कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९२

 युवराजांचा नूर क्षणात पालटला. त्यांनी गडबडीने जाधवरावांना उठवून वर घेतले. आणि त्यांच्या डोळ्यांत खोलवर बघताना " हे आऊसाहेबांचे नातलग आहेत. भाचे आहेत. आमचे मामेकाका आहेत." या भानाने त्यांचे डोळे पाणावले; फर्जदपण जागे झाले! झटकन वाकून त्यांनी जाधवरावांच्या पायांना आपले हात भिडविले. नासिक-त्र्यंबकचे मोगली ठाणेदार जाधवराव श्रींच्या राज्यात सेवेसाठी रुजू झाले !

परतीच्या वाटेवरचे वणी दिंडोरी हे ठाणे मारून, तिथल्या सिद्दी हिलाल या ठाणेदाराला स्वराज्याच्या चाकरीला वळवून संभाजीराजांची फौज रायगड जवळ करण्यासाठी मराठा मुलखात घुसली.


"युवराज येताहेत. स्वामींनी मनी धरल्या मनसुब्यात फत्ते घेऊन.” असे पत्रस्वार पंतांनी आगे खबर देण्यासाठी रायगडाकडे पाठविले.


मार्गी लागणाच्या नद्यांत नौका घालून, तऱ्या सोडून मावळे मुलूख जवळ करू लागले. पावसाची मार आता सुमार होती. हत्तीवरच्या हौद्यात बसून युवराज पावसात निथळून निघालेला मुलूख न्याहळू लागले. बैठकीच्या जनावराच्या गळ्यातील थोराड चंदेरी घाट किणकिणत होती. पाठीमागे मोरोपंत आणि जाधवकाका बसले होते.


घंटेच्या किणकिणाटाला धरून संभाजीराजांची विचारधारा लागून राहिली. ऐकू येणारा किणकिणाट मोठा होत होत पाचाडच्या सदरेवरून उठणाऱ्या ठणठणाटाएवढा झाला. युवराजांना दूरवर चुन्याच्या बोटभर धारेसारखी कड्यावरून कोसळणारी धबधब्याची रेष दिसली अशीच रेप रायगडाच्या मावळमाचीवरून पाचाडच्या सदरेवर ते बघत आले होते. पांढऱ्या नेसूच्या जिजाऊसाहेबांची !


दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल युवराजांच्या मनात फेर टाकून गेले. यशवंत, वरदवंत, पुण्यवंत, कीर्तिवंत.


या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्ष ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकरिता ॥

संभाजीराजांच्या मनी कसलीतरी फडफड उठली. एका विचाराने सोंड उठवली- आम्हास समर्थांसारखी रसाळ काव्यदेणगी लाभती तर!! तर आम्ही दुरून 64 • आऊसाहेबांच्या रूपाने दिसणाऱ्या त्या खड्या चुन्याच्या रेषेला ठीक शब्दांत पकडले असते !


"जगदीश्वरांच्या चौकातील त्या दगडी कासवाचे रूप एकदा तरी आमच्या वाट्याला यावं! महाराजसाहेब आणि आऊसाहेबांची पायधूळ पाठीवर मस्तकावर घेण्यात आम्हास धन्य वाटेल !"


मजला मागून मजला हटल्या. युवराज आणि पंत विजयी सेनेसह पाचाडजवळ आले.


पुढे वर्दी गेली. युवराजांच्या भेटीसाठी राजेही पाचाडात उतरले होते. युवराज, पंत, जाधवकाका सारेच चालत पाचाडच्या वाड्यात आले. पुतळाबाईंनी सदरी उंबरठ्यातच भाताचे मुटके युवराजांच्या चेहऱ्याभोवती ओवाळून दूर भिरकावले. राजांच्यासह संभाजीराजे जिजाऊंच्या बैठकमहालात आले.


पाच पावले जिजाऊ पुढे आल्या. झुकू बघणाऱ्या युवराजांना त्यांनी थोपविले आणि जवळ घेत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधावर आपले सुरकुतले ओठ टेकले ! आणि म्हटले " असेच विजयवंत व्हा." त्यांनी युवराजांच्या पाठीवरून मायेने हात फिरविला.

"आऊसाहेब, आम्ही आपल्या भेटीसाठी एक खाशी आसामी आणल्येय. आज्ञा व्हावी." युवराज हसून म्हणाले.


" आम्ही साऱ्यांना भेटावे म्हणूनच या वाड्यात मुक्काम टाकून आहोत. बोलवा त्यांना.” जिजाऊ म्हणाल्या.


युवराजांनी जोत्याजीला भुवईचा इषारा दिला. जोत्याजी जाधवकाकांना पाठीशी


घेऊन बैठकमहालात आला. त्यांना बघताच जिजाऊंच्या सुरकुतल्या कपाळी आठ्यांची जाळी चढली. मन होलपटत मागील काळात गेले. " काकासाहेब आता उपरतीत आहेत मासाहेब. त्यांचा मुजरा घ्यावा !"


संभाजीराजांनी जिजाऊंची कातरता हेरली.


पुढे झालेल्या जाधवरावांनी जिजाऊंचे सरळ पाय धरले. आपसांतील भांडणापोटी, चाकरीसाठी पत्करलेल्या लाचारीपोटी आपल्या माहेरची झालेली वाताहत जिजाऊंच्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभी राहिली. त्यांच्या पायपोटयांत गोळे धरल्यासारखे झाले. मंचकाचा कठडा धरीत त्या काही न बोलता खाली बसल्या. लगबगीने राजे-संभाजीराजे त्यांच्या दुहाती झाले.


" यांना जाऊ द्या राजे.” जिजाऊ थकल्या जबानीने मान डोलवीत म्हणाल्या. शरमिंदे जाधवराव खालमानेने बाहेर पडले. जिजाऊंचा मान राखण्यासाठी संभाजीराजे का पेटून उठले होते ते आता जाधवरावांना कळले!


पाचाडच्या वाड्यात थाळे घेऊन राजे-संभाजीराजे पंतांच्यासह रायगड चढून आले. युवराजांचा पहिला विजय गड चढून आला.


उन्हपावसाचा श्रावणी खेळ सुरू झाला. राजांच्या प्रवासी सामानाची बांधाबांध झाली. खंडोजी दाभाड्यांनी, नागफण्यांचे छत्र असलेले, राजांचे नित्यपूजेचे स्फटिक शिवलिंग हलक्या हातांनी एका लकडपेटीत ठेवले.


" समर्थांचे दर्शन करून आम्ही परतीच्या पावलांनी निघू, तोवर रायगडाचा जाबता तुमच्या हाती आहे. साऱ्यांना सांभाळून असा.” राजांनी वाड्याची सदर सोडताना युवराजांना सांगितले. आणि राजे समर्थांच्या भेटीसाठी चाफळ गढीत जायला निघाले, जी. " काही तरी बोलणारे संभाजीराजे थांबले. 

बोला.


समर्थांना आमचा दंडवत सांगावा ! "


" जरूर. आणि " पुन्हा युवराजांची जबान घोटाळली. " काय ? बोला. " 'आमची आमची प्रार्थना की समर्थांनी जसे आपले चित्र ओव्यांत उभे केले, तसे - मासाहेबांचेही करावे! त्यांचे बोल रसाळ आहेत. 

राजे हसले. मग एकदम गंभीर झाले. संभाजीराजांच्या भरल्या खांद्यावर तळहात चढवून ते क्षणभर तसेच थांबले. त्यांना म्हणावेसे वाटले- “अगदी हा हा... हाच विचार समर्थांचे पत्र ऐकताना आमच्या भोवती फेर टाकून गेला! "


पण प्रकटपणे मात्र राजे म्हणाले, “युवराज, त्यांना शब्दांनी श्लोकात पकडणे सहजी साध्य न होणारे म्हणूनच समर्थ विचारपूर्वक थांबले असावेत. आम्ही आता निघतो आहोत. तुम्ही जातीने पाचाडच्या वाड्यावर नजर ठेवा. ओव्या ऐकण्यापेक्षा मनी वाटेल तेव्हा गड उतरून त्यांचे दर्शन घ्या. येतो आम्ही."


राजांच्या टोपातील मोतीलग डुलली. ते वळते झाले; मोरोपंत, आण्णाजी, प्रतापराव यांना संगती घेऊन चालू लागले. महादरवाज्यापर्यंत युवराजांनी त्यांना पायसोबत दिली. परतताना त्यांना श्रावणी उन्हात अंगभर उजळून निघालेला गंगासागर तलाव दिसला. त्याचे ते सोनेरी चंदेरी रूप बघताना संभाजीराजांना वाटले "आबासाहेब या गंगासागरासारखेच आहेत! किती तरंग ! किती रूपं ! 


नागपंचमी दोन दिवसांवर आली म्हणून सोयराबाईंनी सणाच्या डागांची आणि उंची आसवाबांची यादी आपल्या खाजगी कारभाऱ्याला सांगून तयार केली. आणि हुजन्यामार्फत ती जामदारखान्याचे प्रमुख निळो सोनदेवांच्याकडे रवाना केली. निळोपंतांची परतीची वर्दी आली, “ यादीस युवराजांच्या शिक्कमोर्तबाचे फर्मान हवे ! जामदारखान्याची मोहोर त्याखेरीज तोडता येत नाही !"


हुजन्याने ती कानांवर घातली मात्र, सोयराबाईंचा नाकशेंडा लालावून आला. डोळे फुलले. कानपाळी रसरसली. कारण नसता सोयराबाई हुजन्यावर घसरल्या. कुणास वर्दी धाडतात ही मुजुमदार? आम्हास ? स्वारीखेरीज आम्ही कोणाचे शिक्के फर्मान जुमानत नाही हे ते विसरले ?'


दीड वर्षांच्या रामराजांना निमा-चोळणा चढवीत असलेल्या धाराऊचा ते बोल ऐकताना थरकाप झाला. रामराजांच्या कपाळी शिवगंधाचे पट्टे रेखून त्यांना घेऊनच ती महालाबाहेर पडली. बाहेर पडताना तिने निसटते ऐकले, "जा. मुजुमदारांना आम्ही याद फर्मावलीय म्हणावं." सोयराबाई हुजयाला शब्दांनीच पिटाळीत होत्या.


रामराजांसह धाराऊ युवराजांच्या महाली आली. दादा ऽ दादा " म्हणून झेपावणाऱ्या रामराजांना पुढे होत संभाजीराजांनी छातीशी घेतले. रामराजे खिदळू लागले. त्यांना थोपते करण्यासाठी युवराज हसत म्हणाले, “हां. हां. सबुरीनं घ्या. पातशाही ऐवजी तुम्ही दादामहाराजांनाच पालथे घालता की काय ? ते ऐकताना चरकलेल्या धाराऊने अगोदर हे ऐकायला आणखी कोणी आहे की काय यासाठी दरवाज्याकडे बघितले. न राहवून ती म्हणाली, "धाकलं, असं म्हणू नगा त्येस्नी ! आदुगरच राईचा डोंगुर चडाय लागलाय ! त्यात हो नगो. " का काय झालं धाराऊ ? " बुवराजांनी गोंधळून विचारले.

धाराऊने ऐकलेला चटका त्यांच्या कानी घातला. क्षणभर युवराजांचा रामराजांच्या पाठीवरचा फिरता तळहात थांबला. गंधाचे पट्टे एकमेकांत गुंतले. मग दरवाज्याकडे बघत त्यांनी साद दिली - " मुतालीक ?'


एक खिदमतगार आत आला. त्याला आज्ञा झाली. "जा. महादेव यमाजींना सांगी दे. मुजुमदारांना आम्ही याद केलीय म्हणावं !"


घेतल्या रामराजांना तसंच छातीशी धरून युवराज पायफेर टाकू लागले. “आता काय व्हनार ?" या विचाराने धसकलेली धाराऊ त्या दोघांकडे बघत गपसूर झाली.


महादेव यमाजींना पाठीशी ठेवीत निळोपंत महालात आले. सोयराबाईंनी त्यांची बिनामुलाहिजा झाडणी केली होती. झुकता मुजरा देतानाच न राहवून ते म्हणाले, "आम्ही चाकरांनी काय करावं युवराज ? सरकार स्वारींची आपल्या हुकुमाशिवाय डागकोठीच्या मोहरेस कोणी हात लावण्याची आज्ञा नाही.


“पंत, ती यादी आणा.” संभाजीराजे शांतपणे म्हणाले. हलक्या हातांनी त्यांनी रामराजांना धाराऊकडे दिले.


निळोपंतांनी मागणीच्या डागांची यादी युवराजांच्या हाती दिली. तीवर नजरेचा फिरका टाकीत संभाजीराजे म्हणाले, " या आमच्या संगती.


धाराऊला म्हणावेसे वाटले, “जाऊ नगा धाकलं." पण तिची जबानच धरल्यागत झाली. निळोपंतांच्यासह संभाजीराजे डागाच्या कोठीजवळ आले. हत्यारी पहारे मुजरा देत मागे हटले. युवराजांचा आवाज निर्धारी होता. "पंत, मोहर खोला.' कारभाराकडून किल्ल्या घेत पंतांनी कोठीचा दरवाजा खोलला.


'आम्ही वाचतो ते ते डाग प्रतवारीतून तबकात उतरा.” संभाजीराजे यादीबरहुकूम डाग वाचू लागले. चटक्या पावलांनी हलत, किल्ल्या चाळवीत निळोपंत एक एक डाग तबकात उतरू लागले. यादी संपली. पुढे होत युवराजांनी खोलल्या आलमारीतील मुठीत मिळतील ते सुवर्णालंकार तबकात उतरवले.


'या यादीबरहुकूम आसवाबांचे नग घेऊन तुम्ही खुद आऊसाहेबांच्या सेवेस या." वस्त्रांची दुसरी जोडयादी युवराजांनी निळोपंतांच्या हाती दिली.


जामदारखान्याचा पहारेकरी डागांचे तबक उचलायला पुढे आला. त्याला हातपंजा उठवून युवराजांनी थोपविले आणि आपल्याच हातांनी ते तबक उचलले! 


बांधील मनाने संभाजीराजे सोयराऊंच्या महालासमोर आले. त्यांना बघूनच एका धारकऱ्याने आत जाऊन तशी वर्दी दिली. ती ऐकून मनाशी काही ठरवून सोयराबाई आत पाठमोन्या झाल्या. तबक घेतलेले युवराज त्यांच्या महालात आले. चौरंगावर तबक ठेवून त्यांनी पाठमोऱ्या सोयराऊंना तिवार मुजरा दिला. काही क्षण तसेच गेले. दाटलेले, दडपलेले.