कोणतही शिवकाव्य येथे शोधा

उदयगिरी / उदगीर किल्ला


किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
डोंगररांग: बालाघाट रांग
जिल्हा: लातूर
श्रेणी: सोपी
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन इतिहास आहे. बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेल्या उदगीरचे प्राचीन नाव ‘उदयगिरी’ होते. काही ठिकाणी याचा उल्लेख ‘उदकगिरी’ या नावानेही येतो. या डोंगररांगेत लेंडी नदीचा उगम होत असल्यामुळे या परीसराला हे नाव मिळाले असावे. अगदी पुराण काळापासून या नगरीचे उल्लेख सापडतात त्यामुळे या शहराला ऎतिहासिक व आध्यात्मिक मह्त्व आहे. सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे.उदगीर हा भूईकोट किल्ला आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. त्याचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत.
इतिहास: उदगिर किल्ल्याचा उल्लेख ११ शतकातील शिलालेखांमध्ये येत असला तरीही या नगरीचा उल्लेख पूराण कथांमध्येही आढळतो. करबसवेश्वर ग्रंथ या पोथीतील कथे नुसार उदलिंग ॠषींनी शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन ॠषींनी आशिर्वाद दिला,”मी या ठिकाणी लिंग रुपाने येथे प्रगट होईन.” त्यानुसार काही काळाने जमिनीतून एक लिंग हळूहळू वर आले. पुढील काळात याठिकाणी वस्ती वाढून नगर वसले त्याला उदलिंग ॠषींच्या नावावरून उदगीर हे नाव पडले. आजही किल्ल्यात उदगिर महाराजांचा मठ व शिवलिंग आहे.प्रतिष्ठाण (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. राज्यातील सर्व रस्ते राजधानीकडे जातात. त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या उदगीर गावाची बाजारपेठ भरभराटीस आली. पुढील काळात या भागावर वर्चस्व असणार्या चालुक्यांची राजधानी बदामी येथे होती, त्यांच्या काळात हा किल्ला बांधला असावा. त्यानंतर राष्टकुट, चालुक्य (कल्याणी), देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती. यादवांच्या राजा सिंघनदेव यांच्या इ.स. ११७८ च्या शिलालेखात उदगीर नगरीचा उल्लेख आहे. सहावा भिल्लम यादव हा उदगीरचा शासक असल्याचा उल्लेख आढळतो.यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात उदगीर हे व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले. बहामनी घराण्याचा ९ वा राजा महमदशहा बहामनी याने २२ सप्टेंबर १४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलविली. बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले. महमुदशहा बहामनीने इ.स.१४९२ मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागिर म्हणून दिले. इ.स.१५२६ मध्ये बहमनी राज्याचे विघटन होऊन ५ शाह्या उदयास आल्या. त्यापैकी औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर हि राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परीघात आदिलशाही विरुध्द अनेक लढाया झाल्या. मोगल बादशहा शहाजहानने २८ सप्टेंबर १६३६ मध्ये उदगीर किल्ला जिंकून घेतला.बरीदशाहीच्या अस्तानंतर या किल्ल्यावर आदिलशाही, मुघल, मराठे व शेवटी निजामाची सत्ता होती. या तीन शतकांच्या काळात उदगीर येथे एकमेव महत्वाची लढाई इ.स. ३ फेब्रुवारी १७६० रोजी मराठे व निजाम यांच्यात झाली. या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी केले. या लढाईत त्यांनी केलेल्या निजामाच्या सपशेल पराभव केला. त्यामूळे पानिपतच्या युध्दाच्या नेतृत्व त्यांच्यावर सोपवण्यात आले. मराठ्यांच्या पानिपतच्या युध्दात झालेल्या परभवा नंतर निजामाने हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता.पहाण्याची ठिकाणेउदगीर गावातून गाडीने आपण थेट किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो. उदगीर गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामूळे आपण त्याला भूईकोट म्हणत असलो तरी, किल्ल्याच्या इतर तीन बाजूंनी खोल दरी आहे. त्यामूळे या तीन बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण आहे. तर उरलेल्या चौथ्या बाजूने म्हणजेच, गावाच्या बाजूने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४० फूट खोल व २० फूट रूंद खंदक खोदलेला आहे. हा खंदक दोनही बाजूनी बांधून काढलेला आहे. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशव्दारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे. हा पूल सूर्यास्तानंतर व युध्द प्रसंगी उचलून (काढून) घेतला जात असे. आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो.चौबारा चौकातून किल्ल्याकडे जातांना नविन बांधलेले भव्य दक्षिणाभिमुख प्रवेशव्दार दिसते. आत शिरल्यावर उजव्या बाजूस मूळ किल्ल्याच्या परकोटाचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार दिसते, परकोटाची तटबंदी आज अस्तित्वात नाही. परकोटात काही वास्तूंचे अवशेष आहेत. याशिवाय एक भव्य बांधीव तलाव आहे. या तलावातून किल्ल्याला पाणी पुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या काळी मातीचे पाईप व पाण्याची समपातळी राखण्यासाठी मधेमधे दगडात बांधलेले मनोरे बांधलेले होते त्यापैकी एक मनोरा (उच्छवास) येथे पहाता येतो.उदगीर किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. बाहेरील तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात १२ बुरुज आहेत. बाहेरील तटबंदीवर २ फूट रुंद व ३ फूट उंच चर्या आहेत. आतील तटबंदी १०० फूट उंच असून त्यात ७ बुरुज आहेत. चर्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. खंदक ओलांडून आपण पूर्वाभिमूख मुख्य प्रवेशव्दारापाशी येतो. प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूंना दोन भव्य बुरूज आहेत. यातील उजव्या बाजूच्या शेवटच्या बुरुजावर शरभ शिल्प व हत्तींची झुंज अशी दोन शिल्प आहेत. तसेच एक हत्तीचे शिल्प त्यामागील (आतील तटबंदीतील) अंधारी बुरुजावरील तटबंदीत आहे. किल्ल्याच्या डाव्या कोपर्यात भव्य अष्ट्कोनी चांदणी बुरुज आहे. या बुरुजावरही शरभ शिल्प व हत्तींची झुंज अशी दोन शिल्प आहेत. किल्ल्याला एकामागोमाग एक असे ४ दरवाजे आहेत. त्यातील पहील्या दरवाजाला लोहबंदी दरवाजा म्हणतात. या दरवाजाला सध्या लोखंडी दरवाजा बसवलेला आहे. हा दरवाजा १४ फूट उंच व ७.५ फूट रूंद आहे. या दरवाजाला ६ कमानी आहेत. या दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे एक चिंचोळा मार्ग जातो. दोन तटबंदीतून जाणारा हा मार्ग उदगीर महाराजांच्या मठाकडे जातो. या मार्गाने थोडे पुढे जाऊन परकोटाच्या तटबंदीत असलेल्या बुरुजावर चढून जावे. या बुरुजावर ११ इंच * ११ इंच आकाराचा फारसी शिलालेख कोरलेला आहे. पण तो अस्पष्ट असल्याने वाचता येत नाही. बुरुजवरून खाली उतरून उदगीर महाराजांच्या मठाकडे चालत जातांना डाव्या बाजूस भव्य चौकोनी बुरुज दिसतो, तो “अंधारी बुरुज किंवा तेलीण बुरुज” या नावाने ओळखला जातो. तेलीण बुरुज असे नाव पडण्यामागे एक दंतकथा आहे. हा बुरुज बांधतांना त्याचे बांधकाम सारखे कोसळत होते. त्यावेळी एका तेलीणीला येथे जिवंत पुरल्या नंतर हा बुरुज उभा राहीला. बुरुजाच्या एका टोकाला शेंदूर फासलेला आहे, तेलीण म्हणून स्थानिक लोक त्याला फूले वहातात. अशा प्रकारच्या दंतकथा पुरंदर, नळदुर्ग इत्यादी किल्ल्यावरही वेगवेगळ्या नावाने ऎकायला मिळतात. या बुरुजवर पाच हत्ती पकडलेल्या शरभाचे शिल्प आहे. अंधारी बुरुजाच्या पुढे जाऊन पायर्या उतरल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस एक कमान आहे. यातून पायर्यांचा बांधीव भूयारी मार्ग काटकोनात वळून खंदकावरील तटबंदीत असलेल्या चोर दरवाजा पर्यंत जातो. सध्या चोर दरवाजा समोर खंदकावर पक्का पूल बनवलेला आहे. चोर दरवाजाच्या पुढे डाव्या हाताला एक विहिर आहे. उदगीर महाराजांचा मठ जमिनीत कातळ खोदून बनविलेला आहे. मठासमोर पाण्याचे चौकोनी टाक आहे. हा मठ पाहून आल्या मार्गाने पुन्हा दुसर्या प्रवेशव्दारापाशी याव.किल्ल्याचा दुसरा दरवाजा पूर्वाभिमूख असून १४ फूट उंच व ७.५ फूट रूंद आहे. या दरवाजाची खासियत म्हणजे या दरवाजाच्या बाजूला असलेली दगडी “परवाना खिडकी” होय. दरवाजच्या अगोदर उजव्या बाजूस जाळीदार नक्षी असलेली दगडी खिडकी आहे, तर त्याच्या उजव्या बाजूला दगडातच कोरलेली हात जाईल एवढीच अर्धगोलाकार खाच (झरोका) आहे. पूर्वीच्या काळी या खिडकीतून येणार्या अभ्यंगताची चौकशी करून त्याने दाखवलेल्या कागदपत्रांची छाननी करून मगच दरवाजा उघडला जात असे. या दरवाजातून आत गेल्यावर दोनही बाजूला देवड्या व पिण्याच्या पाण्याचा छॊटा हौद आहे. तिसरे प्रवेशव्दारही पूर्वाभिमूख आहे, तर चौथे प्रवेशव्दार दक्षिणाभिमूख आहे. या दरवाजाच्या आतील बाजूस डाव्या हाताच्या भिंतीत छोटा दिंडी दरवाजा व आत जाण्यासाठी वळण रस्ता (भूयार) आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद असतांना दिंडी दरवाजाचा उपयोग केला जात असे. या दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला पूरातत्व खात्याचे कार्यालय असून त्याच्यावरील मजल्यावर अप्रतिम सज्जा आहे. तेथे जाण्यासाठी मार्ग मात्र डाव्या बाजूने आहे. डाव्या बाजूला काही पायर्या चढून गेल्यावर आपण ५ कमानी असलेल्या तहसील कार्यालय नावाच्या इमारतीत येतो. याच्या मधल्या कमानी समोरील भिंतीवर हिसाम उल्ला खान याने लिहिलेला काव्यातत्मक फारसी शिलालेख पहायला मिळतो. तहसील कार्यालयातून वर चढून पहिल्या मजल्यावर गेल्यावर समोरील दालनात दोन पट्ट्यांवर कोरलेला जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारा फारसी शिलालेख कोरलेला आहे . त्याचा भावार्थ असा आहे, “तू जरी जिंकल्यास हजारो लढाया, घडवलास इतिहास, पण मरण हे अटळ आहे”.या दालनातून बाहेर निघून उजव्या बाजूला वळल्यावर आपला दुसर्या दालनात प्रवेश होतो. या दानलाच्या मधोमध डोळ्याच्या आकाराचा कारंजा आहे तर भिंतीत अप्रतिम सज्जा आहे. या दालनतून बाजूच्या गच्चीवर जाण्यासाठी कमानदार दरवाजा आहे. या दरवाजाच्या डाव्या बाजूला ७ ओळींचा फारसी शिलालेख कोरलेला आहे . त्याचा भावार्थ असा आहे. ” सरवार उल्क मलिक शहाजहानच्या काळात हिजरी १०४१ रोजी फतह बुरुज जिंकला (जून १६३६), त्यावेळी मुगल खान झैनखान हा राजाचा सेवक होता. या शिलालेखाच्या चारही बाजूच्या पट्टीवर नक्षी काढलेली दिसते, पण ती नक्षी नसून कुराणातील अल्लाची नाव कोरलेली आहेत. या प्रवेशव्दारवर एक अरबी शिलालेख आहे पण पूसट झाल्याने तो वाचता येत नाही. दरवाजातून बाहेर गच्चीवर गेल्यावर उजव्या बाजूला भिंतीत अनेक चौकोनी कोनाडे दिसतात, ते कबूतरे ठेवण्यासाठी केलेले असून त्याला कबूतरखाना असे म्हणतात. त्याच्यापुढे ५ कमानी व पंधरा खांबांवर तोललेला रंग महाल आहे. कबूतरखान्यातून खाली उतरण्यासाठी जीना आहे. या जीन्याने खाली उतरल्यावर आपण ३ कमानी व ६ खांब असलेल्या महालात पोहोचतो. याच्या मधल्या कमनीवर बाहेरच्या बाजूने एक फारसी शिलालेख लिहिलेला आहे, त्यात लिहिले आहे, “हा उदगीरचा दिवाने आम व खास आहे”. या महाला समोर एक कारंजा आहे. महालासमोरील मोकळ्या भागात अष्टकोनी विहिर आहे. त्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. “दिवाणे आम” च्या समोर ५ कमानी असलेली इमारत आहे.दिवाने आम मधून बाहेर पडण्यासाठी डाव्या बाजूस प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर एक इमारत आहे. तिच्यावर १० इंच रूंद व २ फूट लांब पट्टीवर फारसी शिलालेख कोरलेला आहे. त्यात लिहिले आहे, “सन १०९२ हिजरीला साक्ता मीरखान हुसेन यांनी मोहरमच्या महीन्यात ही इमारत बांधली”. या इमारतीच्या बाजूला दोन हौद आहेत. त्यातील एक हौद पाकळ्यांच्या आकाराचा बनवलेला आहे. या इमारतीच्या समोर मशिद व हौद आहे. (चौथ्या प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश करून थोडे अंतर चालून गेल्यावर डाव्या बाजूस मशिद आहे.)“दिवाने आम”च्या मागच्या बाजूस ४ छोटे मिनार असलेला २ मजली टेहळणी बुरूज आहे. या बुरुजावरून किल्ल्यातील सर्व भागांवर व किल्ल्याच्या बाहेर दूरवर नजर ठेवता येत असे. या बुरूजा वरून उजव्या बाजूला खाली उदगिर महाराजांचे मंदिर दिसते. टेहळणी बुरूजा खालून मंदिराकडे जाण्यासाठी भूयारी मार्ग आहे. तसेच तटबंदीच्या चर्येत बांधलेले संडास पहायला मिळतात.किल्ल्याच्या उत्तर टोकाला दोन महाल आहेत. त्यातील पहिला बेगम महाल, सम्स उन्निसा बेगम हिच्यासाठी बांधण्यात आला होता. महालाच्या एका भिंतीवर कबुतरांसाठी खुराडी बनवलेली आहेत. या महालाची प्रतिकृती समोरच्या बाजूला बनवलेली आहे, परंतू तो महाल आता उध्वस्त अवस्थेत आहे. या दोन महालांच्या मध्ये दोन हौद व चार कोपर्यात कारंजासाठी असलेले ४ चौकोनी बांधीव खड्डे आहेत. बेगम महालाच्या बाजूला खास महाल आहे. ५ कमानी व १० खांबांवर उभ्या असलेल्या या महाला समोर एक हौद व ४ कारंजे आहेत. या दोन महालांना लागून धान्य कोठाराची इमारत आहे. या इमारती मधून जाणार्या रस्त्याने गेल्यावर खास महालाच्या मागे असलेला नर्तकी महाल आहे. या महाला समोर एक हौद व ४ कारंजे आहेत.नर्तकी महालातून पश्चिमेच्या तटबंदीच्या कडेकडेने प्रवेशव्दाराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीतच ३ मजली हवा महाल आहे. हवा महालाच्या समोरच ७ कमानी असलेली आयताकार घोड्यांच्या पागांची इमारत आहे. हवा महालातून उतरून तटबंदीच्या कडेकडेने दिशेने चालत गेल्यावर भव्य चांदणी बुरुज पहायला मिळतो. या बुरुजावर झेंडा काठी व २ प्रचंड मोठ्या तोफा आहेत. यातील बांगडी तोफ १० फूट ३ इंच लाबीची आहे. दुसरी तोफ पंचधातूची ८ फूट ४ इंच लाबीची आहे. या तोफेच्या तोंडाकडे मकर मुख कोरलेले आहे तर मागिल बाजूस सूर्याचे मुख कोरलेले आहे. अशीच एक तोफ औसा किल्ल्यावर देखील आहे. या तोफेवर अरबी भाषेतील २ शिलालेख कोरलेले आहेत. चांदणी बुरुजावरून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली दुर्ग फेरी पूर्ण होते.
राहाण्याची सोय: उदगीर गावात काही लॉज आहेत.
जेवणाची सोय: उदगीर गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय: किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: किल्ला पाहण्यासाठी २ तास लागतात.
माहिती साभार: ट्रेक क्षितीज संस्थाudgir