कोणतही शिवकाव्य येथे शोधा

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४८▪*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४८▪*


*अंतिम भाग*
राजे गडावर येताहेत, हे पाहून खेळण्याचे किल्लेदार झुंजारराव पवार आपल्या शिबंदीनिशी धावत राजांच्या सामोरे आले. हातांत पट्टे चढवलेले राजे सर्वांसह गडाकडं चालत होते. राजांच्या डाव्या खांद्यावर जखमेची खूण दिसत होती. राजांबरोबर यशवंत चालत होता. राजे गडाच्या दाराशी आले. तो बिकट गड चालून येताना, आधीच लढलेले वीर दमले होते, श्वास जड झाले होते. गडावरून चौफेर नजर फिरवीत राजे म्हणाले,
'हा खेळणा कसला! हा तो विशाळगड आहे. झुंजारराव, क्षणाचाही विलंब न लावता तोफेचा आवाज द्या. त्या गजाखिंडीत आमचे बाजी, फुलाजी, आमचे मावळे आमच्यासाठी प्राणपणानं खिंड लढवीत आहेत. बाजी होते, म्हणूनच आम्ही या संकटातून तरलो. आम्ही बाजींना पहिल्या तलवारीचा आणि पालखीचा मान देणार आहोत. झुंजारराव, तोफेचा आवाज द्या. तो आवाज ऐकण्यासाठी बाजी उतावीळ झाले असतील. आमच्या स्वराज्यासाठी आज बाजींनी आपल्या पराक्रमाने गजाखिंडीची पावन खिंड बनवली आहे.'
'झुंजारराव! विलंब न करता तोफेचा आवाज द्या!'
हातात इटा घेऊन, तोल सावरत बाजी पावलं टाकीत होते. सारा चेहरा घामानं डवरला होता. डोळ्यांत रक्त उतरलं होतं. सर्वांगावर रक्ताची तांबडी कलाबूत चढली होती. बाजी खिंडीच्या सामोरे आले. त्यांनी इटा पेलला आणि ते गर्जले,
'या s s'
झोकांड्या देत येणाऱ्या बाजींचं रूप महाकाय द्वारपालाप्रमाणे पुढं सरकत होतं. बाजींचं ते रूप पाहून मावळ्यांना आपल्या जखमांच्या वेदनांची जाणीव राहिली नव्हती. बाजींनी इटा पेलला आणि त्याच वेळी तोफेचा आवाज झाला.
समोरचा शत्रू, त्याचं हे सर्व बळ विसरून बाजींच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. त्यांनी विचारलं,
'तोफेचा आवाज झाला! झाला ना?'
शेजारचा वीर म्हणाला,
'धनी! तोप झाली.'
त्याच वेळी दुसरी तोफ धडाडली. बाजींच्या चेहऱ्यावरचे सारे भाव पालटले. विराट हास्य उमटलं___
'राजे! लाज राखलीत!' म्हणत बाजी खाली कोसळले.
बाजींना उचलून मागं नेण्यात आलं. कुणीतरी साचलेल्या पाण्यातून मुंडासं भिजवून आणलं. ते बाजींच्या कपाळावर थापलं.
क्षणभर बाजी शुद्धीवर आले. भोवताली वाकून पाहणाऱ्या माणसांवरून त्यांनी नजर फिरवली. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.
बाजी हसले,
_*'रडता कशाला? त्या मसूदची खोड मोडा. आम्ही जातो. राजांना आमचा मुजरा सांगा ss मुजरा ss'*_
_*बाजींनी हात उंचावला; पण कपाळी नेण्याआधीच तो कोसळून पडला.*_
बाजींचे उघडे डोळे कुणीतरी मिटले. डोळे टिपून माणसं आपल्या तलवारी घेऊन उठली.
गडावरून तोफांचे आवाज उठत होते___!
भर दुपारी सुद्धा गड गार वाऱ्यात आणि विरळ धुक्यात गारठून गेला होता. राजांच्या बरोबर आलेल्या धारकऱ्यांच्या जखमांवर उपचार चालू होते. 'हर हर महादेवs'चा गजर अस्पष्टपणे त्यांच्या कानांवर येत होता.
झुंजारराव पवार राजांच्या जवळ आले. ते म्हणाले,
'राजे! आपण थोडी विश्रांतीss'
'नाही, झुंजारराव! जोवर बाजी दिसत नाहीत, तोवर आम्ही या जागेवरून पाऊलही उचलणार नाही. झुंजारराव, आमची चौकशी करण्याऐवजी गडाची शिबंदी एकत्र करा आणि बाजींच्या मदतीला जा.'
झुंजारराव निघून गेले.
राजे एकटेच उभे होते. बराच वेळ गेला आणि धावत आलेल्या यशवंतनं सांगितलं,
'राजे, गडावर पालखी येते आहे.'
'पालखी?' राजे चिंतातूर झाले. 'यशवंत, तू पालखीला सामोरा जा. बाजी जखमी झाले असतील. आम्ही वाड्याकडं जातो. वैद्यांना बोलवून घेतो. बाजींना सांभाळून घेऊन या.'
राजे वाड्याकडं चालू लागले. वाड्यात येताच ते आज्ञा सोडत होते,
'वैद्यांना इथं बोलवून घ्या.
'बाजी येतील. त्यांचा पाठलाग होईल....
'तोफा आणि शिबंदी सज्ज ठेवा....'
राजांना प्रत्येक क्षण घटकेसारखा भासत होता. त्यांच्या जिवाला चैन नव्हती. वाट पाहत थांबणं अशक्य होतं. राजे तसेच वाड्याच्या बाहेर पडले. राजे धावत गडाच्या दरवाज्याकडं जात होते. दरवाजा दिसू लागला आणि त्याच वेळेला दरवाज्यातून येणारी पालखी राजांच्या नजरेत आली.
पालखीभोवती माणसांचं कडं पडलं होतं. जसजशी पालखी जवळ येत होती, तसं राजांना सर्वांचं रूप स्पष्ट होत होतं. जखमांनी घायाळ झालेले वीर नतमस्तकानं पालखीसमोर चालत होते. कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. जड पावलांनी ते येत होते.
पालखी वाड्यासमोर आली आणि राजे पुढं झाले. पालखीवर हात ठेवून यशवंत चालत होता. राजांना साऱ्यांनी वाट करून दिली. तेव्हा पालखी जमिनीवर ठेवली होती. पालखीवरचं लाल अलवानाचं आच्छादन तसंच झाकलेलं होतं. यशवंतच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. राजांनी विचारलं,
'यशवंता! अरे, बाजी जखमी झालेत ना?'
यशवंतनं नकारार्थी मान हलवली.
'अरे! ते जखमी झाले नाहीत, तर रडतोस कशाला?' सारं बळ एकवटून राजांनी विचारलं. पण त्या पालखीवरचं अलवान उचलण्याचं धारिष्ट राहिलं नव्हतं.
यशवंत कसाबसा म्हणाला,
'राजे! आपले बाजी, फुलाजी गेलेss'
'गेले?' राजे उद्गारले.
कुणीतरी पालखीची कनात वर केली. पालखीत रक्तबंबाळ झालेले बाजी, फुलाजी एकमेकांच्या मिठीत झोपी गेले होते.
राजांचा ऊर भरून आला. डोळ्यांत अश्रू उभे राहिले. सारा चेहरा मनस्तापानं तांबडा बुंद झाला. छातीवर मूठ मारत ते ओरडले,
'बाजी! काय केलंत हे! पालखीचा मान कुठं जात होता का? त्यासाठी हे करायला हवं होतं? बाजी, फुलाजी....काय केलंत हे!'
राजांना आपले अश्रू आवरत नव्हते. रडणाऱ्या यशवंताला त्यांनी आधारासाठी मिठी मारली.
___आणि दोघांच्याही भावनांचे बांध फुटले. ते सावरण्याचं सामर्थ्य कुणालाही राहिलं नव्हतं.

*🚩-:समाप्त:-🚩*
*🙏🏻लोभ असावा...🙏🏻*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४७▪*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४७▪*


घोडखिंडीत घनघोर युद्ध चालू होतं. खिंडीत जाणारे मसूदचे अर्धे सैनिकही माघारी सुखरूप येत नव्हते. जे येत होते, ते परत लढण्याच्या अवस्थेत नव्हते. मसूद ओरडत होता, 'मारो s काटो ss आगे बढोss' पण त्या आव्हानाचा काही परिणाम होत नव्हता. मसूदचे सैनिक जेवढ्या हिरिरीनं पुढ येत होते, तेवढयाच तत्परतेनं मार खाऊन मागं सरकत होते. फुलाजी, बाजी व सारे मावळे रंगपंचमीच्या दरबारातून बाहेर पडावे, तसे दिसत होते. पांढरंपाणी गावापासून ते घोडखिंडीपर्यंतचा रस्ता शत्रूच्या रक्तानं आणि वीरांच्या जखमांनी माखला होता.
सूर्य मध्यान्हीला आला, तरी राजांची तोफ ऐकू येत नव्हती. वादळवाऱ्यातून वीस कोस धावून आलेल्या उपाशी मावळ्यांचं, जखमांनी जर्जर झालेलं अंग क्षणाक्षणाला थकत होतं. खिंडीच्या तोंडाशी लढणारे बाजी आपला तोल सावरत पट्टा चालवीत होते. मावळ्यांना उत्तेजन देत होते. एका शत्रूच्या वारानं त्यांचा तोल गेला. मावळ्यांनी त्यांना सावरलं. खिंडीत मागं आणून ठेवलं. बाजी माघारी आलेले पाहताच विश्रांती घेणारे फुलाजी धडपडत उठले. त्यांनी दोन्ही हातात तलवारी पेलल्या आणि खिंड लढवणाऱ्या मावळ्यांच्या सामोरे जाऊन, येणाऱ्या शत्रूबरोबर ते लढू लागले.
मसूदचे हजार सैनिक होते. त्यानं नव्या दमाची तुकडी सज्ज केली आणि ती खिंडीवर सोडली. नव्या दमाची तुकडी येताना पाहताच फुलाजी ओरडले,
'मागं जा, मागच्यांना पुढं पाठवा.'
विश्रांती घेणारे वीर तत्परतेनं उठले. आपली शस्त्रं सावरून ते पुढं धावले. थकलेले वीर मागं येऊन दिसेल त्या ठिकाणी ढासळले.
एकच निकराची झुंज घोडखिंडीत सुरू झाली. खिंडीत तलवारी भिडल्याचे आवाज येत होते. आरोळ्या उठत होत्या___
'जय भवानी'
'दीन s दीन'
'जय विंझाई'
'अल्ला हो अकबर'
'आगे बढो'
'हर हर महादेव'
'काटो, कतल करो'
'पुढं व्हा! कापा, मारा! राजे गडावर पोहोचत नाहीत; तोवर एका माणसाचं पाऊल या खिंडीतून पुढं जाणार नाही.'
फुलाजी लढत असताना अचानक एकाकी पडले. ती संधी साधून मसूदचे चार धारकरी त्यांच्यावर तुटून पडले. फुलाजी त्यांच्याबरोबर दोन्ही हातांत तलवारी घेऊन, सारं बळ एक करून लढत होते. अचानक एकाचा वार त्यांच्या मानेवर पडला. तोल जाऊन फुलाजी कोसळले आणि ती संधी साधून मसूदच्या निर्घृण सैनिकांनी पडलेल्या फुलाजींवर वार चालवले. ते दृश्य पाहून सारे मावळे धावले. चारी बाजूंनी धावलेल्या त्या मावळ्यांनी मसूदच्या त्या सैनिकांची त्वेषानं कत्तल केली. आणि लढता-लढता गतप्राण झालेल्या फुलाजींचा देह उचलून मागं नेला.
जिथं बाजी विश्रांती घेत होते, तिथं फुलाजींचा देह आणला गेला. फुलाजींना पाहताच बाजी उठून उभे राहिले. ज्यांनी फुलाजींना आणलं, त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले होते. फुलाजींच्याकडं पाहतच बाजी फुलाजींच्या मस्तकाजवळ बसले. एकटक नजरेनं फुलाजींकडे बाजी पाहत होते. नकळत ते उद्गारले,
'भाऊ! जगण्याचं सार्थक केलंस! गेलास; म्हणजे जातोस कुठं! तू मोठा ना? तुझा मान पहिला! मी मागून आलोच!' आपली आरक्त नजर भोवतालच्या मावळ्यांवरून फिरवत बाजी ओरडले, 'रडता कशाला? तुमचा बाप पडला, त्याचा सूड घ्या! चलाss'
बाजी उठले आणि मागच्या मावळ्यांसमवेत ते खिंडीत दाखल झाले. आकाशीचा सूर्य मध्यान्हीकडं चढत होता. सारं आकाश ढगांनी व्यापलं होतं. धुक्याचे लोट खिंडीवरून जात होते. भिजल्या अंगावर, वाऱ्याच्या झोतांनी, झालेल्या जखमा तटतटत होत्या. दोन्ही हातांत पट्टे घेतलेले बाजी झोकांड्या देत पुढं येत होते. त्यांच्या नेत्रांत अंगार फुलला होता. थंडीचे दिवस असूनही त्यांच्या चेहऱ्यावर घाम डवरला होता. मस्तकावरच्या संजाबावारची शेंडी मानेवर सुटली होती. खिंडीसामोरे येत ते गर्जले,
'आवो! आगे बढोss'
जखमांनी घायाळ झालेल्या त्या बाजींना दोन्ही हातांत पट्टे सरसावून येताना पाहताच मसूदचे सैनिक मागे हटत होते. ते किंचाळले,
'शैतान आयाss पीछे हटोss'
बाजींच्या चेहऱ्यावर विक्राळ हास्य प्रगटलं होतं. आठवण येत होती, ती त्या शिवतांडवाची.
मसूदचा संताप वाढला होता. दोन प्रहर टक्कर देऊनही खिंड मोकळी झाली नव्हती. हजाराची शिबंदी असूनही यश मिळत नव्हतं. त्यानं बंदूकधारी बोलवला आणि सांगितलं,
'कुछ भी हो! लेकिन वो शैतानs'
त्या बंदूकधाऱ्यानं मसूदला मुजरा केला. घोडखिंडीच्या दरडीवर तो बंदूकधारी चढत होता. खिंडीत लढणाऱ्या वीरांच्या ते ध्यानी येत नव्हतं. तो सैनिक बंदूक सावरत, सरपटत खिंडीवर सरकत होता. त्या सैनिकानं आपली जागा गाठली. त्या दरडीवरून त्याला खिंडीच्या तोंडाशी चाललेला रणसंग्राम दिसत होता. एखादा अचानक धुक्याचा लोट येई. सारं दिसेनासं होई. दोन्ही हातांत पट्टे चढवून लढणाऱ्या बाजींच्यावर तो सैनिक निशाण धरत होता. बाजी लढत होते आणि बंदुकीचा बार कडाडला होता. धूर ओकीत ती लांब नळ्याची बंदूक मोकळी झाली. सैनिकानं पाहिलं. तो बाजी मागं कोसळत होते.
बाजींचे वीर धावले. त्यांनी पाठीत गोळी शिरलेल्या बाजींना सावरलं. बाजी ओरडत होते,
'लढा! जिवाचं मोल बाळगू नका. अजून राजेss'
बाजींची ती अवस्था पाहून साऱ्यांना नवचैतन्य प्राप्त झालं. खिंड परत त्याच हिरिरीनं लढू लागली.
बाजींना माघारी आणलं गेलं. बाजींची काही काळ शुद्ध हरपली होती. रक्ताचा ओघ थांबण्यासाठी एका वीरानं आपला कमरबंद बाजींच्या जखमेवर खुपसला होता.
बाजींना जाग आली. त्यांनी भोवती जमलेल्या साऱ्यांकडं पाहिलं. भान येताच त्यांनी विचारलं,
'तोफ झाली?'
साऱ्यांच्या नेत्रांत पाणी तरळलं होतं. कोणी काही बोलत नव्हतं. बाजींचा चेहरा बदलला. कुणाच्याही अडकाव्याला दाद न देता बाजी सर्व बळानिशी बसले. सर्वांवर नजर फिरवीत ते म्हणाले,
'राजे गडावर अजून पोहोचले नाहीत?'
उत्तर काय द्यावं, हे कुणालाही कळत नव्हतं. कुणी तरी धीर करून म्हणालं,
'अजून तोफेचा आवाज झाला नाही.'
'तोफेचा आवाज झाला नाही?' बाजी बोलले, 'कान बहिरे झाले का?'
बाजी उठण्याचा प्रयत्न करीत असता कोणीतरी म्हणालं,
'बाजी, तुम्ही स्वस्थ पडा! खिंड आम्ही लढवतो.'
'स्वस्थ पडू?' बाजी उद्गारले, 'राजे गडावर पोहोचले नाहीत, तोवर बाजी मरेल कसा? माझा इटा द्या.'
बाजी तोल सावरत उठले. उभे राहिले. धारदार टोकाचा इटा बाजींच्या हातात दिला गेला. बाजी त्या इट्याच्या आधारानं चालत होते.
सारे मावळे बाजींकडं एखादं स्वप्न पाहावं, तसे पाहत होते.
*🚩क्रमशः🚩*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४६▪*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४६▪*


गजाखिंडीत बाजी आपल्या धारकऱ्यांसह राहिले होते. दाट धुक्यानं माखलेली गजाखिंड पहाटेची विरळ होत होती. वीस कोस धावत आलेले धारकरी धापा टाकीत गजाखिंडीत विसावले होते. गजाखिंडीच्या दोन्ही दरडा दाट रानानं वेढल्या होत्या. अरुंद गजाखिंड दगडधोंड्यांनी व्यापली होती. बाजी सर्वांना म्हणाले,
'आता थोडी विश्रांती घ्या, जरा ताजेतवाने व्हा!'
सारी फौज बाजींच्या आज्ञेनं पांगली. वीस कोस धावत आलेल्या त्या माणसांना भिजल्या अंगाची, थंडी-वाऱ्याची जाणीव राहिली नव्हती. झाडाझुडुपांतून ते विसावले होते. पानांवर पडलेले धुक्याचे थेंब त्यांच्या अंगावर ठिबकत होते. पण वीस कोस धावत आलेल्या वीरांची छाती अजून धापावत होती. दिसंल त्या ठिकाणी ते विसावले होते.
बाजी, फुलाजी एका झाडाखाली थांबले होते. बाजींनी विचारलं,
'भाऊ, आता कसं?'
'कसं?' फुलाजी निष्काळजीपणं म्हणाले, 'आता काम सोपं! ही चिंचोळी खिंड लढवायला पाच-पंचवीस खूप झाले. केवढी जरी फौज चालून आली, तरी मागं रेटता येईल. फेराफेरानं खिंड लढवू.
'काळजी वाटते, ती राजांची! खरंच, भाऊ! हा सुर्वे इथं बसला आहे, हे माहीत असतं, तर राजांना इथं आणलं नसतं.'
'झालं गेलं, होऊन गेलं. तू चिंता करू नको. आपला राजा देवमाणूस आहे. देव त्याला हजार हातांनी राखेल.'
बाजींनी काही उत्तर दिलं नाही.
पहाट झाली. रात्रभर गारठलेल्या पाखरांनी आपली अंगं झाडली. त्यांच्या चिवचिवाटानं रान गजबजून गेलं. दिवस उजाडला, तशी घोडखिंडीची भयाणता दिसू लागली. दोन्ही बाजूंची दरडं आकाशात चढली होती. त्यांची उतरंडं दाट रानानं भरली होती. खिंडीचा निमुळता रस्ता अजगरासारखा पसरला होता. वाढत्या दिवसाबरोबर धुकं विरळ होत होतं.
बाजींचे सैनिक विसावले असतानाच नजरबाज धावत आला. तो बाजींना म्हणाला,
'बाजी! गनीम नजीक आला.'
'बाजी! गनीम नजीक आला.'
बाजी उठले. त्यांनी साऱ्या मावळ्यांना खिंडीच्या दोन्ही बाजूंच्या रानांत आश्रय घ्यायला सांगितलं. आघाडीची माणसं निवडली. बाजींनी फुलाजींना सांगितलं,
'भाऊ! तुम्ही तुकड्या पाडा. मी माझी तुकडी घेऊन सामोरा जातो. दमानं खिंड लढवायला हवी. जोवर राजे पोहोचल्याची तोफ कानांवर येत नाही, तोवर एकही शत्रू या खिंडीतून जाता कामा नये.'
बाजी आपल्या मावळ्यांसह गजाखिंडीच्या तोंडाला, झाडीचा आश्रय घेऊन उभे राहिले. घोड्यांच्या टापांचा आवाज क्षणाक्षणाला वाढत होता. बाजींनी हातात पट्टा चढवला - धारकऱ्यांनी ढाल - तलवारी पेलल्या. साऱ्यांचं लक्ष गजाखिंडीच्या वाटेवर लागलं होतं. गजाखिंडीच्या जवळ येऊन मसूदचे घोडदळ पायउतार झालं.
मसूदनं त्वेषानं आरोळी दिली,
'आगे बढोss'
भर पावसाळी एखादा संतप्त ओढा खळाळत, फेसाळत यावा, तसा मावळ्यांचा लोंढा मसूदच्या फौजेवर तुटून पडला. उठलेल्या 'जय भवानीss' 'हर हर महादेवss' च्या गर्जनेत शत्रूचे 'दीनs दीनss' आवाज लुप्त झाले. बाजी पट्टा सरसावत रणांगणात उतरले होते. आवाज ऐकू येत होता, तो तलवारींच्या खणखणाटाचा आणि आर्त किंकाळ्यांचा. बाजींचा पट्टा विजेसारखा चौफेर फिरत होता. बाजींचं पागोटं केव्हाच पडलं होतं. संजाबावरून रूळणारी शेंडी हेलकावे घेत होती. बेभान झालेले बाजी टिपरी घुमावी, तसे लढत होते. _शत्रूच्या शस्त्रांनी झालेल्या आघातांनी फाटलेल्या वस्त्रावर रक्ताची शिवण चढत होती._
मसूदचे सैनिक त्या माऱ्यानं मागं सरत होते. थकलेले बाजींचे वीर मागं सरकले आणि त्यांची जागा फुलाजी आणि त्यांच्या धारकऱ्यांनी घेतली.
जखमी झालेले बाजी मागं येऊन विसावले होते.
फुलाजी खिंड लढवीत होते.
शिवाजी राजे, यशवंत आणि आपल्या मावळ्यांसह दीड कोसावर असलेल्या खेळण्याकडं जात होते. खिंडीतून वर चढलेल्या आणि आपल्या तीनशे धारकऱ्यांसह येणाऱ्या राजांना मोर्चेवाल्यांनी पाहिलं. सुर्व्यांचे आणि पानवलकरांचे पडलेले हजार-दीड हजाराचे मोर्चे खेळण्यासारख्या विशाल गडाला अपुरे होते. शेकडो धाराईतांसह गडावर चढणारे धारकरी पाहताच सुर्व्यांच्या मोर्चेवाल्यांनी आपलं बळ एकत्र केलं.
राजांनी हाती पट्टा चढवला होता. राजांच्या संगती तळपत्या तलवारीसह यशवंत धावत होता. राजे आणि यशवंत यांना गराडा घालून धारकरी सुर्व्यांच्या वेढ्याला भिडले.
सुर्व्यांच्या वेढ्याला राजांची गाठ पडली होती.
सुर्व्यांच्या मोर्च्याचे असामी कमी होते. पण ते शर्थीनं लढत होते. राजे पट्टा चालवत पुढं सरकत होते. यशवंता राजांचं ते कसब आश्चर्यचकित होऊन पाहत होता. एखादं सुदर्शन फिरावं, तसं राजे पट्ट्याचं मंडळ आखत होते. एक पट्टेकरी आणि दहा धारकरी ही उक्ती सार्थ ठरली होती. चक्राकार फिरत जाणाऱ्या राजांची वाट मोकळी करण्यासाठी यशवंत समोरच्या गर्दीत शिरला. यशवंत आपली तलवार चालवीत असता अचानक, त्याच्या पायाखालचा दगड ढासळला. तोल सावरण्याचा प्रयत्न करीत असता यशवंत पालथा पडला. ती संधी साधून शत्रूचा एक सैनिक धावला. राजांचं लक्ष यशवंताकडं गेलं. आपल्या जागेचं भान न बाळगता राजे धावले आणि पाहता-पाहता यशवंतवर उगारलेल्या शत्रूच्या तलवारीचा हात कलम केला. किंचाळत तो सैनिक कोसळला. राजांनी हात देऊन यशवंतला उठवलं. तलवार सावरून यशवंत परत लढू लागला.
राजांचं पथक पुढं सरकत होतं. क्षणाक्षणाला शत्रूचं बळ सरत होतं.
राजांनी वेढा फोडण्यात यश मिळवलं. दूर दिसणाऱ्या खेळणा गडाच्या प्रवेशद्वाराकडं त्यांच लक्ष लागलं होतं. आलेल्या यशानं आनंदित झालेले मावळे जखमांच्या वेदना विसरून राजांच्या समवेत गडाकडं धावत होते.
धावत जात असलेले राजे एका ठिकाणी काही क्षण विश्रांतीसाठी थांबले. ती संधी साधून यशवंत पुढं झाला. राजांचे पाय शिवत तो म्हणाला,
'राजे, आपण होता, म्हणून मी आज वाचलो.'
राजांनी यशवंतला उठवलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले,
'यशवंता, तुला वाचवलं नाही, तुझ्या नावानं कुंकू बाळगणारी सखू आम्हाला आठवली. त्या पोरीसाठी धावावं लागलं. चल, गड जवळ करू.'
राजे सर्वांसह गडाकडं चालू लागले.
*🚩क्रमशः🚩*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४५▪*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४५▪*


पहाट होण्याला अवधी होता. नखशिखांत भिजलेले सहाशे धारकरी राजांची पालखी राखत धावत होते. रुतलेल्या काट्यांची, खुपलेल्या कपारींची जाणीव कुणाला नव्हती. दगडाधोंड्यांतून धावताना अनवाणी पाय जागोजागी रक्ताळत होते. लोहाराच्या भात्यासारखी प्रत्येकाची छाती फुगत होती. धापेचा निःश्वास बाहेर पडत होता. तोंडातून, नाकातून बाहेर पडलेला श्वास वाफेच्या रूपानं उसळत उतरणाऱ्या धुक्यात मिसळत होता. हेलकावे घेणाऱ्या पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते. पालखीवर झाकलेल्या अलवानामुळं राजांना काही दिसत नव्हतं. फक्त बाजींचा आवाज कानांवर येत होता,
'चलाss'
चला!
कुठं जायचं?
एका माणसाच्या जिवासाठी धावायचं कुठवर?
बाजी! कशासाठी हे कष्ट घेता?
कोणाच्या स्वार्थापायी?
___आणि तेही एका माणसाच्या जिवापायी?
कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं?
कोणत्या अधिकारानं?
जीवनात अखेरचं मोल असतं, ते स्वतःच्या जिवाचं
मग त्या जिवाच्या कवड्या यांनी आम्ही मांडलेल्या पटावर का उधळाव्यात?
कसल्या आणि कुणाच्या भरवशावर?
बाजी, फुलाजी, तुम्ही स्वामिकार्यासाठी का ह्या अवघड वाटचालीत सामील झालात?
कोणत्या त्यागापायी?
हे स्वराज्य व्हावं, ही तो श्रींची इच्छा आहे, असं आम्ही म्हणालो.
पण हा महाचंडिकेचा होम धडाडत असता त्याचं पौरोहित्य आमच्या हाती का सुपूर्द केलंत?
यातून खरं काही साधणार आहे का?
या पालखीचा वीट येतो!
नशिबानं या संकटातून पार पडलोच, तर....
बाजी, पालखीचा मान तुम्हांला देऊ!
त्या वेळी तुम्हांला कळेल, ही पालखी केवढं सुख देते, ते!
पालखी हेंदकाळत धावत होती.
अचानक पालखी थांबली. मागून नजरबाज धावत आला. तो बाजींना म्हणाला,
'बाजी, पाठलाग होतो आहे.'
सर्वत्र दाट धुकं होतं. बाजी ओरडले,
'थांबू नका पळा.'
राजांची पालखी धावत होती. वेग वाढला होता. पालखीत तोल सावरणं कठीण जात होतं.
पांढरंपाणी ओलांडून खेळण्याचा पायथा गाठला. गजाखिंडीत पालखी आली, नजरबाज उलट दिशेनं आला त्याने बाजींना काही सांगितलं आणि पालखी थांबली.
पालखीवरचं अलवान उचललं गेलं. बाजी म्हणाले,
'राजे, उतरा!'
शिवाजी राजे पालखीबाहेर आले. धुक्यानं सारा मुलूख वेढला होता. दोहों बाजूंनी उंच गेलेल्या दरडींतून जाणाऱ्या त्या खिंडीत सारे उभे होते. पहाटेचा समय जवळ येत होता.
'बाजी! काय झालं?' राजांनी विचारलं.
'राजे! दैवानं दावा साधला. खेळणा सुर्व्यांच्या मोर्च्यात सापडलेला आहे, हे आधी कळतं, तर मधल्या वाटेनं आपल्याला राजगडाच्या रोखानं सोडलं असतं. आता तेही जमणार नाही. मागं शत्रू आहे. पुढं वेढा आहे.'
'बाजी! चिंता करू नका. सुर्व्यांनी मोर्चे लावलेत ना! ते जरूर आपण मोडून काढू.'
'आपण? नाही, राजे, ते तुम्ही करायला हवं! पाठलाग करून येणारे गनीम कोणत्याही क्षणी आपल्याला गाठतील. ते आणि सुर्वे यांची हातमिळवणी होता कामा नये.'
'मतलब!'
'राजे, आता उसंत नाही. तीनशे धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. आम्ही ही खिंड लढवतो.'
'नाही, बाजी! तुम्हांला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल, ते होऊ दे.'
राजांच्या बोलांनी बाजी कासावीस झाले. त्यांचा चेहरा कठोर बनला. ते म्हणाले,
'राजे! आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वडिलकीचा मान दिलात, तो पाळा. गड गाठा!'
'नाही, बाजी! ते होणार नाही.'
'मला सांगता? या बाजीला? राजे, ही सारी फौज माझी, बांदलांची आहे. प्रसंग ओढवून घेतलात, तर तुमच्या मुसक्या आवळून या पालखीतून तुम्हांला जावं लागेल. विंझाईशपत सांगतो, यात तिळमात्र बदल घडणार नाही. राजे बऱ्या बोलानं गड गाठा!'
राजांना काही सुचत नव्हतं. बाजींचं वेडावलं रूप ते पाहत होते.
क्षणभर रोहिड्याच्या किल्ल्यावर पाहिलेलं बाजींचं रूप राजांच्या नजरेसमोर तरळलं. राजे म्हणाले,
'बाजी, फुलाजी...पण तुम्ही....'
'आमची चिंता करू नका, राजे! तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही गनीम या खिंडीतून आत येणार नाही.'
'बाजी ss.'
'बोलू नका, राजे! ही बोलण्याची वेळ नाही. लहान तोंडी मोठा घास घेतला असला, तर क्षमा करा.'
राजांचे डोळे भरून आले. त्यांनी बाजींना मिठी मारली. फुलाजींना कवटाळलं. बाजी म्हणाले,
'राजे! परत नाही भेटलो, तर आठवण विसरू नका.'
दोघांच्याही अश्रूंचे बांध फुटले. डोळे पुसत बाजी म्हणाले,
'राजे! आमची लाज राखा. सुखरूपपणे गडावर जा. जोवर तोफेचा आवाज ऐकत नाही, तोवर जिवाला चैन नाही.' बाजींची नजर यशवंताकडं गेली. ते म्हणाले, 'यशवंता, राजांना सांभाळ. त्यांच्यावरची नजर ढळू देऊ नको. राजे, तुम्ही जा.' कठोर आवाजात बाजी ओरडले, 'जा म्हणतो ना!'
राजांना काही सुचत नव्हतं. तीनशे धारकरी गोळा झाले होते. राजांनी पाऊल उचललं; पण बळ येईना. त्यांनी माघारी पाहिलं. बाजी, फुलाजी उभे होते. एखाद्या देवालयाच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल असावेत, तसे.
'या, राजे!' बाजींनी हात उंचावला.
धुक्याचा एक लोट आला आणि बाजी, फुलाजी दिसेनासे झाले.
राजे खेळण्याकडं चालू लागले होते. गजाखिंड ते खेळणा अंतर दीड कोस तरी होतं.
*🚩क्रमशः🚩*

⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४४ ▪*

⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४४ ▪*...

...
भर उन्हाळ्यात चक्री वादळ घुमत यावं, तशी शिवाजी सापडल्याची बातमी सिद्दीच्या तळावर आली. शिवाजी पकडल्याच्या आनंदात मसूद छावणीकडं येत होता. सिद्दी जौहर, फाजलखान, सलाबतखान सारे सिद्दीच्या डेऱ्यात शिवाजीला पाहण्यासाठी उत्सुक झाले होते.
मसूद दौडत डेऱ्याजवळ आला. ओलाचिंब झालेल्या मसूदला भिजलेल्याची जाणीव नव्हती. मसूदला पाहताच सिद्दी म्हणाला,
'मसूद! बहाद्दर हो! त्या शिवाजीला पकडून आणलंस ना?'
'जी! कोणत्याही क्षणात तो शिवाजी हजर होईल.'
'जा, मसूद. पोशाख बदलून ये.'
मसूद गेला आणि डेऱ्यासमोर पालखी आली. पालखीला शेकडो सशस्त्र लोकांचा गराडा पडला होता. चौफेर मशाली धूर ओकत होत्या.
धिप्पाड देहाचा, काळ्या कुळकुळीत रंगाचा, जाड ओठांचा सिद्दी जौहर डेऱ्यासमोर आलेल्या पालखीकडं पाहत होता. दाट भुवयांखालील त्याचे आरक्त डोळे चमकत होते. आपल्या कुरळ्या केसांवरून हात फिरवीत सिद्दी जौहर पुढं झाला. पालखीतून उतरलेल्या राजांना तो म्हणाला,
'आवो, राजे! भिजला नाहीत ना?'
'फारसा नाही.'
बैठकीकडं बोट दाखवत सिद्दीनं सांगितलं,
'बसा, राजे!'
सिद्दी जौहरबरोबर फजलखान,सलाबतखान होते. आपल्या बापाच्या मृत्यूला कारणीभूत झालेला शिवाजी फाजलखान ताठरलेल्या नजरेनं पाहत होता. सिद्दी जौहरनं सलाबतखान आणि फाजलखान यांची ओळख करून दिली. सिद्दीनं सलाबतच्या कानात काही तरी सांगितलं आणि सलाबत बाहेर गेला.
सिद्दीनं राजांना विचारलं,
'राजासाब! पळून जात होता?'
'जमलं, तर पाहावं, हा इरादा होता.'
'तो फिर क्या हुआ?'
'जमलं नाही.'
सिद्दी ढगांच्या गडगडाटासारखा हसला. म्हणाला,
'राजे, बहाद्दूर आहात. तुमच्या धिटाईचं कौतुक वाटतं.'
'कौतुक! जौहर!' फाजलखान ओरडला, 'सलतनीच्या या दुश्मनाचं कौतुक कसलं? तलवारीनं त्याची कत्तल....'
'हां, फाजल! जुबाँ आवर.' सिद्दी जौहर डोळे फिरवीत म्हणाला, 'शिवाजीराजे हे तुझ्या-माझ्यासारखे सरदार नाहीत. ते राजे आहेत. त्यांचा निर्णय पादशाह सलामत घेतील. आज राजे आमचे मेहमान आहेत.'
त्या प्रकारानं राजांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नव्हती. ते शांतपणे सैल अंगानं आरामात बसले होते.
सलाबतखान डेऱ्यात आला. त्याच्या पाठोपाठ एक मुसलमान सरदार होता. डेऱ्यात येताच त्या सरदारानं सिद्दीला मुजरा केला. राजे त्या सरदाराकडं पाहत होते.
राजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. निरोपाचे विडे देण्यासाठी आले होते, तेव्हा तो हेर तिथं होता. सिद्दीनं त्या हेराला विचारलं,
'तोहमतखाँ! तुम्ही यांना ओळखता?'
'इनको कौन पहचानते नही? ये तो शिवा महाराज है!'
'पूरी तरहसे पहचानते हो?'
'जी, हाँ!' राजांकडं निरखून पाहत तोहमतखाँ म्हणाला, 'अच्छी तरहसे! ये शिवाजी महाराज हैं!'
'आप जा सकते हैं!' सिद्दीनं आज्ञा दिली.
मुजरा करून तोहमतखाँ गेला. आता सिद्दीच्या मनात कुठलाही संशय राहिला नव्हता. राजांच्या बोलण्यानं तो सावध झाला.
'सिद्दी जौहर! आपल्याला आमच्याबद्दल शक आला होता?'
सिद्दी हसला. तो म्हणाला,
'राजे! माफ करा. पण आम्ही संशयाला जागा ठेवत नसतो. तो आमचा रिवाज आहे. राजासाब, शराब पिओगे?'
मंचावरचा पेला सिद्दीनं उचलला. रौप्य सुरईतलं मद्य पेल्यात ओतून ते राजांच्या हाती दिलं. पण राजांनी ते ओठाला लावलं नाही.
सिद्दीची शंका दूर झाली होती. राजांचं सावध रूप तो कौतुकानं पाहत होता. तो म्हणाला,
'राजे! आमचाही शक आला ना?'
'माफ करा! पण आम्ही संशयाला थारा देत नसतो.'
सिद्दी खूश होऊन मोकळेपणानं हसला. राजांचं हसणं त्यात मिसळलं होतं.
सिद्दीनं विचारलं,
'राजासाब, एक प्रश्न विचारू?'
'विचारा ना!'
'जमलं असतं, तर कुठं जाणार होता?'
'खेळणा!'
सिद्दीच्या राकट ओठांवर हसू उमटलं,
'राजे! तुम्हांला ते जमलं नसतं.'
'का?'
'का? आता या क्षणी खेळण्याला आमच्या वतीनं सुर्वे आणि जसवंतराव मालवणकरांनी मोर्चे लावले आहेत.'
राजांचं सोंग घेतलेल्या शिवाचा चेहरा खरकन् उतरला.
खेळणा मोकळा आहे, अशी बातमी होती!
वेढा पडल्याचं समजलं कसं नाही?
हा सिद्दी काही खेळ तर खेळत नसेल!
बातमी खरी असली, तर राजे, बाजी सुखरूप गडावर पोहोचतील ना?
'राजे! कसला विचार करता?' सिद्दीनं विचारलं.
'काही नाही.' शिवा म्हणाला, ' बरं झालं, आम्ही खेळण्याला गेलो नाही, ते! रात्र खूप झाली. जरा विश्रांती घ्यावी म्हणतो.'
'बेशक!' म्हणत सिद्दी जौहर उठला आणि त्याच वेळी हेजीब नेहमीचे रिवाज न पाळता सरळ डेऱ्यात आला आणि सिद्दीच्या कानाला लागला. त्यानं कानात सांगितलेल्या मंत्रानं सिद्दीचं रूप पालटलं. संतापानं बेभान झालेला सिद्दी शिवावर नजर रोखत ओरडला.
'कोण आहेस तू?'
'मतलब?' शिवा उसन्या धैर्यानं म्हणाला, 'मी शिवाजी.'
'झूट! बिलकूल झूट! तो काफर शिवा केव्हाच पळून गेला.'
'तेही खरं आहे.' शिवा शांतपणे म्हणाला.
'मतलब?'
'सिद्दी जौहर! आमचे राजे एवढया सहजासहजी शत्रूच्या हाती सापडत नसतात. एव्हाना राजे खूप दूर गेले असतील. आता तुझ्या पंज्यात ते सापडणार नाहीत.'
'पण तू कोण?' सिद्दीचा संयम ढळत होता.
'माझं नाव शिवाच!' शिवा हसून म्हणाला, ' जरा आडनावात फरक आहे. ते शिवाजीराजे भोसले आणि मी शिवा न्हावी.'
'हजाम?'
'हां! हजाम! नाहीतर आपली एवढी सुरेख मान आपल्या ताब्यात कुणी दिली असती?'
'दगाs' म्हणत फाजल तलवार उपसून शिवाच्या छाताडाला लावत म्हणाला, 'याचा नतीजा माहीत आहे?'
'ते माहीत नसतं, तर इथं कशाला आलो असतो? फाजलखान, जिवाची भीती आम्हांला नाही. ती असती, तर पालखीत हीच कट्यार दुशेल्यात खोवली होती ना!'
'ये हिम्मत!' फाजल उसळला.
'हां, फाजल! आता संतापून काही उपयोग नाही. राजे केव्हाच दूर गेले.'
'हरामखोर!'
'हरामखोर मी नव्हे! मी माझ्या धन्यासाठी इथं आलो. हरामखोर तू! बाप मेला, तरी त्याच्याकडं पाठ वळवली नाहीस. मी तसा नाही. सोंगातला का होईना, पण शिवाजी बनलो. बस्स! जिवाचं सोनं झालं'
'कंबख्त!' फाजल किंचाळला आणि संतापानं भान हरवलेल्या फाजलनं आपली तलवार शिवाच्या छाताडातून आरपार नेली. तलवार उपसली, तेव्हा ते पातं रक्तानं नहालं होतं.
शिवाचं शरीर विजेसारखं कंप पावत होतं. छाताडात रुतलेल्या तलवारीच्या जखमेतून रक्त उसळत होतं. त्यावर आपला उजवा हात दाबून तोल सावरण्यासाठी शिवानं कनातीची दांडी डाव्या हातानं पकडली. एक विराट हास्य त्याच्या मुखावर अवतरलं. फाजलकडं पाहत तो म्हणाला,
'फाजल! सोंगातला शिवाजी झाला, म्हणून काय झालं? तो कधी पालथा पडतो काय?' एक असह्य वेदना शिवाच्या मुखावर प्रगटली. डोळे विस्फारले गेले. कनातीच्या दांडीला धरून घरंगळत ढासळत असता तो उद्गारला, 'राजेss, येतोss मुज...'
'कुत्ता कहीं का!' ढासळलेल्या शिवाकडं पाहत फाजलखान उभा होता. त्याच्या हातात रक्तानं माखलेली तलवार तशीच होती. शिवा न्हावी कनातीची दांडी धरून अंग मुरचडून तसाच बसला होता. मान कनातीच्या दांडीवर विसावली होती. प्राणज्योत केव्हाच नाहीशी झाली होती. पण छातीतून पडणाऱ्या रक्ताचा ओहोळ गालिच्यात टिपला जात होता.
फाजलचे शब्द ऐकताच सिद्दी संतापानं उद्गारला,
'कौन कुत्ता!'
शिवाकडं बोट दाखवत सिद्दी म्हणाला,
'येssनहीं, फाजल! गलत बात करतोस तू! असा एक जरी इमान बाळगणारा आदमी आदिलशाहीत पैदास्त झाला असता, तर या धुवांधार पावसात पन्हाळ्याला वेढा घालायची पाळी आली नसती. काय या माणसाचं इमान! जान कुर्बान करून टाकावी, असं वाटतं.'
सलाबतखानानं विचारलं,
'या माणसाबरोबर पालखीसह जी माणसं आली आहेत, त्यांचं काय करायचं?'
'काय करायचं?' फाजल हसला, 'कत्तल!'
'फाजल! तुझा दिमाग बिघडलेला दिसतो. बादशहांनी आमच्या हाती ही मोहीम दिली, हे विसरतोस! इथं तुला हुकूम देण्याचा अधिकार नाही.'
'मग काय त्यांना सोडणार?' फाजलनं विचारलं.
'अलबत! ज्याला पकडायचा, तो केव्हाच सुटला. गरुड निघून गेला. कावळे मारून काय करणार? फाजल, त्या माणसांची कत्तल केलीस, तर त्याचा नतीजा जाणतोस?'
'काय होईल?'
'काय होईल? काय होणार नाही, ते विचार. त्यातल्या प्रत्येकाची बायको, आई, बाप, मुलं गोतावळा आहे. ती माणसं पिढ्यान् पिढ्याची वैरी बनतील. एका माणसाचं वैर घ्यायला शंभर उभे राहतील. तुझ्या आब्बाजानचा वध झाला, तेव्हा सापडलेले सारे सरदार बाईज्जत शिवाजीनं माघारी पाठविले. ती नुसती दया नव्हती. त्यात फार मोठं शहाणपण होतं.'
सिद्दी जौहर बोलत असता मसूद कपडे करून डेऱ्यात आला. कनातीच्या दांडीला मिठी मारून पडलेला शिवाजी, रक्तानं डागाळलेली तलवार घेऊन उभा असलेला फाजलखान पाहून त्याला काय बोलावं, हे सुचत नव्हतं.
मसूदला पाहताच सिद्दीनं आज्ञा केली,
'मसूद! शिवाजीचा पाठलाग करा. तो पळून जाता कामा नये.'
मसूदला काही कळत नव्हतं. त्यानं पडलेल्या शिवाकडं बोट दाखवलं.
'मूरख! तो शिवा नाही. अस्सल शिवा केव्हाच पळून गेला. त्याला गाठ. त्याला पकडून आणल्याखेरीज आम्हांला तोंड दाखवू नको. अंधे कहीं के! जाव! निकल जाव मेरे सामनेसे!!'
सिद्दीच्या संतापानं भ्यालेला मसूद वळला.
छावणीत धावपळ सुरू झाली आणि काही वेळानं शेकडो घोड्यांच्या टापांचा आवाज उठला.
तुफान वाऱ्या-वादळाची, पाऊस पाण्याची क्षती न बाळगता कोरड्या कपड्यांनिशी आलेला मसूद परत भिजण्यासाठी चिखला-राडीतून शिवाजीचा शोध घेत दौडत होता.
*🚩क्रमशः🚩*

⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४३ ▪*

⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४३ ▪*...


...
आषाढी पौर्णिमेचा दिवस असूनही दाट धुक्यामुळं चांदणं जमिनीवर उतरत नव्हतं. घोंगावणारं वारं गडावर थैमान घालत होतं. कोणत्या क्षणी पाऊस कोसळेल, याचा भरवसा नव्हता.
सज्जा कोठीत राजे आपल्या साथीदारांसह बसले होते. राजांनी विचारलं,
'किती सांगाती निवडलेत?'
'राजे! संगती सहाशे धारकरी आहेत. दोन पालख्यांसाठी तीस चक्री भोई आहेत. त्यांखेरीज सामान नेण्यासाठी दहा जण आहेत. पुऱ्या वाटेवर जबाबदार माणसं पेरली आहेत. आपण मुळीच चिंता करू नये.'
'बाजी! तुमच्यासारखी भावंडं असल्यावर काळजी कसली?' राजे म्हणाले.
सदर महालाच्या आजूबाजूला असलेल्या छपऱ्यांतून सारे धारकरी बसले होते. नाचण्याची भाकरी आणि झुणका साऱ्यांना वाढला जात होता. गडावर रात्र उतरली. रात्र वाढत होती. मशाली, टेंभे, पलोते जळत होते. स्वप्नामध्ये वावरावे, तसे सारे दाट धुक्यातून वावरत होते. वादळी वारा अंगावर काटा उभा करीत होता. पण त्याची जाणीव कुणालाही राहिली नव्हती.
एक प्रहर रात्र उलटली आणि महादेव राजदिंडीच्या वाटेनं गडावर आला. त्यानं बाजींना एकच सांगितलं,
'चला!'
राजे सदर महालाबाहेर येताना त्र्यंबकजी व गंगाधरपंतांना म्हणाले,
'त्र्यंबकजी, गड लढवता येईल, तेवढा लढवा. जीव राखून शत्रू सामोरे जा. प्रसंग पडला, तर बेलाशक गड शत्रूच्या हवाली करा.'
'गड शत्रूच्या हवाली करा?' त्र्यंबकजी म्हणाले, 'मग आम्ही किल्लेदार कसले?'
'असा खोटा अभिमान बाळगू नका. पंत, तुम्ही असला, तर दहा गडांची किल्लेदारी देता येईल. पन्हाळा आज आपल्या हातून गेला, तर त्याचं दुःख कसलं? परत तो घेता येईल. विवेक सोडून काही करू नका.'
राजे सदर महालाबाहेर आले. राजांच्या संगती मशालधारी चालत होते. पालखीत बसण्याआधी राजे थांबले. त्यांनी पाठीमागच्या पालखीकडं पाहिलं. राजांच्या वेषात मागं शिवा उभा होता. शिवा पुढं झाला. त्यानं राजांच्या पायाला हात लावून वंदन केलं. राजांनी शिवाला मिठी मारली. राजांना काही बोलवत नव्हतं. शिवाच्या पाठीवरून हात फिरत होते.
बाजी म्हणाले,
'राजे! वेळ नको. पालखीत बसावं.'
राजे पालखीत बसले. पालखी उचलली गेली. पाठीमागच्या पालखीसमोर शिवा उभा होता. बाजींनी सांगितलं,
'बैस.'
'नको, मी चालतो.'
'बैस म्हणतो ना! पाऊस केव्हा कोसळेल, हे सांगता येणार नाही. तू भिजता कामा नये.'
दोन्ही पालख्या उचलल्या गेल्या. दुतर्फा धारकरी चालत होते. पावसाळी चिखलाची वाट असल्यानं, कुणाच्याही पायांत वहाण नव्हती. अनवाणी पावलांनी सारे चालत होते. उत्तरेचा राजदिंडीचा दरवाजा आला. सोबतीला आलेले मशालकरी थांबले. दिंडी दरवाज्यापर्यंत पोहोचवायला आलेले गंगाधरपंत व त्र्यंबकजी यांना राजे म्हणाले,
'त्र्यंबकजी, आम्ही येतो. गड संभाळा.'
बाजी म्हणाले,
'चला.'
दोन्ही पालख्यांवरची अलवानं सोडली गेली. राजांची पालखी सर्वांसह गड उतरत होती
मशाली केव्हाच मागं पडल्या होत्या. दाट धुक्यातून दोन पालख्या सावरत मावळे धावत होते.
गडाच्या पायथ्याशी सारे आले आणि पाऊस कोसळू लागला. उभ्या पावसातून चिखल, पाणी तुडवत सारे धावत होते. राजांच्या पालखीच्या दांडीवर हात ठेवून बाजी पळत होते. कवारखिंड नजीक आली. कवारखिंडीच्या दोन्ही बाजूंच्या डोंगरांवर सिद्दीचे मेटे होते, याची साऱ्यांना कल्पना होती. ते मेटे ओलांडले की, पुढची वाट सुखरूप होती. कवार खिंडीतला ओढा खळाळत वाहत होता. दाट रानानं भरलेल्या त्या मुलखातून डोंगरकडेनं दोन्ही पालख्या जात होत्या.
त्याच वेळी आवाज उठला,
'हुश्शारss.... कौन है?'
बाजी म्हणाले,
'चला! थांबू नका.'
राजांची पालखी पळवली जात होती. राजांची पालखी पुढे गेली आणि डोंगरावरून मशाली खाली उतरू लागल्या. बाजींनी धारकऱ्यांना इशारत दिली. पाच-पंचवीस धारकरी दोन्ही बाजूंच्या रानात शिरले आणि काही वेळातच घोंगावणाऱ्या वाऱ्यातून, दाट धुक्यातून आर्त किंकाळ्या उठल्या,
'दगा s दगा ss'
बाजी शिवाच्या पालखीकडं धावले. पालखी क्षणभर थांबली. बाजी म्हणाले,
'शिवा, आता तुझी वाट वेगळी.'
भर अंधारात कुणी कुणाला दिसत नव्हतं. बाजी अंदाजानं पुढं झाले. त्यांनी शिवाला मिठी मारली. शिवा म्हणाला,
'धनी! काळजी करू नका! तुम्हांला राजे मानतात. एकच आशीर्वाद द्या.'
'बोल!' घोगऱ्या आवाजात बाजी म्हणाले.
_'मरताना भीती वाटायला नको.'_ शिवाचे शब्द उमटले.
बाजींना हुंदका फुटला. मन घट्ट करून त्यांनी पालखीवरचं अलवान खाली ओढलं. भोयांना आज्ञा दिली. शिवाची पालखी धारकऱ्यांच्यासह उलट वाटेला लागली.
पुढं गेलेली राजांची पालखी गाठण्यासाठी बाजी आपल्या धारकऱ्यांसह धावू लागले.
'शिवाजी भाग गयाss? कौन कहता है, शिवा भाग गयाss'
सिद्दी जौहर आपल्या पलंगावरून उठत किंचाळला. विझलेल्या साऱ्या मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. मद्यानं धुंद झालेला सिद्दी नुकताच कुठं निद्राधीन होत होता. तोच शिवाजी पळून गेल्याची बातमी त्याला सांगण्यात आली. संतप्त सिद्दी उभा होता. डोळे आरक्त बनले होते. ज्यानं ही बातमी आणली, त्याचे गाल सिद्दीच्या थपडा-बुक्क्यांनी रंगले होते.
फाजल, मसूद धावत डेऱ्यात आले. सिद्दी जौहरसमोर येताच फाजल म्हणाला,
'तरी मी सांगत होतो....'
'खामोश!' सिद्दीची संतप्त नजर वळताच, फाजलचे पुढचे शब्द घशातच राहिले. सिद्दीची नजर मसूदवर वळली. तो म्हणाला,
'मसूद! शिवाका पीछा करो! जिंदा या मुर्दा, त्याला घेऊन आल्या खेरीज, आमच्यासमोर येऊ नका. जाsss'
छावणीची धावपळ उडाली. मसूदनं भर रात्री हजार घोडेस्वार, पायदळ जमा केलं. भर पावसात राजांच्या मागावर तो धावू लागला. घोंगावणाऱ्या वादळ-वाऱ्याची, उभ्या पावसाची तमा न बाळगता मसूद त्या चिखल-राडीतून घोडदौड करीत होता. पेटलेल्या शेकडो मशाली अमावस्येला भुतांच्या काड्या नाचाव्यात, तशा नाचत होत्या.
अचानक पुढं गेलेला कोणी तरी किंचाळला,
'दुश्मन ss'
मसूदला अवसान चढलं. मसूदच्या वाटेनं येणाऱ्या पालखीला गराडा घालण्यात आला. चिंब भिजलेला मसूद पायउतार झाला. पालखीभोवती मशाली आणल्या गेल्या. पालखीचं अलवान उचललं गेलं. स्मितवदनानं बसलेला शिवा सर्वांच्या नजरेत आला.
'शिवाजी राजे!' मसूद उद्गारला.
'हां!' शिवा म्हणाला.
मसूदला काय बोलावं, हे कळेना. आपल्या चेहऱ्यावरून ओघळणारं पाणी निपटत तो म्हणाला, 'आपल्याला छावणीकडं नेण्यासाठी, आम्ही आलो आहोत.'
'आम्ही तिकडंच येत होतो! ठीक आहे. चलाs'
पालखीला मसूदनं गराडा दिला. पालखी सिद्दीच्या तळाकडं चालू लागली.
*🚩क्रमशः🚩*

⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४२▪*

⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४२▪*


गंगाधरपंत गडावर आले. सदरमहालात राजे त्यांची वाट पाहत होते. गंगाधरपंतांना पाहताच राजांनी विचारलं,
'बोला, गंगाधरपंत!'
'राजे, आपल्या भेटीच्या वार्तेनं सिद्दी समाधानी बनला आहे. फाजल मात्र संतप्त दिसत होता.'
'त्यात चूक काय आहे? अफजलचा वध आम्ही केला, हे सदैव त्याला डाचत राहिलच.' राजांनी सांगितलं, 'पंत, आम्ही उद्या सिद्दीच्या भेटीला जाणार, ही बातमी गडावर पसरू द्या. योजल्याप्रमाणे पार पडलं, तर आम्ही या वेढ्यातून बाहेर पडू. नाही जमलं, तर सिद्दीच्या भेटीला जावं लागेलच!'
'राजे!' बाजी म्हणाले, 'आपल्या आखल्या बेतात एक तसूभर जरी कस राहिला असता, तरी मी ही जबाबदारी घेतली नसती. खेळणा गड मोकळा आहे. आपल्याला खेळणा गडावर पोहोचवण्याची जबाबदारी माझी.'
'बाजी! ती आम्हांला कधीच शंका नव्हती. पण कुठलाही बेत करताना अरिष्टांची चिंता राहावी, म्हणून आम्ही ते बोललो.'
'राजे! अरिष्ट कोसळू नये, म्हणून तर आम्ही आपल्या भोवती गोळा झालो. येणारं संकट आम्ही आनंदानं पेलू.' बाजींनी सांगितलं.
'बाजी, हा खेळ आम्ही आमच्यासाठी मांडला नाही. आम्ही या कारणी हरवलो, तरी हा डाव असाच चालू राहिला पाहिजे.'
मध्यान्हीचा सूर्य ढळला, तरी कुणाला जेवणा-खाण्याची जाणीव राहिली नव्हती. बाजींनी आपली माणसं निवडली होती. त्र्यंबक भास्कर, गंगाधरपंत, राजांच्या संगती जाणारं दळ, सामान यांची देखरेख करीत होते.
सायंकाळी राजे सदर महालातून बाहेर आले. सज्जाकोठीच्या समोरच्या छपरीत दोन पालख्या सजल्या होत्या. राजांनी बाजींना विचारलं,
'बाजी, पालखी कशाला?'
'आपल्यासाठी!'
'नाही, बाजी. आम्ही तुम्हां सर्वांच्या संगती चालत जाऊ.'
'क्षमा असावी, महाराज!' बाजी म्हणाले, 'वाट बिकट आहे. पल्ला दूरचा आहे. काळोखातून जावं लागेल. ते आपल्याला झेपणार नाही.'
'तुम्ही म्हणाल, ते खरं!' राजे पालखीकडं पाहत विचारते झाले, 'पण दोन पालख्या कशाला?'
'एक आपल्यासाठी. आणि....'
'आणि?'
'दुसरी शिवा न्हाव्यासाठी!'
'शिवा!' राजे उद्गारले.
'हो! प्रसंग पडला, तर शिवा न्हाव्याची पालखी सिद्दीच्या तळावर जाईल. आपलं रूप घेऊन.'
राजे बाजींच्याकडं पाहतच राहिले, आपला सारा उद्वेग संयमित करीत राजे म्हणाले,
'बाजी, कसला अघोरी खेळ खेळता हा!'
'राजे!' बाजी धिटाईनं म्हणाले, 'आपली जबाबदारी मी पत्करली आहे. तुम्हीच सांगितलं की, हा डाव मांडला, तो तुमच्यासाठी नव्हे. तो पुरा करायचा झाला, तर तुम्ही राहिलं पाहिजे. आपण सुखरूपपणे खेळण्यावर पोहोचणं एवढीच ही कामगिरी आहे.'
'जेवढी तुमची कामगिरी सरळ आहे, तेवढी आमची नाही, याचंच दुःख आम्हांला फार आहे.' राजे कातर होऊन बोलले.
'राजे! आमचं काही चुकलं का?' बाजी म्हणाले.
'नाही, बाजी! तुम्हांला आम्ही वडिलकीचा मान दिला, तो आम्हांला पाळायला हवा. तुमची आज्ञा आम्ही कधीही डावलणार नाही.'
राजे सदर महालाच्या दुसऱ्या मजल्यावर निघून गेले.
बाजी एकटे सदर महालाच्या खालच्या दिवाणखान्यात उभे होते. त्यांनी शिवा न्हाव्याला हाक मारली. शिवा न्हावी आला. बाजी त्याला आलेला पाहताच बेचैन बनले.
शिवानं विचारलं,
'का, बाजी, का बोलवलंत?'
बाजी म्हणाले,
'एक जोखमीची कामगिरी आहे. करशील?'
शिवा हसला. म्हणाला,
'धनी, जोखीम सांगितली आणि ती पाळली नाही, असं कधी झालं?'
'एवढी सोपी जोखीम नाही ही!' बाजी म्हणाले, 'प्रसंग आला, तर जीव गमवावा लागेल. चालेल?'
शिवाच्या चेहऱ्यावर तेच हास्य होतं. त्यानं सांगितलं,
' जीव! त्याची बढाई कशाला सांगता? कवाबी मरायचं नव्हं? पन जीव ओवाळून टाकावं, असं कुणीतरी भेटायला हवं!'
'तुझ्याच नशिबी ते भाग्य आहे.' बाजी म्हणाले, 'रात्री राजांना घेऊन आम्ही गडाबाहेर जाणार आहोत. तुला दुसरे राजे बनायला हवं. दुर्दैवानं राजांची जाग मेटेकऱ्यांना लागली, तर तुला राजे बनून सिद्दीच्या छावणीवर जावं लागेल. राजे वेढ्याबाहेर जाईपर्यंत तुला सिद्दीला गुंतवावं लागेल. आहे तयारी?'
'असली संधी कोन सोडंल? आता बेत बदलू नका. ती जोखीम माझी.' शिवा म्हणाला.
'शाबास, रे वाघा!' म्हणत बाजींनी शिवाला मिठी मारली. 'मला खात्री होतीच.' कोपऱ्यातल्या मंचावर ठेवलेल्या कपड्यांकडं बोट दाखवत बाजी म्हणाले, 'राजांचे कपडे ठेवले आहेत. ते अंगावर चढव.'
शिवाने राजांचा पोशाख चढवला. अंगरख्याचे बंद बांधत असता बाजी आत आले. आपल्या हातानं त्यांनी शिवाच्या मस्तकी जिरेटोप घातला. चार पावलं मागं सरकून ते शिवाचं रूप बघत होते.
'छान!' बाजी समाधानानं म्हणाले, 'ज्यांनी राजांना जवळून पाहिलं नाही, त्यांना तू राजेच वाटशील.'
बाजींनी शिवाला दुशेला बांधला. दुशेल्यात कट्यार, तलवार खोवली. आणि त्याच वेळी गंगाधरपंत आत आले. शिवाला पाहताच त्यांनी हात जोडले.
बाजी, शिवा हसले. शिवाकडं पाहताच गंगाधरपंत उद्गारले,
'कोण.... तुम्ही...तू....''
'काय पंत! सोंग सजलं ना?'
'बेमालूम!' पंत म्हणाले, 'एकदम राजांचा भास होतो.'
'शिवा, सोंग उभं राहिलं. पण तुझी भाषा! ते कसं जमणार?'
शिवानं कमरेवर मूठ ठेवली. बाजींकडे पाहत तो म्हणाला,
'बाजी, तुम्हांला शंका का यावी? पंत, आमच्या आज्ञेप्रमाणे खलिता रवाना झाला ना? आमच्या आज्ञेत कुचराई झाली, तर अक्षम्य गुन्हा ठरेल. ध्यानी घ्या!'
पंत आणि बाजी आश्चर्यानं शिवाचं बोलणं ऐकत होते.
पंत म्हणाले,
'बाबा, रे! हे केव्हा पाठ केलंस?'
'आता राजांच्या संगती राहून येवढंबी येत न्हाई?' शिवानं सवाल केला.
'येत, बाबा, येत!' बाजींनी सांगितलं, 'पंत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवला, हे खोटं वाटत होतं. आज ते पटलं.'
दोघं मोठ्यानं हसले. शिवानं विचारलं,
'मला समजलं न्हाई.'
'नाही समजलं, तेच बरं!' बाजी शिवाच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाले, 'वरच्या महालात राजे आहेत, त्यांना मुजरा करून ये.'
वरच्या महालाशी शिवाचे पाय अडखळले. त्याचं मनं संकोचलं होतं.
राजे महालात उभे होते. पावलांचा आवाज ऐकताच ते वळले. त्यांनी हाक दिली,
'कोण आहे?'
शिवानं आत पाऊल टाकलं आणि राजांना मुजरा केला. राजांना आपण आपली प्रतिमाच पाहतो, असा भास झाला. शिवाकडं पाहत ते म्हणाले,
'शेवटी, बाजींनी आपला हट्ट पुरा केला, तर... शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही. कदाचित तुझ्यामुळं आम्ही सुटून जाऊ. पण तू सुटणं कठीण. त्या कर्दनकाळ सिद्दीच्या हातांत आपसूक सापडशील तू. तुला कोणी दया दाखवणार नाही. त्याचाच विचार आम्ही करीत आहोत.'
शिवानं राजांचे पाय धरले. तो म्हणाला,
'राजे, आता विचार करू नका. भवानीची आण आहे तुम्हांला. तुम्ही राहिला, तर माझ्यासारखे लाख शिवा जन्माला येतील. तुमच्या कारणी जीव पडला, तर जन्माचं सोनं होईल.'
राजांनी शिवाला उभं केलं. एक निःश्वास सोडून ते म्हणाले,
'ठीक आहे. जे आपल्या नशिबी असेल, ते होईल. जा, शिवा. आम्हांला एकटं राहू दे.'
शिवा वळला. तोच राजांची हाक कानांवर आली,
'शिवा थांब!'
राजांनी आपली संदूक उघडली. त्यातली एक कवड्यांची माळ काढली. आपल्या गळ्यातला मोत्याचा कंठा त्यांनी शिवाच्या गळ्यात घातला आणि कवड्यांची माळ त्याच्या गळ्यात घालत ते म्हणाले,
'शिवा, तो सिद्दी जौहर कशानं फसला नाही, तरी ही कवड्यांची माळ बघून फसेल. हे भोसल्यांचं खरं लेणं. भवानीचा प्रसाद. देवीच्या भक्ताची खूण. हिला कमीपणा आणू नको.'
राजांनी शिवाला मिठीत घेतलं. त्यांना अश्रू आवरत नव्हते.
शिवा म्हणाला,
'महाराजs'
त्याला मिठीतून दूर करीत, हात हलवत राजे भरल्या आवाजात म्हणाले,
'तू जा! आम्हांला एकांत हवा.'
पाठमोऱ्या राजांना मुजरा करून शिवा महालाबाहेर गेला. राजे भारल्यासारखे त्याच जागी खिळून होते.
कसली माणसं तयार केली आम्ही?
आमच्यासाठी मरू जाणारे जीव का शोधत होतो?
त्याचसाठी का हा स्वराज्याचा पट मांडला?
या पटावरची मोहरी अशीच उधळायला लागली, तर आमचा डाव साधणार कसा?
राजे! असला दुसऱ्या जिवाशी खेळ खेळण्याचा तुम्हांला काही अधिकार नव्हता!
अधिकार?
कुणाचा?
कोणी कुणावर गाजवायचा?
अधिकार गाजवतात बाजी.
हा शिवा आग्रह धरतो.
एवढं स्वस्त मरण कोणी केलं नसेल, ते ही माणसं करताहेत.
या राजेपणाचा वीट येतो, ते याचमुळं!
राजांना काही सुचत नव्हतं. ते तसेच मंचकाजवळ गेले आणि त्यांनी स्वतःला मंचकावर झोकून दिलं.
*🚩क्रमशः🚩*

⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४१▪*

⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४१▪*


सदर महालात अहोरात्र खलबतं चालू होती. दिवसा, रात्री, भर पावसातून, धुक्यातून महादेव धारकऱ्यांसह बाहेर पडत होता. माघारी येत होता.
___आणि एके दिवशी गंगाधरपंत तहाचा खलिता आणि पांढरं निशाण हाती घेऊन मोजक्या धारकऱ्यांनिशी गडाखाली तहासाठी उतरले.
सिद्दी जौहरनं त्यांचं स्वागत केलं. अभय मिळाल्यास, आपण सारे किल्ले शरण करून बादशहाच्या सेवेस हजर राहण्यास तयार आहोत, असं राजांनी सिद्दीस कळविलं होतं.
वादळ-वाऱ्यात, उभ्या पावसात सापडलेल्या सिद्दीच्या छावणीला ती बातमी आनंददायक वाटली. तहाची बोलणी सुरू झाली. गंगाधरपंत गडावरून सिद्दीच्या छावणीपर्यंत येरझाऱ्या घालीत होते - आणि शेवटी राजांनी सिद्दीची भेट घेण्याचं ठरवलं.
राजांनी सकाळच्या वेळी बाजींना बोलावून घेतलं. बाजी येताच ते स्मित वदनानं म्हणाले,
'बाजी, आम्ही दोन दिवसांनी सिद्दीच्या भेटीला जाणार. या असल्या वादळी हवेत, भर पावसात आमच्या या सैनिकांनी निष्ठेनं पहारा ठेवला. त्यांना मानाचे विडे द्यायला आम्ही जायला हवं!'
'आपण जाणार?' बाजींनी विचारलं.
'हो!' राजांनी हाक मारली, 'शिवाs'
आतून शिवा बाहेर आला. बाजी थक्क होऊन शिवाकडं पाहत होते. राजांचे कपडे त्यानं परिधान केले होते. मस्तकी जिरेटोप होता. कपाळी शिवगंध होतं. शिवाच्या रूपानं राजांचं दुसरं रूप साकार झालं होतं.
राजे म्हणाले,
'बाजी, या शिवाजी राजांच्या समवेत तुम्ही जा. सैनिकांना, मानकऱ्यांना मानाचे विडे देऊन माघारी या.'
बाजी हसले. त्यांना सर्व समजलं.
थोड्याच वेळात राजांचा विश्वास घोडा उभा केला गेला. शिवाबरोबर जाणारे शिबंदीचे घोडे तयार होते. शिवानं राजांना मुजरा केला आणि तो सदरेवर आला. पण राजे बाहेर आले नाहीत. शिवापाठोपाठ बाजी चालत होते. शिवानं विश्वास घोड्यावर मांड टाकली आणि बाजींच्यासह ते अश्वपथक चार दरवाज्याकडं जाऊ लागलं.
पाऊस थांबला होता. धुक्याचे लोट गडावरून वाहत होते. दोन प्रहरच्या वेळी शिवासह बाजी परत आले. वाड्यात येताच राजांनी शिवाला विचारलं,
'मानाचे विडे दिले?'
'जी!'
बाजी हसत म्हणाले,
'राजे, हा शिवा खरा सोंगाड्या आहे. आपल्या माणसांना तर विडे घेताना बहुमान वाटला. एवढंच नव्हे, तर गडाखाली उतरत असता आमच्या माणसांनी ह्याला ओळखलं नाही. सारे मुजरे करीत होते आणि हा घोड्यावरून मान तुकवून मुजऱ्यांचा स्वीकार करीत होता.'
'जसं सोंग, तसा रिवाजss' राजे शिवाला म्हणाले, 'शिवा, ते कपडे व्यवस्थित ठेव. कुणास माहीत, त्याची गरज केव्हा लागेल, ती!'
हे बोलत असता राजांच्या मुखावर सदैव विलसणारं स्मित लुप्त झालं होतं.
रात्री सदर महालात खास बैठक भरली होती. त्र्यंबकजी, बाजी, फुलाजी, महादेव, शिवा न्हावी, गंगाधरपंत एवढीच मंडळी तिथं होती. राजे सांगत होते,
'बाजी, पन्हाळा खूप महिने लढवता येईल, हे खरं. पण तेवढी उसंत आम्हांला नाही. शाईस्तेखानाचं संकट पुण्याच्या उंबरठ्यावर आलं आहे. हा पावसाळा संपला की, गारठलेली सिद्दी जौहरची फौज ताजीतवानी होईल. नंतर वेढा लढवणं एवढं सोपं जाणार नाही.'
बाजी विश्वासानं बोलले,
'त्याची चिंता नसावी, राजे. महादेवनं शोधलेली वाट सुखरूप आहे. काल महादेव परत जाऊन आला. पश्चिमेच्या दोन मेटी पातळ आहेत. डोंगराच्या कडेकडेनं जावं लागेल.'
'आणि शत्रू सावध झाला तर?...' त्र्यंबकजी म्हणाले.
'शत्रू सावध झाला, तर.... जाग्याला कापून काढू.' बाजींची छाती रुंदावली होती.
'तेही जमेल!' राजे म्हणाले, 'पण खेळणा वीस कोस दूर. शत्रूनं गाठायच्या आधी तो गड जवळ करता येईल?'
'राजे!' बाजी म्हणाले, 'फक्त वेढ्यातून बाहेर पडू या. पुढं खेळणा गाठायची जबाबदारी आमची.'
राजांची नजर गंगाधरपंतांच्याकडं वळली. ते म्हणाले,
'पंत! सिद्दी जौहरसाठी आमचा खलिता तयार करा. त्यात लिहाः 'सलाबत खानानं मध्यस्थी करून अली शहांच्याकडं रदबदली करावी; म्हणजे आम्ही आपलं सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करू.' आणि सिद्दी जौहरना सांगा की, आमच्या जीविताची हमी दिली, तर आम्ही आनंदानं त्यांच्याशी दिलखुलास वाटाघाटीसाठी त्याच्या छावणीत हजर होऊ.'
'दुसरे दिवशी पहाटेपासून बाजी, फुलाजी, यशवंत, बांदल मावळे निवडत होते. सदर महालासमोर दोन पालख्या सज्ज केल्या जात होत्या. त्या महालाकडं कोणीही फिरकू नये, असा पहारा जारी केला होता.'
पावसाची उघडीप मिळताच गंगाधरपंत राजांचा खलिता घेऊन पांढऱ्या निशाणासह गडाखाली उतरले.
सिद्दी जौहरच्या छावणीत शिवाजीची माणसं पांढरं निशाण घेऊन येत असल्याची बातमी गेली. सिद्दी जौहर, फाजलखान, मसूद सारे गंगाधरपंतांची वाट पाहत होते.
गंगाधरपंत डेऱ्यात आले. अत्यंत नम्रतेनं त्यांनी सिद्दीच्या हाती खलिता दिला. सिद्दीनं तो खलिता शेजारच्या दुभाष्याकडं दिला. खलित्याचा मसुदा समजताच सिद्दी जौहर म्हणाला,
'ठीक है! राजासाब यहाँ कब हाजिर होंगे?'
'आपण राजांच्या जीविताची हमी दिली, तर राजे उद्या आपल्यासमोर हजर होतील.'
'आम्ही जरूर हमी देऊ.' सिद्दी जौहर म्हणाला, 'पण राजासाब त्यावर विश्वास ठेवतील?'
'का नाही?' गंगाधरपंत म्हणाले.
'आणि दगा झाला, तर?'
'अशक्य!' गंगाधरपंत म्हणाले, 'दगा होणार नाही, याचा राजांना पुरा विश्वास आहे.'
'मतलब?' सिद्दीनं विचारलं.
'राजे, हे फर्जंद शहाजीराजांचे सुपुत्र आहेत. राजांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी शहाजी राजांना हे सहन होणार नाही.'
सिद्दी जौहरला गंगाधरपंतांचं भाषण ऐकून कौतुक वाटत होतं. तो म्हणाला,
'बिलकुल दुरुस्त! आम्हांला तुमच्या राजांच्या सावधगिरीचं जरूर कौतुक वाटतं. राजांना सांगा, त्यांच्या भेटीसाठी आम्ही उतावीळ आहोत.'
सिद्दी जौहरनं जरी वस्त्रं, विडे देऊन गंगाधरपंतांना सन्मानित केलं. आणि गंगाधरपंत गडाकडं जायला निघाले.
गंगाधरपंत निघून जाताच, रागानं उसळलेला फाजलखान म्हणाला,
'येऊ दे तो शिवा! ज्यानं माझ्या आब्बाजानची कत्तल केली, त्याला मी जिंदा सोडणार नाही.'
सिद्दी जौहरची तिखट नजर फाजलवर गेली. सिद्दी म्हणाला,
'हां, फाजल! ही माझी छावणी आहे. माझ्या हुकमाखेरीज इथं गवताची काडीही हलता उपयोगी नाही.'
'लेकिन...'
'फाजल! त्या शिवाला दरबारात हजर करणं, एवढंच माझं काम आहे. तो दरबारी गेल्यानंतर तुम्ही आणि दरबार हवा तो निर्णय घ्या.'
'तो शिवा एवढा सरळ नाही. आब्बाजानला त्यानं असंच फसवलं होतं.'
सिद्दी जौहर मोकळेपणानं हसला. त्याच्या हसण्यानं सारा डेरा भरून गेला. सिद्दीचा आवाज उठला,
'फाजलखान! त्या भेटीत ह्या भेटीत फार फरक आहे. इथं सिद्दी जौहर आहे आणि तो अफजलखान होता. त्या वेळी तुझे आब्बाजान मूर्खपणानं, एकटे शिवाजीला भेटायला त्याच्या गोटात गेले होते. उद्या शिवाजी आमच्या गोटात येतो आहे...'
शिवाजी राजे उद्या छावणीत येणार, या वार्तेनं सिद्दी जौहरचा वेढा आनंदीत झाला.
वेढ्याचा ताण ढिला पडला.
विजापूरच्या दरबारातलं आपलं स्वागत रंगवण्यात सिद्दी जौहर मशगूल झाला होता.
बाहेर उभा पाऊस कोसळत होता.
*🚩क्रमशः🚩*

⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४०▪*

⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ४०▪*


🚩🚩गडावर धो-धो पाऊस कोसळत होता. जेव्हा पाऊस उसंत घेई, तेव्हा दाट धुकं अवतरत असे. रात्रीच्या वेळी तटावरून फिरणाऱ्या रखवालदारांनी हाताच्या अंतरावर धरलेली मशाल त्या उतरणाऱ्या धुक्यात काजव्यासारखी दिसे. राजांनी सारे धारकरी भर पावसात, पावसाची तमा न बाळगता चारी बाजूंच्या तटाला भिडवले होते. तटाचा पहारा जारी केला होता. दिवसरात्र गडकोटावरून 'हुश्शार s रखवालाss' आवाज उठत होते.
मध्यरात्रीचा समय उलटला होता. पाऊस थांबला होता. दाट धुकं सर्वत्र पसरलं होतं. सिदू हवालदार उत्तरेच्या तटावरून दोन बारगिरांच्यासह फिरत होता. गार वारा अंगाला झोंबत होता. गडावरच्या झाडांच्या पानांची सळसळ आणि घोंगावणारं वारं धुक्याची भयाणता वाढवत होतं. एका हातानं डोक्यावरची इरली सावारत तिघेजण तटावरून जात असता अचानक कसला तरी आवाज आला. बारगिरानं मशाल सावरत आवाज दिला. 'हुश्शारss' आणि क्षणात तिघांची पावलं थांबली. तटाखालून अस्पष्ट आवाज आला.
'हुश्शारss'
सिदूनं आपलं इरलं फेकून दिलं. बारगिरांनी त्याचं अनुकरण केलं. तिघांनी आपल्या तलवारी सावरल्या. सिदूनं आवाज दिला,
'अरे, कोन हाय?'
खालून आवाज आला.
'दोर सोडा, दोरss'
तो आवाज ऐकून सिदूच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यानं बारगिराला पिटाळलं.
परत खालून आवाज आला,
'दोर सोडा, दोरss'
'उबा ऱ्हा!'
तटावर पाच-पन्नास धारकरी गोळा झाले. त्यात त्र्यंबक भास्कर पण होते. किल्लेदार त्र्यंबक भास्करनी आज्ञा दिली,
'दोर टाका! बघू, काय हाय, ते.'
सिदूनं दोराचं वेटोळं तटाखाली फेकलं. दोराचं टोक सिदूच्या हातात होतं. तो ओरडला,
'दोर आला, हो s'
दोराला हिसके बसताच सिदू म्हणाला,
'दोर पकडा.'
दोघं बारगीर पुढं झाले. तटाला पाय देऊन सर्व ताकद लावून ते दोर धरून उभे होते. दोराला ओढ लागत होती. ती ओढ हळूहळू वाढत होती. शेवटी तटावर एक हात आला. बारगीर पुढं झाले. त्यांनी त्या माणसाला तटावर घेतला. त्र्यंबकजींनी विचारलं,
'आणि कोन हाये?'
तो थकलेला इसम म्हणाला,
'कोन न्हाई.'
मशालीच्या उजेडात त्र्यंबकजी त्या माणसाला न्याहाळत होते. त्याचा वेष साधूचा होता. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. अनेक ठिकाणी त्याचं अंग खरचटलं होतं.
'कोण तू?' त्र्यंबकजींनी विचारलं.
'साधू महाराज!' तो म्हणाला.
'मग अपरात्री या वाटेनं का आलास?'
'दिवसा येन्याची परिस्थिती ऱ्हायली न्हाई. याबिगर दुसरी वाट नव्हती. मला राजांच्या म्होरं उभा करा.'
'तर! मानकरीच तू! म्हणे, राजांच्या समोर उभं करा! राजे सुख करताहेत.'
'मग त्यांना उठवा! नाही तर...'
'नाही तर काय?' त्र्यंबकजींनी विचारलं.
'राजे आपल्यावर रागवतील.'
त्या संन्याशाच्या धिटाईनं त्र्यंबकजी गोंधळले. सन्याशासह ते वाड्याकडं चालू लागले.
राजांना जागं करण्यात आलं. ताडकन पलंगावरून उतरत राजांनी विचारलं,
'काय आहे?'
'किल्लेदार आलेत. त्यांनीच उठवायला सांगितलं.'
'पाठव त्यांना.'
त्र्यंबकजी आत आले. राजांना म्हणाले,
'गडावर एक संन्याशी आला आहे.'
'कसा आला?' राजांनी करड्या आवाजात विचारलं.
'तटाखाली दोर सोडून त्याला घ्यावं लागलं. आपल्यासमोर हजर करा, असं तो म्हणतो.'
'घेऊन या त्याला.'
संन्याशी आणला गेला. त्याला पाहताच राजांच्या मुखावर समाधान पसरलं. राजे त्र्यंबकजींना म्हणाले,
'तुम्ही जा. विश्रांती घ्या.'
'पण महाराज...'
राजे हसले. ते म्हणाले,
'त्र्यंबकजी हा संन्याशी नव्हे. हा आपला महादेव. त्याला तुम्ही ओळखला नाही. तुम्ही निर्धास्तपणे जा.'
आश्चर्यचकित झालेले त्र्यंबकजी सन्याशाकडं पाहत निघून गेले. राजांनी आपली संदूक उघडून आपले कपडे महादेवच्या हातात दिले.
'हे कपडे घाल. तोवर आम्ही आलो.'
राजे बाहेर गेले. देवडीवरची धुमी प्रज्वलित करायला सांगून परत आले. तोवर महादेवनं कपडे बदलले होते. महादेवसमवेत राजे देवडीवर आले. धुमी प्रज्वलित झाली होती. तिथं अंथरलेल्या घोंगड्यावर दोघे बसले. राजे म्हणाले,
'बोल...'
'मासाहेब आपल्या काळजीत आहेत. नेताजी हरल्यापासून त्यांच्या जिवाला चैन नाही.'
राजांनी निःश्वास सोडला. त्यांनी विचारलं,
'आणि शास्ताखान?'
'त्यानं पुण्यात तळ ठोकला आहे. ऐंशी हजारांची फौज घेऊन तो उतरला आहे.'
महादेव आणि राजे बोलत होते. दिवस केव्हा उजाडला, हेही त्यांना कळलं नाही.
सकाळी बाजी, फुलाजी सदरेवर आले. राजांना मुजरा करून बाजींनी विचारलं,
'राजे, काल रात्री तटावरून महादेव आला, म्हणे...'
'हो!'
'पण एवढया वेढ्यातून तो आला कसा?'
'ते त्यालाच विचारा.' राजे हसून म्हणाले. राजांनी हाक मारली, 'महादेव!'
'जी!' म्हणत महादेव बाहेर आला.
बाजी पुढं झाले. त्यांनी महादेवच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं,
'महादेव, काल रात्री खरंच तू वेढ्यातून आलास?'
'मी काय पाखरू आहे उडून यायला?'
सारे हसले.
'पण एवढा कडक वेढा! मुंगीलाही शिरकाव होणार नाही.' फुलाजी म्हणाले.
'मुंगीला काय...मनात आणलं, तर हत्तीबी ईल...'
'हत्ती?' बाजी उद्गारले.
'हां हत्ती! मावळतीच्या बाजूला दऱ्याखोरी हाईत. दाट रानानं भरलेला तो मुलूख हाय. रेड्याची मुसंडी घेत दरीतनं ओढं पळत्यात. तिथं कोन मरायला जाणार? मेट्या हाईत डोंगरावरच्या टोकावर. ह्या उपऱ्यांस्नी त्या वाटा कशा समजणार?'
'अरे, पण तटावरून यायची काय गरज होती? राजदिंडीचा दरवाजा नव्हता का?' बाजींनी विचारलं.
महादेव शरमला. तो म्हणाला,
'धुकं लई दाट. काय दिसंना झालं. वाट चुकली आणि सरळ तटाखाली आलो.'
'छान केलंस!' राजे म्हणाले, 'तरी बरं; वाट चुकून कुठं सिद्दीच्या छावणीत दाखल झाला नाहीस.'
सारे परत हसले. सदरेवरचे सारे राजांच्या आज्ञेनं उठून आत गेले. बराच वेळ सर्वांच्यासह ते बोलत बसले होते.
बाहेर अखंड पावसाच्या धारा ओतत होत्या. सोसाट्याचा वारा गडावर घोंघावत होता.🚩🚩
*🚩क्रमशः🚩*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ३९▪*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ३९▪*



🚩🚩दुसरे दिवशी राजे सदर महालावर उभे होते. आपल्या संतप्त नजरेनं ते सिद्दी जौहरच्या हालचाली पाहत होते. टोपीकरांच्या दोन तोफा पुढं सरकवीत येत होत्या. मोर्चे बांधले जात होते आणि थोड्या वेळात टोपीकरांच्या तोफांनी धूर ओकला. सारा गड त्या तोफांच्या आवाजानं थरथरला. राजे सदर महालात उभे होते. तोफांचे गोळे अर्ध्या कड्यापर्यंतही पोहोचत नव्हते.
परकोट बुरूजावर बाजी शत्रूच्या निशाणबाजीचा अंदाज घेत उभे होते. शत्रू टप्प्यात येतो, असे वाटताच बाजींनी आज्ञा दिली,
'तोफेचं तोंड वळवा!'
बुरूजावरची लांबझोक फिरंगी तोफ वळवली जात होती. काली तोफ वळवली गेली. बाजी गर्जले,
'आता बघू कालीची करामत! आम्ही इशारा करताच तिला बत्ती द्या.'
बाजी बुरूज उतरले. दूर अंतरावर जाताच त्यांनी हातानं इशारा केला आणि कानांत बोटं घातली. काली तोफेला बत्ती दिली गेली. बत्ती देताच बत्तीदारानं जवळच्या टाक्यात उडी घेतली. टाक्यातलं पाणी उसळलं आणि बत्तीदार टाक्यातल्या पाण्यात डुबकी घेत असताच काली धडाडली. तिच्या पाठोपाठ गडावरच्या तोफा धडाडू लागल्या. साऱ्या गडावर माकडांचा आणि पाखरांचा चीत्कार उठला.
पागेतल्या घोड्यांच्या खिंकाळ्यांनी आवार भरून गेला.
तोफांच्या माऱ्यात येणारे गोळे पाहून टोपीकर आपल्या तोफा मागं नेत होते.
ती धावपळ राजे सदर महालाच्या सज्जावरून आनंदानं पाहत होते.
दिवस उलटले, तसे पूर्वेकडचे वारे बंद झाले. पश्चिमेच्या वाऱ्यांनी जोर धरला. काळ्या ढगांच्या राशी पश्चिमेकडून पूर्वेला सरकू लागल्या. येणाऱ्या पावसाच्या तयारीला गडकोट लागला. गडावरच्या घरट्यांना मावळतीला झडपा लावल्या जात होत्या. गार वारे गडावर आले. आकाशात ढगांची दाटी वाढू लागली.
राजे सकाळी सदर महालावर गेले. गच्चीवर उभे राहून ते सिद्दी जौहरची छावणी निरखीत असता उद्गारले,
'बाजी! ते पहाss'
'काय, महाराज?' बाजींनी विचारलं.
'सिद्दीचा शामियाना, डेरे कुठं आहेत?'
बाजींनी पाहिलं. तो राजांचं म्हणणं खरं होतं.
उन्हात तळपणारा तांबड्या अलवानाचा शामियाना कुठं दिसत नव्हता. सिद्दीचा हिरव्या रंगाचा डेरा तोही उतरला होता.
बाजी आनंदानं म्हणाले,
'राजे! आपलं भाकीत खरं ठरलं. सिद्दी वेढा उठवतो आहे.'
'एवढा सोपा शत्रू तो नाही. काही तरी डाव आहे.'
राजांचा तर्क खरा ठरला. सिद्दी जौहर पावसाळ्याला तोंड देण्यासाठी पावसाळी छपऱ्या उभारत होता. जिथं शामियाना होता, तिथं रानातली लाकडं तोडून भव्य छपरी उभारली होती. खानाच्या डेऱ्याचीही जागा अशाच मोठ्या छपरीनं व्यापली होती.
ते दृश्य पाहून राजे बाजींना म्हणाले,
'बाजी! गनीम भारी पडला! सिद्दी आता हलणार नाही. तो आपली वाट बघत राहणार!'
'कसली?'
'शरणागतीची!' राजांनी सांगितलं.
'वाट बघ, म्हणावं!' बाजी उसळले, 'वेळ आलीच, तर मारू किंवा मरू.'
राजे हसले. ते म्हणाले,
'नाही, बाजी, असला अतिरेकी विचार आपल्याला परवडणार नाही. ते फक्त रजपूत करू जाणे! मोठं संकट आलं की, वैतागानं प्राणाची बाजी लावायची आणि रणांगणी समर्पण करायचं. मागं बायका-मुलांनी जोहार करायचा. नावलौकिक फक्त मरणाचा. यश मात्र नेहमीच शत्रूच्या हाती!'
बाजींनी विचारलं,
'क्षमा असावी, राजे! म्हणजे नेहमी जीव राखूनच राहायचं?'
'असं कोण म्हणतं! प्रसंग आला, तर कोणी जीव राखून राहत नाही. फक्त एकच. तो प्रसंग जीव-मोलाचा आसायला हवा. आता पावसाळा सुरू होईल. हा पाऊस सिद्दी जौहरचा दिमाख उतरवील आणि त्याच वेळी आपले नेताजी, दोराजी मदतीला येतील. तेव्हा सिद्दी टिकाव धरेल, असं वाटत नाही. एव्हाना नेताजी यायला हवे होते.'
सर्वांचं लक्ष नेताजी केव्हा येतात, इकडं लागलं होतं. गडावर पाऊस उभा कोसळत होता. पाऊस थांबला की, सारा गड धुक्यानं व्यापला जाई.
असंच धुकं गडावर उतरलं होतं. राजे सज्जा कोठीतून तो धुक्याचा पडदा पाहत होते. मागं बाजी उभे होते. अचानक धुक्याचा पडदा विरळ होऊ लागला. समाधि-अवस्थेत मोहपटल दूर व्हावं आणि स्वर्गीय अलौकिक दृश्य दिसू लागावं, तसं साऱ्या सृष्टीचं रूप साकार झालं. दरीतून आलेला आणि हिरव्याकंच माळवदावरून जाणारा तो नदीचा प्रवाह एखाद्या हिरवं वस्त्र परिधान केलेल्या नवरीच्या कमरपट्ट्यासारखा भासत होता. डोंगरमाथ्यावरून धुक्याचे ढग जात होते.
ते दृश्य पाहून राजे म्हणाले,
'बाजी! शिवशंकराचं रूप यातूनच साकार झालं नसेल ना? हा निळाभोर डोंगर, त्याच्या मस्तकावरून खाली उतरणारे हे प्रपात. शिवविभूती रेखाटण्यासाठीच त्याच्या माथ्यावर रेंगाळणारे हे धुक्याचे विरळ ढग...'
राजे ते दृश्य पाहत असतानाच परत दाट धुकं अवतरलं, क्षणात दिसणारं ते दृश्य त्या पडद्याआड लुप्त झालं. राजांनी निःश्वास सोडला. ते माघारी वळले.
घोड्यांच्या टापांचा आवाज घुमला. राजे सज्जाकडं धावले. दाट धुक्यातून टापांचा आवाज येत होता. गडाखाली धावपळ उडाल्याची निशाणी होती. राजे म्हणाले,
'बाजी! आवाज ऐकलात? आमचे नेताजी येत असावेत!'
त्याच वेळी राजांच्या हेरांनी राजांना सोडवण्यासाठी नेताजी येत असल्याची बातमी आणली.
राजे म्हणाले,
'बाजी, आता वेळ करून चालणार नाही. नेताजी वेढा फोडतील, तेव्हा त्यांच्या संगती आपण सर्वांनी बाहेर पडायला हवं.'
राजे वाड्यात आले. सामानाची बांधाबांध झाली. वाड्यासमोर राजांच घोडदळ उभं राहिलं. राजांनी त्र्यंबक भास्करांना सांगितलं,
'जर नेताजींनी वेढा फोडला, तर आम्ही बाहेर पडू. तुम्ही गड लढवा. आम्ही बाहेर जाताच सारी कुमक गोळा करून सिद्दीवर हल्ला करू. चिंता करू नका.'
राजे सर्व तयारीनिशी सज्ज होऊन बातमीची वाट पाहत होते. सायंकाळ होत असता गडावर बातमी आली---
'सिद्दीनं नेताजीचा पराभव केला होता, त्याला माघार घ्यावी लागली होती.'
त्या बातमीनं राजे निराश झाले नाहीत. ते म्हणाले,
'बाजी! सिद्दी केवढा जागरूक आहे, याची ही खूण आहे. या वेढ्यातून सुटण्याचा आपणच विचार करायला हवा!'
राजे शांतपणे बोलत होते. पण बाजींचं मन चिंतेनं ग्रासलं होतं.🚩🚩
*🚩क्रमशः🚩*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ३८ ▪*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ३८ ▪*


🚩🚩सिद्दी जौहर हा निष्णात सेनापती. जेव्हा त्यानं पन्हाळगड पाहिला, तेव्हाच त्याला गडाच्या मजबुतीची कल्पना आली होती. त्यानं राजापूरच्या इंग्रजांकडं मदत मागण्यासाठी आपली माणसं पाठविली होती. पन्हाळगडावरून झालेल्या तोफांच्या माऱ्यानं तो अधिक संतापला होता. येणाऱ्या पावसाळ्याची त्याला भीती होती. मुंगीलाही वाव मिळू नये, असा वेढा त्यानं घातला होता.
सायंकाळच्या वेळी वाड्यासमोर राजांचा विश्वास घोडा खोगीर चढवून तयार होता. त्याखेरीज पाच-सहा घोडी खोगीरांनी सज्ज होती.
राजे सदरेवर आले. साऱ्यांनी मुजरे केले.
'बाजी, त्र्यंबकजी! चला.'
राजे स्वार झाले. राजांचं पथक गडकोटाची पाहणी करीत गडावर फिरत होतं. राजदिंडी, पुसाटीचा बुरूज, तीन दरवाजा, चार दरवाजा एवढी चक्कर घेऊन राजे वाड्यावरून सदर महालात आले.
दोन प्रहरी राजांना जागं करण्यात आलं.
'काय झालं?' राजांनी विचारलं.
'सदरेवर किल्लेदार आल्यात जी!' सेवकानं सांगितलं.
राजे सदरेवर आले, तेव्हा चिंतातूर त्र्यंबकजी आणि बाजी उभे होते. त्यांच्या मागं यशवंत जगदाळे उभा होता.
'काय झालं, त्र्यंबकजी!' राजांनी विचारलं.
'राजे! टोपीकरांनी घात केला. ते सिद्दीला मिळाले.'
'खोटं!' राजे म्हणाले.
'नाही, राजे! अनुस्कुरा वाटेनं टोपीकर दोन लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन सिद्दीच्या तळावर हजर झाले आहेत.'
राजांचा संताप उफाळला. कधीही संयम न सोडणारे राजे म्हणाले,
'ही हिंमत! दारोजीनं राजापूरवर स्वारी केली. या गोऱ्या माकडांना पकडलं. भीक मागत आमच्या दाराशी आले. आदिलशाहीला मदत करणार नाही, असा तह करून आपला जीव वाचवून गेले. बेइमान! करार मोडून आज आमच्यावर चालून येतात?'
राजे क्षणभर थांबले. दीर्घ श्वास त्यांनी घेतला. आणि खिन्नपणे ते हसले---
'बाजी, ही टोपीकरांची जात फार हुशार. सातासमुद्रांवरून आलेत ना! बोलून चालून व्यापारी. ते हा सौदा सोडतील कसा? शास्ताखान चालून येतो, हे त्यांना माहीत असणार. सिद्दीच्या वेढ्यात आम्ही पुरे अडकलो आहो, हे ते जाणतात. या दुहेरी संकटातून आम्ही वाचणार नाही, हा त्यांचा अंदाज! ठीक आहे. जगदंबेच्या कृपेनं आम्ही या संकटातून तरलो, तर त्या टोपीकरांना जरूर धडा शिकवू.'
'त्यांच्या जवळ दूरवरचं पाहण्याचं यंत्र आहे, म्हणे!' त्र्यंबकजी म्हणाले.
'असेल! त्यांना दूरवरचं दिसतं. आम्हांला दिसत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. बाजी, आम्हांला भीती ना आदिलशाहीची, ना दिल्ली तख्ताची. खरी भीती वाटते, ती या टोपीकरांची. सातासमुद्रांवरून आलेले हे व्यापारी नाहीत. त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफा, बंदुका त्यांसह ते येतात, ते का व्यापारासाठी! एक ना एक दिवस, हेच टोपीवाले आसेतुहिमालय कबज्यात घेऊन मोकळे नाही झाले, तर नशीब!'
राजांनी थोडी उसंत घेतली. ते बाजी, त्र्यंबकजींकडं वळून म्हणाले,
'कठीण वेळ आहे खरं! आपला तोफखाना सज्ज ठेवा. पण ही बातमी आणली कुणी?'
बाजींनी सांगितलं,
'यशवंत जगदाळे घेऊन आला.'
राजांनी विचारलं,
'यशवंता गडाखाली उतरला होता?'
'जी!'
राजांची नजर यशवंतावर खिळली. कठोर शब्द उमटले,
'यशवंत! हे फिरतीचे दिवस नाहीत. शत्रूगोटाभोवती फिरणं हे धोक्याचं असतं, हे तुम्हांला कळायला हवं होतं. बाजी, आमच्या आज्ञेखेरीज कोणीही गडाखाली उतरत नाही, याची दखल घ्या. आम्हांला थोडा एकांत हवा. आम्ही जातो.'
राजे गेले. आणि पडल्या चेहऱ्याच्या यशवंताकडं पाहत बाजींनी विचारलं,
'मिळाली शाबासकी? पण, यशवंता, तू गडाखाली गेलाच कशाला?'
यशवंतानं आवंढा गिळला.'
'सांग ना!' बाजी म्हणाले.
'मैतरांनी पैज लावली.'
'कसली पैज?'
'खालच्या छावनीवर फेरफटका करू ईल, त्याला...'
यशवंत अडखळलेला पहाताच बाजींनी विचारलं,
'कसली पैज?'
'कोंबड्याची! जिंकल, तर त्यांनी कोंबडं द्याच. न्हायतर मी...'
'छान!' बाजी हसले. 'इकडे राजांनी मेजवान्या बंद केल्या आणि तिकडं कोंबड्यांची पैज लावता! आणि एवढा जीव स्वस्त केव्हापासून झाला?'
सारे हसले.
बाजी यशवंतासह सदरेबाहेर पडले.
रात्री बाजी, फुलाजी आपल्या निवासात बोलत बसले होते. फुलाजींनी बाजींची चिंता ओळखली होती. आपल्या चिलमीचा बार फुंकत फुलाजी म्हणाले,
'बाजी, गावावर पाडव्याचा सण जोरात साजरा झाला. पण तू नव्हतास, त्याचं दोन पोरींना फार वाईट वाटलं.'
'देवीची पालखी गेली ना?' बाजींनी विचारलं.
'त्यात काहीही कमी पडलं नाही.'
'बरं झालं! पण, दादा, आज राजे उदास होते, हे ध्यानी आलं?'
'होय! राजे कधी नाही ते घोरात दिसले. ते गोरे आले नसते, तर...'
'दादा, माझ्या मनात एक विचार आहे. उद्या आपली बांदल फौज घेऊन गडाखाली उतरायचं.'
'राजांना न विचारता?'
'हां! आणि त्या टोपीकरांच्या दोन्ही तोफा निकामी करून यायचं.'
'सिद्दीचा वेढा एवढा सोपा वाटला?' फुलाजींनी चिलमीचा धूर सोडत विचारलं.
'लई तर काय होईल? मरू एवढंच ना?' बाजी म्हणाले.
'तू मरशील. मी मरेन. पण राजे एकटे राहतील, याचा विचार केलास?'
'म्हणजे?' बाजींनी विचारलं.
'त्यांना कोण वाचवणार? नाही, बाजी, हा राजा जपला नाही, तर काही राहणार नाही. या राजावरची नजर हलू न देता त्याला जपायला हवं.'
बाजींच्या डोळ्यांत पाणी तरळलं. त्यांना हुंदका फुटला. डोळे टिपून ते म्हणाले,
'कोणत्या जन्माचं देणं देतो आहे, कुणास ठाऊक. या राजाचं प्रत्येक पाऊल पाहत असता वाटतं की, याच्यावरून जीव ओवाळून टाकावा! त्याच्या रूपात हरवून जावं! दादा, हा माणूस जगला नाही, तर काही होणार नाही. आमचा मुलूख, आमची माणसं अब्रूनं जगणार नाहीत.'
बाजींना काही सुचत नव्हतं. ते उठले आणि घराबाहेर पडले.
सर्वत्र काळोख पसरला होता. तटावरून गस्तकऱ्यांच्या दिवट्या फिरत होत्या. आवाज उठत होता,
'हुश्श्यारsss'🚩🚩
*🚩क्रमशः🚩*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ३७▪*

*⚔🌄पावनखिंड🌄⚔* *▪भाग : ३७▪*



🚩🚩गडाखाली वेढ्याची तयारी जोरात सुरू झाली होती. सर्व वाटा रोखल्या गेल्या. ठायी ठायी डेरे, शामियाने उभारले जात होते. घोडदळाची फिरती गस्त चालू होती. रात्री सिद्दी जौहरच्या छावणीतल्या मशाली बघून आकाशातली नक्षत्रं धरित्रीवर उतरल्याचा भास होत होता.
एके दिवशी धुरळ्याचे लोट उडवत सिद्दी जौहर आपल्या घोडदळासह नौबत वाजवीत आपल्या छावणीत हजर झाला. सिद्दी जौहर येताच त्यानं वेगानं वेढा वाढवायला सुरूवात केली. पूर्वेच्या बाजूला स्वतः सिद्दी जौहर, फाजल, बडेखान व रुस्तुमेजमां होते. पश्चिमेला सादतखान, मसूद, बाजी घोरपडे, भाईखान होते.
तोफांचे मोर्चे बांधले जात होते. छावणीची वर्दळ, तोफांच्या जागा, सैन्याची वर्दळ गडावरून दिसत होती.
राजे ते शांतपणे पाहत होते.
'राजे! आपण काय करायचं?' बाजींनी विचारलं.
'बघायचं!' राजे म्हणाले.
'नुसतं बघायचं?'
'हो! त्यांची चाल प्रथम समजायला हवी. त्यानंतर आपली पावलं टाकायची. बघता-बघता उन्हाळा संपेल. मग मृगराज आपल्या दळासह आपल्या मदतीला येतील. विजापूरच्या कोरड्या मुलखावर वाढलेली ही माणसं आमच्या पावसापुढं टिकाव धरणार नाहीत. त्यांना ते परवडायचं नाही. त्या दिवासाची आपण वाट पहायला हवी.'
दुसऱ्या दिवशी गडावर तोफांचे आवाज येऊ लागले.
राजे सज्जा कोठीवर गेले. सिद्दी जौहरच्या तोफा वाजत होत्या. पण एकही गोळा गडाच्या पायथ्याशी पोहोचत नव्हता.
राजे हसत म्हणाले,
'नेमबाजीचा सराव करीत असावेत!' त्र्यंबकजींच्याकडं वळून ते म्हणाले, 'त्र्यंबकजी! एवढा तोफांचा भडिमार होतो आणि गडावरून त्याला उत्तर दिलं जात नाही?'
त्र्यंबकजी संकोचले. ते म्हणाले,
'बाजींनी तशी आज्ञा दिली आहे.'
'आज्ञा? कसली?'
'बाजी म्हणाले की, आम्ही सांगितल्याखेरीज एकही तोफ उडता कामा नये.'
'असं बाजी म्हणाले? त्यांना बोलावून घ्या.'
थोड्याच वेळात बाजी फुलाजींसह सज्जा कोठीवर हजर झाले. राजांना मुजरा करून ते उभे राहिले. राजांनी विचारले,
'बाजी! आम्ही तुमचीच वाट पाहत होतो.'
'राजे! गडाची पश्चिम बाजू पाहायला आम्ही गेलो होतो.'
राजे म्हणाले,
'इकडं पूर्वेकडून सिद्दी जौहर तोफांचा भडिमार करतो आहे. आणि तुम्ही पश्चिमेला गेलात?'
'आम्ही समजलो नाही!'
'समजायचं काय?' राजे म्हणाले, 'गडावर तीनशे तोफा असून शत्रूला प्रत्युत्तर दिलं जात नाही. त्र्यंबकजी सांगतात की, ती आज्ञा तुम्ही केली, म्हणून! खरं?'
'जी! खरं आहे.'
'पण का? कशासाठी?'
'राजे! सिद्दीच्या तोफा उडत असतील. कदाचित तो आपल्या नेमबाजीचा सराव करीत असेल. त्याच्या तोफांचे गोळे गडावर यायला त्याला दुसरा जन्म घ्यावा लागेल.'
राजांच्या मुखावरचं स्मित तेच होतं. त्यांनी विचारलं,
'पण तो आपल्याला कमकुवत समजेल ना!'
'राजे! तेच व्हायला हवं. एकदा सिद्दी जौहर टप्प्यात येऊ द्या. मग त्याला समजेल; पन्हाळ्याची ताकद काय आहे, ती!'
राजांना आपला संयम राखणं कठीण जात होतं. आनंदभरित झालेल्या राजांनी बाजींच्या खांद्यावर हात ठेवला. ते म्हणाले,
'बाजी! हा संयम क्वचित दिसतो. तुम्हांला बांदल देशमुखांनी दिवाण नेमलं, याचं रहस्य आज आम्हांला उलगडलं.'
सिद्दी जौहर तोफांचे गोळे उडवत होता. पूर्व व पश्चिम बाजूंनी आवाज उठत होते. पण गडावरून एकही आवाज उठत नव्हता. ती अवस्था बघून सिद्दीच्या चेहऱ्यावर हसू उमटत होतं. पन्हाळ्याच्या आश्रयाला गेलेल्या राजांना मजबूत गड मिळाला असेल, पण गडाची लढण्याची ताकद नाही, असा अंदाज होता. दुसऱ्या दिवाशीच सुलतान ढवा करण्याचा बेत त्यानं आखला. त्या अंदाजानं त्यानं सैन्याची विभागणी केली.
राजांची अपेक्षा तीच होती. दुसरे दिवशी राजे पूर्वेच्या बुरूजावर दाखल झाले. गडावरच्या तीनशे तोफा माचून तयार झाल्या. राजे बुरूजावरून पाहत होते. रात्रीत सिद्दीच्या तोफा पुढं सरकल्या होत्या. तोफांचे गोळे उतरंडीवर कोसळत होते आणि काही वेळानंतर सिद्दीची फौज गडाकडं येताना दिसू लागली.
गडावर सर्वत्र शांतता पसरली होती. भर उन्हातून सिद्दीची फौज 'दीन s दीन ss' म्हणत गडाकडं धावत होती.
राजांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारे स्मित दिसत होतं. बाजींनी अधीरतेनं विचारलं,
'राजे! आता?'
'नाही, बाजी! तो निर्णय तुम्ही घ्यायचा! या क्षणापर्यंत तुम्हीच आमचा तोफखाना थांबवलात. यापुढची चाल तुमची. आम्ही सज्जा कोठीतून तुमची करामत पाहतो.'
राजांच्या त्या बोलण्यानं बाजी सुखावले. विश्वासानं धावत ते सज्जा कोठीतून उतरले. पाठीमागून आलेल्या त्र्यंबक भास्करना म्हणाले,
'त्र्यंबकजी, तुम्ही तीन दरवाज्याकडं जा. आमची तोफ डागल्याखेरीज तुमच्या तोफा डागू नका.'
त्र्यंबकजी तीन दरवाज्याकडं रवाना झाले. बाजी पूर्वेच्या बुरूजावर आले. तोफ सज्ज होती. बाजी गडाच्या पायथ्यावरून येणारे सिद्दी जौहरचे सैनिक पाहत होते. बाजींनी हात वर केला आणि ते गरजले,
'जय भवानी ss'
__आणि पन्हाळगडच्या पूर्वेच्या बुरूजावरून पहिली तोफ कडाडली. तिचा आवाज विरतो, न विरतो, तोच साऱ्या तोफा आग ओकू लागल्या. निर्भयतेनं येणाऱ्या शत्रूच्या फौजेवर आगीचा वर्षाव झाला. खाली एकच गदारोळ उडाला.'
सिद्दी जौहरची माघार घेणारी फौज राजे आनंदानं पाहत होते.
सिद्दी जौहरनं आपली माणसं, तोफा मागं खेचल्या. ती धावपळ पाहण्यास गडावरच्या साऱ्या तटावर गडाच्या शिबंदीची माणसं गोळा झाली होती. 'जय भवानीs' आणि 'हर हर महादेव' च्या गर्जनेनं सारा गड निनादत होता.🚩🚩
*🚩क्रमशः🚩*

पावनखिंड🌄⚔ ▪भाग : ३६▪

पावनखिंड🌄⚔* ▪भाग : ३६▪*


वाड्याच्या राजसदरेवरती मशाली पेटल्या होत्या. राजे सदरेवर येताच पोशाख बदलून आलेले बाजी, फुलाजी आणि त्र्यंबकजी यांनी राजांना मुजरे केले. राजांनी विचारलं,
'काय, त्र्यंबकजी! गडाची हालहवाल काय म्हणते?'
त्र्यंबकजींना काही बोलता येत नव्हतं. त्यांना जोराची शिंक आली. उपरण्यानं आपली शिंक सावरत ते म्हणाले,
'ठीक आहे, महाराज!'
राजे हसले. ते त्र्यंबकजींच्याकडं पाहत होते. त्र्यंबकजींचा सारा चेहरा तांबडाबुंद झाला होता. राजे हसले. ते म्हणाले,
'बस्स! एक वळीवात भिजलात, तर सर्दी झाली!'
बाजी म्हणाले,
'राजे! जो गड मातब्बर असतो, सुरक्षित असतो, त्या गडाचे किल्लेदार नेहमीच नाजूक तब्येतीचे असतात.'
'अगदी खरं!' राजे म्हणाले, 'त्यासाठीच माणसांना संकटांचा सराव व्हावा.'
अचानक बाजींच लक्ष सदरेवर येणाऱ्या शिवा न्हाव्याकडं गेलं आणि ते एकदम उद्गारले,
'या, राजे!'
राजांनी शिवा न्हाव्याकडं पाहिलं आणि बाजींना ते म्हणाले,
'काय म्हणालात, बाजी?'
बाजी हसले,
'पाडव्याच्या दिवशी खेळ झाला. त्या दिवशी गडावर पोरांनी सोंगं काढली होती... आणि अचानक आपण आलात, म्हणून गलका झाला. सारे मुजरे करीत होते आणि आपलं सोंग घेतलेला हा शिवा मुजरे स्वीकारत पुढं येत होता.'
राजे शिवाकडं पाहत होते.
शिवा राजांच्या अंगलटीचा. बाकदार नाकाचा. राजांच्या चेहऱ्याशी जुळणारा होता. त्याची दाढी-मिश्यांची ठेवण राजांच्यासारखीच होती.
थिजल्यासारखा शिवा न्हावी खांबाशी उभा होता.
राजे एकटक नजरेनं त्याच्याकडं पाहत होते.
बाजींची नजरही राजांच्या नजरेबरोबर शिवावर खिळली होती.
कोल्हापूर सोडून सिद्दी जौहर पन्हाळ्याच्या दिशेनं येतो आहे, ही बातमी गडावर पोहोचली. त्र्यंबक भास्कर आणि बाजी गडावरच्या दिशेनं बुरूजांवरच्या तोफांची पाहणी करून आले. येवढं मोठं संकट येत असताही गडावरच्या कुणाच्याही मुखावर चिंतेची रेघ उमटली नव्हती. राजांचा आधार, राजांचं वास्तव्य त्यात सारे निर्धास्त होते.
राजे दोनप्रहरच्या वेळी विश्रांती घेत असता, त्र्यंबक भास्कर आल्याची वर्दी त्यांना मिळाली. राजे उठून सदरेवर आले. राजांनी विचारलं,
'सिद्दी जौहर आला ना!'
'जी! गडाच्या पायथ्याजवळ त्याची फौज थडकली आहे.'
'चला, पाहू.'
राजे सज्जा कोठीवर गेले. गच्चीतून ते पाहत होते.
भर उन्हाळ्यात एखादा वळवाचा काळा ढग माळवदावरून आपली सावली टाकीत यावा, तसा फौजेचा लोंढा गडाखाली येत होता. घोड्यांच्या टापांचे आवाज गडापर्यंत पोहोचत होते.
राजे ते दृश्य शांतपणे पाहत होते. राजे मागं उभ्या असलेल्या बाजींना म्हणाले,
'बेत तर मोठा दिसतो! बाजी, आपल्या आयुष्यात आम्हांला कधी विश्रांती मिळाली नाही. या सिद्दीच्या वेढ्यामुळं ती आम्हांला मनमुराद घेता येईल, असं वाटतं.'
एवढं मोठं संकट आलं असताही, राजांची ती शांत प्रवृत्ती पाहून बाजी चकित झाले होते. विजयाच्या वेळी बेभान होणारे बाजींनी अनेक पाहिले होते. पण कठीण समयीच्या येणाऱ्या संकटाचं अशा तऱ्हेनं स्वागत करणारे फार थोडे होते.
सिद्दी जौहरच्या छावणीची पाहणी करून राजांनी सदर महाल सोडला आणि ते राजवाड्याकडं जात असता, बाई सामोरी आली आणि तिनं राजांच्या पायांवर डोकं ठेवलं. राजे म्हणाले,
'आऊ! सांग काय झालं?'
'काय सांगू, राजं!' ती पोक्त वयाची बाई म्हणाली, 'माझी पोर, नातू वेढ्यात अडकली.'
'राजांना सारं सांग, बाई.' बाजी म्हणाले.
त्या बाईनं डोळे पुसले. ती सांगू लागली,
'आमी गडावरच्या वाडीचं. मी, माझी सून आणि नातू येवढीच आमी मानसं. गावात सादवलं व्हतं. ज्यांचं कुनी न्हाई, त्यांनी गडावर यावं. सून म्हनली, तुमी पुढं जावा. मी मागनं येतो. धाड बसली मला! म्या गडावर आलू. पन माझी सून, माझा नातू गडाखाली ऱ्हायला, बगा.'
राजांनी विचारलं,
'आणि तुझा मुलगा कुठं आहे?'
त्या बाईच्या डोळ्यांत अश्रू तरळले. हुंदका फुटला. डोळे टिपत ती म्हणाली,
'राजा, तुला ठावं न्हाई? कोल्हापूरच्या लढाईत माझा पोरगा गमावला, त्याला बघायला बी मिळाला न्हाई. म्या सांगत व्हते, पन मला कुनाचा बी धीर न्हाई. तू जाऊ नगं! तर म्हनला-- 'राजाला टाकून परजा ऱ्हाईल काय?'
त्या बाईच्या बोलण्यानं राजांचं मन चिंतातूर झालं. काय करावं सुचत नव्हतं. ते म्हणाले,
'चला, आऊ! वाड्याकडं जाऊ. बघू काय करायचं ते!'
राजे सर्वांच्यासह वाड्याकडं जात असता मागून हाक आली,
'आज्जेss'
साऱ्यांची पावलं थांबली. एक सात-आठ वर्षांचं पोर धावत येत होतं. ती बाई धावली. तिनं त्या पोराला कवटाळलं. त्या पोरामागोमाग एक बाई आणि महादेव सोंगाडी प्रकटले. महादेवानं सांगितलं,
'महाराज! सिद्दी उद्या दाखल व्हनार हाय. गावात ही पोर अडकली व्हती. तिला घेऊन आलो.'
राजांनी हातातलं कडं उतरलं. ते महादेवाच्या हातात घालत म्हणाले,
'जगदंबेची कृपा! महादेव आज तू आमची लाज राखलीस! मोठ्या संकटातून आम्हांला पार केलंस'
राजे बाजींना म्हणाले,
'बाजी, आमचे नजरबाज नुसत्या शत्रूवर नजर ठेवीत नाहीत. त्यांचं लक्ष आमच्या माणसांवरही असतं, हे केवढं भाग्य! बाजी! त्या बाईला आणि तिच्या सुनेला एक घरटं द्या. काळजी करू नका, म्हणून सांगा.' जाता-जाता राजांनी महादेवला आज्ञा केली, 'महादेव, वेढा बळकट होण्याआधी तू गड उतर. जमेल, तशा बातम्या देत जा. पण केव्हाही आततायीपणा करू नको आणि जीव धोक्यात घालू नको. समजलं?'
'जी!' महादेव म्हणाला.
राजे सर्वांच्यासह बोलत वाड्याकडं येत होते. त्या वेळी रस्ते साफ करीत असलेल्या माणसांच्याकडं त्यांचं लक्ष गेलं. राजे थांबले. ते चाललेली साफसफाई पाहत होते.
बाजींनी विचारलं,
'राजे, का थांबलात?'
'बाजी, गड नेहमी स्वच्छ ठेवावा, हे खरं! पण हा गोळा केलेला केरकचरा कुठं टाकतात?'
'गडाखाली टाकीत असावेत.' त्र्यंबक भास्कर म्हणाले.
'असावेत!' राजांच्या मुखावरचं हास्य विरलं, 'त्र्यंबकजी! तुम्ही किल्लेदार. तुमच्याकडून हे उत्तर अपेक्षिलं नव्हतं. हा कचरा गडाखाली टाकला जात असेल, तर ते ताबडतोब बंद करा. ठिकठिकाणी तो गोळा करून जाळायला सांगा. त्याची जमलेली राख गडावरच्या घरट्यांच्या परड्यांत पडू दे. त्यावर पावसाळी भाजीपाला तयार होईल. ही आमची आज्ञा समजा.'
बाजी राजांच्या मागून चालत होते. पण विचारचक्र जोरानं फिरत होतं.
काय राजा आहे हा!
दाराशी येवढा प्रबळ शत्रू असता, हा गडावरच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, याचा विचार करतो!
भाजीपाला करायला सांगतो.
याला हे सुचतं कुठून?
राजे वाड्यात गेले, तरी बाजी सदरेवर त्याच विचारात उभे होते.
रात्री राजांची पंगत बसली होती. बाजी, त्र्यंबकजी, फुलाजी, महादेव वगैरे मंडळी पंगतीत सामील झाली होती.
आंबरसपुरीचा बेत केला होता.
मसालेभात होता.
पंगत उठली.
राजे सदरेवर आले.
बाजी राजांना म्हणाले,
'आजच्या पंगतीचा बेत छान जमला.'
'ते ठीक आहे.' राजे म्हणाले, 'पण यापुढं असल्या पंगती बंद करा. सिद्दीचा वेढा किती दिवस चालेल, याचा अंदाज नाही. यापुढं वेढा उठेपर्यंत आमचे मावळे जे खातात, तेच अन्न आम्ही घेऊ. नाचणी, नागलीच्या भाकरीवर जगायची सवय आम्हांला आहे. असल्या मेजवानीपेक्षा ते अन्न आम्हांला अधिक प्रिय वाटेल.'
*🚩क्रमशः🚩*

⚔🌄पावनखिंड🌄⚔ ▪भाग : ३५▪

⚔🌄पावनखिंड🌄⚔ ▪भाग : ३५▪


दोन प्रहरीच्या वेळी राजे सज्जाकोठीवरच्या तीन कमानी सदरेत बसले होते. बाजी, फुलाजी, त्र्यंबकजी ही मंडळी हजर होती. सिद्दी जौहरचा अंदाज आणि मोहरा काय असेल, यावर खलबत चाललं असताना ढगांचा आवाज कानांवर आला. उकाडा जाणवत होता. राजे बैठकीवरून उठले आणि तीन कमानीपाशी जाऊन उभे राहिले. पाठोपाठ बाजी, फुलाजी, आणि त्र्यंबकजी यांनी राजांचं अनुकरण केलं. कमानीतून दिसणारा मुलूख राजे न्याहाळत होते.
पूर्व क्षितिजावर ढगांच्या गर्जना आकाशात चढत होत्या. वाऱ्याचा लवलेशही नव्हता. सारं वातावरण उन्हाच्या तावानं गुदमरलं होतं. सर्वत्र निःस्तब्ध शांतता पसरली होती.
राजांची नजर कमानीतून दिसणाऱ्या मुलखावर स्थिरावली होती.
उजव्या बाजूला पसरलेल्या पावनगडावरून काळ्याभोर ढगांची सावली फिरत जात होती. सामोरा ज्योतिबाचा डोंगर दिसत होता आणि त्यानंतर दृष्टीत भरत होतं, ते वारणा खोरं! गडाच्या पायथ्यापासून क्षितिजापर्यंत विस्तारलेल्या मुलखात झाडी-झुडपांत लपलेली आंबवडं, बोरपाडळे, नेवापूर ही गावं दिसत होती.
वाऱ्याचा कुठं लवलेशही नव्हता. ज्या क्षितिजावर ढगांच्या गौळणी उठल्या होत्या, त्या क्षितिजावर त्या गौळणींना वेढणाऱ्या काळ्या ढगांचा कडकडाट आकाशात उंचावत होता.
बाजींच्या बोलण्यानं राजे भानावर आले. बाजी म्हणाले,
'राजे! पाऊस येणार, असं वाटतं!'
'येणार तर खरंच! पण तो कसा येणार, हे आम्ही पाहत आहो.'
राजांची नजर परत कमानीबाहेर वळली.
पाखरांचे थवे आसरा शोधण्यासाठी गडाच्या झाडीकडं चालले होते. अचानक पूर्वेच्या ढगांच्या पडद्यावर वीज चमकली. नगाऱ्यावर टिपरी झडावी, तसा आवाज आसमंतात घुमला. आणि एक नाजूक, गार वाऱ्याची झुळूक अंगावरून गेली.
फुलाजी म्हणाले,
'राजे! पाऊस आला.'
राजांचे सेवक तीन कमानीवरचे पडदे सोडण्यासाठी धावत वर आले. राजांनी त्यांना थांबवलं. ते म्हणाले,
'आम्ही आज हा वळीव पाहणार आहोत.'
'पण, राजे, आपण भिजाल.' बाजी म्हणाले.
'भिजल्याखेरीज वळीव दिसेल कसा?' राजांनी सांगितलं. आणि क्षणार्धात राजांनी विचारलं, 'पाऊस येणार, असं दिसतं. आपल्या गडावरच्या तोफा...'
'चिंता नसावी! साऱ्या बुरूजांच्या तोफांची तोंडं चिलखाटीनं बांधली आहेत. तोफांची मोहरीही झाकली आहेत.' बाजींनी सांगितलं.
गार वाऱ्याचा झोत वाढला होता. सारं आकाश पाहता-पाहता कुंदावून गेलं होतं. एक वीज कडाडत धरित्रीवर उतरली. साऱ्यांचे डोळे दिपून गेले. आणि पूर्वेकडून पावसाचा पडदा पुढं सरकू लागला. लक्षदल पावलांचा आवाज यावा, तसा आवाज करीत पाऊस पुढं येत होता. विजा कडाडत होत्या. समोरचा मुलूख दृष्टीआड करीत पाऊस पुढं सरकत होता. हळू हळू सारी माळवदं त्या पावसाच्या पडद्याआड दिसेनाशी झाली. टपोऱ्या थेंबांच्या तिरकस सरी सज्जा कोठीच्या तीन कमानीतून प्रवेश करू लागल्या. राजे त्या पावसाच्या सरींत भिजत होते. पण त्यांना पावसांच भान नव्हतं. मंत्रमुग्ध होऊन ते पाहत होते.
बाजी धीर करून म्हणाले,
'राजे! आपण भिजाल....'
राजे हसले. म्हणाले,
'त्यासाठी तर आम्ही इथं उभे आहोत.'
तीन कमानीतून पावसाच्या सरी येत होत्या. सेवकांनी सदरेची बिछायत केव्हाच हलवली होती.
पाऊस कोसळत होता. त्या पावसात राजेच नव्हे, तर सारेच भिजत होते. गार वारे वाहत होते.
हळू हळू पाऊस कमी झाला. पाऊस थांबला, तेव्हा पश्चिमेकडून उमटलेल्या पिवळ्या किरणांत सारी धरित्री नहात होती. पूर्वेला काळ्या ढगांवर भलंमोठं इंद्रधनुष्य उमटलं होतं.
नखशिखांत भिजलेल्या राजांनी आपल्या मानेवर रुळणाऱ्या केसांवरून हात फिरवला आणि ते बाजींना म्हणाले,
'केवढं विशाल रूप हे! बाजी, संकटं येतात ना, ती या वळीव पावसासारखीच असतात. काळे भिन्न ढग उठतात. वारा सुद्धा त्यांच्या भीतीनं दबून जातो. विजा लखलखू लागतात. कडाडतात. सारा आसमंत आपल्या आवाजानं भारून टाकतात. टपोऱ्या जलधारांच्या माऱ्याखाली सारी धरित्री भिजून जाते... आणि पाऊस थांबतो, तेव्हा तृप्त झालेला सुगंध सर्वत्र दरवळतो. पिवळ्या किरणांत हळदीच्या नवरीसारखी धरित्री नटून जाते. आकाशाकडं पाहावं, तर सप्तरंगांची, इंद्रधनुष्याची कमान भाग्योदयाची वाट दाखवीत असते. नाही, बाजी! संकट हे वरदान आहे. ती परीक्षा असते. जी माणसं त्या संकटांना सामोरी जातात. त्यांचं यश सदैव वाढत जातं.'
राजे बोलत होते. पण बाजींचं लक्ष भिजलेल्या राजांच्याकडं लागलं होतं. ते म्हणाले,
'राजे! भिजल्या अंगानं फार काळ उभे राहू नका.'
'काय म्हणालात?' राजांनी विचारलं.
बाजी राजांच्या दृष्टीला नजर खिळवत म्हणाले,
'राजे! भिजल्या अंगानं फार काळ राहू नका. वाड्याकडं चलावं.'
राजांची दृष्टी पूर्वेच्या दृश्याकडं लागली होती. त्या क्षितिजावर भलं मोठं सप्तरंगी इंद्रधनुष्य उभं ठाकलं होतं. त्याकडं बोट दाखवीत राजे म्हणाले,
'पाहा, बाजी! केवढं सुरेख दृश्य! क्षितिजाला निर्माण होऊन आकाशाला भिडलेलं हे सप्तरंगी शिवधनुष्य!'
'क्षमा असावी, राजे! इंद्रधनुष्य प्रकटत असता, ते पूर्ण होत असता राजांनी पाहावं. पण ते आकाशाचं वैभव फिकं होत असता पाहू नये. आपण वाड्याकडं चलावं!'
राजे हसले आणि बाजींना म्हणाले,
'जशी आज्ञा!'
राजांच्या बोलण्यानं साऱ्यांच्या मुखांवर स्मित उमटलं. राजे सर्वांसह सज्जा कोठीतून वाड्याकडं चालू लागले.
ओलीचींब झालेली मंडळी राजांच्या मागून चालली होती.
वळवाच्या पावसानं जांभळाच्या, आंब्याच्या झाडांखाली जांभळं, आंब्यांचा सडा पडला होता. भिजलेली माकडं आपलं अंग झाडत जांभळांची चव घेत झाडांवरून चीत्कारत फिरत होती.
🚩क्रमशः🚩

⚔🌄पावनखिंड🌄⚔ ▪भाग : ३४▪


🌄पावनखिंड🌄
भाग : ३४
गडाची वर्दळ दिवसेंदिवस वाढू लागली. बाजींनी बांदल-मावळे गडावर आणले. गंजीखान्यात गवत रचलं जात होतं. अंबरखान्यासाठी खरेदी करून आणलेली धान्याची पोती नीट लावली जात होती. गडकोटाचे पहारे वाढवले होते. दररोज गडावर बातम्या थडकत होत्या. राजे, फुलाजी, त्र्यंबकजी, गंगाधरपंत गड फिरत होते. गडाच्या मोकळ्या जागेतून अनेक छपऱ्या, घरटी उभारली जात होती.
राजांनी विचारलं,
'ही घरटी कशासाठी?'
'गडाची शिबंदी वाढते आहे. एवढया शिबंदीला निवारा हवा.'
'छान केलंत! पण बाजी, गडाची शिबंदी केवढी ठेवायची, याचा पक्का विचार केला पाहिजे. गड वेढ्यात पडेल. पण वेढा किती दिवस, वर्षे, महिने चालेल, हे कोण सांगणार? त्या शिबंदीची उपासमार होऊ लागली, तर...'
'त्याचा विचार केला आहे.' बाजींनी सांगितलं, 'गडाची शिबंदी तीन हजार राहील. आणि गडाचे गंगा-जमना हे अंबरखाने धान्यानं भरून घेतले आहेत. अजूनही गडावर धान्य येतं आहे.'
'जुलूम-जबरदस्ती करून धान्य गोळा करू नका.'
'नाही, राजे तसं घडत नाही. उद्या तो सिद्दी जौहर आला, तर साऱ्या गावांना झळ पोहोचणार आहे, हे सर्वांना माहीत आहे. बाजारभावापेक्षाही दुप्पट किंमत देऊन आम्ही धान्य खरीदतो आहोत.'
'कारण?'
'त्या बिचाऱ्यांना या संकटकाळी घरदार सोडून जावं वाटलं, तर त्यांना जाता यावं.'
राजांना समाधान वाटलं, ते म्हणाले,
'बाजी, एवढं साऱ्यांना कळलं, तर किती बरं होईल; पण एवढी संपत्ती...'
'त्यालाही कमतरता नाही. रुस्तुमेजमा आणि फाजलखान यांच्या लढाईत गवसलेला खजिना आपणच गडावर पाठविला आहे.'
राजे हसले, मनमोकळेपणानं हसले,
'छान! म्हणजे, आम्हीच तुम्हांला उधळण करायला शिकवली, असंच ना!'
दररोज मध्यरात्रीपर्यंत सदर-इ-महलमध्ये बैठक भरत होती. मोहिमेचे आराखडे आखले जात होते. बहिर्जी नाईक आणि आबाजी प्रभू यांना मुलखात पेरलेल्या गुप्त हेरांकडून सर्व बातम्या येत होत्या. सिद्दी जौहर मिरज ओलांडून कोल्हापूरच्या वाटेला लागला होता. राजे किंचित चिंतातुर होते.
'राजे, आता वेढा पडायला फारसा अवधी लागणार नाही.'
'आबाजी, सिद्दी जौहरची छावणी काय म्हणते?'
'महाराज!' आबाजी म्हणाले, 'सिद्दी जौहरची फौज समुद्रासारखी पसरली आहे. तो येताना दरबारातून त्याला सलाबतजंग हा मान दिला आहे. चाळीस हजार फौज आणि जवळ जवळ वीस हजार घोडदळ त्याच्या संगती आहे.'
'बोला!' राजे म्हणाले.
'सिद्दी जौहरच्या संगती फाजलखान, रुस्तुमेजमा, सादतखान, बाजी घोरपडे, सिद्दी मसूद वगैरे सरदार आहेत. तोफा, बाड-बिछायत, गंजीखाना यांसह तो येत आहे. आणि....'
'आणि काय?'
'शिवाय श्रृंगारपूरचे राजे सूर्यराव सुर्वे, पालवणीचे जसवंतराव, सावंतवाडीचे भोसले सावंत त्यांच्या मदतीला आले आहेत.'
'आम्ही ते गृहीतच धरलं होतं. या वक्ताला नेताजी, दारोजी जवळ असायला हवे होते. नेताजी आपल्या फौजेनिशी कर्नाटकात आहेत आणि दारोजी राजापुरास आहेत.'
'एका दृष्टीनं झालं, ते बरं झालं.' बाजी म्हणाले.
'मतलब?'
'आम्ही वेढ्यात अडकलो, तर बाहेरची फौज धावून येईल. वेढा मोडायला वेळ लागणार नाही.' बाजींनी सांगितलं.
'आबाजी! तुम्ही आणि बहिर्जी कोल्हापूर गाठा. आपल्या नजरबाजांच्या बातम्या जोवर पाठवता येतील, तोवर पाठवा.'
राजांनी सर्वांना निरोप दिला. सारे गेले.
एकटे राजे सज्जावर उभे होते. ज्या कमानीतून सारा मुलूख दिसायचा, त्या कमानीतून फक्त अंधार दिसत होता. दाट धुकं उतरत होतं. काही क्षण तो काळोख निरखून राजे सदरमहाल उतरले.
मशालीच्या उजेडात राजे राजवाड्याकडे जात होते.
दिवस उलटले. उन्हाळा आला. हिरवागार दिसणारा मुलूख उन्हाच्या तावानं करपू लागला. डोंगर-कडांवर पिवळी झाक उमटू लागली. गडावरची हवा जरी थंड असली, तरी सारा मुलूख वाढत्या उन्हात गदगदत होता.
भर दुपारच्या वेळी राजे गडाचा पाहणा करून फिरत दौलती बुरूजावर आले होते. संगती त्र्यंबक भास्कर, बाजी होते. दौलती बुरूजावरून दिसणारा डोंगरदऱ्यांनी रेखलेला तो अफाट मुलूख डोळ्यांत मावत नव्हता.
'बाजी! या बुरूजाचं नाव सार्थ ठेवलं आहे. दख्खन दौलतीवर नजर ठेवणारा हा दौलती बुरूज!' राजांचा हात तोफेवर विसावला होता. नजर उत्तरेवर खिळली होती. तिकडं बोट दाखवत राजांनी विचारलं,
'बाजी! या पर्वतरांगांच्या शेवटी दूरवर खेळणा ना?'
'जी! तोही गड मजबूत आहे. निसर्गानंच त्याला वरदान दिलं आहे.' थोडी उसंत घेऊन बाजी म्हणाले, 'राजे, ऊन वाढतं आहे.'
'हो! जाऊ या. या गडाला आशीर्वाद लाभला आहे. उन्हाळ्याची जाणीवही या गडावर होत नाही. येव्हाना दोन-तीन वळीव यायला हवे होते.'
राजे दौलती बुरूज उतरले आणि वाड्याच्या दिशेनं चालू लागले.
🚩क्रमशः🚩