कोणतही शिवकाव्य येथे शोधा

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८९


भोर संस्थान : शंकरराव रघुनाथ (१७९१-१७९८)
याच्या कारकीर्दीत म्हणण्यासारख्या गोष्टी घडल्या नाहींत. याला पुत्रसंतान नव्हतें. हा १७९८ सालीं वारला. तेव्हां त्याचा दत्तक पुत्र चिमणाजीपंत हा गादीवर आला शंकररावाच्या अंगीं विशेष कर्तबगारी नव्हती; तो जरा भोळसट होता. त्याच्यावर देखरेख ठेवण्याकरितां नाना फडणविसांनीं बाजीराव मोरेश्वर याची योजना केली होती. हा मनुष्य हलकट व क्रूर होता. यानें शंकररावास जवळ जवळ बंदीवासांत ठेविलें होतें. त्याच्या हातून शंकररावाची सुटका महादजी शिंदे यानें केली. बाजीरावानें एकदां शंकरराव कुटुंबासह जेजूरीस असतां त्याचा घात करण्याकरितां मारेकरी पाठविले होते. शंकरराव सखारामबापू बोकीलचा जांवई होय. रामशास्त्री न्यायाधीशाची मुलगी शंकररावाची दुसरी बायको होती.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८८


भोर संस्थान :चिमणाजी नारायण (१७३७-१६५७)
नारोपंतास पुत्र नव्हात. त्यानें दत्तक पुत्र घेऊन त्याचें नांव चिमणाजी ठेविलें. आजपर्यंत सचिवांचें राहण्याचें ठिकाण नेरें होतें. तेथील वाडा जळाल्यानें चिमणाजीनें इ. स. १७४० त भोर हें राजधानीचें ठिकाण केलें. पेशव्यांनीं याला तुंगतिकोना देऊन त्याऐवजीं सिंहगड किल्ला घेतला. चिमणाजी पेशव्यांच्या विरूद्ध वागत असे.
सदाशिव चिमणाजी (१७५८-१७८७)
हा चिमणाजीचा औरसपुत्र. यानें संस्थानचा ३० वर्षें उपभोग घेऊन तो १७८७ सालीं निवर्तला. हा निपुत्रिकच होता.
रघुनाथराव चिमणाजी (१७८७-१७९१)
सदाशिवपंत निपुत्रिक वारल्यामुळें त्याचा सख्खा धाकटा भाऊ रघुनाथ चिमणाजी सचीवपदाचा वारस झाला. याचा शंकरराव उर्फ बाबासाहेब नांवाचा पुत्र पुढें गादीवर बसला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८७




भोर संस्थान : नारो शंकर (१७०७-१७३७)

शंकराजीपंत समाधिस्थ झाल्यानंतर शाहूनें त्याचा अज्ञान पुत्र नारोपंत यास सचीवपदाचीं वस्त्रें देऊन हे संस्थान आपल्या बाजूचें करून घेतलें. नारोपंत अल्पवयी असल्यामुळें त्याची मातोश्री येसूबाई व त्याचा मुतालिक हीं दोघें राज्याकारभार चालवूं लागलीं. येसूबाई चांगली कर्ती असून तिचें आपल्या अंमलदारावर वजन होतें. न्यायाच्या कामीं ती कोणाचीहि भीडभाड धरीत नसे. नारोपंताच्या कारकीर्दीत महत्त्वाच्या राजकीय गोष्टी घडल्या नाहींत. दमाजी थोरातावर शाहूनें याला पाठविलें असतां दमाजीनें याचा पराभव करून याला बंदींत ठेवलें. त्याला पुढें बाळाजी विश्वनाथानें सोडविलें, त्याबद्दल येसूबाईनें बाळाजीस पुणें परगणा व पुरंधर किल्ला दिला. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशीं असलेल्या बेलसर गांवच्या एका रामोपासक कुळकर्ण्यानें श्रीरामाच्या मूर्ती त्यास चैत्र शु. ८ च्या दिवशीं आणून दिल्या व तेव्हांपासून भोरास रामनवमीचा उत्सव सुरू झाला. नारोपंताच्या वेळीं शाहूनें साहोत्राबाब सचिवास वंशपरंपरा वतनी करून दिली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८६




भोर संस्थान : शंकराजी नारायण गांडेकर

इतिहास
संस्थानचे मूळ संपादक शंकराजी नारायण गांडेकर हे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण असून त्यांचें मूळचें गांव गांडापूर (निजाम इलाखा) हें होतें. शंकराजी याचा आजा मुकुंदपंत हा गांडापूर सोडून रोजगाराकरितां पुण्याच्या नैर्ॠत्येस आठ कोसांवर मांगदरी गांवीं येऊन राहिला. हें गांव हल्लीं राजगड तालुक्यांत आहे. त्याचा पुत्र नारोपंत. हा थोरल्या शिवरायांच्या सैन्यांत कारकून होता. शंकराजी हा प्रथम पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ नोकरीस राहिला. त्याचवर पेशव्यांची चांगलीं मर्जी बसली. संभाजी राजाच्या वेळीं रामचंद्र निळकंठ अमात्य याच्या हाताखालीं शंकराजी हा कारकुनीचें काम करीत होता. त्यावेळीं शंकराजीची कामांतील हुषारी व शौर्य आत्याच्या दृष्टोत्पत्तीस आलें. डोंगरांतील चोरवाटा पाहून ठेवण्याचा, व मावळे लोकांत मिसळण्याचा शंकराजीस नाद असे. यामुळें अमात्यानें शंकराजीस (१६८६ त) फौजी कामांत घेतलें. राजाराम जिंजीस गेला, तेव्हां महाराष्ट्रांत एकटा रामचंद्रपंत अमात्य होता. स्वराज्यरक्षणची सर्व जबाबदारी रामचंद्रपंतावर हाती. अमात्याच्या जवळ शंकराजी व परशुराम त्र्यंबक हे दोन साहसी पुरूष होते. शंकराजीनें राजगड किल्ला मोंगलापासून सोडविला व अनेक विश्वासाचीं कामें उत्तम रीतीनें पार पाडलीं. त्यामुळें राजारामानें शंकराजीस मदारूनमहाम (विश्वासनिधि = कारभारी) हा किताब दिला. पुढें (१६९८) राजाराम परत आल्यावर शंकराजीनें स्वराज्यरक्षणार्थ बजाविलेली कामगिरी लक्षांत घेऊन राजारामानें त्याला रिकामें असलेलें सचीवपद दिलें. ताराबाईच्या कारकीर्दींत मोंगली व मराठी फौज याचें महाराष्ट्रांत सारखें रण माजलें होतें. त्यावेळीं शंकराजीनें पुष्कळ शौर्याचीं कामें केलीं. त्यानें मावळांत कांहीं वतनें जोरावारीनें मिळविलीं व आपलें संस्थान वाढविलें. पुढें शाहु दक्षिणेंत येण्यास निघाला तेव्हां ताराबाईनें सर्व प्रधानमंडळीस व सरदारास बोलावून कळविलें कीं, हा शाहु खरा नसून तोतया आहे, तरी सर्वांनीं त्यास न मिळण्याबद्दल शपथ घ्यावी. तेव्हां सर्वांबरोबर शंकराजीनें शपथ घेतली. पुढें ताराबाईचा पराभव करून शाहू साता-यास आला व त्यानें सर्व सरदारांनां भेटीस बोलाविलें तेव्हां अडचण आली; तींतून निसटण्यास शंकराजीनें भोरानजीक अंबवडें येथें जाऊन चतुर्थाश्रम घेतला; थोड्याच दिवसांत विष खाऊन तो वारला (१७०७ नोव्हेंबर).

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८५








भोर संस्थान-

मुंबई, पुणें जिल्हा. हें संस्थान उ. अ. १८० ते १८० ४५' व पूर्व रेखांश ७३० १४' ते ७३० १५' यांत होते. संस्थानच्या राजधानीचें भोर हें शहर पुण्याच्या दक्षिणेस सुमारें ३० मैलांवर नीरा नदीच्या तीरीं वसलेलें असून सभोंवार सह्याद्रीचे फांटे आहेत ह्या गांवावरून महाड-पंढरपूर रस्ता वरंच्या घाटानें गेलेला आहे. भोर येथें नीरेस घाट आहे. राजवाडा, भोरेश्वर देवालय, रामबाग बंगला, हायस्कूल या पहाण्यासारख्या इमारती आहेत. राजवाडा भव्य व जुन्या पद्धतीनें बांधलेला आहे. हें शहर लहान पण टुमदार असून येथील हवापाणी चांगलें आहे. पुण्याचा कलेक्टर हा भोर संस्थानचा पोलिटिकल एजंट आहे. या संस्थानचा प्रदेश पुणे, सातारा व कुलाबा या तीन जिल्ह्यांत विभागलेला आहे. संस्थानचे एकंदर पांच तालुके आहेत; पैकीं विचित्रगड सातारा जिल्ह्यांत; राजगड, प्रचंडगड, व पौनमावळ हे पुणें जिल्ह्यांत; आणि पांचवा सुधागड हा कुलाबा जिल्ह्यांत आहे. सुधागडशिवाय चारी तालुक्यांचा प्रदेश घाटमाथ्यावरीलमावळांत आहे संस्थानांत एकूण ५०२ गांवें आहेत. संस्थानचें क्षे. फ. ९२५ चौरस मैल असून लोकसंख्या (१९२१) १३०४१७ आहे. संस्थानचा ३/४ भाग डोंगराळ आहे. ३/४ जमीन तांबडी असून, पाण्याखालीं जमीन फार थोडी आहे. पाण्याचा पुरवठा बहुतेक विहिरींपासून होतो. घाटमाथ्यावरून निघालेल्या मोठ्या नद्या नीरा, मुठा, मुळा, वेळवंडी व गुंजवाणी ह्या आहेत. याशिवाय लहान नद्याहि आहेत. भोरापासून उत्तरेस सुमारें २ मैलांवर वेळवंडी नदीस भाटघर येथें धरणाचें मोठें काम केलेलें आहे. हें प्रथम ९० फूट उंच होतें, तें हल्लीं (१९२६) १५० फूट उंच करण्यांत येत आहे. या धरणाचें पाणी नीरा उत्तर व नीरा दक्षिण या नांवाच्या मोठाल्या कालव्यांतून फार दूरवर दुष्काळी जिल्ह्यांत नेलें आहे. या कामासाठीं संस्थाननें आपली पुष्कळशीं गांवें बुडूं दिलीं आहेत. घांटमाथ्यावर कोठें थंड, कोठें समशीतोष्ण हवा आहे व सुधागड तालुक्यांत उष्ण हवा आहे. घाटमाथ्यावर पाऊस सुमारें १० पासून १०० इंचांपर्यंत पडतो व सुधागडकडे १५० पर्यंत पडतो. घांटावर मुख्य धान्यें भात, नागली, वरी, जोंधळा व बाजरी हीं आहेत. सुधागड तालुक्यांत मुख्य पीक भाताचें आहे. जंगलांत साग, हिरडा, जांभूळ, आंबा, फणस ही मुख्य झाडें आहेत. घाटमाथ्यावर सर्वत्र रानडुकरें व थोडे वाघहि आहेत मुख्य लोकवस्ती हिंदूंची आहे. निर्गत माल भात, हिरडा व साग व आयात माल भाताशिवाय सर्व धान्यें व इतर सर्व त-हेचा माल संस्थानचें वार्षिक उत्पन्न सुमारें पांच लाखांचें आहे.
किल्ले
संस्थानांत विचित्रगड तालुक्यांत रोहिडा, राजगडांत राजगड, प्रचंडगडांत प्रचंडगड (तोरणा), पौनमावळांत तुंग व तिकोना आणि सुधागडांत भोरप व सरसगड असे एकंदर ७ किल्ले आहेत. बहुतेक किल्ले इतिहासप्रसिद्धच आहेत. राजगडाची बांधणी प्रेक्षणीय आहे. प्रचंडगड हा सर्व किल्ल्यांत उंच आहे. भोरापासून दक्षिणेस सुमारें ८ मैलांवर भोर व वाई यांच्या दरम्यान अंबाडखिंड उर्फ विश्रामघाट येथें संस्थानची धर्मशाळा, वाडा व अन्नसत्र आहे. येथील हवा पांचगणीसारखी थंड आहे. भोरच्या आग्नेय दिशेस अंबवडे येथें शंकराजी नारायण (पंतसचीव घराण्याचा मूळपुरूष) यांची समाधि आहे. राजगड तालुक्यांत बनेश्वर, विचित्रगडांत रायरेश्वर व सुधागडांत उन्हाळें हीं स्थळें पहाण्यासारखीं आहेत.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८४



भोर संस्थान

भोर संस्थान महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक संस्थान होते. भोर संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या संस्थानांपैकी एक संस्थान होते.

पंतसचिव

भोर संस्थानचे संस्थापक शंकराजी नारायण हे छत्रपती राजाराम महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील सचिव होते.[१] पंतसचिव ह्या नावाने त्यांनी आणि त्यांच्या वारसदारांनी भोर संस्थानाचा कारभार पाहिला.

भोरच्या पंतसचिव घराण्याच्या राज्यकर्त्यांची नावे अशी

पंतसचिव शंकराजी नारायण (कार्यकाल १६९७ - १७०७)
पंतसचिव नारो शंकर (कार्यकाल १७०७ - १७५७) - शंकरजी नारायण ह्यांचे चिरंजीव
पंतसचिव चिमणाजी] (कार्यकाल १७३७ - १७५७) - नारो शंकर ह्यांचा पुतण्या
पंतसचिव सदाशिवराव (कार्यकाल १७५७ - १७८७) - चिमणाजी ह्यांचे जेष्ठ पुत्र
पंतसचिव रघुनाथराव (कार्यकाल १७८७ - १७९१) - चिमणाजी ह्यांचे कनिष्ठ पुत्र
पंतसचिव शंकरराव (कार्यकाल १७९१ - १७९८) - रघुनाथराव ह्यांचे चिरंजीव
पंतसचिव चिमणाजी दुसरे (१७९८ - १८२७) - शंकरराव ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव रघुनाथ चिमणाजी (१८२७ - १८३७)- चिमणाजी दुसरे ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव चिमणाजी रघुनाथ (१८३९ - १८७१) - रघुनाथराव चिमणाजी ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव शंकर चिमणाजी (१८७१ - १९२२) - चिमणाजी रघुनाथ ह्यांची चिरंजीव
पंतसचिव रघुनाथ शंकर भाऊसाहेब पंडित (१९२२ - १९५१) - शेवटचे पंतसचिव

८ मार्च १९४८ रोजी हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८३




परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी

परशुराम त्रिंबक किन्हईकर (इ.स. १६६० - इ.स. १७१८) हे छत्रपतींचे पंतप्रतिनीधी आणि नंतरच्या औंध संस्थानाचे संस्थापक होते.
कारकीर्द

परशुरामपंत वयाच्या १४ व्या वर्षी रामचंद्रपंत अमात्यांच्या कार्यालयात विशाळगडास रुजू झाले. दप्तरीच्या आणि लष्करच्या कारभारात चोख असणाऱ्या पंतांची प्रगती झपाट्याने झाली आणि अल्पावधीतच त्यांची अमात्यांचे साहाय्यक म्हणून नेमणूक झाली.

छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराज्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मराठा साम्राज्य संपुष्टात आणण्याचा चंगच बांधला होता. अशा काळात औरंजजेबाच्या ताब्यातला पन्हाळगड पंतांनी १६९२ साली मोठ्या हिकमतीने परत जिंकून घेतला. यानंतर अमात्यांच्या मोलाच्या मार्गदर्शानाखाली पंतांनी मिरजेपासून प्रचितगडापर्यंतचा मुलूख पादाक्रांत केला. त्याबरोबरच भूदरगड आणि चंदनगडासारखे किल्लेदेखील पुन्हा स्वराज्यात आणले.

पुढे औरंगजेबाने १६९९च्या शेवटास सातारच्या किल्ल्याला वेढा घातला असता पुढचे ५ महिने पंतानी ह्या किल्यावरच्या मराठ्यांना रसद पुरवली आणि किल्ला झुंजवण्यास मोलाची मदत केली. १७०० साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने - राणी ताराबाईंनी - मुघलांविरुद्धचा लढा सुरु ठेवला तेव्हा पंतांचा त्यांना मोठाच आधार होता. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना सुभालष्कर, समशेर जंग असे किताब बहाल करण्यात आले.

सातारच्या किल्ल्याप्रमाणेच १७०२ साली पंतांनी विशाळगडदेखील तब्बल ५ महिने झुंजवला पण सरतेशेवटी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला. पण ताबा पुढच्या ५ वर्षातच म्हणजे १७०७ साली मुघलांशी निकराची झुंज देऊन परत काबीज केला. त्याचबरोबर सातारा, वसंतगड, पन्हाळगड हे किल्ले परत स्वराज्यात आणले.

१८ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात परशुरामपंत सातारच्या शाहू महाराजांच्या सेवी रुजू झाले. तिथपासून कराड आणि आजूबाजूचा मुलुख हा पंतप्रतिनिधींच्याच ताब्यात होता आणि त्यांचा कारभार कराडच्या भुईकोटातून चाले.

१८१८ साली परशुरामपंतांचे निधन झाले.
पंत प्रतिनिधी

पंत प्रतिनिधी हे पद राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत निर्मीले गेले. छत्रपती राजाराम महाराजांनी १६९१ साली जिंजीला असताना प्रल्हाद निरोजी ह्यांना आपले प्रतिनिधी म्हणून नेमले. हेच पहिले प्रतिनिधी. त्यांचा कर्नाटकात मृत्यू झाल्यानंतर १६९४ साली तिमाजी रघुनाथ हणमंते ह्यांची ह्या पदी नेमणूक झाली. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर १७०१ साली राणी ताराबाईंनी परशुरामपंत त्रिंबक ह्यांची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली आणि त्यानंतर पंताच्या पुढच्या वंशावळीस पंतप्रतिनिधी असे संबोधले जाऊ लागले.
संदर्भ

पंत प्रतिनिधी बखर
लोकप्रभा ५ नोव्हेंबर २००४ मधील लेख

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८२


गजेंद्रगड आणि बहिरजी हिंदुराव

गजेंद्रगड- मुंबई, धारवाड जिल्हा. हें बदामीच्या पश्चिमेस २८ मैलावंर एक खेडे आहे. हें पूर्वी मुधोळच्या घोरपड्यांकडे होतें. येथें शिवरायांनी बांधलेला एक किल्ला आहे. येथील उंचगिरी नांवाचा दुसरा किल्ला १६८८ त दौलतराव घोरपडयांनी बांधला. गांवापासून ३ मैलांवर एका खोऱ्यांत यात्रा भरत असते. या खोऱ्यांत शंकराची मूर्ति आहे. लोकसंख्या (१९११) ८३०९.

येथील घोरपडयांनां हिंदुराव ही पदवी आहे. बहिरजी घोरपड्यानें शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत गजेंद्रगड व गुत्ती मिळविली. संताजी हा प्रख्यात सेनापति या बहिरजीचा भाऊ होय. संताजीला पुढें कापशी गांव इनाम मिळाल्यानें त्याचे वंशास कापशीकर नांव पडलें व बहिरजी हा गजेंद्रगडास राहिल्यानें त्याच्या वंशास गजेंद्रगडकर म्हणूं लागले. याचा वडील मुलगा हा बावीस वर्षांचा असतांनाच मुसुलमानांबरोबरच्या एका लढाईंत ठार झाला. त्याचा धाकटा भाऊ शिदोजी याला हिंदुराव ममलकतमदार जफ्तनमुल्क फत्तेजंग समशेर बहादूर सेनापति अशी पदवी होती. कोल्हापुरची देवी मुसुलमानांच्या भयामुळें मध्यंतरीं दुसरीकडे ठेविली होती, ती पुन्हां कोल्हापुरच्या राज्याची स्थिरस्थावर होतांच या शिदोजीनें स्थापिली. त्याबद्दल त्याला देवीच्या प्रधानकीचीं वस्त्रें व पांच गांवची सरदेशमुखी इनाम मिळाली. शिदोजी हा पेशव्यांनां अनुसरून वागे. याचे मुरारराव, दौलतराव व भुजंगराव असे तीन पुत्र होते. पैकी भुजंगराव हा २० व्या वर्षी लढाईंत मरण पावला. मुरारराव हा पराक्रमी होता. हा जवळ जवळ स्वतंत्र वागे; याच्या पदरीं कवायती पलटणें असल्यानें त्याचा दरारा निजाम, टिपू व इंग्रज यांस त्या प्रांतीं चांगलाच असे. हा पेशव्यांच्या तर्फेनें तिकडे बंदोबस्त ठेवी. त्यांनीं त्याला सेनापतिपद दिलें होतें. हा बहुधा गुत्तीस राही. वीस पंचवीस लाखांचा प्रांत त्यानें काबीज केला होता. अनेक कारकीर्दी त्यानें पाहिल्या होत्या. इंग्रजांसहि यानें अडचणींत मदत केली होती. मुराररावाकडे गुत्ती व दौलतरावाकडे गजेंद्रगड अशी वांटणी पेशव्यांनीं करून दिली. मुरारराव शेवटीं टिपूच्या हातीं लागले. त्यानें त्याला शेवटपर्यंत रुप्याची बेडी पायांत घालून कपालदुर्गास कैदेंत ठेविलें होते. टिपूनें गजेंद्रगडहि घेतला. पुढें हरिपंत तात्या टिपूवर चालून आले तेव्हा पेशव्यांच्या मदतीनें दौलतरावानें गजेंद्रगड हस्तगत केला. त्यावेळीं तीन लाखांचा सरंजाम किल्ल्याकडे चालत होता. परशुरामभाऊ पटवर्धन व दौलतराव यांची फार दोस्ती होती. दौलतरावहि शूर होता. निजामाशीं तह झाल्यावेळीं हरिपंततात्यांनीं दौलतरावाची पावणेतीन लक्षांची जहागीर निजामाकडे देऊन दौलतरावास पंचवीस हजारांची जहागीर खर्चास ठेविली. मध्यंतरी थोरल्या माधवरावांनी गलगलें, इंगल वगैरे ५०।६० हजारांची जहागीर यांना दिली होती. रावबाजीच्या वेळीं पुन्हा घोरपड्यांच्या जहागिरीपैकीं कांही गांवे जप्त झालीं. दौलतरावास बहिरजी म्हणून पुत्र होता. त्याचा पुत्र भुजंगराव. बहिराजी याच्या वेळी इंग्रजी झाली. त्यावेळीं गजेंद्रगड संस्थान तेरा हजारांचें होतें. [डफ; कैफियती; बिजापूर ग्याझे. राजवाडे. खं. ७, १०].

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८१




गु त्ती क र घो र प डे.-

या घराण्याचा मूळ पुरूष सेनापती संताजी घोरपडयाचा भाऊ बहिरजी हिंदुराव हा होय. संताजीच्या खुनानंतर बहिरजी कनारटाकांत आला व त्यानें मौंगलांची नौकरी पत्करून, गजेंद्रगड, गुत्ती वगैरे मुलुख मिळविला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र शिदोजी हा गादीवर बसला. शिदोजीच्या मागून त्याचा पुतण्या यशवंतराव हा गुत्तीचा मालक झाला. हा पुढें मोंगलांकडून निघून पेशव्यांनां मिळाला. हा हैदराच्या स्वा-यांत नेहमी पेशव्यांतर्फे हजर असे. शिदोजीचा मुलगा प्रख्यात मुरारराव ह्यानें त्या भागांत आपलें सामर्थ्य फार वाढवून पुष्कळच प्रांत मिळविला (मुरारराव घोरपडे) पहा. हाहि गुत्तीचा कारभार पाहत असे.पुढें टिपूनें एका लढाईंत मुरारराव व यशवंतराव यांस पकडून कैदेंत ठेविलें.तेव्हां यशवंत रावाचा मुलगा मालोजी हा गुत्तीचा मालक झाला. त्यानंतर दुसरया एका लढाईंत गुत्ती टिपूनें घेऊन आपल्या राज्यास जोडली.त्यामुळें पेशव्यांनीं मालोजीस गुत्ती ऐवजीं सोंडूर (हें टिपूकडून घेऊन) ठाणें दिलें व त्याबरोबरच कंकण वाडी, बेळवती वगैरे तालुके सरंजामादाखल दिले. यानंतर सोंडूर संस्थान स्थापन होऊन त्याचा पइिला पुरूष शिवरात्र घोरपडे हा बनला. पुढें गुत्तीकर घरण्यांतील दुसरा यशवंतराय हा नाना फडणिसांनां कैदेंतून सोडविण्याच्या वेळीं पुढें आला होता. पेशवाइअखेर हा रावबाजी विरूध्द्र इंग्रजांस मिळाला. आणि त्यांच्या तर्फें पेशव्यांर्शी लढला. या त्याच्या मदतीबद्दल ज.वेलस्लीनें त्यास सदतीस हजारांची जहागीर दिली. पुढें दौलराव शिद्यांच्या दरबारींहि हा इंग्रजांतफें काम करीत असे. हा सन १८२१ सालीं पुणें येथें मरण पावला; त्यास मालोजी हा एक पुत्र होता. याचा वंश हल्लीं सोंडूर प्रांतीं नांदत आहे . ( खरे-ऐ. ले. संग्रह; डफ; बाड- कैफियती).

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८०




इचलकरंजी, सं स्था न.नारायणराव बाबासाहेब आणि त्यांचा वंश

नारायणराव बाबासाहेब ज्या वेळी गादीवर बसले त्यावेळी इचलकंरजी संस्थानची स्थिती समाधानकारक नव्हती. करवीरकरांचे व इचलकंरजीकराचें वैमनस्य असल्यामुळे करवीरकर, इचलकरंजीकरांना नेहमी त्रास देत असत. पण पुढे १८२७ मध्ये ब्रिटिश सरकारच्या मध्यस्थीनें या दोन्ही संस्थानात तह घडून आला व इचलकरंजीकरांना पूर्वीचा सर्व मुलुख मिळाला, नारायणराव हें चांगले लढवय्ये होते. त्यानी खडर्याच्या लढाईत पेशवे सरकारला चांगली मदत केली होती. ते द्दढनिश्चयी व धोरणी होते. विपत्तीच्या स्थितीतहि त्यांनी आपल्या कर्तबगारीची पराकाष्टा करुन इचलकंरजी संस्थानाचे रक्षण केले, ही गोष्ट सर्वसमंत आहे. हे सन १८२७ साली वारले. त्यांना दोन मुलगे व पांच मुली अशी एकंदर सात अपत्यें होती.

नारायणरावांच्या मागून त्यांचे जेष्ठ पुत्र व्यंकटराव गादीवर बसले. त्यांना पुत्रसंतान नव्हते. हे इ.स.१८३८त निवर्तले. त्यांच्या मागून त्यांचे धाकटे बंधू केशबराव तात्या हे संस्थानचे मालक झाले. यांच्या अमदानीत, इचलकंरजी संस्थानचा दर्जा खरोखर काय आहे याचा निकाल लागला. इचलकरंजी संस्थान हे करवीरकर छत्रपतीच्या ताब्यांतले आहे असें इंग्रजसरकारने ठरविलें. अशा रीतीने करवीररांचे ताबेदार होऊन राहण्यापेक्षा संस्थानच्या उत्पन्नास रामराम ठोकून काशीस जाण्याचें तात्यासाहेबानी ठरविले. पण सरकारचे त्यावेळचे पोलिटिकल खात्याचे अधिकारी यांनी 'कोल्हापूरकर महारांजाची ताबेदारी नुसती नावांची आहे त्यामुळे महाराजांचा व तुमचा प्रत्यक्ष संबंध येत नाही व तुमचा दर्जाहि कमी होत नाही' असें सांगितल्यावरुन शेवटी तात्यासाहेब पुन्हां संस्थानचा कारभार पाहूं लागले. याचवेळी सरकारकडून असेंहि आश्वासन देण्यांत आले होते की 'इचलकरंजीकर यांस कारणपरत्वें दत्तकाविषयी तजवीज करणे झाल्यास, सरकार त्याचा विचार करील आणि हुकूम देणे तो कोल्हापूर प्रांताची तशीच दक्षिण महाराष्ट्रदेशाची अशा प्रकारची जी वहिवाट असेल तीस अनुसरुन सरकारास वाजवी वाटेल तेच करील केशवराव तात्या हे इ.स.१८५२ मध्यें वारले. त्यांना पुत्रसंतान नसल्यामुळे, तात्यासाहेबाच्या मातोश्री गंगाबाई व पत्नी यशोदाबाई यांनी दत्तक घेण्याबद्दलची परवानगी सरकारकडे मागितली व सरकारच्या परवानगीनें १८५३ साली यशोदाबाईनी, विसाजीपंत हुपरीकर यांचा मुलगा दत्तक घेतला व त्याचे नाव व्यंकटराव ठेवले. पण व्यंकटराव हे एकदोन वर्षातच वारले. आणि पुन्हा दुसरा दत्तक देण्याची पाळी आली. यावेळी सरकारने पुष्कळ अडचणी आणल्या. पण सरतेशेवटी दत्तक घेण्याची परवानगी देण्यात आली. नंतर विश्वनाथराव हुपरीकर (तासगांवकर) यांचा मुलगा दत्तक घेण्यात आला. पण १६।१७ महिनें या दत्तक मुलानें (गोंविदराव आबासाहेबानी) राज्यकारभार पाहिला नाही. तोच त्याचें आकस्मिक देहावसान झाले. पुढे थोडया दिवसानी आबासाहेबाची बायको पद्मावतीबाई यांनी हल्लीचे संस्थानाधिपती नारायणराव बाबासाहेब यांस दत्तक घेतले. याचें प्रवेशपरीक्षेपर्येतचे शिक्षण राजाराम हायस्कुलात होऊन नारायणराव हे १८८८ त प्रवेशपरीक्षा पसार झाले. पुढे त्यानी राजाराम कॉलेजमध्ये व विल्सन कॉलेजमध्ये, एलएल् बी पर्येतच्या अभ्यास केला. १८९२ साली याना संस्थानची अखत्यारी देण्यांत आली. याचा विवाह १८८६ साली झाला. हे विद्यासंपन्न व जिज्ञासू असल्यामुळे संस्थानात चांगल्या सुधारण घडवून आणण्याकडे यांचे नेहमी लक्ष असते. यांना सार्वजनिक कामाची फार हौस आहे. दक्षिणेतील इनामदार व सरदार याच्यातर्फेने हे १४।१५ वर्षे कायदेकौन्सिलमध्ये निवडून आले होते. यांना प्रवासाचा नाद असून त्यांनी जगाच्या निरनिराळया भागांत प्रवास केला आहे. हे स्वभावानें उत्साही असून यांची राहणी अगदी साधी आहे. महायुध्दामध्ये यांनी सरकारास शक्य तितकी मदत केली. यांना पुत्रसंतान नसल्यामुळे यांनी आपल्या पुतण्यास दत्तक घेतले आहे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७९




इचलकरंजी, सं स्था न.

व्यंकटराव ना रा य ण रा व उ र्फ दा दा सा हे ब

नारायणरावाच्या मागून त्यांचे ज्येष्ठ पुत्र व्यंकटराव यांनी संस्थानचा राज्यकारभार हांकण्याला सुरवात केली. हे शूर असल्याकारणानें, हरिपंत फडके यांच्या गुजराथवरील स्वारीत व इतर अनेक स्वाऱ्यांत त्यांनी प्रामुख्यानें भाग घेतला. पण हे परमुलूखांत स्वारीवर असतांना इचलकरंजी संथानला कोल्हापूरकरांकडून उपद्रव होऊं लागला. करवरिकरांनी इचलकरंजी संस्थानावर स्वारी केली पण शेवटी पेशवे व करवीरकर यांच्या दरम्यान पुरंदर येथे तह होऊन इचलकरंजीकरांचे सर्व गाव त्यांना परत मिळाले. व्यकंटराव हे फार दुव्यर्सनी होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत संस्थान अगदी कर्जबाजारी करुन टाकिले. हे १७९५ साली वारले. यांना पुत्रसंतान नसल्यामुळें त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची बायको रमाबाई हिनें, पेशव्यांच्या संमतीने नारायणराव बाबासाहेब यांस दत्तक घेतले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७८




इचलकरंजी, सं स्था न.

व्यंकटराव ना रा य ण रा व उ र्फ दा दा सा हे ब. -

इचलकरंजीकरांकडून धारवाड सुभा काढून तो दुस-या मामलेदाराकडे पेशव्यांनीं दिला होता. सुमारें सोळा वर्षेपर्यंत तो सुभा त्यांजकडे होता. त्यां अवधींत मामलतीसंबंधीं तफावत रहातां रहातां आजपर्यंत सरकारची बाकी बरीच तुंबली होती. सरकारचा तगादा उठविण्यासाठीं अनूबाईंस पुण्यास जावें लागलें. व्यंकटरावदादा त्याजबरोबर या खेपेसहि गेले होते. तेथें गेल्यावर हिशेब होऊन मुत्सदी व पेशवे यांजवळ अनुबाईंनीं बहुत रदबदली केल्यावरून शेवटीं यांजवळ अनुबाईंनीं बहुत रदबदली केल्यावरून शेवटीं ७३००० रूपयांवर तोड झाली. पेशव्यांची स्वारी कर्नाटकच्या मोहिमेस निघाली तेव्हां व्यंकटरावांसह अनूबाई पुण्याहून निघून जेऊरच्या मुक्कामीं लष्करांत जाऊन पोंचल्या. तेथें चार दिवस रहावयाचा त्यांचा बेत होता, परंतु इचलकरंजीस तात्यांस देवाज्त्रा झाल्याचें वर्तमान कळतांच त्या व व्यंकटराव तेथून ताबडतोब निघून इचलकरंजीस आल्या

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७७


इचलकरंजी, सं स्था न.
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

सरकारची कामगिरी करून दाखवून आपली बढती करून घ्यावी, इकडे तात्यांचें लक्ष नसल्यामुळें त्यांची सरदारी काढून घ्यावी असें श्रीमंतांच्या मनांत आलें; त्यामुळें (सन १७६६) अनुबाई व त्यांचे नातू व्यंकटराव दादा ही पुण्यास गेलीं. तात्यांची कशी तरी समजूत घालून त्यांनीं त्यांसहि बरोबर नेलें. अद्यापि अनुबाईंची भीड पुणें दरबारीं बरीच असल्यामुळें त्यानीं पेशव्यांकडून व्यंकटरावांच्या नावें सरदारी कंरून घेतली व पुन्हां पथकाची उभारणी केली. कडलास, पापरी व बेडग हे गांव इचलकरंजीकरांकडे पथकाच्या सरंजामांत चालत होते ते. या सालच्या डिसेंबरांत पेशव्यांनीं दूर करून तेच गांव त्यांच्या तैनातीस लावून दिलें. पेशवे सरकारांतून एकंदर ११४१० रूपयांची तैनात इचलकरंजीकरांस रोख मिळत होती. तिच्या ऐवजीं त्यांनीं या तीन गांवांचा वसूल तैनातीकडे घेत जावा असें ठरलें.

कोल्हापूरकर जिजाबाईंनीं इचलकरंजीकरांचें सरदेशमुखीचें वतन जप्त केलें होतें तें सोडण्याबद्दल व तिकडे इचलकरंजीकर यांची गांवें, खेडीं, शेतें, कुरणें, बाग, मळे वगैरे आहेत त्यांस उपसर्ग न देण्याविषयीं श्रीमंतांनीं जिजाबाईस पत्रें लिहिलीं. म्हापण गांवास वाडीकर सावंत यांजकडून उपद्रव होत होता तो बंद करण्यांविषयींहि पेशव्यांनीं सावंतांस एक ताकीद पत्र पाठविलें. आपल्या दौलतीचा याप्रमाणें बंदोबस्त करून घेऊन अनुबाई, तात्या व दादा; परत इचलकरंजीस आलीं. पुढें तात्या ख्यालीखुशालींत व दुव्यसनांत मग्न होऊन इचलकरंजींत आयुष्याचे दिवस घालवू लागले. त्यामुळें (१७६९) धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांकडून काढून पेशव्यांनीं नारो बाबाजी नगरकर यांस सांगितला.

सन १७७० व १७७१ सालीं हैदरअल्लीवर मोहीम सुरू होती. तींत इचलकरंजीकरांची पागा मात्र होती. यावेळीं तात्या बेहोष व व्यंकटराव दादा अल्पवयी असल्यामुळें इचलकरंजीचें पथक मोडल्यासारखेंच झालें होतें. याच सुमारास नारायणराव तात्या हे (१७७० च्या प्रारंभापासून) आजारी पडले होते. तें दुखणें वाढत जाऊन शेवटीं त्याच वर्षी (नोवेंबर १०) त्यांचें देहावसान झालें.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७६



इचलकरंजी, सं स्था न.
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

स.१७६२ त थोरले माधवरावांच्या बाजूस दादासाहेबां विरूध्द अनूबाई होत्या व त्यांचें पथक घेऊन विसाजी नारायण हा दादासाहेबांशीं झालेल्या लढायांत कामगिरीवर हजर होता. नंतर दादासाहेबांनीं मिरज घेतली तेव्हां सामान व पायदळ वगैरे कुमक इचलकरंजीहून पेशव्यांस होत होती. स. १७६३ त मोंगलानें पुणें जाळिलें व पेशव्यांनीं बेदर शहर जाळिलें व अवरंगाबाद व भागानगर या शहरांपासून खंडणी घेतली. त्यावेळीं नारायण तात्या पेशव्यांबरोबर होते. यावेळीं दोन तीन निरनिराळया प्रसंगीं श्रींमंतांनीं तात्यांस स्वतंत्र कामगिरीवर पाठविलें होतें व त्यानीं थोडीबहुत खंडणीहि वसूल करून आणिली होती.

इकडे मोंगल व मराठे यांचें युध्द सुरू असतां कर्नाटकांत हैदरअल्ली फार प्रबळ होऊन त्यानें धारवाडचा सुभा बहुतेक काबीज केला. धारवाडचा सुभा हातचा गेल्यामुळें इचलकरंजीकरांचें फार नुकसान झालें. यापूर्वी याच वर्षी मर्दनगड किल्ला व त्याखालचा मुलूख पोर्तुगीज लोकांनीं त्यांज पासून हिसकावून घेतला होता. ती नुकसानी झाली होतीच. याप्रमाणें हैदरीचें प्राबल्य फार वाढल्यामुळें पेशव्यांनीं १७६४ त त्याच्यावर स्वारी केली. त्यावेळीं इचलकरंजीचें पथक नरगुंदास होतें तें या लष्करास येऊन मिळालें होतें.

पुढें १७६४ त धारवाडचा सुभा मोकळा होतांच त्याची मामलत इचलकरंजीकरांस पेशव्यांनीं दिली; कारण त्यांच्या कडे ती पूर्वी बहुत वर्षे होती. व त्यांच्याहि पैसा त्या मामलतींत पुष्कळ गुंतला होता; यावेळीं तात्या इचलकरंजीहून निघून स्वा-या करीत भटकत होते.श्रीमंतांनीं त्यांस धारवाडास बोलावून नेलें व उपदेश केला. परंतु त्यापासून कांहीं निष्पन्न झालें नाहीं.

अनूबाई इचलकरंजीस दुखणेकरी पडून होत्या. ती संधि साधून तात्यांनी परत आल्यावर बराच दंगा केला. प्रथम ते आज-यांस आले. तेथें स्वार व पायदळ मिळून पांच सातशें नवे लोक त्यांनीं चाकरीस ठेविले आणि राणोजी घोरपडे सेनापति यास कांहीं उपद्रव केला. तात्यांचे आजे नारो महादेव यानीं दत्तक कांहीं घेतलेले नरसिंगराव यांचे पुत्र सदाशिव घोरपडे हे रघुनाथराव दादासाहेब यांजवळ होते. त्यांच्या द्वारें दादासाहेबांशीं तात्यांनीं संधान बांधिलें होते. मातोश्रीच्या निसबतीचे जितके लोक आहेत त्यांचें पारिपत्य करावें, सर्व दौलत आपल्या स्वाधीन करून घ्यावी, गोविंद हरि व त्रिंबक हरि पटवर्धन यांशीं कज्या करावा हे त्यांचें बेत होते. तात्यांनीं इचलकरंजीच्या ठाण्यांत प्यादे होते त्यांस वश करून घेतलें व किल्ल्या हिसकांवून घेतल्या. सर्व दौलतींत त्यांचा अंमल बसला. परंतु अनुबाईंची प्रकृती बरी झाली व पेशवेहि कर्नाटकांतून परत
आले. तेव्हां त्यांचे सर्व बेत विरघळून जाऊन त्यांस पुन्हां पूर्वीप्रमाणेंच प्रतिबंधांत रहाणें भाग पडलें

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७५




इचलकरंजी, सं स्था न.
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

सन १७५७ च्या प्रारंभीं नानासाहेब व भाऊसाहेब श्रीरंगपट्टणच्या स्वारीस आले. स्वारींत अनूबाई नव्हत्या. तात्या धारवाड प्रांतीं फौजेसह होते. त्यांस श्रीमंतांच्या स्वारींत हजर रहाण्याविषयीं अनूबाईनीं लिहून पाठविले. तेव्हां वर सांगितलेल्या वितुष्टाचा प्रकार प्रथम उघडकीस आला. तात्या श्रीमंतीबरोबर स्वारीस गेले नाहींत. अनूबाईंच्या हाती कांहीं सत्ता नसावी, सर्व कारभार आपल्या हातीं असावा, मन मानेल त्याप्रमाणें वागण्यास आपणास कोणाची आडकाठी नसावी ही त्यांची इच्छा आतां उघड रीतीनें दिसू लागली. स्वारी आटोपून श्रीमंत परत पुण्यास गेले तेव्हां अनूबाईचें ह्मणणें पडलें कीं, तात्यांनी आपणाबरोबर पुण्यास श्रीमंतांकडे जाऊन आपल्या सरदारीचे व दौलतीचे लढे उलगडून घ्यावे. परंतु तें त्यांच्या मर्जीस येईना. ते धारवाडाकडे परत आले. मग बाईंनीं धारवाडास जाऊन तात्यांची कांहींशी समजूत काढून त्यांस घेऊन त्या परत इचलकरंजीस आल्या.

तात्यांस तीन अपत्यें होतीं. धोरला मुलगा व धाकटया दोघा मुली. मुलाचें नांव व्यंकटरावदादा व मुलींची नांवें अनुक्रमें बयाबाई व सगुणाबाई अशीं होतीं. पुण्यास भिडे म्हणून सावकार होते त्यांची कन्या व्यंकटरावांस दिली होती. तिचें नांव रमाबाई.

सन १७५९ च्या अखेरीस मराठयांची व मोंगलांची लढाई सुरू झाली. भाऊसाहेब व दादासाहेब बरोबर फौज घेऊन बेदरच्या रोखें चालले व वेळ पडल्यास त्यांस कुमक करितां यावी म्हणून पेशवे खुद्द अहमदनगर तेथें तळ देऊन राहिले. व्यंकटरावाचें लग्न उरकून अनूबाई तेथेंच श्रीमंतांजवळ राहिल्या. पेशव्यांच्या ल्ष्करास मिळण्याकरितां नग राहून निघून तात्या उध्दीर येथें दाखल झाले. परंतु ते तेथें पोंचण्याच्या आधींच मोंगलांचा पूर्ण पराजय झाला होता. पुढें रास्ते व पटवर्धन यांजबरोबर पेशव्यांनी कर्नाटकाच्या स्वारीस त्यांसहि पाठविलें.

त्या वेळीं तात्यांनीं (१७६१ डिसेंबर) कोपळावर स्वारी केली. तिकडे काटकांनीं दंगा करून ठाणीं घेतलीं होतीं. त्यांचें पारिपत्य करून ते गजेंद्रगडास येऊन तेथून बागल कोटाकडे गेले.

या सुमारास अनुबाईचें व तात्यांचें सौरस्य पुन्हां कमी झालें व तंटा मोडण्यासाठीं पुण्यास जाण्याचेंहि त्यानीं साफ नाकारलें. एवढेंच नव्हे तर ते कारभारांत व खासगी वागणुकींतहि अव्यवस्थितपणा करूं लागले. त्यामुळें त्यांस व त्यांच्या स्त्रियेस यापुढें अनूबाईंनीं जवळ जवळ नजरकैदेंतच ठेविलें. या सुमारास कडलास येथील देशपांडयांच्या मुलीशीं त्यानीं लग्न केलें असें ऐकण्यांत आहे. नानासाहेब पेशवे यानीं देशस्थाच्या मुलीशीं लग्न लाविलें. हें मामेबंधूचें उदाहरण पाहून तात्यानींहि त्याचप्रमाणें केलें. दुस-या कांहीं गोष्टींत अलीकडे त्यांचें जें बेफामपणाचें वर्तन सुरू होतें त्या वर्तनानें ते राज्यकाराभारासारख्या व सरदारीसारख्या जबाबदारीच्या कामास अगदी नालायख झाले होते. अनूबाई, खुद्द पेशवे, त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनीं व इतर पुष्कळ थोर लोकांनीं त्यांस मातोश्री गोपिकाबाई यांनीं व इतर पुष्कळ थोर लोकांनीं त्यांस दुर्व्यसनांपासून परावृत्त करावें म्हणून बहुत यत्न केला, धाक घालून पाहिला, निष्ठुरपणानें व कडकपणानें बागवून पाहिलें, पण सर्व व्यर्थ.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७४



इचलकरंजी, सं स्था न.
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

सन १७५६ च्या सावनूरच्या मोहिमेंत तात्या व अनूबाई हजर होती. पुढें तात्यांच्या शरीरीं आराम नसल्यामुळें ते परत इचलकरंजीस आले. परंतु सरदार व मुत्सद्दी व फौजेसुध्दां अनुबाई श्रीमंतांच्या स्वारीबरोबर राहिल्या. यावेळीं काबीज केलेला मर्दनगड इचलकरंजीकरांचडेच ठेवावा असें मनांत आणून श्रीमंतांनीं त्यांचेंच लोक किल्ल्यांत ठेविले. नंतर श्रीमंतांनीं पटवर्धन व इचलकरंजीकरांचे कारभारी यांस धारवाड प्रांतीं छावणीस ठेवून त्या प्रांतांची मामलत पटवर्धन, इचलकरंजीकर व विठ्ठल विश्राम या तिघांस सारखी वाटून दिली. पूर्वीचा व हल्लींचा नवीन मिळालेला मुलूख मिळून हा धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांच्या ताब्यांत आला. त्या वेळीं सुभ्याचें क्षेत्र फार मोठें असून त्याखालीं मिश्रीकोट, धारवाड वगैरे तेरा परगणे होते. खुद्द धारवाडचा किल्ला अनूबाईच्या ताब्यांत होता. बाकींची ठाणीं व परगण्यांतील किल्ले अनूबाईंनी आपल्या तर्फेनें त्या त्या परगण्याच्या मामलेदारांच्या ताब्यांत दिले होते. याशिवाय वल्लभगड, पारगड, भीमगड, कलानिधि, खानापूर व चंदगड हीं ठाणीं व कितूर संस्थानांपैकीं बागेवाडी हीं सर्व गेल्या तीन सालांत पेशव्यांनीं इचलकरंजीकरांच्या हवालीं केलीं होतीं. परगणा कंकणवाडी हाहि त्याजकडे पेशव्यांकडून मामलतीनें होता. एवढा हा मोठा धारवाडचा सुभा जो इचलकरंजीकरांकडे दिला होता त्याचा वसूल सरकारांत नियमितपणें यावा म्हणून येसाजीराम व रामचंद्र नारायण हे पेशव्यांच्या तर्फे सुभ्याची वहिवाट करण्यास नेमिले होते व वसुलाबद्दल पेशव्यांस व बंदोबस्ताबद्दल इचलकरंजीकरांस ते जबाबदार होते. रायबागची कमाविशीहि पेशव्यांकडून याच वेळीं तात्यांस मिळाली होती.

तात्या या लाडांत वाढलेला अनूबाईचा एकुलता एक मुलगा. त्याचे वडील व्यंकटराव यांनीं त्यास लहापणींच देशमुखीच्या कामांत घालून राज्यकारभाराचा ओनामा पढविला होता. परंतु दुर्दैवानें तात्यांस एकविसावें वर्ष लागतें तोंच वडील मृत्यू पावून सर्व कारभार अनूबाईस पहाणें प्राप्त झालें. बाईची हिंमत, धोरण व महत्वाकांक्षा जबरदस्त होती. त्यांचे भाचे नानासाहेब पेशवे भाऊसाहेब दादासाहेब यांजवर त्यांची चांगली छाप होती. तात्यांस त्यांनीं स्वतंत्रपणें कधीं वागूं दिलें नाहीं. ‘हें लहान पोर याला काय समजतें!’ अशा भावनेंनें अनूबाई त्यास जन्मभर वागवीत गेल्या. तात्या हे सरदारीचे मालक नांवाचे मात्र होते. या सर्व गोष्टींचा परिणाम तात्यांच्या मनावर प्रतिकूल रीतीचा होऊन बाईच्या ओंजळीनें पाणी पिण्याचा त्यांस कंटाळा येंऊ लागला. संस्थानांतील लबाड लोकांनीं तात्यांस भर देऊन आई व तिचे कारभारी यांविषयीं त्यांच्या मनांत वितुष्ट उत्पन्न केलें

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७३

 

इचलकरंजी, सं स्था न.
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

यापुढें नारायणरावतात्यांची कारकीर्द येते. ही कारकीर्द पंचवीस वर्षाच्या अवधीची असून तींत इचलकरंजी संस्थानाच्या वैभवाचा कळस झाला म्हटलें तरी चालेल. त्या संस्थानाचें वैभव इतकें वृध्दिंगत होण्यास तात्यांची करामत कारण नसून त्यांच्या मातोश्री अनूबाई यांचेच कर्तृत्व होय. (अनुबाई पहा.) मुलगा संस्थानाचा कारभार व सरदारीचा बोजा सांभाळण्याजोगा होण्यापूर्वीच व्यंकटराव वारले त्यामुळें तीं दोन्ही कामें नीट चालतील अशा तजविणी योजणें अनूबाईंचें कर्तव्य होतें.

नानासाहेब पेशवे व त्यांचे बंधू हे अनूबाईचे भाचे असल्यामुळें त्यांनीं तात्यांचा पुरस्कार करण्याचें मनावर घेतलें व त्यांच्या वडिलांकडे सरदारी होती तीच त्याजकडे कायम करून प्रत्येक स्वारींत त्याजकडे कांहींना कांहीं तरी कामगिरी सोंपविली इतकेंच नव्हें तर इनामें तैनाता देऊन मोठमोठया मामलती सांगून व मुलुखगिरींत संस्थानिकांकडे खंडणी करार करण्याच्या बोल्या त्यांजवरच सोंपवून त्यांस लाखों रूपये मिळवून दिले. व्यंकटराव वारल्यावर शाहूनें सबंध आजरे महाल अनूबाईस इनाम करून दिला.

पूर्वी गोकाकचा देसाई शिवलिंगप्पा म्हणून होता. त्यानें बंडावा केल्यामुळें सावनूरचा नबाब अबदुल मजीदखान यानें त्यावर स्वारी केली. तेव्हां तो देसाई पळून चिकोडीकर देसायाच्या आश्रयास जाऊन राहिला. नबाबानें त्याचें देसगतीचें वतन त्याचाच भाऊ अमीन आप्पा म्हणून होता त्यास दिलें. इकडे चिकोडीकरानें शिवलिंगप्पास दगा करून मारून टाकिलें व त्याचे मुलगे लखमगौडा व शिवरामगौडा म्हणून होते त्यांस कैदेंत ठेविलें. प्रस्तुतच्या प्रसंगीं त्या दोघां मुलांनीं आपली मुक्तता करण्याविषयीं प्रार्थना केली व त्यांनां आश्रय दिला.

यावेळीं पेशवें कर्नाटकांत आले होते व त्यांचा धारवाड काबीज करण्याचा मनसबा ठरला होता. तेथें मोंगलांचा किल्लेदार पृथ्वीसिंग म्हणून होता. त्याजकडे राजकारण करून शिबंदी खर्चाबद्दल त्यास ३५००० रूपये देऊन तारीख १३ रोजीं श्रीमंतांनीं तो किल्ला व त्याखालचा सरंजाम ताब्यांत घेतला व तेथील मामलत तात्यांस दिली. पुन: सन १७५४ च्या कर्नाटकाच्या मोहिमेंत महादजीपंत पुरंदरे व नारायणरावतात्या हेच मुख्य सरदार होते. पुरंदरे व तात्या यांनीं प्रथमच गोकाकचें ठाणें देसायापासून हिसकावून घेऊन माजी देसायाचे दोन मुलगे तात्यांच्या आश्रयास राहिले होते त्यांसच त्यांनीं या वेळीं हें देसगतीचें वतन देऊन गोकाकचें ठाणें आपल्या ताब्यांत ठेविलें. देसायाच्या मुलांनीं यावेळीं कृतज्त्रताबुध्दीनें हुनशाळ हा गांव तात्यांस इनाम दिला. नंतर हें लष्कर श्रीरंगपट्टणापर्यंत जाऊन त्यानें कित्तुर, सोंदें, सावनूर, बिदनूर, चित्रदुर्ग, रायदुर्ग, श्रीरंगपट्टण, बसवापट्टण, कनकगिरी या नऊ संस्थानांपासून एकंदर खंडणी ३८७०००० रूपये घेतली. संस्थानिकाशीं खंडणीचा ठराव तात्या यांच्या विद्यमानें होत असे. सन १७५५ च्या मे महिन्यापर्यंत हा मजकूर झाला. नंतर तात्यांनीं पाच हजार फौजेसह धारवाडास छावणीस रहावें याप्रमाणें पेशव्यांचा हुकूम झाल्यावरून पुरंदरे पुण्यास गेले व तात्या धारवाडास राहिले. स्

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७२



इचलकरंजी, सं स्था न. व्यंकटराव घोरपडे

इ.स.१७३० मध्यें सातारकर व करवीरकर यांच्या दरम्यान वारणातीरीं जी लढाई झाली तींत व्यंकटराव घोरपडे हे करवीरकरांकडून लढत होते. सभोवतीं संभाजींचें राज्य आपण दूर एकटे पडल्यामुळें अपली काय जीं खेडीं आहेत तीं तात्काळ हातचीं जाऊन नाश होईल, या भयानें ते त्यांच्या फौजेंत हजर झाले असावे. या लढाईत करवीरकरांचा पराभव होऊन भगवंतराव अमात्य व्यंकटराव घोरपडे वगैरे करवीरकरांकडील प्रमुख असाम्या कैद झाल्या. शेवटीं बाजीराव पेशव्यांनीं दहा हजार रूपये दंड भरून आपल्या मेहुण्याची सुटका करून घेतली.

यापुढें शाहूनें आपल्याजवळ रहाण्याविषयीं व्यंकटरावास आज्त्रा केल्यावरून साता-यास ते राहिले. पूर्वी त्यांचें पथक पांचशें स्वारांचें असतां आतां सातशें स्वारांचे झालें. त्या पथकास शाहूकडून सरंजामास यावेळीं आणखी कडलास, पापरी व बेडग हे गांव मिळाले व वाडा बांधण्याकरितां सातारा येथें जागा मिळाली. त्या पेठेचें अद्यापि व्यंकटपुरा हें नांव प्रसिध्द आहे.

व्यंकटरावांचे पुत्र नारायणरावतात्या यांचें लग्न याच वेळीं झालें. त्यांच्या स्त्रीचें नांव लक्ष्मीबाई. पूर्वी व्यंकटराव लहान होते तोंच त्यांच्या वडिलांनीं देशमुखीचा मामला त्यांच्या हवालीं करून व त्यांस वडिलांनी देशमुखीचा मामला त्यांच्या हवालीं करून व त्यांस त्र्यंबक हरि पटवर्धन हे दिवाण नेमून देऊन त्यांजकडून त्या वतनाचा करभार करविला. तसेंच आतां नारायणराव वयांत येण्याच्या पूर्वीच व्यंकटरावांनीं तीच देशमुखी त्यांच्याहि हवालीं केली व त्र्यंबक हरि यांसच त्यांचे दिवाण नेमून दिले. (१७३३).

सन १७३९ त व्यंकटरावांनीं इचलकरंजीचें ठाणें वसवण्याची सुरूवात केली. गांवकुसवापैकीं अमुक उंचीचा व रूंदीचा भाग रयतेपैकीं प्रत्येक कुळानें बांधून द्यावा, याप्रमाणें ठराव करून त्यांनीं गावक-यांकडून सक्तीनें गांव कुसूं घालविलें.

वसईची मोहिम चालू असतां व्यंकटरावांनीं गोव्यावर स्वारी करून तेथें फिरंग्यांचा पुरा मोड केला व ते परत देशीं आले (१७३९). त्या वेळीं शाहूमहाराज मिरजेच्या किल्ल्यास वेढा घालून बसले होते. त्यांच्या लष्करांत व्यंकटराव चांरशे स्वारानिशीं येऊन दाखल झाले. त्यावेळी इंग्रजांकडून गॉर्डन नांवाचा वकील शाहूमहाराजांकडे आला होता. यानें त्या वेळची अशी एक बातमी लिहून ठेविली आहे कीं “गोवेकर पोर्च्यगीज लोकांनीं सहा लक्ष रूपये देण्याचें कबूल करून मराठयांशीं (व्यंकटरावांशीं) समेट करून घेतला. त्यांपैकीं त्यांनीं पस्तीस हजार रूपये रोख व एक लक्ष पस्तीस हजार रूपये किमतीचीं ताटें तबकें वगैरे चांदी दिली. सर्व रकमेचा फडशा होईपर्यंत मराठी फौज गोंव्याच्या आसपास रहावयाची आहे व गोवेकरांनीं तिच्या खर्चाकरितां दरमहा दोन हजार रूपये देण्याचें कबूल केलें आहे.” गोव्यावरच्या स्वा-यांत व्यंकटरावांनीं जितका मुलूख जिंकिला होता तितका सर्व शाहूमहाराजांनीं त्यांजकडे जहागीर म्हणून वहिवाटीस ठेविला. त्या मुलखाच्या आसपास कोल्हापूरकरांचे कांहीं टापू असल्यामुळें त्यांशीं नेहमीं तंटें होतील या भयानें ते टापूहि व्यंकटराबांनीं संभाजीपासून कमविशीनें घेतले होते. गोव्याच्या स्वारीहून परत आल्यावर करवीरकर संभाजी यांनीं व्यंकटरावांस सुळकूड, टाकळी व दोन्ही शिर्दवाडें मिळून चार गांव इनाम दिले.

मिरज प्रांतीं मोंगलांचा अंमल होता तेथपर्यंत (१७४०) तिकडचा देशमुखीचा अंमल व्यंकटरावांस कधींच सुरळींतपणें मिळाला नाहीं. मोंगलाई मुलुखांत महाराजांची देणगी जरी असली तरी तिजवर मोंगल अधिकारी मोंगलबाब म्हणून एक कर घेत असत. पन्हाळा प्रांतीं शाहूमहाराजांनीं व्यंक
टरावांस देशमुखी दिली होती त्याबद्दल जिजाबाईचा कार भार सुरू झाल्यावर करवीर दरबारानें व्यंकटरावांजवळ इनाम तिजाई मागितली परंतु ती त्यांनीं देण्याचें साफ नाकारिलें. त्यामुळें यापुढें करवीरकर व व्यंकटराव यांच्या नेहमीं कटकटी होत. एकदां तर इचलकरंजीवर करवीरकरांनीं चाल केली होती परंतु त्या वेळीं त्यांचा पराभव झाला (१७४२).

गोव्याच्या स्वारीहून परत आल्यावर व्यंकटराव कांहीं दिवस साता-यास होते. त्यानंतर आणखीही एकदोन मोहिमांत ते नानानाहेब पेशव्यांच्या फौजेबरोबर चाकरी करीत होते. पुढें १८४३ पासून त्यांच्या शरीरावर क्षयरोगाचा पगडा दिवसेंदिवस हळू हळू बसत चालला या आजारांत एके जागीं राहून त्यांच्या प्रकृतीस बरें वाटेना, म्हणून ते इचलकरंजी, नांदणी, टाकळी, उत्तूर या ठिकाणीं रहात असत. त्या काळीं देवधर्मांवर व भुतांखेतांवर लोकांचा विश्वास फार असे. सदलगें येथें कोणी प्रसिध्द देवरूषी होता त्याजकडून कांहीं दैवी उपाय करविण्याकरितां ते सन १७४५ त कुटुंबसुध्दां जाऊन राहिले होते. तेथेंच त्यांचें देहावसान झालें.

व्यंकटराव हे शूर व कर्तृत्ववान् पुरूष होते. करवीर व सातारा या दोन्ही दरबारांत त्यांचे वजन चांगलें असे. इचलकरंजी संस्थानाच्या इतिहासांत त्यांनीं शाहूमहाराजांची स्वतंत्र सरदारी मिळविली ही गोष्ट महत्वाची आहे. ही सरदारी मोठया योग्यतेची होती. त्यांचा ‘ममलकत मदार’ हा किताब शाहूनें मान्य केल्याचें सरंजामजाबत्यावरून स्पष्ट होतें.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७१


इचलकरंजी, सं स्था न. व्यंकटराव घोरपडे
व्यंकटराव नारायण हा नारोपंताचा पुत्र. नारोपंत मरण पावले तेव्हा त्यांचें कुटुंब बहिरेवाडी येथें रहात होतें. पंताच्या मृत्यूचें वर्तमान पिराजी घोरपडे यांस कळतांच ते बहिरेवाडीस आले. पंतांची स्त्री लक्ष्मीबाई व पुत्र व्यंकटराव यांची भेट झाल्यावर ते फार कष्टी होऊन बोलले कीं, “आमचे वडिलांनीं नारोपंतास पुत्राप्रमाणें मानून त्यांचें कल्याण केलें; तें स्मरून नारोपंतांनीं आमचे वडील वारले तेव्हां आम्ही नेणतीं मुलें होतों, तरी आमच्या दौलतीसाठीं बहुत खस्त खाल्ली. त्यांनीं भाऊपणाचें उत्तम सार्थक केलें. त्यांचे तुम्ही पुत्र आहां ते आमचेच आहां. आमचे देशमुखी सरदेशमुखीचें वतन मिरजप्रांतीं आहे तें आमचे वडिलांनीं व आम्हीं नारोपंतांकडे वहिवाटीस दिलें होतें. तेच वतन आम्ही तुम्हाकडे चालू ठेवितों.” असें म्हणून पिराजी परत गेला.
नारोपंतांच्या हृयातींत सेनापतीकडून व इतरांकडून इचलकरंजी, आजरें, आरग, मनेराजुरी, म्हापण, बहिरेवाडी व शिपूर इतकीं खेडीं त्यास इनाम मिळालेंली होतीं. शिवाय तर्फ आजरें येथील एकतर्फी खेडयांची वहिवाट व प्रांत मिरज येथील देशमुखीची वहिवाट सेनापतींकडून पंताकडे चालत होती. हें सारें उत्पन्न सालिना तीस चाळीस हजारांचे होतें. शिवाय करवीर राजमंडळांपैकीं सचिवाचें पद त्यांस मिळाले होतें (१७११) त्याचा सरंजाम ते उपभोगीत होते; व सेनापतीच्या संस्थानाचा कारभार त्यांजकडे असल्यामुळें त्यासंबंधींहि त्यांची प्राप्ति बरीच असावी. पण पंत वारल्यावर संभाजीनें सचिवाचें पद व्यंकटरावास दिलें नाहीं व सेनापतींनींहि त्यांच्या हातीं कारभार ठेविला नाहीं. कारण कीं नारोपंतांचे पुरस्कर्ते रामचंद्रपंत अमात्य हे यापूर्वीच वारले होते व व्यंकटरावांचें नीट बनत नव्हतें. अशा वेळीं व्यंकटराव यांची नजर शाहूचा आश्रय संपादण्याकडे लागली. पेशव्यांच्या द्वारें तिकडे त्यांचा वशिलाहि चांगला होता. पेशव्यांनीं त्या वेळेपासून त्यांची सोय, उत्पन्न व अधिकार वाढविण्याचा हळू हळू उपक्रम सुरू केला.
पेशव्यांच्या विनंतीस अनुसरून शाहूनें व्यंकटरावास सन १७२२ त शिरढोण हा गाव व पुढच्या वर्षी मनेराजुरी दणी, आरग व म्हापण हे गांव इनाम दिले. त्याच्या पुढच्या वर्षी उत्तूर हा गांव इनाम दिला. या सालीं (१७२४) व्यंकटराव यांच्या नांवें निराळा सरंजामजाबता करून दिला. मागलें (१७०३) सरंजामजाबत्यांत व्यंकटरावांनीं कापशीकरांच्या हाताखालीं चाकरी करावी असें ठरलें होतें. परंतु आतांच्या जाबत्यामुळें त्यांचा कापशीकर व करवीरकर यांशीं अजीबात संबंध तुटला व ते शाहू महाराजांचे स्वतंत्र सरदार झाले.
व्यंकटराव व अनूबाई हीं दोघेंहि आतां वयांत आलीं होतींक्त पेशव्यांनीं (१७२२) व्यंकटरावास रहाण्यांकरितां पुण्यांत वाडा बांधून दिला. आणि तेथच्या संसाराच्या सोईकरितां त्यास वडगांव (चाकण) हा सबंध गांव, पर्वतीनजीकचा बाग व हडपसर येथील बाग इनाम दिला.
याप्रमाणें पुण्यांत रहाण्याची सोय झाल्यामुळें व्यंकटराव वर्षांतून कांहीं दिवस तेथें रहात असत. त्यांस दोन अपत्यें झालीं. पहिली कन्या वेणूताई व दुसरा पुत्र नारायणराव ही वेणूताई ही पुढें पेशवाईंतले प्रसिध्द सरदार त्रिंबकराव मामा पेठे यांस दिली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७०


इचलकरंजी, सं स्था न. व्यंकटराव घोरपडे
नारोपंताच्या मागाहून त्यांचे चिरंजीव व्यंकटराव घोरपडे यांनांहि संताजीराव घोरपडे यांच्या वंशजांनीं, मिरजेची देशमुखी सरदेशमुखी वगैरे सर्व हक्क देऊं केले. पण व्यंकटराव एवढयावर संतुष्ट राहिले नाहीत. पोर्तुगीज लोकाशी मराठयांच्या ज्या लढाया झाल्या त्यांत व्यंकटरावांनी चांगले नांव मिळविले व पुष्कळ मुलूख काबीज केला, त्यामुळें शाहू महाराज खूष होऊन त्यांनी व्यंकटरावांना 'स्वतंत्र' सरदारी दिली. व्यंकटरावानीच इचलकरंजीचा किल्ला आपल्या कारकीर्दीत बांधला व तें आपल्या राजधानीचें गांव ठरविले.
व्यंकटरावानंतर त्यांचे चिरंजीव नारायणराव यांची कारकीर्द झाली. या कारकीर्दीत इचलकरंजी संस्थानची अतिशय भरभराट झाली. नानासाहेब पेशव्यांनी व भाऊसाहेबांनी दक्षिणेंत ज्या मुलुखगिऱ्या केल्या त्या सर्व प्रसंगी, नारायणराव हे जातीनें हजर होते, त्यांत त्यांनी चांगला पराक्रम गाजविल्यामुळे धारवाडची सुभेदारी त्यांनां मिळाली. हे १७७० साली वारले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६९


इचलकरंजी, सं स्था न.- मूळ संस्थापक नारो महादेव
हें संस्थान उ. अ. १६० ४१ आणि १६० ५०' व पू. रे. ७४० ३१' आणि ७४० ५०'
यांमध्ये वसलेले आहे. हे कोल्हापूरच्या राजाच्या ताब्यांतील एक मांडलिक संस्थान आहे. या संस्थानची राजधानी इचलकरंजी हें गांव असून या राजधानीच्या नांवापासूनच 'इचलकरंजी' हें नांव संस्थानाला प्राप्त झाले आहे. संस्थानचें क्षेत्रफळ २४० चौ. मैल. लोकसंख्या सुमारे ६०००० व उत्पन्न सवातीन लाखांचे आहे.
इतिहास - इचलकरंजी संस्थानचा मूळ संस्थापक नारो महादेव हा होय. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात जी कित्येक कोंकणस्थांची घराणी, आपले नशीब काढण्याकरितां घाटांवर आली,त्यांतच रत्नागिरी जिल्ह्यांतील वरवडेकर जोशांच्या घराण्याचा समावेश होता. नारो महादेवांचे वडील महादेवपंत हें सावंतवाडी संस्थानांतील म्हापण गांवच्या कुलकर्णीपणाचें काम करीत होते. नारोपंत हे अवघे चार पांच वर्षाचे असतांना, महादजीपंत निर्वतले. त्यामुळे महादजीपंतांची बायको गंगाबाई ही आपल्या मुलाला घेऊन उदरनिर्वाह करण्याकरितां घाटावर बहिरेवाडी येथे आली. प्रसिध्द मराठा सेनापती संताजी घोरपडे याचें हें रहाण्याचें ठिकाण होते. या ठिकाणी असतांना नारोपंतांच्या अंगचे विलक्षण गुण संताजीच्या नजरेस पडल्यामुळे संताजीने त्यास आपल्या दिमतीस ठेवले व लिहिणे वाचणे, घोडयावर बसणे, निशाण मारणे इत्यादि त्या काळची सर्व विद्या शिकविण्याची व्यवस्था लावून दिली.
राजारामाच्या कारकीर्दीत संताजीरांव हे सेनापती असल्याने त्यांना नेहमी स्वारीवर असणे भाग पडे. संताजीरावांनी राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचे स्वातंत्र्य राखण्यासाठी जे असाधारण पराक्रम केले, ज्या अचाट मसलती केल्या त्यांत नारोपंतांनी बहुमोल मदत केली. नारोपंतांवर संताजीची बहाल मर्जी होती व नारोपंताचीहि संताजीवर अतिशय भक्ति असे; ती इतकी की, नारोपंतांनी आपले मूळचें जोशी हें आडनाव बदललें व आपल्या धन्याचे-संताजीचें –घोरपडे हें आडनांव धारण केले. अद्यापिहि, नारोपंताचे वंशज 'घोरपडे' हेंच आडनाव अभिमानपूर्वक आपल्या पुढे लावतात.
संताजीराव घोरपडे यांनी नारोपंत यास मिरजप्रांताच्या देशमुखीसरदेशमुखीची वहिवाट दिली होती; व इचलकरंजी व अजरें हे गांव इनाम दिले होते. पुढे संताजीराव घोरपुडे १६९८ साली वारले. त्यानंतर दहा पंधरा वर्षे निरनिराळया मसलतीत नारोपंत यांनी आपले लक्ष घालून चांगलेच नांव कमावले. नारोपंतांचा मुलगा व्यंकटराव याला बाळाजी विश्वनाथ यांनी आपली मुलगी अनुबाई दिली; त्यामुळे खुद्द पेशव्यांच्या घराण्याशी नारोपंताच्या घराण्याचा शरीरसंबंध जडला, व त्यामुळे नारोपंतांनी स्थापलेल्या इचलकरंजी संस्थानाला चांगले भाग्याचे दिवस प्राप्त झाले

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६८




राजस्थानातील मुसंडी
मराठयांनी महाराष्ट्राबाहेर गाजवलेल्या पराक्रमाची यशोगाथा सांगणा-या ‘झंझावात’ या इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील राजस्थानातील मराठय़ांच्या कामगिरीवर लिहिलेल्या लेखाचा हा संपादित भाग -
राजस्थानातील कोटा आणि बुंदी ही दोन छोटी राज्ये हाडा राजपुतांच्या ताब्यात होती. नसर्गिकरीत्या या दोन्ही राज्यांना मोठे संरक्षण लाभलेले आहे. उत्तरेला चमेली म्हणजे चंबळ, पूर्वेला पार्वती नदी, मुकुंद-याची डोंगररांग ही दक्षिणेला, तर आरवली पर्वताच्या रांगा या पश्चिमेला असल्याने ही दोन्ही राज्ये तशी संरक्षित होती. मुकुंद-याची खिंड हा जाण्या-येण्याचा मोठा मार्ग होता.
मराठय़ांचा एकूण उत्कर्ष आणि ताकद पाहिल्यावर कोटय़ाच्या राजाने मराठी फौजेची मदत घेण्यास सुरुवात केली. राव किशोरसिंह हाडा याने १६८३ पासूनच ही मदत घेतली होती. मराठी फौजांना उत्तरेत जाण्यासाठी मिळालेली ही एक मोठी संधी होती. किशोरसिंहानंतर त्याचा मुलगा रामसिंह हा वजीर झुल्पिकारखान याच्या मदतीने गादीवर आला आणि द्रष्टवन कर्नाटक मोहिमांवर मुघलांतर्फे सामील झाला. मुघलांच्या कैदेत असलेल्या शाहूराजांशी याच वेळी त्याचा संबंध आला असावा.
रामसिंहाने त्याच्या वडिलांचे मराठय़ांसोबत चांगले वागण्याचे धोरण कायम ठेवले. त्याने काही मराठी ब्राह्मणांना जहागि-याही दिल्या. सनगोढ, मांगरोळ, अटोनी, इजारा येथे या जहागि-या होत्या. निळोजी प्रधान यांचा कोटय़ाला १६९७ मध्ये सत्कारही करण्यात आला. हा रामसिंह जजाऊच्या लढाईत १७७० मध्ये मारला गेला. त्याचा मुलगा राव भीमसिंह हा कोटय़ाच्या गादीवर आला. कोटय़ाच्या दक्षिण प्रांतात राजाविरुद्ध उठाव झाल्याने राजाने चंद्र पंडित आणि हिंदुराव यांना मदतीस बोलावून त्यांच्या करवी उठावाचा बंदोबस्त केला. या दोघांना मोठय़ा भेटी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
फरुखसियर १७१३ मध्ये दिल्लीचा बादशाह म्हणून गादीवर आल्यावर कोटय़ाच्या राजाने त्याचा सन्मान केला. पण बुंदीच्या राजाने मात्र काहीच केले नाही. कालांतराने भीमसिंहाने दाखवलेल्या हुशारीबद्दल त्याचा ‘महाराव’ असा किताब देऊन सत्कार करण्यात आला. १७१९ मध्ये त्याला बुंदी घेण्याची परवानगीही देण्यात आली. भीमसिंह १७२० मध्ये बु-हानपूरजवळ निजामाच्या विरुद्ध लढत असताना मृत्युमुखी पडला.
‘महाराव अर्जुनसिंह’ हा भीमसिंहाचा मुलगा कोटय़ाच्या गादीवर आला. दिल्लीत यावेळी उलथापालथ चालू असल्याने जयपूरच्या सवाई जयसिंहाने सर्व राजपुतांना एकत्र येण्याचे आवाहन केले. अनेक राजपूत राजे या योजनेच्या विरुद्ध होते. शिवाय जयसिंहाने दिल्लीला मुहम्मदशाहाच्या मदतीला आपली फौज पाठवली तरी त्या फौजेचे नेतृत्व करण्यास तो स्वत: गेला नव्हता. अर्जुनसिंहानेही तसेच केले होते. पण तो अचानक १७२३ मध्ये मृत्युमुखी पडला. यावेळी कोटय़ाचा १६७ मराठय़ांशी उत्तम संबंध होता.
मराठय़ांनी तोपर्यंत माळव्यात आपले पाय उत्तम रोवले होते. १७२६च्या पूर्वार्धात मराठी फौज मेवाड, कोटा आणि बुंदीत उतरली. मराठय़ांच्या हल्ल्यात त्यांना फार लूट हाती लागली नाही. सवाई जयसिंहाने आता इतर राजपुतांना मराठय़ांविरुद्ध एकत्र येण्यासाठी परत आवाहन केले. त्याने जोधपूरपासून सगळीकडे भराभर पत्रे पाठवली. त्यावेळी कोटय़ाचा महाराव दुर्जनसालाने जयसिंहाला संपूर्ण पाठिंबा दिला. जयसिंहाने आपला एक वकील साता-याला पाठवला. १७३० पर्यंत जयसिंहाने मराठय़ांशी सलोखा साधला.
१७३३ मध्ये नाहरगढाचा किल्लेदार नाहरसिंह याने कोटय़ाच्या राजाचे अधिपत्य अमान्य करून स्वत:ला सार्वभौम म्हणून घोषित केले. त्याने इस्लाम स्वीकारून स्वत:ला नाहरखान म्हणवले. दुर्जनसालाने शाहूराजांकडे दूत पाठवून नाहरखानाचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. शाहूराजांनी त्यांचे तीन सरदार नारो विठ्ठल, कृष्णाजी आणि उदाजी पवार यांना कोटय़ास जाण्यास सांगितले. त्याच वेळी पिलाजी जाधवराव पार्वती आणि अत्रू या नद्या उतरून आला. तेथे असूजी नावाचा एक मराठा जहांगीरदार होता.
दुर्जनसालाने पिलाजीस १.५० लाख रुपये देतो, असे सांगून नाहरखानावर पाठवले. पिलाजीने नाहरखानाचे मूळ उखडून काढले. नाहरगढ ताब्यात घेऊन पिलाजीने तो दुर्जनसालास दिला. त्याने पिलाजीस दीड लाख रुपये दिले. मराठयांशी महारावाचे संबंध चांगले राहिले. पुढे जयसिंह आणि अभयसिंहाच्या राजकारणाला कंटाळून दुर्जनसाल हा मुघल खानदौरानला मिळाला. त्यावेळी मराठय़ांनी मुघलांचा मोठा पराभव केला. मराठय़ांचे नंतर कोटय़ावर वर्चस्व राहिलेच.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६७




सरदार  मानाजी पायगुडे - झेंडा ‘अटके’पार!
झेंडा ‘अटके’पार!
पानिपतच्या रणांगणावर अगणित मराठी वीरांनी आपले प्रश्नण देशासाठी अर्पण केले आहेत. यामध्ये
पुणे परिसरातील मावळ्यांच्या शौर्याला तोड नाही. पानिपत संग्रामपूर्वी १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते.
सन १७५८ मध्ये मराठय़ांनी सरहिंद, लाहोर जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमूर आणि सरदार जहाँनखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. जाताना त्यांनी अवजड तोफखाना आणि दिल्लीतील लुटीचा खजिना तेथेच सोडून दिला. त्या वेळी तैमूरने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले. तहमासखान मुक्त झाल्याने त्याने लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे! तारीख होती १० एप्रिल १७५८. ही हकिकत ‘तहमासनामा’ या आपल्या आत्मचरित्रापर ग्रंथात तहमासखानाने लिहून ठेवली आहे. अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठय़ांनी चालूच ठेवला होता. त्यांनी चिनाब, झेलम अशा मोठय़ा नद्या ओलांडल्या. रावळपिंडीही मराठय़ांनी सर केली व मराठी फौजा सिंधु नदीच्या काठांवर आल्या. नदीच्या पलीकडील काठांवर अटक किल्ला आहे. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी १५८१ मध्ये अकबराने अटक किल्ला बांधला. मराठी सैन्याने नदीच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज घेतला व नदीवर होडीचा पूल तयार केला. होडीच्या पुलावरून मराठी फौजा सिंधूपार होऊन अटक किल्ल्यापर्यंत आल्या व किल्ल्यावर हल्ला करून तो हस्तगत केला. ‘अटके’ वर मराठी जरीपटका फडकला. ही गोष्ट १० ऑगस्ट १७५८ ची. मराठी फौजेत या वेळी मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर, गोपाळराव गणेश, तुकोजी खंडोजी कदम, नरसोजी पंडित, साबाजी शिंदे इत्यादी सेनानी आपापल्या पथकाबरोबर होते.
अटकेच्या मोहिमेचे नेतृत्व श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी केले. लाहोरहून श्रीमंत रघुनाथरावांचे पत्र पुण्यात आले. बिपाशा नदी तीरावरून सडय़ा फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव, गोपाळ गणेशसह पुढे रवाना केल्या. पेशवे दप्तर खंड २७/२१८ या मध्ये या बाबतचे पत्र उपलब्ध आहे. ‘अटके’ च्या विजयात सहभागी असलेले सरदार मानाजी पायगुडे यांची इतिहासातील कामगिरी खालील प्रसंगावरून आपल्या समोर येते.
१) सन १७३४ मधील दिल्लीच्या रणसंग्रामात राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार, गोविंद हरी पटवर्धन इत्यादी ज्येष्ठांबरोबर मानाजी पायगुडे सहभागी होते.
२) १६-२-१७५१ च्या पत्रात नारायणराव घोरपडे व मानाजी पायगुडे यांनी बेळगाव प्रश्नंतात शहापूरची पेठ मारली असा उल्लेख आहे. ३) ३०-११-१७३७ च्या पत्रात म्हटल्याप्रमाणे थोरले बाजीराव यांनी काही घोडे व बंदूकस्वार मानाजींकडे सुपूर्द केले होते. ४) २६-१-१७४८ च्या पत्रात जनार्दन गणेश भाऊसाहेब पेशव्यांना लिहितात, ‘मानाजी पायगुडे व आंग्रे यांची लढाई मसुऱ्यास झाली. आंग्रे भगवंतगडावर पळून गेले. मानाजी पायगुडे यांनी पारगड व शिवगड हस्तगत केला व पोर्तुगीजांना शह दिला.’ ५) २२-१-१७४९ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव पेशव्यांना आपली हकिकत कळवितात. त्यात मानाजी व त्यांचा पुत्र लालजी यांच्या पराक्रमाचा उल्लेख आहे. बुंदेलखंडात तेजगड किल्ला आहे. ह्य़ा किल्ल्यास तीन हजार सैन्याने वेढा घालून किल्ला मोठय़ा शर्थीने जिंकला. मानाजी व त्यांचा पुत्र लालजी याने पराक्रमाची परिसीमा गाठली. लालजीस वीरमरण आले परंतु किल्लय़ाचा पाडाव झाला. ६) फेब्रुवारी १७५१ च्या पत्रात त्रिंबकराव पेठे सातारा व कोल्हापूर प्रश्नंताची घटना पेशव्यांना कळवतात. त्यात म्हटले आहे, की ‘मानाजी पायगुडे कोल्हापूर प्रश्नंतात तळ ठोकून आहेत व छत्रपती रामराजे कोल्हापूरकर राजकारणावर लक्ष ठेवून आहेत.’ ७) १७५४ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव लिहितात- राजेश्री मानाजी पायगुडे यांजकडे बाणाची कैची, बाणदार, पैसा सत्वर पाठवायची आज्ञा करावी. ८) १४-२-५६ (१७५६) च्या पत्रात गोविंद बल्लाळ यांनी बकरुल्लाखान याचे बरोबर केलेल्या लढाईचे वर्णन आहे. यातही मानाजींनी मोठा पराक्रम गाजवला. ९) जून १७५७ रोजी मानाजी पायगुडे यांनी दिल्लीहून पुण्यास कळवले आहे, की आम्ही लाल किल्ल्याचा काबूल दरवाजा व लाहोर दरवाजा ताब्यात घेतला आहे व त्यावर पहारे बसवले आहेत. आम्हाला मनुष्यबळ व पैसा पाठवावा, ही विनंती. पानिपत संबंधात मानाजी पायगुडे यांचा बऱ्याच पत्रात उल्लेख आहे. पानिपतच्या ऐतिहासिक पोवाडय़ात समशेरबहाद्दर व मानाजी शेजारीशेजारी उभे राहून लढत होते असा उल्लेख आहे.
कॅ. वासुदेव बेलवलकर यांनी लिहिले आहे, की खैबरखिंडीच्या पायथ्याशी असलेल्या जमरुड या किल्ल्यावर मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, केशवराव पानसे इत्यादींनी कबजा मिळविला. मराठी फौजा जवळजवळ काबूल नदीपर्यंत गेल्या होत्या, पलीकडून येणाऱ्या शत्रूच्या फौजांना हैराण करण्याचे काम या मराठी फौजेने केले. मानाजी पायगुडे यांची एकंदर कारकीर्द पाहता असे लक्षात येते, की मानाजी हे पेशव्यांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. त्यांचे आयुष्यातील आणखी एक प्रसंग म्हणजे त्यांच्या अपूर्व कामगिरीचा ‘कळस’ म्हणावा लागेल. पेशवे-पोर्तुगीज संबंधातील एक घटना. त्या वेळी गोव्यात मांडवीनदी काठावर मराठा पोर्तुगीज यांच्यात बोलणी चालू होती. नदीकाठी एका तंबूत दोन मराठा सरदार मराठय़ांचे वतीने बोलत होते. नारायण शेणवी नावाचा ब्राह्मण दुभाष्याचे काम करीत होता. मराठय़ांचे वकील म्हणून काम करणारे दोन सरदार होते. मानाजी पायगुडे व सयाजी गुजर! ही बाब सेतु माधवराव पगडी यांनी आपल्या ‘मराठे-पोर्तुगीज संबंध’ या आपल्या पुस्तकात दिलेली आहे. अशा या मानाजी पायगुडे व अन्य सर्वच मराठा सेनानींना मानाचा मुजरा!
अरुण पायगुडे
Taken From,
लोकसत्ता पुणे वृत्तान्त, सोमवार, १० ऑगस्ट २००९. Credits to original author Mr Arun Paigude

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६६


सरदार कृष्णाजी गायकवाड

शिवरायांची पत्नी राणीसाहेब सकवारबाई यांचे बंधू सरदार कृष्णाजी बंकी गायकवाड , कवी पारामंद यांच्या परमानंद काव्यात शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून जी नावे आहेत त्यामध्ये कृष्णाजी बांकी गायकवाड हे अग्रभागी होते
अफजल खान चालून आला त्यावेळी माणकोजी दहातोंडे , सुभानजी इंगळे ,जिवाजी देवकाते पिलाजी बेलदरे व संताजी बोबडे हे सरदार भेटायला गेले सोबत कृष्णाजी गायकवाड होते , शिवाजी राजांनी विचारले कि बेत कसा आखावा तेव्हा कृष्णाजी गायकवाड बोलले "आतून बारीक चिलखती झगा घाला बाहेरून मुसेजरी वापरा डाव्या हातात बिचवा आणि उजवीकडे छुपी वाग नखे पंजात लपवा कारण खान कापटी आहे दगाबाज आहे …….'' आणि झाले तसेच झाले खानाने कपाट केले महाराजांवर वार केला महाराजांनी खानच्या पोटात बिचवा फेकला वाघ नखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला . महाराज जिंकले पण त्याच्या मागे गनिमी कावा होता तो सरदार कृष्णाजी बांकी गायकवाड यांचा हे इतिहास विसरला ……।
पण शिवराय विसरले नव्हते

म्हणून

अफजल खानच्या वधाच्या नंतर शिवाजी राजांच्या राजदरबारात अज्ञान दासाकडून पोवाडा सादर झाला त्यामधल्या ओळी

राजा विचारी भल्या लोकांला । "कैसें जावें भेटायाला" ॥

बंककर कृष्णाजी बोलला । "शिवबा सील करा अंगाला" ॥

भगवंताची सील ज्याला----। आंतून, (तो) बारिक झगा ल्याला ॥

मुसेजरीच्या सुरवारा । सरजा (जें) बंद सोडुन दिला ॥

डावे हातीं बिचवा त्याला (ल्याला) । वाघनख सरज्याच्या पंजाला ।

पटा जिव म्हाल्याप दिला । सरजा बंद सोडुन चालिला ॥२४॥

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६५


कावजी कोंढाळकर एक योद्धा
Written By Nikhil salaskar

१६६१ च्या जानेवारी महिन्यात, महाराजांनी कोकणात उतरू पाहणार्या कारतलबखान या मोगली सरदाराचा धुव्वा उडविला आणि दक्षिण कोकणात मुसंडी मारली. ही कोकण मोहीम स्वराजासाठी फारच यशस्वी ठरली, पण जवळजवळ पाच महिने मराठी सैन्य या मुलुखात अडकून राहिले. या संधीचा फायदा उठवत शाइस्तेखानाने १६६१ च्या मे महिन्यात कल्याण काबीज केले आणि नंतर देइरीगडास वेढा घातला. या वेढ्याची जबाबदारी
शाइस्तेखानाने सरदार बुलाखीवर सोपविली होती.महाराजांनी हा वेढा उठविण्यासाठी कावजी कोंढाळकरची रवानगी केली. कावजी कोंढाळकरांच्या मराठी सैन्याने मुघलांचे तब्बल चारशे सैनिक मारीत देइरीगडाचा वेढा उधळून लावला.याचा संदर्भ आपल्याला शि.प.सं मध्ये सापडतो.
आता प्रश्न राहतो तो म्हणजे, हा कावजी कोंढाळकर कोण?
हा संभाजी कावजी कोंढाळकर असेल (अफझलखान युद्धाच्या वेळेस मर्दुमकी गाजविणारा) का? तर या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे, कारण संभाजी कावजी या दरम्यान शाइस्तेखानास मिळाला होता.हा कावजी मल्हार (शिरवळचे ठाणे काबीज करणारा) असेल का? याचे उत्तर सुद्धा नाही कारण कावजी मल्हार यांचे पूर्ण नाव कावजी मल्हार खासनीस असे होते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६४




शिवरायांचे शिलेदार - शिवा काशीद

शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग प्रामुख्याने विजापूरच्या आदिलशहाच्या अमलातील प्रदेशात चालू होता. शिवराय आणि आदिलशहा यांच्या पहिल्या उघड संघर्षात पुरंदरावर विजापुरी सेना पराभूत झाली. आदिलशाहीच्या सामर्थ्याला न जुमानता शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांचा नायनाट करून जावळी बळकावली. स्वराज्याच्या सीमा वाढू लागताच उरात धडकी भरलेल्या आदिलशाहीने प्रचंड फौज फाटा देऊन स्वराज्यावर पाठविलेला अफझलखान शिवरायांनी प्रतापगडाजवळ ससैन्य संपविला. हा प्रचंड पराभव आदिलशहाला अतिशय झोंबला. अफझल वधानंतर स्वराज्याच्या सीमा विजापूरच्या दिशेने वाढवत शिवरायांनी पन्हाळा हा बलाढ्य आणि मोक्याचा किल्ला जिंकला.
आदिलशहाने पुन्हा फौज देऊन सिद्दी जौहर या चिवट लढवय्या सरदारास शिवरायांवर पाठविले. सिद्दीने पन्हाळ्यास वेध घातला. या परिसरातील प्रचंड पावसाळ्यात वेढा चालविणे विजापुरी फौजेला अशक्य होईल हा पन्हाळ्यावर असलेल्या महाराजांचा अंदाज चिवट सिद्दी जौहरने खोटा ठरविला. वेध अधिकच कडेकोट करून सिद्दी गडाखाली ठाण मांडून बसला. मराठ्यांनी वेढ्याबाहेरून केलेल्या हल्ल्यांना मोडून काढीत सिद्दी गडावर मारा करू लागला. वेढ्यात अडकून चार महिने झाले आणि शिवरायांनी यापुढे पन्हाळ्यात रहाणे स्वत:ला आणि राज्याला अपायकारक ठरणार हे ओळखून वेढ्यातून निसटून जायचे ठरवले. तहाची बोलणी चालू करून काही प्रमाणात शिवरायांनी सिद्धीचे सैन्य गाफील बनविले. पन्हाळ्यातून बाहेर पडण्याचा दिवस निश्चित करण्यात आला.
निवडक एक हजार मावळे बरोबर घेऊन दुर्गम मार्गाने विशाळगडाकडे भर पावसात रात्रीच्या अंधारात गुपचूप निसटण्याच्या या योजनेत चाहूल लागून शत्रू पाठीवर आलाच तर त्याला हूल देण्यासाठी शिवा काशीद यांची एक वेगळ्या कामावर योजना करण्यात आली. पन्हाळ्या शेजारच्या नेबापूर गावच्या नाभिक समाजाच्या शिवा काशीद या वीराने महाराजांच्या पेहरावात दुसऱ्या पालखीत बसून नेहमीच्या मार्गाने प्रयाण केले तर महाराज आडवाटेने विशाळगडाकडे निघाले. विजापुरी सैन्याला चकवा देऊन महाराज वेढ्याबाहेर पडले पण सिद्दीच्या गस्ती पथकांना त्यांची चाहूल लागली आणि विजापुरी सैन्य पाठलागावर निघाले. घोड्यावरून पाठलाग करणाऱ्या सिद्दीच्या सेनेच्या तावडीत शिवा काशीद सापडले. महाराज सापडले या आनंदात त्यांना सिद्दीसमोर आणण्यात आले. पण महाराजांना ओळखणाऱ्या फाजलखानाने हे महाराज नाहीत असे सांगताच सिद्दी हाधरला.
ते महाराज नसून शिवा काशिद आहे.
सिध्दीने त्यास विचारले , " मरणाचे भय वाटत नाही का? ".
त्यावर शिवा काशिद म्हणाला, " शिवाजी राजेसाठी मी हजार वेळा मरावयास तयार आहे, शिवाजी राजे कोणास सापडणार नाहीत ".
हे उत्तर ऐकून रागाने चिडून सिद्दीने भाल्याने भोसकून शिवा काशिदचे शीर कलम केले. पण या सर्व घटनांनी शिवरायांना विशाळगड गाठण्यास लागणारा बहुमोल जादा वेळ मिळवून दिला.

महाराजांचे रूप घेऊन विजापुरी सैन्याला फसविण्याचे पर्यवसान आपल्या मृत्यूमध्ये होणार हि पूर्व कल्पना असूनही मृत्यूला सामोरे जाण्याचे साहस दाखविणारे हे शिवा काशीद .इतिहास ही त्याचा पराक्रम विसरु शकणार नाही,कारण शिवा काशिद सारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले. यांना मनाचा मुजरा..........!!!

मृत्यू - १३ जुलै १६६०
समाधीस्थान - पन्हाळा, जि. कोल्हापूर

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६३




शिवरायांचे शिलेदार - सेनापती संताजी घोरपडे

संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे (१६८९ ते १६९७) सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला,मुघल सैनिकां मध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल छावण्यांवर हल्ले हे त्यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यू समयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या एका मोहिमेचा हा किस्सा .......

शंभूराजानंतर राजाराम महाराजांनाही आता औरंगजेब वाट मोकळी करत नव्हता त्यामुळे पन्हाळ्या वरूनच राजाराम महाराज राजकारभार पाहत होते. सर्व मराठा मावळ्यांमध्ये एक शल्य होते आणि ते म्हणजे संभाजी महाराजांसाठी काहीच करू शकलो नाही ,मनात ठासून राग भरला होता पण याला पर्याय काय ? कोण घेणार पुढाकार ? कोण राखणार स्वराज्य ? कोण राखणार शिवरायांची शान ? कोण मिळवून देणार मावळ्यांचा आत्मविश्वास ? आणि याचा उद्रेक शेवटी होणार तो झालाच.मराठा सरदारांच्या गुप्त बैठका सुरु झाल्या.. कसे उट्टे काढायचे ? कसा बदला घ्यायचा ? त्या औरंग्याची दात घशात कशी घालायची ? कसे दाखवायचे मराठ्यांचे सळसळते रक्त ? कोण येणार पुढे ? गुप्त सल्लामसलतीमध्ये आघाडीवर होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, सोबतीला संताजींचे दोन बंधू बहिर्जी आणि मालोजी सोबत विठोजी चव्हाण तसेच आणखी काही शूर सेनानी..या गुप्त बैठकीत धाडसी बेत ठरला कि औरंग्याला त्याचाच छावणीत घुसून लज्जित करायचा..त्याचा पाडाव करायचा. त्यात सोन्याहून पिवळी एक गोष्ट म्हणजे शंभूराजांचा बदला तुळापुर येथेच करायचा कारण औरंग्या इथेच होता.. (तुळापुर जिथे संभाजीराजांना मारण्यात आले) चर्चा झाली.. निर्णय ठरला.. धनाजीरावांकडे पाहत संताजी घोरपडे म्हणाले “खानाचा माज तुम्ही जिरवा फलटणला आणि मी खुद्द २००० निवडक मावळ्यान्सोबत औरंग्याला मराठ्यांचा रुद्रावतार दाखवितो, दाखवितो मराठे आजही आहेत.. तुमास्नी आसमंत दाखवायास”या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे इतके सोपे नव्हते परंतु संताजींनी सर्व मोहीम नियोजनबद्ध आखली, दस्तुरखुद्द संताजींनी एका एका मावळ्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा जोश वाढविला आणि प्रसंगी संयम राखण्याचा सल्ला दिला.. हळूहळू संताजींची हि तुकडी तुळापुरकडे कूच करू लागली, औरंग्याला त्यावेळी विचारसुद्धा नव्हता कि अशी त्याची वाट मावळे लावतील,भयान अंधारातून पायवाट काढली जाऊ लागली, झाडाझुडपाचा, पालापाचोळ्याचा आणि रातकिड्याचा आवाज कानी घुमू लागला.. तुळापुर जसजस जवळ येत होत तसतस मुघलांची घुबड दिसू लागली.रात्रीची भयाण शांतता तुळापुरभोवती पसरलेली होती.. त्यावेळेस काही मराठी लोकांच्या फौजही औरंग्याकडे होत्याच त्यामुळे मुघल सैन्याला वाटले आपलीच माणसे असतील……. आणि नेमका याच गोष्टीचा आणि या अंधाराचा फायदा घेत मावळ्यांची तुकडी थेट औरंग्याच्या छावणीत घुसली,काही कळायच्या आतच मावळ्यांनी “हर हर महादेव” चा जयघोष करत आणि “जय भवानी, जय शिवाजी” या नावाने मोघलांची अक्षरशः कत्तलच सुरु केली शीर धडावेगळे होत होते, कुठे नुसती रक्ताची चिळकांडी दिसून येत होती.औरंग्यासोबत अख्खी त्याची लाखोंची सेना भांबावून गेली होती, या अवस्थेत ते स्वतःच्याच सैन्यासोबत युद्ध करू लागलेबरगडीत मराठ्यांच्या तळपत्या तलवारी घुसून बाहेर पडू लागल्याने तडफडत जीव सोडू लागले.एकच हल्लकल्लोळ सुरु झाला परंतु तरीही संताजींचा एक मनोदय फसला तो म्हणजे औरंग्याला भुईसपाट करायचा अंगरक्षकांनी अक्षरशः पळवूनच नेले त्याला. जेवढे प्रचंड नुकसान करता येईल तेवढे करत करत शेवटी औरंग्याचा तंबुच उखडून टाकला.. औरंग्याचा डेरा भुईसपाट करून त्याचा सुवर्ण कलश निशाणी म्हणून घेऊन संताजींनी मावळ्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला.याअगोदर कि औरंग्याची सेना तयार होईल छोट्या छोट्या तुकडीत विभागून संताजींनी मावळ्यांना शेवटी मोहीम सिंहगडाकडे कूच करण्याचा आदेश दिला…. मोहीम फत्ते झाली होती.

रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा .......!!!

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६२




शिवरायांचे शिलेदार - सुर्यराव काकडे
छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र : सुर्यराव काकडे

सुर्यराव हे छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते. रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.शिवरायांनी 'सुरराव काकडे दोन हजार हासम जावळीवर रवाना केले.' असा मोर्‍याच्या बखरीमध्ये उल्लेख आहे.सुर्यराव यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला.त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली.ते एकून पातशहा कष्टी झाला, नि म्हणाला,' काय इलाज करावा,लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले.आता कोण पाठवावे 'तेव्हा पातशहाने 'शिवराय जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही'असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले. मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले 'तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले.' हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे'अशी पत्रे पाठविली.
त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव,सुर्यराव तर दुसरीकडून पेशवे,उभयता सालेरीस आले,आणि मोठे युध्द झाले.सभासद बखरीत याचा उल्लेख् खालील प्रमाणे आढळतो ''चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल,पठाण,रजपूत,तोफांचे,हत्ती, उंट आराबा घालून युध्द जाहले.युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडालाकी,तीन कोश औरस चौरस,आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले,पूर वहिले.रक्ताचे चिखल जाहले.मराठांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला.युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली.या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता,पैकी १० हजार माणसे कामीस आले.सहा हजार घोडे,सहा हजार उंट,सव्वाशे हत्ती तसेच खजिना,जडजवाहीर,कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली.
या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली.सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला.ते तोफेचा गोळा लागून पडले. 'सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे.भारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा,असा शूर पडला.' विजयाची बातमी शिवरायांकडे गेली. राजे खूप खूश झाले.खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत,मोरोपंत पेशवे,आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले. हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो,पातशहा असे कष्टी जाले. 'खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवरायांसच दिधली असे वाटते.
आता शिवराय अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे.आता शिवरायांची चिंता जीवी सोसवत नाही.'असे बोलिले.मोगलांच्या सैन्याशी समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता,त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता.असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.या युध्दात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युध्दकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला.साल्हेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला.त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६१




शिवरायांचे शिलेदार - मदारी मेह्त्तर.

आग्र्यास हिरोजी बरोबर आपला जीव धोक्यात घालून शिवरायांचे प्राण वाचवणारा एक मुस्लीम तरुण मदारी मेह्त्तर, राज्याभिषेकावेळ ी एका कोपऱ्यात उभारलेल्या मदारी ला महाराजांनी बोलावले आणि विचारले"मदारी बोल तुला काय देवू?
मदारी काही बोलला नाही महाराज म्हणाले "तू मागशील ते मी तुला देईन".........
मदारी नम्रपणे म्हणाला "मला काही नको फक्त आपल्या सिंहासनाची व्यवस्था ठेवण्याचे काम मला द्या" महाराज हसले आणि त्याची विनंती मान्य केली इतकेच नाही तर त्याला सोन्याचे कडे आणि वस्त्रे बहाल केली.....
तर असे होते शिवरायांचे काही स्वामिनिष्ठ शिलेदार त्यांना मानाचा मुजरा.....!!!!!!

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
मराठ्यांचा नाद खुळा….!!

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६०




शिवरायांचे शिलेदार - वीर बाजी पासलकर

वीर बाजी पासलकरांच्या शेवटच्या समयीचा, काळजाचा ठाव घेणारा, त्यांचा आणि महाराजांचा संवाद माझ्या वाचनात आला... तो तुमच्या सगळ्यांच्या वाचनासाठी... || गडवाट !! या facebook वरील ग्रौप मधील एका पोस्टचा (-by Vishal Pednekar) संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे.

बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले ! आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.
कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती !
पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला - शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले !
पालखी उतरुन त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,"बाजी,आम्हाला असं पोरकं करून कुठे चाललात?" राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,"आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणाऱ्या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्‍हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातु सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !....." राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली.....

त्यांच्या पवित्र स्मृतीला माझे शतश: नमन !!

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥