
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
किल्ल्याची उंची: ३०५० फुट
चढाई श्रेणी: मधम
जिल्हा: पुणे
तालुका: मावळ
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या दक्षिणेला साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेला आणि चढण्यासाठी सोपा असा हा किल्ला कोरीगड. घाटमाथ्यावर असल्यामुळे एकाच वेळी कोकण व देशावरील परिसराने विस्तृत दर्शन घडते. तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यावर कोराईदेवीचे मंदिर व मोठे तळे पहाण्यासारखे आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. बुरुजावरुन कोकणातील मुलुखाचे विहंगम दृश्य दिसते.
मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचे नाव आहे कोरबारस मावळ. याच मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्याकडे असणाऱ्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्यःस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे या भागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड या सारखा सुंदर टेकही या भागात आपल्याला करता येतो.
इतिहास
इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कोराईगड लोहगड, विसापुर, तुंग, तिकोना या किल्ल्याबरोबर स्वराज्यात सामील करून घेतला.
११ मार्च इ.स. १८१८ रोजी कर्नल प्रार्थरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली. या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही ही इंग्रजांना मिळाला.
गडावरील पाहण्याजोगी ठिकाणे
कोराई देवीचे मंदिर गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर उंच आहे.
गडावरील एकूण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ लक्ष्मी मंदिराजवळ आहे.
गणेश टाके गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कड्याच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात.
गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. तिसरी वाट खाजगी आहे एम्बी व्ह्यालीतून खाजगी डांबरी रस्ता थेट पायऱ्यापर्यंत जातो. किल्ला चढण्यासाठी साधारण ६०८ पायऱ्या असून गडचढाई सोपी करतात.
१. पेठ-शहापूर: कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आय.एन.एस. शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी, किंवा सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि भुशी धरणाच्या पुढे, आय.एन.एस. शिवाजीच्या पुढे २२ कि.मी वरील पेठ-शहापूर गावात उतरावे. या गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला पायऱ्यांशी घेऊन जाते. पायऱ्यांच्या सहाय्याने वीस मिनिटांत गडावर पोहचता येते.
२. आंबवणे गाव: कोरीगडला जाण्यासाठी आंबवणे गावातूनही जाता येते. ही वाट मात्र जरा अवघड आहे. या वाटेने जाण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेकडे अथवा थेट आंबवणेकडे जाणारी बस पकडावी. गावातून अर्ध्या तासात गडावर जाता येते.
कोराई गडावरील मंदिरात राहण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वतःच करावी. गडावर पाण्याची सोय नाही, गडावर दोन तळी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पेठशहापूर मार्गे गडावर येणाऱ्या वाटेवर दरवाजाच्या अलीकडे एक टाके आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे वापरावे. गडावर जाण्यासाठी पेठशहापूर मार्गे अर्धा तास लागतो.
टीप: स्वतःचे वाहन असल्यास घनगड, कोरीगड, तुंग आणि तिकोना असे चार किल्ले एकाच दिवशी करता येतात.
माहिती साभार: विकी सोनपेठकर