कोणतही शिवकाव्य येथे शोधा

कमळगड


किल्ल्याची उंची: ४२०० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: महाबळेश्वर
चढाईची श्रेणी: सोपी
जिल्हा: सातारा
तालुका: वाई
महाबळेश्र्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत.धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध कमळगड हा दिमाखदार किल्ला उभा आहे.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणेएरवी आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत. गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरी चे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायऱ्याही आहेत. हीच ती गेरूची किंवा कावेची विहीर, उंच अशा या ५० – ५५ पायऱ्या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथ-यांचे अवशेष दिसतात.नैऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्र्वराचे पठार, कोळेश्र्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोयरिक कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. मूळ मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्याने प्रसिद्ध झाले. थोर संत कवी वामन पंडित यांचीही जवळच भोमगावाला समाधी आहे.गडावर जाण्याच्या वाटाकमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.महाबळेश्र्वरच्या केट्स पॉईंट वरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खो-यात उतरले की सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदवणे गावी पोहचतो. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते.वाईहून नांदवणे गावी येण्यास सकाळी ९.३० वाजता एस.टी. बस आहे.इतर गावांतून उत्तरेकडून वाळकी नदीच्या खो-यातील असरे, रानोला वासोळे गावीही वाईहून एस.टी. ने येता येते.वासोळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठाच्या दिशेने चढणीस सुरुवात केली असता आपण साधारण एक ते दीड तासातच माचीजवळ येतो. वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसऱ्या अंगाला खोलदरी आहे. पुढे गेल्यावर यू टर्न घेऊन पाऊण तासा नंतर आपण किल्ल्याच्या मुख्य पहाडावर येतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसते. येथून थोडे पुढे ५ – १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊल वाटेने तसेच वर गेले की १५ – २० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र आपण मोकळ्या मैदानावर येतो. येथे धनगरांची वस्ती आहे. याच पठारावरून आपणास कमळगड पूर्णपणे दृष्टीपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहेगडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिरात पाच – सहा जण राहू शकतात.गडावर पाण्याची नाही, गोरखनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आहे.