*अग्निदिव्य*
*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*
*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔*
*___⚔🚩⚔📜🚩_______*
*कुलीखानाच्या तुकड्या बऱ्हाणपूरच्या छावणीतून कूच करीत असतानाच दाऊदखानाचे खास टपाल घेऊन सांडणीस्वार दिल्लीच्या दिशेने सुटले. त्या खलित्यात कुलीखानाने आखलेली छावणीची व्यवस्था, त्याने ती व्यवस्था राबविण्यासाठी स्वत: घेतलेला पुढाकार आणि औरंगाबादेस जाऊन आगाऊ तजवीज करून ठेवण्याची खटपट वगैरे सारा तपशील तिखटमीठ लावून रसभरित वर्णन करून दिला होता. अनेक गोष्टींचे परस्पर श्रेय लाटण्यात आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात त्याने कसर सोडली नव्हती.*
*शिरस्त्याप्रमाणे थैली वजीर जाफरखानाकडे आली. दाऊदखानाचा खलिता त्याने हातातली सारी कामे संपवून निवांतपणे उघडला. लोडावर रेलून बसून तो आरामात खलिता वाचायला लागला आणि वाचता-वाचता एकदम ताठ झाला. त्याच्या मस्तकात झिणझिण्या उठू लागल्या. दिवसाउजेडी डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले. दाऊदखानासारख्या अनुभवी दरबाऱ्याने, अत्यंत जबाबदार, म्हणजेच सर्वसामान्य लोक ज्यास पाताळयंत्रीपणा म्हणतात त्यात नावाजलेल्या मुत्सद्द्याने, बादशहाच्या अत्यंत भरवशाच्या माणसाने, असे वागावे याचे कोडे जाफरखानाला उलगडेनासे झाले. अफू मिसळलेल्या मोहाच्या दारूचे दोन-तीन पेले पोटात गेले, तेव्हा कुठे त्याचे डोके थोडे ताळ्यावर आले. तो आपल्या धन्याला पुरता ओळखून होता. दाऊदखानाच्या या खलित्यावर बादशहाची प्रतिक्रिया काय होणार याचे चित्र त्याला डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट दिसू लागले. कुलीखानाला एकट्याला स्वतंत्रपणे फौज घेऊन महाराष्ट्रात जाऊ देणे हा मोठा भयंकरच प्रकार होता. शेवटी त्याने बादशहाचा सर्वांत विश्वासू सल्लागार दानिशमंदखान याचाच सल्ला घेण्याचे ठरविले. त्याला बोलावून घेण्यात वेळ न दवडता तो स्वत:च पालखीत बसून दानिशमंदखानाच्या हवेलीवर पोहोचला. साम्राज्याचा मुख्य वजीर असा अकस्मात आणि वर्दी न देता घरी आलेला पाहून दानिशमंदखानाची मोठी तारांबळ उडाली. भेटीचे नेहमीचे दरबारी सोपस्कार बाजूला सारून जाफरखानाने दाऊदखानाच्या खलित्यातली हकिकत भडाभडा सांगून टाकली.*
दानिशमंदखान तुम्हाला तर माहीत आहेच, आलाहजरत कुलीखानाच्या संबंधाने किती सावध असतात ते. तो अगदी हिंदुस्थानापासून दूर अफगाणिस्तानात असतानासुद्धा आलाहजरतांनी किती कडक निगराणी ठेवली होती. त्याला या दख्खन मोहिमेवर रवाना करण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा त्यांनी आपल्या मनातला शक माझ्यासमोर जाहीर केला होता. आणि आता या मूर्ख दाऊदखानाने त्याला एकट्याला त्याच्या स्वत:च्या मुलखात रवाना केले आहे. आता त्याच्या फौजेत हिंदूसुद्धा आहेत. त्यांना फितवून कुलीखानाने काही फितवा केला तर आलाहजरत माझीसुद्धा खैर करणार नाहीत.
हे तर खरेच, पण ही गोष्ट आलाहजरतांपासून लपवून ठेवणे शक्यच नाही. त्यांचे स्वत:चे खबऱ्यांचे स्वतंत्र जाळे आहे. कित्येकदा असे घडते की, खबर त्यांना आधीच मिळालेली असते, पण ते आपल्याकडून बातमी सांगितली जाण्याची वाट बघतात; त्यामुळे ही खबर दडपण्याची कोशिश झाल्याचे उद्या उघड झाले तर? आणि ते लपून राहणे शक्यच नाही. मग तर त्याचा नतीजा अधिकच खतरनाक असेल. या सर्व पेचिद्या प्रसंगात जनाब वजीरेआझम साहेबांची माझ्यासारख्या एका नाचीज खोजाकडून काय अपेक्षा आहे?
अत्यंत नावडती गोष्टसुद्धा आलाहजरतांच्या गळी कशी उतरवायची याचे नेमके कसब तुमच्याकडे आहे. हा खलिता मी आलाहजरतांना पेश करीन तेव्हा तुम्ही माझ्यासोबत असावे आणि त्यांचा गुस्सा ठंडा करावा अशी माझी इंतजा आहे.
जहे किस्मत. मुघलिया सलतनतीचे मुख्य वजीरेआझम, उमदेतुल मुल्क, जनाबे आली हजरत जाफरखान हुजूर या प्राणाशी गाठ पडू शकणाऱ्या जोखमीच्या कामासाठी आपण या नाचीज खोजाला लायक समजलात हा गुलामाचा मोठा गौरव आहे. अलहमदुल इलल्लाह। पण वजीरेआझम हा सियासी मामला आहे. माझ्यासारख्या गुलामाने आपल्याला हे सांगणे ठीक नाही की, जेव्हा आलाहजरत सियासी बाबींची चर्चा करतात तेव्हा ते विषयाशी संबंध नसलेल्या व्यक्तीची दखलअंदाजी बरदाश्त करीत नाहीत. कित्येकदा त्यांनी जहाँआरा बेगमनासुद्धा खरीखोटी सुनावली आहे. मामला पेचिदा आहे यात दो राय नाही. बाब आपल्याच अखत्यारितील असल्यामुळे तिचा मुकाबला आपल्यालाच करावा लागणार. कोई चारा नहीं. गुलाम फक्त एकच मशवरा देऊ शकतो, तो म्हणजे दाऊदखानावर जे कोसळेल ते कोसळू दे. आपण त्याची तरफदारी करण्याची वा बचाव करण्याची कोशिश करू नये. बाकी हुजुरांचा अनुभव गुलामापेक्षा मोठा आहे.
दानिशमंदखानाने सोबत राहावे म्हणून जाफरखानाने बराच आग्रह करून पाहिला, पण तो काही बधला नाही. अखेर जाफरखान एकटाच बादशहाच्या भेटीसाठी निघाला. अजून कोणाचा सल्ला घेऊन वेळ वाया दवडण्याची आणि गोष्ट षटकर्णी करण्यापेक्षा त्याने दानिशमंदखानाच्या हवेलीतून तडक लाल किल्ला गाठणे पसंत केले.
जाफरखान लाल किल्ल्यात पोहोचला तेव्हा जुम्म्याच्या नमाजानंतर चालणारी बादशहाची मोती मशिदीबाहेरची मजलिस आटोपून तो शुक्रवारच्या धार्मिक चर्चेसाठी खास राखून ठेवलेल्या महालात मुल्ला-मौलवींशी धार्मिक चर्चा करीत बसला होता. विशेष म्हणजे जाफरखानासारख्या वयोवृद्ध सर्वोच्च दरबारी मानकऱ्यालासुद्धा बादशहासमोर बसण्याची परवानगी नव्हती, मात्र हे मुल्ला-मौलवी बादशहासमोर खुशाल बसत असत. एवढेच नव्हे तर बादशहा त्यांना खाऊ-पिऊ घालून त्यांची सरबराईसुद्धा करीत असे; त्यामुळे ही मुल्ला-मौलवी मंडळी मोठ्या गुर्मीत राहत असत.
जाफरखानाने बादशहाकडे वर्दी पाठवून भेटीची इजाजत मागितली. बादशहाने साफ नकार कळविला. पण जाफरखानाने चिकाटी सोडली नाही. त्याने देवडीवरच्या दरोग्यालाच खुद्द वर्दी घेऊन पाठविले. धर्मगुरूंच्या मजलिसमध्ये कोणी व्यत्यय आणलेला बादशहास खपत नाही हे माहीत असल्याने दरोगा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करीत होता, पण अखेर साम्राज्याच्या मुख्य वजिराचा हुकूम डावलणे त्याला शक्य झाले नाही. भीतभीत तो बादशहासमोर उभा राहिला. अंगार बरसणारी हिरवी नजर टाळीत त्याने कशीबशी वर्दी दिली–
गुस्ताखी माफ आलमपन्हा, लेकिन गुलाम मजबूर है। जनाबे आली वजीरेआझम हुजूर दख्खन मुहीम के मुतालिक तनहाई में खबरे अहमियत कहना चाहते है।
अत्यंत नाखुशीने बादशहाने जाफरखानाला भेटीची इजाजत फरमावली. कुर्निसात करून जाफरखान खालमानेने समोर उभा राहिला. उष्ट्या-खरकट्या तश्तरींच्या कोंडाळ्यात बसलेल्या धर्मगुरूंवरून त्याने नापसंतीची नजर फिरविली. बादशहाची थंड प्रश्नार्थक हिरवी नजर त्याला जाळत होती. कपाळावरच्या आठ्यांचे जाळे सख्त नाराजी जाहीर करीत होते. पण तिकडे दुर्लक्ष करणे भाग होते. जाफरखान हलकेच पुटपुटला–
तनहाई में.
बादशहाचा अखेर नाइलाज झाला.
तखलिया.
धर्मचर्चा आणि त्याहीपेक्षा शाही मिष्टान्न अर्धवट सोडून जावे लागल्याने गुर्मीत असणारे मुल्ला-मौलवी वजिरावर डोळे वटारत, पण मुकाट्याने महालाच्या बाहेर पडले.
जाफरखान तुला माहीत आहे, आज जुम्म्याच्या पवित्र दिवशी माबदौलतांना दीन आणि इबादत याशिवाय सारे वर्ज्य असते.
जी आलमपन्हा. आलाहजरतांच्या दीनी मजलिसमध्ये व्यत्यय आणल्याबद्दल गुलामाला सख्त अफसोस आहे. पण मामला बडा पेचिदा आहे. दख्खनमधून दाऊदखानाचा खास खलिता आला आहे, महम्मद कुलीखानाच्या संबंधाने. तो आलाहजरतांपर्यंत तातडीने पोहोचवणे गुलामाला गरजेचे वाटते.
शब्द न बोलता बादशहा तसाच रोखून पाहत राहिला. मग एकदम उठून दोन्ही हात पाठीशी बांधून तो महालाबाहेर चालत निघाला. बावचळलेला जाफरखान असहायपणे पाहत राहिला. दारापर्यंत गेलेल्या बादशहाने मागे वळून त्याला मागोमाग येण्याची खूण केली. जाफरखान लगबगीने मागोमाग निघाला. आपल्या खासगी दिवाणखान्यात येऊन बादशहा मसनदीवर बसला. जुम्म्याच्या दिवशी बादशहा दिवाणखान्याकडे फिरकत नसल्याने खोजा आणि खिदमतगारांची मोठीच तारांबळ उडाली.
तो महाल सिर्फ दीनी कारोबार करण्यासाठी आहे. दुनियाई मामल्यांची चर्चा तिथे नको. आता बोल.
आलमपन्हा, दख्खनमधून दाऊदखानाची खास डाक आली आहे. त्याने कुलीखान संबंधाने बरेच लिहिले आहे. ते तातडीने हुजुरांच्या पायाशी पेश व्हावे म्हणून ही बेवक्तची जहमत देण्याची गुस्ताखी करणे भाग पडले.
काय? काय झाले? क्या कुलीखान भाग गया? या फिर त्या बेमुरवत जलील शिवाने त्याला खतम केले? मला टपाल मुळातून वाचून दाखव.
जसजसे पत्र वाचले जात होते, तसतसे बादशहाच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत गेले. त्याच्या अंगाचा नुसता तिळपापड उडाला. दाऊदखानाच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहणे सुरू झाले. शाही तालमीत वाढलेला बादशहा अशा नामांकित शिव्या देताना पाहून जाफरखान स्तंभित झाला. एरवी कुठल्याही प्रसंगी शांत आणि निर्विकार राहणारा बादशहा दरवाजात शेपटी अडकलेल्या मांजरासारखा थयथयाट करू लागला. संतापाने दिवाणखान्यातील वस्तूंची फेकाफेक करू लागला. त्या वेळी दाऊदखान समोर येता, तर आपला मूल्यवान गालिचा बरबाद होईल याची चिंता न करता त्याने त्याचे मुंडके जागच्या जागी, स्वत:च्या हाताने उडविले असते. या धिंगाण्यातच पत्राचे वाचन संपले. काही क्षणांत बादशहाने स्वत:वर ताबा मिळविला. काही वेळ तो पिंजऱ्यातल्या वाघासारखा येरझारा घालीत राहिला. मग काहीसा शांत होऊन पुन्हा मसनदीवर बसला. डोळे अजून आग ओकत होते. जहरी नागासारखे फूत्कार सोडत त्याने बोलण्यास सुरुवात केली.
लाहौलवलाकूव्वत. जाफरखान दाऊदने फार मोठी गफलत केली आहे. या क्षणी तो समोर मौजूद असता, तर माबदौलतांनी आपले हात त्याच्या नापाक रक्ताने खराब करून घेतले असते. त्या मूर्खाच्या एका नादान चुकीमुळे एवढी मोठी आणि महत्त्वाकांक्षी शाही मोहीम पाण्यात जाण्याचा धोका उभा झाला आहे. या मोहिमेत माबदौलतांच्या मोठ्या आशा-आकांक्षा गुंतल्या आहेत, हे त्या बेवकूफला जाहीर आहे. ही काही एखादी सर्वसामान्य मोहीम नव्हे, माबदौलतांनी शाही तख्तावरून पुकारलेला हा जिहाद आहे, हे तो सुअर की औलाद कसे काय विसरू शकतो? त्या मूर्खाने कुलीखानाला एकट्याला स्वतंत्रपणे तापीपार त्याच्या स्वत:च्या मराठी मुलखात पाठवायला मान्यता दिलीच कशी? कुलीखान एकटा, स्वतंत्रपणे, काफिरांचा भरणा असलेली मोठी मातब्बर फौज, तोफखाना, पीलखाना; या अल्ला, ही कल्पना केवढी भयानक आहे. जाफरखान, जेमतेम तीस-पस्तीस हजार फौज घेऊन तो सहा महिन्यांत अफगाणिस्तानसारखा जालीम देश जिंकण्याचा वादा करण्याची हिंमत दाखवतो. आता इथे तर चाळीस हजारांची कडवी ताज्या दमाची फौज, अवघा तोफखाना आणि सारा मुलूख त्याच्या पायाखालचा, त्याने सोबत भरपूर खजिनासुद्धा उचलला असेल, शंकाच नको, मग तर तो कयामत आणू शकतो. या अल्ला, काय म्हणावे दाऊदखानाच्या या बेवकूफीला? थेट खैबरपार अगदी अफगाणसारख्या अति दूरच्या प्रदेशातसुद्धा ज्याच्यावर सतत दहा वर्षे माबदौलतांची कडक नजर होती, इतकी वर्षे ज्याला मराठ्यांचा तर सोडाच, काफिरांचासुद्धा वारा लागू दिला नव्हता, तो कुलीखान स्वतंत्रपणे मराठी मुलखात!
लाहौलवलाकूव्वत!! जाफरखान, काय म्हणावे या नादानपणाला? अय्याशीला चटावून आपले दरबारी इतके नादान झाले आहेत की, केवळ यांच्या भरवशावर राहून राज्य चालवायचे म्हटले तर शिवासारखा एखादा जालीम दुश्मन चार-पाच वर्षांत सरजमीने हिंदमधून इस्लामचे नामोनिशान नष्ट करून टाकील. हे मूर्ख राजपूत, बुंदेले, जाट, मराठे वगैरे हिंदू आपल्या फौजांमधून रक्त सांडत आहेत म्हणून माबदौलत मुघलिया तख्तावर बसून या काफिरांच्या देशातसुद्धा अल्लाच्या नावाने इस्लामी हुकुमत चालवू शकत आहेत. या अल्ला, हा बदतमीज, नादान बेअक्कल दाऊदखान, माबदौलतांची दहा वर्षांची अथक मेहनत मातीमोल करणार. हे मराठे मोठे धूर्त आणि बिलंदर असतात. कदाचित हा पाजी कुलीखान ही सारी फौज आणि सरंजाम घेऊन थेट शिवाला सामील होईल किंवा कदाचित ही आयती चालून आलेली संधी साधून हा बेवफा, बेइमान कुलीखान एकटा तरी शिवाकडे पळून जाईल. त्याला शिवानेच बुढ्ढ्या जयसिंहाकडे पाठवले हा माबदौलतांचा शक खरा असेल, तर तो हमखास असे केल्याशिवाय राहणार नाही. तो शिवासुद्धा मोठा बिलंदर आहे. पूर्वी त्याने आपल्या मेहुण्याला हिंदू करून घेतले होते. आता तो कुलीखानाला पण हिंदू करून घ्यायला कमी करणार नाही. आता तर तो स्वत:ला काफिरांचा सर्वसत्ताधीश सुलतान म्हणवून घेतो. पंडितांना मोठी लालूच दाखवून वा जबरदस्ती करून आपली मनमानी करायला तो भाग पाडू शकतो. खुदा ना खास्ता असे झाले तर तो नामुराद शेकडो-हजारो मुसलमानांना पुन्हा हिंदू करून घेण्याचा नवा खटाटोप उत्पन्न करून इस्लामसाठी खतरा पैदा केल्याशिवाय राहणार नाही. या अल्ला, काय करावे आता? या नामुराद हरामखोर दाऊदखानाचे आता काय करावे?
बादशहा पुन्हा उठून येरझारा घालू लागला. अशा परिस्थितीत नेमके काय बोलावे हे न सुचून जाफरखान मुकाट उभा राहिला. काही वेळाने बादशहाचे मन स्थिर झाले. त्याने लिखाणाचे सामान घेऊन मुन्शीला बोलावून घेतले. दाऊदखानाच्या नावाने धाडायचे फर्मान तो स्वत:च सांगू लागला. त्याचा अवघा संताप, चीड आणि मनस्ताप शब्दाशब्दांतून व्यक्त होत होता. एकेक शब्द म्हणजे जळता निखारा होता. जाळून भस्म करणारा. फर्मानात दाऊदखानाला जशा भरपूर शिव्या होत्या तशाच धमक्यासुद्धा होत्या. बादशहाच्या धमक्या पोकळ नसतात हे अवघी सलतनत जाणून होती. कुलीखानाला जसा असेल तसा, जरूर पडली तर मुसक्या आवळून तळावर परत आणण्याचा हुकूम बादशहाने दिला. हुकमाची तामील करण्यासाठी दोन-तीन नामांकित सरदारांसोबत आठ-दहा हजार फौज देऊन फर्मान मिळताक्षणी रवाना करण्याचासुद्धा हुकूम दिला. पत्रातला विखार आणि अंगार बघून पत्र लिहून घेणारा मुन्शी थराथरा कापू लागला. डाव्या हाताने कपाळावरचा घाम पुसता पुसता त्याची पुरेवाट झाली.
हातोहात बादशहाने दिलेरखानाच्या नावे दुसरे फर्मान सांगण्यास सुरुवात केली. त्यात कुलीखान संबंधाने विशेष काही न लिहिता औरंगाबादवरून शिवाच्या दौलतीत जाणाऱ्या सर्व वाटा रोखून धरण्याचा आणि पुढील हुकूम मिळेपर्यंत कोणाही मोगली अंमलदारास मुघली सीमा ओलांडण्याची सख्त मनाई करण्याचा हुकूम जारी केला. कुणी शिवाच्या दौलतीवर हल्ला करण्याचा बहाणा केला तरी त्यास रोखण्याचा इशारा दिला. इतकेच नव्हे तर व्यापारी काफिले आणि लमाणांचे तांडेसुद्धा या हुकमास अपवाद न करण्याची सख्त ताकीद दिली.
जाफरखान, ही दोन्ही फर्माने आजच्या आज अष्टौप्रहर दौडणाऱ्या जासूदांच्या हातून दख्खनमध्ये रवाना कर. दाऊदच्या या पत्राची खबर बाहेर फुटू देऊ नकोस. माबदौलत या संबंधाने नवी फर्माने लवकरच जारी करतील.
जो हुकूम आलमपन्हा.
मुन्शीला पुढे घालून जाफरखान बाहेर पडला तेव्हासुद्धा त्याच्या पायांची थरथर थांबली नव्हती. या प्रकरणाची झळ त्याला लागू न दिल्याबद्दल तो अल्लाचे मनोमन आभार मानीत होता.
बादशहाचे फर्मान वाचताच दाऊदखानाची धुंदी क्षणात उतरली. त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले. बादशहाच्या खफा मर्जीचा नतीजा काय काय असू शकतो त्याने डोळ्यांनी पाहिले होते. वेळ न गमावता त्याने इखलासखान आणि मीर अल्तमशखान यांना आपल्या डेऱ्यात बोलावून घेतले. शाही फर्मानातील ‘बराचसा’ भाग गाळून फक्त कुलीखानासंबंधीचा भागच त्यांच्या कानावर घातला आणि त्याला परत घेऊन येण्याच्या बादशहाच्या हुकमाची तामील करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविली. त्यांच्यासोबत दहा हजारांची फौज तैनात करून दिली. पण कितीही घाई करायचे म्हटले तरी मोगली कारभारात एवढ्या फौजेचा बारदाना हलवायचा म्हणजे चार-पाच दिवस लागणारच. त्याने कितीही जपायचे आणि लपवायचे म्हटले तरी शाही फर्मानाच्या गोष्टी फौजेत पसरल्याच; त्यामुळे त्याला तातडीने काही करणे भाग होते. त्याने त्याच्या अत्यंत विश्वासातील चार नजरबाज कुलीखानाची खबर काढण्यासाठी लगोलग रवाना केले. तापी पार झाल्यावर लगेचच नजरबाजांना खबर मिळाली की, कुलीखान साल्हेर गडाजवळ जंगलात मुक्काम करून आहे. नजरबाजांच्या तुकडीने झपाट्याने दौड मारून कुलीखानाचा पडाव गाठला. त्या वेळी दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होती. नर्दुल्लाखानाने नजरबाजांच्या जुमलेदारास कुलीखानासमोर पेश केले. त्याची गुर्मी आणि तोरा पाहून काहीतरी बिनसले असल्याचे कुलीखानाच्या लगेच लक्षात आले.
असलाम आलेकुम जनाबे आली. हजरत सरलष्कर हुजूर साहब का पैगाम पेश करने की इजाजत हो.
इर्शाद.
हजरत सरलष्कर हुजूर आपल्या दिरंगाईमुळे सख्त नाराज आहेत आणि त्यांनी आपल्याला असाल तसे ताबडतोब हुजूर दाखल होण्याचा हुकूम बजावला आहे. तेव्हा हुजुरांनी आमच्यासोबत आजच बऱ्हाणपूरकडेच कूच करावे.
गोड गोड बोलण्यात गुंतवून कुलीखानाने त्याच्याकडून अवघी वित्तंबातमी काढून घेतली. फौज औरंगाबादेस हलविल्याने आलाहजरत कसे खफा झाले आहेत आणि त्यांनी अष्टौप्रहर दौडवत दाऊदखानास कसे कडक फर्मान पाठविले आहे. इतकेच नव्हे तर अशा प्रकारचेच फर्मान दिलेरखानाकडे पण पाठविले आहे वगैरे सारे त्याने सांगून टाकले. हे ऐकून कुलीखान मनातून हादरला. मनात अशुभाची पाल त्याच्या चुकचुकली. आपली छावणीची योजना आणि आत्ता आपण करीत असलेली कारवाई यामधून बादशहाने नेमके तर्क काढले असणार हे अनुभवाने लगेच त्याच्या लक्षात आले. मात्र वरकरणी काहीच न दाखविता त्याने नजरबाजांचा चांगला पाहुणचार केला. त्यांना थोडा अहेरसुद्धा केला. मोठ्या इतमामाने त्यांना निरोप देताना त्याने दाऊदखानाला संदेश दिला. कोणतीही काळजी करू नये, औरंगाबादेत सर्व व्यवस्था पूर्ण झाल्या आहेत, तीन-चार दिवसांत इथला मुक्काम हलवून सर्व तपशीलवार पडताळा देण्यासाठी बऱ्हाणपुरास दाखल होत असल्याचा हा संदेश होता. त्याशिवाय जिहादसाठी आपण कसे कटिबद्ध आणि बादशहाशी कसे वचनबद्ध आहोत याचासुद्धा वळसा दिला. मोहोरबंद न केलेला, वजिराच्या नावे लिहिलेला एक खलितासुद्धा त्याने जुमलेदाराच्या हवाली केला. त्या खलित्यात त्याने बादशहा, मुघल तख्त आणि इस्लाम यांवरच्या आपल्या निष्ठांचे मोठे जोरकस चित्र रंगविले. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत आपण जिहाद लढत राहू अशी फुशारकीसुद्धा मारली. बादशहाच्या मनातील संशय आणि गैरसमज दूर करावा अशी विनंती मोठ्या आर्जवी भाषेत वजिराला केली होती. नजरबाज माघारी रवाना झाले.
दरम्यान, बऱ्हाणपुराहून फौजबंद होऊन निघालेल्या इखलासखान आणि मीर अल्तमशखान यांची आणि नजरबाजांची तापीपासून दोन मजलांवर गाठभेट झाली. कुलीखानाशी झालेल्या भेटीचा रसभरित तपशील जुमलेदाराने दोन्ही खानांस सांगितला. एवढेच नव्हे तर मोहोरबंद नसलेले पत्रसुद्धा वाचायला दिले. सारा वृत्तान्त ऐकून आणि ते पत्र वाचून दोन्ही खान कुलीखानाबाबत अगदी निश्चिंत झाले. आलाहजरत विनाकारण प्रत्येकाचा संशय घेत असतात; त्यातलाच हा प्रकार. कुलीखान चार-पाच दिवसांत परत येतोय तर उगीच भरउन्हाळ्यात या निपाण्या देशात रखडपट्टी करण्यापेक्षा इथेच त्याची वाट पाहावी आणि त्याला सोबत घेऊन बऱ्हाणपूर गाठावे. म्हणजे कोणतीही दगदग न करता शाही हुकमाची तामील केल्याचे श्रेय अनायासे पदरात पडेल. नजरबाज बऱ्हाणपुराकडे रवाना झाले, खानांनी छावणी टाकली. फौज सुस्तावली.
नजरबाज बऱ्हाणपुरास पोहोचले. कुलीखानाच्या भेटीचे वृत्त दाऊदखानास रुजू झाले. मिळालेल्या अहेरास जागून जुमलेदाराने कुलीखानाच्या बाजूने त्यात थोडे मीठ-तिखटसुद्धा घातले. कुलीखान बऱ्हाणपुरास येण्यासाठी निघाल्याचे ऐकून त्याच्या जिवात जीव आला. वजिराला लिहिलेले पत्र वाचून तर त्याला अधिकच हायसे वाटले. मीर अल्तमश आणि इखलासखान यांची वाटेत भेट झाल्याचे आणि ते दोघे कुलीखानास सोबत घेऊन येणार असल्याचे जुमलेदाराने सांगताच दाऊदखानाला शाही हुकमाची आपण ताबडतोब पूर्ण तामिली केल्याबद्दल अगदी कृतकृत्य वाटले. त्याने लगोलग वजिरासाठी खलिता लिहिण्यास घेतला.
कुलीखानासंबंधाने काळजीचे कोणतेच कारण नसून तो बऱ्हाणपूरच्या वाटेवर आहे. आलाहजरतांच्या वतीने त्याने जिहाद पुकारला असून जोपर्यंत सारी दख्खन दार-उल-इस्लाममध्ये तबदील करीत नाही तोपर्यंत तलवार म्यान न करण्याची त्याने शपथ घेतलेली आहे. वगैरे तर लिहिलेच त्याशिवाय आपण कुलीखानाबाबत किती आणि कसे सावध आहोत, त्याच्यावर सख्त नजर राहील याची कशी तजवीज केली आहे, त्याच्यासोबत पाठविलेल्या फौजेत काफिर अधिकारी आणि सैनिक असणार नाहीत याची आपण कशी काळजी घेतली आहे; त्याशिवाय त्याच्यासोबत खान-इ-सामान इफ्तीखारखानास रवाना केले असून, तो औरंगाबादेतच कसा तळ ठोकून राहणार आहे वगैरे फुशारकी मारण्यास तो विसरला नाही. त्याशिवाय इखलासखान आणि मीर अल्तमश त्याला बंदोबस्ताने कसे आणत आहेत वगैरे तपशिलाने कळविले. हा खलिता आणि कुलीखानाने वजिरास लिहिलेले पत्र एकाच लखोट्यात मोहोरबंद करून त्याने अष्टौप्रहर दौडणाऱ्या जासूदांच्या हाती दिल्लीस रवाना केले.
दाऊदखानाचे ताजे टपाल हाती येताच वजीर जाफरखानाने हातातली सारी कामे एका बाजूला सारून दोन्ही पत्रे वाचून काढली. पत्रे वाचून त्याचा जीव भांड्यात पडला. दख्खनमधून काय खबर येते आणि बादशहाची वीज कोणाकोणावर कसकशी कोसळते या काळजीपायी गेले कित्येक दिवस त्याचा जीव थाऱ्यावर नव्हता. काही वेळ तो डोळे मिटून स्वस्थ बसून राहिला. समाधान साजरे करण्यासाठी त्याने दारूचे दोन पेले झपाट्याने रिचविले. तोंडाचा वास लपविण्यासाठी सुगंधी किवाम आणि केशर-कस्तूरी घातलेले पान तोंडात कोंबले आणि तो तडक बादशहाच्या मुलाखतीसाठी निघाला.
बादशहा जनानखान्यातल्या आपल्या महालात बसून काही कौटुंबिक तंटे सोडविण्यात मश्गूल होता. जाफरखानाने वर्दी पाठविली–
कुलीखान के मुतालिक हालात-ए-हाजरा बयान करना है.
बादशहाने तातडीने समोरचे कामकाज बंद केले आणि सर्व बेगमांना महालातून बाहेर जाण्याचा हुकूम दिला. कुर्निसात करीत वजीर आत आला.
क्यों जाफरखान, चेहरा खिलाखिलासा दिसतो आहे.
जी आलमपन्हा, खबर तशीच समाधान देणारी आहे.
प्रथम त्याने दोन्ही पत्रांचा गोषवारा तोंडी सांगितला आणि नंतर पत्रे मुळातून वाचून दाखविली. पत्रे ऐकून बादशहाचा राग थोडा निवळला. पण फुणफुण शिल्लक राहिलीच.
कुछ भी कहो जाफरखान, पण काहीतरी गडबड होणार असल्याची शंका अजून मनातून जात नाही. माबदौलतांना अजून असे वाटते की, कुलीखानाला दिल्लीत वापस आणावे आणि माबदौलत जातीनिशी दख्खनमध्ये उतरतील तेव्हाच त्याला सोबत न्यावे आणि इस्लामची सेवा डोळ्यांदेखत करवून घ्यावी.
आलमपन्हा, आमच्यासारख्या पापी माणसांना जे दिसत नाही, जाणवत नाही ते आलाहजरतांना स्पष्ट दिसते म्हणून तर अवघी आवाम हजरतांना जिंदा पीर म्हणून पुकारते. मगर गुस्ताखी माफ हुजूर, कुलीखानाने पवित्र कुराणावर हात ठेवून कसम घेतली आहे. धर्मांध मराठे आता दहा वर्षांचा अरसा गुजरल्यानंतर त्याला जवळ करतील असे गुलामाला वाटत नाही. सियासतच्या नजरियाने विचार केला तरी शिवाला त्याची आता काही गरज वाटत असेल असे जाणवत नाही, कारण कुलीखानाच्या गैरहाजरीत शिवाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. नेताजी माने दुसरा शिवा यह अब तारीख बन चुकी है, हकिकत नहीं. लिहाजा गुलामाला असे वाटते की, इतक्यात घाई करू नये. वाटल्यास एखादा भरवशाचा माणूस त्याच्यावर खास नजर ठेवण्यासाठी म्हणून पाठवावा. माझा माणूस त्याच्यावर नजर ठेवून आहेच. शिवाय जनाब महाबतखानांचा माणूस त्याचा अंगरक्षक म्हणून आजसुद्धा त्याच्या मागे सावलीसारखा आहेच. त्या दोघांकडूनही काही संशयास्पद वाटावे अशा खबरा नाहीत. तरीसुद्धा दाऊदखानाला सख्त सावधगिरीच्या गुप्त सूचना पाठवाव्यात. दिलेरखान लवकरच दख्खन मोहिमेच्या या फौजेत शरीक होणार आहे. त्याला तातडीने औरंगाबादेस डेरेदाखल होण्याचा हुकूम करावा आणि कुलीखानाच्या नकळत पण तो सतत त्याच्या नजरेसमोर असेल असे पाहावे, असा हुकूम करावा. तो कुलीखानाला फार पूर्वीपासून नीट ओळखून असल्याने हे काम करण्यास त्याच्याइतका लायक माणूस माझ्या नजरेत नाही. बोलताना जीभ अडखळते. पण गुलाम आलाहजरतांचे मीठ खातो; त्यामुळे तख्ताच्या आणि आलमपन्हांच्या जे हिताचे, ते कोणताही पर्दा न ठेवता आलाहजरतांपर्यंत पोहोचवणे गुलामाचे फर्ज आहे. जान की अमान पाऊँ तो कुछ बयान करने की इंतजा है.
हुं कहो, तुझे म्हणणे माबदौलतांच्या मर्जीस येत आहे. बेहिचक बोल.
गुस्ताखी माफ आलमपन्हा, पण शहजादा अकबरांची लक्षणे ठीक दिसत नाहीत. दुर्गादास राठोडच्या मार्फत तो राजपुतांशी लगट वाढवीत आहे. सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे त्याला जनानखान्यातून फूस आहे. हातात पुख्ता सबूत नसल्याने गुलाम या क्षणी नाव घेणे मुनासिब समजत नाही, पण लवकरच सबूत मिळतील याची खात्री आहे. त्याशिवाय शहजादा मुअज्जम आणि त्यांच्यातली अनबन वाढते आहे. कधी खबरा येतात की, दोघे हातमिळवणी करून काही गडबड करू पाहत आहेत. या सर्व मामल्यात गुलामाने चौकशी सुरू केलीच आहे. लवकरच पुराव्यानिशी मुस्तकीम हकिकत गुलामाच्या हातात येईल. त्या वेळी सारा तपशील आलाहजरतांच्या पायाशी रुजू होईलच. गुलामाला असे वाटते की, काही गडबड होण्याची आलाहजरतांना जी जाणीव होत आहे ती कदाचित या संबंधानेसुद्धा असण्याची शक्यता आहे; त्यामुळे गुलामाला असा मशवरा द्यावा वाटतो की, खबरदारी म्हणून नजीकच्या भविष्यात आलाहजरतांनी दिल्ली सोडून दूर जाऊ नये.
बराच वेळ माळ नुसतीच फिरत राहिली. ओठ कलमा पुटपुटत राहिले. बऱ्याच वेळाने बादशहाच्या ओठातून हलकेच शब्द उमटले–
ठीक आहे. तुझ्या बोलण्यातसुद्धा काही दम दिसतो आहे. कुलीखानाला आखरी मौका देऊन पाहू. त्याच्या मनामध्ये बगावत करण्याचा खयाल येतो आहे अशी हलकीशी खबर जरी आली तरी माबदौलत त्याचा पुरता सत्यनाश करून टाकतील. त्यासाठीच तर त्याचा सारा जनानखाना शाही निगराणीत ठेवला आहे. तू सुचवलेस तसे फर्मान आजच दिलेरखानाकडे रवाना कर. त्याला सरहद्दी मोकळ्या करण्याचा हुकूमसुद्धा रवाना होऊ दे. कुलीखानाच्या खास निगराणीसाठी माबदौलत माणूस रवाना करतील. त्यामध्ये तू दखल देऊ नकोस. माबदौलतांचा जुम्मा खराब केल्याचा दंड म्हणून पन्नास अश्रफींची खैरात फकिरांमध्ये वाटून टाक.
जो हुकूम आलमपन्हा.
पाठ न दाखविता जाफरखान बाहेर पडला.
दाऊदखानाचे नजरबाज मुकाट्याने रवाना झाले खरे, पण कुलीखानाच्या डोक्यात चिंतेचा भुंगा मागे ठेवून गेले. बादशहाचे फर्मान त्याच्या स्थानाला धोका पोहोचविणारे जसे होते तसेच भयाण भविष्याला कारण ठरणारेसुद्धा होते. त्याला बऱ्हाणपुरास नेण्यासाठी निघालेली दहा हजारांची फौज एकदा येऊन थडकली की, सारेच अवघड होऊन बसणार होते. मोठ्या मिनतवारीने जमून आलेला हा मौका हातून निसटला तर पुन्हा कधीच काही हालचाल करता येणार नव्हती. किंबहुना अधिकच सजग झालेला बादशहा अशी संधी कधी उत्पन्नच होऊ देणार नव्हता. ही संधी साधतानासुद्धा जरा गफलत झाली तरी मस्तक धडावर राहणार नाही याची त्याला कल्पना आली. एक वेळ मस्तक उडविले तरी परवडले निदान एका झटक्यात सारे प्रश्न निकालात निघतील. पण क्रूर पाताळयंत्री बादशहा इतक्या सहजासहजी त्याची सुटका होऊ देणार नाही हेसुद्धा तो जाणून होता. सर्वप्रथम बादशहा ओलीस ठेवलेला त्याचा कुटुंबकबिला नष्ट करून टाकणार आणि त्याला पुन्हा एकदा दख्खनमधून उचलून दूर हिमालयपार तिबेटमध्ये किंवा आसामच्या नागा भूमीतील बिकट डोंगरी जंगलांमध्ये मरेपर्यंत कुजवत ठेवणार याचे भय त्याला सतावू लागले. तिबेट जिंकून घेण्याचे वेड कोणा एका मलंगाने बादशहाच्या डोक्यात भरविले होते आणि त्या स्वारीसाठी त्याला नेमका माणूस सापडत नव्हता. कुलीखानाला तिकडे पाठविण्यासाठी त्याला मग आयतेच निमित्त मिळणार होते.
रात्री जेवणानंतर संधी मिळताच त्याने आफताबखानास परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली आणि लवकरात लवकर महाराजांकडून कौल मिळविण्याची खटपट करण्याचा त्याला हुकूम दिला. कुलीखानाचे नशीब त्या सुमारास चांगलेच जोरावर होते म्हणायचे. कारण दुसऱ्याच दिवशी त्याला वद्य चतुर्दशीचा निरोप समजला. त्याला एकदम हायसे वाटले. दुपारी तळ निवांत असताना त्याने आफताबखान आणि नुर्दल्लाखान यांना एकत्र बोलावून योजनेचा सारा तपशील पुन्हा एकदा नीट समजावून घेतला. योजनेत त्यांनी जे करायचे आणि करवून घ्यायचे होते त्या संबंधाने तपशीलवार सूचना दिल्या. कुठेही कच्चा दुवा किंवा संभ्रम राहून गफलत होणार नाही याची खात्री करून घेतली.
नर्दुल्लाखान, आता या विषयावर आपली परत चर्चा होणार नाही; आता फक्त कृती. आपल्याला हीच एकमात्र संधी आहे हे नीट लक्षात ठेव. ही हुकली की सर्वनाश; त्यामुळे केसाइतकी चूक होता कामा नये. आफताब…
जी सरकार…
छापा पडताच तू सगळ्यात प्रथम हाताशी लागेल त्या आपल्या गोटातील माणसाला ठार करून त्याचा मुडदा आमच्या पलंगावर टाकायचास आणि पेटवून द्यायचा. पलंगावर जास्तीच्या चार-दोन गाद्या टाकून ठेव, वरती तेल ओत; म्हणजे मुडदा पुरता जळून राख होईल. गनिमाने आमचा काटा काढला असेच सर्वांना वाटेल.
जी सरकार.
नर्दुल्लाखान, शिकारीनंतर तळावर जेवणाची धांदल सुरू असतानाच सोबतचा सारा खजिना तू आणि तुझी माणसे आपल्या अंगावर लपवून ठेवून सज्ज होतील. पुरेशा पिवळ्या पगड्यांचा किंवा पागोट्यांचा बंदोबस्त लगेचच झाला पाहिजे. गोटातील कोणाला आपल्या बेताचा सुगावा लागतो आहे असा संशय आला तरी काही ना काही निमित्त काढून साफ कापून काढा.
हुकूम सरकार. चिंता करू नका, सारे ठीक होईल. आपणसुद्धा सदासर्वदा सावध राहावे.
वद्य चतुर्दशीचा दिवस उजाडला. तळावर सकाळपासून शिकारीच्या खेळाची धांदल-गडबड उडाली. तळावर पहाऱ्यासाठी फक्त नर्दुल्लाखानाचीच माणसे ठेवून बाकी साऱ्यांना बाहेर काढण्यात आले. अगदी शागिर्द-खिदमतगारालासुद्धा मागे राहू दिले गेले नाही. दिवसभर हाके घालून जंगल पार दणाणून सोडले. एकही जनावर जागेवर राहिले नाही. झाडावर पाखरू बसणे दुरापास्त झाले. सर्वत्र नुसता एकच कल्लोळ भरून राहिला. ओरडून ओरडून घसे सुकले, ढोल-ताशे बडवून हातातले बळ संपले तरी दुपारच्या जेवणासाठीसुद्धा कोणाला उसंत घेऊ दिली गेली नाही. उन्हे कलती होईतो जवळपास आठ-दहा हरणांची शिकार झाली. दोन चांगले भले दांडगे एकुलगेसुद्धा उठले होते, पण डुकराचे मांस मुसलमानांसाठी निषिद्ध म्हणून त्यांना सोडून देण्यात आले. एक बिबट्या थोडक्यात बचावला.
थकूनभागून शिकार बांधून घेऊन मंडळी तळावर परत आली तेव्हा सूर्य साल्हेर गडाच्या आड गेला होता. कुलीखानाने उदार होऊन सारी शिकार शिपायांमध्ये वाटून टाकली. शिपाई एकदम खूश होऊन गेले. त्यांचा जल्लोष थोपवीत त्याने अजून एक घोषणा करून त्यांना सुखद धक्का दिला. त्या रात्रीचा पहारा फक्त नर्दुल्लाखानाचा दस्ता, जो सारा दिवस तळावरच थांबून होता, सांभाळणार आणि बाकीच्यांना पूर्ण आराम करण्यास मोकळीक राहणार. मात्र बऱ्हाणपुरावरून तातडीचे बोलावणे आल्या कारणाने उद्या उन्हे चढण्यापूर्वी तळ उठवून कूच करायचे होते; त्यामुळे रात्री गाणे-बजावणे वगैरे करत जागरण करण्यास सख्त बंदी घालण्यात आली. एका बुजुर्ग जमादाराने चाचरत विचारले–
हुजुरांच्या दर्यादिलीसाठी आणि जर्रा नवाजीसाठी आम्ही सारे एहसानमंद आहोत. लेकिन हुजूर जान की अमान पाऊँ तो कुछ अर्ज करू.
कहो.
हुजूर, उद्या अमावास्या आहे. तळ परवा सकाळी हलवला तर चालणार नाही का?
कुलीखान एकदम संतापला. डोळे काढत तारस्वरात तो ओरडला–
खानदानी मुसलमान म्हणवणाऱ्यांमध्येसुद्धा आजकाल कुफ्र शिरलेला दिसतोय. तुम्हाला माहीत नाही का, सगळे दिवस अल्लानेच निर्माण केले असल्याने सारखेच पाक असतात. पुन्हा कोणी अशी काफिरानी हरकत केली तर खपवून घेतली जाणार नाही. अशी नापाक हरकत इस्लामची नाफर्मानी समजली जाईल आणि शरियतमध्ये त्याची सजा फक्त मौत आहे हे पक्के ध्यानात ठेवा.
नर्दुल्लाखानाची माणसे दिवसभर नुसतीच माश्या मारत रिकामी बसली नव्हती. तर दिवसभरात त्यांनी भरपूर जळण गोळा करून आणले होते. जंगलातल्या भिल्लांकडून मोहाची दारू मिळवून ठेवली होती. कुलीखानाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ती ‘गुपचूप’ शिपायांमध्ये वाटून दिली. दिवसभर दमणूक झालेल्या शिपायांना असा श्रमपरिहार हवाच होता. बऱ्हाणपूर सोडल्यापासून ते या सुखाला आचवले होते; त्यामुळे हरणांच्या चमचमीत सागुतीवर आडवा हात मारताना त्यांनी मोहाच्या दारूचीसुद्धा मनसोक्त मजा लुटली. खाऊन-पिऊन तट्ट होऊन सारा तळ लवकरच गपगार झोपी गेला. जंगली श्वापदांना दूर ठेवण्यासाठी तळाच्या मध्यभागी एक भली मोठी शेकोटी पेटवून ठेवली होती. पहारेकऱ्यांच्या ‘हुश्शार’च्या हाकाऱ्यांशिवाय सारे काही शांत शांत होते. कुलीखानाला मात्र झोप नव्हती. आपल्या पलंगावर तो टक्क जागा होता.
रात्रीचा दुसरा प्रहर चढत होता. नर्दुल्लाखान आणि आफताबखान कुलीखानाच्या डेऱ्यात आले. अगदी हलक्या आवाजात कुलीखानाने हुकूम दिला–
हरएक घोडं जीन कसून तयार ठेवा. आमच्या तंबूच्या पिछाडीला सारी घोडी एकत्र करून ठेवा. जनावरांची तोंडे बंद राहतील याची काळजी घ्या. झोपलेल्यांना चाहूल लागता उपयोगाची नाही. आपण जसे ही घोडी वापरणार आहोत तशीच गडावरून येणारी आणि आपल्यासोबत असणारी शिबंदीसुद्धा हीच घोडी वापरणार आहेत. कारण गडावरून येणारी फौज चालत येणार आहे. तळावर एक जरी घोडा मागे राहिला तर याद राखा. दोनशेच्या दोनशे घोडी आपल्यासोबत आली पाहिजेत. कोणी पळून जाऊ म्हणेल तर एकही जनावर हाताशी असता कामा नये.
अगदी गुपचूप सारी घोडी जीन आणि पडशा कसून एका बाजूला अगदी जय्यत तयार ठेवण्यात आली. नर्दुल्लाखान आणि आफताबखान यांच्यासह प्रत्येकाने अंगरख्याच्या आत ‘खजिन्याच्या बंड्यांमधून’ सारा खजिना अंगावर बांधून घेतलेला होता. त्यात मूल्यवान रत्ने आणि सोन्याच्या लगडींचा मोठा वाटा होता. थोडी म्हणजे काही लाखांची रक्कम अश्रफी आणि रुपयांमध्ये होती. आता फक्त इशारतीची वाट पाहायची होती. मंडळी डोईला पिवळी पागोटी बांधून, लग्नाच्या वऱ्हाडासारखी सजली होती किंवा जणू दंडांना पिवळी फडकी बांधून भामरागडावर शंभू महादेवाच्या यात्रेला निघावीत अशी शोभत होती. सगळा आसमंत नीरव शांततेने भरून गेला होता. दिवसभरात चाळवली गेलेली रानातील जनावरेसुद्धा बहुधा शांत झोपली असावीत. रातकिडे मात्र ठरावीक लयीत किरकिरत वेळ मोजत होते.
साल्हेरच्या बुरुजावरून सरनोबत हंबीरराव मोहिते दूरवर खिंडीच्या पलीकडे मोगलाई हद्दीत असणाऱ्या जंगलात चाललेली धावपळ निरखीत होते. शेजारी डाव्या हाताला बहिर्जी नाईक, तर उजव्या हाताला गडाचा किल्लेदार असे उभे होते. घनदाट झाडोऱ्यामुळे स्पष्ट काही दिसत नसले तरी ढोल-ताशांचे आवाज बऱ्यापैकी ऐकू येत होते. रानश्वापदांची धावपळ आणि भयभीत पक्ष्यांच्या हालचाली जाणवत होत्या. त्यावरून शिकारीचा खेळ पूर्ण जोशात सुरू असल्याचे लक्षात येत होते. हंबीरराव गालातल्या गालात हसत होते. त्यांना रायगडावर झालेली चर्चा आठवत होती. नेताजीरावांबद्दल महाराज एवढे हळवे व्हावेत याचे त्यांच्या मनात पडलेले कोडे सुटतेय अशी अंधूक शंका त्याच्या मनात बहुधा डोकावू लागली असावी.
खिंडीपल्याडच्या मोगली तळावर छापा मारण्याची तयारी जय्यत होती. कडुसे पडण्याच्या बेतासच जेवणे उरकून जय्यत तयार राहण्याची ताकीद शिबंदीला दिली गेली होती. आभाळात अद्याप संधिप्रकाश रेंगाळत होता. एखाद-दुसरी चांदणी अंधारल्या आकाशात झळकू लागली होती. गडावरचे चारशे मावळे आणि रायगडावरून आलेले दोनशे मावळे हत्यारेपात्यारे बांधून महादरवाजाशी जय्यत तयार होऊन बसले होते. रायगडावरून आलेली अर्धी शिबंदी आपल्या पडशा पाठीशी बांधून आली होती.
सहाशे घोड्यांच्या टापांचा नाद घुमून गनीम सावध होण्याची शक्यता होती म्हणून फौज चालत जाणार होती. कुणी काय करायचे याच्या अगदी स्पष्ट आणि सख्त सूचना प्रत्येक मावळ्याला आगाऊच दिलेल्या होत्या; त्यामुळे आयत्या वेळी सांगण्यासारखे काही उरले नव्हते. आयत्या वेळी सूचना देण्याचा मुळी शिरस्ताच नव्हता. तळावरचा पिवळा फेटा नसलेला एकही गनीम कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवायचा नाही अशी कडक ताकीद होती. रायगडावरच्या बहिर्जीच्या तुकडीला सूचना होती, त्यांनी कापाकापी किंवा अन्य गोष्टींमध्ये लक्ष न घालता, दंगल सुरू होताच कुलीखान आणि पिवळी पागोटी बांधलेल्या त्याच्या अंगरक्षकांना घेरायचे. तळावरची आधीच फोडून ठेवलेली मंडळी घोडी तयार ठेवणार होती. त्यांच्या तळावर असलेली त्यांचीच घोडी वापरून, कैद्यांना पक्के घेऱ्यात घेऊन, तळापासून दूर बहिर्जी दाखवील त्या वाटेने पळत सुटायचे. नेहमीप्रमाणे आखणी अगदी चोख होती.
हंबीरराव व बहिर्जीने बुरुजावरून एकदा नजर टाकली. तळावरची भली मोठी शेकोटी टेंभ्यागत दिसत होती. पण तिच्यामुळे तळाची जागा स्पष्ट लक्षात येत होती. करकर आवाज करीत महादरवाजा उघडला. सहाशे दोन सावल्या हलकेच गडाबाहेरच्या गच्च अंधारात मिसळून गेल्या. झपाट्याने चालत पाऊण-एक घटकेत फौज खिंड ओलांडून मोगली तळाच्या जवळ बाणाच्या टप्प्यावर पोहोचली. हंबीररावांची इशारत झाली. सावल्या तिथेच थांबल्या. तळावरच्या पहारेकऱ्यांच्या हलत्या मशाली वगळता हालचाल दिसत नव्हती. त्यांच्या ‘हुश्शार’च्या हाकांशिवाय आवाज नव्हता. तळ गाढ झोपला असावा. थोडे पुढे जाऊन बहिर्जीने कानोसा घेतला. पाडाचा आंबा पडावा तसा धप्प आवाज झाला. सावल्या सावधपणे पुढे सरकू लागल्या. पायतळीच्या पाचोळ्याचा आवाज होणार नाही याची काळजी घेत पण शक्य त्या झपाट्याने त्या शेकोटीच्या दिशेने सरकत होत्या.
सावल्या तळाच्या अगदी जवळ पोहोचल्या. सापाचा फूत्कार झाला. सावल्या थांबल्या. जेमतेम काही क्षणांची उसंत गेली असेल नसेल, घुबडाचा भयाण धूत्कार वातावरणात घुमला. पलीकडे दूर असलेल्या दुसऱ्या घुबडाने दिलेला प्रतिसाद पुन्हा एकदा घुमला. हलके हलके सावल्या पांगू लागल्या. त्यांनी तळाला चारही बाजूंनी घेरा टाकला. आश्चर्य म्हणजे मघाशी दिसलेली पहारेकऱ्यांची हालचाल आता दिसत नव्हती. किंबहुना तळाभोवती कोणी पहारेकरीच दिसत नव्हता. तळाभोवती एवढी सहाशे माणसे हलत होती, चालत होती; पण तळावर कोणालाच त्याची चाहूल जाणवली असावी असे वाटत नव्हते. हालचालींमध्ये सफाईच मुळी तशी होती. या बाबतीत मांजरांनीपण मराठ्यांकडून धडे घ्यावेत.
वेढा पुरता आवळला गेला. अचानक मोराच्या ओरडण्याने अवघे रान दुमदुमले. त्यासरशी तळावर एकदम धावपळ सुरू झाली. शेकोटीमधील जळती लाकडे उपसली गेली आणि धडाधडा राहुट्या-तंबूंवर भिरकावली जाऊ लागली. दिवसभराच्या रखरखीत उन्हात तापलेल्या कनाती कापरासारख्या पेटून उठल्या. शेकाने ढारढूर झोपलेले मोगली शिपाई दचकून जागे झाले. राहुट्या पेटलेल्या पाहताच घाईने उठून राहुटीबाहेर पडण्यासाठी धडपडू लागले. पण तणावाचे दोर खडाखडा कापले गेले आणि धडाडून पेटलेल्या राहुट्या त्यांच्यावर कोसळल्या. बिचाऱ्यांचे दुर्दैवच उभे ठाकले होते. मागोमाग त्यांच्यावर सपासप तलवारीचे वार कोसळू लागले. किंकाळ्या आणि ओरडण्याने इतका वेळ नीरव शांत असलेले रान गर्जून उठले. क्वचित कोणाला हत्यार हाती घ्यायला अवधी मिळाला. पण बहुतेक सारे अर्धवट झोपेतच सरसहा कापले गेले.
त्या रात्री आफताबखानाने काहीतरी बहाणा करून एका खिदमतगाराला कुलीखानाच्या डेऱ्यात एका कोपऱ्यात झोपायला लावले होते. हरणाची सागुती आणि मोहाच्या अस्सल दारूने आपले काम केले, गडी अगदी गपगार झोपून गेला होता. बिचाऱ्याची काळझोपच ठरली. मोराची आरोळी हवेत विरण्यापूर्वीच आफताबखान डेऱ्यात घुसला. पहारेकऱ्याच्या हातातला भाला घेऊन त्याने, जमिनीत पहार मारावी त्याप्रमाणे सारा जोर एकवटून भाला त्या खिदमतगाराच्या छातीत मारला. बिचारा तोंडातून आवाज न काढता मुकाट्याने मरून गेला. तोपर्यंत कुलीखान उठून चढाव चढवून आणि कंबरेला तलवार बांधून डेऱ्याच्या बाहेर पडला. दोन पहारेकऱ्यांनी मुडदा उचलून पलंगावर टाकला. डेऱ्यात आधीच आणून ठेवलेले तेल त्याच्यावर ओतले. हाती लागतील तेवढ्या उश्या आणि तकिये वर टाकले आणि मशालीने पलंग पेटवून दिला. काही क्षणांमध्ये सारा कारभार आटोपून सारे डेऱ्याच्या पिछाडीस आले आणि त्याच वेळी मराठ्यांचा घाला तळावर कोसळला.
दंगल सुरू होताच कुलीखान आणि त्याच्या माणसांनी घोड्यांवर झेपा घेतल्या. पण बहिर्जीची तुकडी सावध होती. त्यांनी चटाचटा उरलेल्या घोड्यांचा ताबा घेतला आणि त्या पन्नास-पंचावन्न लोकांनी काही हालचाल करण्यापूर्वीच त्यांना कसून गराडा टाकला. गराडा असा सख्त होता की, तो फोडून बाहेर पडण्याची कोणाची बिशाद नव्हती. एक कर्णकर्कश शीळ वातावरणात घुमली आणि स्वार दौडू लागले. वेढा असा चोख आवळलेला होता की, मोगली स्वारांना त्यांच्याबरोबर दौडण्याविना पर्यायच नव्हता. पाहता पाहता घोडी तळापासून दूर गेली आणि काही पळांतच खिंडीपार होत नजरेआड झाली.
मराठ्यांच्या बाकी शिबंदीला त्याची काहीच दखल नव्हती. त्यांनी प्रचंड कत्तल सुरू केली. जणू अवसेच्या तोंडावर रानातली पिशाचेच तळावर हैदोस घालत होती. जळू शकणारी प्रत्येक चीज पेटविली जात होती. हत्याराचा प्रत्येक घाव जीव वसूल करीत होता. घाव पडताना त्याला शिवीची जोड हमखास मिळत होती.
तिच्या आयला तुझ्या, भाड्या सोराज्य बुडवाया येतुस व्हय. ह्यो बघ सोराज्याचा हिसका.
दया, माया, करुणा, माणुसकी कशाला इथे स्थान नव्हते. महाराजांच्या हुकमाने या साऱ्या भावना मराठे गडावर मागे ठेवून आले होते. एकही मोगल कुठल्याही स्थितीत जिवंत राहता कामा नये, हेच एकमेव उद्दिष्ट. घटका-दीड घटकेत सारा खेळ आटोपला. तळावर उरली विखुरलेली प्रेते आणि जळत्या राहुट्या. मराठ्यांनी कैद करून नेलेल्यांशिवाय तळावर एकही हशम जिवंत नाही याची खात्री करून घेऊन हंबीरराव झपाट्याने गडाकडे परत निघाले. छापा इतका चोख कारगर झाला होता की, कुणा मावळ्यावर साधा ओरखडासुद्धा उठला नव्हता. खिंड ओलांडून हंबीररावांनी वर नजर टाकली तेव्हा आकाशातले म्हातारीचे बाजले माथ्यावरून मावळतीकडे उतरले होते. पाखरांची झोप चाळवत होती.
रात्रीचा किर्रर अंधार कापीत घोडी दौडत होती. कुणी कुणाशी बोलत नव्हते. किंबहुना कुणी बोलण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. मूकपणे दौड सुरू होती. कुलीखानाचा ऊर भरून आला होता. वरचेवर डोळे पाण्याने भरून येत होते.
‘माझी माती, माझा देश, माझी माणसे, माझी भाषा, माझे मावळे; पण सध्यातरी मी माझ्याच फौजेचा एक बंदिवान म्हणून चालविला जातो आहे. यालाच म्हणायचे दैवगती!’
तांबडे फुटू पाहत असताना दल एका ठाण्यावर पोहोचले. शीळ घुमली. दौड थांबली. बहिर्जीने आरोळी दिली–
येक घटका. फकस्त येक घटका थांबनार. तेवढ्यात प्रातर्विधी उरकून घ्या. साधंल तेवडी विश्रांती घ्या. मिळतील त्ये चार घास पोटात घाला. शिदोरी मिळंल ती बांधून घ्या. आनलेली जनावरं तळावरच सोडा. ताज्या दमाची घोडी जीन कसून तयार मिळतील. घोडी मिळताच दौड पुढं सुरू. म्हाराजांचा सख्त हुकूम हाये, लवकरात लवकर रायगड गाठायचा.
कुलीखानाच्या मदतीला ठाण्यावर असलेले दोन-चार सेवक धावले. प्रातर्विधी आटोपून तो ठाण्याच्या चौकीच्या इमारतीत आला तेव्हा एका बाजेवर स्वच्छ बिछाना घालून तयार होता. शेजारी बहिर्जी उभा होता. कुलीखान येताच त्याने लवून मुजरा घातला.
तू बहिर्जी नाईक, होय ना? अरे! मुजरा कसला घालतोस, आता आम्ही सरनोबत नाही. आज आम्ही स्वराज्याचे कैदी आहोत.
बारा गावचे पाणी प्यायलेल्या बहिर्जीसारख्या रांगड्या गड्याच्या डोळ्यांत टचकन पाणी आले–
आसं कसं म्हन्ता सरकार? येळवखत बदलला तरी आपली मानसं आपलीच ऱ्हात्यात. ती काय अशी बदलू म्हनलं तर बदलत्यात व्हय? आन कोन म्हनलं तुमाला कैदी? उगी कायबाय समजून घ्याचं न काय. पार काडून टाका मनातून त्ये. तुमी तर घरची मानसं. वाईच विसंबला दुरावला व्हतात. तुमासाटी मूळ घेऊन आलोया पुन्यांदा घराकडं निंगालासा. जरा इसावा घ्या, न्ह्यारी ईल. दोन घास खावा. तवर घोडी तयार व्हतील की, फुडं सुटायचं. हुकूम आसंल तर म्या तेवड्यात माझं बी उरकतो.
का? एवढी घाई का? आता तर आपण आपल्याच मुलखात आहोत. गनीम पाठलागावर येण्याची तर कोणतीच भीती नाही.
छ्या, गनिमाची काय बिशाद आपल्या मुलखात घुसून पाठलाग करन्याची. पर म्हाराज तुमाला भेटाया लई उतावीळ झाल्याती. कंदी येकदा भेटतो तुमाला आसं झालंया. आन हां अंगावर हाय त्या सरंजामातच हजर करन्याचा हुकूम हाये.
आडवा झाला. मनामध्ये भावनांचा एवढा कल्लोळ उठला होता की, डोळा लागणे शक्य नव्हते. मावळ्यांची लगबग, थट्टामस्करी, उडालेली धांदल पडल्या पडल्या तो आसूसून पाहत होता. थोड्या वेळाने एका पळसाच्या पत्रावळीवर वाढलेली बाजरीची गरमागरम भाकरी, कांद्याचा झुणका, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि बुक्की मारून फोडलेला कांदा अशी न्याहारी घेऊन एक मावळा सामोरा आला. त्याच्या मागोमाग स्वत:ची वाढलेली पत्रावळ हातावर घेऊन बहिर्जी समोर आला.
सरकार, घाईगर्दीत जे साधलं त्येच गड्यांनी रांधलंया. ग्वॉड मानून घेवाजी. येळ निभावायची दुसरं काय? जरा त्रास व्हईल पन इलाज न्हाई. मापी असावी.
बहिर्जी, अरे किती वर्षांनी असे हे मराठमोळे, घरचे अन्न खातो आहे. माझ्यासाठी हे पक्वान्नापेक्षा जास्त मोलाचे आहे. आपला नेहमीचा रिवाज सोडून काही भलतेसलते समोर आणले असतेस तर वाईट वाटले असते.
घ्या धनी, सुरू करा.
पहिला घास तोंडात टाकला आणि कुलीखानाचे डोळे ओसंडून वाहू लागले. घळघळा वाहणारे अश्रू दाढीच्या जंजाळात झिरपत राहिले. हुंदक्यांनी शरीर गदगद हलू लागले. एक पाऊल पुढे टाकून बहिर्जी कानाशी वाकला.
सबूर. सरकार सबूर. समदी बघत्याती सबूर.
पालथ्या मुठीने कुलीखानाने डोळे कोरडे केले आणि समोरचे अन्नब्रह्म संपविले. थोड्याच वेळात कुचाची आरोळी उठली आणि दौड पुढे सुरू झाली.
ठाण्याठाण्यावर जनावरे बदलली जात होती. फार तर दीडएक घटकेची विश्रांती घेतली की, दौड पुढे सुरू. असा सिलसिला सतत सुरू होता. रात्रीची झोपसुद्धा जेमतेम आणि शिरस्त्याप्रमाणे उघड्या माळावर. लिंगाण्याला वळसा घालत दौड जेव्हा कोकणातून सुरू झाली तेव्हा कुलीखानाने अचंब्याने बहिर्जीला विचारले–
*बहिर्जी, अरे एवढ्या लांबचा वळसा घालून जाणारा रस्ता का धरलास?*
*सरकार इतकी वर्सं दूर ऱ्हायलासा पर वाटांचे बारकावे अजून पक्के ध्यानात हायती तुमच्या. पर आपुन अगदी जवळच्या वाटंनं निगालो हाय. म्हाराज आता राजगडावर वस्तीला न्हाईत. आता तख्ताची जागा रायगड झालिया. म्हाराजांचे पाय आपल्याला रायगडीच भेटतीला.*
*_क्रमश:_*
*________⚔📜🚩