किल्ल्याची ऊंची: ३२२० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: कोल्हापूर
श्रेणी: मध्यम
जिल्हा: कोल्हापूर
प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असे स्थानिक लोक सांगतात. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. महिपाल गडाखालील वैजनाथ देवालय पाहता, हा गड प्राचिन आहे याची साक्ष पटते. तसेच ब्रिटीश काळात गडावरील लोकांचा लढाऊ बाणा लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी लष्करात राखीव जागा ठेवल्या जात, हे लक्षात घेता या गडाचे लष्करी महत्व मोठे होते यात शंका नाही.
पहाण्याची ठिकाणे : बेळगावहून ४५ मिनिटामध्ये आपण गडपायथ्याच्या देवरवाडी गावात पोहचतो. या गावातून गडाच्या चढणीला सुरवात होते. अर्धा चढ चढल्यानंतर आपण प्राचीन वैजनाथ व आरोग्य भवानी मंदिर संकुलात पोहचतो. श्री गुरु चरित्राच्या १४ व्या अध्यायात या स्थानाचा दक्षिणेतील महाक्षेत्र असा उल्लेख आहे. मुख्य मंदिर ११ व्या शतकात बांधलेले आहे. प्रवेशद्वारातच एक शिलालेख आहे. मंदिरासमोर सुंदर नंदी आहे. गाभार्यात भव्य शिवलिंग आहे. वैजनाथ मंदिराला जोडून बाजूला आरोग्य भवानीचे मंदिर आहे. ही आरोग्य भवानी अष्टभूजा आहे. दोन्ही मंदिरे हेमाडपंथी शैलीत आहेत. मंदिरातील खांब अत्यंत आकर्षक व घाटदार आहेत. मंदिराच्या मागे चवदार पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले पवित्र कुंड आहे.वैजनाथाचे दर्शन करुन मंदिराच्या मागून डांबरी सडकेने आपण महिपालगडाकडे निघायचे. या मार्गावरुन जाताना डाव्या बाजूच्या डोंगरातील कातळामध्ये प्राचीन गुंफा व भुयारे आहेत. आत प्रवेश करण्यासाठी प्रखर विजेरी आवश्यक आहे, कारण या भुयारातून पाणी भरलेले आहे. या कातळाच्या वर असलेल्या पठारावर भारतीय सैन्यदलाचा नियमित युध्द सराव चालू असतो.या पठाराच्या उजव्या बाजूने जाणार्या डांबरी सडकेने आपण गडावरील वस्तीवर पोहचायचे. गडावरील वस्ती सुरु होण्यापूर्वी आपणास उध्वस्त तटंबदी, प्रवेशद्वाराचे अवशेष व शिळा दिसतात. गावकरी त्यांना गौळ देव म्हणतात. पुढे शिवरायांचा आश्वारुढ पुतळा दिसतो, येथून पुढे गडाची मुख्य तटबंदी सुरु होते. वस्तीच्या मधून जाणार्या सडकेने पुढे गेल्यावर आपणास बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. यावर गणेशाचे सुंदर शिल्प आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस उभारलेल्या तटबंदीने हा भाग माचीपासून वेगळा केलेला आहे. दरवाजातून आत प्रवेश करताच डाव्या बाजूस कातळात खोदलेली प्रचंड विहिर लागते. तिची लांबी ७० फूट व रुंदी ४० फूट आहे. तिची खोली किती आहे, याच अंदाज कोणालाच नाही. विहिरीत उतरण्यासाठी पायर्या आहेत. ही विहिर पाहून आपण विहिरीच्या मागे असलेल्या अंबाबाई मंदिरात जायचे. उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपणांस सुस्थितीतील निशाण बुरुज लागतो. त्यावर चढण्यास पायर्या आहेत. बुरुजाशेजारीच श्री महादेवाचे मंदिर आहे. तटबंदी आपल्या उजव्या हातास ठेवून आपण गडाचे दुसरे टोक गाठायचे. तटातून खाली उतरणार्या वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात खोदून काढलेली कोठारे दिसतात. परत मागे फिरल्यावर आपणास ढासळलेला दरवाजा दिसतो. त्याचे बुरुज मात्र चांगल्या अवस्थेत आहेत. गडावरील प्रत्येक घरासमोर आपणास इतिहासकाळातील पाणी भरुन ठेवलेली दगडी भांडी दिसतात. गडावरील लोकांना गडाविषयी अभिमान आहे. मात्र त्यांनी तटावरच गवताच्या गंज्या, जनावराचे गोठे बांधल्यामुळे गडाची अवस्था फार बिकट झाली आहे. गडावरील वाढती लोकसंख्या व विभक्त होणारी कुटुंबे ही त्याची कारणे आहेत.
पोहोचण्याच्या वाटा: महिपाल गडातच मोठे गाव वसलेले आहे. त्याचे नावच ‘महिपालगड’ असे आहे. महिपालगड जरी कोल्हापूर जिल्हयात येत असला, तरी तिथे जाण्यासाठी बेळगाव गाठायचे. बेळगाव मधून शिनोळी फाट्यामार्गे देवरवाडी गावात जायचे. देवरवाडीतून वैजनाथमहिपाल गाव ६ किमी वरच आहे. किल्ल्यातून गाडीरस्ता गेलेला आहे.
राहाण्याची सोय: गडावर निवासाची व्यवस्था आहे.जेवणाची सोय: जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय: गडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ: गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे २ तास लागतात.