कोणतही शिवकाव्य येथे शोधा

किल्ले अंकाई-टंकाई


    download       अजिंठासातमाळा या डोंगररांगेवर हे दोन दुर्गवीर मोठ्या दिमाखात उभे आहेत. .. १६३५ मध्ये शहाजहानचा सेनापती खान याने हे किल्ले ताब्यात घेतल्याचा उल्लेख आहे. मराठ्यांच्या शेवटच्या  युद्धात एप्रिल १८१८ मध्ये किल्लेदाराने हे किल्ले  इंग्रजांच्या स्वाधीन केले. दक्षिणेकडील गोदावरीचे खोरे उत्तरेकडील गिरणेचे खोरे, खानदेश या मुलखांवर नजर ठेवण्यासाठी हे दुर्गवीर महत्त्वाचे होते.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मनमाडच्या दक्षिणेस सुमारे १५ किमी अंतरावर दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर आणि येवला-मालेगाव रस्त्यावर अंकाई गावाजवळ ‘अंकाई-टंकाई’ ही किल्ल्यांची जोडगोळी ठाण मांडून बसली आहे. पुणे-संगमनेर-कोपरगाव-येवला असा सुमारे २२५ किलोमीटरचा प्रवास करून येवला शहर गाठायचे. इथून पुढे येवला-मनमाड-मालेगाव या रस्त्याने मनमाडच्या दहा-बारा किलोमीटर अलिकडे अंकाई रेल्वे स्टेशन व पुढे उजव्या हातास अंकाई गावाकडे जाणारा रस्ता लागतो. रेल्वे स्टेशनपासूनच हे किल्ले दिसू लागतात. यांना वळसा घालून ‘अंकाई’ गावात पोहचायचे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव होय.
समुद्रसपाटीपासून साधारण ९६० मीटर उंचीवर अंकाई तर ८५० मीटर उंचीवर टंकाई किल्ला आहे. अजिंठा-सातमाळा या डोंगररांगेवर हे दोन दुर्गवीर मोठ्या दिमाखात उभे आहेत. इ.स. १६३५ मध्ये शहाजहानचा सेनापती खान याने हे किल्ले ताब्यात घेतल्याचा उल्लेख आहे. मराठ्यांच्या शेवटच्या युद्धात एप्रिल १८१८ मध्ये किल्लेदाराने हे किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन केले. दक्षिणेकडील गोदावरीचे खोरे व उत्तरेकडील गिरणेचे खोरे, खानदेश या मुलखांवर नजर ठेवण्यासाठी हे दुर्गवीर महत्त्वाचे होते. गावात पोहचल्यावर किल्ल्यांचे भव्य-दिव्य रूप आपल्या पुढ्यात उभे राहते. डावीकडे अंकाई आणि उजवीकडे असलेला टंकाई यांच्या दरम्यान असलेली खिंड आपले लक्ष वेधून घेते. गावातून पुढे बाभळीच्या रानातून वाट काढत दोन गडांच्या पायथ्याशी असणार्‍या लेण्यांकडे आगेकूच करायची. वाटेत बुलबुल, मैना, चिमण्या झाडून सारे बाभळीच्या शेंगावर ताव मारताना दिसतात. पक्ष्यांचा चिवचिवाट कानी पडतो. लेण्यांकडे जाणार्‍या पायवाटेवर पायऱ्या केलेल्या आहेत. थोड्या वेळाच्या चालीनंतर आपण लेण्यांच्या परिसरात पोहोचतो. लेण्यांकडे पाहून डोळ्यांचे पारणेच फिटते. ही लेणी जैन धर्मीयांची असावीत. या लेण्यांमध्ये इंद्रदेव, शांतिनाथ, पार्श्वनाथ आदींच्या सुबक मूर्ती पहायला मिळतात. एकूण सात लेणी आहेत. चौथ्या गुहेत शंकर भगवानांची ध्यानस्थ बसलेली मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. या सर्व लेण्यांमधील बऱ्याचशा मूर्ती भग्नावस्थेत आहेत. परंतु जे काही आहे ते अप्रतिमच…! छतांवर केलेले कमलपुष्पाचे नक्षीकाम अफलातून. काही गुहांना खिडक्या आहेत. तसेच त्यांच्या प्रवेशद्वापाशी शेपूट उंचावलेल्या सिंहाचे शिल्प कोरलेले आहे. पहिल्या गुहेच्या दरवाजाच्या चौकटीतून आत शिरल्यावर वाघावर स्वार झालेली तांबडा मळवट अन् करारी नजर असलेली देवीची मूर्ती दिसते. जणू काही रणांगण गाजवून आलेल्या विजेतीचा थाटच. तिच्यासमोर नतमस्तक व्हायचे अन् दर्शन घेऊन गडाकडे आगेकूच करण्यासाठी बाहेर पडायचे.
     लेण्यापाहून डावीकडील पायऱ्यांच्या वाटेने दोन दुर्गांना जोडणाऱ्या खिंडीकडे मार्गस्थ व्हायचे. ही खिंड भक्कम तटबंदी घालून बंदिस्त करण्यात आली आहे. यामुळे गडावर जाण्याचा मार्ग संरक्षित केलेला दिसतो. खिंडीत पोहोचायचा मार्ग खडतर व बिकट आहे. चढण थोडी कठीण व दमछाक करणारी आहे. नागमोडी वाटेने खडकात कोरलेल्या पायऱ्या चढून आल्यावर एक दरवाजा व तटबंदी दिसू लागते. पुढे हा नागमोडी वळणाचा रस्ता खडकाच्या कड्याकडे जातो. इथेही एक दरवाजा व तटबंदी नजरेस पडते. इथून गडावर जाणारी वाट धरायची. थोडे वर चढून आल्यावर एक प्रवेशद्वार दिसते. या दरवाज्यातून आत प्रवेश करायचा. डावीकडे कातळावर चढल्यावर समोर अंकाईचे मुख्य प्रवेशद्वार आपल्या स्वागताला तयारच   असते. मागे टेकाई किल्ल्याच्या पायऱ्या आणि दरवाजा स्पष्ट दिसतो. अंकाईच्या मुख्य प्रवेशद्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे याला दोन रांगड्या, पोलादी, षट्कोनी बुरुजांचे संरक्षण लाभले आहे. प्रवेशद्वाराची भव्य दिव्यता पाहत आत प्रवेश करायचा. आत आल्यावर समोर गुंफा आणि उजव्या बाजूला जिना दिसतो.  लेण्यांची कलाकुसर पाहून जिना गाठायचा. जिना चढून वर आल्यावर डोंगराच्या नाकाडावर दुहेरी तटबंदी आणि संरक्षक दरवाजे बांधलेले दिसतात. कातळ जिन्याच्या पायऱ्या मधोमध दुभंगल्या आहेत. थोडे अजून वर चढून जायचे. माथ्यावरील अजून एक टेकाड आपली वाट पाहत असते. या राकट कणखर सह्याद्रीची हीच तर खरी खासियत आहे. एकामागून एक टेकाड. पायथ्याला सामान्य वाटणारे किल्ल्यांचे वर पोहोचल्यावर खरे कळते. पण सह्याद्रीच्या राकटपणात आणि ओबडधोबडपणातही तितकेच प्रेम दडलेले असते.
अंकाई-टंकाईचा उल्लेख काही ठिकाणी अणकाई-टणकाई असाही केला जातो. या जोडदुर्गातील अंकाई किल्ला महत्त्वाचा आहे. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून मुख्य किल्ल्याजवळ जोडून असलेला दुसरा डोंगर हा मुख्य किल्ल्याला बाधक ठरू शकतो. म्हणून तो दुर्गम करण्यात येतो. तसेच त्याला भक्कम तटबंदीचे शेलापागोटे चढवून मुख्य किल्ल्यामध्ये समाविष्ट केले जाते. त्यामुळे टंकाई हा अंकाईचा जोडदुर्ग झाला  आहे. अंकाईच्या गडमाथ्यावरून फेरफटका मारताना कातळात कोरलेल्या काही गुहा दिसतात. स्थानिक लोक यांना ‘सीता गुंफा’ म्हणतात. यातील एका गुहेत अगस्ती ऋषींचे मंदिर आहे. गुहेपासून पुढे गेल्यावर विस्तीर्ण पठार नजरेस पडते. या पठारावर मोठे तळे आणि तळ्याच्या बाजूला पश्चिम टोकाजवळ राजवाड्याचे पडझड झालेले अवशेष पाहायला मिळतात. गतकाळाची वैभव संपन्नता कमी झाली असली तरी रुबाब तोच आहे असे लक्षात येते. वाड्याचे अवशेष पाहत पुन्हा परतीला निघायचे. गडमाथ्यावरून चौफेर नजर फिरवली असता मनमाड शहर, गोरखगडचा डोंगर आणि हडबीची शेंडी म्हणजेच थम्सअपच्या आकाराचा सुळका नजरेस पडतो. किल्ल्यावरून दिसणारी मनोहारी दृश्ये कॅमेऱ्यरत बंदिस्त करून अंकाईचा निरोप घेत टंकाई किल्ल्याकडे निघायचे.
पुन्हा अंकाईच्या पायऱ्या उतरून खिंड गाठायची. खिंडीतून उजव्या हाताला असलेल्या पायऱ्या चढून शिवाजी महाराजांचा जयघोष करत टंकाईवर चढाई करायची. वाटेत मागे बघताना अंकाईचे खिंडीत बांधलेल्या तटबंदीचे दर्शन आपल्याला खिळवून ठेवते. साधारण शे-दीडशे पायऱ्या चढून आपण टंकाईच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. अंकाईच्या मानाने टंकाई कमी उंचीचा आहे. अंकाईपेक्षा भव्यदिव्यता कमी असली तरी रांगडेपणा तोच आहे. महाराष्ट्रात असे अनेक जोडकिल्ले आहेत. उदाहरणे द्यायची झालीच तर, पुरंदर-वज्रगड, लोहगड-विसापूर, चंदन-वंदन, मुल्हेर-मोरागड इत्यादी. मुख्य किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी हे बांधले जायचे. ‘जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष करत दरवाज्यातून आत प्रवेश करायचा. मागे वळून पाहिले असता अंकाई महादेवाच्या पिंडीसारखा भासतो. पुढे गेल्यावर डावीकडे महादेवाचे मंदिर आणि पाण्याचे टाके आहे. महादेवाला वंदन करून पुढची पायपीट करायची. वाटेत मोठे पठार अन् अधूनमधून डोकावणाऱ्या गतवैभवाची साक्ष देत भग्नावस्थेत उभ्या असलेल्या वाड्यांचे दर्शन होते. गडमाथ्यावर जास्त अवशेष नाहीत. गड तसा आटोपशीर आहे. माथ्यावरून उजवीकडे पाहिले असता हडबीची शेंडी म्हणजे थम्सअपसारखा दिसणारा सुळका सह्याद्रीच्या वारकऱ्यांना जणू काही शुभेच्छा देत असतो. शुभेच्छांचा स्वीकार करत गडफेरी करून पुन्हा खिंडीत पोहोचायचे अन् अंकाई गावात येऊन दोन्ही किल्ल्यांचा निरोप घ्यायचा