कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८८

 जिजाऊ, राजे, संभाजीराजे गंगासागरात पडलेल्या आघाडी मनोऱ्यांचे देखणे प्रतिबिंब बघू लागले. हरवल्या डोळ्यांनी. गंगासागरात केवढ्या थोर गोष्टींचा जमाव झाला होता! द्वादशकोनी उंच मनोरे डोकावलेले भोसलाई त्रिदळ आणि वरचे निळेशार आभाळ ! त्या तिघांपैकी कुणालाच बोलावेसे वाटत नव्हते. एकाएकी ते आपोआप घडलेले देखणे पाणचित्र हिंदोळले आणि विलग झाले !

तलावाच्या काठावर ओळंबलेल्या आंब्याच्या एका फांदीवरून, बराच वेळ मोहरा धरून गोळ्यासारख्या बसलेल्या एका मुठीएवढ्या खंड्या पक्ष्याने उसळी घेत गंगासागरात सूर टाकला!! लाटाच लाटा उठल्या. संभाजीर जे त्या सुराने दचकले. त्यांनी पाण्याबाहेर 'उमाळी घेऊन उठलेल्या त्या लहान वाटणाऱ्या फडफडत्या पक्ष्याच्या चोचीत मासोळी पाहिली! मग हट्टाने त्यांचे डोळे त्या पक्ष्यामागून दौडत गेले.


पुन्हा फांदीवर बसलेल्या खंड्याने मानेला दिलेला झटका संभाजीराजांना दिसला. मासोळीची एक तळपती रुपेरी तार उन्हात फेकलेली त्यांना दिसली न दिसली आणि ती क्षणात खंड्याच्या चोचीआड झाली! मासोळी होत्याची नव्हती झाली !

खंड्याने शीळ भरली संतोषाने! संभाजीराजे ती ऐकून अस्वस्थ झाले. मनोऱ्यांनी सुरूर केलेल्या बालेकिल्ल्याच्या सदरदरवाज्यात स्वाऱ्या आल्या. हिरोजी इंदळकराने पुढे येत राजांच्या हाती एक पायबांधले काळे कोंबडे दिले. राजांनी ते दरवाज्यावरून तीन वेळा उतरून दूर फेकून दिले! असते ! चुन्या दगडांनी घडलेल्या वास्तूलाही एक न दिसणारे 'बाळसे' असते! त्यालाही दृष्ट लागण्याचा संभव असतो! त्यासाठी हा उतारा होता.

राजांनी बालेकिल्ल्याच्या दरवाज्याची पूजा बांधली. त्यावर मोहरा उधळल्या. आणि, पृथ्वीवरल्या कुठल्याही गडाला ज्यांची पायधूळ मस्तकी घेताना धन्य वाटावे अशा जिजाऊंना मध्ये घेऊन राजे-संभाजीराजे यांनी रायगडच्या बालेकिल्ल्याच्या सदरदरवाज्याचा दगडी उंबरठा ओलांडला !!


स्वप्ननगरीचे दालन उलगडावे तसा पालखी दरवाजा पार करताच बालेकिल्ल्याचा ऐन शिलावटी भाग समोर आला.


एकास एक लागून असलेल्या सातमहालांच्या. माळवदे असलेल्या जोड चिरेबंद इमारती समोर होत्या. त्यांतील कुठल्याही महालाच्या मजल्याला लागून पुढे झुकलेल्या माळवदात उभे राहिले तर, आतल्या चौकात दगडी पाटातून फिरविलेल्या पाण्यातील माशांची पाठशिवणीची अविरत खेळी सहज दिसावी अशी चतुर सोय केली होती. त्या सात महालांची जोड इमारत निरखीत संभाजीराजांनी राजांना विचारले, "हे. कसले वाडे ?'


"हा राणीवसा आहे संभाजीराजे." उत्तर देताना राजांचा आवाज धरल्यासारखा झाला, त्यांना सईबाईंचा आठव आला. महाल सात होते. 'आठवा' म्हणण्यापेक्षा 'पहिला' महाल त्यात असायला पाहिजे होता सईबाईंचा तो नव्हता. असूही शकत नव्हता. तसा तो होताही! कुणाला न दिसेल असा. राजांच्या मनात! सावळ्या स्मृतींच्या रूपात!


जिजाऊ, राजे-संभाजीराजे यांच्यासाठी बांधलेला 'खासेमहाल ऊर्फ राजवाडा' बघून राजे सिंहासनचौकात आले. ही राजदरबारची जागा होती. सिंहासन बैठकीपासून समोरच्या भव्य नगारखान्यापर्यंत पाच हाती पायपट्टा मोकळा सोडला होता. त्यावर जामे अंथरले होते. शानदार सिंहासन बैठक साऱ्यांनी डोळाभर बघितली. समोरच्या पायपट्ट्यावर मध्येच एक तलाव खोदून त्यात उसळत्या कारंज्यांची दिमाखदार योजना केली होती. त्या कारंज्याभोवती सारी राजमंडळी जमा झाली. हिरोजी इंदळकर कारंज्यातून पाणी कसे उसळी घेते याची जाणकारी सांगू लागला. संभाजीराजे एकरोखाने वर फवारणाच्या पाण्याच्या अगणित धारा बघताना हरवून गेले. नगारखान्याची अस्मानात घुसलेली देखणी कारागिरी डोळ्यांखाली टाकीत राजे-संभाजीराजे जिजाऊ दरबारासमोरच्या मोकळ्या पटांगणात आले.


जिजाऊंच्यासाठी पालखी जोडण्यात आली. मोरोपंत, आण्णाजी, बाळाजी, दत्ताजी, प्रतापराव, इंदळकर, आबाजीपंत, मुधोजी सरकवास, चांगोजी काटकर आणि राजे व संभाजीराजे यांनी पालखीभोवती फेर घेतला. सारा राणीवसा, येसूबाई, धाराऊ अशा स्त्रिया पालखीच्या पिछाडीला झाल्या. जिजाऊ दर्शनाला निघाल्या- गडदेवाच्या! श्रीजगदीश्वराच्या!!

होळीचा फेरघेराचा माळ येताच पालखी ठाण झाली. या माळावर होळीसणाचा हुडवा कसा शिलगणार याची माहिती आबाजीपंतांनी साऱ्यांना दिली.


मांड घेतलेल्या घोड्यावरून उभ्या उभ्याच स्वाराला खरेदी करता यावी अशी जोती राखलेली, दुतर्फा एका हारीत दुकाने असलेली व्यापारपेठ आली. अजून ती पेठ क्सती झाली नव्हती. ती वसती करण्याचा मक्ता राजांच्याकडून घ्यावा म्हणून गड चढून आलेला नागाप्पा शेट्टी आपल्या चाकरांसह सामोरा आला. त्याने जिजाऊंच्या पालखीवर सोनमोहरा उधळल्या. त्यांची पायधूळ घेतली.


जगदीश्वराच्या मंदिराचा, उन्हात झळकता सोनकळस दिसू लागला. जिजाऊंची पालखी मंदिरासमोर ठाण झाली.


हातजोड देत राजांनी जिजाऊंना पालखीतून उतरून घेतले. उत्तराभिमुख असलेल्या गाभाऱ्यातील नितळ शिवलिंगासमोर, राजबेलाचे जन्माने वाहिलेले पान असावे तसे मध्ये जिजाऊ आणि दुहाती राजे, संभाजीराजे उभे राहिले.


तिघांनीही वाकून मंदिराच्या दगडी पायरीला हात लावले. आणि मंदिराच्या प्रथम चौकात प्रवेश केला. पाठोपाठ राणीवसा, मंत्रिगण आत आले. गाभाऱ्यातील समयांच्या मंद प्रकाशात, अर्धवट फुलांनी झाकलेले. अभिषेकपात्राखाली जलधारा घेणारे शिवलिंग बघत राजे पुढे झाले.


डोकीवर असलेल्या घंटेचा टोल राजांनी दिला. सारे मंदिर आवार घंटानादाने भरून पावले. पुढे टाकावे म्हणून राजांनी पाऊल उचलले आणि फरसबंदीवर रेखलेल्या दगडी कासवाकडे बघताच ते तसेच मागे घेतले.


“पंत, आम्हा हिंदूच्या मंदिरांत प्रवेशचौकातच या दगडी कासवाची योजना का केलेली असावी ? काही अंदाज ? " पाठीशी असलेल्या मोरोपंतांना राजांनी विचारले. "जी" म्हणत पुढे आलेले मोरोपंत, संभाजीराजे, जिजाऊ सारेच कासवाकडे निरखून खाली बघू लागले. आणि पगडी डोलवीत मोरोपंत म्हणाले, "नाही स्वामी, तसा अंदाज नाही करता येत पण हे पहिल्या कूर्मावताराचं प्रतीक असावं. " आम्हास वेगळंच वाटत पंत. मंदिरी येणाऱ्या हर दर्शनभक्तास, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार या कासवाच्या पायांसारखे मागे सारून मोकळ्या मनाने गाभान्यात या' याची सांग देण्यासाठी ही योजना असावी! पण आम्हा दर्शनभक्तांचे, विसरगतीनं का होईना पाय पडतात ते या कासवाच्या पाठीवर !!" राजे भारल्यासारखे बोलत होते.


कासवाकडे बघताना संभाजीराजांना वाटले- 'एकदा का होईना कासवाचं रूप आमच्या वाट्याला यावं! महाराजसाहेब आणि आऊसाहेब यांचे पाय पडावेत- आमच्या पाठीवर !!

जगदीश्वराचे दर्शन होताच जिजाऊ राणीवशासह बालेकिल्ल्याकडे परतल्या. राजे संभाजीराजांना घेऊन गडाचा फेर टाकण्यासाठी पुढे निघाले.


काळा हौद, भवानी टोक, बारा टाकी, दारू कोठ्या, मंत्र्यांचे वाडे, कुशावर्त तलाव, शिरकाईचे देऊळ अशा लहानथोर साऱ्या जागा बघून राजे-संभाजीराजांच्यासह नगारखान्याच्या पायऱ्या चढून आले. ही रायगडावरची सर्वात उंच जागा ! निशाणचौथऱ्याच्या काठीवर चढलेल्या भगव्या जरीपटक्याची फडफड साऱ्यांना स्पष्ट ऐकू येत होती. "तो तोरणा- उगवतीला तोंड धरून राजांनी संभाजीराजांना बोटाने मार्ग दाखविला. " तो तो राजगड ! "


“जी.” संभाजीराजांनी साद भरला. दोघांचेही जरीनामे वाऱ्यावर फरफरू लागले.


जिरेटोपातील लगी हिंदोळू लागल्या. कानांतील सोनचीकडे डुलू लागले. दुसऱ्याच्या शे-दोनशे मेंढीकळपात चुकार होऊ बघणारे आपले मेंढरू जातिवंत धनगर ज्या नजरेने अचूक पारखून काढतो तसे सह्याद्रीच्या काळपट रांगांत मुरू बघणारे "आपले गडकोट राजे तर्जनी फिरवीत संभाजीराजांना अचूक दाखवू लागले. " तो सोनगड, तो चांभारगड, तो घोसाळा, हा लिंगाणा, हा कांगोरा, हा कोकणदिवा, तो तळेगड, शंभूराजे, हा रायगड जगदंबेचा सर्वांत थोर भुत्या आहे! भोवतीच्या या गडांच्या कवड्यांची माळ त्यानं कंठात चढविली आहे! त्या पायथ्याशी फिरलेल्या गांधारी आणि काळ या नद्यांच्या सफेद पाण्यानं त्यानं आईचा 'तांदूळचीक' भरला आहे! याच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे पाट संबळ तुणतुण्याचा ठेका धरून आहेत! जवळ असलेल्या उगवतीच्या सूर्याांचा पोत करून तो हा हाती धरतो ! या जरीपटक्याचा भगवा-भंडारा त्यानं माथी माखून घेतला आहे! असा हा रायगड आहे !" राजांनी हाताची बोटे छातीशी नेत त्या भुत्याला मान दिला. शुभमुहूर्तावर राजांनी जिजाऊंच्या हातांनी जगदीश्वराला अभिषेक करविला.


महिन्याभरातच रायगडाचा दफ्तरी जाबता बसला. गड नांदू लागला. गडावरच्या थंड हवेत जिजाऊंचे दम्याचे दुखणे उचल खाऊ लागले. राजांच्या सल्ल्याने त्या गड उतरून पाचाडच्या वाड्यात राहायला आल्या. त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाईही गड उतरल्या. महाडचे निष्णात वैद्य गंगाधरपंतांनाही सेवेसाठी पाचारण्यात आले.


पाचाडच्या वाड्याच्या कारभाऱ्याला सदरेशी बोलावून राजांनी एक सक्त आज्ञा केली- “एक फेर घेराची घंटा वाड्याच्या सदरी तुळईस बांधणे. त्यावर एक तासवाला नेमून देणे. रोज आऊसाहेबांची स्नानादी आन्हिके आटोपून त्या तुळशीपूजेसाठी सदरी येतील त्या समयास घंटेचे टोल ते एकसुरी देत जाणे! त्या इशारतीने आम्ही युवराज संभाजीराजांच्यासमवेत मावळमाचीवर दाखल होऊ. दुरून का होईना जे घडेल ते आऊसाहेबांचे चरणदर्शन करू. ये काम बिलाकसुरीने हररोज पार पाडीत जाणे! ".