कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवा काशिद


अफजलखानाच्या वधानंतर आदिलशाहने सिद्दी जोहरला शिवाजीराजेंविरूध्द धाडले.दि २ मार्च १६६० साली,सुमारे २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळ घेऊन सिद्दी शिवरायांवर चालून आला.त्यावेळी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते.सिध्दीने पन्हाळा किल्ल्यास वेढा घातला.महाराज गडावर अडकून पडले.तिकडे शाहिस्तेखान पुण्यात लालमहालात तळ ठोकून होता.स्वराज्यावर मोठे संकट आले होते.पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते.कारण राजेंना शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करावयाचा होता.

हिरडस मावळातील शूर अशा बांदलाचा सहाशे जणांचा जमाव राजेंनी निवडला.पालखीसाठी भोई सुध्दा खासे निवडले.सिध्दीस तहाचा समझोता धाडून राजेंनी त्यास गाफील ठेवले.छत्रपती सारख्या दिसणार्‍या शिवा काशिदला राजेंनी पालखीत बसवून मलकापुरच्या दिशेने पाठविले,तर राजेंची पालखी म्हसाई पठाराच्या दिशेने गेली.मुसळधार पावसाचा फायदा घेत राजे पन्हाळ्यावरून निसटले.सिध्दी जोहरला याचा थांगपत्ता लागला त्याने पाठलाग करून राजेंची पालखी पकडली.शिवाजीराजे आपल्या ताब्यात आल्यामुळे सिध्दी खुशीत होता पण लवकरच त्याला कळून चुकले की आपण शिवा काशिद नावाच्या मावळ्याला पकडले आहे.

सिध्दीने त्यास विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का?त्यावर शिवा काशिद म्हणाला की शिवाजी राजेसाठी मी हजार वेळा मरावयास तयार आहे,शिवाजी राजे कोणास सापडणार नाहीत.हे उत्तर ऐकून रागाने सिध्दीने शिवा काशिदचे शीर कलम केले.इतिहास ही त्याचा पराक्रम विसरु शकणार नाही,कारण शिवा काशिद सारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले.
पन्हाळगडावरील शिवा काशीद यांचे स्मारक
पन्हाळगड,शिवा काशिदचे स्मारक