*अग्निदिव्य*
*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*
*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔*
*___⚔🚩⚔📜🚩_______*
*हजच्या मार्गाने घियासुद्दीन गेला त्याला बराच काळ उलटून गेला. त्याचे ‘आजारी’ मुरीद आता चांगलेच ‘तंदुरुस्त’ झाले होते. कोणताच उद्योग नसल्याने ते छावणीत उनाडक्या करीत फिरत राहत. अखेर नर्दुल्लाखानाने दटावून त्यांना आळा घातला. छावणीतल्या छावणीत निरोपांची ने-आण करणाऱ्या हरकाऱ्यांच्या कामावर त्यांना नेमले; त्यामुळे छावणीतल्या अंतर्गत बातम्या मिळणे सुलभ झाले.*
* कुलीखानाने संपूर्ण प्रांतात केलेला दौरा चांगलाच लाभदायक ठरला. संपूर्ण अफगाण प्रदेशात त्याचा धाक आणि दबदबा निर्माण झाला. मोगली अधिकाऱ्यांना जसा त्याचा वचक बसला तसेच अफगाण कबिलेवालेसुद्धा वचकून राहू लागले. अर्थातच या वार्ता दिल्लीत पोहोचत होत्याच. तो काबूलला परतला त्यालासुद्धा काही आठवडे लोटले. पण बादशहाकडून ना कुमक आली ना वापसीचे फर्मान. मोगली हिशेबाने आणि अफगाणी प्रदेशाच्या विस्ताराच्या तुलनेत फौज एवढी तोकडी होती की, एकही सेनानी नवे आक्रमण हाती घेण्याची हिंमत करीत नव्हता. आजवर जेवढे मिळविले होते ते राखण्यातच बहुतेक सगळे मनुष्यबळ गुंतून पडले होते. काही ना काही उद्योग काढून कुलीखान फौजेत हालचाल ठेवत असला तरी प्रत्यक्ष लढाईची मोहीम नसल्याने शिपाई कंटाळले होते. लढाईनंतरच्या लूटमारीला मोगली सैनिक चटावला होता. किंबहुना त्याला एक धार्मिक अधिष्ठान असल्याने लूटमार हा त्यांच्या उत्पन्नाचा एक स्रोत होता. तो आटला होता. रयतेला लुबाडण्यावर कुलीखानाने कडक पायबंद घातल्याने त्यांची कुचंबणा होत होती; त्यामुळे फौजेत अस्वस्थता दाटू लागली होती. घरापासून, बायका-मुलांपासून दूर राहावे लागत असल्याने फौज वैतागली होती.*
सरलष्कराच्या दरबारात एके दिवशी कुलीखानाने या विषयाला तोंड फोडले. कुलीखानाने जोशपूर्ण भाषण केले–
ईमानवालो, जनाब महाबतखान सरकारांच्या सोबत मोठी फौज निघून गेली आणि आपण जणू पोरके झालो; त्याला साल उलटून गेले. मध्यंतरी आपण सर्वांनी आम्हाला साथ दिल्यामुळे आपण जे उपाय केले त्यामुळे फौज हालती राहिली. राजधानीतून खजिना कमी आला तरी आपण पैसा उभा केला. फौजेच्या गरजा पुऱ्या केल्या. यामुळे फौज नाराज असली, तरी कुठे बंडाळी झाली नाही. पण मोहीम थंडावल्याने शिपाई जवळपास रिकामाच आहे. रिकामे मन सैतानाचे घर. आलाहजरत आलमपन्हांना आपल्याकडे लक्ष द्यायला फुरसत नाही याचा अर्थ ते दुसऱ्या कोणत्यातरी अतिमहत्त्वाच्या कामात व्यग्र असले पाहिजेत. आपण काहीतरी चमकदार कामगिरी केल्याशिवाय त्यांचे आपल्याकडे लक्ष जाणार नाही. आता असे काहीतरी करून दाखवायचे जे आजपर्यंत सलतनतीत घडले नसेल. आपण अफगाणिस्तानचा बराच मोठा हिस्सा जिंकला हे खरे, पण अजून बरेच जिंकायचे आहे. ते आपण जिंकून घ्यायचे. आता स्वस्थ बसायचे नाही.
एक बुजुर्ग दरबारी मनसबदार कुत्सित स्वरात पण नाटकी विनयाने म्हणाला–
जनाब सरलष्कर म्हणतात ते अगदी बरोबर आहे. काहीतरी केलेच पाहिजे. पण सवाल असा आहे की, कशाच्या भरवशावर? मोहीम करायची तर फौज हवी, तोफा-दारूगोळा हवा, खजिना हवा. मोगली मोहीम म्हणजे काही मरगट्टे चालवतात तशी दरवडेखोरी नव्हे.
अगदी बरोबर. मराठ्यांनी जशा प्रकारे लढाया केल्या आणि प्रदेश मिळवला तसेच लढून आपण प्रदेश मिळवायचा. तशा लढाया कशा लढतात, मी शिकवतो तुम्हाला. त्यासाठी आपल्याकडे असलेली फौज पुरेशी आहे. थोडीबहुत इथल्या पठाणांची भरती करू. मनगटात ताकद आणि हौसला बुलंद असला तर तोफांची आणि बंदुकांची काहीच गरज नसते. रही बात खजाने की। जनानखान्यांचा आणि बाजारबुणग्यांचा छावणीवर पडणारा बोजा दूर झाल्याने आपले खर्च आटोक्यात आले आहेत. शिपायांना तनख्वाह सुरूच आहे. वेगळा तनख्वाह देण्याची गरज नाही; तसेच ते गनीमतमधून कमावतील ते वेगळेच. त्याशिवाय आपण व्यापाऱ्यांकडून भरपूर कमावतो आहोत. त्यातून बरीच शिल्लक जमली आहे. शिवाय इथली रयत आता सलतनतीची रयत आहे. तिच्याकडून थोडा कर आणि सारा वसूल करू. हिंमत, बुद्धी, युक्ती आणि ताकद यांचा आत्मविश्वासाने योग्य उपयोग केला की काहीच अशक्य होत नाही. सुलताने आली मरहूम हजरत बाबर सरजमीन-ए-हिंदमध्ये लाखांची फौज आणि पेटारे भरून सोने घेऊन आले नव्हते.
नवीन तडफदार तरुण सरदारांमध्ये कुलीखानाचे वक्तव्य ऐकून मोठा उत्साह संचारला. एकामागोमाग एक तरुण सरदार तडफदार बोलून सरलष्करांचे म्हणणे उचलून धरू लागला. मात्र चैनबाजीची चटक लागलेले काही खुशालचेंडू बुजुर्ग सरदार कुरकुर करू लागले. त्यांनी अनेक खुसपटे काढली. पण तरुण सरदारांनी त्यांना परस्परच उत्तरे दिली. अखेर कुलीखानाची योजना यशस्वी करून दाखवायची आणि आलाहजरतांना चकित करायचे, असा सर्वांनी उत्साहाने निर्णय घेतला. इतका वेळ शांतपणे उभा राहून सर्व चर्चा ऐकत असलेला गुलाम हैदर गंभीरपणे म्हणाला–
जनाबे आली, जान की अमान पाऊं तो कुछ अर्ज करूं…
अजी आपल्यासारख्या तजुर्बेकार बुजुर्गांच्या मशवऱ्यांची आम्हाला नेहमीच गरज असते. बोला. फक्त एक सूचना की, तरुणांना नाउमेद करू नका.
अजिबात नाही. जनाबे आली जे करू म्हणत आहेत ते सलतनतीच्या भल्याचेच आहे. फौजेच्या कल्याणाचे आहे यात संशय नाही. मात्र माझा इतक्या पिढ्यांचा तजुर्बा सांगतो आहे की, जल्दबाजी नको. दरबारातील काही मोजक्या लोकांचे ऐकून संशयाचे भूत दरबारात थैमान घालताना मी पाहिले आहे. केवळ गैरसमजामुळे वफादारांचे रक्त सांडलेले मी बघितले आहे. अनेक इमानदारांचे संसार बरबाद झाले आहेत. माझी जनाबे आलींना विनंती आहे, त्यांनी या मोहिमेसाठी आलमपन्हांची रजामंदी घ्यावी. अन्यथा जनाबे आलींचे दुश्मन ही बंडखोरी, बगावत आहे म्हणून आलाहजरतांचे कान भरतील आणि अनर्थ ओढवेल. आलाहजरतांनी सख्ख्या भावांची गुस्ताखी बख्शली नाही. आपण तर अखेर गुलाम. बस्स एवढेच. याउपर जनाबे आलींचा हर हुक्म सर आँखोंपर.
तो सबुरीचा सल्ला मात्र सर्वांना पटला. कुलीखानाने पत्र लिहिण्यासाठी आवर्जून गुलाम हैदरची मदत घेतली आणि अत्यंत काळजीपूर्वक, तोलूनमापून शब्द वापरून पत्र तयार केले आणि सरलष्कराच्या सही-शिक्क्याने खुद्द बादशहाच्याच नावे पत्र रवाना झाले. पत्राचे उत्तर येण्यासाठी साडेतीन-चार महिन्यांचा काळ लागणार होता. पण तेवढा वेळ नुसतेच बसून न राहता कुलीखानाने नव्या मोहिमेची जंगी तयारी सुरू केली.
-
-
महाराजांना जाग आली तेव्हा पूर्वा नुकतीच उजळत होती. करदर्शन करून त्यांनी उजळत्या पूर्वेला नमस्कार केला आणि ते पलंगावरून खाली उतरले. त्यांची चाहूल लागून दारावरचा हुजऱ्या लगबगीने आत आला. मुजरा घालून खालमानेने म्हणाला–
रामराम मायबाप. म्हाराज रामपारी तकलीप देतुया मापी असावी. पर भल्या पाटंच सरदरवाजास्नं माणूस आल्ता. कोनी बामन सासवडच्या अंजिराची परडी आत्ताच आपल्या सुपुर्द करायची हाय म्हनून रातभर तटाभाईर ताटकळत बसलाया. लईच जिद करतुया, ऐकना झालाय. त्येचं काय करावं म्हनून हवालदार इचारतुया.
का? थेट आमचा सल्ला का घ्यावा वाटला? किल्लेदाराच्या कानी ही गोष्ट का घातली नाही?
किल्लेदार सरकारास्नी रातीलाच कळवलया पर ते म्हनलं रातच्याला गडाचे दरवाजे आपल्या हुकमाबिगर उगडत न्हाईत. दरवाजावरून राऊत आल्ता तवा मध्यान रात झाल्ती. आपला डोळा लागला व्हता म्हनून नींद खराब क्येली न्हाई.
उत्तम! छान! चांगली अक्कल चालवलीत. आत्ता या क्षणी असेच सुटा आणि किल्लेदार सूर्याजी पिसाळांना हुजूर दाखल होण्यास हुकूम झाला म्हणून सांगावा द्या. म्हणावे, असाल तसे दाखल व्हा. पोशाख करण्यात वेळ दवडू नका. दातवण करीत असाल तर चूळ वाड्यावर येऊन भरा. आमचे दातवणादी विधी आटोपण्याच्या आत किल्लेदार या इथे आमच्या महालात दाखल झाले पाहिजेत. समजले? हवालदारास हुकूम द्या, त्या ब्राह्मणास सन्मानाने पाचाडच्या वाड्यात न्या. त्यांस म्हणावे, आन्हिके उरकून आमच्या खासगीच्या दालनात बसावे. घटकाभरात आम्ही पोहोचतो आहोत. वाड्यावर कारभाऱ्यांस वर्दी द्या; आम्ही स्नान-पूजा तेथेच करू. आता निघा. तोंडाकडे काय पाहत बसलात?
जी, महाराज…
गडबडीने मुजरा घालून हुजऱ्या पळतच बाहेर पडला. महाराजांचे शौच-मुखमार्जन आटोपण्याच्या आत किल्लेदार सूर्याजी पिसाळ हुजूर दाखल झाले. खरोखरच ते फक्त धोतर आणि पैरणीवर होते. महाराजांसमोर बोडक्याने उभे राहणे शक्य नव्हते म्हणून एक पंचा मुंडाशासारखा डोक्याला गुंडाळला होता. अशा प्रकारे बोलावणे म्हणजे कंबख्तीच, हे माहीत असल्याने त्याचे पाय लटपटत होते, मुजरा घालणारे हात थरथरत होते. महाराजांच्या क्रुद्ध चेहऱ्याकडे नजर टाकण्याची हिंमत नव्हती तिथे नजर भिडविणे कुठले जमायला?
या किल्लेदार. खास तख्ताच्या गडाची किल्लेदारी आम्ही तुम्हावर सोपवली ती या विचाराने की, तुम्हापाशी काही विशेष योग्यता आहे. पण तुम्ही तर हुजऱ्यापेक्षा सांगकामे निघालात. तुम्हास खास हिदायत देऊन ठेवलेली आहे की, सासवडचे अंजीर घेऊन येणारास दिवसाच्या कोणत्याही क्षणी, आम्ही जेथे असू तेथे आम्हासमोर दाखल करावे. याचा अर्थ आणि महत्त्व तुमच्यासारख्या विश्वासू म्हणवणाऱ्या अनुभवी मानकऱ्यांस उमगू नये? आश्चर्य!!
क्षमा महाराज. पण काल महाराजांना ज्वर होता असे कळले. म्हणून मध्यान रात्री तकलीफ दिली नाही.
अस्सं? स्वराज्याच्या काजापुढे आमच्या निद्रेची मातब्बरी कधीपासून धरू लागलात?
क्षमा महाराज, पण रात्री-अपरात्री आपणांस त्रास देऊ नये असा महाराणी सरकारांचा हुकूम आहे.
त्यापायी त्या गरीब ब्राह्मणास भरथंडीत रात्रभर तटाबाहेर ताटकळवलेत? त्या ब्राह्मणाने दिलेल्या निरोपाचा मथितार्थ तुम्हाला कळला नाही असे आता वर सांगू नका. मुलाहिजा राखला जाणार नाही. निरोप मिळताच सरदरवाजावर का गेला नाहीत? ठीक आहे, या गफलतीचा फैसला आम्ही सवडीने करू. आत्ता असेच त्या ब्राह्मणास घेऊन पाचाडास जा. हवालदार आमचा हुकूम तुम्हाला कळवेलच. पाचाडास आमची वाट पाहा. अनुमतीशिवाय वाडा सोडू नका. जसे आहात तसेच आत्ता इथूनच निघा. आमची मुलाकात होईल तोपर्यंत तुम्ही चाकर कोणाचे, स्वराज्याचे की महाराणी सरकारांचे हे मनाशी आठवून ठेवा. या.
आज्ञा.
थरथरत्या पावलांनी सूर्याजी महालाबाहेर पडला. महाराजांनी तातडीने आपल्या विश्वासू हुजऱ्यांच्या हस्ते मोरोपंत, अनाजी दत्तो वगैरे कारभारी मंडळींना सकाळच्या दरबारातील कामासंदर्भात सूचना धाडल्या. दुपारचा खाना पाचाडास घेणार असल्याची वर्दी दारुणी महालात रवाना केली. त्यानंतर जुजबी पोशाख करून ते लगबगीने वाड्याबाहेर पडले. पाचाडाच्या वाड्यावर पोहोचताच मुजऱ्यांकडे दुर्लक्ष करीत ते तडक आपल्या दालनाकडे निघाले. देवडीवर तिष्ठत बसलेल्या सूर्याजीकडे त्यांनी फक्त एक कटाक्ष टाकला. दालनात एक शुचिर्भूत ब्राह्मण हातात फळांची करंडी सांभाळीत तोंडाने देवाचे पुटपुटत तिष्ठत होता. महाराजांचे पाऊल दालनात पडताच मुजरा करून तो सस्मित मुद्रेने महाराजांकडे पाहत उभा राहिला. खिडकीतून येणारे कोवळे ऊन त्याच्या चेहऱ्याच्या प्रसन्नतेत अधिकच भर घालत होते. बैठकीवर बसत महाराज म्हणाले–
या मथुरे गुरुजी. बरीच लांबची मजल मारून आलात. आपली प्रसन्न, आनंदी मुद्रा पाहिली आणि आमचा जीव भांड्यात पडला. म्हटले आपण एवढी रात्र करून गडावर आलात, कोणती तातडीची खबर घेऊन आलात न कळे. सांगा, कोणती वार्ता आणलीत?
महाराज, वर्तमान शुभ आहे. हे तर आपण ताडलेच आहे. तितकेच ते तातडीचेसुद्धा आहे. नाईकांनी अगदी बजावून सांगितले आहे की, फळांची करंडी अतिशय मूल्यवान फळांनी भरलेली आहे. कितीही रात्र झाली तरी आपल्या सुपुर्द केल्याशिवाय उसंत घेऊ नये. अंजीर फळ मोठे नाजूक. एकदा पिकले की फार लवकर नासून जाते. म्हणून तातडी करणे निकडीचे होते.
सूचक हसत मथुरे गुरुजींनी परडी महाराजांसमोर तिवईवर ठेवली. परडीत हात घालून पाचोळ्याखाली दडविलेला कागद त्यांनी काढून हातात घेतला! अधीर नजरेने झरझर ते कागद वाचू लागले. त्यांच्या मुखावरची प्रसन्नता क्षणोक्षणी वाढू लागली. मान संतोषाने डोलू लागली. पत्र वाचून संपताच त्यांनी मथुरे गुरुजींकडे प्रसन्न कटाक्ष टाकला. काही क्षण नजर खिडकीबाहेर वळविली. मग पुन्हा एकदा सावकाशपणे सारे पत्र वाचून काढले. मग पत्राचा कागद काळजीपूर्वक उशीखाली ठेवून दिला.
सांगा मथुरे गुरुजी, काय खबर आमच्या नाईकांची?
महाराज, पत्रात सारे सविस्तर लिहिलेले आहेच. इतक्या वर्षांनंतर का होईना नेताजीरावांना संपर्क साधण्याचा मार्ग गवसला. आता नियमितपणे खबरा येण्यास सुरुवात व्हावी अशी आशा ईश्वरकृपेने उत्पन्न झाली आहे. नाईकांनी खास कळवण्यास सांगितले आहे की, आपला नजरबाज आफताबखान यानेच मोठ्या हिकमतीने हा मार्ग शोधून काढला आहे.
अरे व्वा! छान! आणखी काही?
त्यानंतर मथुरे गुरुजींनी नेताजीरावांनी अवलंबिलेले कडक धोरण, पैसा उभा करण्यासाठी योजलेले अनेक मार्ग, ठाण्यांना दिलेल्या भेटी, फौजेत मिळविलेली लोकप्रियता, सर्वसामान्य शिपाई, तरुण सरदार इत्यादींमध्ये मिळविलेले प्रेम, बुजुर्गांमध्ये उत्पन्न केलेला धाक आणि स्थानिक जमीनदार-रयतेत निर्माण केलेला दबदबा या साऱ्यांचे तपशीलवार आणि रसभरित पण वास्तव वर्णन महाराजांना ऐकवले. महाराज अत्यंत समाधान पावले. ऐकत असताना सारा वेळ महाराज डोळे मिटून बसून होते. त्यांनी मध्ये एकही शब्द विचारला नाही. जिरेटोपातील मोत्यांचा घोस मंदपणे डुलत होता.
जगदंब! जगदंब!! गुरुजी भल्या सकाळी आपली भेट झाली, सुवार्ता घेऊन आलात; ही सारी आई जगदंबेची कृपा. तुम्ही आमच्या मनावरचा फार मोठा भार हलका केला आहे. फार लांबची मजल मारून आला आहात. आता चार दिवस विश्राम करा. आम्ही सूर्याजींना सूचना देतो, ते आपली व्यवस्था करतील. आम्ही नाईकांसाठी पत्र तयार करतो, ते घेऊनच गड उतरावा. या आता. रात्रभर आपल्याला थंडीत कुडकुडत ताटकळावे लागले, यासाठी आम्ही दिलगीर आहोत.
स्वामी, त्यासाठी आपण कष्टी होऊ नये. चाकराने असे कष्ट सहन करणे हे त्यांचे कर्तव्यच असते. निष्ठांचे पीळ त्यातूनच घट्ट होतात. कल्याणमस्तु।
तोंडभर आशीर्वाद देऊन मथुरे गुरुजी बाहेर पडले आणि महाराजांनी सूर्याजी पिसाळांना बोलावून घेतले. पारोशा तोंडाने, उघड्याबोडक्याने धावपळ करून आणि बराच वेळ देवडीवर बसून, वाट पाहून सूर्याजी अगदी कानकोंडा होऊन गेला होता. पण महाराजांची प्रसन्न, हसरी मुद्रा पाहून थोडा त्याच्या जिवात जीव आला.
या किल्लेदार. नशीब जोरावर आहे तुमचे, वार्ता शुभंकर - आनंदाची होती म्हणून बचावलात; आता आम्हास आमचे तोंड विटाळायचे नाही. पण ध्यानात ठेवा, थेट आमच्याशी बांधलेले नजरबाज कोणाही कारणाने खोळंबता कामा नयेत. राजकारणाचे अनेक नाजूक गुंते त्यांच्या बातम्यांमध्ये गुंतलेले असतात. थोडा उशीरसुद्धा कोणाच्या प्राणावर बेतू शकतो किंवा स्वराज्याचा घात करू शकतो. नेताजीकाकांना उशीर झाला त्याचे काय परिणाम स्वराज्य भोगतेय ते बघताय ना? या खेपेला आम्ही आनंदात आहोत म्हणून माफी देत आहोत, पण पुन्हा अशी गफलत झाली तर किल्लेदारीचा मुलाहिजा राखला जाणार नाही. असो. मथुरे गुरुजी काही दिवस गडावर मुक्कामास राहतील. त्यांची उत्तम बडदास्त राखली गेली पाहिजे. रोज मिष्टान्न व्यवस्था करा.
आज्ञा.
मुजरा घालीत, पाठ न दाखविता सूर्याजी दारापर्यंत गेला तेवढ्यात महाराजांनी त्याला हाकारून पुन्हा बोलावले.
हं, ऐका. आणखी एक महत्त्वाचे. एक गोष्ट नीट गाठी बांधून ठेवा. दारुणी महालातील असे हुकूम महालाच्या उंबरठ्याच्या आतच ठेवायचे. त्यांची ढवळाढवळ सदरेपर्यंत पोहोचू द्यायची नाही. अशा हुकमांची लुडबुड जर स्वराज्याच्या कारभारात होऊ लागली तर फार मोठी दुरवस्था ओढवेल. सुज्ञ आहात, अधिक उघड करून सांगणे नको. बरे, असेच उघडेबोडके गडावर परतू नका. दिवस वर आला आहे. राबता सुरू झाला असेल. निष्कारण बभ्रा नको. वाड्यावरच स्नान उरका. आमच्या कपडेपटातून पोशाख देण्याची सूचना आम्ही कोठावळ्यांस देतो. तयार होऊन निघा. मथुरे गुरुजी थांबतील थोडा वेळ.
महाराजांचे मनमोकळे मिस्कील बोलणे ऐकून सूर्याजीचा धीर चेपला आणि त्याच्या मुद्रेवर हास्य उमटले. हसत हसत मुजरा करून तो बाहेर पडला.
महाबतखान दिल्लीत परतला आणि मागोमाग तक्रारींच्या पत्रांचा महापूर उसळला. महाबतखानास नर्दुल्लाखानाकडून येणारी ‘अधिकृत’ / ‘गुप्त’ वार्तापत्रे आणि वजीर जाफरखानास सिद्दी फुलादखानामार्फत मिळणारे सिद्दी आफताबखानाचे खलिते यांची भर वेगळीच! एकच बातमी. वेगवेगळ्या मनोवृत्तीतून आणि हितसंबंधांतून वेगवेगळे आकार-विकार घेऊन येत होती. कुलीखानाने छावणीतून जनानखान्याचे केलेले उच्चाटन, त्यांची पेशावरला केलेली रवानगी, जनानखान्याचा खर्च ज्याचा त्याने करण्याची सक्ती, त्यावर पूर्वी सरकारातून झालेल्या खर्चाची सक्तीने केलेली वसुली, फौजेची प्रत्यक्ष शिरगणती, शिपायांना सुविधा पुरवून त्यांचे चालविलेले लाड, सामान्य शिपायांशी त्याचा थेट संपर्क, सैन्यात त्याला मिळणारी लोकप्रियता, सैन्याच्या तुकड्यांच्या सततच्या बदल्या, निर्माण केलेली नवनवी उत्पन्नाची साधने, टपाल व्यवस्थेतल्या सुधारणा अशा एकापेक्षा एक अचंबित करणाऱ्या बातम्या राजधानीत पोहोचत होत्या. अनेक शतकांच्या मुघलशाहीत असे अक्रीतघडलेले ना कोणी पाहिले, ना ऐकले.
उमराव आणि दरबाऱ्यांमध्ये अस्वस्थ चर्चा सुरू झाली होती. महाबतखानाचा जामीन अडकला असल्याने त्याचा जीव टांगणीला लागला. तो आणि जाफरखान त्यांच्या परीने प्रत्येक लहान-मोठी खबर बादशहाच्या कानावर घालीत होते. बादशहा ऐकून घेत होता पण त्याच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया येत नव्हती. दोन्ही खान पुरते परेशान होऊन गेले. हे सारे कमी पडले म्हणून की काय, कुलीखानाने संपूर्ण अफगाणिस्तानात काढलेल्या झंझावाती दौऱ्याच्या, त्याने नैर्ऋत्य सीमेवरच्या अफगाण-इराण सीमाभागातील रानटी लोकांची वस्ती असलेल्या विराण प्रदेशाला दिलेल्या भेटीच्या आणि त्याने स्थानिक जमीनदार आणि कबिल्याच्या सरदारांबरोबर सुरू केलेल्या संवादाच्या बातम्या धडाधड येऊन कोसळल्या. महाबतखानाच्या पायाखालची वाळूच सरकली. तो उठला आणि थेट वजीर जाफरखानाच्या समोर दाखल झाला. त्याच खबरींनी भरलेल्या खलित्यांचा ढीग समोर घेऊन तो सचिंत बसून होता. त्याची तर मतीच गुंग झाली होती. अत्यंत चिंताक्रांत होऊन दोघांनी प्रदीर्घ चर्चा केली. एकच मुद्दा दोघे एकमेकांना वेगवेगळ्या शब्दांत पटवून देत राहिले. दोन-अडीच घटकांचा काथ्याकूट झाल्यानंतर मात्र दोघांचे एकमत झाले. दोघांनाही मनोमन पटले की, ही बाब अत्यंत गंभीर असल्याने बादशहाच्या कानी घातलीच पाहिजे. ताबडतोब आत्ताच्या आत्ता.
दोघेही उठले आणि पालख्यांमध्ये बसून बादशहाकडे निघाले. बादशहा आपल्या जनानखान्याच्या महालात बसला होता. वर्दी पाठवून दोघे सदर महालात बसले. वास्तविक बादशहा जनानखान्याच्या आणि कौटुंबिक बाबींमध्ये फारसा गुंतत नसे. जनानखान्याची पूर्ण अखत्यारी त्याने रोशनआरा बेगमेवर सोपवली होती. मात्र धाकटा शहजादा अकबर, बादशहाच्या चिंतेचा विषय होऊन बसला होता. आईवेगळे पोर म्हणून तो जरा जास्तच लाडावला होता. त्याला वळण लावण्यासाठी म्हणून झेबुन्निसा बेगमेच्या देखरेखीखाली ठेवले होते. त्याच्याच विषयी काही खल चालू होता. आधी तर, बादशहाने वर्दीकडे दुर्लक्ष करून आपले काम तसेच सुरू ठेवले. जसजसा भेटीस उशीर होऊ लागला तसतसे दोन्ही उमराव अस्वस्थ होऊ लागले. अखेर त्यांनी देवडीवरच्या खोजांच्या दरोग्यालाच तातडीची वर्दी देऊन पाठविले. खुद्द दरोगा वर्दी घेऊन आला म्हटल्यावर बादशहाला दखल घेणे भाग पडले. त्यातच महाबतखानासारखा मातब्बर उमराव खुद्द वजीर जाफरखानाला सोबत घेऊन काबूलच्या मसलतीसंबंधाने भेट मागतो म्हणजे निश्चितच काही तातडीची बाब असली पाहिजे हे ओळखून त्याने आपले काम आवरते घेतले आणि बेगमांना निरोप दिला. त्याने दोन्ही उमरावांस जनानखान्यातच भेटीस बोलावले. दोघे आधीच तणावात होते. शाही जनानखान्याच्या अंतर्भागात जायचे म्हणून त्यांना अधिकच दडपण आले. ताणलेल्या चेहऱ्याने कुर्निसात करत महालात शिरणाऱ्या त्या दुकलीवर बादशहाची प्रश्नार्थक गहिरी हिरवी नजर खिळली होती. दरबारी रिवाजाला अनुसरून बोलण्याची सुरुवात अर्थातच जाफरखानाने केली.
आलमपन्हांच्या विश्रांतीमध्ये खलल आणल्याबद्दल गुलाम माफी चाहतो. पण आलमपन्हा, महम्मद कुलीखानाचे कारनामे दिवसेंदिवस नवनवीन काळज्या उत्पन्न करीत आहेत.
जी आलाहजरत, हम भी वजीरेआझम की बातों से इत्तफाक रखते हैं.
प्रश्नार्थक नजर जास्तच गहिरी झाली. आपला खास माणूस नर्दुल्लाखानाच्या खलित्यामधील वेचक भाग महाबतखानाने बादशहास वाचून दाखविला आणि महम्मद कुलीखानासंबंधीचा सारा तपशील अगदी तिखटमीठ लावून सांगितला. मध्ये मध्ये वजीर जाफरखान आपल्या ‘विश्वासू’ सूत्रांचा हवाला देत मसाला पेरत गेला. अत्यंत निर्विकार चेहऱ्याने बादशहा ऐकत होता. दोघांचे बोलणे संपले तरी बादशहाच्या चेहऱ्यावर कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही. तो निर्विकार दगडी चेहरा पाहून दोघेही मुत्सद्दी गांगरून गेले. न राहवून जाफरखान म्हणाला–
आलमपन्हा, कुलीखानाला आळा घालण्याची वेळ आली आहे. गुलामाला असे साफ दिसते आहे की, पाणी डोक्यावरून जाण्याची वेळ येण्याच्या आधीच बांध घालणे जरुरीचे आहे. महम्मद कुलीखानावर जरब बसवू शकेल असा कोणी काबील आणि विश्वासू दरबारी तातडीने अफगाणिस्तानात पाठवला पाहिजे.
वजिराचे शब्द ऐकताच कपाळाला आठ्या घालीत महाबतखानाने चमकून त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले. ही बारीकशी हरकतसुद्धा हिरव्या नजरेने टिपली. दातांच्या फटीतून तीव्र पण थंड शब्द बाहेर आले–
अस्सं? असा कोण आहे तुझ्या नजरेत? तू स्वत:च सिफारिश करून महाबतखानास माघारी बोलावून घेतलेस. त्याने माबदौलतांना जामीनकी लिहून दिली आहे. कुलीखानाची खातरजमा दिली आहे. क्यों महाबतखान?
महाबतखानाच्या पायाखालची जमीनच खचली. आता लोढणे उलट फिरून त्याच्याच गळ्यात येऊन पडू पाहत होते. प्रकरण फार ताणले तर त्याचा जीव आणि दौलत दोन्ही धोक्यात आले असते. लाचार हसत तो गडबडीने म्हणाला–
अलबत. आलमपन्हा, बंद्याचे वचन आलाहजरतांच्या पायाशी गुंतले आहे. मी परत निघालो तेव्हा मला खात्री पटली होती की, त्याच्या मनात बगावत-बंडखोरी करण्याचा वा पळून जाण्याचा विचार उरलेला नाही. आतासुद्धा ज्या खबरी येत आहेत त्या पाहता तो असला काही अविचार करीत असल्याचे दिसत नाही. तख्ताशी बेइमानी करण्याच्या वा पळून जाण्याच्या तो योजना आखत असावा अशी कोणतीही खबर अद्याप नाही. हां तो जरा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने, मोगली रिवाजास नव्या असलेल्या पद्धतीने, जरा स्वतंत्र वृत्तीने वागतो आहे एवढे खरे; त्याला फक्त नकल घालणे जरूर आहे इतकेच.
महाबतखानाने परतवार करीत मारलेली कोलांटी उडी पाहून जाफरखान चाट पडला. डोळे फाडून तो त्याच्याकडे पाहत राहिला. काय बोलावे त्याला सुचेना. त्याच्याऐवजी बादशहाच म्हणाला–
जर एवढेच आहे तर मग एवढा बेताब होऊन का धावत आलास; तेसुद्धा थेट शाही जनानखान्यात?
गुस्ताखी माफ आलमपन्हा, पण गुलामाच्या दिलोदिमागमध्ये दौलतीच्या आणि तख्ताच्या कल्याणाशिवाय कोणताच खयाल नसतो. नोकर त्यातून फौजबंद सिपाहसालार वाजवीपेक्षा जास्त स्वातंत्र्य घेण्याचा प्रयत्न करू लागला, तर त्याला वेळीच अटकाव करवावा यासाठी आम्ही हजरतांच्या कदमांशी आलो आहोत.
मग? माबदौलतांनी काय करावे असा तुमचा मशवरा आहे?
आलमपन्हा कुलमुखत्यार आहेत. सर्वज्ञ आहेत. गुलामाच्या मर्यादित बुद्धीला जे जाणवते ते पायाशी रुजू आहे. गुलामाला असे प्रामाणिकपणे वाटते की, आलाहजरतांनी ज्या मकसदसाठी कुलीखानाला जिवंत ठेवले, इस्लामच्या नेक राहवर आणले तो मकसद त्याला इतक्या दूरवर एकटे ठेवण्याने पुरा होणार नाही. आता योग्य वेळ पाहून आलमपन्हांनी कुलीखानाला आपल्या पायाशी बोलावून घ्यावे आणि नजरेखाली ठेवावे.
आपला पायगुंता सोडवून घेण्याची महाबतखानाची धडपड पाहून जाफरखान चकित झाला. बादशहाच्या गंभीर दगडी चेहऱ्यावर किंचित स्मित उमटून गेले असावे अशीसुद्धा त्याला शंका आली.
वजीरेआझम, तुमचा मशवरा काय आहे?
एक डोळा महाबतखानावर ठेवत तो हळूच पुटपुटला-
गुलाम जनाब महाबतखान साहब की राय से इत्तफाक रखता है.
महाबतखानाची डोलती नय्या सावरणे भाग होते. तो त्याचा जवळचा रिश्तेदार होता. इराणी दरबाऱ्यांत त्याचे मोठे वजन होते.
बेहतर है। मामले की पूरी तफतीश हो। कुलीखान के इस बर्ताव का मकसद मालूम किया जाय। अन्यथा महाबतखानास अफगाणिस्तानात वापस जाणे भाग आहे. ते रवाना झाले तर त्यांचा जनानखाना माबदौलत आपल्या पनाहमध्ये ठेवतील.
आंबलेल्या दातांनी दोघे शाही जनानखान्यातून बाहेर पडले आणि आपापल्या मुक्कामावर रवाना झाले. त्याच दिवशी दोघांचे सांडणीस्वार आपापल्या माणसांसाठी कडक खलिते घेऊन काबूलकडे दौडत निघाले. महाबतखानाचे नशीब जोरावर होते. या प्रसंगाला जेमतेम पंधरवडा झाला असेल-नसेल आणि महम्मद कुलीखानाचे दस्तूरखुद्द आलमपन्हा जिल्हेसुभानी बादशहा सलामतांच्या नावे लिहिलेले पत्र राजधानीत येऊन दाखल झाले.
महम्मद कुलीखानाचे थेट बादशहाला लिहिलेले पत्र म्हटल्यावर बादशहाने दरबारात पत्र वाचण्यास मना केले. याचा अर्थ ते पत्र खासगीत - बादशहाच्या महालात निवडक मुत्सद्दी दरबाऱ्यांच्या समोर वाचले जाणार होते. रात्री बादशहाच्या खासगी महालात मुख्य वजीर जाफरखान, मीर बक्षी, सरलष्कर महाबतखान, दाऊदखान कुरेशी, दानिशमंद खान आणि काही महत्त्वाची मोजकी मंडळी हजर झाली. दरबारी पोशाख उतरवून बादशहाने साहेबी लिबास, म्हणजे साधी सुती लुंगी, सैलसर अंगरखा आणि स्वत:च्या हाताने विणलेली गोल टोपी असा साधा पोशाख परिधान केला होता. तो एका साध्या मसनदीवर पालथी मांडी घालून बसला होता. हात टोपी विणण्यात व्यग्र होते. पण गहिरी हिरवी नजर समोरच्या प्रत्येकाचा वेध घेत होती. सलाम-दुव्याचे प्राथमिक उपचार आटोपून मानकरी हात बांधून समोर उभे राहिले.
खैर. वजीरेआझम, सुनाईये, क्या कहता है तुम्हारा महम्मद कुलीखान.
कुर्निसात करून जाफरखानाने समोरच्या तिवईवर ठेवलेली किनखापाची हिरवी मखमली थैली उचलली. सरफास ओढून त्यातून अतिशय सुंदर कोरीवकाम केलेले व त्यात अधूनमधून किमती खडे जडवलेले अक्रोडाच्या लाकडाचे पत्राचे नळकांडे बाहेर काढले. त्यातून तशाच प्रकारचे कोरीवकाम केलेल्या लाकडी दांडीवर गुंडाळलेले पत्र काढून उलगडले. अस्सल रेशमी कापडावर सुंदर रंगीबेरंगी नक्षीदार वेलबुट्टीच्या चौकटीत घोटीव फारसी अक्षरांत पत्र लिहिले होते. ते पत्र उलगडताच कस्तूरी आणि हीनाचा वास महालभर दरवळला. पत्राच्या शिरोभागी फौजेच्या सरलष्कराचा पाचबुर्जी शिक्का झळकत होता. पत्र भले लांबलचक होते. वजिराने पत्र उलगडताच खोजाने दिव्याची ठाणवई पत्रावर नीट उजेड पडेल अशा पद्धतीने आणून ठेवली आणि तो पावले न वाजविता निघून गेला. वजिराने बादशहाकडे एक कटाक्ष टाकला. नजरेचा इशारा मिळाल्यावर त्याने धीरगंभीर आवाजात पत्र वाचण्यास सुरुवात केली.
आलमपन्हा, जिल्हेसुभानी, शहनशाहे आलम बादशाहे हिंदोस्तान, हुजुरे आली आलमगीर गाझी यांच्या मुबारक कदमांशी नाचीज बंदा गुलाम महम्मद कुलीखान पेशावरी फौजबंद सरलष्कर सरजमीने अफगाण हाली डेरा काबूल याचा सलाम अलेकुम बरकत्तुल्ला-ए-आलई.
हुजुरेपाक खाविंदांनी कृपावंत होऊन गुलामाला अज्ञानाच्या अंधारातून स्वत:च्या मुबारक हातांनी इस्लामच्या नेक राहवर तर आणलेच, शिवाय दयावंत होऊन माझ्यासारख्या नाचीज माणसाची नेमणूक सरजमीने अफगाणच्या मोहिमेवर करून इस्लामची आणि मुघलिया तख्ताची सेवा खिदमत करण्याचा नायाब मौका दिला. त्यानंतर अत्यंत कृपावंत होऊन त्याच मोहिमेच्या सरलष्करीचा सरताज शिरावर चढवून गुलामाचा बहुमान केला. या नाचीज बंद्या गुलामावर मोठाच विश्वास व्यक्त केला.
युसुफजाही पठाणांसारख्या अत्यंत जालीम गनिमांशी झुंजून त्यांना परास्त करणाऱ्या शाही फौजेला शीण आला असेल असे अलीजांना वाटले असावे; त्यामुळे आलाहजरतांनी अत्यंत दयावंत होऊन जनाब-ए-आली महाबतखान साहेबांना मोठ्या शाही फौजेसह आपल्या चरणांपाशी वापस बोलावून घेतले. त्या जागी नवी कुमक येण्याची गुलाम अत्यंत आतुरतेने, चातकासारखी वाट पाहत आहे. रानटी पठाणांशी झुंजून त्यांना नामोहरम करण्यासाठी आणि मुघलिया तख्ताची शानोशोहरत बुलंद करण्यासाठी शाही फौज बेताब असली तरी नवी ताज्या दमाची कुमक आणि पुरेसा खजिना याअभावी गुलाम पूर्ण ताकदीनिशी मोहीम पुढे चालविण्यास असमर्थ ठरला आहे. यासंबंधीचे अनेक अखबार व खलिते गुलामाकडून यापूर्वीच दरबारात पेश झालेले आहेत. परिणामत: मुघलिया साम्राज्याचा विस्तार खैबरपार करण्याच्या आणि इस्लामचा झेंडा बुलंद करण्याच्या कामास मोठीच खीळ बसली आहे. हशम आणि इसम बेकाम, बसून आहेत. सरदार आणि शिपायांचा जोम आणि उत्साह ओसरू लागला आहे; त्यामुळे त्यांना अय्याशीची चटक लागण्याची शक्यता आहे. असेच चालू राहिले, तर ज्यांच्यावर विजय मिळवून ही दौलत कमावली आहे ते रानटी गंवार अफगाणी पठाण त्यांची भूमी मुघलिया तख्ताच्या छायेखालून पुन्हा हिसकावून घेतील; त्यामुळे आलाहजरतांच्या अल्लाच्या पाक साम्राज्याला मोठा धोका उत्पन्न होईल, अशी गुलामाला भीती वाटू लागली आहे. या कारणे त्वरित हालचाली करून हर प्रयत्ने मोहीम नेटाने पुन्हा चालू करणे निकडीचे होऊन बसले आहे; त्यामुळे गनिमावर दाब राहून कमावलेल्या दौलतीचे उत्तम संरक्षण तर होईलच शिवाय साम्राज्याचा विस्तारसुद्धा होईल. तसेच अफगाणांच्या मनात मुघल सत्तेचा धाक जसा पैदा होईल तसाच अधूनमधून गुस्ताख कारवाया करून रानटी अफगाणांना फूस लावणाऱ्या आणि मुघलिया सलतनतीवर आक्रमण करण्याची धमकी देणाऱ्या इराणच्या शहावरसुद्धा वचक निर्माण होईल.
अल्लाच्या मेहेरबानीने खाविंदांचे गुलामावर पुत्रवत प्रेम आहे आणि नजरे इनायत बरकरार आहे, असे असूनसुद्धा गेल्या काही दिवसांत खाविंदांना गुलामाकडे ताजी कुमक व खजिना पाठविणे जमू शकले नाही, याचा गुलामाच्या क्षुद्र मर्यादित बुद्धीला असा अर्थ दिसतो की, मुघल फौजा दुसऱ्या कोणा अत्यंत निकडीच्या कामी गुंतून पडल्या आहेत. या बिकट समस्येतून मार्ग काढण्यासाठी गुलामाने आपल्या अधिकारात सर्व बुजुर्ग, अनुभवी तसेच नव्या दमाच्या सरदारांचा विचार घेतला. सर्वांना एकमताने असाच उपाय सुचतो की, असे निष्क्रिय बसून मुघलिया पौरुष बरबाद करण्यापेक्षा, जर जिल्हेसुभानी आलाहजरतांनी कृपावंत होऊन रजामंदी फरमावली तर आहे त्या सामर्थ्यानिशी मोहीम नव्या जोमाने पुन्हा सुरू करावी.
आलाहजरतांच्या पायाशी विदित आहेच की, रसद आणि खजिन्याची भयंकर कमतरता असताना गुलामाने अनेक धाडसी निर्णय घेऊन, नेहमीच्या मुघलिया रिवाजात न बसणाऱ्या उपाययोजना करून खर्चात मोठी बचत तर केलीच, शिवाय प्यादे, शिपाई, अंमलदारांना चांगली शस्त्रे आणि सुविधा मुहैया करविल्या. एवढेच नव्हे तर खजिन्यात भर टाकण्याचेसुद्धा उपाय केले. आज गुलाम फक्र के साथ अत्यंत लीनपणे हुजेरे आलांच्या मुबारक कदमांशी असे पेश करण्यात धन्यता मानतो की, छावणीच्या खजिन्यात आता बऱ्यापैकी शिल्लक जमा झालेली आहे; त्यामुळे मोहीम पुन्हा सुरू केली तरी शाही खजिन्यावर भार पडणार नाही याचा नाचीज गुलामाप्रमाणेच छावणीतील प्रत्येकाला विश्वास वाटतो.
आलमपन्हांच्या पायाशी हे जाहीर आहे की, आज छावणीतल्या प्रत्येक शिपाई, प्यादा, शागिर्दपेशा तसेच सरदार मानकऱ्यांचा तनख्वाह आणि भत्ते हा खर्च चालूच आहे. आलाहजरतांच्या हुकमाने मोहीम पुन्हा सुरू केली तरी त्यासाठी वेगळा खर्च येणार नाही. बाकी जो काही वाढीव खर्च येणार आहे त्यासाठीसुद्धा शाही खजिन्यावर कोणताही बोजा पडू नये अशी गुलामाची इच्छा आहे. त्यासाठी स्वत:च इथल्या इथे खजिना उत्पन्न करण्याची योजना दयावंत आलाहजरतांच्या मुबारक कदमाशी पेश करण्याची इजाजत मिळावी असा गुलामाचा अर्ज आहे.
महापराक्रमी मुघलिया फौजेने सरजमीन-ए-अफगाणचा मोठा हिस्सा जिंकून घेतला आहे; त्यामुळे ही जमीन आता मुघलिया सलतनतीचा अविभाज्य भाग बनलेली असून, येथील वासिंदे मुघलिया सलतनतीची रयत झालेले आहेत. जीत प्रदेशातील या वासिंद्यांना रयतेचा दर्जा जाहीर करून मुघल रयतेला मिळणारे हक्क आणि संरक्षण त्यांना बहाल करण्याची शाही कृपा झाली तर त्या बदल्यात त्यांच्याकडून शेतसारा आणि अन्य कर वसूल करता येतील. तो अधिकार गुलामाला बहाल झाला तर येथील सुभ्याच्या शाही खजिन्यात मोठीच भर पडेल. तसेच पूर्वी जिंकलेल्या आणि नव्याने जिंकल्या जाणाऱ्या प्रदेशातून चौथाई - सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार बंद्याला इनायत झाले तर शाही खजिन्यावर फुटक्या कवडीचा बोजा न टाकता मोहीम कामयाब करण्याची ग्वाही नम्रपणे देण्याची गुस्ताखी करण्यात गुलामाला आनंद वाटेल. राजधानीतून दारूगोळ्याच्या अखंड पुरवठ्याशिवाय अन्य कोणतीच अपेक्षा हा नाचीज ठेवत नाही.
जान की अमान मिळाली तर अत्यंत नम्रतेने हा नाचीज गुलाम आलाहजरतांच्या मुबारक कदमांपाशी असे पेश करण्याची दरखास्त करतो की, मुघली फौज ज्या पद्धतीने जंग चालविते, त्यामध्ये फार मोठी मनुष्यशक्ती तर गुंतून पडतेच शिवाय अमाप खजिना आणि बेहिसाब गोळाबारूद जाया जाते. आलमपन्हांनी कृपावंत होऊन माझ्या पूर्वायुष्यातील तजुर्बा वापरून जंग चालविण्याची इजाजत फरमावली तर गुलामाच्या हाताखाली उपलब्ध असलेली फौज वापरूनच, इन्शाल्लाह, सहा महिन्यांत मुघल सलतनतीच्या सरहदी इराण आणि तुर्कस्तानपर्यंत नेऊन भिडविण्याचे वचन देण्यास गुलाम बेताब आहे.
आलाहजरतांच्या कृपाछत्राखाली राहून आखरी दम तक मुघलिया तख्ताची आणि इस्लामची सेवा करते रहना एवढेच आता गुलामाचे जीवनकार्य होऊन राहिलेले असल्याने अन्नदात्याचा पैसा खात चैनीत काळ वाया घालविणे गुलामाला जड जात असल्याने दरखास्त जल्द अज् जल्द मंजूर करावी अशी गुलामाची इंतजा आहे.
आलमपन्हांचा बंदा गुलाम, महम्मद कुलीखान
पत्राचे वाचन संपले. दालनात सन्नाटा पसरला. टोपी विणणारे बादशहाचे हात पत्राचे वाचन सुरू असताना कधी थांबले त्यालादेखील कळले नाही. कपाळावरील काळा डाग पूर्ण आक्रसून गेला होता. डोळे बंद झाले होते. वाचन संपून बराच काळ झाल्यानंतर डोळे उघडले गेले. कपाळावरील जाळी साफ झाली. विणकाम खाली ठेवून समोरच्या तबकात असलेली जपमाळ हातात आली. ओठ पुटपुटू लागले. हिरव्या नजरेची धार समोरच्या प्रत्येकाला तोलत आणि जोखत होती. प्रतिक्रिया विचारली तर काय जवाब द्यावा याचा प्रत्येकजण विचार करीत होता. एवढी धाडसी योजना एवढ्या स्पष्ट शब्दांत थेट बादशहासमोर बेधडकपणे मांडण्याचे धाडस मोगली दरबारात आजपर्यंत कुणाला झाले नव्हते. सलतनतीचे कट्टर दुश्मन असलेल्या मराठ्यांच्या पद्धतीने युद्ध करून मुघल साम्राज्य वाढविण्याची मोठी अजब तरकीब हा वेडापीर थेट बादशहालाच सुनावत होता. बादशहाच्या एका दीर्घ नि:श्वासाने शांततेचा भंग झाला.
बोला मीर बक्षी, तुम्हाला काय वाटते पत्र ऐकून. तुमचा मशवरा काय आहे?
आलमपन्हा, कुलीखान स्वाऱ्या-शिकाऱ्यात उभी हयात घालवलेला गडी आहे. असे काही न करता स्वस्थ बसावे लागले तर तो बेचैन होणारच. काही काबील सरदारांबरोबर त्याची कुमक करावी आणि शाही रिवाज अन् तरीक्याप्रमाणे मोहीम दोबारा सुरू करावी.
हिरवी नजर महाबतखानावर स्थिर झाली. इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची गत झाली. कालपरवाच बादशहाकडून मिळालेली दरडावणी अजून कानात घुमत होती. सर सलामत तो पगडी पचास या न्यायाला अनुसरून थरथरत्या आवाजात तो कसाबसा पुटपुटला–
बंदा जनाब मीर बक्षी साहब की राय से इत्तफाक रखता है. थोडी बहुत फौज त्याच्या दिमतीला पाठवून त्याला गुंतवून ठेवावे. एकदा जंग करण्याचा जुनून त्याच्यावर सवार झाला, म्हणजे असे विचित्र खयाल त्याच्या जहनमध्ये येणे आपोआप बंद होईल. मी त्याला चांगला ओळखतो. रिकामपणामुळे त्याला भलभलते खयाल येतात.
वजीरेआझम, आपकी राय क्या है?
जाफरखानाची नजर क्षणभरासाठी महाबतखानाच्या नजरेला भिडली. निरुपाय होत असल्याचे भाव नजरेत तरळून गेले. महाबतखानानेसुद्धा नजरेनेच असहायता व्यक्त करून मूकसंमती दर्शविली.
हुजुरे आला कुलीखानाला फार काळ एकटा ठेवणे धोक्याचे ठरेल. कोणीतरी जबरदस्त सिपाहसालार ताबडतोब अफगाण मोहिमेवर पाठवणे निकडीचे झालेले दिसते. कुलीखानाला कामात गुंतवून ठेवले पाहिजे.
जाफरखान रात्र झाली की, तुझे डोके जनानखान्याकडे ओढ घ्यायला लागते. नेमका धोका तुझ्या लक्षात आला आहे पण तुझे डोके योग्य विचार करीत नाही. कारण तुझे चित्त भलतीकडे गुंतले आहे.
माफी आलमपन्हा…
काही क्षण हिरवी नजर शून्यात गेल्यासारखी झाली. स्वत:शीच बोलावे तसा बादशहा बोलू लागला–
माबदौलतांच्या नजरेपासून दूर, एकटे आणि रिकामे बसून राहून कुलीखानाच्या मनात बंडखोरी आणि महत्त्वाकांक्षा जागी व्हायला लागलेली दिसते. या आधी त्याने सर्वसामान्य शिपाई-प्याद्यांच्या दिलात आपली इज्जत वाढवून आणि नौजवान तडफदार अधिकारी आणि सरदारांना आपलेसे करून स्वत:चे स्थान पक्के करण्याची कोशिश केलेली आहे. उत्पन्नाचे नवनवे जरिया आणि मार्ग तयार करून तो स्वत:चा खजिना वाढवीत आहे. तो स्वावलंबी होण्याची कोशिश करीत असावा असे वाटते. काबूलपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या नजरबाजांना तो अंकित करण्याचा प्रयत्न करीत असावा. माबदौलतांना असा पक्का शक वाटतो, त्या शकला मजबुती देणारे काही पुरावे माबदौलतांकडे मौजूद आहेत. महाबतखान आणि जाफरखानाने आपली खास विश्वासाची जी माणसे त्याच्या निगराणीसाठी ठेवलेली आहेत, त्यांना त्याने फोडले आहे. आपल्या कह्यात आणले आहे. ती बेवकूफ माणसे त्याच्या तारीफेचे पूल बांधताना थकताना दिसत नाहीत. काही मजबूरींमुळे माबदौलत त्याच्याकडे पुरेसे ध्यान देऊ शकले नाहीत; त्यामुळे त्याचा हौसला वाढलेला दिसतो. आता तो मुघली फौजा आपल्या हिशेबाने नाचवण्याचा विचार करू लागला आहे. त्याला दौलतीच्या सरहद्दी इराण, तुर्कस्तानला भिडवायच्या आहेत. तेवढी काबिलीयत त्याच्या दिलात, मस्तकात आणि मनगटात नक्कीच आहे. माबदौलतांना यात दोन धोके दिसतात, एक म्हणजे इराणच्या शहाच्या मदतीच्या आश्रयाने आमच्या शिकंजातून सुटका करून घेणे किंवा दुसरे, इराणचा शहा किंवा तुर्की खलिफाच्या आशीर्वादाने स्वत:ला अफगाणिस्तानचा स्वतंत्र सुलतान घोषित करणे. काही असो, माबदौलतांना त्याचा इरादा साफ असावा असा भरवसा वाटत नाही.
खुद्द बादशहाच्या मुखातूनच कुलीखानावर ताशेरे उडाले. मग काय! बादशहाच्या संशयाला पुष्टी देण्यात सर्वांची अहमहमिकाच लागली. एकटा महाबतखानच भिजल्या मांजराप्रमाणे थरथर कापत अल्लाची करुणा भाकत खालमानेने स्वस्थ उभा होता. बादशहाची कुलीखानावर खास मर्जी; त्यामुळे आधीच त्याच्यावर मेहेरबानी आणि सवलतीची खैरात सुरू असल्याने जुन्या मानकऱ्यांचा जळफळाट होतच होता. मग त्याच्याविरुद्ध कान भरण्याची आयती चालून आलेली सुवर्णसंधी कोण गमावणार? खरे-खोटे किस्से मीठ-मसाला लावून रंगवून रंगवून सांगितले जाऊ लागले. कुणीतर हातासरशी शिवालासुद्धा चार शिव्या देऊन आपली रसना धन्य केली. अर्ध-मिटल्या डोळ्यांनी बादशहा एकेकाला जोखत होता. त्याच्या दगडी निर्विकार चर्येवरून नक्की कोणताच अर्थबोध होत नव्हता. बराच वेळ ती काव काव ऐकून घेतल्यानंतर माळेचा हात वर झाला. एकदम शांतता पसरली.
माबदौलतांनी तुमच्या वाह्यात कहाण्या ऐकण्यासाठी तुम्हाला गोळा केलेले नाही. कुलीखान तुम्हाला कितीही निकम्मा वाटला तरी त्याला जर योग्य पद्धतीने वागवले आणि वापरले तर तो तुम्हा कोणाहीपेक्षा दसपट जास्त लायक आहे. त्याच्या मनातली बंडखोर भावना तेवढी निपटून काढली गेली पाहिजे. शिवापासून दूर होऊन त्याला आता दहा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. नऊ वर्षे तो अफगाणिस्तानात कर्तब गाजवतो आहे. या काळात दख्खनचा वारासुद्धा लागलेला नाही. त्यात त्याने साहेबे इमान स्वीकारले आहे. आता शिवाला आपली गरज उरलेली नाही, अशा परिस्थितीत तो आपल्याला जवळ करणार नाही याची त्याला निश्चितच जाणीव झालेली आहे. पण त्याच्या जहनमध्ये खोलवर रुतून बसलेला आझादीचा जुनून संधी मिळाली की फणा काढतो; त्यामुळे तो शिवाकडे परत जाणे शक्य नाही याची त्याला खात्री पटली असली तरी हा खयाल, हा जुनून त्याला सतत बेताब करीत असतो. जाफरखान…
हुकूम आलमपन्हा.
उद्याच्या उद्या फर्मान रवाना करा आणि अफगाण मोहीम बंद करा. जल्द अज् जल्द महम्मद कुलीखानाला मुस्तकीर उल खिलाफत दिल्लीमध्ये बोलावून घेऊन दरबारात बाइज्जत हाजिर होण्याचा हुक्म द्या.
जो हुक्म आलमपन्हा. पण जान की अमान पाऊँ तो कुछ पेश करूं.
इर्शाद.
गुस्ताखी माफ हुजुरे आला, पण इतकी वर्षे झुंजून जी अफगाणी पठाणांची जमीन मुघलिया फौजेने जिंकली आहे ती अशी वाऱ्यावर सोडून देणे कसे शक्य आहे? त्याची काहीतरी सोय लावावीच लागेल. तीसुद्धा शाही फौजांनी काबूल सोडण्याच्या आत. दोन्ही फर्माने एकदमच निघायला हवीत.
जाफरखानाने महाबतखानाची जळजळीत तिखट नजर चुकविण्याचा निष्फळ प्रयत्न केला. नजरांचे हे द्वंद्व हिरव्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते.
बहोत खूब जाफरखान! या अशा मशवऱ्यांमुळेच तुझी रात्रीची बेताबी माबदौलतांना माफ करणे भाग पडते. महाबतखान…
महाबतखान नखशिखान्त हादरला. जाफरखानाकडे जळजळीत कटाक्ष टाकत, खालमानेने कुर्निसात करीत तो एक पाऊल पुढे झाला. दीन स्वरात त्याचे शब्द उमटले–
अन्नदाता…
महाबतखान, तू कुलीखानाला जामीन आहेस. तुझ्या शब्दाखातीर त्याला एकट्याला सोडून तुला परत बोलावले.
जी अन्नदाता.
काही वेळ शांतता राहिली. दिल्लीच्या थंडीत महाबतखानाच्या कपाळावर घाम जमा झाला. अंग थरथरा कापू लागले. तावडीत सापडलेल्या उंदराकडे मांजराने पाहावे त्याच नजरेने बादशहा त्याला न्याहाळत होता. महाबतखानावर काय वीज कोसळते या भयाने वातावरणात तणाव भरून राहिला.
महाबतखान, कुलीखान दिल्लीत परत आला की, तू त्याला सतत संपर्कात ठेव. त्याच्यावर आता नजरकैद नसली, तरी त्याच्या मनात बंडखोरी पैदा होऊ न देण्याची खबरदारी घेतलीच पाहिजे. तो जिम्मा आता तुझा.
वातावरणातला ताण सैलावला. महाबतखानाचा जीव भांड्यात पडला. सुटकेचा नि:श्वास टाकत, जमिनीपर्यंत झुकून कुर्निसात करत तो आपल्या जागी गेला.
जी अन्नदाता. गुलाम पूर्ण कोशिश करील.
बेहतर है। रही बात अफगाण की। जाफरखान, राजा रामसिंहाचा निम्मा सरंजाम त्याला परत करण्याचा आणि मिर्झाराजाची जहागिरी त्याच्या नावे पुढे चालवण्याचा हुकूम उद्याच जारी कर. त्याचबरोबर त्याच्यासोबत पंचवीस हजारांची राजपूत फौज देऊन अफगाणिस्तानात नामजद करण्याचा हुकूम जारी कर. उद्या ईशाच्या नमाजानंतर त्याच्यासोबत नामजद होणाऱ्या राजपूत सरदारांची यादी माबदौलतांच्या मंजुरीसाठी पेश झाली पाहिजे. एका हप्त्यात रामसिंहाचे काबूलकडे कूच झाले पाहिजे. त्यासाठी मुहूर्त बघण्याची त्याला गरज नाही. त्याचे निरोपाचे विडे आणि मानाचा पोशाख मीर बक्षी त्याच्या मुक्कामी जाऊन देतील, त्यासाठी त्याला दरबारात येण्याची गरज नाही. हा हुकूम त्याच्यावर तोंडी बजावावा. कुलीखानाच्या फर्मानात स्पष्ट लिही की, रामसिंह ज्या दिवशी काबूल मुक्कामी पोहोचेल त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या हाती सारा मामला सोपवून कुलीखानाने दिल्लीकडे कूच करावे. वाटेत पेशावरमध्ये मुक्काम करून वेळ वाया घालवू नये. सर्वांचे जनानखाने फौजेस वाटेतच भेटतील. तीन महिन्यांच्या आत तो दरबारात पेश झाला पाहिजे.
जो हुक्म आलमपन्हा.
और एक बात. जाफरखान, मीर बक्षी आणि दानिशमंद खान तुम्ही तिघांनी कुलीखानाच्या पत्रावर नीट विचार करून त्याने सुचवल्याप्रमाणे कारवाई कशी करता येईल याविषयी माबदौलतांना आपापला मशवरा द्या. म्हणजे रामसिंह रवाना होण्यापूर्वी तसे फर्मान जारी करता येईल.
जो हुक्म.
तखलिया.
क्षणही न दवडता सारे मानकरी कुर्निसात करत दालनातून बाहेर पडले.
सकाळचा दरबार आटोपून महाराज महालात परत आले. मागोमाग भोजनाची वर्दी घेऊन हुजऱ्याही आला. दरबारी पोशाख उतरवून साध्या पोशाखात महाराज भोजनगृहाकडे निघणार एवढ्यात बहिर्जी नाईक देवडीवर आल्याची वर्दी आली. महाराज लगेच थबकले. त्यांनी बहिर्जीला लगेचच बोलावून घेतले. काही क्षणांतच बहिर्जी दाखल झाला. बहिर्जीचा चेहरा आनंदाने फुलला होता, म्हणजे खबर नक्कीच चांगली असावी, असा सहजच अंदाज येत होता. दारातून मुजरा घालता घालताच बहिर्जीने बोलायला सुरुवात केली.
म्हाराज, खंडेरायाची, आई भवानीची, समद्यांचीच मोटी किरपा जाली. खबर लय आनंदाची हाय. आलमगिरानं नेताजीराव सरकारास्नी दिल्लीत माघारी बोलावलया. त्येंच्या जागी कुंवर रामसिंहांना नामजद केलया. त्येंची अर्धी मनसब आन जागिरी परत दिलिया बाच्छावानं. नेताजी सरकारांसंगत समदी फौज मुसलमानच व्हती, आन आता सारी राजपूत. म्या दिल्ली सोडली तवा कुंवर रामसिंह कूच करून हप्ता जाला व्हता. अडीच-तीन म्हयन्यात नेताजी सरकार दिल्लीत दाखल व्हतील. त्येंची नजरकैद कवाचीच उटलिया पर म्हाबतखानास त्येंच्या निगरानीचा हुकूम झालाया. दुसरी मुस्तकीम खबर हाय की बाच्छा नेताजी सरकारास्नी लवकरच सोराज्यावर सोडनार. म्हंजी सरकारांचा घरी परतन्याचा मार्ग खुला व्हनार.
जगदंब! जगदंब! जवळपास एक तप होऊ घातले तेव्हा कुठे आज नेताजी काकांसंबंधी बरी खबर कानावर आली. आज आम्ही समाधानाने भोजन करू.
भोजनाचा उल्लेख म्हणजे जाण्याची सूचना समजून बहिर्जी मुजऱ्यासाठी खाली वाकला.
थांबा नाईक. तुम्ही निरोप घ्यावा म्हणून आम्ही भोजनाचा उल्लेख केला नाही. कवाड… आणि भोजनगृहात वर्दी द्या. म्हणावे, थोडा वेळ लागेल आम्हाला, आम्ही तुमच्यासोबत आहोत.
बहिर्जीने दारावरच्या हुजऱ्याला भोजनगृहात वर्दी देऊन रवाना केले आणि परतल्यावर दारापासून दूर उभे राहण्याची सख्त सूचना दिली. नंतर मग कवाड लावून घेऊन पुन्हा महाराजांसमोर येऊन उभा राहिला.
आता सारे नीट सविस्तर आणि खुलासेवार सांगा.
त्यानंतर नेताजीरावांनी उपलब्ध फौजेनिशी, मराठा पद्धत वापरून मोगली फौजेने पठाणांशी लढण्याची योजना, शेतसारा, कर वसूल करण्याचे तसेच चौथाई-सरदेशमुखीचे हक्क वगैरे मागण्या करणारे थेट बादशहाला लिहिलेले पत्र, त्यावर बादशहाची प्रतिक्रिया वगैरे सारे तपशीलवार सांगितले. महाराजांनी मध्ये एकही शब्द न बोलता त्याचे सारे बोलणे एकाग्रतेने ऐकून घेतले. बोलणे संपल्यावर संतोषाने मान डोलावीत पण गंभीरपणे बोलले–
नाईक, आता जबाबदारी वाढणार. आफताब आणि नर्दुल्ला दोघांनाही जास्त चौकस आणि सावध राहावे लागणार. नर्दुल्लास सख्त सूचना रवाना करा, त्याने सदैव जागरूक राहून नेताजीकाकांना जपायचे आहे. सावलीसारखा तो त्यांच्यासोबत हवा. पलायनाची योजना ठरवताना संपूर्ण विचार करूनच आखणी करा, तुम्ही त्यात जातीनिशी लक्ष घाला. मात्र आमचा शब्द-कौल मिळाल्याशिवाय कृती करू नका. आलमगिरास दहा कोसांवर असलेल्या माशीचे गुणगुणणे स्पष्ट ऐकू येते, याचे नीट भान ठेवा. आईच्या पोटात असलेल्या बाळाच्या मनात काय आहे हे तो ओळखू शकतो, याचे ध्यान ठेवा. कुत्र्यापेक्षा सावध, चित्त्यापेक्षा चपळ, कोल्ह्यापेक्षा कपटी, सर्पांपेक्षा घातकी आणि इंगळीपेक्षा जहरी आहे तो. त्याची नजर गिधाडासारखी तीक्ष्ण आहे. घारीच्या अचूकतेने त्याची भक्ष्यावर झडप पडते, हे कधीही विसरू नका. पण हे फर्मान अचानक निघाले कसे?
म्हाबतखान परतल्यापासून अफगान म्होईम थंडच व्हती. घियासुद्दीनकडून आपला कौल सरकारास्नी भ्येटला. मंग त्येंनी पाहनी करन्यासाठी इरानी सरहद्दीकडं धडक मारली. त्यो मुलुक लई वंगाळ आन तितली रानटी मानसं लई धोकादायक. त्या मुलकात त्येस्नी योक अवलिया भ्येटला. त्येनं भाकीत सांगितलं, या रस्त्यानं जाऊ नगंस. आल्या वाटंनंच तू परत जाशील म्हनून. त्याच दिशेनं खटपट कर, यश ईल म्हनला. मंग सरकारांनी समद्या मोगली सरदारास्नी उटवलं. हाती व्हती तेवड्याच फौजेनिशी म्होईम चालू करन्यास राजी क्येलं. थ्येट बाच्छावालाच पत्र लिवून इजाजत मागितली. म्होईमेचा खर्च भागवन्यासाठी चौथाई-सरदेशमुखीच्या अधिकाराची मागनी क्येली. मंग काय? आलमगीरच त्यो, त्याला बंडखोरीचा वास आला. नेताजी सरकार नदरंसमोर ठेवल्याबिगर खरं न्हाई म्हनला आन… आन टाकोटाक फर्मानं निगाली. सरकारांची मात्रा बराब्बर लागू पडली.
बहिर्जी, आलमगीर किती सावध आणि सतर्क आहे हे ध्यानात घ्या. आपण त्याला संशयी म्हणून हिणवतो, पण प्रत्येक बारीकातल्या बारीक गोष्टीतला ठिणगीएवढा धोकासुद्धा तो बरोब्बर ओळखतो. गनिमाच्या चालीचा अंदाज तो फार आधीच बांधतो आणि त्याप्रमाणे प्रतिचाल आखतो. पूर्वीच्या बादशहांसारखा तो नुसता खुशालचेंडू अय्याश नाही. तो खराखुरा राज्यकर्ता आहे. (आपले आणि स्वराज्याचे सुदैव की, त्याची दृष्टी, तडफ आणि कर्तबगारी असणारा कुणीच त्याच्या पदरी नाही. म्हणूनच तो नेताजीकाकांची किंमत ओळखून आहे. आपले मनसुबे त्यांच्या हातून करवण्याची स्वप्ने तो पाहतो आहे. आलमगिराऐवजी दारा किंवा शुजा गादीवर येता, तर स्वराज्याचे काम अधिक सोपे होते. आपण आपल्या सरहद्दी आतापावेतो नर्मदापार सरकवल्या असत्या. आलमगिराने मोठ्या हिकमतीने दिलेर आणि बहादूरखानास दख्खनमध्ये ठेवले आहे. ते दोघेही भले फार काही कर्तब दाखवू शकले नसले तरी त्या दोघांनी स्वराज्य विस्तारास बराच पायबंद घातला आहे ही वस्तुस्थिती आहे. नजीकच्या काळातच तो नेताजीकाकांना स्वराज्यावर सोडणार यात संशय नाही. खऱ्यापेक्षा बाटगा जास्त कडवा असतो, अनुभवाने सिद्ध झालेले त्याने पाहिले आहे. मागोमाग तो स्वत: कधी ना कधी तरी स्वराज्यावर घसरणार. त्या वेळी तो नुसते स्वराज्य बुडवण्याचीच कोशिश करणार नाही तर आदिलशाही आणि कुतुबशाहीसुद्धा बुडवल्याशिवाय राहणार नाही. आमची ही भविष्यवाणी नीट ध्यानात ठेवा.)
व्हय जी म्हाराज, अक्षी खरं हाय ह्ये म्हननं.
आम्हास नेताजीकाकांच्या संबंधाने नियमित खबरी मिळतील याची तजवीज करा. सर्वसाधारण खबरी सदरेमार्फत आल्या तरी विशेष घडामोडी थेट कळवण्याची वहिवाट अशीच चालू राहिली पाहिजे.
जी म्हाराज.
कुंवर छत्रसालना कळवा. म्हणावे, नजर तेज करा. नेताजीकाकांना कधीही कुमक करण्यासाठी वा गुप्त आश्रय देण्यासाठी सज्ज असा. दुसरे महत्त्वाचे, नेताजीकाका दिल्लीतून निसटू म्हणतील तर द्वारका वेरावळमार्गे गलबतातून आणा. नाहीतरी मकरानला गलबते रवाना करण्याची योजना पुरी होत आलीच होती. आता गलबते दूरदेशी परदेशात धाडण्याचे कारण उरलेले नाही. बाब टप्प्यात आली आहे. त्या भागातली आपली माणसे सतर्क करा.
जी म्हाराज.
शुचिर्भूत होऊन लवकर भोजनगृहात दाखल व्हा. तुमच्या पंगतीसाठी आम्ही खोळंबलो आहोत. या आता.
ज्या स्वरात आणि ढंगात महाराजांनी बाकी हुकूम दिले, त्याच स्वरात आणि ढंगात हा हुकूमसुद्धा दिला. क्षणभर बहिर्जीच्या काही ध्यानातच आले नाही आणि जेव्हा आले तेव्हा त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. प्रत्यक्ष महाराजांच्या पंगतीचा बहुमान. त्याच्या आनंदाला अस्मान ठेंगणे झाले. गडबडीने मुजरा करून, कवाड उघडून तो झपाट्याने बाहेर पडला. त्याची उडालेली धांदल पाहून महाराजांच्या मुखावर स्मित उमटले.
चोळणा-डगला काढून ठेवून, धोतरबितर नेसून बामणासाराखा खांद्यावर पंचा घेऊन, वारकऱ्यासारखा कपाळी टिळा आणि बुक्का लावून बहिर्जी महाराज पानावर बसण्याच्या आत भोजनगृहात पोहोचला. महाराजांनी त्याचे पान आपल्या नीट समोर घ्यायला लावले होते. शंभूराजे महाराजांच्या उजव्या हाताला, तर रामराजे डाव्या हाताला बसले होते. पंगतीला महाराजांची एक-दोन सोयरी-पाहुणी मंडळी अशी मोजकी घरचीच मंडळी होती. सोयराबाई राणी सरकार वाढपावर देखरेख करण्यासाठी पाट घेऊन जातीनिशी बसल्या होत्या. महाराजांच्या आणि दोन्ही राजकुमारांच्या जेवणाच्या थाळ्या सोन्याच्या होत्या. प्रत्येकासमोर गुडघाभर उंचीच्या दोन-दोन समया पूर्ण दीपकळ्यांनी उजळल्या होत्या.
बहिर्जीचा थाळा चांदीचा होता. समोर समई उजळली होती. विशेष म्हणजे थाळ्याभोवती सुंदर रंगीत रांगोळी घातलेली होती. समोर चंदनाची धूपबत्ती जळत होती. महाराजांच्या बरोबरीने केलेला थाटमाट पाहून बहिर्जी पानावर बसण्यास संकोच करू लागला. महाराज हसून म्हणाले–
लाजू नका बहिर्जी. अगदी मोकळ्या मनाने बसा. पोटभर जेवा. आज तुम्ही आम्हाला इतके आनंदी केले आहे की, स्वहस्ते तुमच्या मुखात मोत्याचा घास भरवला तरी कमी पडावा.
महाराणी सरकारसुद्धा हसून आग्रह करत म्हणाल्या–
हे मात्र अगदी खरे नाईक. कित्येक वर्षांनंतर आज स्वारींनी सांजोऱ्या करण्यास सांगितले. जेवणात काही विशेष करायला सांगण्याचा योग आज तुमच्यामुळे आला. स्वस्थ निवांत बसा. संकोचाचे काही कारण नाही.
महाराज स्वत: अगदी मोजके जेवले. मात्र आग्रह करकरून त्यांनी बहिर्जीला जेवू घातले. जेवताना अगदी अघळपघळ गप्पा सुरू होत्या. शंभूराजेसुद्धा त्याला अनेक प्रश्न विचारीत होते; त्यामुळे सुरुवातीला संकोचून जेवणारा बहिर्जी अगदी गळ्यापर्यंत जेवला. भोजन असे हसत बोलत आटोपले. महाराजांनी अतिथी म्हणून प्रथम बहिर्जीचे हात धुवायला लावले. नंतर स्वत: हात धुतले. त्यानंतर बसल्या पाटावरच कारभाऱ्याच्या हातून त्याला साग्रसंगीत पूर्ण अहेर करविला. महाराज भोजनगृहातून बाहेर पडण्यास वळणार तोच बहिर्जी झटकन पुढे झाला. त्याने महाराजांच्या पायावर डोके ठेवले.
अरे अरे नाईक हे काय? उठा उठा.
आरं माज्या सर्जा, सेवकाची येवडी बूज राखणारा, कदर करनारा येवडा थोर राजा परमेसरानं आमाला दिला हाय. न जानो किती जल्मांचं पुन्य फळाला आलं आनि या राजाची सेवा करन्याचं भाग्य गावलं. परतेक्ष राजाच्या पंगतीला, बसवून आग्रेव करकरून राजानं जेवाया घातलं, यापरीस मोटा सन्मान कोन्ता वं? सेवकाला समदं भरून पावलं. राजारं तुज्या याच कदरदानीपाई, जिव्हाळ्यापाई हजारो हजार जीव तुझ्यावर कुरवंडी व्हतात.
बहिर्जीचा तो उमाळा, तो आवेग आणि गदगदलेला स्वर पाहून दोन्ही राजकुमार आणि राणी सरकारांसह सारेच गहिवरले. दोन्ही खांद्यांना धरून महाराजांनी त्याला वर उठविले. पाठीवर थाप देत आश्वासक सुरात म्हणाले–
ठीक! ठीक!! राहू देत. सायंकाळी आम्ही जगदीश्वराच्या दर्शनास जाऊ, तेव्हा मंदिरात भेटा. त्या आधी मोरोपंतांना आणि अनाजीपंतांच्या कानी खबर जाऊ देत. मात्र तेवढीच. गडावर फार रेंगाळू नका. उद्याच गड सोडा. बायको-पोरांची खबरबात घेऊन चार-दोन दिवसांतच हिंदुस्थानात रवाना व्हा. आता पळ-पळ, क्षण-क्षण मोलाचा आहे. संधी निसटता कामा नये. या आता.
राणी सरकारांच्या समोर भुईवर माथा टेकवून बहिर्जीने नमस्कार केला आणि खांद्यावरच्या पंचाने डोळे पुसत भरल्या मनाने आणि नव्या हुरुपाने तो बाहेर पडला.
-
-
दिल्लीत पोहोचून कुलीखानाला जवळपास सहा महिने होत आले होते. खैबर ओलांडल्यानंतर बाकी फौज मोगली गतीने दिल्लीकडे कूच करीत असतानाच तो मोजके अंगरक्षक घेऊन पेशावरला पोहोचला. त्याचा जनानखाना बाकी जनानखान्यांसोबत दिल्लीकडे रवाना झाला होता. पेशावरला पोहोचून त्याने जहागिरीचा शिल्लक खजिना सोबत घेतला आणि झपाट्याने मराठी मजला मारीत जनानखाने मुख्य फौजेला मिळण्यापूर्वी तो फौजेत दाखल झाला. अटकेच्या किल्ल्यामध्ये जनानखान्यासह फौजेचा आठ दिवस मुक्काम पडला होता. त्यानंतर वेळ न गमावता फौज दिल्ली जवळ करू लागली. प्रत्येकालाच घरी परत जाण्याची ओढ लागली होती. शिकारपूरची कुलीखानाची हवेली त्याच्या स्वागतासाठी सजवून सुसज्ज ठेवली होती. त्याच्या जनानखान्याचा मुक्काम त्या हवेलीत होता, मात्र त्याचा स्वत:चा मुक्काम दिल्लीत होता. त्यासाठी वजीर जाफरखानाने स्वत: खटपट करून एक ऐसपैस हवेली मिळवून दिली होती. त्याची नागा बेगम नूरबानू त्याच्यासोबत दिल्लीत राहत होती. रोज सकाळ-संध्याकाळ दरबारात हजेरी लावण्याशिवाय काहीच काम नव्हते. वेळ घालविण्याचे कोणतेही मोगली शौक त्याने स्वत:ला लावून घेतले नव्हते. दिवस कंटाळवाणे जात होते. काहीच घडत नव्हते.
कुलीखानाच्या जिवाची नुसती तगमग सुरू होती. बादशहाच्या पकडीतून निसटण्याची संधी मिळण्याची कोणतीच चिन्हे नजरेत येत नव्हती. त्याला रोज कोणातरी बड्या अमीर उमरावाकडे दावत असे, नाहीतर कोणीतरी आपणहोऊन आमंत्रण ओढवून घेऊन त्याच्याकडे मेजवानी झोडण्यासाठी येत असे. महाबतखान, इफ्तखारखान वा मीर बक्षी असदखान किंवा दानिशमंदखान यांसारखा बादशहाचा जवळचा उमराव काही ना काही निमित्त शोधून दररोज त्याच्या मुक्कामावर एखादी खेप टाकत असे. हा सारा आपल्यावर लक्ष ठेवण्याचा एक प्रकार आहे एवढे न समजण्याइतका तो दूधखुळा निश्चितच नव्हता; त्यामुळे तो निश्चिंतपणे कुठलीही योजना ठरवू शकत नव्हता. आफताबखानाच्या मार्फतसुद्धा त्याला अद्याप कोणतेही संकेत मिळत नव्हते. दिल्ली-आग्र्यापासून थोडे दूर गेल्याशिवाय पळून जाण्याची हालचाल न करण्याच्या महाराजांच्या सख्त सूचना होत्या. परिणामी, एक विचित्र कोंडी होऊन बसली होती. या स्वस्थतेत एक मात्र फायदा होता, हस्ते-परहस्ते स्वराज्यातल्या बातम्या समजत होत्या. त्या बातम्या अर्थातच शिव्याशापांच्या सोबत असत हा भाग अलाहिदा.
महाराजांचा राज्याभिषेक झाला. महाराज स्वतंत्र राजे झाले. सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले हे त्याला दिल्लीत आल्यानंतरच समजले. बातमी ऐकून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण व्यक्त करण्याची चोरी होती. स्वत:च्या बेगमेसमोरसुद्धा काही बोलण्याची किंवा मनातल्या भावना व्यक्त करण्याची त्याला मोकळीक नव्हती. न जाणो कोणता खोजा वा बटकी बादशहाची हेर असेल. राज्याभिषेकाच्या शुभप्रसंगी सरनोबत म्हणून मुजरा करण्याचा बहुमान हुकल्याची खंत त्याच्या मनात येऊन गेल्याशिवाय राहिली नाही. नेसरीच्या खिंडीत अब्दुल करीम बहलोलखानावर चालून जाऊन त्याच्या जागी सरनोबत झालेले कुडतोजी गुजर खस्त झाल्याचे आणि त्यांच्या जागी आता महाराणी सरकार सोयराबाईंचे बंधू हंबीरराव मोहिते सरनोबत झाल्याचे वृत्तसुद्धा त्याला समजले. राज्याभिषेकानंतर लगेचच आईसाहेबांचा काळ झाल्याची बातमी आगीच्या लोळासारखी त्याच्या जखमी हृदयावर कोसळली. दु:खाला पारावार नव्हता. पण डोळ्यांतून पाणी काढण्याचीसुद्धा सोय नव्हती. तोंड दाबून बुक्क्यांचा मार याची शब्दश: प्रचिती तो घेत होता. त्याचे मन पित्या वासरासारखे स्वराज्याकडे ओढ घेत होते.
मध्येच कधीतरी त्याच्या मनात कुशंका येत असत. मन सैरभैर, उदास होऊन जाई. आपण स्वराज्य का सोडले, ते एक स्वत:ला माहीत आणि दुसरे महाराजांना. प्रधानमंडळ, सरदार, फौज आणि रयतेला एवढेच माहीत होते की, नेताजी पालकर महाराजांवर रुसला आणि मोगलांना मिळाला. वतनाच्या लोभापायी स्वार्थीपणे मुसलमान झाला. ते त्याचे स्वागत कसे करतील ही चिंता कधीतरी त्याचे काळीज कुरतडू लागे. स्वराज्य सोडले एवढा एक अपराध ते सारे महाराजांच्या शब्दाखातर नजरेआड करतील, पण धर्मभ्रष्टतेचा अपराध? त्याला कोण क्षमा करणार?
‘नाही, पण महाराजांनीच शब्द दिला, त्यांनी आज्ञा केली म्हणूनच देह राखण्यासाठी धर्म सोडला. अन्यथा धर्मासाठी आपण काय सोसले, कसे बलिदान केले असते हे ते पुरते जाणून आहेत. ते आपल्याला असे वाऱ्यावर सोडून द्यायचे नाहीत. जसा बजाजी नाईक निंबाळकराला शुद्ध करून घेतला, तसे ते मलासुद्धा शुद्ध करून घेतीलच. ते आलमगिरालासुद्धा पुरते ओळखून आहेत. येथे होत असलेल्या आपल्या कुचंबणेची त्यांना जाणीव असल्याशिवाय कशी राहील?’
‘पण बजाजी त्यांचा सख्खा आप्त. मेहुणाच. मी पाहुणा असलो तरी तसा दूरचाच.’
लगेच पहिले मन पुन्हा समजूत काढी–
‘छे! छे!! महाराजांकडे असा आपला-परका, सख्खा-सावत्र भेद नाही. महाराज आपल्याला दूर लोटायचे नाहीत. तसे असते तर त्यांनी आफताबखानास आपल्या खिदमतीत आणि नर्दुल्लाखानास चक्क पन्नास हशमांसह अंगरक्षक म्हणून आपल्याकडे इतक्या दूर अफगाणिस्तानासारख्या परमुलखात, हजार हिकमती लढवून आणि अनंत धोके पत्करून धाडले नसते. आग्र्यात असताना किंवा दिल्लीत असताना आपल्यासाठी पन्नास-साठ मावळे नजरबाज कुर्बान केले नसते. घियासुद्दीन मुद्दाम लांबचा वळसा घालून खुश्कीच्या रस्त्याने हजला गेला, तो केवळ आपली गाठ घेण्यासाठी महाराजांनी धाडले म्हणूनच ना? नाही, नाही महाराजांचे माझ्यावर पूर्णपणे लक्ष आहे.’
क्वचित कधी त्याच्या मनात फारच निराशा दाटून येई– ‘कपटी, धूर्त आणि अष्टौप्रहर सावध आलमगिराने सारे राजकारण नासवले. धर्म सोडण्यास भाग पाडले. जनसंपर्क तोडला. दूर, पार तिकडे परदेशात अफगाणिस्तानात दहा वर्षे कुजवत ठेवले. स्वराज्यच काय पण हिंदुस्थानचीसुद्धा हवा जाणवू दिली नाही. हा एवढा प्रदीर्घ काळ महाराज आणि स्वराज्य काही स्वस्थ बसून आपली वाट पाहत राहिले नाही. बहादूरखान आणि दिलेरखानासारख्या मातब्बर मुरब्बी आणि घातक सेनानायकांना यशस्वी टक्कर देत स्वराज्य वाढतच राहिले आहे. दूर गेलेल्या या हतभागी सरनोबताची उणीव कोणालाच जाणवली नसणार. एक पडताच दुसरा तितकाच, किंबहुना कांकणभर सरसच, समर्थ गडी उभा राहतो. हेच तर स्वराज्याचे बळ आहे. हीच तर महाराजांची शिकवण आहे. मग आता महाराजांना आपली गरज उरली आहे का? काय स्थान असेल माझे स्वराज्यात, परत गेल्यानंतर? फौजेत, रयतेत मी कोण असेन?’
मग तोच स्वत:ला समजावीत असे–
‘स्वराज्यात स्थान कोणते? स्वराज्याचा इमानदार, प्रामाणिक, निष्ठावान पाईक असण्याचे तुझे स्थान कोण हिरावून घेणार? प्रधानमंडळाला विचारतो कोण? महाराजांच्या हृदयात तुझे जे स्थान आहे, त्याला कोण धक्का लावणार? महाराजांचे राजकारण साधण्यासाठी जेव्हा स्वराज्य सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच हे सगळे धोके स्पष्ट दिसत नव्हते काय? अपमान, अपकीर्ती, अवहेलना आणि तिरस्कार होणार हे तेव्हाच कळले नव्हते काय? तथाकथित गद्दारीच्या पापाचा भार त्याच वेळी महाराजांनी स्वत:च्या माथी घेतला नव्हता काय? मग जर जाणूनबुजून, समजूनउमजून या आगीत उडी घातली आहे, जर महाराजांच्या आज्ञेने आणि त्यांच्या शब्दावर विसंबून हे सतीचे वाण हाती घेतले आहे तर मग आता शंका का? ते काही नाही, आता एकच ध्यान, एकच ध्यास, एकच ध्येय; जेवढे लवकर होईल तेवढे लवकर महाराजांचे चरण जवळ करायचे. आता यात कणभर बदल नाही. पुढे महाराज ठरवतील तसे. त्यांच्या चरणी निष्ठा वाहिल्या आहेत, त्यांच्या हाती जीव सोपवला आहे; आता त्यांच्या पायावेगळा विचार कशाला?’
स्वत:च स्वत:ची समजूत काढली की, कुलीखानाला नवा हुरूप येत असे. संधी मिळताच तो आफताबखानाबरोबर नव्या नव्या योजना तयार करण्याचा प्रयत्न करीत राही.
-
दख्खनमध्ये मराठ्यांनी नुसता उच्छाद मांडला होता. बहादूरखान आणि दिलेरखानासारख्या मातब्बर सरदारांनासुद्धा ते आटोपत नव्हते. दोन्ही खान आणि शहजादा मुअज्जम यांच्या आपसातल्या बेबनावाचा ते नेमका फायदा उठवीत होते; त्यामुळे त्यांना पायबंद घालण्याशिवाय बादशहासमोर दुसरा विषय नव्हता. दिल्लीत दख्खनच्या नव्या मोहिमेचे वारे सुरू होते. मराठ्यांवर मोहीम म्हणजे हमखास अपयश असे समीकरण प्रत्येक दरबाऱ्यांच्या मनात अगदी पक्के ठसले होते. नव्या मोहिमेत आपली वर्णी लागू नये यासाठी प्रत्येकजण आपापल्या अल्ला आणि देवाकडे प्रार्थना करीत होता.
गेल्या दहा वर्षांत कुलीखानाला बादशहाच्या स्वभावाची मेख नेमकी कळली होती. शिवाय अफगाणिस्तानात नव्या पद्धतीने मोहीम चालविण्यासाठी इजाजत मागितली होती त्याचा ताजा अनुभव गाठीला होताच की. म्हणूनच कुलीखान हे पक्के जाणून होता की, त्याला दख्खनमध्ये जाण्यात तीळमात्र जरी रस आहे असा बादशहाला नुसता संशय येण्याची खोटी की त्याची रवानगी बंगाल-आसामच्या किंवा पार हिमालय ओलांडून तिबेटच्या स्वारीवर झाल्याशिवाय राहणार नाही; त्यामुळे त्याने मोठी नामी, थेट मराठी गनिमी काव्याची युक्ती वापरण्यास सुरुवात केली. दख्खनचा आता आपल्याला कसा तिरस्कार वाटतो, त्या अडाणी अश्रद्ध लोकांमध्ये आपण इतके दिवस कसे काढले हे नुसते आठवले तरी अंगावर कसा काटा येतो, दख्खनमध्ये गेल्यानंतर आपला सूड घेण्याचा शिवाजी हर प्रकारे कसा प्रयत्न करील वगैरे वगैरे तो भेटेल त्या दरबारी मानकऱ्याशी बोलत राही. त्याउपरही कडी म्हणजे बादशहा सलामतांना आपल्याला दख्खनपासून दूर ठेवण्याची बुद्धी व्हावी अशी आपण अल्लाची कशी सतत प्रार्थना करतो याचे मोठे रसभरित वर्णन करीत राही.
या खटाटोपाचा अपेक्षित तो परिणाम झाला. दख्खन मोहिमेचा विचार करण्यासाठी बादशहाच्या खासगी महालात रात्री भरणाऱ्या मसलतीचे त्याला बोलावणे आले. नेहमीप्रमाणे साहेबी लिबासात साध्या बैठकीवर बादशहा टोपी विणत बसलेला आणि जाफरखानासह सारे पुरेसे अंतर राखून माना खाली घालून उभे.
वजीरेआझम जाफरखान, दख्खन का हाल बयान हो.
वजीर जाफरखानाने मराठ्यांना भरपूर शिव्याशाप देत मोगली फौजांची आणि अंमलदारांची दख्खनमध्ये उडत असलेली दाणादाण आणि मराठ्यांनी मांडलेला उच्छाद याचे रसभरित वर्णन केले. हे ऐकत असताना कुलीखानाला मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी त्या आनंदाची अस्फुटशी लहरसुद्धा चर्येवर उमटणार नाही याची तो कटाक्षाने खबरदारी घेत होता. हिरवी नजर त्याला नेमके टिपत होती या वास्तवाची त्याला पूर्ण जाणीव होती. त्याने मान जास्तीतजास्त खाली झुकविली होती; बादशहाला त्याच्या चेहऱ्याचा कमीतकमी भाग दिसावा असा त्याचा प्रयत्न होता. वजिराच्या तोंडून एखाद्या दारुण पराभवाचे किंवा बहादूरखानाच्या एखाद्या नव्या फजितीचे वृत्त सांगितले जाऊ लागले की, तो चेहरा अधिकच सुतकी करून विषादाने मान हलवी. वजीर बोलायचा थांबला. दालनात नेहमीप्रमाणे शांतता पसरली. बादशहाने विचारल्यास काय जवाब द्यायचा या विवंचनेत जो तो बुडाला. अपेक्षेप्रमाणे हिरवी नजर कुलीखानावर स्थिरावली.
तर, महम्मद कुलीखान, दख्खनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत तुझे काय म्हणणे आहे?
जमिनीपर्यंत लवून कुर्निसात करीत कुलीखान एक पाऊल पुढे सरकला.
अन्नदाता, जेव्हापासून आपण या गुलामाला इस्लामचा खरा मार्ग दाखवला आहे, तिथपासून मला त्या रासवट अडाणी मराठ्यांचा आणि खोट्या धर्माच्या नावाखाली त्यांनी चालवलेल्या व्यर्थ खटाटोपाचा अत्यंत तिरस्कार वाटू लागला आहे. त्या काळातले माझे दिवस जेव्हा मला आठवतात, तेव्हा माझी मलाच शरम वाटू लागते. हुजूर जिल्हेसुभानी, शिवाजीराजा किती कपटी आणि दीर्घ द्वेष्टा आहे हे माझ्यासारख्या नाचीज गुलामाने आलाहजरतांना काय सांगावे? हुजुरे आला ते पूर्णपणे जाणतात; अगदी स्वानुभवाने जाणतात. मी नर्मदेच्या आसपास पोहोचल्याचे जरी त्याला समजले तरी तो माझा खून पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या गरीब गुलामाला दख्खनपासून चार पावले दूरच ठेव अशी मी रोज अल्लाची करुणा भाकतो.
हिरव्या नजरेत क्षणभर संशयाची झाक तरळून गेली. दातांच्या फटीतून तीक्ष्ण स्वरात शब्द उमटले–
लाहौलवलाकूव्वत. हे कोण, महम्मद कुलीखान बोलला? सिंहाच्या छातीचा, चित्त्याच्या चालीचा, वाघाच्या शौर्याचा, गरुडाच्या नजरेचा आणि हत्तीच्या बुद्धीचा कुलीखान हे बोलला? माबदौलत आपल्या कानांवर विश्वास ठेवू शकत नाहीत. कुलीखान, आज तू कुलीखान आहेस ते एका खास मकसदसाठी. तुला संपवायचे असते तर दिलेरखानाच्या गोटातच तुझी विल्हेवाट लागली असती. सर्वशक्तिमान अल्लाने तुझी निवड सरजमीने हिंद दार-उल-इस्लाममध्ये तबदील करण्यासाठी असून, तुझ्याकडून इस्लामची सेवा करून घेण्याची आज्ञा माबदौलतांना दिली आहे. बंगालात काळापहाडने जे काम केले, तेच काम दख्खनमध्ये अल्लाने तुझ्यावर सोपवले आहे, अशी माबदौलतांची संपूर्ण खात्री पटलेली आहे. तुझ्या मनामध्ये इस्लाम पूर्णपणे रुजवण्यासाठीच तुला माबदौलतांनी अफगाणवर पाठवले होते. त्या नामुराद कमअस्सल काफिर कोहस्तानी चूह्याच्या भीतीपोटी नव्हे. त्याला नेस्तनाबूद करण्याची ताकद अलम मुघलिया फौजेत कोणात असेल तर ती केवळ एकट्या महम्मद कुलीखानामध्येच आहे. माबदौलतांच्या जहनमध्ये असे आहे की, त्या नामुराद शिवाचा आणि आदिलखानाचा जो मुलूख कुलीखान आपल्या समशेरीच्या जोरावर जिंकून घेईल त्याचा अलग सुभा करून त्याची सुभेदारी कुलीखानाला दिली जावी.
करामात. करामात.
कुलीखान तुला मरगट्ट्यांबद्दल जी चीड आणि नफरत वाटते, त्याची भडास आपल्या समशेरीने पूर्ण काढून घे. एक तर त्यांना अल्लाच्या झेंड्याखाली आण नाहीतर दोजखच्या आगीत रवाना कर. रही बात तुझ्या मनातल्या अंदेशाची, तर मुघलिया फौजेच्या अजगरी विळख्यात तुझा डेरा थेट मधोमध असेल. नवाब शाहिस्ताखान जसे गाफील राहिले तसा तू गाफील राहणार नाहीस हे माबदौलत पूर्णपणे जाणतात. त्या काफिर दखनी चूह्याची प्रत्येक चाल आणि त्याचा प्रत्येक माणूस तू नीट ओळखतोस. दगा होईलच कसा?
पुढे होऊन कुलीखान झटकन गुडघ्यांवर बसला आणि बादशहाच्या बैठकीच्या चादरीचे टोक हातात घेऊन त्याचे चुंबन घेऊन पुन्हा जागेवर गेला.
रहम, आलमपन्हा रहम। कसूर माफ असावी जिल्हेसुभानी. तिरस्काराच्या ऊर्मीत आणि भावनेच्या लाटेत वाहत जाऊन गुलाम भलतेच बोलून गेला. हुजुरेपाकच्या दिले मुबारकला ठेस पोहोचवण्याचा गुलामाचा कोणताही इरादा नव्हता. गुलाम रहमतची भीक मागतो. या मातीच्या शरीरावर आणि प्राणांवर अलीजा शहनशाहे आलम आलमगीर बादशहा सलामत यांचीच एकमेव सत्ता आहे. कुराण आणि हदीसच्या खालोखाल आलमपन्हा हुजुरांचा शब्द गुलामासाठी सुन्नत आहे. आलमपन्हांची प्रत्येक कृती गुलामासाठी नवी हदीस आहे. जिल्हेसुभानींची इच्छा म्हणजेच फर्मान, नजरेची फडफड हाच हुकूम. आलाहजरतांसाठी आणि इस्लामसाठी या शरीरातला प्रत्येक श्वास आणि रक्ताचा प्रत्येक कतरा कुर्बान आहे याची आलमपन्हांनी खात्री बाळगावी.
शाबास! ये हुई कुलीखान जैसी बात. जसा हजरत अबू बकरसाठी खालीद तसा शहेनशाहे आलमगिरांसाठी महम्मद कुलीखान अशी इस्लामची तारीख लिहिली जाईल यात आता माबदौलतांना संशय वाटत नाही.
इन्शाल्लाह! इन्शाल्लाह!!
सर्व उपस्थित दरबारींच्या मुखातून सुटकेचा नि:श्वास आणि दुवा एकदमच बाहेर पडला. दख्खनमध्ये जायला मिळणार याचा आनंद कुलीखानाच्या चेहऱ्यावर बादशाही कृपालाभाच्या कृतज्ञतेचा लोचट बुरखा घेऊन अवतरला.
दाऊदखान कुरेशी…
हुकूम आलमपन्हा…
दख्खनची ही नवीन मोहीम माबदौलत तुझ्यावर सोपवीत आहेत. महम्मद कुलीखान तुझा नायब असेल. मोहिमेत कुलमुखत्यारी तुझीच असेल पण फौजेच्या हालचाली, हल्ल्याच्या योजना आणि डावपेच तसेच लढण्याची पद्धत ठरवण्याचे सारे अधिकार कुलीखानाला असतील. त्याच्या मागणीप्रमाणे आणि विचाराने तुझे हुकूम जारी होतील. तातडीची गरज असेल तर तुझ्या हुकमाशिवाय फौज हलवण्याचा अधिकार कुलीखानाला बहाल असेल. तू त्याला जाब विचारणार नाहीस. मात्र तुला वाटल्यास, तुझी काही तक्रार असल्यास तू थेट माबदौलतांसमोर पेश करू शकतोस. एक गोष्ट नीट ध्यानात ठेव, या मोहिमेत माबदौलतांच्या साऱ्या आशा-आकांक्षा गुंतल्या आहेत. कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी बेहत्तर, पण फते हासिल झालीच पाहिजे. ही मोहीम फक्त एकट्या नामुराद शिवाला बुडवण्यासाठी नाही तर, ज्याच्या नालायक आणि गलथान कारभारामुळे शिवाला बगावत करण्याची संधी मिळाली आणि मुघलिया तख्ताला आव्हान देण्याइतका त्याचा हौसला वाढला, त्या नामुराद आदिलखानालासुद्धा सबक मिळाली पाहिजे. त्याची दौलतसुद्धा साफ बुडवून टाक. मुघली झेंडे दक्षिण समुद्रात भिजले पाहिजेत. कोणत्याही सबबीवर सुलूक किंवा तह मंजूर केला जाणार नाही. शर्त केवळ एकच. मुलूख खालसा आणि संपूर्ण शरणागती.
जो हुक्म आलमपन्हा. महम्मद कुलीखानासारखा काबील आणि गनिमाचा मुलूख स्वत:च्या तळहाताप्रमाणे माहीत असलेला नायब, आलाहजरतांची मेहेरनजर आणि कुमक, त्याचप्रमाणे परमदयाळू अल्लाची पाठराखण या बंद्याला मिळाली तर कुठलेही काम गुलामासाठी सहज मुमकिन आहे.
अलहमदुलइलल्लाह.
जाफरखान…
हुकूम…
उद्या दरबारात दख्खनच्या नव्या मोहिमेचे ऐलान कर. सरलष्कर म्हणून दाऊदखान कुरेशी आणि त्याचा नायब म्हणून महम्मद कुलीखान नामजद केल्याचे जाहीर कर. तशी फर्माने लगोलग जारी कर. मोहिमेत कोणकोण शरीक होणार याचा फैसला लवकरच केला जाईल. पण इफ्तखारखानाला मोहिमेचा खान इ सामान नामजद करण्यात आले आहे. त्याला हर एक चीज मुहैया झाली पाहिजे. तोफखाना, बारूदखाना आणि खजाना यांचा इंतजाम ताबडतोब सुरू झाला पाहिजे. एक गोष्ट नीट समजून असा, छावणीत कलालांची दुकाने आणि तवायफांचा राबता असल्याचे कानावर आले तर माबदौलत खान-इ-सामानला त्यासाठी कसूरवार ठरवून कारवाई करतील. त्याव्यतिरिक्त आरामके हर सामान की तजवीज हो. विजयी फौजेला आराम करण्याचा आणि लूट मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे.
जो हुकूम आलमपन्हा. हुकमाची शब्दश: तामील होईल.
याद रहे, काफिर बुढ्ढ्या जयसिंहापेक्षा ही मोहीम जास्त मोठी आणि ताकदवर झाली पाहिजे. कुठल्याही वस्तूची कमतरता पडता कामा नये. फौजा कोठेही असोत, रसद बे रोकटोक शेवटच्या शिपायापर्यंत चोख पोहोचली पाहिजे. मोहीम रंगात आली की, कुलीखानाची कर्तब आणि नामुराद शिवाची बरबादी स्वत:च्या डोळ्यांनी पाहण्यासाठी माबदौलत जातीनिशी दख्खनमध्ये उतरतील. त्या दृष्टीने दिल्लीमध्ये तजवीज सुरू करा.
बादशहाच्या महालातून मंडळी बाहेर पडली तेव्हा देवडीवर मध्यरात्रीचे टोल पडत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी तोंड धुण्याचे तस्त घेऊन आफताबखान दालनात आला. तोंड धुण्यापूर्वीच कुलीखानाने आदल्या रात्री बादशहाच्या मसलतीत घडलेले सारे त्याला सांगितले. त्याच्या शब्दांतून आनंद आणि उत्साह ओसंडत होता.
आफताब, ही खबर विनाविलंब महाराजांकडे पोहोचती झाली पाहिजे. महाराजांना कळव. म्हणावे, शाही फौजा तापी उतरून बागलाणात शिरतील तेव्हा संधी साधून, काय वाट्टेल ते करून आम्ही स्वराज्य जवळ करू. मोहिमेचा तपशील पक्का झाला की, योजना पूर्ण तयार करून महाराजांचा कौल घेण्यासाठी पेश करू. ही संधी जणू शेवटचीच. तीही साधणे शक्य झाले नाही तर हा सेवक स्वर्गाच्या दाराशी महाराजांची वाट पाहत तिष्ठत बसलेला असेल.
सरकार, चिंता करू नका. सारे नीट जमून येईल आणि आपण लवकरच महाराजांच्या पायाशी असू. आजच नव्हे आत्ता घटकाभरात खबर घेऊन माणूस रवाना होईल. तो दोन-तीन हप्त्यांत थेट स्वराज्यात पोहोचेल.
इतक्या तातडीने? कसे शक्य होईल?
सरकार, घियासुद्दीनचे आजारी चेले अजून आपल्याच आश्रयाला आहेत. ती बहिर्जी नाईकांची खास माणसे आहेत. अशा प्रकारचे काम आज ना उद्या उद्भवणार ही अटकळ असल्यानेच त्या दोघांना आपल्यासोबत ठेवले होते. घटकाभरातच त्यातला एक स्वराज्याकडे रवाना होईल. चिंतेचे कारण नाही.
एकटाच? इतका दूरचा पल्ला आणि तो एकटा…?
सरकार, एकटा माणूस न रेंगाळता भरभरा जातो. आम्हा लोकांना अशा प्रवासाची सवय असते. जोडीला कोणी नसल्यामुळे गप्पा छाटण्याचा प्रश्न नसतो आणि त्यामुळे खबर फुटण्याचाही धोका उरत नाही. त्या माणसाकडे ना कुठली चिठ्ठी ना चिठोरा. सारा तोंडी व्यवहार. पंधरा-वीस दिवसांत खबर महाराजांच्या पायाशी जाते बघा.
पण खबर पोहोचल्याची खातरजमा?
वाटभर आपले अड्डे आहेत. रोज रात्रीचा त्याचा मुक्काम त्या अड्ड्यावरच असणार. तो तिथून पुढे सरकल्याची खबर लगोलग आदल्या मुक्कामाला पोहोचवली जाते. दुसऱ्या दिवशी त्या अड्ड्यावर खबर पोहोचली नाही तर लगेच शोधाशोध सुरू होते आणि मूळ ठिकाणी तसा संदेश येतो.
हरएक खबर अशीच जाते?
नाही सरकार. थेट महाराजांकडे ‘सासवडचे अंजीर’ पोहोचवायचे असतील आणि अगदी गुप्त खबर घेऊन एकटा हशम जात असेल तरच ही व्यवस्था असते. इतर बाबतींत वेगळी तजवीज असते.
वा छान! लगेच माणूस रवाना कर.
*कुलीखानाच्या आन्हिकांचे दुसऱ्या विश्वासू खिदमतगारावर सोपवून आफताबखान निघून गेला. घियासुद्दीनच्या चेल्याला गाठून त्याने सारी मसलत नीट पढवली. अर्ध्या घटकेतच एक फकीर अलख गाजवीत आणि चिमट्याचा खुळखुळाट करीत झपाट्याने दख्खनच्या वाटेने निघाला. आफताबखानाने दिल्लीतल्या बहिर्जीच्या डेऱ्यात असा माणूस रवाना झाल्याची खबर दिली आणि तो पुढच्या तजविजीला लागला.*
*_क्रमश:_*
*________🌱🌳🍂🍁______*