानदेशात आपले मुतालिक म्हणून जाणाऱ्या प्रतापराव, निराजी, आनंदराव यांना संभाजीराजांनी वस्त्रे, श्रीफळ, विडा मरातबाने बहाल केला. त्या तिन्ही मावळी हत्यारबाजांनी संभाजीराजे आणि राजांना अदब मुजरे घातले.


प्रतापरावांची मराठी फौज राजगड उतरू लागली. तिच्या कूचासाठी पाली दरवाज्यावरची नौबत घुमू लागली. ती ऐकताना संभाजीराजांना वाटले- "आमची फौज सरलष्करानिशी आमच्या पाठीशी घेऊन दौडीवर जाण्याचा योग आम्हास केव्हा येणार ?


आता राजगडावर राणीवसा, मंत्रिगण, अठरा कारखाने, फड सर्व ठिकाणी संभाजीराजे मानले जात होते. राजांची ' चालती बोलती सावली' म्हणून !


धाराऊचा आणि येसूबाईंचा तर आता गडावर काळीजमेळ जमून गेला. येसूबाई धाराऊला 'मामीसाहेब' म्हणत होत्या आणि मानीत होत्या. धाराऊ त्यांना 'सूनबाई' म्हणत होती आणि 'लेक' म्हणून मानीत होती. दररोज दिवस उगवताना 'सूर्याचा' आणि मावळताना 'दिवट्याचा' नमस्कार जिजाऊंना घालण्यासाठी ती येसूबाईंना खासेमहालात घेऊन येत होती.


सुरुवातीला बावरलेल्या येसूबाई जिजाऊ, धाराऊ, पुतळाबाई, आणि राजे यांच्या धीर देणाऱ्या मायेच्या वागण्याने आता गडाला चांगल्या रुळल्या. फक्त एकाच महाली त्यांची जवान कशी जखडल्यागत होऊन जात होती. सोयराबाईंच्या मासाहेबांचा नाही, आबासाहेबांचा नाही, कधी खुद 'त्या' हिंदोळत्या मोतीलगाच्या 'टोपाचा' नाही पण येसूबाईना सोयराबाईंचा धाक वाटायचा! ह्या 'मामीसाहेब' येसूबाईंना, त्यांच्या झळझळीत गोरेपणामुळे, म्यानखेच करून उन्हात गडाच्या तटबंदीवर तळपत ठेवलेल्या हत्यारासारख्या वाटायच्या!


बोलता बोलता सोयराबाईंच्या शेंडा नकळत लालावून येतो हे येसूबाईंच्या नजरेतून सुटले नव्हते! हातीच्या सुवर्ण-कंकणांचा नाद व्हावा म्हणून सोयराबाई पदर पुन्हा पुन्हा नीट करतात हेही येसूबाईंच्या ध्यानी आले होते. आणि दर्पणात मेणमळल्या कुंकवाची कपाळी आडवी घेतलेली बोटे एकलगीत आलीत का नाहीत हे बघताना तर 'मामीसाहेबांना' कशाचेच भान उरत नाही हेही त्यांच्याच महाली उभे राहून येसूबाईंनी अनेकदा अनुभवले होते!


नेहमीसारखी धाराऊ येसूबाईंना घेऊन दिवटीचा नमस्कार घालण्यासाठी जिजाऊच्या महाली आली. तिथे सगळा गोतावळाच आऊसाहेबांचे पाय शिवण्यासाठी जमला होता.


त्यात संभाजीराजे होते. सारा राणीवसा होता. राजे महाड-रायगडाकडे कूच झाले होते.


रोषणनाईकाने महालीची शमादाने पाजळली. देवमहाली अंबेचे दर्शन घेतलेल्या जिजाऊसाहेब कुणबिणींच्या सोबतीने महालात आल्या. त्यांनी शमादानांना हात जोडले. आता त्यांचे वय झाले होते. डुईभर पदर असल्याने कुणाला सहज दिसत नव्हती पण त्यांच्या केसावर चुनेवाणाची पांढरी शिकल उतरली होती. एक एक करता राणीवशातील बाईसाहेब जिजाऊ सामोरे येत नमस्कार घालू लागल्या. जिजाबाई जबानभर आशीर्वाद देऊ लागल्या.


संभाजीराजे पुढे झाले. त्यांनी जिजाऊंचे पाय शिवले. त्यांच्या पाठीशी रायजी, अंतोजी हे धाराऊचे मुलगे आणि जोत्याजी केसरकर अदबीने उभे होते. "शंभूराजे, तुम्ही आता एकट्यानं नाही करायचा दिवट्यांचा रिवाज ! येसूड, अशा जोडीला या आपल्या स्वारींच्या ! " जिजाऊंनी धाराऊकडे हसत बघत येसूबाईंना साद घातली.


धाराऊच्या सोबतीने येसूबाई पुढे झाल्या. संभाजीराजांच्या डाव्या हाताशी जोड देऊन उभ्या राहिल्या. दोघांनीही वाकून जिजाऊंना दिवळ्यांचा रिवाज दिला. जिजाऊंच्या चर्येवर हास्य तरळले. भरल्या जिभेने त्या म्हणाल्या, "औक्षवान व्हा ! जे करणं भोगणं असेल ते जोड साथीनं भोगा !!


येसूबाईंची हनुवटी तर्जनीने वर घेत जिजाऊंनी त्यांच्याकडे काही न बोलता नुसते. 64 बघितले. आणि त्यांना आज पहिल्याने जाणवले, "नातसूनबाईंचा चेहरा मोहरा त्यांच्या आबा आऊसारखा शिक्यांच्या माटानं आहे, पण पण डोळे आहेत साक्षात - जगदंबेच्या डोळ्यांसारखे! टपोरे दूरचे बघणारे!" -


जिजाऊंनी साऱ्यांना निरोप दिला. एक एक करता राजांच्या गोतावळ्यातील आसामी जिजाऊंच्या महालाबाहेर पडू लागली. कधी नव्हे त्या सोयराबाई आपल्या चंद्रा दासीशी काहीतरी बोलत मागे रेंगाळल्या ! महालाबाहेर पडू बघणाऱ्या येसूबाईंच्या जवळ येत त्यांना त्या हळुवार म्हणाल्या, "येता आमच्या महाली ?"


येसूबाईंनी मान डोलावली होकाराची. आणि त्या अदबीने सोयराबाईंच्या मागून चालल्या. धाराऊने गोंदल्या कपाळावर घड्या घालीत आपल्या 'लेकीची ' पाठ धरली. सोयराबाईंच्या मागून चालणाच्या येसूबाईंना बघून पुतळाबाईंना खिनभर वाटले-" आपण स्वतःच जावं सूनबाईंना सोबत - " 'पण धाराऊला जाताना पाहून त्या बिनघोर झाल्या!

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८१

 राजांच्या सगळ्या अटी मान्य झाल्या. औरंगाबादेहून मुअज्जमचे पत्र आले- " जहागिरीची वस्त्रं आणि फर्मान घेण्यासाठी शंभूराजांना औरंगाबादला पाठवून द्यावे !' " राजांचे बर्हिजी, कर्माजी, विश्वास असे खबरगीर औरंगाबादेच्या रोखाने सुटले. मुअज्जमची माहिती काढायला. हे राजकारण फक्त राजेच खेळू जाणत होते. ते स्वतः असेच चालत आले होते. एक वेढा फोडावा, दुसऱ्यात आपणहून घुसावे! एका गोटातून संभाजीराजांना त्यांनी काढून घेतले होते, दुसऱ्या गोटात ते त्यांना आपणहून पाठवायला तयार झाले होते! या चालीचे यश मुअज्जमचा स्वभाव कसा आहे यावर अवलंबून होते. संभाजीराजांचे धैर्य केवढे आहे यावरही विसंबून होते.


खबरगिरांनी औरंगाबादेहून बातम्यांची कोरीव लेणी जशीच्या तशी उचलून आणली ! " मुअज्जम विलासी आहे. साजशिनगाराची त्यास गोडी आहे. राजांना तो मनोमन 'वचकून आहे. आपल्या बापाशी तो नेक नाही!"


विचार करून राजांनी निर्णय घेतला. संभाजीराजांना औरंगाबादेला धाडण्याचा. त्यांना विश्वास होता शंभूराजे दरबारी रीतीभातीचे सारे ठीक करतील. खुद तेच जाऊन आले की, औरंगजेबाला कायमचा नसला तरी उडता भरोसा येईल ! या खानदेशी राजकारणाचा समय आला ऐन दिवाळीत. राजकारण सणवार, भावभावना काहीच जात नसते, भरत्या थंडीला धरून नरक चतुर्दशीचा दिवस राजगडावर फटफटला.


आज औरंगाबादेच्या रोखाने प्रस्थान ठेवण्याचा मुहूर्त होता. . जिजाऊ, पुतळाबाई, धाराऊ, सोयराबाई सान्या आऊसाहेब यांचा शंभूराजांनी आशीर्वाद घेतला. “येतो आम्ही " म्हणत येसूबाईंचा निरोप घेतला. बालेकिल्ल्याच्या सदरचौकात गडउतारांसाठी प्रतापराव, निराजी रावजी, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, आनंदराव अशी निवडीची मंडळी सिद्ध होती.


जिजाऊ आणि राजे संभाजीराजांसह सदरचौकात आले. शंभूराजांनी जिजाऊंच्या पायांवर कपाळ ठेवले. "औक्षवंत व्हा! कार्य सिद्ध होताच परतीला लागा.' " जिजाऊंनी त्यांना आशीर्वाद दिला.


राजांच्या संगतीत, बरोबर यायच्या मंडळीसह संभाजीराजे चालू लागले. संजीवनी माचीच्या रोखाने. माचीवर गडउताराची पालखी तयार होती.


माचीवर उतरणारे भुयार आले. त्यांच्या तोंडावरची धोंड हटली. राजे व शंभूराजे आत उतरले. मागून प्रतापराव, निराजीपंत, रावजी, आनंदराव, प्रल्हादपंत ही मंडळी उतरली. एकामागून एक पायऱ्या मागे पडू लागल्या. चालता चालता राजे कसल्यातरी विचाराने थांबले.


"तुम्हास आठवते वेरूळच्या कैलासलेण्याची गुंफा ?” राजांनी प्रश्न केला.


" जी." दोन्ही आवाजांचा फेरसाद भुयारात घुमला. काय आवडलं तुम्हास त्या शिलागारीत ?”


" कैलास पर्वताखाली दमगीर झालेला रावण! "


... 'भुवया चढवीत राजांनी संभाजीराजांना आश्चयनि निरखले. " का ?" " शिवाचा कैलास त्यास उचलता आलेला नाही! एवढे बल असून." शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले.


संजीवनी माची आली. संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मोजड्यांवर आपला भंडारामंडित माथा ठेवला, त्यांना उठवून पोटाशी घेत राजे धीट धीमे बोलले- "संभाळून असा. आम्ही नसलो तरी प्रतापराव आहेत. त्यांच्या सल्ल्याने वागा. यशवंत व्हा. आम्ही तुमची वाट बघतो आहोत!'


शंभूराजे सजल्या पालखीत बसले. फुलार राजगोंडा त्यांनी मुठीत पकडला. रणशिंगाच्या कातऱ्या ललकाऱ्या उठल्या. अब्दागिरे, चोपदार, निशाणबारदार चालू लागले. आग्रा झाला आता औरंगाबादेला ! -


मजल दरमजलीने सेनेसह संभाजीराजे औरंगाबादला पोहोचले. शाहजाद्याच्या वतीने दिल्ली दरबारचा मातब्बर सरदार जसवंतसिंग याने सामोरे येत त्यांची आगवानी केली. जसवंतसिंगाच्या साक्षीने संभाजीराजांनी मनसबदारीची वस्त्रे स्वीकारली. त्याला फेरनजराणा बहाल केला.


औरंगाबादेतील शाही महाली प्रतापराव, निराजीपंत, रावजी यांच्या सोबतीत जाऊन संभाजीराजांनी शहजादा शहाआलम याची भेट घेतली. तांबूस, गौरवर्णाचा शहाआलम शंभूराजांना बघून खुषदिल झाला. ओठातल्या ओठांत पुटपुटला - “इन्शाल्लाऽ ! कैसी शेरे सुरत है !” त्याने एक झूलबाज हत्ती आणि रत्नजडावाची तलवार संभाजीराजांना दरबारी इतमामाने नजर केली. संभाजीराजांनी त्याला फेरनजराणे दिले. महालीच्या अलिशान बैठकीवर शहाआलमने संभाजीराजांना आपल्या शेजारी बसवून घेतले. खुद्द जसवंतसिंगाला असा मान कधी मिळाला नव्हता! तो हात बांधून समोर उभा होता.


शहजाद्याने संभाजीराजांच्या प्रवासाची आदराने चौकशी केली. राजांच्या तबियतीची पूछताछ केली. निरोपाची वेळ आली. महालीच्या दरबारी आत्तरियाने पुढे येत अत्तरदाणीतील काबुली अत्तराचे फाये झुकून शहजाद्याच्या आणि संभाजीराजांच्या मनगटावर अदबीने फिरविले. एक खिदमतगार सोनेरी नक्षीदार तबकात टपोऱ्या गुलाबाचे रसरशीत गेंद घेऊन बैठकीसमोर पेश आला.


तबकातील एक फुलता गुलाबगेंद हाती घेऊन शहजाद्याने तो क्षणभर निरखला. संभाजीराजांच्या हातात तो देताना शहजादा शहाआलमच्या तोंडून नकळत लब्ज सुटले- “लीजिए, गुलाब भी खूबसूरत होता है छोटे राजासाब!'


प्रतापराव, प्रल्हाद निराजी रावजी सोमनाथ अशा मंडळींना सोबतीला घेऊन संभाजीराजांनी घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. मनी घर करून बसलेली वेरूळच्या पहाड़ी गुंफांतील कोरीव लेणी नजरेखाली घातली.


औरंगाबादेच्या दक्षिण वेशीला लागून मराठी सेनेचा तळ पडला होता. डेरे, शामियाने उठले होते. रोज संभाजीराजे प्रतापरावांनिशी नगराचा फेरफटका करून येत होते. औरंगाबाद ही मुगलशाही दख्खनेतील राजधानीच. तटबंदीतील शहर देखणे होते. राजांनी निघताना सूचना केली होती- “मिळेल तेवढी नगराची वस्ती डोळ्यांखाली घाला! " शंभूराजे शहराचा फेरफटका करून परतले. प्रतापराव संगती होते.


.. तळावर येताच त्यांना निराजीपंतांनी वर्दी दिली- “शहजादे सरकार स्वारीस याद फर्मावतात. भेटीचे कारण समजू येत नाही."


संभाजीराजांनी ती वर्दी ऐकून प्रतापरावांच्याकडे सल्ल्यासाठी म्हणून पाहिले.. प्रतापरावांच्या कपाळी आठ्या उठल्या. तरीही ते म्हणाले, “पाण्यात माशाचा शब्द झेलाय लागतो. धाकल्या राजांनी भेटीला जाऊन यावं.' संभाजीराजांनी प्रतापराव, निराजीपंत, रावजी सोमनाथ अशी मंडळी संगतीला घेतली आणि ते सरंजामाने शहजाद्याच्या भेटीसाठी शाही महालावर आले.


शहजाद्याच्या वजिराने सामोरे येत संभाजीराजांना आदराने बैठक महालात नेले. " आईये !" म्हणत, दातकळ्या खुलवीत, देखण्या शहाआलमने बैठकीवरून उठून पुढे येत हाताला धरून संभाजीराजांना आपल्या बैठकीवर शेजारी बसवून घेतले. त्याचे खासे सरदार बगलेने अदबीत हात बांधून उभे होते.

संभाजीराजांवर सहज नजर ठेवता येईल असे प्रतापराव आणि त्यांचे मराठी सरदार उभे राहिले. इकडच्या - तिकडच्या गप्पा करून शहजाद्याने आपल्या मूळ हेतूला हा "घातला. " कभी शिकार खेलते हो शंभूराजे ?' " नाही.” शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले.


" ताज्जुब है! राजासाबके फर्जद और शिकार का षौक नहीं! " शहजाद्याने आपल्या रेखीव भुवया वर चढविल्या.


“ आम्ही विचारले तर आमचे महाराजसाहेब शिकारीला ना नाही म्हणणार ' " तो फिर आज हमारे साथ चलिए शिकार खेलने. आज हम रामटेक के बनमें जा रहे हैं निशाना लगाने. '"


"नको. आम्हास येणे होणार नाही.” संभाजीराजे सावध झाले. "क्यों डरते हो हमारे साथ चलने ? - "" शहजाद्याने खोचक सवाल केला. संभाजीराजांनी प्रतापरावांच्याकडे बघितले. असा काही मामला या भेटीत पुढे येई याचा प्रतापरावांना अंदाज नव्हता. त्यांना काय सल्ला खुणवावा कळेना. “डरनेकी कुछ बात नहीं। हम आयेंगे शिकार खेलने ! " मान ताठ ठेवित संभाजीराजांनी शहजादा शहाआलमला क्षणात जाब दिला !! " वाहव्वा ! आफरीन - यही उम्मीद थी आपसे आपके सवारीका सब इंतजाम होगा. आपके नेक लोग साथ लेना.” प्रतापरावांच्या बघत शहजादा म्हणाला. दुपार टळतीला लागल्यावर वेशीबाहेर पडण्याचा बेत ठरला. अत्तर- गुलाब झाले. संभाजीराजांनी शहजाद्याचा निरोप घेतला. ते तळावर आले.


आपल्या माणसांतील कसबी पटेकरी, तिरंदाज, भालाईत, रानात घोडा फेकणारे सराईत घोडाईत संभाजीराजांनी प्रतापरावांच्या मदतीने निवडले. आनंदराव, प्रतापराव, निराजी, रावजी ही हत्यारबाज मंडळी निवडक घोड्यांवर जीन कसून तयार झाली. संभाजीराजांनी अंगाला लागून लोखंडी जाळीदार बख्तर चढविले. टोपाखाली शिरस्त्राण घेतले. सिद्ध होऊन ते दिल्या शब्दाप्रमाणे आपल्या शामियान्यात शहजाद्याची वाट बघत बैठकीवर बसले.


वर्दी आली. संभाजीराजे आपल्या निवडक लोकांनिशी तळाबाहेर पडले. शहजादा एका हत्तीवरच्या बंदिस्त हौद्यात बसला होता. तसलाच एक हत्ती, हौदा चढवून त्याने संभाजीराजांच्यासाठी बरोबर आणला होता.


शहजाद्याने हौद्यातूनच शेजारच्या हत्तीच्या माहुताला इशारत केली. माहुताने मोकळ्या हौद्याचा हत्ती अंकुशमार देऊन वळविला आणि संभाजीराजांच्या समोर आणला. पढाऊ हत्तीने सोंडेचे शिंग उठवून सवारीला देखणी सलामी दिली. झुलत झुलत बैठक घेतली. संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेली मोहरांची थैली खेचून माहुताच्या रोखाने वर फेकली. ती वरच्यावर झेलून माहुताने त्यांना कुर्निस केला. हत्तीला शिडी लावण्यात आली. शस्त्रसज्ज संभाजीराजे शिडी पार करीत हौद्यात चढले. माहुताने हत्ती उठता करून शहजाद्याच्या हत्तीच्या बगलेला जोडून घेतला. प्रतापराव, रावजी, निराजी, आनंदराव आणि निवडलेल्या खेळ्यांनी संभाजीराजांच्या हत्तीला वळे दिले. शहजाद्याने हात उठवून हसत संभाजीराजांना अदब दिली. संभाजीराजांनी हात उठवून हसत त्याला फेर साद दिला.


शहाजणे कल्लोळून उठली. हत्ती, घोडे, निष्णात शिकारी खेळे, हाका घालणारे असा शिकारी तांडा दक्षिणवेशीबाहेर पडला.


रामटेकचे रान येताच हत्ती थांबले. मागचे घोडाईत आणि हाकारे, खेळे पांगले. संभाजीराजांची माणसे त्यांच्या हत्तीला घेरून उभी राहिली.


आज शहजाद्याला 'शाही शिकार' कशी असते ती संभाजीराजांना दाखवायची होती. हाकारे, खेळे पांगलेले बघून शहजाद्याने इशारत केली. माहुतांनी हत्ती रानात घुसविले. प्रतापराव, आनंदराव ही मंडळी हत्तीमागून कदमबाज चालीने निघाली.


एका उंच टेकाडावर येऊन दोन्ही हत्ती थांबले. ही निशाणी मारा करायची मचाणी जागा होती. इथून समोर एक पठार दिसत होते. रानाच्या चारी बाजूंनी आलेल्या पाणंदीच्या वाटा त्या पठाराला येऊन मिळालेल्या होत्या.


शहजाद्याने हौद्यात बसूनच खांद्याचा उंच तिरकमठा हाती घेतला. त्याला बाक देऊन वाद पारखून घेतला. त्याच्या निवडक सरदारांनी कुणी तिरकमठे तर कुणी भाले सरसावले. मराठी भालाईतांनी ते बघून, आपले भाले पेलले. तिरंदाजांनी तिरकमठे सरसे धरले.


रामटेकचे रान चारी बाजूंनी कुदू लागले. कसलेतरी विचित्र आवाज काढून ते उभे रान क्षणात कण्हू लागले. हाकाऱ्यांनी चारी बाजूंनी हाका घातला होता. रणशिंगाची एक कातरी ललकारी त्या सगळ्या कालव्याला कापीत उठली. सावजे मारगिरीच्या टप्प्यात आल्याची ती खूण होती.


नुसता प्रचंड कल्लोळ ऐकू येतो आहे असे काही क्षण गेले आणि पाठोपाठ पठारावर येऊन मिळालेल्या पाणंदीच्या चौबाजूच्या वाटांनी पांढऱ्या, कबऱ्या, बाळ्या अशा प्राणभयाने हंबरडा फोडत चौखूर उड्या टाकणाऱ्या उभक्त्या शेपट्यांच्या वनगाईंचे कळपच्या कळप पठारात उतरले !! वनगाई ! मराठी खेळे ते बघून चरकले. सामने हंबरत आलेल्या, भेदरलेल्या वनगाई गोंधळून एकमेकींना थडकल्या. शिंगांना शिंगे खटखटली. टेकाडावरून सटासट सुटलेल्या भाले, तीरांनी मिळेल तशी वर्मी फेक केल्याने कितीतरी बनगाई ऊर उठवून जीवजाता हंबरडा फोडत क्षणात पठारावर कोसळल्या. बचलेल्या भेदरून पुन्हा पाणंदीत घुसल्या. पडलेल्या जाया गाई आचके देत खूर झाडून शांत झाल्या.


समोर प्राणांतक हंबरडा फोडणाऱ्या वनगाई बघून आपल्या हौद्यात, संभाजीराजे ताडकन वर उठले होते. त्यांच्या हातीचा तिरकमठा गाई बघताच गळून पडला. खूर झाडत पठारावर पडलेल्या वनगाई बघताना त्यांचा अस्वस्थ हात सरसरत कवड्यांच्या माळेवरून नुसता फिरत राहिला. त्यांनी आपले डोळे क्षणभर गच्च मिटून घेतले. कानात गाईचा हंबरडा कसा दाटून बसला.


“सरलष्कर ऽ” ते प्रतापरावांच्या रोखाने केवढ्यातरी मोठ्याने ओरडले. घोडा टाकीत प्रतापराव हत्तीजवळ आले.

"शहजाद्यांना सांगा. आम्हास हा खेळ पसंत नाही. आम्ही निघतो.” आणि त्यांनी


माहुताला आज्ञा केली. "हाथी घुमाव !" माहुताने हत्तीचा मोहरा लगबगीने वळविला. प्रतापरावांनी शहजाद्याला शंभूराजांचा निरोप सांगितला. संभाजीराजांच्या परतलेल्या हत्तीला घेर टाकून मराठी घोडाईत, तिरंदाज, भालाईत चालले. कुणीच काही बोलत नव्हते.


संभाजीराजांनी हौद्यातूनच आपल्या तिरंदाजांनी खांद्याला टांगलेल्या भात्याभात्यांवर नजर टाकली. भरले भाते तसेच होते! समोर वनगाई बघून एकाही मराठी शिकारखेळ्याने हत्यार चालविले नव्हते!


समाधानाने संभाजीराजांचा चेहरा त्या अवस्थेतही उजळून उठला. त्यांनी बगलेने दौडत्या प्रतापरावांना विचारले, "गुजरकाका, शिकार करायचीच झाली तर कसली करावी आम्ही ?


" जी धनी, रावसावजाची! रानडुकराची!" प्रतापराव हौद्याच्या रोखाने मान उठवीत म्हणाले. हत्ती चालविणाऱ्या बिचाऱ्या शाही माहुताला माहीत नव्हते की - " 'आपल्या हत्तीच्या पाठीवर एक मावळी सिंह बसला आहे! तोही आता शिकारच करणार होता - फक्त रानडुक्करांचीच!