नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या परिसरातील सर्वात कठीण असे अलंग, मदन, कुलंग हे तीन किल्ले आहेत.
नाशिक
जिल्ह्यातील इगतपुरी या परिसरातील सर्वात कठीण असे अलंग, मदन, कुलंग हे
तीन किल्ले आहेत. घोटीवरून भंडा-याला जाताना कळसुबाई शिखराच्या रांगेत हे
किल्ले लक्ष वेधून घेतात. त्यापैकी अलंग हा एक गिरीदुर्ग प्रकारातला किल्ला
आहे. त्याची उंची ४५०० इतकी असून या किल्ल्यावर जाण्यासाठी अत्यंत अवघड
वाटा आहेत. या किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे.
या किल्ल्यावर पाण्याच्या अकरा टाक्या
आहेत. या किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत आणि त्या गुहेत तीस ते
चाळीस लोकांची राहायची सोय होऊ शकते. या किल्ल्यावरून अनेक सुंदर ठिकाणं
पाहता येतात. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष आहेत. तसेच पूर्वेला
कळसूबाईचा डोंगर, औंढाचा किल्ला, बितनगड तर उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड,
अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्र गड, आजोबाचा गड, रतन गड, कात्राबाईचा
डोंगर हा परिसर दिसतो. या किल्ल्याचा माथा फिरण्यास कमीत कमी चार तास
लागतात. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आंबेवाडी मार्ग, घाटघर मार्ग, उदडवणे
गावातून जाण्याचा मार्ग असे तीन मार्ग आहेत, पण हे तिन्ही मार्ग खडतर आहेत.