कोणतही शिवकाव्य येथे शोधा

।। मराठा साम्राज्याची महाराणी ।।

।। मराठा साम्राज्याची महाराणी ।।
 
छत्रपती संभाजीराजे व छत्रपती राजाराम यांच्या मृत्युनंतर औरंगजेबच्या प्रचंड सैन्यापुढे सतत साडेसात वर्ष लढा देऊन त्याला पराभूत करून मराठा साम्राज्याचे रक्षण करणारी महाराणी ताराबाई खरोखरच श्रेष्ठ होती.कवी गोविंद यांनी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
 
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।
 
महाराणी ताराबाई यांचा जन्म १६७५ साली सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला.छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न १६८३-८४ च्या सुमारास झाले.२५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या.रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई यांच्यासह जिंजीला पोहचल्या.९ जून १६९६ रोजी त्यांना शिवाजी हा पुत्र झाला.
सन १६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले.पण ताराबाई व इतर लोक मोघल सेनापती जुल्फिखान यांच्या तावडीत सापडले पण जुल्फिखानने सर्वांची मुक्तता केली.२ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यु झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सुत्रे ताराराणीच्या हाती आली.ताराराणीच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ,उदाजी चव्हाण,चंद्रसेन जाधव,कान्होजी आंग्रे आदि मात्तबर सेनानी होते.त्यांनी मोघलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली.सन १७०५ साली त्यांनी मोघलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून पन्हाळा ही राजधानी बनविली.

आपला पुत्र शिवाजी यांच्या नावाने त्यांनी राज्यकारभार चालविला.छत्रपती राजाराम यांच्या मृत्युनंतर मराठी राज्य संपले असे औरंगजेबला वाटले होते.पण पराक्रमी ताराराणीच्या सैन्यांने मोघलांशी सतत सात वर्ष निकराने लढा दिला व मोघलांच्या ताब्यातील सर्वच किल्ले परत जिंकले.मराठ्यांचे राज्य आपण जिंकू शकलो नाही ही खंत शेवटपर्यंत औरंगजेबला होती त्यातच त्याचा औरंगाबादजवळ मृत्यु झाला.
औरंगजेबच्या मृत्युनंतर शाहूंची मोघलांच्या कैदेतून सुटका झाली.शाहू सुटल्यानंतर ताराराणी व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला.१२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूचा विजय झाला.अशारीतीने ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले.शाहूच्या पक्षातील बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण,चंद्रसेन जाधव,कान्होजी आंग्रे आदि सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले.त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला.शाहूंनी सातार्‍याला गादीची स्थापना केली.

मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.सन १७१४ साली कोल्हापूरच्या राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर राजाराम यांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी आपला मुलगा दुसरा संभाजी यांस कोल्हापूरच्या गादीवर बसवून ताराराणी व तिचा पुत्र दुसरा शिवाजी यांस बंदी बनवून कैद केले.या कैदेमध्येच ताराराणीच्या पुत्राचे निधन झाले.

पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराराणीची कैदेतून सुटका झाली.त्यानंतर ताराराणी सातारा येथे राहावयास गेल्या.शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले.पुढे शाहूंच्या मृत्युनंतर सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन सत्ता पेशव्यांच्या ताब्यात गेली.त्यावेळी त्यांनी पेशव्यांविरूध्द उठाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले.