कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९३

 " सणाचे डाग आसवाब आपल्या सेवेस रुजू करायला आम्ही जातीने आलो आहोत आऊसाहेब. त्यांचा स्वीकार व्हावा.' सोयराबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या कपाळीच्या मेणकुंकवाच्या पट्ट्यांमध्ये घामाचे थेंब थेंब जमून आले.


"आणखी एक अर्जी आहे. गडाचे चाकर आपले आहेत. आम्हीही आपले चाकरच आहोत. जे लागेल त्याची आज्ञा आम्हास द्यावी." ती जातीवंत अदब होती.


सोयराबाई आतल्या आत धुमसल्या. त्यांनी काही चाल घ्यावी असला कुठलाच वाव युवराजांनी त्यांना ठेवला नव्हता. तरीही त्या सोयराबाई होत्या ! पुढा तसाच ठेवीत त्यांनी तेहा सवाल केलाच, " सूनबाईंना लागले तर असेच आणून द्याल ?' "


"नाही! " संभाजीराजांचा संथ जाब आला.


"मतलब ? "


"त्या कुणबी आहेत! कुणब्यांना डागांची सवय नसते! येतो आम्ही.


तिरक्या बोलांनी येसूबाईंना आपण कधीतरी 'कुणबी' म्हटल्याचे या वेळी आणि असे चालून येईल याचा सोयराबाईंना अंदाज नव्हता! त्यांची चरफड झाली. त्यांच्या महालातून बाहेर पडताना रामराजांच्या आठवणीने संभाजीराजांना म्हणावेसे वाटले, आपणाला जामदारखान्याचे सोनडाग आवडतात. आम्हास म्हणाल तर आपला रामडाग खूप आवडतो!" पण ते काही बोलले नाहीत. विचारांच्या फेरात ते तसेच चालत चालत मनोऱ्यापर्यंत आले. मनोऱ्याच्या पायन्यांनी चारी मजले खाली टाकीत ते शेवटच्या पाचव्या मजल्यावर आले. "ठण ठण ठण ऽ" गडवाऱ्याने आणून सोडलेले सूर त्यांच्या कानात उतरले. पाचाडच्या सदरेवर जिजाऊ आल्याची खूण देणारी घंटा झडत होती !!


मावळमाचीवर जाऊन तिला मान देण्याएवढाही समय नव्हता. संभाजीराजांनी पाचव्या मजल्यावरूनच पाचाडच्या रोखाने तीनदा रिवाज दिला.


राजांचे बोल त्यांच्या मनात फिरले " ध्यानी ठेवा. श्रद्धा आणि मायेपोटीच माणसे जान लावून असतात. प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात ! श्रद्धा आणि माया! " एक दीर्घ निःश्वास त्यांच्या नाकपाळ्यांतून सुटला.


"केवढे ठाव घेणारे बोलतात आबासाहेब!” राजांची दाढीधारी, हसरी, सतेज मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात तरळली. आणि आठवले की आबासाहेब सांप्रत समर्थांच्या सान्निध्यात दंग असतील !


महाडच्या तलावातून आणलेले रक्तवर्णी, आकाशवर्णी, सफेद अशा वाणांचे कमळगड्डे रायाजी आणि अंतोजींकडून कुशावर्त तलावाकाठच्या चिखलात लावून झाले. तलावाकाठच्या करंजीच्या झाडाखाली सावली धरून संभाजीराजे उभे होते. त्यांनीच ते कमळगडे आणवले होते.

" देठांचे नाळ चिखलात ठेवून नानारंगी कमळांचे डुलते थाळे या कुशावर्तावर दाटतील तेव्हा कसा दिसेल हा तलाव ? " पोटऱ्यांवर चोळणा दाटलेले रायाजी, अंतोजी पायऱ्याच्या बाजूने तलावात उतरून चिखलमाखले हातपाय धुऊन बाहेर आले. " रायाजी बघूया तुमचा हातगुण कसा निघतो ? बघू किती गड्डे जीतवन धरतात ते!” संभाजीराजे म्हणाले.


" धाकलं धनी, फुलांची ही जात लई चरनी धरनारी ! वाईच ठाव घावला की पसारती हां हां म्हत्ता. सम्दं टाकं येरमटून टाकतील हो गई !!" अंतोजी हसून म्हणाला.


" कसूर माप धाकलं धनी, सरकार याद करत्यात. हिंदुस्तानातलं कुनी दोन पावनं गड चडून आल्यात. हो ऽ आडवं पट्टे हाईत कपाळावं गंदाचं." वाड्याच्या रोखाने आलेल्या जोत्याजी केसरकराने करंजीच्या झाडाखाली येऊन वर्दी दिली. . राजे चाफळहून येऊन दीड मास लोटला होता.


" चला. म्हणत संभाजीराजांनी माथ्यावरची सावली सोडली. जगदीश्वराचा सोनकळस दूरवर त्यांना उन्हाच्या तिरिपेत झगमगताना दिसला. त्याने फेकलेल्या प्रखर झोताने लवभर युवराजांचे डोळे अंधारल्यागत झाले. एक विचित्र विचार त्यांच्या मनात फेर टाकून गेला. "जगदीश्वराच्या चौकातील त्या दगडी कासवाला हयातीत कधी हा तळपता सोनकळस बघायला मिळणार नाही! 


"हिंदुस्थानी पाहुणे कोण असतील ?" विचार करीतच त्यांनी राजांच्या बैठक महालाचा उंबरठा ओलांडला. राजांना मुजऱ्याचा रिवाज दिला. कमरेच्या हत्यारावर हाताची डावी मूठ रुपवीत, राजांच्या बैठकीसमोर असलेल्या दोन्ही असामींना निरखीत


“या. यांना ओळखलंत ?” राजांनी त्यांना समोरच्या दोन्ही असामींच्या रोखाने हात करीत हसत हसत विचारले.


दोन्ही उत्तरी असामींनी युवराजांना हात जोडून, कमर झुकवीत मथुराई नमस्कार घातले. रुजाम्याची वळी उलगडावी तसा संभाजीराजांच्या मनी आठवणींचा पट खुलला. यमुनेचे गिरके वळण डोळ्यांसमोर तरळले. दोन्हींतील एका असामीच्या अंगी भगवी कफनी होती. दुसरीने उत्तरी डौर, जरीकिनारी धोतर उपरणे, घेरदार पगडी असा पेहराव केला होता.


हे कविराज!" आठवणीसाठी कपाळीच्या शिवगंधाला मुडपीत संभाजीराजे म्हणाले, "आम्हास वाराणशीच्या वाटेवरून मथुरेपर्यंत सोबत करणारे कवी कलश !


" कसूर माफ हो युवराज. कलश नहीं कवी कुलेश !" कर्वांनी हसून दुरुस्ती केली. 'आणि हे कोठीत भेटलेले कवी परमानंद." राजांनी कफनीधारी असामीची याद "दिली.

"युवराज ही मंडळी म्हणताहेत, 'केवळ भेटीसाठी आलो आहोत. चार दोन दिवस राहून परतू.' त्यांना सांगा तुम्हाला काव्य केवढे प्यार आहे ते. आम्ही त्यांना येथे कायमचे ठेवून घेऊ म्हणतो." असे म्हणून राजे हसले. 'जी, आपला बेत बरोबर आहे. आमचाही त्यांना तसाच आग्रह आहे.

युवराजांच्या या बोलण्यावर सारेच हसले.


" चंडी ऽ चंडी ऽ" हसण्याच्या शेवाला धरून कुलेश पुटपुटले !

शालिग्रामी रंगाच्या एका तकतकीत घोड्यावर मांड जमवून भवानीटोकाच्या बाजूने संभाजीराजे फेर टाकीत होते. डाव्या हाताला लिंगाणा, उजव्या तर्फेला पोटला आणि समोर दूरवर त्यांना तोरणा राजगडाची काळपट शिखरे दिसत होती. " राजगड! उडत्या गरुड पक्ष्याच्या पवित्र्यात माच्यांचे पंख पसरून असलेला गडराज !" त्या शिखराने त्यांची नजर पकडून ठेवली.


" दुइ दुइ ss दुड" रायगडावरच्या नगारखान्याचा नौबतडंका त्यांना ऐकू आला. पाठोपाठ तोफखान्यावरून फुटलेल्या भांड्यांचे बार दणदणले.


कायदे खेचून त्यांनी मांडाखालच्या जनावराला मोजडीची टाच दिली. काळेशार जनावर शेपटीचा फुलवा नाचवीत दौडू लागले. काळा हौद, जगदीश्वराचा कळस मागे पडला. दौड़ते जनावर खडखडाट करीत व्यापारपेठेत घुसले..


उंच जोत्यावर बसलेले नागाप्पा शेटीचे व्यापारी बसकणीवरून उठून, जोत्यांना घोडी भिडवून खरेदी करणारे धारकरी घोड्यांवरून खाली झेपा घेऊन धडाधड मुजरे करताहेत इकडे संभाजीराजांचे लक्ष नव्हते. होळीमाळ मागे पडला. नगारखान्यातून घुसताना संभाजीराजांना कमानीवर कोरलेल्या, पंजा उगारल्या दगडी वाघाचे मानचिन्ह निसटते दिसले.


आत जाताच त्यांनी डाव्या रिकिबीवर भार देऊन जनावरावरून खाली झेप घेतली. हातीचे कायदे सामोरा आलेल्या मोतद्दाराच्या दिशेने फेकले. आणि ते झपाझप दरबारी चौकातील हजारी कारंजी पार करून गेले. तशी त्यांच्या आम्याच्या पाठीवरची सोनजरीची वेलबुट्टी लखलखली.


दरबारी चौकाच्या बैठकीवर राजे माणसांच्या घेरात उभे होते. संभाजीराजांना बघताच त्यांनी एका मावळ्याच्या खांद्यावरील परातीतील साखरेची मूठ भरून घेतली. राजे दगडी पायऱ्या उतरून येताहेत हे बघून संभाजीराजे झपाझप पुढे झाले. मुजन्यासाठी ते झुकणार हे बघून राजांनी त्यांना थोपविले.


"शंभूराजे, तोंडी साखर घ्या. पन्हाळा फते झाला! बारा वर्षांनी आमचा मनसुबा तडीस लागला.” राजांनी हसत मूठ युवराजांच्या ओठांशी नेली. तोंडात रेंगाळणाऱ्या साखरेच्या चवीने संभाजीराजांच्या मनाच्या मठीत लपलेले. 

दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल भगवी कफनी चढवून वर आणले- "गडपति, गजपति, हयपति। पुरंधर आणि शक्ति पृष्ठभागी।' "


त्या दिवशी संध्याकाळी समाधानी राजे सोयराबाईच्या महाली आले. बाईंनी चौरंगीवर साखरेचे भरले तबक कुणबिणीकडून ठेवून घेतले होते. रामराजांना घेऊन त्या चौरंगीजवळच उभ्या होत्या. राजे जवळ येताच त्या रामराजांना म्हणाल्या, "जा, आबासाहेब काय देतात बघा तरी ! " रामराजांना आपल्याकडे घेऊन त्याच्या गालावर ओठ टेकीत राजे म्हणाले,


"आम्ही काय देणार यांना ? देणार श्री थोर आहे." राजांच्या दाढीच्या स्पर्शनि हुळहुळलेल्या गालांवर रामराजांनी तळहात फिरविला. तीन वर्षांचे रामराजे म्हणाले, 

श्ली म्हंजे काय आबा ?


हसत राजे म्हणाले, “ ते आम्हास तरी पुरतं कुठं माहीत आहे ! ते माहीत झालं की माणसाचा समर्थ होतो ! "


आतल्या आत घुसफुसलेल्या सोयराबाईंच्या मनात राजांच्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेकडे बघताना एक बटबटीत विचार फिरला, "तोंडी साखर पडायला मोठेपणाचं भाग्य लागतं ! "


आणि मग त्या म्हणाल्या, "या. तुम्ही नको 'समर्थ' व्हायला." सोयराबाईंनी रामराजांना राजांच्याकडून आपल्याकडे घेतले. दरबारी चौकात राजांनी संभाजीराजांच्या तोंडात हसत साखर भरलेली सोयराबाईंचा दरूबंकी बयाजी याने बघितले होते. बघितले तसे आपल्या बाईसाहेबांच्या कानी घालायला तो विसरला नव्हता!


बाहेर पडताना राजे विचार करू लागले. " तुम्ही नको समर्थ व्हायला !" राणीसाहेब असे का म्हणाल्या ? पण त्यांना ते कळलेच नाही. कळणारही नव्हते !