कोणतही शिवकाव्य येथे शोधा

।।मुत्सद्दी सेनानी छत्रपती शाहूराजे।।

।।मुत्सद्दी सेनानी छत्रपती शाहूराजे।।
 
छत्रपती शाहूंचा जन्म रायगड जिल्ह्यातील, माणगाव तालुक्यात असलेल्या गांगवली या गावी १८ मे १६८२ रोजी झाला.छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येनंतर सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे रायगड मोघलांच्या ताब्यात गेला.त्यावेळी गडावर असलेले लहानगे छत्रपती शाहू,महाराणी येसूबाई हे मोघलांच्या हाती पडले.आयुष्याची सतरा वर्ष त्यांना मोघलांच्या ताब्यात राहावे लागले.
 
ऐन तारूण्यातील उमेदीचा काळ कैदेत गेल्यामुळे त्यांचे लष्करी शिक्षण योग्यरित्या झाले नाही.औरंगजेबच्या कैदेत असताना त्यांच्या पहिल्या पत्नी अंबिकाबाई यांचे निधन झाले.औरंगजेबच्या मृत्युनंतर सन १७०७ साली,औरंगजेबचा मुलगा बहादूरशाहने,शाहूंचा अधिकार मान्य करून,शाहूंची सुटका केली.पण महाराणी येसूबाई व अन्य मंडळीना दिल्लीस ओलीस ठेवले.
 
कैदेतून सुटल्यानंतर शाहू स्वराज्यात दाखल झाला.पण महाराणी ताराबाई व शाहू यांच्यात संघर्ष चालू झाला.सन १७०८ साली खेडजवळच्या लढाईत त्यांनी महाराणी ताराबाईचा पराभव केला व सातार्‍याला गादीची स्थापना केली.राज्याभिषेकानंतर त्यांनी सकवारबाई व सगुणाबाई यांच्याशी लग्न केले.पुढे बाळाजी विश्वनाथ,उदाजी चव्हाण,चंद्रसेन जाधव,कान्होजी आंग्रे आदि कोल्हापूरच्या महाराणी ताराबाईंचे सेनानी शाहूंना मिळाल्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला.याकामी बाळाजी विश्वनाथ यांनी मोठी भूमिका बजावली.सन १७१४ साली बाळाजी विश्वनाथ यांची शाहूंनी पेशवेपदावर नेमणूक केली.
सन १७१४ साली महाराणी ताराबाई यांचा सावत्र मुलगा दुसरा संभाजी यांनी कोल्हापूरच्या गादीत सत्तांतर घडविले आणि ताराबाई व त्यांचा मुलगा दुसरा शिवाजी यांना कैदेत टाकले.त्यामुळे महाराणी ताराबाई व शाहू यांच्यातील संघर्ष कमी झाला.सन १७१९ साली बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीला बहादूरशाहची भेट घेऊन महाराणी येसूबाई व अन्य मंडळीची सुटका करविली तसेच दक्षिणेच्या सहा सुभ्याची चौथाई शाहूस प्राप्त करून दिली.
 
पुढे १७२० साली बाळाजी विश्वनाथच्या मृत्युनंतर त्यांच्या थोरल्या मुलग्यास पहिला बाजीराव यांस शाहूंनी पेशवेपद दिले.पहिला बाजीरावने शाहूंच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांचे राज्य उत्तरेत वाढविले.याचदरम्यान त्यांनी वारणेला कोल्हापूरकरांशी तह केला.
 
पहिला बाजीराव याच्या अकाली मृत्युनंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांस १७४० साली पेशवेपद दिले.शाहूंच्या कालावधीत मराठी साम्राज्यात पेशव्यांचे महत्त्व वाढले.शाहू महाराजांना माणसांची चांगली पारख होती,त्यांच्यात अंगी नेतृत्वगुण,कलागुण होते.मुलगा नसल्यामुळे ताराबाईंचा नातू रामराजा याला शाहूंनी दत्तक घेतले होते.अशा या सेनानीचा मृत्यु १५ डिसेंबर १७४९ रोजी झाला.शाहूंच्या मृत्युनंतर सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन सत्ता पेशव्यांच्या ताब्यात गेली.