कोणतही शिवकाव्य येथे शोधा

पावनगड


उंची: ४०४० फूट
डोंगररांग: कोल्हापूर
जिल्हा: कोल्हापूर
तालुका: पन्हाळा
वाघबीळ गावापासून पन्हाळ्याकडे जाताना आपल्या डाव्या बाजूस सतत सोबत करणारा छोटेखानी किल्ला म्हणजे पावनगड. पन्हाळ्याचा जोडकिल्ला असला तरीही पावनगड दुर्लक्षित राहिलेला आहे. पन्हाळगडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मार्कंडेय डोंगराचा अडथळा पाहून शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये हा डोंगरच पन्हाळगडाचा एक घटक बनवण्यासाठी त्याची बांधणी सुरू केली. पावनगड या नावाने पन्हाळ्याला जोडूनच बुरुजासह हा गड बांधला.
इतिहास : इ.स.१६७३ मध्ये शिवरायांनी पावनगड बांधला, पन्हाळा वेढ्याच्या वेळी पन्हाळ्याचा पूर्व बाजूस असणार्या मार्कंडेय टेकडीवरून पन्हाळ्यावर तोफांचा मारा करण्यात आला. नंतर शिवरायांनी पन्हाळा पुन्हा जिंकून घेतल्यानंतर संरक्षणातील हा दोष काढून टाकण्यासाठी मार्कंडेय टेकडीला तटा-बुरूजांनी बंदिस्त करून नाव दिले ‘पावनगड’. पावनगडाच्या बांधकामाची जबाबदारी चोख पार पाडल्याबद्दल महाराजांनी अर्जोजी यादव व हिरोजी फर्जंद यांना प्रत्येकी पाच हजार होनांचे बक्षीस दिले.पावनगडावर भक्कम तटबंदी आहे. बुरुज आहे. जखमी सैनिकांवर त्या काळी गायीच्या जुन्या तुपाचा वापर केला जात असे. या तुपामुळे जखमा भरून येत. या तुपाच्या साठवणुकीची विहीर आजही पावनगडावर आहे. गड बांधताना बांधलेली दोन सुंदर दगडी मंदिरेही आहेत. अर्थात त्यातील मूर्ती मात्र गायब झाल्यात. १८४२-४४ मध्ये इंग्रजांनी पन्हाळगडाच्या प्रवेशद्वाराची नासधूस केली. त्याचवेळी पावनगडाचे दोन दरवाजेही पाडले; मात्र या पावनगडाला पहिल्यापासूनच एकांतवासाची शिक्षा भोगावी लागली आहे. पन्हाळ्याला लागून हा गड असून या गडावर प्रेमीयुगुले वगळता कोणीही फिरकत नाही. वास्तविक खुद्द शिवाजी महाराजांनी बांधलेला गड म्हणून त्याचे महत्त्व वेगळेच आहे. पावनगड कुणाला माहीतच नाही, तर त्याचे महत्त्व तरी कसे माहीत असणार.राणी ताराबाईंच्या कारकिर्दीत औरंगजेबाने लाखभर सैन्यानिशी घातलेला वेढा पन्हाळा-पावनगड या दुर्गजोडीने निष्प्रभ केला. १८४४ मध्ये इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबरच पावनगड देखील उद्ध्वस्त करून टाकला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पन्हाळ्याचा काली बुरुजाखालून रेडेघाटीतून गेलेला रस्ता पावनगडावर नेतो, दाट झाडीमुळे गडावर फिरण्यास एकच रस्ता बर्यापैकी मोकळा आहे, या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मंदिरांचे अवशेष पडलेले दिसतात.पावनगडावर पहाण्यासारखी तीन ठिकाणे आहेत. एक आहे तूपाची विहीर,ठरावीक किल्ल्यांवर तूप साठवण्याची व्यवस्था शिवकाळात होती. औषधे बनविण्यासाठी, सैनिकांच्या जखमांवर लावण्यासाठी तूपाचा वापर होत असे ,ही विहीर म्हणजे छोटा हौद असून त्यावर छत आहे.शेजारीच एक प्राचीन मंदिर आहे तिथे शिवलिंगाची स्थापना केली आहे. गडावर दक्षिण कडेला लगडबंद फकिराचा दर्गा आहे, दर्ग्यात जाण्यासाठी पायर्यांवरून खाली उतरुन जावे लागते, इथे पूर्वी मार्कंडेय त्रषींची गुहा होती. गडाच्या पूर्व टोकावर असलेला बुरुज बर्यापैकी अवस्थेत आहे, बुरुजावरून ज्योतिबाच्या डोंगराचे दर्शन होते.
माहिती साभार: अमर मोरे आणि प्रवीण शिर्केpavangad